इसे रिश्तोंका इल्जाम ना दो..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

किरण नगरकरचं ककल्ड वाचून संपवलं.
पुन्हां एकदा तो दोन स्त्री पुरुषांच्या दरम्यानचा अनाम नात्याचा वेध.

अव्यक्ताच्या मागे कुठल्या अनावर आकर्षणातून जात रहातो आपण!

स्त्री पुरुषांच्यामधे अनपेक्षितपणे कधीतरी जे शब्दांत मांडता येत नाही, नात्यात बांधता येत नाही आणि उलगडत नाहीये म्हणून गुंतणं सोडूनही देता येत नाही असं काहीतरी रुजतं आणि ती अपरिहार्यता पुढे जाऊन जीवघेणी ठरणार आहे हे उमजूनही तिचा वेध घेत राहण्याचा मोह नाही टाळता येत.

भल्याभल्यांना नाही टाळता आला.

खूप वर्षांपूर्वी रविन्द्रला जांभूळ आख्यान पाहीलं होतं.
विठ्ठल उमपांच्या त्या सहा फ़ुटांच्या काळयारोम रांगड्या देहातून साकारत गेलेले द्रौपदीचे ते विभ्रम! पाच पांडवांच प्रेम आणि कृष्णासारख्या सख्याचं मैत्र मिरवणा-या पांचालीचं एका दुपारी घरात कोणी नसताना अचानक पांडवांची खुशाली विचारावी म्हणून आलेल्या कर्णाला एकांतात समोर बसलेला पाहून याच अनाम आकर्षणाच्या भोव-यात खेचलं जाणारं आणि मग त्यातच अडकून हिंदोळे घेत राहिलेलं मन..
तिचं विभोर रुप निटसं समजण्याचं ते वय नव्हतं.
पण "कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं.. " .. ऐकताना ती कोणत्यातरी अशाच अव्यक्तामागे आकर्षित होतेय हे त्यातल्या कृष्णाला जितक्या स्पष्टपणे उलगडत गेलं तितक्या स्पष्टपणे नाही कदाचित तरी अस्पष्ट नाजूकतेने मनाला स्पर्शून गेलं होतं.

प्रेम आणि आकर्षणा दरम्यानच्या याच कुठल्यातरी अज्ञात प्रदेशामधली वाट चालून जाणारे मग पुढे अनेक जण भेटले.

जमिनदाराची छोटी बहू आणि तिच्या त्या सरंजामी वाड्यातला अनाहूत पाहुणा भूतनाथ याच अव्यक्ताचे गुलाम बनताना पाहिले.
जबाच्या प्रेमात आधीपासूनच असलेला भूतनाथ आणि पतीवरच्या आंधळ्या रुढीबद्ध ’प्रेमात’ जखडली गेलेली छोटी बहू.
त्या दोघांमधला तो अनाम, अव्यक्त आणि म्हणूनच अपूर्व वाटलेला कोवळा भावबंध.
निरपेक्ष नव्हता अगदीच पण नितळ होता.
निव्वळ गोडगोड नव्हता. त्यात भांडण होतं पण दुरावा नव्हता.
ते दोघे एकमेकांचे कोणीच नाहीत. त्यांच्यातलं नातं मालक-नोकराच नाही, मित्र-मैत्रिणीचं नाही, भावा-बहिणीचं नाही, देवर-भाबीचं नाही, प्रियकर-प्रेयसीचंही नाही आणि तरी एकमेकांवरच्या अपार विश्वासाने, उत्कट जवळिकिने बांधले गेलेले ते दोघे.. इतके जवळ की तिच्या अंत:पुरात सहजतेने येऊन तो तिच्या एकटेपणात सोबत करु शकत असलेला, तिला तिच्याच पतीला वश करुन घ्यायला उपयोगी पडेल म्हणून मोहिनी सिंदूर ची चिमुट तिच्या भांगात भरु शकणारा.
आणि सा-या जगापासून दडवून, लपवून ठेवलेलं पतीबद्दलचं काळिज फ़ोडणारं दु:खं त्याला मोकळेपणाने सांगणारी ती. नव-याचे बाहेर पडणारे पाय धरुन ठेवण्याच्या अगतिकीतेतून मदिरा प्यायची वेळ येते तेव्हां ती आणुन द्यायलाही तिला हक्काचा वाटतो तो भूतनाथच.

जबा भूतनाथची प्रेयसी असते पण शेवटपर्यंत तो अधिकार मानतो छोट्या बहूचा आणि त्यासाठी जबाच्या वैषम्याची जाणिव होऊनही त्याची पर्वा तो करत नाही..
आपल्या हृदयातली छोट्या बहूची जागा प्रेयसीलाही अप्राप्य करणारा तो.
निर्माण झालेलं ते अनाम नातं समूळ तोडणं दोघांनाही शक्य नसतं. ते तसा प्रयत्नही करत नाहीत.

या निसरड्या वाटेवरुन चालताना त्यांचा तोल तर जाणार नाही नां चं टेन्शन बघणा-यांनाच.

पण मग एकदा तिलाच सावरताना या अस्पर्श नात्याला स्पर्शाची पहिली ओळख होते तेव्हां छोटी बहू इतकी क्रुद्ध कां होते?
खूप कठिण जातं हे कळून घेणं.
अव्यक्ताला सामोरं जायला न धजावणारं मन अचानक उघडं पडलं म्हणून? की तिचा पातिव्रत्यावर शिंतोडा पडल्याचा तथाकथित कांगावाच खरा होता?

त्याच्या आणि तिच्या मधल्या नात्याच्या प्रवासातलं अव्यक्त टिकवत रहाण्याचा हट्ट कधीतरी आपलाच बनून जातो.

स्त्री पुरुषांमधल्या या अनाम आकर्षणाची ही गुढ आणि रहस्यमय लिपी शारिर भाषेतूनच उलगडण्याचा प्रयत्नही पुढे पाहीला.
पण जणू काही या अनाम नात्याला स्पर्श झाला की त्यातली जादूच संपून जाते.
आभासी जगात मनानं कायम वावरणा-या त्या मायाचं कायम शारिरिक प्रेमातूनच व्यक्त होतं रहाणं आणि तरी एका हताश क्षणी ’ क्या सपनोंको छूनेसे इनके रंग उडने लगते है?’ हा प्रश्न पाडत नात्यांचा साराच प्रवास संपवून टाकणं!
एक अयशस्वीच प्रवास तो.

स्पर्शाचा शाप मिरवणा-या निष्फ़ळ नात्याचं हवय कशाला हे आकर्षण?

ककल्ड मधल्या नात्यांचा प्रवास तर थक्क करुन टाकणारा.

त्याच्या पत्नीचं दुस-यावर प्रेम असतं.
आणि म्हणून तो ककल्ड. व्यभिचारी स्त्रीचा पती.

जगाने त्याची हेटाळणी केली नाही पण सहानुभुतीचा धनी म्हणूनही इतिहासात नोंद केली गेल्याची दखल नाही.

स्त्री पुरुषांमधे असणा-या नात्याच्या कोणत्याच रुढ व्याख्येत न बसवता येणारं महाराज कुमार आणि त्याच्या पत्नीमधलं नातं.
परपुरुषाच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या आपल्या पत्नीबद्दलं त्याला वाटत राहिलेलं गुढ आणि रहस्यमय असं अनामिक आकर्षणाचं ते नातं.
वाचताना आपल्याला विलक्षण आकर्षून घेणारं. ही जादू किरण नगरकरच्या नेहमीच मोहात पाडत आलेल्या शब्दांच्या खेळाची की त्या नात्यातल्या अगम्यतेची हे मात्र नाही कळत.

महाराज कुमारने या त्याच्या रुढार्थाने पत्नी असलेल्या स्त्रीचा,सारं जग जिला मीरा म्हणून ओळखतं तिचा तिरस्कार करायलाच हवाय पण तरी तिच्याबद्दलच्या नेमक्या कसल्या अनिवार आकर्षणाच्या जाळ्यात तो अडकून पडलेला आहे?
आणि तिनेही दुस-यावर प्रेम करताना, शारिर प्रेमापासून म्हणून पतीला वंचित करत असतानाही त्याच्यावर याच अनाम नात्यातून गाजवलेला हक्क. त्याच्या इतर मैत्रिणींबद्दल तिच्या मनातला तो मत्सर!
तिच्या प्रियकराचा मुकाबलाही तो करत नाही.
ते अशक्य आहे त्याला माहीत आहे. कारण त्याचं अस्तित्व केवळ तिच्यापुरतंच.

आपली पत्नी असूनही अप्राप्य असणा-या तिच्याशी जर रत झालो तर उलगडेल आणि संपेल एकदाचं आकर्षणाचं गुढ कदाचित असं म्हणून महाराज कुमार एकदा त्या तिच्या भास-आभासाच्या सीमारेषेवर असणा-या मन:स्थितीचा फायदा उठवत तिच्या निळ्या प्रियकराचं रुप घेतो. तेव्हा कां कुणास ठाऊक पण आपल्यालाही त्याची कीव किंवा तिरस्कार नाहीच वाटू शकत.

अव्यक्ताच्या मागे अपरिहार्यपणे खेचला गेलेला महाराज कुमार.
काय आहे ते नक्की जे त्याला तिच्याबद्दल वाटतय हे त्याच्यासोबत आपणही शोधत रहातो. ते कोडं उलगडणारण नाही कधीच हे माहीत असूनही.

प्रेम आणि आकर्षणाच्या दरम्यानच्या या अशा कितीतरी जागा!सोडताही येत नाहीत आणि भरुनही टाकता येत नाहीत धडपणे अशा...

अव्यक्ताच्या मागे धावत जाऊनही त्याला स्पर्श करायला न धजावणारं एक मन स्त्री पुरुष दोघांकडेही असतं हेच खरं.
ते असतं म्हणूनच आकर्षण टिकून आहे हे कोण नाकारणार?

----------

विषय: 
प्रकार: 

मस्त लिहिलं आहेस ट्युलिप!
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..

ट्युलिप, मस्त लिहिलं आहेस एकदम.... बाकीही माहिती दे ना ह्या पुस्तकाची, अनुवादीत आहे की मराठी किंवा इतर भाषांत? प्रकाशक कोण वगैरे..

बाकी लेखन-आस्वाद ह्या कॅटेगरीत टाकलयंस म्हणून, नाहीतर लिहिण्याच्या बाजावरून पुस्तकाचं रसग्रहण करत्येस की सिनेमाचं, असा विभ्रम निर्माण होतो इतकं सुरेख लिहिलयंस..

---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

Cuckold हे किरण नगरकरांचे पुस्तक (हे इंग्रजीमधेच लिहिलेले आणि प्रकशित केलेले आहे). ह्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. सात सख्खम त्रेचाळीस हे त्यांचे पहिले पुस्तक (ह्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद देखील उपलब्ध आहे). ह्या पुस्तकाने बरीच खळबळ निर्माण केली होती.

मी नगरकरांचे फक्त रावण अँड एडी हे एकच पुस्तक वाचले आहे आजवर. मला ते मुळीच आवडले नव्हते त्यामुळे Cuckold ला हात लावला नव्हता. आता एकदा Cuckold पण वाचून बघितले पाहिजे.

छान लिहीतेस ट्युलिप!

छान लिहिलयेस ट्युलिप. 'प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो' हेच खरं. आपण उगाच लेबलं लावात रहातो आणि मित्र/मैत्रिण, नवरा/बायको अशा कॅटेगरीत टाकतो निखळ, निर्मम प्रेम..

ट्यु, एकदम कातील लिहिलंस!! खूप म्हणजे खूपच आवडलं.

ट्यु, तुझ्या ब्लॉगवरही वाचलं काल रात्री. मस्तच लिहिलं आहे. वाचायला म्हणून ठीक आहे पण हे असं काही लिहिणं मला झेपणे नाही.

जुनाच विषय, पण लिहिलंयस चांगलं. (टायटल वाचून पुन्हा गाण्याबिण्यावर आहे की काय म्हणून घाबरतच वाचलं. Happy )

साहब-बिबी.. बद्दल लिहिताना ते नातं आहे त्यापेक्षा जास्त काँप्लिकेटेड करुन लिहिलंयस असं वाटलं.
>>या निसरड्या वाटेवरुन चालताना त्यांचा तोल तर जाणार नाही नां चं टेन्शन बघणा-यांनाच
हे मला नाही पटलं. म्हणजे तो मूव्ही पहाताना मला तरी तसं वाटलं नाही. हे आपलं माझं मत.

वरचं वाचून Cuckold काही वाचेन असं वाटत नाही.

उच्च लिहिलयस !!!

पण मलाही लालूसारखेच साहब..बिबी चे वाटले.

ट्यू
पुस्तकाबद्दल जास्त अन साहब बिबी बद्दल कमी लिहायला हवं होतंस.
अन गाणं ज्यातलं आहे त्या सिनेमाबद्दल काहीच नाही कसं काय ?

khupach chan Tulip,

Movie baghatana evhadya barkaine me pahila navhata, punha ekda pahin.
Cuckold me nakkich ekda tari vachen.

मस्त लिहिलंय..
मध्ये मध्ये मला झेपत नव्हतं ती गोष्ट वेगळी! Happy
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है

मला झेपलं का नाही माहीत नाही... पण ट्यूलिप, हे लिहिलयस ते कातिल आहे.
'प्रेम' हा एकच शब्दं जगातले असले नसले... सगळे खेळ खेळवतोय... तुला दिसलेला साहब्-बीबी मधला अविष्कार हा त्याचाच एक प्रकार.. तुला दिसला तसा मला दिसलाच असेल असं नाही... पण तुझी ते मला दाखवण्याची, व्यक्तं करण्याची जी शैली आहे.... ती कातिल आहे!
जियो! रंगेबीरंगीवर येणं होत नाही, खोटं कशाला सांगू....
पण वेळ होतो तेव्हा इथे आवर्जून तुझं वाचण्याचा मोह टळत नाही... आणि तो टाळला की, चैनही पडत नाही... असं मोठं अवघड आहे Happy

हे २ वर्षांपूर्वी वाचलं तेव्हापासून cuckold हे पुस्तक डोक्यात होतं. परवा एका मित्राकडे अचानक हाती लागलं. आत्ताच वाचायला सुरवात केली आहे.
केवळ तुझ्या लेखामुळेच.

खुप आवडलं!!! त्यातुन द्यायचा जो संदेश आहे तो अगदी मनाला भिडला... << 'प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो' हेच खरं. आपण उगाच लेबलं लावात रहातो >>> सरिवीणाला अनुमोदन!!! माझ्याकडुन मनापासुन शुभेछा!! या विषयावर खरचं काहीतरी वाचायला आवडेल.. बघते cuckold कुठे मिळतय का ते!!

ट्युलिप.. छान लिहिलयस.. बापरे..ककल्ड तुझं वाचू झालंही.. मी सध्या फक्त १८७ व्या पानावर आहे.. ऊफ्.. Happy
साहेब बीबी और गुलाम तर माझं मोस्ट मोस्ट फेव कादंबरींपैकी एक .. शाळेच्या जमान्यापासून कितीतरी वेळा वाचलं तरी त्याभोवती असलेलं गूढ वलय कमी होत नाही अजिबात..
छान रसग्रहण केलयस..

नगरकरांचे cuckold वाचतेय सध्या. आवडतय. पूर्ण झाल्यावर लिहीनच इथे.

बाकी 'साहेब,बिबी और गुलाम' बद्दल- अगदीअगदी.
आहेस कुठे तू ट्युलिप ? वी आर मिसींग यु. Happy

चारूलता, मादाम बोव्हारी किंवा अ‍ॅना पासून ते 'ब्रिजेस ऑफ मेडिसन काऊंटी', 'मुक्काम' पर्यंत कंटाळ येईतो लिहील्या गेलेला विषय. तरी एखादा लेखक असे काही रत्नमाणकं दाखवतो की पुन्हा आपण त्यात गुंततो.

ट्युलिप सुरेख लिहिलय एकदम. ह्या विकांताला वाचण्यासारखं काहीतरी मिळालं. धन्यवाद. एका छान पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.