हृदयविकार का होतो?

Submitted by नरेंद्र गोळे on 26 January, 2011 - 21:10

श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत. हा लेख औषधोपचार अथवा आहार विषयक मार्गदर्शक सल्ला देणारा लेख नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. हे लेख ही माझीच अभिव्यक्ती आहे. इथे व्यक्त झालेली माहीती ही कुठल्याही पुस्तकाचे आधारे लिहावी असे प्रयोजन नाही. हे संदर्भलेखन नाही.

प्रस्तावना: ह्या रोगाची आणि त्याच्या उपायांचीही अवस्था 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी आहे. इथे हे नमूद करायला हवे की हे लिखाण निराधार नाही. हे लेखन कुठल्याही पुस्तकाचे भाषांतर नाही. मौलिक आहे. बखरनुमा आहे. हे केवळ अनुभवातून/वाचनातून आलेले शहाणपण आहे. ह्या लेखनाच्या आधारे 'सम्यक जीवनशैली परिवर्तनास' सामान्यजनांनी सिद्ध व्हावे, कर्मठपणे ते आचरावे आणि हृदयरोगच नव्हे तर इतरही अवनतीकारक रोगांना आपल्यापासून दूरच ठेवण्यात यश मिळवावे अशी माझी अपेक्षा आहे. ह्या लेखनाचा आपल्या सार्‍यांच्याच आरोग्यस्थितीवर सकारात्मक, सत् प्रभाव पडू शकेल तेंव्हाच ते यशस्वी झाले असे समजता येईल.

हृदयाघात का होतो?: शरीर निचरा करू शकते त्यापेक्षा जास्त, मेदयुक्त पदार्थ सतत खात राहिल्यास, शरीर त्यांची विल्हेवाट लावू शकत नाही. त्यामुळे त्यांचे साठे शरीरात साचू लागतात. धमनींच्या भींतींवर मेदाची पुटे चढतात. ह्या पुटांना धमनीअस्तर म्हणतात. हृदयधमनीत अशा प्रकारे साचणार्‍या सांख्यांमुळे धमनीची रुंदी कमी होते. धमनीअस्तर जर पुरेसे कठीण नसेल तर, कधी कधी पुंजक्यांच्या स्वरूपात सुटते आणि रक्तात उतरते. अडचणीच्या ठिकाणी, म्हणजे अरुंद झालेल्या हृदयधमनीत जाऊन तिला आणखीनच अरूंद करते.

जखम झाल्यास ती त्वरित बंद व्हावी म्हणून शरीर-रचनेतच रक्ताला साखळण्याचा गुणधर्म दिलेला असतो. मात्र शरीरांतर्गत जखमांच्या प्रकरणात रक्त साखळल्यास त्याची गुठळी होते. अशी गुठळी अडचणीच्या ठिकाणी, म्हणजे अरुंद झालेल्या हृदयधमनीत जाऊन तिला आणखीनच अरूंद करते. आपले स्नायू सतत आकुंचन-प्रसरण पावतच असतात. मात्र अनेकदा ते मनोव्यापारांवर अवलंबूनही आक्रसतात. त्याचप्रमाणे धमन्याही आक्रसतात. उदाहरणार्थ, समजा गाडी सुटते आहे तेंव्हा ती पकडण्याची निकड शरीरात अनेक घडामोडी घडविते. त्यातीलच एक म्हणजे हृदय धमनीचे आक्रसणे. ह्याला धमनी-आकष म्हणतात. अरुंद झालेल्या हृदयधमनीत, धमनीअस्तर सुटून लोंबकळत आहे, काही कारणांनी निर्माण झालेली रक्तगुठळी येऊन ठेपलेली आहे, अशाच अवघडलेल्या क्षणी जर काही कारणाने रुग्णाच्या मनात तीव्र घडामोडी घडल्या (तणाव उत्पन्न झाले) तर धमनी-आकष होतो आणि उरलीसुरली हृदयधमनी पूर्णतः बंद होऊन हृदयविकाराचा झटका येतो.

हृदयाघाताची पूर्वसूचना:
आपण सारेच हा प्राणघातक आजार बाळगत असतो. आपले हृदय कितपत प्रभावित झालेले आहे याची आपल्याला कल्पना नसते आणि मग आपण आपल्या शरीराने दिलेल्या पूर्व संकेतांकडे पुरेसे लक्ष देण्यात अपयशी ठरतो. याकरता, हे जाणणे आवश्यक असते की हृदयाघाताच्या पूर्वसूचना काय असतात.

उच्च रक्तदाब हा सुप्त, प्रगतीशील आणि प्राणघातक विकार समजल्या जातो.

सुप्त या अर्थाने की त्याची लक्षणे शरीरावर दिसू लागतात. तोपर्यंत तो आहे अशी शंकाही रुणाला अथवा त्याच्या नातेवाईकांना येत नाही. स्वतः काही बोलू नये असे वाटणे, इतरांनीही फार बोलू नये असे वाटणे, साध्या साध्या आवाजांची कलकल सहन न होणे, चिडचिड होणे अशी कारणे हळूहळू प्रकट होऊ लागतात. मात्र पावलांवर सूज येणे, प्रचंड थकवा, श्वसनहीनता जाणवणे ही प्रगत लक्षणे दिसू लागेपर्यंत रक्तदाब खूपच (१६०/१००) वाढलेला असू शकतो.

प्रगतीशील या अर्थाने की एकदा वाढू लागलेला रक्तदाब 'सम्यक जीवनशैली परिवर्तनाव्यतिरिक्त' इतर उपायांनी (म्हणजे रक्तदाब कमी करणार्‍या गोळ्यांनी) क्वचितच नियंत्रणात येतो. दिसामासी वाढतच राहतो. कारण शरीरावर त्याच्या उत्सर्जक शक्तीबाहेर टाकलेला खाद्यपदार्थांचा भार. विशेषतः तेल, तूप, साखर आणि मीठ या मानवनिर्मित संहत पदार्थांचा भार.

प्राणघातक यासाठी की असाच अनियंत्रित वाढू दिल्यास रक्तदाबाने अचानक मृत्यू संभवतो. रक्तदाब शरीरात किती दिवसांपासून, महिन्यांपासून अथवा वर्षांपासून ठाण मांडून बसलेला आहे याचे निदान आवश्यक असते. मग करायला सांगतात रक्ततपासणी. रक्तातील मेदाची रूपरेषा (लिपीड प्रोफाईल). आपले नेहमीचे काम करीत असतानाही आपल्याला थकवा जाणवतो. आजूबाजूचे सर्व लोक आपआपली कर्तव्ये यथासांग बजावत असताना उगाचच 'थकलो बुवा' असे म्हणत नाहीत. मात्र आपल्यालाच थकवा वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. व्यायामानंतर, परिश्रमांनंतर, उत्तेजनेनंतर अथवा रागावल्यावर श्वास घेण्यास त्रास जाणवतो. अपुरी श्वसनक्षमता हे हृदयविकाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

शारीरिक श्रमांनंतर आणि खाल्ल्यानंतर छातीत अस्वस्थता जाणवते. तिच्याकडे दुर्लक्ष करू नये. छातीच्या मध्यावर वेदना सुरू होते. ती डाव्या हाताकडे व कधीकधी उजव्या हाताकडे पसरत जाते. चालल्यावर डाव्या हाताकडे व पाठीकडे पसरत जाणारी वेदना जाणवते. ह्या वेदनेस हृदयशूळ (अंजायना पेन) म्हणतात. पोटातील वातामुळेही अशी वेदना जाणवू शकते. मात्र ही वेदना काही खाल्यावर, प्यायल्यावर अथवा थोडेसे चालल्यावर कमी होऊ शकते. खाल्यावर, प्यायल्यावर अथवा थोडेसे चालल्यावर, हृदयशूळ मात्र वाढू शकतो. अर्ध्या तासापर्यंत जर वेदना शमली नाही, तर ती हृदयशूळ असण्याची शक्यता दाट असते.

हृदयाघात अगदी नजीकच्या भविष्यात येऊन ठेपलेला असेल तर दरदरून घाम सुटतो (आंघोळ घातल्यागत), प्रचंड थकवा जाणवतो. श्रम केल्यास हृदयशूळ वाढतो. परसाकडची भावनाही होऊ शकते. मात्र अशावेळी क्षणाचाही विलंब करू नये. वैद्यकीय मदत मिळवावी. डॉक्टर धमनीविस्फारक औषधे देऊन रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला देतात. एकदा हृदयाघात झाला तर दरम्यानच्या काळात हृदयस्नायूच्या ज्या भागास रक्तपुरवठा बंद पडतो तो भाग कायमचा मरण पावू शकतो. म्हणून अर्ध्या तासाच्या आत तातडीच्या मदतीची गरज असते.

हृदयविकार व श्वसनक्षमता यांचे नाते: इतर रोगांमध्ये जसे स्टेथोस्कोप छातीवर लावून निदान करतात, त्याउलट हृदयविकारात पाठीवर स्टेथोस्कोप लावून श्वसनक्षमतेचे निदान करतात. श्वसनक्षमता ऑलिम्पिक खेळाडूंमध्ये १५ टक्केपर्यंत असू शकते, सामान्य लोकांत ती पाच ते दहा टक्के असते तर हृदयरुग्णांमध्ये ती २.५ टक्क्यांपर्यंत घटलेली सापडते.

कापडी टेपने छातीत पूर्णपणे श्वास भरून घेऊन छातीचा घेर मोजावा. समजा तो 'भ' सेंटीमीटर आहे. कापडी टेपनेच छातीतील उच्छवास पूर्णपणे निष्कासित करून छातीचा घेर मोजावा. समजा तो 'र' सेंटीमीटर आहे. तर भ उणा र भागिले र ह्या संख्येस शंभरने गुणल्यास टक्क्यांमध्ये श्वसनशक्ती मिळते. ही श्वसनशक्ती कुणीही, कधीही मोजू शकतो. ती वाढवावी. वाढल्याची नोंद ठेवावी. असे नेहमी केल्यास अवनतीकारक रोग आसपासही फिरकणार नाहीत.

श्वसनशक्ती कशी वाढवावी? उत्तरः प्राणायामाने. योगासनांनी. व्यायामाने. मात्र हे सारे करण्याचे प्रयोजन श्वसनशक्ती वाढविणे हे असले पाहिजे. ३० अधिक वयात छातीचा पिंजरा पूर्णपणे तयार झालेला असतांना श्वसनशक्ती वाढते कशी? तर आपण छाती जास्त फुगवून अधिक प्राण भरून घेऊ शकत नसलो तरीही छाती पूर्णपणे रिकामी करून अंतरंगातील साठलेला कर्ब-द्वि-प्राणिल पूर्णपणे निष्कासित करण्यात यशस्वी होतो. आपली छाती जास्त मोकळी होऊ लागते आणि श्वसनशक्ती वाढू शकते.

हेच साधण्याचा भरकस प्रयत्न करावा. प्रयत्न केल्यास श्वसनक्षमता निरंतर वाढतच राहते. तिची अंतीम मर्यादा बहुधा कुणीच गाठत नाहीत. सामान्यतः आपण आपल्या शक्यकोटीतील श्वसन क्षमतेच्या १०-१५ टक्केच क्षमता श्वसनासाठी वापरत असतो. जे उर्वरित ८५-९० टक्के क्षमतेचा प्रभावी वापर करू शकतात ते निरोगी, दीर्घायुष्याचे वरदान मिळवतात. शरीर ही ईश्वराची सर्वांगसुंदर रचना आहे. आपल्याला कल्पनाही नसते एवढ्या क्षमता त्याच्यात कायमच अंगभूत असतात. म्हणूनच जीवघेण्या आजारांनंतरही लोक पूर्णतः सामान्य जीवन जगू शकतात.

उच्च रक्तदाब: उच्च रक्तदाब म्हणजे हृदयविकाराचे कारण आहे की उच्च रक्तदाब हृदयविकाराचे पर्यवसान आहे, हा वाद 'अंडे आधी की कोंबडी आधी' असा आहे. मात्र दोघांचाही परस्परांशी घनिष्ट संबंध आहे आणि हेही खरेच की आपल्या आजकालच्या बैठ्या, श्रमविहीन, खाद्यविपूल राहणीमानामुळे ह्या दोहोंचा जन्म होतो. म्हणूनच विशेषतः सदरहू वर्णनाचे जीवनमान धारण करणार्‍या ३० अधिक वयाच्या प्रत्येकाने वर्षातून किमान चारदा आपला रक्तदाब, वैद्यकीय व्यक्तीकडून मोजून घ्यावा आणि त्याची तपशीलवार नोंद ठेवावी.

निरोगी माणसाचा सामान्य सरासरी रक्तदाब कुठल्याही वयात, प्राणभरीत रक्त हृदयातून बाहेर टाकतानांचा दाब (systolic pressure) १२० मिलीमीटर तर अपानमिश्रित रक्त हृदयात खेचतांनाचा दाब (diastolic) ८० मिलीमीटर पारा पातळी इतका असतो. तो १२०/८० असा लिहीतात. हल्ली १४०/१०० रक्तदाब आढळल्यासही 'तो तुमच्या वयासाठी (४० वर्षे) सामान्य आहे' अशा प्रकारची वाक्ये ऐकू येतात, ती सर्वथैव निराधार आहेत. वयोमानानुसार हृदयधमन्यांमध्ये कीट साठून धमनीकाठीण्य येते. धमन्या लवचिक राहत नाहीत, व कीटामुळे अरुंदही झालेल्या असतात. म्हणून त्यांमधून रक्त ढकलण्यासाठी हृदयास रक्तदाब वाढवावा लागतो. हेही रक्तदाब वाढण्याचे एक कारण असते.

मात्र, आवश्यक तेवढाच निरामय आहार घेणार्‍या निरोगी माणसात वयपरत्वेही धमन्या लवचिकच राहतात आणि कीट चढून अरुंदही होत नाहीत. म्हणून अशा लोकांत रक्तदाब कोणत्याही वयात १२०/८० असाच राहतो. आपलाही तेवढाच राहावा असा आपण आग्रह धरावा. मात्र ह्यासाठी औषधांचा, शस्त्रक्रियांचा आग्रह धरून उपयोग होत नाही. योग्य त्या 'सम्यक जीवनशैली परिवर्तनाने' हे निश्चित रूपाने साधता येते. त्या शैलीबाबत संपूर्ण चर्चा आपण यथावकाश करणारच आहोत.

हल्ली १३०/९० रक्तदाबास दखलपात्र न समजण्याची प्रथा आहे. १४०/१०० झालेला आढळल्यास 'उच्च रक्तदाब' आहे असे मानून तो कमी करण्यासाठी औषधे देतात. १६०/१०० वा त्याहून अधिक असल्यास शुश्रुषालयात भरती करून, धमनी विस्फारक औषधे देऊन त्वरित उतरवतात. नंतर रक्तदाब कमी करणारी औषधे व मेदविदारक (कोलेस्टेरॉल कमी करणारी) औषधेही सुरू करतात. याहूनही रक्तदाब वाढतांना दिसला तर विद्युत-हृदय-आलेख (ECG: electro cardio gram) काढण्यास सांगतात. त्यात संशय गडद झाल्यास ताणचाचणी (stress test) करवतात. इथे निर्णय होतो तो तुम्हाला हृदय-धमनीविकार (IHD: Ischemic Heart Disease) आहे की नाही त्याचा. तो असल्यास हृदयधमनीआलेखन (Angiography) करवतात. ह्या चाचणीत हृदयाच्या तीन प्रमुख धमन्यात असलेले अडथळे पाहता येतात. ते ७० टक्क्यांहून अधिक असल्यास हृदयधमनीरुंदीकरण (Angioplasty) अथवा हृदयधमनीउल्लंघन (Bypass) करण्याचा सल्ला दिला जातो.

इथवर पोहोचूनही मनुष्य वैद्यकाच्या कचाट्यातून मुक्त सुटू शकतो. जर गंभीर अडथळा नसेल तर याऊपरही माणूस विनाऔषध, विनाशस्त्रक्रिया 'सम्यक जीवनशैली परिवर्तनाने' पूर्ववत निरोगी होऊ शकतो. कसा ते आपण पाहणारच आहोत.

उच्च रक्तदाब शारीरिक, मानसिक, आनुवांशिक अशा अनेक कारणांनी निर्माण होत असला तरी निवळ रक्तदाब मोजल्याने त्यामागचे कारण समजत नाही. तसेच, तो किती काळपासून तसा असावा याचे निदान येत नाही. ते जाणून घेण्यासाठी अनेक चाचण्या कराव्या लागतात. त्याविषयीही वेगळ्याने लिहायचे आहे. उच्च रक्तदाब दीर्घकाळ बाळगल्याने मेंदूतील रक्तवाहिन्या क्षीण होऊन पक्षाघात होऊ शकतो. हृदयधमन्या अरुंद होऊन हृदयाघात येऊ शकतो. हृदयाचा आकारच वाढू शकतो. डोळ्यांच्या रक्तपुरवठा उणावून दृष्टी क्षीण शकते. मूत्रपिंडे खराब होऊ शकतात. हे सर्व हानीकारक प्रभाव प्रत्यक्षात घडलेले आहेत अथवा नाही ते नक्की करण्यासाठीही विविध चाचण्या केल्या जातात. त्यांचेविषयीही स्वतंत्रपणे लिहायचे आहे.

मात्र, 'सम्यक जीवनशैली परिवर्तना' व्यतिरिक्त कशानेही प्राथमिक (ज्याचे कारण वैद्यकीयदृष्ट्या नक्की करता आलेले नाही असा) उच्च रक्तदाब सामान्य होऊन, कायम सामान्यच राहू शकत नाही. औषधाने तो केवळ तात्पुरता (औषधाचा प्रभाव असेपर्यंत म्हणजे बहुधा २४ तास, त्यानंतर पुन्हा औषध घ्यावे लागते) नियंत्रणात ठेवतात. हे उमजून घेतल्यास उच्च रक्तदाबाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आमुलाग्र बदलेल, ह्यात काय संशय?

रक्तचिकित्सा: रक्तात तीन प्रकारची कोलेस्टेरॉल आढळतात. चांगलीः उच्च सघन लिपो प्रथिने (गुडः हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन्स), वाईटः कमी सघन लिपो प्रथिने (बॅडः लो डेन्सिटी लिपो प्रोटीन्स) आणि ओंगळः ट्रायग्लिसेराईडस् (अग्लीः ट्रायग्लिसेराईडस्, ह्यांना ओंगळ म्हटलेले आहे कारण ती सूक्ष्मदर्शकाखाली ओंगळ, कुरूप दिसतात). चांगली कोलेस्टेरॉल बदाम, आळशी इत्यादींपासून मिळतात. इतर सर्व तेले, तूप इत्यादी अपायकारक सदरात मोडतात. साखरेपासून मानसिक तणावाच्या परिस्थितीत शरीर, ओंगळ लिपोप्रथिने तयार करते, ज्यांमुळे हृदयधमनीविकार बळावतो. ही कोलेस्टेरॉल मिलीग्रॅम टक्क्यांमध्ये मोजतात. चांगलीः ३०-६० असतात, जेवढी जास्त तेवढी चांगली. वाईटः १९० पर्यंत असतात, जेवढी कमी तेवढी चांगली. ओंगळः ६०-१६० असतात, जेवढी कमी तेवढी चांगली.

शरीरातील कोलेस्टेरॉलच्या ७५ टक्के कोलेस्टेरॉल शरीरच तयार करते. कच्चा माल म्हणजे शरीरात खाद्य-पदार्थातून येणारी, व विल्हेवाट लावण्यास कठीण असलेली साखर. तेव्हा 'मला मधुमेह आहे का असे विचारू नका'. साखर त्वरित कमी करा. हल्लीच्या आपल्या आहारात साखरेचा वापर खूपच जास्त झालेला आहे. रक्तात गुठळ्या होण्यास पोषक वातावरण म्हणजे रक्त दाट असणे, होणे. तेव्हा विनाऔषध, रक्त पातळ ठेवणारा आहारच पत्करा. काळ्या मनुका, लसूण इत्यादी पदार्थ रक्त पातळ करतात. सकाळी त्या थोड्याशा जरूर खाव्यात.

रक्तदाबाचे प्रभाव: निराश झालेल्यास हिंदीत अशी तसल्ली देतात की 'दिल छोटा न करो'. मात्र उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाच्या हृदयाचा आकारच त्या दाबाने वाढतो आणि तो रुग्ण 'दिल बडा' करून बसतो. पण ही स्थिती वस्तुतः निराशाजनक असते. कारण मोठे हृदय मोठ्या रक्तप्रवाहास आणि त्यानुषंगाने आलेल्या थकव्यास कारणीभूत ठरते. द्विमितीय प्रतिध्वनी चाचणीने (टू डी. इको टेस्टने) ह्याचा शोध घेतात. उच्च रक्तदाबाचा मूत्रपिंडांवरील प्रभाव शोधण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी करतात. दोन्हीही मूत्रपिंडे खराब झाल्यास सारखे रक्तबदल (डायलिसिस) किंवा मूत्रपिंडबदल शस्त्रक्रिया करावी लागते. ही सारीच प्रक्रिया मनस्तापाची, खर्चिक आणि संसर्गप्रवण असते. उच्च रक्तदाबाचा बुबुळांवरील प्रभाव फंडुस्कोपी नावाच्या चाचणीने हुडकतात. उच्च रक्तदाबाचा रक्ताभिसरणावरील प्रभाव विद्युत हृदयालेखाने तपासतात. रक्तातील मेदाच्या रूपरेषेने निश्चित करतात. हृदयधमनीतील अडथळे ताणचाचणी आणि हृदयधमनी आलेखनाने स्पष्ट होतात. उच्च रक्तदाब शरीराच्या असंख्य चयापचयांशी जवळून निगडीत असल्याने, त्याचे असणे म्हणजे शरीरात कली शिरला असावा तसे आहे.

स्वस्थतेचे निकष: हृदयविकार असतो तेव्हा आपण स्वस्थ नसतो. म्हणजे स्वस्थ असणे हे आपले इप्सित असायला हवे. मग आपल्याला स्वस्थता कशी मोजतात ते माहीत असायला हवे. एकाला विचारले की तू पौष्टिक आहार घेतोस का? तर तो म्हणाला 'हो. नेहमीच'. मग त्याला विचारले की तुला पौष्टिक म्हणजे काय ते माहीत आहे का? तर त्याने उत्तर दिले 'नाही'. आपली अवस्था नेहमी बहुधा अशीच असते. म्हणूनच स्वस्थतेच्या निकषांचा हा प्रपंच. मानवी शरीराच्या स्वस्थतेचे ढोबळमानाने तीन निकष मानल्या जातात.

१. विश्रांत अवस्थेतील हृदयस्पंदनदर कमीत कमी असणे. हृदयस्पंदनदर मनगटातील, मानेच्या बाजूने डोक्याकडे जाणार्‍या किंवा मांडीतील धमनीवर बोटे ठेवून मोजतात. पुरूषांमध्ये सामान्यतः ७२ स्पंदने दर मिनिटास तर स्त्रियांमध्ये त्याहून जास्त आढळतो. विश्रांत अवस्थेतील हृदयस्पंदनदर जेवढा कमी असेल तेवढीच प्रकृती स्वस्थ. आयुष्य दीर्घ.

२. परिश्रमाने हृदयस्पंदनदर वाढतो. वाढायलाच हवा. मात्र त्यानंतर श्रम थांबतात तेव्हा तो पूर्ववत होतो, त्यावेळी किती लवकर तो पूर्ववत होतो त्यावर स्वस्थता अवलंबून असते. जेवढा लवकर हृदय स्पंदनदर पूर्ववत होऊ शकेल तेवढी स्वस्थता अधिक.

३. एकूण कार्यक्षमता. माणूस किती वेगाने, किती काम, किती वेळ करू शकतो त्याने त्याची एकूण कार्य-क्षमता ठरते. माणसाने कामाची गती, परिश्रमाचे परिमाण अथवा परिश्रमकाल यांपैकी काहीही किंवा सगळेच वाढविल्यास हृदयस्पंदनदर वाढत जातो. मग माणूस 'थकलो' म्हणून निवृत्ती पत्करतो.

हृदयस्पंदनदर किती वाढत जातो त्याला मर्यादा असते. माणूस थकतो त्यानंतरही तो काम करत राहू शकतो. मात्र लवकरच तो अंतीम मर्यादा गाठतो. तिही ओलांडून एकूण कार्य वाढवतच नेणारा उरस्फोट होऊन मृत्यू पावतो. त्यावेळी तो जो हृदयस्पंदनदर गाठतो त्यास अंतीम हृदयस्पंदनदर मर्यादा म्हणतात. प्रत्येक व्यक्तीसाठी ही मर्यादा जाणून घेण्याचा एक ठोकताळा आहे. २२० उणा तुमचे वय म्हणजेच तुमची अंतीम हृदयस्पंदनदर मर्यादा. साधारणपणे ह्या मर्यादेचा ७०-८० टक्के हृदयस्पंदनदर गाठल्यावर मनुष्य थकलो म्हणतो. मात्र, चुकूनही त्याने अंतीम मर्यादेच्या ९० टक्क्यांहून अधिक काम करू नये.

तेव्हा कमीत कमी विश्रांत हृदयस्पंदनदर, परिश्रम थांबविल्यानंतर लवकरात लवकर पूर्ववत हृदय-स्पंदनदर गाठण्याची क्षमता आणि एकूण जास्तीत जास्त काम करता येणे यावरून तुमची स्वस्थता ठरते. ती वाढवत नेणे हाच प्राणायाम, योगसाधना आणि व्यायामाचा उद्देश असायला हवा. अर्थातच जो स्वस्थता उंचावेल तो अवनतीकारक विकारांपासून निःसंशय आणि नक्कीच दूर जाईल. तेव्हा हे साधण्याचा आटोकाट प्रयत्न करा!

हृदयस्पंदनदर मुळातच जास्त असू शकतो का? तसा असेल तर तो आटोक्यात आणण्यास/ठेवण्यास काय करावे? प्राणायाम/योगसाधना एवढा एकच उपाय आहे का?

हृदयस्पंदनदर मुळातच जास्त असू शकतो. मात्र फार नाही. ६०-८० असा सामान्यतः असतो. तसा असेल तर तो आटोक्यात आणण्याची काहीच गरज नाही. डोंबिवलीस एक प्रकाश वेलणकर नावाचे गृहस्थ आहेत. त्यांचा लहानपणापासून ३२ ठोके दर मिनिटास असाच हृदयस्पंदनदर आहे. तो संपूर्णतः नैसर्गिक असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. ती संपूर्ण कहाणी त्यांनी '३२ हार्टबीटस्' ह्या त्यांच्या पुस्तकात नमूद करून ठेवलेली आहे. अवश्य वाचा.

प्राणायाम व योगसाधनेमुळे हृदयस्पंदनदर निःसंदिग्धरीत्या कमी होतो. एवढा एकच उपाय आहे का? नाही. उपाय अनेक आहेत. शिथिलीकरण हा एक आहे. मात्र एका विशिष्ट मर्यादेबाहेर हृदयस्पंदनदर कमी होऊन चालत नसावा. कारण त्यामुळे रक्तशुद्धीकरणाचा दर कमी होता उपयोगाचा नसतो. तुमच्या शरीराच्या क्षमतेनुरूप कमीत कमी हृदयस्पंदनदर किती असावा ते ठरत असावे. म्हणूनच प्रकाश वेलणकरांना पहिल्यांदा जेव्हा ३२-हृदयस्पंदनदर असल्याचे लक्षात आले होते तेव्हा तातडीने भरती केलेले होते.

श्वसन संथ केल्यासही उपयोग होतो. सामान्यतः मनुष्य मिनिटाला १४-१५ श्वासोच्छवासाची आवर्तने करतो. ती कमी करत न्यावी. ऋषीमुनी तपश्चर्या करत असता ५-६ श्वासोच्छवासाची आवर्तने मिनिटाला साध्य करत असावेत. माणसाच्या आयुष्यातील श्वासांची संख्या विधीलिखीत असली, तर प्रलंबित श्वसनाने आयुष्य लांबवता येईल हे उघडच आहे. मात्र, तसे खरोखरच असते का? देव जाणे!

"जीवनशैली परिवर्तन" या विषयाशी संबंधित मायबोलीवरील माझे काही लेखन खालील दुव्यांवर उपलब्ध आहे.

http://www.maayboli.com/node/23083 माझे हृदयधमनीरुंदीकरण
http://www.maayboli.com/node/23013 हृदयविकार का होतो?
http://www.maayboli.com/node/21579 एकाकीपणा आणि त्यावरचे उपाय
http://www.maayboli.com/node/12307 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-४
http://www.maayboli.com/node/12306 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-३
http://www.maayboli.com/node/12291 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-२
http://www.maayboli.com/node/12263 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-१
http://www.maayboli.com/node/12231 हृदयोपचार घेत असताना मी वाचलेली पुस्तके
http://www.maayboli.com/node/11009 आरोग्य आणि स्वस्थता यांचे निकष
http://www.maayboli.com/node/12061 हृदयधमनी रुंदीकरण
http://www.maayboli.com/node/10982 आंतरिक शक्तीचा शोध

याशिवाय,
http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीपूर्ण लेख. ४-५ महिन्यांपूर्वी माझ्या आईला आयुष्यात पहिल्यांदाच रक्तात जास्त साखर, हाय कोलेस्टरॉल, उच्च रक्तदाब असे सगळे निघाले. काळजी घेतली नाही तर त्याची हृदयरोगात परिणीती होईल अशी धमकी डॉक्टरांकडून मिळाल्यावर तिने औषधे, योग्य आहार आणि अगदी नियमित व्यायाम असे सगळे अगदी काटेकोरपणे केले आणि ३-३.५ महिन्यात सगळे मुळपदावर आणले. आता औषधे घ्यावी लागत नाहीत पण योग्य आहार आणि व्यायाम मात्र नियमित करते. तिला हा लेख वाचायला देणार आहे प्रत काढून.
धन्यवाद.

खुप छान, माहितीपूर्ण आणि सर्वांगाने लिहिलेला लेख. सगळी माहिती एकत्रित दिल्याबद्दल धन्यवाद. नेमके मराठी शब्द (जे आम्हाला कधी माहितही नसतात) अगदी सहजपणे वापरले आहेत.

व्वा, मस्त लेख Happy
काही अर्धवट माहिती होती, ती नव्याने सन्दर्भित करु शकलो
लगोलग हातोहात माझी नाडी मोजुन बघितलि, ती आत्ता तरी मिन्टाला साठ भरली! Happy
छातीचा घेर घरी गेल्यावर मोजिन अन बघेन श्वसन क्षमता! (दमेकरी अस्लो तरीही चान्गलीच असावी ती क्षमता, आशा करायला काय हरकत हे? Proud )

आयुष्यातील श्वासांची संख्या विधीलिखीत असली, तर प्रलंबित श्वसनाने आयुष्य लांबवता येईल हे उघडच आहे. >> याच करता प्राणायामाच शोध लागला असावा कां??

अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त लेख. याची लिंक मित्र-मंडळींना पाठवली तर चालेल कां?

खूपच माहितीपूर्ण लेख.
जर रक्तदाब नेहेमी कमी ( किंवा योग्यच ) येत असेल ( ११५ / ७५ वगैरे ) आणि ह्रदयस्पंदनदर सातत्याने जास्त येत असेल ( साधारण ९०-९५ स्पंदनं मिनिटाला ) तर त्यातून काय सूचित होते ?

अतिशय उपयुक्त माहिती , अन अगदी छान , सोप्या भाषेत सांगितलीय.
या विषयाशी संबंधित अजून माहिती लिहाल का - प्राणायामाची माहिती, आहार - विहार या विषयी अजून माहिती वगैरे .

रूनी पॉटर, मामी, वर्षू नील, सावली, रैना, दिनेशदा, लिम्बूटिम्बू, साधना, भ्रमर, चिंगी, अगो आणि मेधा
तुम्हा सगळ्यांचे प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

मामी,
खुप छान, माहितीपूर्ण आणि सर्वांगाने लिहिलेला लेख. सगळी माहिती एकत्रित दिल्याबद्दल धन्यवाद. नेमके मराठी शब्द (जे आम्हाला कधी माहितही नसतात) अगदी सहजपणे वापरले आहेत.>>>>
तुमच्या या मार्मिक रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा हार्दिक धन्यवाद!!

भ्रमर,
अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त लेख. याची लिंक मित्र-मंडळींना पाठवली तर चालेल कां?>>>>
नेकी और पूंछ पूंछ! नक्कीच पाठवा. सगळ्यांना यापासून लाभ मिळावा याकरताच हे लिहीले आहे.

चिंगी,
मराठीचा 'सहज' वापर तर फारच छान. >>>> सहजता आवडली हे महत्त्वाचे. त्याकरता धन्यवाद!

अगो बाई,
तुम्ही मलाच बुचकळ्यात टाकताय हो!

जर रक्तदाब नेहेमी कमी ( किंवा योग्यच ) येत असेल ( ११५ / ७५ वगैरे ) आणि ह्रदयस्पंदनदर सातत्याने जास्त येत असेल ( साधारण ९०-९५ स्पंदनं मिनिटाला ) तर त्यातून काय सूचित होते ?>>>>
स्त्रियांचा नियमित स्पंदनदर ८४ ठोके प्रति-मिनिट असतो तर लहान मुलांचा त्याहूनही जास्त. तरीही अशी परिस्थिती जर तात्पुरती आणि असामान्य असेल तर त्यातून बरेच काही सुचित होत असते. त्याच्या अर्थशोधनाचे शास्त्रच, निदान शास्त्र म्हणवते. डॉक्टर ते शिकतात. इथे मात्र मी ते शिकलेलो नाही. तेव्हा डॉक्टरचा सल्ला घ्यावा हेच उचित!

वरील आकडे, हे प्रत्यक्ष मापनांच्या सरासरींवरून काढलेले प्रतिकात्मक आकडे असतात. डॉक्टरलाही, प्रत्येक व्यक्तीची सामान्य आणि असामान्य परिस्थिती प्रत्यक्षात नोंदवूनच मग निदानात्मक निष्कर्ष काढता येतात.

६० पेक्षा कमी स्पंदनदरास ब्राडीकार्डिया म्हणतात तर १०० पेक्षा जास्त स्पंदनदरास टॅकीकार्डिया. दोन्हीही अवस्था असामान्य समजण्यात येतात.

मेधा,
या विषयाशी संबंधित अजून माहिती लिहाल का - प्राणायामाची माहिती, आहार - विहार या विषयी अजून माहिती वगैरे .>>>> हो. असा विचार तर आहे. तो अंमलात येईल तोपर्यंत
http://www.manogat.com/node/5150/
या दुव्यावर यापूर्वीच प्रकाशित झालेली माझी ३० भागांची मालिका, माहितीकरता पाहू शकता. तीच मालिका सुधारून आणि त्यात काहीशी भर घालून इथे ताजी करत आहे.

खुपच छान माहितीपुर्ण लेख. मी सुद्धा लिंक पटवणर आहे बर्‍याच जणांना.
नरेंद्र, तुमचा ब्लॉगही वरच्यावर बघितला, तो पण उपयुक्त वाटला, आता नीट वाचुन बघते. Happy

अश्विनी, के.अंजली, मवा, केदार, रेशिम, लिम्बू, नोरा,
सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

अश्विनी,
ब्लॉग वरवरच का, खोलवर पाहा. अंतर्बाह्य चांगला आहे. तुम्हाला अवश्य आवडेल.

मवा,
आणखीही वेळ मिळेल तसे लिहा, सगळ्यांना फायदा होईल.>>>> नक्कीच!

लिम्बू,
आयला, माझी श्वसनक्षमता फक्त ४.२% आहे >>>> जाग येईल, तीच वेळ सकाळ मानायची!

खूपच सुंदर आणि उपयुक्त लेख... आता बाकीचे लेख आणि तुमचा ब्लॉग पण अवश्य वाचणार... इतकी चांगली, आणि सोपी करून लिहल्याबद्दल धन्यवाद...

नरेंद्र जी छान माहिती ! Happy
आजच सकाळी माझी व आईची चर्चा झाली.
तब्येतीच्या दृष्टीने आहारात शेंगदाणा तेल असावे ? की सूर्यफूल तेल असावे?
या वरून.
कृपया मार्गदर्शन करणार का ?