का तुला तेव्हा हसावे वाटले होते?

Submitted by विशाल कुलकर्णी on 4 January, 2011 - 06:55

हसावे तू .., तुझ्यासाठी रडावे वाटले होते
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते

पुन्हा हा आठवांचा घोळ मी घालायचा नाही
मलाही तू जरासे आठवावे वाटले होते

कशाला तीच खोटी कारणे (?) भांबावलो आहे
तुझ्या रागावण्यासाठी रुसावे वाटले होते

जगाला काय सांगावे नवे आभास दु:खांचे
तुझ्या हास्यात मी गुंतून जावे, वाटले होते

जगाचे बोलणे आता मला ऐकायचे नाही
तुझ्या ओठावरी तेव्हा ठसावे वाटले होते

अताशा वेड हे माझे मलाही पेलणे नाही
विशाला, का तुला तेव्हा हसावे वाटले होते?

डॉ. कैलास यांनी दिलेल्या "कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते" या ओळीवरून खरडलेल्या काही ओळी. Happy
गुरुजनांच्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत...

विशाल...

शब्दखुणा: 
Taxonomy upgrade extras: 

तुझ्या रागावण्यासाठी रुसावे वाटले होते>>>> मस्तच!

जगाला काय सांगावे नवे आभास दु:खांचे
तुझ्या हास्यात मी गुंतून जावे, वाटले होते >>> ओळी स्वतंत्ररीत्या मस्तच!

जगाचे बोलणे आता मला ऐकायचे नाही
तुझ्या ओठावरी तेव्हा ठसावे वाटले होते>>> हाही शेर तसाच, ओळी स्वतंत्ररीत्या उत्तम!

गझल सफाईदार झाली आहे, शुभेच्छा व अभिनंदन!

-'बेफिकीर'!

धन्यवाद बेफ़िकीरजी !
आपल्यासारख्यांच्या प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाने अजुन सफ़ाईदारपणा येत राहील अशी अपेक्षा Happy

वा वा.. गझल अगदी गोटीबंद झाली आहे..... काही सुट्या ओळी लाजवाब झाल्या आहेत.

मतला,

जगाला काय सांगावे नवे आभास दु:खांचे
तुझ्या हास्यात मी गुंतून जावे, वाटले होते

आणि मक्ता फार आवडला. Happy

मस्त.
तुझ्या ओठावरी तेव्हा ठसावे वाटले होते>>>
येथे ठसावे ऐवजी थोडे वेगळे, नाजूक अजून गोड वाटले असते का?

छान आहे...वृत्त हाताळणी आणि काही सुटे मिसरे आवडले. विशेषतः "जगाला काय सांगावे नवे आभास दु:खांचे", "जगाचे बोलणे आता मला ऐकायचे नाही" इ.

रुणुझुणू, शरददादा धन्यवाद Happy
दादा, आत्ताच निर्णय देवु नका, अजुन जस्ट शिकायला सुरुवात केलीय. जेव्हा होइन तेव्हा खरे Happy

कशाला तीच खोटी कारणे (?) भांबावलो आहे
तुझ्या रागावण्यासाठी रुसावे वाटले होते>>>मस्तच खयाल

वा! वा!! विशाल,

चांगली गझल.
तंत्रदृष्ट्या सफाईदार गझल.
मात्र,
पुन्हा हा आठवांचा घोळ मी घालायचा नाही
मलाही तू जरासे आठवावे वाटले होते
इथे 'घालायचा' असे का आहे?