वादात या कुणीही सहसा पडू नये..

Submitted by मी मुक्ता.. on 17 February, 2011 - 03:38

घालोत वाद नेते, आपण चिडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये..

असतात भास सारे, काही खरे नव्हे
येता सुगी जराशी, कोणी उडू नये..

येईल दु:ख आता, जळता उगाच का?
पण तोवरी सुखाचा, डंका झडू नये..

आहेच अंत याला, सोसायचे किती
रामायणे पुन्हा रे, असली घडू नये..

का आज टोचली रे, मजला मिठी तुझी
पैलूस रे हिर्‍याचे, कोंदण नडू नये..

तो देश चांदण्यांचा अन् वाट दूरची
घालेल घाव नियती, आपण अडू नये..

करुया करार आता नात्यात आपल्या,
तू बोलवू नये अन् मी तडफडू नये..

गुलमोहर: 

मी मुक्ता,

गजल फारच मस्त जमलीय आणी खूप आवडली पण!
काफिया मधे उकार -हस्व (उडु, घडु) का घेतला आहे कळले नाही. वृत्ताची मागणी पणा दीर्घ ची आहे. विचार करून योग्य वाटल्यास दुरुस्ती करावी.
पाचव्या शेरातील दुस-या ओळीत पण वृत्त भंग झाल्या सारखा वाटतो " हि-यास" हा शब्द गा गा ल असावयाला हवा.आपण वापरलेला शब्द ल गा ल असा झाला आहे.
बाकी मस्त! शुभेच्छा.

काफिया मधे उकार -हस्व (उडु, घडु) का घेतला आहे कळले नाही. वृत्ताची मागणी पणा दीर्घ ची आहे. विचार करून योग्य वाटल्यास दुरुस्ती करावी.
पाचव्या शेरातील दुस-या ओळीत पण वृत्त भंग झाल्या सारखा वाटतो " हि-यास" हा शब्द गा गा ल असावयाला हवा.आपण वापरलेला शब्द ल गा ल असा झाला आहे.

निशिकांतशी सहमत.
कल्पना आणि द्विपदी आवडल्या.

निशिकांतजी, क्रांतिजी,
धन्यवाद... बदल केलाय.. हिर्‍यावर विचार चालु आहे... माझ्या नजरेतुन सुटला तो शेर कसा तरी.. Sad ह्म्म.. बघते..

धन्यवाद निशिकांतजी,
मी केलाय बदल.. अर्थाच्या दृष्टीने हिरकणीपेक्षा हिराच ठेवलेलं जास्त बरं वाटलं मला.. कसा वाटतोय बघा..

असतात भास सारे, काही खरे नव्हे
येता सुगी जराशी, कोणी उडू नये.>>> शेर आवडला.

(मी ऑक्टोबर २०१० मध्ये एक घटना अनुभवली पर्सनल आयुष्यात, तिच्याशी फार मिळताजुळता वाटला. हे अवांतर!)

धन्यवाद!

धन्यवाद ह.बा.

खूप आभार बेफिकीरजी,
माझ्या शेराचं (अवांतर.?) यश समजते मी त्यात.. Happy

करुया करार आता नात्यात आपल्या,
तू बोलवू नये अन् मी तडफडू नये..
वा!!! किती सहज जमलाय (असे वाटते)!!!

सुगी आणि नियतीही छान! Happy

घालोत वाद नेते, आपण चिडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये..

मुक्ता,
लई भारी ..सल्ला !
तब्येतीसाठी देखील हा सल्ला उपयोगी आहे ..
Happy

असतात भास सारे, काही खरे नव्हे
येता सुगी जराशी, कोणी उडू नये
....बढिया है मुक्ताजी