कोकण भटकंती बाईकवरून भाग-४

Submitted by आशुचँप on 19 December, 2010 - 13:08

http://www.maayboli.com/node/21976 - भाग ३

दिवस चौथा
रात्रीच्या काळोखातून केळशीतील पहाट उगवली तीच मोठी प्रसन्नता घेऊन. इतकी सुंदर पहाट बर्‍याच वर्षांनी अनुभवयाला मिळाली. काल रात्री अंधारात हे गाव किती देखणे आहे हे कळलेच नव्हते आणि एखाद्या सुंदर स्वप्नासारखे ते डोळ्यासमोर उलगडत गेले. आत्ता कुठे जरा कोकणात आल्याचा फील यायला लागला होता. Happy

या घरात आम्ही राहीलो

आजचा पल्लाही मोठा होता. वाटेत हर्णे, कनकदुर्ग, फत्तेदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि गोपाळगड करून दापोली-दाभोळ मार्गाने गुहागर गाठायचे होते. पण आजचा दिवसही खास होता. आज आम्ही दोघेही किल्ल्यांची पन्नाशी पार करणार होतो आणि ती पण सुवर्णदुर्गसारख्या किल्ल्यावर. त्यामुळे दोघेही विशेष उत्साहात होतो.
दिवसाची सुरूवात तर चांगली झालीच होती. त्यात भर पडली आंजर्लेच्या देखण्या गणेशमंदीराने. कड्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण अतिशय सुरेख आहे. इथली शांतता आणि सभोवतालचा लोभस निसर्ग हे एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

मग तिथेच भरपेट नाष्टा करून थोडेसेच पुढे गेलो तो एक सुखद धक्का बसला. तिथल्या किनार्‍यावर हजारोंच्या संख्येने सी-गल्स बसले होते. याच पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी मी अलिबागला जिवाचा आटापिटा केला होता तेच इतक्या मोठ्या संख्येने दिसल्यावर आनंदातिशयाने काय करावे ते सुचेना. आज अमेयचा गाडी चालवण्याचा टर्न होता त्यामुळे तो गाडी पार्क करून येईपर्यंत मी सॅक, हेल्मेट तिथेच रस्त्यावर टाकले आणि टेली लाऊन पक्ष्यांच्या दिशेने सुटलो.
अर्थातच त्यामुळे अमेयची चिडचिड झाली असावी पण त्याने ते लाईटली घेतले. दरम्यान मला काही छानश्या फ्रेम मिळाल्या. पण बॅटरी जीव टाकत होती. मला लवकरात लवकर नविन बॅटरी घ्यावी लागणार आहे याची तीव्र जाणीव होत होती. पण इतर कशाहीकडे लक्ष न देता मी शक्य तितके जवळ जाऊन शिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

मनमुराद फोटो काढल्यानंतर पुढच्या प्रवासाला लागलो. आजचा दिवस भारीच ठरणार होता याची आम्हाला खात्री झाली.
हर्णेला जाताच एका किल्ल्याचे अवशेष दिसले. त्याचे फोटो काढतानाच आम्हाला तिथे एक आजोबा दिसले.

"आजोबा हाच हर्णेचा किल्ला का?"
"हा भुईकोट किल्ला.. " एकदम शुद्ध मराठीत
"हो पण हा हर्णेचाच किल्ला ना?"
"हा भुईकोट किल्ला" ....परत तेच
"अहो ते ठीक आहे, हा हर्णेचा भुईकोट किल्ला का????"
"एकदा सांगितलेले कळत नाही...हा भुईकोट किल्ला आहे ते..परत परत काय तेच विचारता".. आजोबा एकदम कावले. बहुदा पुण्याचे असावेत कारण विचारलेल्या प्रश्नाला धड उत्तर न देताच निघून गेले.

मग आम्हीच आमची समजूत घातली हर्णे बंदराजवळ हर्णेचाच किल्ला असणार म्हणून. पुढे जाताच बंदराजवळ कनकदुर्ग दिसला. सांगातीमध्ये त्याचे फोटो पाहिले असल्याने त्याची ओळख लगेच पटली. मग पटापट तो किल्लाही आमच्या खाती जमा केला. किल्ला अगदी लहान. किल्ला म्हणण्यापेक्षा पहाऱ्याची चौकीच.
किल्ला म्हणण्यासारखे काहीच शिल्लक नाही. मग तिथल्याच लाईटहाऊस आणि आजबाजूचे फोटो काढून किल्ला साजरा केला.

समोरच फत्तेदुर्ग दिसत होता. इथे तर अजिबात अवशेष शिल्लक नाही. कोळ्यांनी वस्ती करून उरल्या-सुरल्या खुणादेखील गायब केल्या आहेत.

आता ओढ लागली होती पन्नासाव्या किल्ल्याची...किल्ले सुवर्णदुर्ग..
पण दुधात माशी पडावी तसे एका कोळ्याने सांगितले की किल्ल्यावर जायची परवानगी नाही शासनाची..
मला तर असे काही वाचल्याचे आठवत नव्हते. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करून नावाडी शोध मोहीम चालूच ठेवली. शेवटी एकजण तयार झाला.
नेहमीप्रमाणेच त्याने दे दणादण ५०० रुपयांची मागणी केली. पुन्हा घासाघिस..आणि शेवटी तीनशेवर तयार झाला तेही फक्त १० मिनिटे किल्ल्यात थांबणार या अटीवर...च्यायला दहा मिनिटात काय भोज्ज्याला हात लाऊन परत यायचे का. पण साहेब काय बधायला तयार नाहीत.
"तुमाला पायजे तर दुसुरा कोनतरी सोधा.."
आता काय बोलणार..शेवटी दहाची १५ मिनिटे करून त्याच्या बोटीत पाऊल ठेवले.

बोटीतून दिसणारा कनकदुर्ग

समोरच बुलंद किल्ला आणि त्याची तटबंदी दिसत होती. नावाड्याकडून कळले होते की इथे कुणी येतच नाही. आणि त्याचा प्रत्यय किल्ल्याजवळील वाळूवर उतरल्यावर आला. कुठेही मानवी प्रदुषणाची चिन्हे नाहीत की कसल्या खुणा नाहीत. एकदम निर्मनुष्य आणि एकाकी किल्ला. त्या वाळूतून बऱ्याच महिन्यांनतर आमचीच पावले उमटत चालली होती. डाव्या बाजूला त्या धडकी भरवणाऱ्या भिंतीमुळे आणि या अनघ निसर्गामुळे आम्हाला अगदी कुठल्यातरी एक्सपीडीशनला चालल्यासारखे वाटत होते.

दुर्गम भागात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसारखे पुढे सरकलो तोच किल्ल्याच दरवाजा सामोरा आला. अनेक मराठमोळ्या किल्ल्यांप्रमाणे याचे प्रवेशद्वारही गायमुख पद्धतीचे होते. वाटेतच दोन तोफा पडल्या होत्या. त्यावल छानपैकी वेलीवगैरे चढल्या होत्या. एकूणच माहोल फार गूढरम्य असा भासत होता.

वेली बाजूला करत आणि झुडूपातून वाट काढत कसेबसे दारातून आत गेलो तर संपूर्ण किल्ला झाडीने भरलेला. पुढे जाणे अशक्य. मग तिथल्याच पायर्‍यांवरून तटबंदीवर चढलो. आजबाजूला नजर टाकली तिथे सगळीकडे झाडी माजलेली.

तोपर्यंत बोटवाल्याचा आरडा-ओरडा सुरू झाला होता आटपा आटपा म्हणून. आम्ही दोघे त्याला एकट्याला ऐकणार नाही म्हणून त्याने त्याची दोन पिल्ले आणली होती. आणि ते दोघे आम्हाला जाम भंडावून सोडत होते.

त्यांचा पुरेसा अंत पाहून आम्ही जमतील तितके फोटो काढत परतलो. बोटवाल्याची बडबड सुरूच होती. शेवटी त्याला माझे प्रेसकार्ड दाखवले.
"कुणी अडवले तर आपण हे दाखवू, मला कोण काय नाही करू शकत कळलं. मी इथे सरकारी कामासाठी आलोय..."
मग तो थोडा शांत झाला आणि वर माझे नाव आणि नंबर मागून घेतला. प्रवासात मी नेहमी व्हिजीटींग कार्ड बरोबर बाळगतो. त्यातले एक त्याला दिल्यावर त्याला हायसे वाटले. मग येताना राजाच्या रुबाबात फोटो सेशन केले.

वी हॅव डन इट...थोडेथोडके नाहीत पन्नास किल्ले...
मन अत्यानंदाने नुसती उसळी मारत होते.
मग बाईकवर जर्कीन, टॉवेल टाकून पुढचा रस्ता धरला. (हो हे सांगायचे राहीले..सततच्या बाईकींगमुळे पार्श्वभागाखाली काहीतरी घेतल्याशिवाय बसणे ही एक मोठी शिक्षा होती)
तिथून दापोली आणि मग दाभोळ असा ५०-६० किमी प्रवास रस्ता चांगला असल्याने फारच छान पार पडला.
दाभोळवरून पुन्हा एकदा फेरी-बोटमध्ये बाईक चढवली. आता तिलाही याची सवय झाली असावी.
आजच्या दिवसाचा मुख्य भाग सुरळीत पार पडल्यामुळे मी बॅटरीची चिंता न करता मनमुराद फोटो काढले.

गायबगळा

ब्राम्हणी काईट

तिथून पुढे एन्रॉनपर्यंतचा रस्ताही सुरेख असल्याने अमेयने ड्रायव्हींगचा आनंद घेत सुसाट गाडी पळवली. अपेक्षेपेप्रमाणेच सगळे व्यवस्थित वेळेत पार पडल्याने गोपाळगडवर आम्हाला सूर्यास्त मिळणार होता. आणि आम्ही किल्ल्यावर पोचतो न पोचतो तोच सूर्याने टाटा बाय बाय म्हणायला सुरूवात केली. कॅमेरा सरसावून किल्ल्याकडे जातानाच एक भारदस्त गृहस्थ भेटले.
"मी .. .. डीवायएसपी..सातारा"
आयला कामाचा माणूस..लगेच माझ्यातला पत्रकार जागा झाला..
मग माझी ओळख करून दिली पण माझे निम्मे लक्ष सूर्यास्ताकडे..
"या किल्ल्याचा काय इतिहास आहे हो...?"
आता त्यावेळी माझ्या स्मरणशक्तीने मला दगा दिला. मला काय आठवेच ना. आणि माहीती नाही म्हणून सुटका करून घेणे पण प्रशस्त वाटेना.
शेवटी देवाचे नाव घेतले आणि बाणकोटचा इतिहास गोपाळगडच्या नावावर खपवून टाकला.
'देवा मला क्षमा कर, मी काय सांगतोय आणि हा काय ऐकतोय हे माझे मला आणि त्यालाही ठाऊक नाही...आमेन.' Happy
त्या पोलिसी पकडीतून सुटका होताच मी किल्ल्याकडे अक्षरश धाव घेतली. तोपर्यंत साहेबांनी ढगांच्या पांघरूणात दडी मारायला घेतलीच होती. ऐवढी धावपळ केल्याचे चिज झाले आणि काही सुरेख प्रचि मिळाली.

प्रसन्न पहाटेनी सुरू झालेला दिवस तितक्याच छान सूर्यास्ताने मावळला. आणि आम्ही आमचा मार्ग धरला.
गुहागरमध्ये जाताच स्वस्त आणि मस्त खोली शोधण्याचा सपाटा लावला.
एका घरगुती रेस्टहाऊसमध्ये शिरलो. तिथे जाऊन त्यांना सांगितले..
"आम्ही ट्रेकर आहोत, आणि उद्या सकाळी आम्ही लगेच निघणार आहोत. तेव्हा फक्त रात्री झोपण्यापुरती जागा हवी आहे. कोणतीही सोयी-सुविधा नसली तरी चालेल. कितीमध्ये देऊ शकाल?"
यावर तो माणूस एकदम गोंधळला. दरम्यान त्यांचे वयोवृद्ध वडील आले. त्यांनाही सर्व सांगितले.
"किती देऊ शकाल?
"कमीत कमी कितीही...जास्तीत जास्त दोनशे"
दोनशे.... असे म्हणत ते झोपाळ्यावर बसले आणि डोळे मिटून विचार करू लागले. आम्ही मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघत बसलो. बराच वेळ झाला तरी ते डोळेच उघडेनात.
मनात आले म्हणावे एवढा त्रास होत असेल तर राहू द्या, आम्ही दुसरीकडे बघतो.
दरम्यान, अमेयला शंका आली..माझ्या कानात तो कुजबुजला..
"अरे झोप लागलीये त्यांना.."
कितीही आवरले तरी एकदम फिस्सकन हसू आले
त्या आवाजाने आजोबांनी डोळे उघडले आणि रेकले.."नाही मिळणार दोनशेत..."
बरंय म्हणून सॅक उचलली तरी आमचे हसणे काय थांबत नव्हते.
तिथून पुढे भक्तनिवास मिळाला आणि छानशी सोय झाली. पण तिथल्या काकूंनी अगदी काळजीने विचारले..
"अरे दोघेच बाईकवरून फिरताय..कशाला अघोचरपणा करता..घरच्यांच्या जीवाला घोर..घरी फोन तरी करताय का नाही.."
त्या अनोळखी ठिकाणी मिळालेल्या त्या मायेच्या शब्दांनी अगदी भरून आले. एकदम घरच्यांची तीव्रतेने आठवण झाली. दरम्यान कडकडून भूक लागलेलीच. भक्तनिवासमध्ये रहायचे म्हणून अमेयने स्वेच्छेन मासळी खाण्याचा बेत रद्द केला. मी तर पोटाला जपून असल्याने शाकाहारीच होतो.
एका टीपिकल हॉटेलमध्ये गेलो आणि तिथेही स्वादिष्ट अन्नाची मेजवानी मिळाली. मग काय भस्म्या मोड पुन्हा ऑन..
हे आणा..ते आणा..पोळ्या आणा..सोलकढी आणा..भात आणा..
तो मालक आमच्या खादाडीकडे आचंबित होऊन बघत होता. पण काय बोलणार..त्याला बरेच वाटत असेल. पण तुडुंब पोट भरल्यावर उठलो आणि बील देताना त्याला जेव्हा विचारले..
"इथे कुठे आईस्क्रीम मिळेल का हो...?"
तेव्हा त्याला राहवेना
"आईस्क्रीम आत्ता?...यावर..?"
मग एकदम त्याला जाणवले की आपण भलतेच बोलून गेलो..मग स्वताला सावरत त्याने आईस्क्रीम पार्लरला पत्ता सांगितला.
अर्थात आमचाही नाईलाज होता..पन्नाशी गाठल्याचे सेलिब्रेशन आईस्क्रीमने करणार नाही तर कशाने...
मग मुद्दाम त्याला खिजवण्यासाठी येताना पुन्हा त्याच रस्त्याने आलो आणि जाता-जात डायलॉग टाकला..
"अरे आत्ताचा दुसरा फ्लेवर जास्त छान आहे..मगाचे एवढे खास नव्हते.." Happy
भक्तनिवासमधल्या खोल्या अगदी ए-वन होत्या. मग झोपण्यापूर्वी सगळा हिशोब पार पाडून आणि उद्याचा प्लॅन डोक्यात घोळवत शाही झोपेच्या राज्यात घुसलो.

http://www.maayboli.com/node/22190 - भाग -५

गुलमोहर: 

सहीच आहे रे........... तो सूर्यास्ताच पिक तर मस्तच........

आणि चंद्रदर्शन कधी घेतलस Happy

अहाहा ! काय एकेक प्र.चि. आहेत !! अन सोबत धावते समालोचन पण !!!
<<वी हॅव डन इट...थोडेथोडके नाहीत पन्नास किल्ले...
मन अत्यानंदाने नुसती उसळी मारत होते.>> सचिनने ५०वा किल्ला सर करायच्या आधीच तुम्हीही ती कामगिरी पार पाडली होती म्हणायची ! दोघांचाही आनंद तितकाच महत्वाचा व सांसर्गिकही !!
अंजनवेल [एनरॉन फेम]- वेलदूर भागात मी बर्‍याच वेळा गेलो आहे. गोपाळगडाचे लक्षवेधी अवशेषही नाही दिसले कुठे.
५व्या भागाची आतुरतेने वाट पहातोय.

मस्त प्रचि आणि वर्णन...
सुर्यास्ताचा अल्टीमेट आलाय...

सगळेच फोटो मस्त वॄतांत पण छान..
मी चारही भाग वाचले. मस्त ..:स्मित:
मी बरेच दिवस असा प्लान करतोय पण या ना त्या कारणाने राहिल.

सर्वांचे मनापासून धन्यवाद...
भाऊ - अगदी अगदी..मी गेली कित्येक महिने वाट पहात होतो या क्षणाची...अर्थात माझ्या पन्नाशीपेक्षा सचिनच्या कामगिरीचा आनंद कैक पटीने जास्त आहे...ही इज गॉड ऑफ क्रिकेट... Happy
अश्विनी - हो ते एक चांगले झाले. परत तब्येतीने दगा दिला नाही. मला वाटते तो एक कैफ असतो जो बाकी सर्व गोष्टी विसरायला लावतो.
विनय - आता नेक्स्ट प्लॅन रत्नागिरी ते गोवा असा ठरतो आहे. येणार असाल तर तुमचे मनापासून स्वागत...
दिनेशदा - धन्स तुम्हाला...:)

<<ही इज गॉड ऑफ क्रिकेट... >>पण एका अर्थीं, एव्हरीवन कॅन बी अ गॉड ऑफ हीज ओन क्रिकेट !! जसे तुम्ही अहात !!

चँप, अहोभाग्य आमचे की तु मायबोलिवर आहेस...! नाहीतर वाळ्वंटात असला अनुभव अशक्य!

(एक चातक "वाळ्वंटात")

अच्छा तु दुबईकर आहेस होय..तुझी पहिली पोस्ट वाचून मला काहीच अर्थबोध झाला नाही...
हम्मम..अरे मोबाईलवर रिझोल्यूशन असेही खराबच येते.
शैलजा - धन्स

क्या बात है आशू..... फार सुंदर समालोचन... आणि सूर्यास्ताचा फोटो तर लैच भारी.... Happy

चँप, तुला कितींदा सांगीतले आहे "वॉटर मार्क" मध्ये ९९% पाणी मिसळत जा म्हणुन.
फक्त शोधुनच दिसला पाहीजे तो, (अर्थातच तुझ्या मालकिचा फोटो आहे "दर्शवणारे" चिन्ह)

हे मी सगळ्यांनाच सांगत सुट्त नाही.. तु आपला...........!

"नैसर्गिक" प्रचि पहायला "आणखी" बरं वाट्तं मित्रा....

मस्त ! मस्तच !....खूप सुंदर प्रचि आणि वर्णन.
सगळ्यांमध्ये अव्वल हा भाग.
भस्म्या मोड....म्हणजे पुढच्या भागात पुन्हा लगबग Proud

नाय काय, ते मागेच क्लिअर झाले की खाण्यामुळे नाही तर पिण्यामुळे....
आणि न खाऊन जीव जाण्यापेक्षा खाऊन गेलेला काय वाईट Happy

Champ.. class photoos.... Varnan pan mastach... Suvarndurg ajun tari mazya wishlistvarach !

मस्तच. मला आवडला सोलिड. भटके दिवस आठवले. आता फक्त ऐअरपोर्ट ते क्लायंटच हापिस एवढाच प्रवास होतो बहुतेक वेळा. ट्रेकला जाउन ५-६ वर्शे तरि झालि. शेवटचा ट्रेक रायगडला होता, टकमक टोकावरुन रैपलिंग साठि....आठवण झालि.

Pages