सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग ३

Submitted by आनंदयात्री on 4 January, 2011 - 11:31

थोडक्यात पात्रपरिचय: नाव आणि कंसात माबो आयडी
यो : योगेश कानडे (यो रॉक्स)
ज्यो: गिरीश जोशी
अवि: अविनाश मोहिते (अवि_लहु)
रोमा किंवा रो: रोहित निकम (रोहित एक मावळा)
मी: नचिकेत जोशी (आनंदयात्री)

२६ डिसेंबर: उर्वरित साल्हेर, मुल्हेर आणि फक्त मुल्हेर

आज संध्याकाळच्या शेवटच्या २० मिनिटांमध्ये जर सर्व काही अपेक्षेप्रमाणे घडले असते, तर मी शीर्षक उर्वरित साल्हेर, मुल्हेर आणि मोरागड असे लिहून याही लेखाचा शेवट We were running as per the schedule असा केला असता! तसं झालं असतं तर प्लॅननुसार सातवा किल्लाही झाला असता... अर्थात ट्रेकमध्ये अशा अनिश्चिततांना सामोरे जावेच लागते.त्याची सविस्तर कहाणी पुढे येईलच.

उंदरांचा धुमाकूळ मध्यरात्रीनंतर केव्हातरी थांबला आणि मला गाढ झोप लागली. पहाटे रोमा आणि अविचे मोबाईल कुठलेतरी भन्नाट सूर आळवू लागले आणि गजर झाला, ५ वाजले असे म्हणून सर्वजण वेळेवर उठलो. तब्बल आठ तास घड्याळी झोप मिळाल्यामुळे थकवा दूर पळाला होता आणि मोठा पल्ला गाठण्यासाठी आम्ही तयार होतो. दिवसाच्या सुरूवातीचा प्लॅन होता- परशुराम मंदिरापासून होणारा सूर्योदय बघणे आणि लवकरात लवकर गड उतरणे!

चुलीत धगधगत असणाऱ्या निखाऱ्यांवर फुंकर मारून गरम पातेल्यात पाणी गरम केले, हातपाय धुतले, चहा बनवून प्यायलो आणि आकाशात उजाडायला थोडा वेळ असतानाच आम्ही निघालो. (मंदिरात जायचे होते ना मग अंघोळ केली नाही का? हा प्रश्न आमच्याप्रमाणेच वाचकहो, तुम्हालाही पडला नसेल ही खात्री आहे मला... Wink )काल अडखळती सुरूवात करणारा रोमा आज पहिल्या पावलापासूनच फुल फॉर्मात होता. गुहेशेजारूनच परशुराम मंदिराकडे वाट जाते. परशुराम मंदिर गुहेपासूनसुद्धा बरीच उंच आहे तसेच उभा चढ आहे. त्या अंधारातसुद्धा रोमा पटापट वाट काढत पुढे गेला आणि पाठोपाठ टॉर्चच्या प्रकाशात आम्हीही मंदिरापाशी दाखल झालो.
वाटाडा रोहित- (मागे मंदिराची टेकडी)

हे मंदिर-

सूर्य उगवायला थोडासाच वेळ बाकी होता. पहाटेच्या रंगांची मनसोक्त उधळण ’त्या’ निर्मिकाने क्षितिजाच्या सीमेवर केली होती. हुडहुडी भरवणारा गार वाराही सुटला होता. साल्हेरच्या सर्वोच्च ठिकाणी असलेल्या एकुलत्या एका चिमुकल्या मंदिराच्या फरसबंदीवर उभे राहून आम्ही सूर्योदयाच्या आणखी एका अनुपम सोहळ्याचे साक्षीदार होत होतो... Happy

त्या वेळी मनात आलेले विचार सगळेच्या सगळे तसेच्या तसे शब्दबद्ध करणे खरं तर अवघड आहे... कारण अशावेळी आपणच नि:शब्द होऊन जातो. त्या स्थितीचे वर्णन करायला कुठलेही गाणे, कविता, गझल, सिनेमाचा ड्वायलॉग असं काही काही आठवत नाही... (सगळं सुचतं ते नंतर!)पंचेंद्रियांना होणाऱ्या संवेदना, जाणीवा एवढाच काय तो ते क्षण अनुभवल्याचा पुरावा! मन वगैरे काही मामला असेलच, तर तो अशा वेळी पूर्ण शांत होऊन गेलेला असतो. मला पूर्ण जाणीव आहे की हे असे अनुभव व्यक्तिसापेक्ष असतात, पण ट्रेकमध्ये काय अनुभवायला आवडते याचे माझे उत्तर "ही अशी शांतता" हे नक्कीच असेल. मला नेहमीच अशा दिल को छू जानेवाल्या शांततेत मिसळून जायला आवडते. Happy

थोड्य़ाच वेळात मुल्हेरडोंगररांगेच्या उजवीकडून सूर्य वर आला. पुढचा अर्धा-पाऊण तास सर्व प्रकारचे फोटो मनसोक्त काढून घेतले.
हा मी -

हा अवि-

उडयाही मारल्या. त्यापैकी काही उड्या आपण इथे पाहिल्या आहेतच. ---
http://www.maayboli.com/node/22277
http://www.maayboli.com/node/12975

अखेर जवळजवळ पावणेआठ वाजता पाय खाली गुहेच्या दिशेने ओढायला सुरूवात केली. उतरताना एका वेगळ्या पण (त्यातल्या त्यात Happy )सोप्या वाटेने उतरलो.
ही ती वाट-

पटापट सॅक्स पॅक केल्या, टाक्यातून पाणी भरून घेतले, अविने भांडी आणि चहा गाळायचा रूमाल धुऊन घेतला. तोपर्यंत आम्ही गुहा साफ केली, सर्व कचरा प्लॅस्टिकबॅगमध्ये भरून घेतला आणि पावणेनऊला साल्हेरवाडीच्या दरवाजाच्या दिशेने निघालो. आधी म्हटल्याप्रमाणे गडाचा विस्तार खूप मोठा आहे. पूर्व-पश्चिम साधारण एक किमी आणि दक्षिणोत्तर अर्धा किमी इतका गडाचा विस्तार असावा.
गडावरून घेतलेले काही फोटॉ-

मंदिरापासून -

परतीच्या वाटेवर गुहेपासून पश्चिमेला बरेच चालून आम्ही दरवाजापाशी आलो. दरवाजावर बाहेरच्या बाजूला नागाची कात पाहिली आणि पायऱ्या उतरू लागलो. पायऱ्या सुंदर आहेत.

एकूण गडाची बांधणीच अप्रतिम आहे. पुरातन काळात साल्हेरचा एक अवघड किल्ला असाच उल्लेख आढळतो. सुरतेच्या लुटीवेळी महाराज साल्हेरमार्गेच गेले/आले होते. साल्हेरची वाट गडाला anticlockwise वळसा घालून उतरते. इतक्या वळसा मारल्यानंतरही सालोटा किल्ला अजिबात दिसत नाही, इतका गडाचा घेरा मोठा आहे!

उतरायला अर्ध्या वाटेपर्यंत पायऱ्या आहेत, त्यावरून हाच गडाचा मुख्य दरवाजा असावा असे वाटते. त्या बऱ्याचशा फुटलेल्या अवस्थेत आहेत आणि दगड-धोंडे वाटेवर पसरलेले आहेत. त्यातून वाट काढत आम्ही मात्र अवघ्या एक तासात गड उरतलो.

साल्हेर गावामध्ये काही तरूणांनी येऊन आमची ’चौकशी’ केली. त्यांच्याशी बोलताना असे कळले, गुजरात सीमा अगदीच जवळ असल्यामुळे देशविघातक शक्तींचे हस्तक त्या भागात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिथली जनता नव्या चेहऱ्यांची खूप चौकशी करत असते. आमची विचारपूस हा त्यातलाच एक भाग होता. आम्हीही त्यांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. कुठल्याही ट्रेकमध्ये स्थानिक गावकऱ्यांशी आपण होऊन संवाद साधणे हा आमचा अगदी आवडीचा भाग असतो. त्यामुळे त्यांच्या या विचारण्याचे आम्हाला काहीच वेगळे वाटले नाही. ’या प्रदेशात जर स्थानिकांनी चौकशी केली तर नीट उत्तरे द्या, नाहीतर इथले तरूण बदडायलाही कमी करणार नाहीत’असा सूचक सल्ला ऐकून घेऊन आम्ही मुल्हेरकडे जीपने निघालो. Happy परत येताना जीप वाघांबेमार्गे मुल्हेरला येते. साल्हेर-वाघांबे अंदाजे ६ किमी आणि मुल्हेर-वाघांबे ८ किमी असेल. मुल्हेर गावात उतरलो तेव्हा अकरा वाजले होते.

गावातून मुल्हेर किल्ला दूर दिसत होता. ते अंतर २ किमी असल्याचे कळले. (त्यावरून दुसरे कुठलेही गाव किल्याच्या पायथ्याशी नाही हे ओळखले.) गावात एका उपहारगृहात नाश्ता केला, चहा घेतला आणि एक टमटम ठरवली. त्याने मुल्हेरच्या पायथ्याजवळ कच्चा रस्ता सुरू होतो तिथपर्यंत पोहोचवले. उतरल्यावर एका म्हातारशा गावकऱ्याने सखोल चौकशी केली आणि तुम्ही हरगड-मुल्हेर-मोरा हे तीनही किल्ले २४ तासात कसे बघाल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. ज्योने मधूनच त्याचे वाक्य पूर्ण करायचा प्रयत्न केला की मात्र बाबाजी कसानुसा चेहरा करून म्हणायचा, ’तुमी ऐकून घेता का जरा मी काय बोल्तोय ते?’ Lol असे दोन-तीनदा झाल्यावर योने एन्ट्री घेतली. बाबाजीचा प्लॅन आमच्या प्लॅनशी एक गोष्ट सोडून तंतोतंत जुळत होता. ती म्हणजे त्याची इच्छा होती आम्ही तिथून खिंडीच्या वाटेने हरगड आधी करावा. मग मुल्हेरवर जावे, आणि मग निवांत मुल्हेर-मोरा गड बघावेत. आमच्या प्लॅनमध्ये मुल्हेरवर जावे, सॅक्स मंदिरात ठेवून मुल्हेर-मोरा बघावे आणि उद्या सकाळी हरगड करावा असे होते. अखेर वजन मंदिरात ठेवल्यामुळे निवांत फिरता येईल असा विचार करून आम्ही मुल्हेर माचीकडे रस्ता वळवला.

त्या कच्च्या रस्त्यानेही अंदाजे एक किमी चालावे लागते, तेव्हा चढण सुरू होते. मुल्हेरच्या उंचीच्या अर्ध्यामध्ये माची आहे. त्यामुळे आम्हाला खूप कमी अंतर चढावे लागणार होते. चढ अंगावर येणारा असला आणि आम्ही बाराच्या उन्हात चढत असलो, तरी माचीवर पूर्ण झाडी असल्यामुळे आम्ही खूष होतो. वाटेत एके ठिकाणी दोन वाटा फुटल्या होत्या. तिथपर्यंत उत्साहात पुढे निघून आलेला मी दोन वाटा दिसल्यावर मात्र थांबलो. मागून येणाऱ्या रोमाने (लगेच) नकाशे काढून अभ्यास करायला सुरूवात केली, ज्यो आणि अवि उजव्या वाटेने तपासायला निघून गेले. रोमाच्या नकाशानुसार सरळ वाटेने पुढे गेल्यावर एक तोफ दिसणार होती आणि ती वाट पुढे बंद होत होती. आम्ही वाट नाही तर नाही, तोफ दिसेल म्हणून पुढे निघालो. खरंच १०० एक मीटर वर छोट्या झऱ्यामध्ये अडकलेली एक मोठी तोफ सापडली.

तिच्यावरच्या ’ताज्या शिलालेखा’नुसार १९-०९-०६ ही तारीख दिसली. (या तारखेला कुठल्यातरी फुल्या फुल्या माणसाने तिथे येऊन गेल्याची तारीख कोरली असावी!!) कारण दुसरा कुठलाच संदर्भ लागला नाही. असो. रोमाने आणलेल्या नकाशाचा उत्तम उपयोग झाला आणि आमचा कमीत कमी १ तास वाचला. (नकाशा नसता तर तोफ दिसली म्हणजे वाट बरोबर आहे असे समजून आम्ही पुढे गेलोही असतो). मागे आलो आणि त्या फाट्यावरून उजवी वर जाणारी वाट पकडून सावकाश चालत दरवाज्यापाशी आलो. ३ दरवाजांची साखळी ओलांडून बरेच चालून गणेश मंदिरापाशी आलो. एव्हाना २ वाजत आले होते. वेळ वाया गेला नव्हता आणि यानंतरही सूर्य मावळायला चार-साडेचार तास बाकी होते.

गणेशमंदिर अप्रतिम आहे. नऊ खांबांवर बांधले गेलेले पुरातन वास्तूकलेचा नमुना असलेले हे मंदिर त्या काळच्या वैशिष्ट्यांची झलक देते.
हे गणेश मंदिर (मागे हरगड)

ते बघून सव्वादोनपर्यंत सोमेश्वरमंदिरात आलो. समोर मोरा आणि उजव्या हाताला मुल्हेर अशा दोन्ही गडांच्या कुशीत अतिशय शांत परिसरात मंदिर उभे आहे.
हे मंदिर (डाव्या कोपर्‍यात मोरागड)

आजचा मुक्काम या मंदिरात असणार होता. मंदिराच्या मागे एका संन्यासीबाबांचे घर आहे. बाबा सबंध पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत. बाबांचे आसपासच्या गावांमध्ये भक्तही असावेत. कारण मुल्हेरगावातून गडावर आलेले लोक त्यांच्याबद्दल श्रद्धेने बोलत होते. बाबांना आम्ही आमची ओळख करून दिली आणि आजचा मुक्काम व जेवण मंदिरात करणार असल्याचे सांगितले. त्यांनी अनुमती दिल्यावर सॅक्स पसरल्या. गावातून दर्शनासाठी आलेल्या दोन तरूणांकडून मुल्हेर-मोरा पुढच्या तीन तासात कसे बघता येतील याबद्दल गप्पा मारल्या.

मुल्हेर आणि मोरागड हे केवळ एका भिंतीने वेगळे केलेले आहेत. किंबहुना मोरा हा बऱ्याच जणांच्या मते मुल्हेरचेच extension आहे. मंदिराच्या मागून माचीला समांतर एक वाट जाते. त्या वाटेने गेल्यास हत्ती टाके आणि मोती टाके अशी दोन टाकी लागतात. त्या टाक्यांच्या मधल्या काठावरून एक वाट वर चढते. कातळात कोरलेल्या मारुतीच्या जवळून ती वाट गडावर जाते. मुल्हेरवरून त्या मधल्या भिंतीवरून मोरागडाकडे एक वाट येते. त्यावाटेने येऊन मोरागड बघावा आणि उतरतांना त्या भिंतीच्या खालून, मुल्हेर आणि मोरा यांच्या मधल्या दरीतून एक वाट थेट सोमेश्वरमंदिराशी येते. आम्ही ह्याच route ने दोन्ही किल्ले बघावेत असा सल्ला त्या दोघांनी दिला. उतरतांना अंधार पडल्यास कातळातील मारूतीच्या वाटेपेक्षा समोरची वाट सोपी आणि फक्त उताराची आहे, तसेच सोमेश्वरमंदिर सतत खाली दिसत राहिल, म्हणून उतरतानाच इथून उतरा असे त्यांचे मत होते. आम्ही त्यानुसार गड बघायला निघालो.

कातळातला मारूती-

अर्ध्या तासात मुल्हेरच्या बालेकिल्यावर पोचलो.
पहिला दरवाजा आणि त्यानंतरच्या गुहा-

उंचीवरून खालच्या अंगाला झाडीत मिसळून गेलेल्या माचीचा सुंदर नजारा दिसतो. आम्ही मंदिरसदृश एक आणि खोलीसदृश एक अशी दोन बांधकामे दिसली. ती खोली म्हणजे रोमाच्या नकाशात दिसणारी राजवाड्याची साईट असावी! बालेकिल्ल्यावर अर्धा-पाऊणकिमी चे अवाढव्य पठार आहे! संपूर्ण गडावर फक्त दोन झाडे आम्हाला दिसली. बाकी सब गवत आणि झाडपत्ती! रोमाच्या नकाशानुसार ठिकाणे बघायला लागलो. राजवाड्याच्या दरवाजाची चौकट वगळता संपूर्ण पडका राजवाडा, ७-८ पाण्याची टाकी, एक चोर दरवाजा, भडंगनाथांचे वडाच्या झाडाखालचे मंदिर आणि मंदिरासमोरील पाण्याचे अतिविशाल टाके एवढ्या एका वाक्यात मुल्हेरच्या बालेकिल्ल्याचे वर्णन संपत असले तरी बालेकिल्ल्यावरून दिसणारा नजारा मात्र शब्दांपलिकडचा आहे. साल्हेरवरून दिसला नव्हता इतका विशाल आणि नजरबंदी करणारा view मुल्हेरवरून दिसतो. सातपुडा आणि सह्याद्रीच्या रांगा, वळ्या पडलेले डोंगर, एकमेकांना चिकटून उभे असावेत असे वाटणारे अनेक लहान-मोठे सुळके... केवळ अप्रतिम!!
नुसतीच चौकट, बाकी सगळं गायब!-

मुल्हेरवरून दिसणारा view -

अतिविशाल टाके-

भडंगनाथांचे मंदिर-

एवढं सगळं बघेपर्यंत आणि कॅमेरात बंद करेपर्यंत सूर्य केव्हा खाली आला ते कळलेच नाही आणि त्याचवेळी ट्रेकमधल्या "त्या" अनिश्चितता नावाच्या घटकाने आमच्या प्लॅनपेक्षा वेगळे स्क्रिप्ट लिहायला सुरूवात केली...

घड्याळात पावणेसहा वाजले होते. प्रकाश भरपूर होता. सूर्यही लालेलाल झाला नव्हता. भडंगनाथांचे मंदिर बघून समोरच दरीपलीकडे दिसणाऱ्या मोरागडाकडे पावले वळवली. मध्ये फक्त एक भिंत होती. ती पार केली असती तर आम्ही मोरागडाच्या पायऱ्यांशी पोहोचलो असतो. मोरागडावर पहायला २ दरवाजे, ३ टाके एवढेच अवशेष आहेत. ते पहायला जास्त वेळ लागला नसता. त्या भिंतीकडे जाणारी वाट मात्र काही केल्या सापडेना! सर्वत्र कमरेइतके कोरडे गवत वाढले होते. त्यातून वाट काढत मोराच्या दिशेने गेलो तर थेट कड्याच्या टोकाशी पोहोचलो. रोमा आणि ज्यो दोन वेगवेगळ्या दिशांनी वाटा शोधायला ’सुटले’. प्रश्न एकच होता - वेळेचा! अजून फारतर २० मिनिटात सूर्य मावळला असता. आणि नंतर अजून जास्तीत जास्त १५-२० मिनिटं नुसत्या डोळ्यांना वाट दिसू शकण्याइतका प्रकाश उरला असता. तेवढा वेळ मोरागड पाहण्यासाठी पुरेसा होता. तो प्रकाश असेपर्यंत आम्ही मोरागड उतरायला सुरूवात करणं आवश्यक होतं. मी आणि योने नकाशा पाहून वाट शोधायचा प्रयत्न केला. रोमा कातळ उतरून गवतावरच्या वाटेकडे गेला होता. पण एका कड्याच्या टोकापाशी जाऊन त्याचा शोध संपला. त्या ठिकाणापासून भिंत खालच्या बाजूला अंदाजे १०० फूटांवर होती आणि पलिकडे मोरागड! परंतु मधला कडा उतरणे अशक्य होते. ज्यो तसाच वरच्या अंगाला गवतातून मागे पळत गेला व पुन्हा वळसा घालून वाट दिसते का ते बघू लागला. चुकामूक नको म्हणून मी, यो आणि अवि जागच्या जागी थांबून दोघांचा अंदाज घेत होतो. भराभर वेळ संपत होता. सूर्यही लाल झाला होता, आणि प्रकाश झपाट्याने कमी होत होता.

प्रसंग फारच अटीतटीचा झाला होता. आम्हाला वाट शोधायला सुरूवात करून २० मिनीटे होऊन गेली होती. ज्यो आणि रोमाला वाट सापडत नव्हती. १० मिनिटात सूर्य क्षितीजाच्या आड नव्हे, तर मुल्हेरमागच्या डोंगराआड जाणार होता. त्यानंतर फारतर २० मिनिटे प्रकाश उरला असता. आम्हाला मंदिरात पोहोचायला धावत सुटलो तरी अंदाजे २५ मिनिटे हवी होती. अशा परिस्थितीत आत्ता जरी वाट सापडली असती तरी मोरागड बघेपर्यंतच अंधार पडला असता. बरं, ती दरीची वाट आम्हालाही नवीन असणार होती. अंधारात सोमेश्वरमंदिर दिसण्याची खात्री नव्हती. हे सगळे विचार माझ्या आणि योच्या मनात एकाच वेळी सुरू होते. अजून फारतर ५ मिनीटात निर्णय घ्यायचा होता. नाहीतर आलो त्या वाटेनेसुद्धा उतरायला अंधार झाला असता...

अखेर, सर्व विचार करून मी आणि योने एकाच वेळी दोघांनाही हाक मारून परत फिरायला सांगितले. सव्वासहा वाजत आले होते. सूर्य एव्हाना डोंगररांगेला जवळजवळ टेकला होता. आलो त्या वाटेने उतरण्यासाठी बालेकिल्ल्यावरील पठार संपूर्ण पार करून मग तीन दरवाज्यांची साखळी ओलांडायची होती. अंधारात मोती टाके आणि हत्ती टाके शोधणे अवघड झाले असते. त्या टाक्यांपासून पुढे नियमीत पाऊलवाट होती. त्यामुळे अंधार पडायच्या आत पूर्ण बालेकिल्ला उतरून माचीवरील ती दोन टाकी गाठणे हे प्रथम ध्येय होते.

झाले. पाच जण पठारावरून शक्य तितक्या गतीने चालत (जवळजवळ धावतच) मागे निघालो. पठार पार झाले, बालेकिल्ल्याचा तिसरा दरवाजा, तुटक्या पायऱ्या, दुसरा दरवाजा, रॉकपॅचेस, पहिला दरवाजा, अरूंद ढासळलेल्या पायऱ्या हे भराभर मागे पडत गेले. कातळातला मारुती अंधूक होऊ लागला होता. ठाशीव पण तीव्र उताराच्या पायवाटेवरून मी, अवि आणि यो धावत सुटलो होतो. काही कारणांमुळे रोमा आणि ज्यो मागे राहिले होते. यात किती वेळ गेला होता कोण जाणे! आता ध्येय होते उतार उतरून टाकी गाठणे! मध्येच एके ठिकाणी ज्यो आणि रोमासाठी थांबलो. ती १-२ मिनिटेसुद्धा १० मिनिटांइतकी दीर्घ वाटत होती! लवकरच ते दोघे येऊन मिळाले. आता जवळजवळ काळोख पडायला आला होता. टॉर्च पेटवले आणि पुन्हा ११ नं ची बस सुसाट सोडली. वाटेत डाव्या हाताला खालच्या अंगाला एक पांढरट बांधकाम दिसले. आम्हाला वाटले टाकी आली.. टाक्यांचा रंग जरी आठवत नसला तरी, आकारमानावरून त्या ह्या टाक्या असाव्यात(च) असे म्हणून तिथेच खाली उतरू लागलो. जवळ गेल्यावर असे लक्षात आले की ही टाकी नसून मगाशी वरून पाहिलेले राजवाडासदृश बांधकाम आहे आणि टाकी अजून बरीच पुढे आहेत! प्रकाश... संधिप्रकाश...अंधार... अनोळखी रान... हरवलेल्या वाटा... इतरत्र गवत आणि झाडी... सरपटणाऱ्या ’शक्यता’... आणि शेवटी पूर्ण अंधार पडल्यास तिथेच रानात उघड्यावर रात्र काढायची मानसिक तयारी!! विचार कुठल्याकुठे हेलकावे घेत होते... त्या धावल्यामुळे घामाघूम झालेल्या अवस्थेतही माझ्या अंगावर थंडगार शिरशिरी आली! फक्त धावतानाही पायांनी ग्रिप घेत जात होतो, ही एक समाधानाची गोष्ट होती! तरीही, एके ठिकाणी माझा डावा पाय सटकला आणि कमरेपर्यंत वाटेबाहेरच्या खंदकात गेला. उजव्या पायावर सावरत असतानांच मला घसरलेला बघून मागून येणारा ज्यो इतक्या जोरात ओरडला, की पडल्यापेक्षा त्याच्या आवाजानेच मी दचकलो! बहुधा अजून ५० एक पावले पुढे गेलो असू, डाव्या हाताला खाली, १०० फुटांवर झाडीमध्ये अखेर दोन टाकी रोमाला दिसली. अत्यंत अत्यंत वेळेवर, पायाखालची वाट दिसेनाशी झाली असतांना आम्ही टाक्यांपाशी येऊन पोहोचलो होतो. टाक्यांच्या काठावरचे वडाचे झाड प्राप्त परिस्थितीमध्ये आणखीनच भीती वाढवत होते! तिथून पुढचा रस्ता सोपा होता. ते अंतर पार करून जेव्हा सोमेश्वरमंदिरात परत आलो, तेव्हा सात वाजायला दहा मिनिटे कमी होती!

तसं म्हटलं तर सव्वासहा ते सहा वाजून पन्नास मिनिटे - उण्यापुऱ्या पस्तीस मिनिटांचा कालावधी! पण एका विलक्षण thrilling अनुभवातून आम्ही सगळे गेलो होतो! तेव्हा ज्ज्जाम टेन्शन आले होते तरी त्या एका अनुभवामुळे मला तरी अख्खा ट्रेकच सार्थकी लागला असं वाटायला लागलं होतं... Happy

सोमेश्वरमंदिर आणि आजूबाजूचा परिसर मला खूप आवडला. गणेशमंदिर आणि सोमेश्वरमंदिरांची बांधणी सारखीच आहे. बाहेरच्या बाजूला मोतीटाक्यातून संन्यासीबाबांसाठी पाईपाने आणलेले पाणी एका टाक्यामध्ये सोडले आहे. दुपारीही ते पाणी बर्फासारखे थंड होते! मंदिर चहुबाजूंनी झाडीमध्ये लपलेले आहे.

दिवेलागणीच्या वेळी रातकिड्यांनी आतला सूर लावायला सुरूवात केली होती. मंदिर परिसरात विलक्षण शांतता होती. आता मोरागडाची फक्त काळी बॉर्डर दिसत होती.संन्यासीबाबांनीही घराबाहेरची सोलर एनर्जीवर चालणारी ट्युब बंद केल्यावर तर सर्वत्र अंधार पसरला. चढत्या रात्रीने थंडीची चादर पसरायला सुरूवात केली. आम्ही मंदिरात चूल पेटवली, आणि यो-अविने सांबरभात आणि आलू-मटर बनवले (रेडी टू ईट जिंदाबाद!)... मंदिरामागच्या रानातल्या झाडांवरून वानरांचे आवाज ऐकू येऊ लागले आणि आजचीही झोप संकटात येते की काय अशी शंका मनाला चाटून गेली! त्यात रोमाने त्यांना रतनगडाच्या ट्रेकमध्ये ते सूर्योदय बघायला गेलेले असताना माकडांनी गुहेत शिरून खाद्यपदार्थ पळवल्याचा किस्सा सांगितला! जेवण आटोपून carrymats पसरल्या तेव्हा साडेनऊ झाले होते..

ट्रेकमधला अविस्मरणीय दिवस संपला होता. आम्ही scheduleच्या थोडेसे मागे होतो. उद्या सकाळी ९ पर्यंत मोरागडबघून आलो असतो, तरी हरगड बघून मांगी-तुंगीकडे निघणे शक्य झाले असते... एकुणात, मोरा बघायला लागणारा वेळ हाच ६ किल्ले की ७ किल्ले यामधला deciding factor असणार होता. पण त्यापूर्वी आम्हाला झोप खुणावत होती... अविने शेकोटीमध्ये २-३ तास पुरतील एवढी लाकडे टाकली. वानरांचा विचार डोक्यातून काढून टाकला आणि अंथरूणावर अंग टाकले. मोरा-मुल्हेरच्या कुशीत असलेल्या सर्व दु:खांचे हलाहल पचवणाऱ्या भोलेबाबाच्या ऐतिहासिक मंदिरात केव्हा झोप लागली ते कुणालाच कळले नाही.. Happy

(क्रमश:)
-- नचिकेत जोशी

सर्व फोटो - यो रॉक्स आणि रोहित

सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग १
सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग २
सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग ४
सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग ५ (अंतिम)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुश्श. अरे वाचतानाच दम लागला मला. आपल्याकडे आता मायबोली हे माध्यम आहे, म्हणून जवळजवळ प्रत्यक्ष सहभागाचा आनंद मिळतो.

अरे काय सही आहे हे.... कित्ती सुंदर.. Happy
चहा गाळायचा रूमाल...
Lol Lol Lol Lol Lol

खरच रे इथल्या रौद्रसौंदर्यात रांगडेपणात एक विलक्षण शक्ती आहे. एकदा का तुम्ही यात शिरलात की हे व्यसन सूटणे कठीण किंबहुना अशक्य.

अंधार झाल्यानंतरचे वर्णन मस्त केले आहेस... Happy असा अनुभव मला अलंगला आला होता... Happy पण जरा वेळ गेला तरी वाट सापडते असा माझा आज वरचा अनुभव आहे.

आत्ताच मी AMK ट्रेक करून आलो तरी हे फोटो बघून माझा प्रचंड जळफळाट होतोय.... Lol

आणि तुझा 'इंडियाना जोन्स' स्टाईल मधला फोटो प्रचंड भारी... कैच्याकै आवडला... Lol

जळफळाट ! जळफळाट ! जळफळाट ! Angry

आनंदयात्री, रोमा, दगडू मा , अवि धम्माल केलीत तुम्ही. हा भाग सुद्धा सहीच.

गुरुवर्य अप्रतिम वर्णन. मुल्हेर गडावरुन दिसणारा नजारा पाहुन या निसर्गाच्या दिव्यतेची कल्पना
मनाला सुखावुन जाते.

दिनेशदा, १००% सहमत...

भटक्या, thanks re..
दिवसा वाट न सापडणे आणि कातरवेळी वाट न सापडणे, यात खूप फरक आहे! Happy
पण वाट चुकण्यातही मजा आहे आणी ती आपली आपण शोधण्यातही मजा आहे... Happy

नंद्या, आडो, सुकी, जिप्सी, धन्यवाद! Happy

मस्त ! आजच तिन्ही भाग वाचले. अप्रतिम वर्णनशैली आणि जोडीला तितकेच सुंदर फोटो. आता पुढचे भाग वाचायची उत्सुकता लागून राहिली आहे.

व्वा.. तिन्ही भाग मस्तच... वर्णन तर छानच आहे.. पण आता अशा 'सुंदर' break नंतर एक गझल होवून जाऊ द्या... तसंही वर्णन वाचून गझल निर्मितीस पोषक वातावरण असल्याचं जाणवलं... Happy

http://merakuchhsaman.blogspot.com/

रोहित, माधवजी, दगड, इंद्रा, मेरा कुछ सामान (pl pl नावासाठी शॉर्टफॉर्म द्या... ), धन्यवाद..

मेकुसा, गझल सुचत नाहीये सध्या... Happy

वा रे ट्रेक तर मस्तच, पण लिहिलय सुद्धा झकास. माझा राहिलाच आहे हा करायचा, कसे जमते बघूया.
पुढचे भाग येऊ द्या पटकन...

श्वेता, लंपनच्या नजरेतून थंडी आवडली.. इकडेही लिहा..

काय ??? दम घेऊ?? की तुला दम देऊ??? Wink लिही की भराभरा...

सुरू केले की लिंक तुटली नाय पाहिजे... Sad

साजिरा, thanks re...
मी वेगवेगळ्या २ PC वरून ट्राय केला.. मला दिसले रे... Sad

साजिरा, i m sorry.. तुमचं बरोबर होतं... पिकासाच्या लिंक हरवल्या होत्या... आता बघा.. सगळे दिसताहेत...

आनंदयात्री ..... ते राज्व्ड्या दारामाघे अति प्राचीन रत्नापुर (मयुर्पुर) गाव आहे... महाभारतकालिन...... आणि भडंगनाथ महादेवाच्या ऊत्त्रेला एक शिलालेख आहे.....

जुन्या प्रतिसादकांचे आभार!

या ट्रेकला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं... त्या आठवणींसाठी हे धागे पुन्हा वर काढतोय.. Happy

तो तीस -पस्तीस मिण्टांचा थरार इथे वाचतानाही जाणवत होता इतके सुंदर, अप्रतिम वर्णन........
फार म्हणजे फारच मस्त वर्णन
८ व्या प्र चि तील पायवाट - केवळ, केवळ - शब्द संपले कौतुक करताना
ते गणेश मंदीर, सोमेश्वर मंदीर - इतक्या आडबाजूला तरीही सुबक ...या विचारात पूर्ण आश्चर्यचकित झालो.
तुम्हा सर्व मावळ्यांना मुजरा........