http://www.maayboli.com/node/22012 भाग-४
दिवस पाचवा -
आज आमच्यापुढे गहन प्रश्न होता. रत्नागिरीला जावे अथवा नाही. आधीच्या प्लॅननुसार आम्ही रत्नागिरीजवळील रत्नदुर्ग आणि त्याच्या थोड्या पुढे असलेला देवगडपासून मोहिमेची सांगता करणार होतो. पण मध्ये माझ्या आजारपणामुळे निम्मा दिवस वाया गेलेला. त्यामुळे आता काय करावे हा विचार डोक्याला शिणवत होता.
रत्नागिरीला जायचे तर एवढ्या लांब जाऊन फक्त एकच किल्ला मिळणार होता आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे दुसरे दिवशी रत्नागिरी ते पुणे असा जवळपास साडेतीनशे किमी हून अधिक अंतर कापावे लागणार होते. आधीच आमचे सहाशे-सातशे किमी बाईकिंग झाले होते त्यावर अजून म्हणजे हालत होती.
एकच होते की रत्नागिरीला एकांच्या ओळखीने फुकट राहण्याची सोय होणार होती.
शेवटी काय ते हेदवीला जाऊन ठरवू असे म्हणत निघालो. कालचे ते हॉटेल मस्त होते त्यामुळे तिथेच जाऊन भरपेट नाष्टा केला आणि हेदवीच्या दिशेने सुटलो...
हेदवीची ब्राम्हणघळ खूप प्रसिद्ध आहे पण नेमके आम्ही चुकीच्या वेळी गेलो त्यामुळे जिथे भरतीच्या वेळी उभे राहणे पण मुश्किल होते तिथे आम्ही छानपैकी घळीत डोकावून पहात होतो.
थोडी निराशा झालीच पण तिथल्याच एका हॉटेलमध्ये असे कळले की जयगड फारसा लांब नाही आणि आत्ता निघून दुपारपर्यंत येणे शक्य आहे. अरे वा, मग बोंबलत रत्नागिरीला जाण्यापेक्षा परत गुहागरला मुक्काम करता येणे शक्य होते आणि दुसरे दिवशी गुहागर-पुणे हे अडीशेच किमी राहणार होते. हे एकदम बेस्ट झाले.
आज माझा टर्न होता गाडी चालविण्याचा. सुरुवातीला चांगला रस्ता लागला त्यामुळे खुश होतो पण नंतर त्या प्रचंड चढ उतारवाल्या रस्त्यांनी जो हिसका दाखवला तो म्हणजे हैराण करणारा होता.
प्रचंड वळणे आणि एकदा तीव्र उतार की थोड्या वेळाने एकदम तीव्र चढ असे करत तडफडत नरवणमार्गे कुडली गाव गाठले. गावातला उतार इतका तीव्र होता की दोन्ही ब्रेक दाबूनच गाडी चालावावी लागत होती. गावातल्या धक्क्यापाशी पोचलो आणि खऱ्या अर्थाने धक्का बसला तिथली होडी पाहून...आधीच तिथे सहा-सात बाईकवाले उभे होते आणि ती होडी म्हणण्यापेक्षा होडके या सगळ्यांना घेऊन जायला किती फेऱ्या मारणार या विचारात पडलो. त्याहून धक्का बसला म्हणजे त्या बोटवाल्या कोकण्याने सगळ्या गाड्या एकदम घेऊन जायचे जाहीर केले तेव्हा. आणि केले की त्याने. तो आणि मदतीला एक जण अशा दोघांनी दे दणादण सगळ्या बाईक्स भराभर त्या होडक्यात बसवल्या आणि वर प्रवासीपण घुसवले.
होडक्यात बाईक चढवताना अमेय आणि कोकणी बोटवाला...
ते होडके म्हणजे दुचाकी गाड्यांचे शोरूमच झाले होते. आमच्या युनिकॉर्नबरोबर, यामाहा, हिरो-होंडा, बजाज पल्सर अशा अनेकाविध गाड्या तिथे सुखाने बसल्या होत्या. माझी बाईक अगदीच कडेला उभी केल्याने मी आणि अमेयने सर्व ताकत लाऊन धरून ठेवली होती.
तो कोकणी म्हणजे एक अस्सल नमुना होता. एकतर अखंड त्याची टकळी सुरू होती आणि एकेकाची तो जे खेचत होता ते ऐकून सॉलीड धमाल येत होती.
पलिकडच्या काठावर उतरल्यानंतर तितक्याच वेगाने त्याने सगळ्या गाड्या अनलोड केल्या आणि पुढच्या फेरीसाठी रवाना झाला.
इथून पुढे जयगडपर्यंतचा प्रवास हा एक लक्षात ठेवण्यासारखा होता. मला अजूनही जसाच्या तसा तो भाग आठवतो, चित्रात जपून ठेवल्यासारखा...
बराच चढ चढून आल्यावर आम्ही डोंगरमाथ्यावर पोचलो आणि तिथून एक रस्ता सरळ रेषेत पार अगदी क्षितीजापर्यंत गेला होता. असा रस्ता कोकणात अगदीच दुर्मिळ...त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुकलेली झाडी होती आणि त्या पिवळसर पार्श्वभूमीवर दुपारच्या उन्हात तो वैराण रस्ता संपता संपत नव्हता. त्या भागातच कंटाळा इतका ठासून भरला होता की भरधाव गाडी चालवतानाही मला जांभया येत होत्या...असो.
जयगडला पोचलो तेव्हा उन्ह चांगलेच वर आले होते आणि घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या.
जयगडबद्दल मी फारश्या अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. पण किल्ल्यात बघण्यासारखे बरेच काही आहे. उन्हाने वैतागलो होतो त्यामुळे फारसा वेळ न घालवता पटापट फोटो मारून निघायचे असा बेत होता पण त्या किल्ल्यात एवढे गुंगलो की वेळ किती गेला ते कळलेच नाही.
खंदकाकडे जाणाऱ्य मार्गावरील द्वार
खंदकFrom Konkan Trip
जयगडचा इतिहास फारसा नाही. पण शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेला किल्ला आहे मात्र देखणा. हा किल्ला बांधताना बुरुज सारखे ढासळत होते त्यामुळे जयबा नावाच्या एका सैनिकाने आपणहून बांधकामाच्याखाली बलिदान दिले. त्यामुळे किल्ल्याचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी वदंता आहे. किल्ल्यात त्या जयबाची घुमटीपण आहे.
कालांतराने या किल्ल्याचा शासकीय विश्रामगृह म्हणूनपण वापर झाला.
एका तीन मजली इमारतीचे अवशेष, मारूती मंदीर, लाईट हाऊस सारखी एक इमारत, भक्कम तटबंदी असे बरेच काही कॅमेराच्या डोळ्याखाली घालून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
पुन्हा एकदा त्या कंटाळवाण्या मार्गाने खाडी गाठली. तो कोकणी होताच स्वागताला. पुन्हा एकदा त्या धोकादायक वाटणाऱ्या होडक्यातून आमची गाडी सुखरूप पैलतीरी नेली आणि हेदवी गाठले.
त्या हॉटेलच्या मालकांना आश्चर्य वाटले. कारण आम्ही जाताना अंदाज केला होता की तीनपर्यंत परत येता येईल म्हणून. आणि बरोबर तीनला एक मिनिट कमी असतान त्यांच्या हॉटेलपाशी जाऊन हॉर्न दिला.
मग त्यांच्याच बागेत जरा फोटोसेशन केले.
From Konkan Trip
या आख्ख्या कोकणप्रवासात किल्ले हेच उद्दीष्ट ठेवल्याने समुद्रकिनारी डुंबायला वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे त्याची भरपाई करण्यासाठी गुहागर गाठले. भक्तनिवासाची खोली दुसरे दिवशीपर्यंत बुक करून फक्त कॅमरा आणि कपडे घेऊन गुहागरचा किनारा गाठला.
आणि गेल्या गेल्याच असल्या फ्रेम्स मिळायला लागल्या की बास.
शेवटी सूर्यास्त झाल्यावर आम्ही कॅमेरा बाजूला ठेवला आणि डोळे लाल होईपर्यंत मनसोक्त पाण्यात डुंबलो.
पाच दिवसाचा धावपळीचा, सततच्या बाईकिंगचा, वेळी-अवेळी खाण्याचा शीण भरून निघत होता. ते समुद्रस्नान इतके सुखद होते की भुकेची जाणीव झाली नसती तर तिथेच डुंबत राहीलो असतो रात्र होईपर्यंत.
आंघोळी उरकून पुन्हा एकदा काकांच्या हॉटेलवर धाड टाकली. आम्हाला बघताच त्यांनी लगबगीने आत जाऊन सुचना दिल्या बहुदा.
अरे ते कालचे बकासुर आलेत. या टेबलला दोघांची सर्वि्स लावा.
आणि आम्ही त्यांची निराशा केली नाही. मनसोक्त समुद्रस्नानामुळे तर पोटात आगडोंब उसळला होता. त्यामुळे भरभक्कम बील होण्याइतके हादडलेच शिवाय जाताना तिथे विकायला ठेवलेले कोकम आगळ, कँडी, मँगो कँडी असा कोकणी मेवापण खरेदी केला.
आमच्यासारखे ग्राहक रोज यावेत असे काकांनी नक्कीच गाऱ्हाणे घातले असणार तिथल्या दैवताला.
घरी फोन करून उद्या येत असल्याची सुवार्ता कळवली आणि एका सुरेख ट्रेकची तितकीच सुरेख सांगता झाल्याच्या आनंदात अंग टाकले.
==================================================================
खांदेरी-उंदेरीला झालेली निराशा आणि माझे पोटाचे दुखणे या गोष्टी वगळता आमची कोकण मोहीम प्रमाणापलिकडे यशस्वी झाली. सगळ्यात आधी लिहील्याप्रमाणे माझ्या होंडा युनिकॉर्नचा त्यात मोलाचा वाटा होता. निर्जन ठिकाणी गाडीला काही झाले असते तर आमच्यासारखे हाल कोणाचे नसते. या प्रवासात अनेक माणसे स्वभावाची माणसे भेटली, निसर्गाचे घडीघडी बदलणारे रूप पाहिले, सूर्योदय-सूर्यास्ताचे मनोहारी रंग अनुभवले आणि समुद्र..तो तर आमचा सखा झालाय. त्या रत्नाकराने तर त्याची किती म्हणून रुपे दाखवायची. प्रत्येक ठिकाणचा समुद्र वेगळा...आणि प्रत्येक गोष्ट कॅमेरात टिपणे हे केवळ अशक्यप्राय होते पण मेंदूच्या हार्डडिस्क मध्ये सेव्ह झालेली आठवचित्रे अजूनही आमच्या सोबत आहेत आणि सोबत राहतील...
समाप्त.....
त्याहून धक्का बसला म्हणजे
त्याहून धक्का बसला म्हणजे त्या बोटवाल्या कोकण्याने सगळ्या गाड्या एकदम घेऊन जायचे जाहीर केले तेव्हा >>:खोखो:
सुंदर वर्णन्....सगळे प्रचि आवड्ले.
तो गुलमोहर खासच...
वॉव ! सगळे प्रचि एक से एक.
वॉव ! सगळे प्रचि एक से एक. वर्णन पण मस्त.
<<अरे ते कालचे बकासुर आलेत. या टेबलला दोघांची सर्वि्स लावा.>>
धन्यवाद...चातक आणि
धन्यवाद...चातक आणि रुणूझुणू...
तुमच्या प्रोत्साहनामुळेच माझ्याकडून ही मालिका पूर्ण झाली नाहीतर मला लिहायचा जाम कंटाळा आहे...
सर्वच प्र.चि. व
सर्वच प्र.चि. व विशेषतःगुहागरच्या सूर्यास्ताचे प्रचि अप्रतिम !
तुम्हाला वेळ कमी होता म्हणून नाहीतर जयगडच्या दीपगृहावरूनही सुंदर प्र.चि. मिळाली असती.
एकंदर सचित्र, रोमांचक प्रवास वर्णनाबद्दल धन्यवाद.
यातले एकही गाव मी अजून
यातले एकही गाव मी अजून पाहिलेले नाही. मस्त वर्णन. किल्ल्यावरचे बांधकामही जरा वेगळ्या धर्तीचे वाटतेय. (आज भरपूर भटकून आलोय, प्रचंड झोप येतेय तरी वाचलेच. त्या झोपेत, पहिल्या फोटोत मला एकदम मगरच दिसली... )
पक्ष्यांच्या थव्याचे प्रचि
पक्ष्यांच्या थव्याचे प्रचि अतिशय उत्तम.
गुहागरचा सूर्यास्तही फार छान...वाळूतील पावलांचे ठसे....:)
वर्णनही उत्तम.
छान वर्णन आणि फोटो तर एकदम
छान वर्णन आणि फोटो तर एकदम झक्कास
रत्नागिरीला जायचे तर एवढ्या
रत्नागिरीला जायचे तर एवढ्या लांब जाऊन फक्त एकच किल्ला मिळणार होता>>>>आशु, अरे रत्नागिरीपासुन साधारण २५-३० किमी अंतरावर पूर्णगडाच किल्लापण झाला असता. रत्नागिरीत (शहरापासुन जवळ) रत्नदूर्ग आणि पूर्णगड हे दोन किल्ले आहेत.
आम्चि सहल केल्याबद्द्ल आभारी
आम्चि सहल केल्याबद्द्ल आभारी आहोत. सुरेख वर्नन
मस्त
मस्त
छान प्रवासवर्णन आणी फोटो.
छान प्रवासवर्णन आणी फोटो.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
धन्यवाद लोक्स...सर्वांचा
धन्यवाद लोक्स...सर्वांचा मनापासून आभारी आहे...
दिनेशदा...
त्या झोपेत, पहिल्या फोटोत मला एकदम मगरच दिसली
सही...
भाऊ - हो खरंय, पण आम्हाला निदान एक दिवस तरी समुद्रात डुंबायचे होते.
जिप्सी - अरे २५-३० म्हणजे जाऊन येऊन ५०-६० किमी झाले रे. आणि आमची बसून बसून हालत खराब झाली होती. त्यामुळे हे अंतर पण फार वाटत होते.
गेलो नाही ते बरे झाले पण..आता पुढच्या टप्प्यात रत्नागिरीपासून सुरूवात करता येईल. पुढचा प्लॅन रत्नागिरी ते गोवा आहे....
डॉ., पान, राजेश्वर, जयू, स्मिता, सर्वांचे आभार
आहाहा---- काय मस्त शब्द
आहाहा---- काय मस्त शब्द चित्रण आणि प्रचि तर सग़ळीच छान सग़ळीच सेव्हलि
झकास
झकास
मस्तच.
मस्तच.
सुंदर वर्णन! प्र. चि. सुंदर
सुंदर वर्णन! प्र. चि. सुंदर !! आम्हाला घरबसल्या कोकणट्रिप घडऊन आणलीत. धन्यवाद!!!
दोन्ही अमित, मंदार आणि
दोन्ही अमित, मंदार आणि प्रज्ञा...खूप खूप धन्यवाद
कोकण ट्रिप आणि तीही बाईक
कोकण ट्रिप आणि तीही बाईक वरून पुर्ण करणे म्हण्जे धाडसाचे काम... अभिनंदन
फोटो आणि वर्णन सुरेख
सही फोटो. जयगड मी पाहिला
सही फोटो.

जयगड मी पाहिला तेंव्हा अगदी 'किले का रहस्य' ची आठवण झाली होती. जयगडचे पठार बरेच मोठ्ठे आहे आणि त्यातर बरेच जाडे-उंच खांब बघितले... ते काय ते माहिती आहे का?
तुम्हाला ती होडी जयगड जेट्टीवर मिळाली का? मला जास्त माहिती मिळाली नव्हती त्यामुळे बराच वळसा घालुन (राई-भातगाव पुल) गुहागरला जावं लागलं.
आता पुढच्या वेळी जयगड-रत्नागिरी आणि पुढे समुद्रकाठच्या रस्त्याने जा... गणपतीपुळे-रत्नागिरी रस्ता तर सहीच आहे!
जय - अरे आम्ही नाही पाहिले हे
जय - अरे आम्ही नाही पाहिले हे खांब....
आणि आम्ही जयगड जेट्टीवर नाही गेलो. त्या दिवशी ईद होती बहुदा त्यामुळे तिथली बोटसेवा बंद होती. त्यामुळे मी वर दिल्याप्रमाणे कुडलीवरून बोट केली. पलिकडच्या काठावरील गावाचे नाव विसरलो आता.
धन्स रे इंद्रा
आशु दादा, खासच रे(सगळे १ ते
आशु दादा, खासच रे(सगळे १ ते ५)!! मजा आली वाचताना.......
आणि हो, माझा फोटु पण छान आलाय
झक्कास प्र.ची.अन सुंदर
झक्कास प्र.ची.अन सुंदर वर्णनाची मेजवानी घडवलीत.........!
अम्या आणि दादाश्री धन्स
अम्या आणि दादाश्री धन्स
सुंदर वर्णन आणि अप्रतिम फोटो
सुंदर वर्णन आणि अप्रतिम फोटो आहेत.
तुमचे 'मोड' प्रकरण फारच आवडले
अशीच भटकंती चालू राहूदे आणि आम्हालाही तुमच्या ट्रेकचा आनंद घेऊदे.
आशुचँप... अप्रतिम्म्म्म..
आशुचँप... अप्रतिम्म्म्म..
धन्यवाद मीरा आणि अंजली
धन्यवाद मीरा आणि अंजली
आशू, अप्रतिम प्रचि. आणि
आशू, अप्रतिम प्रचि. आणि वर्णन..
जयगड बद्दलचा एक अनुभव इथे लिहावासा वाटतो..
मी, जयगडला २००८ मधे गेले होते, तिथे मुंबईहून काही लोक आले होते, वय साधारण ५० ते ५५ च्या आस पास असावे, त्यांच्यासोबत १६ ते १७ वयोगटातील ३ तरुणी होत्या.. त्यांच्या कपड्यांवरुन त्या बहुदा स्थानिक असाव्यात असे वाटले..
किल्ल्यात फोटो काढायच्या निमित्ताने ते इतके बिभीत्स चाळे करत होते.. ते पाहुन आम्ही तिथून लगेच निघालो..
किल्ल्याशेजारी पोलीस चौकी आहे, पण तेही या घटनेकडे कानाडोळा करताना दिसले..
सारिका - हेच दुर्दैव आहे
सारिका - हेच दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचे...या लोकांना किल्ले म्हणजे एकांतवास आणि कसेही चाळे करण्याची जागा हेच वाटते..एकेकाळी आपल्या पराक्रमाने दरारा गाजवणारे हे इतिहासाचे मूक साक्षीदार आता मद्यपींचे आणि जुगार्यांचे अड्डे आणि या अशा आचरट लोकांचे प्रेमचाळे निमूटपणे पाहत आहेत.

>>हेदवीची ब्राम्हणघळ खूप
>>हेदवीची ब्राम्हणघळ खूप प्रसिद्ध आहे
कशासाठी प्रसिद्ध आहे ??
Pages