मोडी लिपीचे देवनागरी लिपीकडे स्थित्यंतर कसे झाले?

Submitted by सानी on 20 January, 2011 - 08:29

आपली मराठी भाषा फार पूर्वी 'मोडी' ह्या लिपीत लिहिली जायची.
मला प्रश्न असा पडलाय, की मोडी लिपी सोडून देवनागरीकडे आपण कसे काय वळलो? त्यामागची कारणे काय?
विकीपीडीयावर मराठी विषयी माहिती लिहितांना मराठी हा शब्द देवनागरी आणि मोडी अशा दोन्ही लिपींमधे लिहिलेला आहे.

तसेच लिपीच्या नष्ट होण्याविषयी माहिती लिहितांना तिच्यातल्या क्लिष्टतेमुळे छापतांना होणार्‍या गैरसोयीचे कारण दिलेले आहे.

मोडी विषयी अधिक माहिती इथे वाचता येईल.

हे सगळे वाचल्यानंतरही माझ्या मनात अनेक दिवस घोळत असलेल्या प्रश्नाचे नीट उत्तर मिळत नाहीये. कोणाला माहिती असल्यास कृपया सांगावे. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पूर्वी मोडी लिपीचे निरिक्षण केले होते, तेंव्हा आता तमिळ लिपी शिकत असतांना त्या दोन्ही लिपींमध्ये बरेच साधर्म्य आढळून आले.

माझे आजोबा पूर्वी पत्र लिहितांना काही अक्षरे वेगळ्या पद्धतीने लिहायचे. मला आता नेमकी ती अक्षरे कोणती, हे आठवत नाहीये... पण त्यांच्यावर बहुदा मोडीचा प्रभाव असावा.

असे काही दाखले आठवत असल्यास ते ही सांगावेत!

सानी, मला नक्की कळलं नाही तुला काय अपेक्षीत आहे Uhoh
मोडी ही देवनागरीची "रनिंग लिपी" आहे. काही अक्षरं त्या दृष्टीने बदलली गेली - लिहिण्याची सोय म्हणून अन लिहिता लिहिता बदलत गेली. नक्की काय हवे ते कलले तर प्रयत्न करू शकेन... मी मोडी शिकले आहे, काही काळ थोडे वाचनही केले होते... अर्थात आता बर्‍याच वर्षात सवय नाहीये, पण प्रयत्न केला तर थोडे वाचू शकेन Happy

सानी, देवनागरीने मोडीवर अतिक्रमण केले अशा काहीशा अर्थाची तुझी पोस्ट अथवा शन्का वाटते. (नसेल तर उत्तम)
वर अवलने लिहिल्याप्रमाणेच, मोडी ही देवनागरी ऐवजी, व त्या काळात बोरुने हात न उचलावा लागता लिहीण्यास सोईची अशी विकसित केली गेली, तिच्यातही कालानुरुप बदल घडले असतील सुधारणा झाल्या असतील.
तिचा "र्‍हास" वा वापरातुन नष्ट होण्यास छपाईसंबधातीलच कारण शक्य आहे.
ज्या काळात रोमन छपाई शक्य होउ लागली त्यानन्तर, अठराव्या शतकाच्या मध्य/उत्तरार्धात, देवनागरीची (खास करुन संस्कृतकरता) छपाई शक्य होऊ लागली (एक सहज सन्दर्भः १९०५-६ दरम्यान केव्हातरी सावरकरान्चे १८५७चे स्वातन्त्र्यसमर या पुस्तकाचे हस्तलिखित जर्मनीमधे पाठवले होते, पण तेथिल कामगारांस सन्स्कृत समजु शकत होते मराठी नाही, जरी लिपी देवनागरीच असली तरी, त्यामुळे त्यान्ना ते भारतात छपाईसाठी पाठवावे लागले - यातिल नेमकी मजकुर समजुन घेण्यातली तान्त्रिक अडचण अशा स्वरुपाची असू शकेल की मजकुर पुर्वी माबोवर जसे रोमन मधे मराठी लिहिले जायचे तसे हस्तलिखित, व ते उच्चार न समजल्यामुळे-अवगत नसल्यामुळे खिळे जुळणी अशक्य असे काहिसे).
याव्यतिरिक्त पेन्सिल / पेन वगैरेन्चा शोध आगामी काळात लागल्यावर बोरुने लिहीण्याचे प्रमाण कमी झाले, व्यवहारात इन्ग्रजी आले, टाईपराईटर आला व कालौघात मोडी लिपी "गरज सम्पल्याने" मागे पडली! माझ्या आईपर्यन्त, म्हणजे स्वातन्त्र्यपूर्व काळात शाळातून मोडी शिकवली जायची, स्वतन्त्र देशात ते देखिल मागे पडले, संस्कृत थोडीफार शिकवतात, सध्या देवनागरी शिकवतात हेच नशिब म्हणायची वेळ आलीये, कारण आईबापच पाल्ल्यान्ना बिगारीपासून इन्ग्रजी माध्यमात घालतात, तेव्हा हे सानी, अजुन पाचपन्चवीस वर्षानन्तर तुझी मुले/नातु-पणतु, इथे मायबोलीवरच जर विचारू लागले की देवनागरी नाहिशी कशी झाली तर त्याबद्दल मला आश्चर्य वाटणार नाही Proud कदाचित माझा नातु-पणतु तेव्हा उत्तर देऊ शकेल अशी अपेक्षा करतो Lol
असो, जोक्स अपार्ट, जुने कागदपत्र वाचायला मोडी शिकणे अपरिहार्य आहे, मी आईकडून शिकलो नाही याचा खेद आहे, जर नाही शिकलो वा पुढील पिढ्यान्ना शिकवली, तर नै नै तो "ब्रिगेडी इतिहास" आमच्या पुढच्या पिढ्यान्च्या नशिबी येईल हे मात्र मी खात्रीने सान्गू शकतो!

सानी, मला विशेष माहिती नाही मोडी बद्दल. काही वडिलांकडून मिळल्यास इथे लिहीन.
सद्ध्या फक्त वाचन करणार आहे. जाणकारांनी अधिक लिहावे.

लिंबूकाका, नेहमीप्रमाणे उत्तम पोस्ट.

अवल, लिंबूदा आणि मंदार, खुप खुप धन्यवाद! Happy

अवल, मला ह्या विषयावर बर्‍याच शंका आहेत. २-३ दिवस माबोवर येऊ न शकल्याने उत्तर द्यायला उशीर झाला...

मोडी ही आपली जुनी लिपी आहे. तू दिलेल्या माहितीप्रमाणे मोडी ही देवनागरीची "रनिंग लिपी" आहे. काही अक्षरं त्या दृष्टीने बदलली गेली - लिहिण्याची सोय म्हणून अन लिहिता लिहिता बदलत गेली. याचा अर्थ मोडीपासून बदलत गेलेली आणि त्यानुसार विकसित झालेली देवनागरी ही भाषा आहे, असा अर्थ होतो... मग हिंदी, संस्कृत आणि नेपाळी ह्या तीन भाषांबद्दल काय?

नेपाळी भाषेचा इतिहास पहाता ११ व्या शतकात ब्राह्मी पासून देवनागरी विकसित झाली आणि १२ व्या शतकापासून वापरात यायला सुरुवात झाली. (अधिक माहितीसाठी हे वाचा. )

याउलट, हिंदी ही भाषा देवनागरीत १९५६ सालापासून लिहिली जाऊ लागली. (अधिक माहितीसाठी हे वाचा. )

संस्कृत भाषेविषयी बोलायचे झाले, तर "भारताच्या ज्या ज्या प्रदेशात जी लिपी लोकांची मातृभाषा आहे त्या लिपीत संस्कृत भाषा लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखित अनेक भाषांत लिहिले जात असे; परंतु आता मात्र संस्कृतग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते." (अधिक माहितीसाठी हे वाचा. )

आता मराठीकडे वळूया.... मोडी ही १३ व्या शतकापासून २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेची प्रमुख लेखनपद्धती होती. लिंबूदा म्हणाले, त्याप्रमाणे देवनागरीने मोडीवर अतिक्रमण केले अशा काहीशा अर्थाची माझी पोस्ट अथवा शंका वाटते आणि दूर्दैवाने ते खरं आहे!!!! आणि यातच माझ्या पोस्टचा मथितार्थ दडलेला आहे. मराठीतले सगळे जुने साहित्य, इतिहास ह्या लिपीत लिहिला गेला आहे. असे असतांना केवळ सोयीसाठी म्हणून आपण आपली ही लिपी सोडून दिली? इतक्या सहजपणे? लोकांनीही देवनागरी सहजपणे स्वीकारली का? की त्या काळात काही विरोधही झाला?

ही लिपीतल्या स्थित्यंतराच्या कालावधीतली प्रक्रिया काय आणि कशी होती, हे जाणून घेण्याचे मला कुतुहल आहे. दुसर्‍या एका धाग्यावर (इतिहासात कुणी आणि का रमावे?) सध्या चालू असलेल्या चर्चेत त्या धाग्याच्या लेखकाने मांडलेल्या एका मतानुसार जर प्रगल्भपणे इतिहासात डोकावले, तर हरकत नाही. म्हणूनच लिंबूदांनी वर लिहिलेले खरे होऊ नये, (तेव्हा हे सानी, अजुन पाचपन्चवीस वर्षानन्तर तुझी मुले/नातु-पणतु, इथे मायबोलीवरच जर विचारू लागले की देवनागरी नाहिशी कशी झाली तर त्याबद्दल मला आश्चर्य वाटणार नाही) म्हणून या विषयावर चर्चा व्हावी, हे माझे प्रामाणिक मत आहे.

कोणतीही भाषा ही माणसामाणसातल्या संवादाचे माध्यम असते आणि त्यावरुन निष्कारण वाद होऊ नये, हे तर खरेच आहे. परंतु, भाषेमुळे माणसाला एक ओळख मिळत असते, अशा ह्या भाषेला व्यक्त करणार्‍या लिपीसंदर्भात आपण उदासिन असू नये, ही एकच इच्छा. आपल्या ह्याच उदासिनतेमुळे जर आपण मोडी गमावून बसलो असलो, तर निदान तिच्या स्मृती तरी कधीतरी जागृत कराव्यात.... ती भाषा कशी होती? तिच्या अनुषंगाने आपल्या जुन्या पिढीतल्या लोकांच्या काय आठवणी होत्या? ती नामशेष होत असतांना कसे पडसाद उमटले, हे सगळे जाणून घ्यावे असे मला वाटते आहे. ह्याविषयी माहिती असणार्‍यांनी त्यावर जरुर प्रकाश टाकावा...

आता मी माझा मुद्दा नीटपणे मांडू शकलेय असे मला वाटते... Happy प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

सानी, मला विशेष माहिती नाही मोडी बद्दल. काही वडिलांकडून मिळल्यास इथे लिहीन.
>>>>>

मंदार, "काही वडिलांकडून" म्हणजे रे काय????? फिदीफिदी हाहा

माझ्या आजोबांना मोडी येत असे. पण त्यापुढच्या पिढीत ती राहिली नाही.

लिंबू, मला अगदी नीट आठवतेय आमच्या अंकलिपीत, म्हणजे हि गोष्ट १९६८-७० सालातली आहे, मोडी अक्षरे असत. अंकलिपी छापलेलीच असल्याने छापण्याचे कारण तेवढे संयुक्तीक नसावे. पण आम्हाला कधी ती शिकवण्यात आली नाही. मी स्वतः बोरुने कित्ता गिरवला आहे, पण त्यातही मोडी लिपी नव्हती.
कदाचित त्या लिपित काही लघुरुपे वापरात असावीत. काही अजून प्रतिकरुपाने उरलीत. उदा. साहेब या अर्थाने, लग्नपत्रिकेत वगैरे सो काढून त्यापुढे एक काना दिला जात असे. (अर्थात हा माझा अंदाज आहे.)

सानी, माझ्या आठवणीत ल हे अक्षर आम्ही वेगळ्या रितीने लिहायचो. ल लसणीतला म्हणायचो आणि त्या अक्षराचा आकारही लसणासारखाच असे. आणि इथला जो ल आहे, तो हिंदीतला मानण्यात येत असे.

धन्यवाद दिनेशदा! Happy

साहेब या अर्थाने, लग्नपत्रिकेत वगैरे सो काढून त्यापुढे एक काना दिला जात असे. >>>
सो....हे अशा पद्धतीने सरकारी कार्यालयात अजूनही लिहिले जाते. माझी आई तसेच सो लिहिते. हे मोडीतले लघूरुप होते का, हे मात्र माहित नाही...
शिवाय मला फ सुद्धा हिंदीतला वेगळा आठवतो आहे. दोन्ही भाषांची लिपी ही देवनागरीच असतांना हा फरक कसा? हा ही प्रश्न आहेच! कुणी सांगावे? त्यावर मोडीचा प्रभाव असू शकतो.

अंकलिपी छापलेलीच असल्याने छापण्याचे कारण तेवढे संयुक्तीक नसावे. >>> सहमत दिनेशदा! आणि नीट निरिक्षण केले, तर अनेक भाषांची लिपी रनिंग प्रकारचीच आहे. उदा. तमिळ. मग त्यांना नसेल का अवघड जात? तेंव्हा मराठीचेच अचानक देवनागरीकरण कसे झाले हा प्रश्न उरतोच...

शिवाय मला फ सुद्धा हिंदीतला वेगळा आठवतो आहे.
'झ' सुद्धा हिंदीत वेगळ्या प्रकारे लिहील्या जाई. थोडासा 'भ' सारखा. 'झांसीकी रानी' सिनेमाला आम्ही कित्येक दिवस 'भांसी की रानी ' म्हणत असू. खरे तर आजकाल जो 'ल' लिहीतात तोहि हिंदीतून आलेला आहे. मराठीत आम्ही 'ल' वेगळा लिहीत असू.

मी लहानपणी शाळेत मोडी शिकलो आहे.

जर देवनागरी फाँट बनवले नसते तर मराठीहि रोमन लिपीत लिहिल्या गेली असती. अगदी सुरुवातीला बरेच लोक मायबोलीवर तसेच लिहीत. श्री. किरण भावे यांनी प्रथम मायबोलीला देवनागरीकरणाचा फाँट दिला असे मला आठवते.

पण आजकालच्या मराठी भाषेतील इंग्रजी शब्दांचे प्रमाण पहाता हळू हळू देवनागरी जाऊन तिथेहि रोमन, चिनी किंवा उर्दू लिपी केंव्हा येईल ते सांगता येत नाही. नाहीतरी बर्‍याच लोकांना मराठी साहित्यापेक्षा उर्दू, इंग्रजी साहित्यच आवडते, मग करायची काय मराठी नि देवनागरी? असे आपले मला वाटते.

झक्की, बरोबर, मलाही आठवते.. भांसी की रानी हिंदी शिकतांना ज्या काही थोड्याफार गंमती झाल्या, त्याही ह्याच ३-४ अक्षरांमधल्या फरकांमुळे...
दिनेशदा आणि तुम्हीही शाळेत मोडी शिकलात, हा उल्लेख केला आहे. तेंव्हाच्या काळात देवनागरी आणि मोडी असे दोन्ही शिकवत असत का? आणि बाकी सगळे विषय कुठल्या लिपीत शिकवत?

नाही आम्हाला मोडी शिकवली नाही. फक्त आमच्या अंकलिपीत होती.
झक्की म्हणताहेत तो झ, बर्‍याच काळापर्यंत वापरात होता. पद्मिनी कोल्हापूरे आणि मिथुन चक्रवर्ती, यांच्या एका सिनेमाला पण आम्ही प्यार भुकता नही, असे म्हणायचो. (हि साधारण १९८६ ची गोष्ट असणार.)

हिंदीतला अ पण वेगळा होता, तो साधारण प्र सारखा दिसत असे.

शब्दांखाली नुक्ता जसा इथे फ / फ मधे येतो, तो मराठीत नव्हता. सपाटीकरणामूळे आलाय तो.

रनिंग लिपीचे म्हणायचे तर फारसी लिपी तशी आहे. प्रत्येक शब्दातले प्रत्येक अक्षर (शेवटचे अक्षर सोडले, तर ) पुढच्या अक्षराला जोडलेले असते. पण काही अक्षरे शब्दात मधे आली तरी जोडली जात नाहीत. प्रत्येक अक्षराचे शब्दाच्या मधे येणारे रुप आणि शेवटी येणारे रुप वेगळे असते. तरी ती लिपी टाईप केली जाते, छापलीही जाते.

मोडीपासून बदलत गेलेली आणि त्यानुसार विकसित झालेली देवनागरी ही भाषा आहे,........नाही नाही अस्ण नाही.. माझ्या म्हणण्याचा जरा वेगळा अर्थ घेतला.... आधी देवनागरी... मग लिहिण्याच्या सोई साठी मोडी... अन लिहिताना मोडीतच काही अक्षरं बदलत गेली ... असं म्हणायचय मला...

मराठीतले सगळे जुने साहित्य, इतिहास ह्या लिपीत लिहिला गेला आहे. .
हे ही मला नाही बरोबर वातत.... मोडीमधे प्रामुख्याने सरकारी कागदपत्रे/ पत्रव्यवहार आहे... पण साहित्य... पोथ्या..... हे देवनागरीतच असे....
मोडी ही देवनागरी पेक्षा जलद लोहिता येणारी.... त्या काळी प्रत्येकाला लिहिण्याची(देवनागरी वा मोडी) फार सवय नसे.... तसेच दरबारात लेखनिक असे.... त्यामुळे राज्यकर्त्याने सांगायचे अन या लेखनिकाने लिहायचे अशी प्रथा होती... मग फारतर राज्यकर्ता आपली मोहोर/ सही/ किंवा त्यांचे म्हणून काही अक्षरे लिहित... ही सहसा देवनागरीत असत.... म्हणजे एकाच कागदावर मोडी अन देवनागरीही असे.....

असे म्हणतात की कर्नाटकात बेंगळूरू जवळ श्रवण बेळगोळाचा प्रचंड मोठा पुतळा आहे, त्याच परिसरात दगडावर कोरलेले वाक्य मराठीतले पहिले आहे म्हणे. (चामुंडराये करविले....). ते देवनागरीतच लिहीले आहे असे आठवते. कुणाला माहित असल्यास त्याचा उल्लेख या विषयाला धरून होईल असे वाटते.

झक्की, हाच तो श्रवण बेळगोळाचा प्रचंड मोठा पुतळा... देवनागरीतली अक्षरे स्पष्ट दिसावीत म्हणून पुतळ्याच्या फक्त पावलांचा प्रचि टाकते आहे.
मूर्तीच्या एका पावलाशेजारी लिहिलेले "चामुंडराये करविले" हेच असावे बहुतेक... दुसर्‍या बाजूची अक्षरे बहुतेक कन्नड भाषेत लिहिलेली असावीत!

Shravanabelagola.jpgShravanabelagola2.jpg
(प्रचि: अंतर्जालावरुन साभार!)

माझ्या लहानपणी ई ७ वी पर्यंत शाळेत मोडी लिपी शिकवली गेली होती. त्याची परीक्षा फक्त वाचनापुरतीच असे. नंतर माझ्या वाचनात आले होते की सध्याची गुजराती व बंगाली लिपी या त्या त्या भाषांतल्या लघुलिप्याच होत्या जशी आपली मोडी. जेव्हा पुस्तके छापली जाऊ लागली तेव्हा मराठी पुस्तके देवनागरी लिपीत तर गुजराथी, बंगाली पुस्तके त्यांच्या लघुलिपीत छापली जात असत. त्याचा परिणाम म्हणून देवनागरी ही मराठीची अधिकृत लिपी तर इतर भाषांच्या लघुलिपी या त्यांच्या अधिकृत लिपी ठरल्या. १९५० - ५२ च्या सुमारास मोडीलिपीचा व्यवहारात उपयोग नाही म्हणून ती शाळांतून शिकवणे बंद केले.
तमिळनाडूत तंजावूर येथे राजा सर्फोजी वाचनालयात बरीच मराठी हस्तलिखिते मोडीतच आहेत.

अवलच्या वरील पोस्टला अनुमोदन
माझ्या आई/आज्जी, तसेच वडिलान्कडुन परम्परागत हेच शिकलो की देवनागरी लिहीण्यास वेळ घेते म्हणून मोडी वापरात आली. देवनागरीने मोडीवर अतिक्रमण केले वगैरे बाबी मला "लाल बावट्याचे शिन्तोडे" वाटतात Proud
माझे वडील त्यान्च्या प्रारम्भिक आयुष्यात काही काळ न.चि. केळकरान्कडे लेखनिक म्हणूनही काम करित होते (अन अर्थातच त्यावेळच्या ब्राह्मणी प्रथेनुसार त्यान्च्याकडे व इतर वेगवेगळ्या घरी "वारांवर" जेवायला असत). शन्कराचार्यान्च्या मठात सात वर्षे राहून शिकलेली वेदविद्या व नन्तरच्या काळात इन्ग्रजी शिक्षण यातुन त्यान्ना कधी कुठे हा साक्षात्कार झाला नाही/कुणी घडवला नाही की देवनागरीने मोडीवर आक्रमण केले!
प्रत्यक्षात पाहू जाता छ्पाईचे कारण हेच सयुक्तिक वाटते, दिनेशदा, आजही अप्पाबळवन्त चौकात मोडीलिपीच्या बाराखडीचे पुस्तक मिळते, माझ्याकडेही आहे, पण ते तसे आहे म्हणजे १८५० च्या नन्तरच्या काळात, जेव्हा हे तंत्रज्ञानच युरोपमधुन आयात होत होते, (जर्मन लोक तेव्हाही संस्कृत शिकत होती व त्यान्ना संस्कृत उच्चार देवनागरीशी जोडता येत होते, मोडीशी नव्हे, याचाच अर्थ परभाषीयान्ना शिकवायला देखिल त्या शतकातही देवनागरीच वापरली जात होती, जसा वर पोथी वगैरेचा सरकारी लेखनीकाशी तुलना करण्याकरता उल्लेख झालाय) तर त्यान्च्या सोईनुसार, मोडी ऐवजी देवनागरीस प्राधान्य मिळणे म्हणजे देवनागरीने मोडीवर आक्रमण करणे असा होत नाही, तर इन्ग्रजी अंमलात मोडीकडे (कदाचित जाणूनबुजुन वा सर्वदूर एक लिपी असावी अशा उद्देशाने) तुलनेत कमी लक्ष पुरवले गेले. शिवाय, मूळात ब्राह्मी पासून देवनागरी वगैरे "विषय" अनाकलनीयच आहेत, इतकेच होते, तर मग ब्राह्मी देखिल वापरातून नष्ट का झाली? देवनागरीने आक्रमण केले? मग सध्या देवनागरी कोण वापरते? कोण पुरस्कर्ते? असा सगळा रोख आहे या विषयाचा! असो.
मूळ तथ्य हेच की, मोडी लिपी ही काहीशी "इन्ग्रजी करता शॉर्टह्याण्ड" जशी वापरली जाते, तशाच प्रकारे, पण बरीचशी कोणालाही वाचता येईल अशा प्रकारे बनवलेली, जलद लिखाणाची लिपी होती, व ती देवनागरीपासूनच, देवनागरीनन्तर सोईकरता बनवली गेली. कालौघात गरज न उरल्याने नष्ट झाली.
अन गरज उरली नाही म्हणजे काय तर, इन्ग्रजी अंमलात, हिन्दुस्थानी सत्ताधार्‍यान्च्या आश्रयाने तगुन रहाण्यास राजेरजवाडेच उरले नाहीत, व जे काय संस्थानिक होते त्यांस अधिकारही इतके नव्हते की रोजच्या रोज आज्ञापत्रे (मोडीतुन) धाडावीत Proud
मात्र देवनागरीचे संवर्धन म्हणण्यापेक्षा "जतन" हे त्या त्या काळच्या पोथ्यापन्डितान्नी चिकाटीने करुन ठेवले व त्याचाच परिपाक म्हणून पुढे देवनागरी जशी पूर्वी होती तशीच टिकून राहिली. अन्यथा, मोडीवर देवनागरीने आक्रमण केले का हा प्रश्न जो तुम्ही आज विचारताय, त्या ऐवजी, हाच सगळा मजकुर तुम्ही रोमन लिपीत व कोणत्यातरी फ्रेन्च्/इन्ग्लिश भाषेत लिहीला अस्तात व विचारले अस्तेत की भारतीय भाषा/लिप्या कुणाच्या प्रभावामुळे नष्ट झाल्या? कदाचित हल्लीच्या "मनु" प्रमाणे वैदिक ज्ञानोपासना करणार्‍या विशिष्ट "वर्गाला" त्याबद्दल दोषही दिला अस्तात.
असो, या बाबी म्हणजे जरी आत्याबाईला मिशा अस्त्या तर... च्या धर्तीचा वाटतात. पण यातही तथ्य आहे, व तेच तथ्य मी "मोडीवर देवनागरीचे आक्रमण" या विषयातून व्यक्त होणार्‍या-जाणवणार्‍या विषारी काट्याकडे वेधतो आहे.

जाताजाता: इ.स. १७८० च्या आसपास लोहगडावर नाना फडणवीसाने आमचे घराण्यातील पूर्वजाचे द्वारे करवुन घेतलेल्या एका भल्या थोरल्या "बावे" संदर्भात (विहीर) जो शिलालेख लिहीला आहे, तो देवनागरी मधेच आहे, मोडी मधे नाही! याचाच अर्थ, वेळ घेऊन लिहावयाच्या वेळेस देवनागरी, व जलद लिहावयाच्या वेळेस मोडी वापरात होती असा होत नाही का?
वर संस्कृत बद्दल एक उल्लेख आहे निरनिराळ्या स्थानिक लिप्यान्चा! तो खराही आहे, मात्र...... आजही, देवनागरीमधुन वाचल्या/उच्चारल्या गेलेल्या वैदिक संस्कृत साहित्याचे उच्चार हे अन्य कोणत्याही लिपीमधुन वाचल्या गेलेल्या उच्चारांपेक्षा अधिक अचूक असतात, असे जाणकार सांगतातच, शिवाय कोकणातील विशिष्ट वर्गाची वैदिक संस्कृत उच्चारणे ही सर्व भारतभर सर्वाधिक अचूक्/शास्त्रशुद्ध मानली जातात. (कृपया यास कोर्टाप्रमाणे पुरावे वगैरे मागू नयेत, माझ्याकडे पारम्पारिक माहितीव्यतिरिक्त नाहीयेत, पटले नाही तर सोडून द्या, इतकेच)

सानी,

वर एका पोस्ट मध्ये तुम्ही 'मतितार्थ' असे लिहिले आहे,
योग्य शब्द 'मथितार्थ' (मथित (मंथन करून आलेला) अर्थ = मथितार्थ)

बाकी अवल आणि लिंबूदांच्या पोस्टींशी सहमत.

पंत, कॉलिंग पंत!
लिहा मोडीबद्दल काय तरी, शिकलाय न्हवं?

ओह, मथितार्थ अस लिहायच अस्त होय, बर झाल सान्गितल
मी आजवर उच्चारण (लहानपणी ऐकल्याप्रमाणे सवईने) बरोबर तरी लेखन मात्र "मतितार्थ" असेच करत होतो Sad

माझे आजी आजोबा त्यांची bank मधील सही मोडीत करत व त्यामुळे तिची नक्कल कोणाला करता येणार नाही याचा त्यांना अभिमान होता!

सर्वांचे अनेक आभार!!!

चैतन्य, ते खरंच मथितार्थ आहे की तुम्ही इथे चाललेल्या मंथनावरुन ते मजेने लिहिलंय? कृपया सांगा म्हणजे मी खरंच बदल करायचा की नाही ते ठरवू शकेन...

पंत, तुम्ही मोडी शिकला असाल आणि त्याविषयी तुम्हाला काही सांगण्याजोगं असेल, तर नक्की सांगा.

बहुमुल्य माहितीबद्दल रविंद्र प्रधान आणि लिंबूदांचे विशेष आभार!!!

लिंबूदा, तुमचा ह्या विषयावरचा अभ्यास गाढा आहे. ते देवनागरीचे मोडीवर आक्रमण ही माझी शंका विकी आणि इतर काही दुव्यांमुळे निर्माण झालेली होती. ज्यामुळे मी अस्वस्थ झाले होते, म्हणूनच तडक मायबोलीवर चर्चेसाठी आले. विषारी काटा वगैरे नाही. शंकेतून निर्माण झालेली बोच मात्र होती.
भारतातल्या अगदी मोजक्या भाषांची देवनागरी ही लिपी आहे आणि त्यातली एक मराठी आहे, ह्यातले वेगळेपण नेहमीच विशेषत्वाने जाणवायचे. त्यातच माझ्या ओळखीतले तमिळ भाषिक त्यांच्या भाषेसंदर्भातील चर्चेत ज्या प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख करतात, त्यातला एक म्हणजे त्यांची लिपी हा होय. २ हजार वर्षांहून जुनी अशी त्यांची लिपी त्यांनी अजूनही जतन केलेली आहे. त्यामुळेच आपल्या भाषेच्या मूळ लिपीसंदर्भात माझ्या मनात अनेक दिवसांपासून निर्माण झालेली शंका अधिक बळावली. तुम्हा सर्वांच्या लेखनातून आता बर्‍यापैकी स्पष्ट झाले आहे, की मोडी आणि देवनागरी अशा दोन्ही लिपी मराठीसाठी पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि कालौघात मोडी लोप पावली, हे कुठल्याही दबावातून नाही तर सावकाश आणि नैसर्गिकपणे घडत गेले. ही सकारात्मक माहिती मिळाल्याने बरंच वाटतंय... Happy

सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद! Happy

धन्यवाद चैतन्य! अतिशय चांगला दुवा आहे. बदल करत आहे. न जाणो आपल्याही नकळत आपण असे किती शब्द चुकीच्या पद्धतीने वापरत असू... अपरोक्ष हा ही तसाच एक शब्द!

मोडीविषयी अत्यंत रंजक अशी माहिती आत्ताच एका ब्लॉगवर मिळाली. तुम्हाला अभिप्रेत असलेले पंत म्हणजे ह्या ब्लॉगचे मालक धोंडोपंत आपटे का? आम्हाला माबोवरचे पंत आठवले.
हाच तो ब्लॉग! त्यावरील मजकूर इथे डकवत आहे. ब्लॉगवरील प्रतिसादही वाचनीय आहेत.

ज्याला लिहिता आली मोडी... त्याला कळली लेखनातली गोडी

|| श्री स्वामी समर्थ||

लोकहो,

या ब्लॉगावर मोडी लिपीत आम्ही लिहिलेला काही मजकूर प्रकाशित केला आणि चोखंदळ वाचकांनी मोडीबद्दल लिहा अशा सूचना केल्या. मोडी लिपीबद्दल आदर असलेला सुसंस्कृत आणि चोखंदळ वाचकवर्ग या ब्लॉगला लाभला, याचा आम्हांला फार आनंद आहे.

"मोडीबद्दल लिहा" हे आम्हांला सांगणे, म्हणजे "तुमच्या प्रेयसीबद्दल लिहा" हे सांगण्यासारखे आहे. कारण मोडी लिपीवर आम्ही प्रेयसीवर करावे तसे प्रेम करतो. त्यामुळे त्यांच्या या आग्रही मागणीची पूर्तता करण्यासाठी मोडी लिपीबद्दल हा लेख.

सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मोडी ही कुठलीही स्वतंत्र लिपी नाही. ही देवनागरीची उप-लिपी आहे. मोडी लिपीची जननी ही देवनागरीच आहे. जरी मोडीने गुजराती, कन्नड व बंगाली लिपीतील काही वर्ण घेतले असले तरी तिचा पाया हा देवनागरीचा आहे.

देवनागरी असतांना मोडी लिपी अस्तित्वात का आली?

याचे कारण असे की, देवनागरीत लिहितांना वेळ बराच वाया जातो. ही बाब पटो किंवा न पटो, पण हे वास्तव आहे. कारण प्रत्येक अक्षर सुटे लिहायचे, प्रत्येक शब्दावर शिरोरेघ मारायची, विरामचिन्हांचा वापर करायचा यामुळे लेखनाचा वेग मंदावतो.

मोडी लिपीचे जनक श्री. हेमाडपंत आहेत. त्यांचे नाव पंत हेमाद्री असे होते. हे अत्यंत विद्वान आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचे होते. ज्यावेळेस यादवांचे साम्राज्य होते त्याकाळी राजा रामदेवराव यादवांच्या दरबारात ते
"करणाधिप" या हुद्यावर होते. राज्याच्या सर्व वसुलीचे कामकाज करणे, राजकारणाबद्दल राजाला योग्य ती सल्लामसलत देणे, दरबाराचा सर्व पत्रव्यवहार पाहणे हे त्यांचे काम होते. आजच्या युगात "चीफ सेक्रेटरी" ज्याला म्हणतात तसा त्यांचा हुद्दा होता.

सहाजिकच त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार पहावा लागे. अशा वेळेस अशा एखाद्या लिपीची आवश्यकता त्यांना भासू लागली की ज्यात अत्यंत शीघ्रतेने कमीत कमी वेळात प्रचंड मजकूर लिहिता येईल. त्या गरजेपोटी त्यांनी मोडी लिपीची निर्मिती केली.

मोडी ही शीघ्रलिपी आहे. ज्याला इंग्रजीत रनिंग हॅण्ड म्हणतात तशी देवनागरीची रनिंग हॅण्ड म्हणजे मोडी.

अत्यंत शीघ्र गतीने लेखन हे जसे मोडीचे वैशिष्ट्य आहे तसेच अत्यंत सुंदर वळण हे ही तिचे वैशिष्ट्य आहे. मोडी लिपी दिसायला अतिशय सुंदर दिसते. तिचा स्वतःचा रूबाब आहे, तिच्यात नज़ाकत आहे.

आपल्या सर्वांचे पूर्वज मोडी लिपीतच लिहायचे. याचे कारण तेराव्या शतकापासून महाराष्ट्रात मोडी लिपी रुजलेली आहे. यादवकाळापासून ते शिवशाही, पेशवाई, परकीय राजवट, स्वातंत्र्यसंग्राम असे अनेक टप्पे या मोडी लिपीने पाहिलेले आहेत. छत्रपतींचा सर्व पत्रव्यवहार याच लिपीतून होत असे. सातशे वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास या लिपीमध्ये नोंदला गेलेला आहे.

सन १९५२ पर्यंत मोडी लिपी शालेय शिक्षणक्रमात होती. त्यानंतर त्यावेळच्या मूर्ख राजकारण्यांनी शिक्षणातून मोडी लिपी काढून टाकली. काही लोकांना असे वाटते की, ब्रिटीशांनी मोडी लिपी हद्दपार केली. पण तसे नाही. ब्रिटिश असतांनाही मोडी लिपी पूर्ण जोमात होती. अगदी ईस्ट इंडिया कंपनीचे पत्रव्यवहारही मोडी लिपीत होत असतं. १९४७ ला जेव्हा ब्रिटीश देश सोडून गेले त्यानंतर आलेल्या भारतीय राजकारण्यांचे हे १९५२ सालचे उपद्व्याप आहेत.

हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी म्हणून प्रादेशिक लिप्यांना नेस्तनाबूत करण्याचा एक व्यापक कट त्याकाळी शिजला होता असे म्हणतात. कारण हिंदी रुजवायची असेल तर देवनागरीच राहिली पाहिजे. मग देवनागरी सोडून इतर लिप्यांना उडवायचे. त्या हेतूने मोडी शिक्षणक्रमातून हद्दपार केली गेली असे मानणारा एक विद्वान वर्ग आहे, आणि त्यांचे हे म्हणणे पटण्यासारखे आहे.

मोडी लिपीचे सौंदर्य हा मोठा मनोरंजक आणि आल्हाददायक विषय आहे. मोडी लिपीतील प्रत्येक अक्षर हे लपेटीदार आहे. आणि अक्षरे जोडून लिहिली जातात त्यामुळे एखादी माळ गुंफल्यासारखी मोडी दिसते. तुम्हाला जे जे साधारण सत्तरी ओलांडलेले वृद्ध लोक माहित असतील, त्यांचे हस्ताक्षर पहा. त्या बहुतेकांचे हस्ताक्षर उत्तम असेल. तुम्ही या गोष्टीचे अवलोकन करा. आम्ही अनेक वृद्ध व्यक्तिंची हस्ताक्षरे पाहिली आहेत. ती अतिशय सुंदर आहेत.

आमचे आजोबा श्री. तात्यासाहेब आपटे यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. याचे कारण हे की, हे लोक लहानपणापासून मोडीत लिहायचे. त्याकाळी मोडीचा कित्ता गिरवत असतं. त्यामुळे त्यांच्या अक्षरांना सुंदर वळण लागलेलं असे.

त्यानंतरची जी पिढी आली म्हणजे जे १९५२ नंतर शाळेत गेले त्या बहुतेकांची अक्षरे ही बिघडलेली दिसतील. अर्थात अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात. पण त्या पूर्वीच्या काळात खराब अक्षर असलेला एखादा सापडे, १९५२ नंतर चांगलं हस्ताक्षर असलेला एखादा सापडतो. अशा बहुतेकांचे हस्ताक्षर पाहिल्यावर तर आमच्या मनात,

" रांडेच्यान् काय लिहिलाय तेच कळत नाही" असा विचार येतो. याचे प्रमुख कारण हे की, त्या लोकांचा मोडीशी संबंध आला नाही.

मोडी लिपीची लेखन वैशिष्ट्ये:-

मोडी लिपी ही देवनागरीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लिहिण्यापूर्वी ज्या शाईने आपण मजकूर लिहिणार त्या शाईने डावीकडून उजवीकडे एक ओळ आखून त्याखाली मोडी लिहिली जाते. प्रत्येक शब्दावर रेघ देण्याचा वेळ त्यामुळे वाचतो. तसेच पूर्वीच्याकाळी मोडी एकही शब्द आणि वाक्य न तोडता सलग लिहिली जात असे. त्यामुळे वाचणार्‍याच्या प्रज्ञेची कसोटी लागे.

म्हणून पूर्वी पत्रात, " लिहिणार्‍याचे वाचणार्‍यास दंडवत" असे लिहिण्याची प्रथा होती. कारण लेखन करणार्‍याने जे लिहिले आहे ते त्याच अर्थाने समजून घेण्याची बुद्धी वाचणार्‍याजवळ हवी.

नको तिथे वाक्य तोडून वाचले तर अनर्थ होईल. उदाहरणार्थ, आमचे एक मित्र आहेत कवी इलाही जमादार. त्यांच्या एखाद्या रचनेबद्दल लिहितांना, समजा असे लिहिले की,

कवी इलाही जमादार आहे.

हे वाक्य मोडीत लिहायचे तर ----- कवीइलाहीजमादारआहे ------ या पद्धतीने पूर्वी लिहिले गेले असते.

वाचणार्‍याने हे वाक्य नको तिथे तोडले तर --- कवी इला ही जमादार आहे --- असे वाचले जाईल आणि अनर्थ होईल. त्यामुळे मोडीत लेखन करणार्‍यापेक्षा, ते वाचणार्‍याच्या बुद्धीचा कस लागतो.

हल्ली मोडीत सुटे शब्द लिहिले जात असल्यामुळे मोडी बरीच "माणसाळलेय". नाहीतर पूर्वी मोडीला पिशाच्च लिपी म्हणत ते यामुळेच.

मोडीचे दुसरे वैशिष्ट्य हे की, मोडीत एक अक्षर अनेक प्रकारे लिहिले जाते. काही अक्षरे तर सहा सात पद्धतीने लिहिली जातात. इतकेच नव्हे तर नेहमीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिण्याऐवजी उजवीकडून डावीकडे लिहिली जातात. उदाहरणार्थ, 'च' हे अक्षर डावीकडून उजवीकडे जसे लिहिले जाते तसे उजवीकडून डावीकडेही लिहिले जाते. त्यात प्रत्येकाच्या "चॉईस" चा भाग आहे. आम्ही शक्यतो 'च' उजवीकडून डावीकडे लिहितो.

मोडीत 'र' अनेक प्रकारे लिहिला जातो. त्यात ज्या अक्षरांत बालबोध प्रमाणे काना असतो त्या कान्याला र जोडला जातो. त्यामुळे एका अक्षरात दोन अक्षरे लिहून होतात.

मोडीत काही अक्षरे अशी आहेत की ज्यात अत्यंत सूक्ष्म भेद किंवा प्रचंड साम्य आहे. लेखन करतांना त्यांच्या वळणावर नीट लक्ष ठेऊन लिहावे लागते. अक्षराचे वळण जरा चुकले की अनर्थ होतो. उदाहरणार्थ,
"कौलांवर पक्ष्यांचा थवा दिसत होता" या वाक्यात थ लिहितांना गडबड झाली आणि थ चे वळण चुकले तर "कौलांवर पक्ष्यांचा खवा दिसत होता" असे वाचले जाईल. त्यामुळे प्रत्येक अक्षराचे वळण नीट येईल ही काळजी घ्यावी लागते.

तसेच मोडीचा महत्त्वाचा भाग म्हणजे र्‍हस्व दीर्घाची भानगड मोडीत नाही. सर्व उकार हे र्‍हस्व आणि सर्व इकार दीर्घ. कितीही खटकलं तरी ते तसचं लिहायचं. लेखनाचा वेग महत्त्वाचा. बाकी विचार करायचा नाही. उदाहरणार्थ, कविवर्य राजा बडे यांची

चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले.... ही ओळ मोडीत.... चांदणे शींपीत जाशी चालता तु चंचले...

अशीच लिहिली जाईल. किंवा सुरेश भटांची

दूर दूर तारकातं, बैसली पहाट न्हातं...... ही ओळ मोडीत.... दुर दुर तारकातं, बैसली पहाट न्हात....

अशीच लिहिली जाईल. किंवा

जिवलगा राहिले रे, दूर घर माझे... ही ओळ मोडीत.... जीवलगा राहीले रे, दुर घर माझे

अशीच लिहिली जाईल. तिथे र्‍हस्व-दीर्घाचा पर्यायच नाहीये. अशा लेखनामुळे वृत्ताची काशी झाली का? मात्रा चुकल्या का? या चौकशा करायच्या नाहीत.

अशी आहे मोडी

या महाराष्ट्राच्या इतिहासाची राखणदार बनून राहणारी, सातशे वर्षांचा इतिहास स्वतःमध्ये साठवून ठेवणारी, छत्रपतींची पत्रे सौभाग्यलेण्यासारखी मिरवणारी, तुकोबांच्या अजरामर अभंगाना स्वत:चे कोंदण बहाल करणारी, अत्यंत कमी वेळात लेखकाला भरपूर मजकूर लिहून देणारी, वाचणार्‍याच्या डोक्याचं खोबरं करणारी, विरामचिन्हे टाळणारी, सलग लेखनामुळे दुर्बोध ठरणारी, विविध लिपीतील वर्ण घेऊनही स्वत:ची मिजास दाखवणारी, लिहिणार्‍याला वरदहस्त देणारी, वाचणार्‍याला वेठीस धरणारी, शुद्धलेखनाचे कोणतेही नियम न पाळणारी, शब्दसंक्षेप वापरून लेखनाची गती वाढवणारी, अनेक शब्द चुकीच्या पद्धतीने लिहूनही त्याची खंत न बाळगणारी, शुद्धलेखनाचा आग्रह धरणार्‍यांना फाट्यावर मारणारी, तिची खडतर साधना आणि सराव करणार्‍यालाच वश होणारी, एकदा वश झाली की आयुष्यभर त्याला लेखनाचा निखळ आनंद देणारी..... आणि

स्वतःच्या सौंदर्याने पाहणार्‍याचे हृदय घायाळ करणारी, त्याच्या हृदयाचे सिंहासन काबीज करून त्याची मल्लिका बनणारी...

त्या मोडी लिपीला आणि तिचे जनक श्री. हेमाडपंत यांना आमचा दंडवत. मोडी नसती तर आम्ही कसे लिहिले असते? असा प्रश्न आम्हाला अनेकदा पडतो.

कारण मोडीने जी लेखनाची मजा दिली ती अन्य कुठल्याही लिपीने दिलेली नाही. तसेच मोडीचा पदर 'हाती लागल्यावर' आम्ही सुद्धा इतर कुठल्या लिपीचा 'दामन' हाती यावा अशी अपेक्षा केली नाही.

कारण ज्याला मोडी येते त्याला इतर कुठल्या लिपीत लिहावे असे वाटत नाही. उत्तम भोग हाती आला की दुय्यम भोग वृत्तीतून वजा होतो अशी मानवाचीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांची प्रवृत्ती आहे.

ज्यांच्या घरात मांजर आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा. भुकेल्या मांजराला दूध पोळी खायला द्या. ते आवडीने खातं. ते खात असतांना त्याच्या समोर पापलेट, सुरमई धरा. मांजर दूधपोळी सोडून पापलेटच्या मागे जातं. उत्तम भोग मिळाला की लगेच दुय्यम भोग वजा होतो.

किंवा एखादा कवी असतो. सुरूवातीस कविता लिहितो. मग त्याला गझल लिहायचे तंत्र साधतं. एकदा तो गझलेकडे वळला की बहुतकरून गझलच लिहितो. असे आहे.

मोडी आली की जे काही लिहाल ते मोडीतच यायला लागतं. म्हणूनच म्हणावसं वाटतं,

ज्याला लिहिता आली मोडी... त्याला कळली लेखनातली गोडी

आपला,
(मोडीप्रेमी) धोंडोपंत

सानी, धोन्डोपन्ताचा मजकुर अन लिन्क दिलीस हे फार छान केलेस Happy

विषारी काटा वगैरे उल्लेख मी तुमच्याकरता केला नव्हता, तर "अशा प्रकारचे "सम्भ्रम / बुद्धिभेद" लोकान्चे मनात निर्माण व्हावेत असा फार मोठा प्रयत्न होतो आहे निरनिराळ्या क्षेत्रात, त्या प्रयत्नास उद्देशून "विषारी काटा" असे म्हणले आहे. अर्थात वरील धोन्डोपन्तान्चा मजकुर व लिन्क देऊन, तुम्हीच परस्पर हा टोचलेला विषारी काटा काढून त्यावर उतारा केलात हे उत्क्रुष्ट झाले Happy

पूर्वी कस? "छापिल ते ते सत्य" असे मानले जायचे, हल्ली "इन्टरनेटवर आलय म्हणजे ते ते सत्यच" असा काहीसा भाव तयार होताना दिस्तोय! Happy व या समजुतीला धरुन इन्टरनेटवर भल्याबुर्‍या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, सामान्य माणूस वर वर वाचतो, आशय लक्षात ठेवतो, अन स्वभाषेच्या स्वलिपीबद्दलच एक प्रकारची न्युनगन्डाची / अपराधीपणाची भावना बाळगुन बसतो, जे होणेच अशा प्रकारच्या कन्ड्या पसरविणारांस व्हायला हवे असते. तुम्ही, माबोवर येणे, तो धोन्डोपन्तान्चा ब्लॉग शोधणे वगैरे कष्ट घेतलेत, तसे सामान्यपणे कुणी घेत नस्तो, वर वर वाचतो, जो काय कळला तो "आशय" मेन्दून ठासतो अन पुढे चालू पडतो. अहो इथे वेळ कुणालाय असल्या प्रश्नान्च्या मूळाचा शोध घ्यायला अन समजुन घ्यायला? अन गरजही काये? त्याने पोट थोडीच भरते? अन यालाच "बहुजनसमाज" म्हणतात!

पोटार्थाची भूक न भागविणार्‍या या अशा विषयातील, तुमच्या अभ्यासपूर्ण चिकाटीबद्दल तुमचे विशेष अभिनन्दन!

धन्स मवा! Happy

लिंबूदा... Happy Happy Happy

अवल... काय मस्त धागा उघडलायस... ह्या धाग्याला अगदी पूरक आहे! Happy

Pages