'तुटलेले पंख' - अम्बई, अनुवाद - सविता दामले

Submitted by चिनूक्स on 21 December, 2010 - 04:49

विभावरी शिरुरकरांपासून मेघना पेठ्यांपर्यंत असंख्य लेखिकांनी मराठीत भरघोस लेखन केलं असलं तरी इतर भारतीय भाषांमधलं स्त्रीसाहित्य मराठीत फारसं आलेलं नाही. हे ध्यानी घेऊन मनोविकास प्रकाशनानं 'भारतीय लेखिका' ही मालिका प्रसिद्ध केली आहे. या मालिकेअंतर्गत आतापर्यंत तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. अकरा पुस्तकं लवकरच प्रकाशित होतील. सेन्सॉरशिपला धुडकावून लावणार्‍या या लेखनात लैंगिकता, राजकारण, पर्यावरण, मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांचा थेट वेध घेतला आहे, जाणार आहे. प्रकाशित झालेल्या पुस्तकांमध्ये सुप्रसिद्ध तामीळ लेखिका अम्बई यांच्या कथांचा अनुवाद सविता दामले यांनी 'तुटलेले पंख' या संग्रहात केला आहे. 'पूल नसलेली नदी' हा मलयाळम लेखिका मानसी यांचा प्रफुल्ल शिलेदार यांनी मराठीत भाषांतरित केलेला कथासंग्रह आहे. वैदेही या कन्नड कथालेखिकेच्या कथांचा अनुवाद सौ. उमा कुलकर्णी यांनी केला आहे.

या तीनही कथासंग्रहांतल्या कथा विलक्षण आहेत. हे लेखन पोकळ किंवा तात्कालिक नाही. या लेखनात अनुभवांचं सपाटीकरण झालेलं नाही. या लेखिकांचा तात्त्विक पाया पक्का आहे. त्यामुळे हे लेखन लेचंपेचं नाही. या कथांमधून दिसणारी तडफ, तळमळ वाचकाला अस्वस्थ करते. या कथांमधून हताशतेचं, व्यर्थतेचं, एकाकीपणाचं, बंडखोरीचं, स्वतःचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करण्याचं चित्रण केलेलं असलं तरी या कथा प्रचारकी नाहीत. सनसनाटीही नाहीत.

या कथासंग्रहांच्या मालिकेतलं पहिलं पुस्तक आहे अम्बई या तामीळ लेखिकेचं. 'तुटलेले पंख' असं नाव असलेल्या या कथासंग्रहाचा अनुवाद सविता दामले यांनी केला आहे. अम्बई यांचं खरं नाव सी. एस. लक्ष्मी. तामीळ साहित्यविश्वात त्यांचा दबदबा आहे. 'सिरागुगुल मुरियुम', 'वेट्टीन मुलैयिल ओरू समयालारै' आणि 'काटील ओरू मान' असे त्यांचे तीन कथासंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. इंग्रजीतही त्यांनी भरपूर लिखाण केलं आहे. 'द फेस बिहाइंड द मास्क : वुमन इन तमील लिटरेचर', 'अ‍ॅन इडिअम ऑफ सायलेन्स : सेव्हन सीज अ‍ॅन्ड सेव्हन माउन्टन्स', 'द सिंगर अँड द सॉन्ग', 'अ‍ॅन इलस्ट्रेटेद सोशल हिस्टरी ऑफ विमेन इन तामीलनाडू' ही त्यांची पुस्तकं बरीच गाजली. अमित चौधुरी यांनी संपादित केलेल्या 'पिकाडोर बूक ऑफ मॉडर्न इंडियन लिटरेचर' या अ‍ॅन्थलॉजीत समावेश केल्या गेलेल्या त्या एकमेव तामीळ साहित्यिक आहेत. अनेक इंग्रजी व तामीळ चित्रपटांसाठी त्यांनी पटकथालेखन केलं आहे.

cslakshmi.jpg

अम्बई यांच्या कथा वरवर साध्या दिसत असल्या तरी त्या वाचकाला बराच काळ विचार करायला लावतात. या विचारांतून अनेक शक्यता मग जाणवत राहतात. या शक्यतांतून वाचक पुन्हा त्या कथा हाती घेतात. या कथा बहुतकरून नातेसंबंधांवर भाष्य करतात. लैंगिकता, भावनिक कोंडमारा, सुसंवादाचा अभाव हे विषय त्यांच्या लेखनात अनेकदा डोकावतात. त्यांची भाषाशैली खासच आहे. जबरदस्त निरीक्षणशक्ती, तीव्र विनोदबुद्धी यांच्या मदतीनं कथांमधून मांडलेले विषय वाचकांपर्यंत थेट पोहोचतात.

मनोविकास प्रकाशनानं प्रसिद्ध केलेली 'भारतीय लेखिका' या मालिकेतली ही तिन्ही पुस्तकं मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहेत -

http://kharedi.maayboli.com/shop/Ambai.html

http://kharedi.maayboli.com/shop/Manasi.html

http://kharedi.maayboli.com/shop/Vaidehi.html

या पुस्तकमालिकेमागची भूमिका कविता महाजन यांनी स्पष्ट केली आहे.

भूमिका

'विमेन्स वर्ल्ड' या संस्थेने १९९९ साली भारतीय लेखिकांच्या काही चर्चासत्रांचं आयोजन केलं होतं. त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती.

‘अशी लेखिकांची वेगळी चूल कशाला मांडायला हवी? त्यामुळे आपण लिंगभेदाची भावना वाढीस लावतो. लेखिकांच्या लेखनाचा मुद्दाम वेगळा विचार करण्याची काही गरज नाही,’ असा विचार तोवर माझ्या मनात होता. या चर्चासत्रानं ते मत पूर्ण बदलून टाकलं. ‘सेन्सॉरशिप’ हा चर्चासत्राचा विषय होता. राजकीय वा धार्मिक सेन्सॉरशिपला सामोरं जाण्याचे अनुभव मराठी लेखिकांच्या वाटयाला तसे आलेले नसले तरी कुटुंबाची आणि स्वत:ची सेन्सॉरशिप मात्र भरपूर होती. लिहिताना मनावर दडपण असतं, यात एकवाक्यता होती. त्या दडपणाच्या कारणांची चर्चा आम्ही त्यावेळी मोकळेपणानं केली.

'विमेन्स वर्ल्ड'नं प्रकाशित केलेल्या पुस्तकात मुस्कटदाबी आणि छळ यांबाबत जगभरातल्या लेखिकांचे अनुभव मांडले गेले होते. रशिया, चिली, द. आफ्रिका इथल्या अनुभवांच्या तुलनेत भारतीय लेखिकांच्या अनुभवांकडे आम्ही पाहायला लागलो. स्वातंत्र्याचा उदोउदो करणार्‍या उत्तर अमेरिकेत एका वर्षात तब्बल १६०७ पुस्तकं सेन्सॉर झाल्याचं त्यात नोंदवलं होतं. कारण मुलांसाठी असलेल्या या पुस्तकांमध्ये पारंपरिक कुटुंबांपेक्षा वेगळी असलेली सिंगल पॅरेंट, समलिंगी जोडपी अशी कुटुंबं चित्रित करण्यात आली होती. मुलांसाठी दूरच पण मोठयांसाठीच्या पुस्तकांमध्येही आपण असे विषय हाताळायला संकोचतो आहोत, हे त्यावरून ध्यानात आलं. नंतर भारतीय लेखिकांच्या मुलाखतींची आणि या चर्चासत्रातून निष्पन्न झालेल्या विचारांची पुस्तकं 'विमेन्स वर्ल्ड'नं प्रकाशित केली. त्यावेळी एकमेकींची सोबत अधिक घट्ट बनवून काही उपक्रम राबवता येतील का, याचा विचार झाला. पण पुढे त्यातून विशेष काही निष्पन्न झालं नाही.

नंतरच्या काळात राष्ट्रीय पातळीवरच्या विविध साहित्यसंस्थांच्या चर्चासत्रांमधून, शिबिरं-कार्यशाळांमधून, संमेलनांमधून अनेक भारतीय लेखिकांच्या भेटीगाठी, ओळखी होत गेल्या. त्यांना प्रत्यक्ष ऐकायची, त्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळत गेली. लेखनासाठी वेळ, लेखनासाठी जागा इथपासून ते लेखनाचे निषिद्ध विषय आणि लेखन ही गोष्टच निषिद्ध... इथपर्यंत अनेक मुद्दयांवर चर्चा घडत होत्या. मराठीशी समांतर असलेलं, मराठीहून खूप वेगळं असलेलं असं साहित्य अनुवादाच्या रूपातून अगदी अल्प प्रमाणात का होईना, पण अशा ठिकाणी ऐकायला-वाचायला मिळत गेलं. त्यातून अनेक प्रश्न, अनेक विचार मनात उगवत राहिले. वेळोवेळी त्याबाबत मी लहानसहान लेख, नोंदी असं लेखन केलं.

मराठी स्त्री-साहित्याचा आढावा घेताना असं ध्यानात आलं की, काही विषयांवर बायका लिहीतच नाहीत, काहींवर धूसर लिहितात. काही विषय मांडताना चलाखी केली जाते. तर काही विषयांची मांडणी पारंपरिक दृष्टिकोनातूनच केली जाते.

संतसाहित्याला अध्यात्माचा गाभा असतो आणि लोकसाहित्यात कुणा एका बाईचं नाव येण्याचं कारण नसतं. त्यामुळे तिथं स्त्रियांकडून पुष्कळ मोकळेपणानं अनुभवांची, प्रसंगांची, विचारांची, भावनांची मांडणी झालेली दिसते. तसं धाडस आजच्या आधुनिक काळात लिहिणार्‍या आम्हां लेखिकांमध्ये अभावानेच दिसतं.

स्त्रियाचं साहित्य हे रोमँटिक, गोड-गुळमट भाषेतलं, कौटुंबिक ( तेही आदर्श पारंपरिक) परिप्रेक्ष्यातलं, पुरुषकेंद्री असं तरी आहे किंवा मग विद्रोही, आवाजी, पुरुषांना विरोध करणारं, बटबटीत, लैंगिक वर्णनं खुलेपणानं करणारं म्हणून आधुनिक (!), पुरुषांचं अनुकरण करणारं असं आहे - असा (गैर)समज आपल्याकडे रूढ आहे. बायका हेच, इतकंच आणि असंच लिहितात, लिहू शकतात... असं ठामपणानं मांडणारी मंडळी आजही आहेत.

इतर भारतीय भाषांचं चित्र पाहायला सुरुवात केली, तेव्हा ध्यानात आलं की प्रत्येकीच्या धाडसाच्या वाटा वेगळ्या आहेत आणि बिचकण्याच्या जागाही वेगळ्या आहेत. काहींनी जे धाडस आपल्या आधीच्या लेखिकेनं केलंय, तिच्यापासून बळ घेऊन, तिच्या पावलांवर पाऊल टाकून पुढे जात त्यातून आपला असा वेगळा ठसा निर्माण केला आहे. वेगवेगळ्या भाषांमधली ही धाडसं जर समोर उलगडत गेली, तर आपल्या भाषेत नसलेल्या गोष्टींबाबतही बळ मिळण्याची शक्यता तयार होते. आपण करतोहोत ते काही फार जगावेगळं नसून त्या लाटेवर स्वार होऊ पाहणार्‍या अनेकजणी आहेत, हे ध्यानात आल्यानंही एक निराळा आश्वासक भाव मनात तयार होतो. भाषा, शैली, रचना यांतले अनेकविध प्रकार समोर दिसायला लागतात; ते आपल्यातील प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देऊ शकतात. याकरिता मराठी लेखिकांसाठी हे दालन खुलं झालं पाहिजे. हा विचार झाला लिहिणार्‍या बायकांच्या संदर्भात. याखेरीज सामान्य वाचक, चोखंदळ वाचक, पुरुष लेखक, अभ्यासक, समीक्षक यांनाही यातून पुष्कळ काही नवं मिळू शकेल. भारतीय स्त्री-जीवनाचं, स्त्री-विचारांचं, स्त्री-जाणिवांचं समग्र भान देणारं चित्र यातून वाचकांच्या डोळ्यांपुढे उभं राहू शकेल.

प्रत्येक प्रश्न हा स्त्री-प्रश्न असतोच, हे ध्यानात घेतलं पाहिजे. त्यानंतरच स्त्रियांचं लेखन हे फक्त स्त्री-विषयक असणं आजच्या आधुनिक लेखिकांना अपेक्षित नाही, हे जाणता येऊ शकतं. ( आम्ही स्त्री-वादी नाहीत, असं अनेक आधुनिक लेखिका म्हणतात, त्याचं एक कारण हेही आहे.) बालविवाह, अल्पवयीन बालकांचं लैंगिक शोषण, बलात्कार, कुमारीमाता, स्त्री-शिक्षण, हुंडा, स्त्री-भ्रूणहत्या, अंधश्रद्धा कुप्रथा, घटस्फोट, विधवेचा वा घटस्फोटितेचा पुनर्विवाह, स्त्रीने ( विशेषत: अविवाहित वा इतर तर्‍हांनी सिंगल असलेल्या स्त्रीने) मूल दत्तक घेणे, आंतरजातीय/धर्मीय विवाह, वर्ज्य समजल्या गेलेल्या व्यवसाय-नोकर्‍यांमध्ये प्रवेश, राजकीय सत्ताग्रहण इत्यादी विषय हे काही फक्त स्त्रियांचे प्रश्न असू शकत नाहीत. ते पूर्ण समाजाचे आणि समाजातील सर्व घटकांच्या चिंतनाचे विषय आहेत.

अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा वावर, सहभाग वाढला आहे. पण हे समकालीन चित्र आमच्या लेखनातून क्वचितच उभं राहतं. उदा. शेतकामाचा स्त्रियांचा सहभाग मोठा आहे. शेतकरी आंदोलनात स्त्रियांचा लक्षणीय सहभाग होता. पण आजही शेतकरी म्हणून स्त्रीचा विचार कुठेच होताना दिसत नाही. हे प्रश्न स्त्रियांनी मांडले, तर त्यातून खास स्त्रीचा असा दृष्टिकोन प्रकट होईल. अनुभवसिद्ध लेखन अधिक प्रभावी रीतीने होण्याची शक्यता निर्माण होते, त्यानुसार केवळ स्त्रियांच्या वाटयाला येणारे भलेबुरे अनुभव थेट मांडले जातील. त्यातून वाचकांच्या ध्यानात येऊ शकेल की, मातृत्व, लैंगिकता, शारीरिकता यांकडेही पारंपरिक चौकट टाळून वेगळ्या तर्‍हेनं पाहता येऊ शकतं. कौटुंबिक गोष्टींकडेही आर्थिक, राजकीय दृष्टीने पाहिलं तर वेगळे निष्कर्ष हाती येऊ शकतात. स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात, अशा ढोबळ विधानांना त्यातून चाप बसू शकतो. एखाद्या घटनेसंदर्भात आमच्या संवेदना कदाचित पुरुषांहून वेगळ्या नसतीलही, पण त्यांकडे पाहण्याचा कोन मात्र वेगळा असू शकतो.

पर्यावरण, शेती, जाती-धर्म, अर्थकारण, राजकारण, जागतिकीकरण, खासगीकरण, विविध विचारप्रवाह आणि वाद अशा अनेक मुद्दयांमध्ये लिंगभेद हा मुद्दा मिसळत लेखिकांनी आपले विचार, भावना, आपल्या दृष्टिकोनातून मांडल्या पाहिजेत, ही आजच्या काळाची गरज आहे. भारतीय लेखिकांचं साहित्य तुलनात्मक दृष्टीने वाचताना अशा अनेक गोष्टी सहज ध्यानात येतात. सहज-सरळपणाने, थेट, विनोदाने, उपरोधाने, तिरकस मांडणीतून, मनोविश्लेषणातून, मिथकं वापरून, इतिहासाचे-पुराणकथांचे-महाभारतादी काव्यांचे संदर्भ घेत, बोधकथांमधून, विज्ञानकथांमधून, काव्यात्म होत, माहिती देत, विचारांचा कीस पाडत... अशा विविध तऱ्हांनी स्त्रियांनी लिहिलं आहे. कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, ललित निबंध, वैचारिक लेखन, डायर्‍या, पत्रं, अनुभवकथन, प्रवासवर्णन अशा विविध प्रकारांत स्त्रियांनी लेखन केलेलं आहे.

भारतीय लेखिका आज नेमक्या कोणत्या वैचारिक स्तरावर आहेत, हे या साहित्यातून दिसतं. स्वत:पासून समाजापर्यंत, श्रद्धांपासून विज्ञानापर्यंत, पर्यावरणापासून राजकारणापर्यंत बहुविध विषयांना सामावून घेणारं, विविध दृष्टिकोनांकडेही स्त्रीच्या नजरेनं पाहणारं हे साहित्य आहे. सर्व तर्‍हांच्या सेन्सॉरशीप धुडकावून लावणारं साहित्य आहे.

हे सारं मराठीत आलं पाहिजे.
- हा विचार तर करून झाला. पण नुसत्या विचारांनी काय होतं?
इतर भाषांमधल्या लेखिकांचं लेखन मराठीत आणण्यासाठी नेमकं काय करता येईल, या कल्पनेला आकार मिळत नव्हता. मनोविकास प्रकाशनाच्या श्री. अरविंद पाटकर यांनी एका भेटीत सांगितलं की,“मनोविकास आता ललित साहित्याच्या दालनात प्रवेश करतंय.” त्यावेळी ‘भारतीय लेखिका’ या मालेची कल्पना मी त्यांच्यापुढे मांडली. भारतीय लेखिकांचं स्त्री-जाणिवांशी निगडित असलेलं लेखन मराठीत आणणारी ‘भारतीय लेखिका’ ही पुस्तक-मालेची कल्पना त्यांच्या पसंतीस उतरली. त्यानुसार काम सुरू केलं. त्यातील तामीळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधले अम्बई, मानसी आणि वैदेही या तीन नामवंत लेखिकांच्या निवडक कथांचे संग्रह आता मराठी वाचकांसमोर ठेवत आहोत.

भारतीय लेखिकांची ही निवड त्या भाषेतील प्रातिनिधिक आहे, असं नाही. मात्र या लेखिकांनी आपल्या भाषेतील साहित्यात आणि पर्यायानं भारतीय साहित्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, हे निश्चित. वय, वर्ग, लोकप्रियता, पुरस्कार असे मुद्दे विचारात न घेता स्त्री-विषयक स्वतंत्र विचार मांडणाऱ्या, स्त्री-जीवनाचं समकालीन दर्शन घडवणार्‍या, एकुणात स्त्री-केंद्रित असणार्‍या साहित्याचा विचार इथं केला. त्यानुसार लेखिका निवडण्यास सुरुवात केली. त्या-त्या लेखिकेवरील स्वतंत्र लेख अथवा तिची मुलाखत प्रत्येक पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. त्यावरून त्या प्रत्येकीचा व्यक्ती आणि लेखक असा दुहेरी परिचय वाचकांना होईलच.

जाणिवा समृद्ध करणार्‍या या पुस्तकांचं स्वागत मराठी वाचक आनंदानं करतील, याची खात्री आहे.

- कविता महाजन


***

Tutalele-Pankha.jpg

अम्बई यांची मुलाखत तामीळ कवयित्री कुट्टी रेवती यांनी २००४ साली 'पणीक्कुडम्' या नियतकालिकासाठी घेतली होती. या मुलाखतीतला हा निवडक भाग -

मी स्वत:च आग आहे...

प्रश्न : तुमच्या लेखनात स्त्रीवादी विचारसरणी असते. स्त्रीवादी विचारांची प्रेरणा तुम्हांला कुठून मिळाली?

उत्तर : अमुकच एका गोष्टीमुळे तशी प्रेरणा मिळाली असं सांगता येणार नाही. आपल्या स्वत:च्या जीवनात ज्या गोष्टी आपण निवडतो, ज्या अनुभवांतून आपण जातो, सामाजिक घडामोडी व इतिहासाचं आपल्याला जे भान येतं त्यातूनच आपल्याला जीवन कसं जगावं ते समजतं. एका सृजनशील लेखकाच्या पाठीशी ह्या सगळया गोष्टी असतात. ‘आता मी एक स्त्रीवादी कथा लिहिणार आहे,’ असं ठरवून कोणी कथा लिहीत नाही. कथा काही अशा तर्‍हेने घडत नाही. आपण स्वत:, आपलं जीवन, इतिहास, राजकारण अशा सगळयांचा आपल्या अभिव्यक्तीवर परिणाम होतो. ह्या सर्वांच्या अदृश्य सीमारेषा परस्परांत मिसळून जातात. त्यामुळेच आपण चांगली कथा किंवा कविता लिहिली पाहिजे ह्यावरच लक्ष केंद्रित करणं योग्य ठरतं. केवळ एखाददुसर्‍या गोष्टीमुळे लेखनाची प्रेरणा मिळत नाही.

प्रश्न : जेव्हा तुम्ही स्त्रीवादी विचारसरणीला अनुसरून वागता, तेव्हा कधी कधी ते समाजाच्या प्रस्थापित नियमांच्या विरुद्ध जाऊ शकतं. मग तुम्ही त्याला कसं तोंड देता?

उत्तर : मी एखादा निर्णय घेते, तेव्हा त्यावेळेस मला जे योग्य वाटतं त्यानुसारच तो घेते. मग तो निर्णय स्त्रीवादी विचारसरणीत बसतो की बसत नाही ह्याची चिरफाड मी करीत बसत नाही. कारण स्त्रीवादी विचारसरणी ही माझ्या जीवनापेक्षा काही वेगळी आहे असं मुळी मी मानतच नाही. स्त्रीवादी विचारसरणी हा माझ्या जीवनाचा एक भागच आहे. ‘स्त्रीवादी विचार’ म्हणजे काय हे कळण्यापूर्वी देखील मी काही स्त्रीवादी निर्णय घेतलेले होते.

ह्या मागचं कारण असं की स्त्रीच्या सन्मानाची आणि आत्मप्रतिष्ठेची एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे मानहानी होता कामा नये असं मला ठामपणे वाटतं. मी घेतलेल्या एकाही निर्णयात विसंगती किंवा वैचारिक गोंधळ नव्हता असं मी म्हणणार नाही. मी जेव्हा आत्मपरीक्षण केलं आणि मला त्या निर्णयांतील विसंगती जाणवली, तेव्हा मी ते निर्णय बदलले. त्या बदलांमुळे जे दु:ख झालं ते मी स्वीकारलं. ज्या ज्या गोष्टींवर माझा विश्वास होता त्या त्या गोष्टींची किंमत चुकवण्याची तयारी मी नेहमीच दाखवली.

मी जेव्हा खूप लहान होते, तेव्हापासून मला वाटू लागलं की लग्न आणि त्या अनुषंगाने जे काही येतं ते सर्व मला जमण्यासारखं नाही. मला एक मोठी बहीण असल्यामुळे मला घरी कुणी फारसं गांभीर्याने घेत नसत. आमची पिढी एकोणीसशे पन्नासच्या दशकात लहानाची मोठी झाली. आमच्या दृष्टीने समाजसेवा हे अतिशय पवित्र कार्य होतं. स्वातंत्र्यानंतरचं पहिलंच दशक होतं ते! त्यात आम्ही वाढलो हे विसरता कामा नये. माझ्या शाळेतील कित्येक शिक्षिका कुमारिका होत्या. त्यांनी शिक्षणकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलं होतं. काही शिक्षिका विधवाही होत्या. सेवा, तळमळ, त्याग आणि राष्ट्रप्रेम ह्या चार गोष्टी आमच्या जीवनात विणल्या गेल्या होत्या.
माझा आदर्श पुरुष हा टागोर, रामकृष्ण आणि विवेकानंद ह्यांचं मिश्रण होता. सात्त्विक संताप, ऋजुता, सौम्यपणा आणि कला ह्यांचा जणू तो संगम होता. तो बंगाली होता. एक कलाकार, एक कवी, एक देशसेवक! असा पुरुष मध्यमवर्गीय कुटुंबांना मान्य होण्यासारखा नव्हता. नीट निरखून पाहिलं तर ह्या सगळया कल्पनांमध्ये मी शरीराचा विचारच केलेला दिसत नाही, कारण शरीर नसलेल्या अवकाशात त्या काळात मी तरंगत होते. पण जेव्हा मी ह्या सुखस्वप्नांतून बाहेर आले, तेव्हा एक गोष्ट मला लख्खपणे उमजली. ती म्हणजे मला स्वत:च्या पायांवर उभं राहायला हवं. आणि त्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण! जीवनाचा अनुभव घेणं ही दुसरी महत्त्वाची गोष्ट होती. घर सोडण्यासाठी शिक्षणाहून अधिक चांगली सबब दुसरी कुठली मिळणार होती! मग मी तिचाच आधार घेतला. थोडा विरोध झाला. मी एकदा घर सोडलं की पुन्हा घरी कधी परतणारच नाही अशी त्यांना भीती होती. आणि ती भीती खरी होती, कारण नंतर मी परत घरी गेलेच नाही. कधीतरी काही कारणानिमित्त घरी जाणं होई, पण माझं प्रत्यक्ष जीवन हे घराबाहेर आणि मला हवं तसं मी जगत होते. जेव्हा एकटीनं जगाला सामोरी गेले, तेव्हा ‘शरीराचं’ प्रखर वास्तव माझ्या पुढ्यात उभं ठाकलं. समाजाने शरीराला ज्या व्याख्या दिल्या आहेत त्या व्याख्यांना न मानता मला माझ्या शरीराची साद ऐकायची होती.

त्यानंतर काही वर्षांनी मी लिहिलेल्या कथा वेगळयाच होत्या. ह्या काळात मैत्री करताना आणि संबंध जोडताना मी अनेक चुका केल्या. ह्या काळात जे पुरुष मला भेटले त्यांच्यात माझ्याशी साम्य असणारे अनेक गुणदोष होते. त्यांतील बरेचसे संबंध तुटले. माझ्या हातून घडलेल्या त्या चुका होत्या म्हणून मी त्यांचा स्वीकार करू शकले. त्या चुकांचे परिणामही मी स्वीकारू शकले. कारण स्वत:शी प्रामाणिक राहणं हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी स्वत:ला वारंवार सांगायची, ‘लक्ष्मी, शेवटी तुला स्वत:लाच तुला सांभाळायचं आहे. त्यामुळे हार पत्करू नकोस.’

माझ्याबद्दलच्या बर्‍याच बातम्या घरी कळत होत्या. पण कुणीही मला प्रत्यक्षपणे काही विचारलं नाही. एकदा फक्त आईने मला शब्दांची कसरत करीत विचारलं होतं की, “तू कुमारी आहेस का?” त्यावर मी तिला म्हटलं, “अम्मा, जर मी तुला ‘मी कुमारी आहे’ असं म्हटलं तर त्यावर तुझा विश्वास बसणार नाही. आणि ‘नाही’ असं म्हटलं तर तुला वाईट वाटेल. त्यामुळे आपण त्याविषयी न बोललेलं बरं!” त्यावर ती म्हणाली, “एकटया स्त्रीनं आगीसारखं असलं पाहिजे.” मी तिला उत्तर दिलं, “अम्मा, मी स्वत:च आग आहे.”

माझ्या कुटुंबियांपेक्षा इतरेजनांकडूनच माझ्यावर टीका झाली, माझा धिक्कार झाला. ह्या टीकाकारांमध्ये अनेक लेखक व कवीसुद्धा सामील होते. त्या सर्व काळात एकच लेखिका माझ्याशी मैत्रीनं वागली. त्यांचं नाव आर. चुडामणी! त्या माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ होत्या, मी बोलत असलेल्या काही काही गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या, तरीदेखील त्यांनी मला माझ्या पद्धतीने वाढण्यासाठी सहकार्य दिलं. हळूहळू मी त्यांच्याशी प्रत्येक बाबतीत मोकळेपणाने बोलू लागले. अजूनही त्यांची मैत्री ही अशी एक जागा आहे की जिथं मी विसावा घेऊ शकते.

प्रश्न : पुरुषांनी स्त्रियांच्या बाबतीत केलेली अत्यंत दडपशाहीची अशी गोष्ट कुठली?

उत्तर : मला असं वाटतं की पितृसत्ताक समाजव्यवस्था आणि तिच्या नीतीनियमांनी स्त्रियांना दडपलं. त्यातील सगळयात क्रौर्याची गोष्ट अशी की पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रीच्या शरीरावर तिचे नियंत्रण नसते. इच्छावासनांपासून ते मातृत्वापर्यंत स्त्रीचा देह तिच्या ताब्यात नसतो. त्यामुळे इतरांना सोयीस्कर होतील तशा तर्‍हेने ते त्याबद्दल व्याख्या बनवू शकतात.

प्रश्न : आजच्या दुनियेत स्त्रियांच्या लिखाणात ‘सत्य’ किती आढळून येते?
उत्तर : ‘सत्य’ म्हणजे काय? सत्याला धरून काय असायला हवं? तुमचे विचार? तुमचं जीवन? की आसपासचं वास्तव? लेखन ह्या सर्वांशी प्रामाणिक राहून करायचं असतं असं तुम्हांला वाटतं का? जे लेखन खोटं, नकली नाही, ते ‘अस्सल’ असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मग फक्त येणारा काळच ते ठरवू शकतो.
संवेदनशीलता असेल तर लिहिण्यातला ‘नकलीपणा’ कधी कधी समजू शकतो. सत्याला धरून केलेलं लेखन हे बाजारातल्या मागणीप्रमाणे नसतं, असं तुम्हांला म्हणायचं असेल तर मग हा मापदंड केवळ स्त्रियांच्याच नव्हे, तर पुरुषांच्या लेखनालाही लावायला हवा. हा मापदंड फारच नीतीवादी दिसतो मला!

त्याविषयी वेगळया तर्‍हेने आपण विचार करू. सध्याच्या साहित्यिक जगतात किती स्त्रिया आपल्या मर्जीप्रमाणे मजकूर व रूप असलेलं लेखन करतात? त्यातलं कितीसं लेखन हे केवळ लेखन करण्यासाठी म्हणून केलेलं असतं आणि किती लेखन बक्षिसं मिळवणं, कीर्ती मिळवणं, प्रकाशकांचा दबाव इत्यादी कारणास्तव केलेलं असतं हे आपल्याला सहज जाणवतं. पण हा मापदंडही स्त्रियांसारख्या पुरुषांच्या लेखनालाही लागू आहे. माझ्या मते ‘साहित्य’ हे मुळी जीवनातील सत्यांबद्दल नसतंच! आपल्याला जे सत्य आहे असं वाटतं ते ‘सत्य’ आणि आपण स्वत: ह्यांतील नातं उलगडून दाखवणं हे साहित्याचं कार्य आहे. विशेष म्हणजे हे ‘सत्य’ आपल्या आयुष्यात सारखं बदलतच असतं. आपण आपल्या भावना आणि सभोवतालचं जीवन अशा तर्‍हेनं शब्दात मांडतो ह्याचा संबंध साहित्याशी असतो. कधीमधी ह्या भावना प्रत्यक्ष स्वरूपात तर कधी लपलेल्या स्वरूपात लेखनात व्यक्त होतात. अशा तर्‍हेने भावनांतल्या उघड व छुप्या अभिव्यक्तीचा लपंडाव साहित्यात सतत चालूच असतो. आपल्याला काय वाटतं ते स्पष्टपणे व्यक्त करता येतं. काही लोकांनी तसं केलेलं आहेही! पण मग ते लेखन वाचनीय नसतं. अनुभवावरून केलेलं लेखन वाचताना ते अनुभवातून आलेलं आहे हे जाणवतं, तो अनुभवांचा परिणाम आहे हेही समजतं, पण तरीदेखील ते अगदी तसंच नसतं, तर पूर्णपणे रूपांतर होऊन काहीतरी नवीनच रसायन त्यातून तयार झालेलं असतं.

नवचित्रकलेत नाही का, वास्तवातल्या एखाद्या गोष्टीवरून प्रेरणा घेतलेली असते, पण तयार झालेले चित्र पूर्णपणे वेगळंच दिसतं. आपल्या स्वत:च्या आकलनशक्तीनुसार प्रत्येकजण त्या चित्राला अर्थ देतो. एखादं आधुनिक चित्र पाहून आपण म्हणतो, हे मला समजलं. माझ्या बाबतीत हे घडलेलं होतं किंवा हे कसं घडतं ते मला समजू शकतं. आणि मी त्याच्याशी तादात्म्य पावू शकते.

‘निखळ सत्य’ सांगणारं साहित्य ही अनुभूती तुम्हांला देऊ शकतं. चित्रात प्रवेश करण्यासाठी तुम्ही त्यातला एखादा रंग, रेषा किंवा आकृती पकडता. संगीतातही तसंच आहे. मूळ राग काय आहे ते न समजतादेखील तुम्ही संगीतात गुंग होऊन जाता. ‘स्वर’ आणि ‘लय’ ह्यांच्या शुद्धतेतून संगीत अनेक ‘सत्यं’ निर्माण करू शकतं. साहित्यदेखील तसं करू शकतं. माझ्या दृष्टीनं साहित्य हे असं आहे.


***

'तुटलेले पंख' या मराठीत अनुवाद केलेल्या अम्बई यांच्या कथासंग्रहातील 'आईनं एक खून केला, तेव्हा...' ही कथा -

आईनं एक खून केला, तेव्हा...

मी माझ्या आईबद्दल विचार करते, तेव्हा तेव्हा काही घटना माझ्या मनात चमकून उठतात आणि माझ्या काळजात जणू सुरी खुपसल्यासारखं दुखतं.

माझी थोरली बहीण कल्याणी! तिला बरेचदा भोवळ येते. मी फक्त चार वर्षांची! त्यामुळे त्याबद्दल काही कळण्याच्या वयातली नव्हे.

पहाटेच्या वेळी माझे डोळे उघडतात. ढोलकी वाजल्यासारखे काहीतरी तालबद्ध निनाद कानावर येतात. मी उठून दरवाजाकडे काय ते बघायला जाते. त्यांनी एका पाटावरती कल्याणीला बसवलेलं आहे. तिच्यासमोर कडुनिंबाची एक फांदी हातात घेऊन कोणीतरी माणूस उभा आहे. चार महिन्यांचा माझा छोटा भाऊ माझ्या खोलीतल्या पाळण्यात झोपलेला आहे. त्याचं खुदुखुदू हसणं आम्हांला खूपच आवडतं.
“नीरजाक्षी, जा आणि ते घेऊन ये,” कोणीतरी म्हणतं.
मी आईकडे पाहते.

मला तिची गडद निळी साडी आठवते आहे. तिनं केसांचा बुचडा बांधला आहे. माझ्या खोलीजवळच्या छोट्या खोलीत आई जाते. ती साडीचा पदर खाली घेते आणि एका छोट्या वाटीत स्तनांतलं दूध काढते. तिच्या डोळ्यांतून अश्रू खाली ओघळतात.

रोज पहाटे, अजून अंधारच असतो बाहेर, अशावेळी माझी आई न्हाणीघरातल्या मोठया पितळी पातेल्याखाली चूल पेटवते आणि पाणी गरम करते.

मी तिच्याकडे बघत असते. तिचे केस सुटलेले असतात व पाठीवर मोकळेच रुळत असतात. आपले गुडघे मुडपून ती बसलेली असते. तिच्या बटा गालावर आणि कानांवरही रुळत असतात. विस्तव पेटल्यावर आगीच्या लाल ज्वाळांची चमक तिच्या खाली झुकलेल्या चेहर्‍यावर खेळू लागते. त्या दिवशी तिनं लाल रंगाची साडी नेसलेली असते. तिच्याकडे मी बघत असतानाच ती चटकन उठते. तिचे केस तिच्या गुडघ्यांच्याही खाली येत असतात. तिच्या साडीच्या निर्‍या निसटतात आणि पदराखालची बटणं न लावलेली चोळी मला दिसते. तिच्या फिकट स्तनांवरल्या हिरवट शिराही मला दिसतात. कुणीतरी अग्निकन्याच माझ्या पुढ्यात अवतरली आहे की काय असा मला भास होतो. ही माझी आई? खरोखरच माझी आई?
काली काली महाकाली भद्रकाली नमोस्तुते
हा श्लोक आताच का माझ्या मनात यावा?
“अम्मा", मी हाक मारते. माझी आई मान वळवते.
“तू इथं काय करते आहेस. चिंगे!”
मला काही बोलताच येत नाही. माझ्या अंगाला घाम फुटतो.

घरात होम पेटलेला आहे. माझ्या आईचे लाल ओठ आणि तिच्या कपाळावरील लाल कुंकवाची टोकदार टिकली हृयामुळे ती अगदी त्या लवलवत्या ज्वाळांचं प्रतीक असल्यासारखी दिसते. ‘अग्नये स्वाहा’ असं दीर्घ मंत्रोच्चार करीत गुरुजी ज्वाळांवर तूप टाकत आहेत. आणि प्रत्येक ‘स्वाहा’ बरोबर माझे डोळे होमाकडून आईकडे वळत आहेत.

माझी आई माझ्या डोक्याला भरपूर तेल चोळते आणि मग मला डोक्यावरून अंघोळ घालते. साडी वर घेऊन तिनं खोचून घेतलेली आहे. मला तिच्या गोर्‍या नितळ मांडयांची कोमलता जाणवते. ती ओणवी होऊन पुन्हा जेव्हा उभी राहते, तेव्हा एक हिरवी शीर मांडीवरती उडत राहते.
“अम्मा, तू कशी एवढी गोरी? आणि मी का काळी?”
ती हसते. “चल, वेडी! तुझ्याएवढं सुंदर दुसरं कुणी आहे का?”

ह्या सर्व घटनांमध्ये काहीही परस्परसंबंध नाही, फक्त त्यातील मुख्य नायिका माझी आई होती. ती होती अग्नीची शुद्ध ज्वाला... सर्व अशुद्ध नष्ट करणारी! केवळ एका स्मितातून ती साध्या साध्या गोष्टींना असं काही सौंदर्य देई की ध्वज फडकावेत तशा माझ्या मनात त्या आठवणी फडकत राहतात. तिच्या मांडीवर डोकं टेकून मी झोपले की तिच्या लांब बोटांनी ती मला कुरवाळायची. तिचा शीतल स्पर्श सुखद वाटायचा. लहानसहान साध्या गोष्टीच ती बोलत असायची - “मी तुला नाचाच्या क्लासला घालणार आहे, तुझं शरीर अगदी लवचिक आहे.” किंवा ती म्हणायची, “किती सुंदर केस हे!”... अगदी छोटयाछोटया गोष्टी! पण त्यांमुळे माझ्या मनातली फुलं नुसती फुलूनफुलून जात.

पण त्या भावना तिच्या बोलण्यामुळे निर्माण झाल्या, की माझ्याकडेच एक स्वतंत्र कल्पनाशक्ती होती त्यामुळे त्या निर्माण झाल्या, ह्याविषयी माझी स्वत:चीच खात्री नाही. माझ्या मनात तिनं जे विचारांचं बी पेरलं त्यातून तिला स्वत:ला काय निर्माण करायचं होतं, हेदेखील मला ठाऊक नाही.

मी तेरा वर्षांची आहे. माझे परकर आता आखूड होऊ लागलेत. माझ्या आईला एकेक परकर उसवून लांब करावा लागतो.

एका संध्याकाळी आईच्या मांडीवर डोकं ठेवून मी झोपलेली असते. थोडया वेळापूर्वी वाचलेलं काहीतरी माझ्या एकदम मनात येतं.
“अम्मा, वयात येणं म्हणजे काय?”
... शांतता.
... दीर्घ शांतता.
अचानक ती म्हणते, “तू आत्ता आहेस तशीच राहा. धावत, खेळत, परकर फलकारत..”

काही लोक माझ्या मावशीच्या घरी तिच्या मुलीला बघायला म्हणून येणार असतात. तिच्या मुलीचं नाव राधू! माझी आईदेखील तिथंच गेलेली असते. त्यामुळे त्या महत्त्वाच्या दिवशी ती घरी नाहीये. माझी बहीण माझ्या डोक्याला तेल चोपडते आणि माझे केस धुते. न्हाणीघराच्या खिडकीतून मला बाहेरचं अजूनही काळं असलेलं आकाश दिसतं.

“ए, कल्लूस, तू मला खूपच लवकर उठवलंस ग! फटाक्यांचे आवाज कुठे ऐकू येताहेत अजून?”
“तुझ्या केसांना तेल लावून, धुवून, पुन्हा ते धुतल्यावर मला माझेही केस धुवायचे आहेत, हो की नाही? आता तेरा वर्षांची घोडी झालीहेस तू! अजून स्वत:ची वेणीसुद्धा घालता येत नाही तुला. चल, डोकं जरा वाकव. मूर्ख कुठली!”
कल्याणीला अजिबात धीर नाही. नारळाच्या करवंटीवरचे केस उपटावेत तसं जोरात ती माझे केस खसाखसा चोळते. अगदी दुखतं मला तेव्हा!

त्या दिवाळीच्या वेळी माझ्या आईने खास माझ्यासाठी जांभळ्या रंगाच्या सॅटीनचा परकर शिवलेला आहे. शिवणाच्या मशीनवर तो परकर शिवताना त्या सुळसुळून खाली घसरणार्‍या कापडाकडे मी किती आसुसून पाहिलं होतं. ह्यावेळी आईनं शिवायला सुरुवात करण्यापूर्वी माझं माप अगदी काळजीपूर्वक घेतलेलं असतं.
“इथं ये राणी! तुझं माप घेते. तू नक्कीच उंच झालेली आहेस पहिल्यापेक्षा!” ती माझं माप घेते आणि मग वरती बघून म्हणते, “अरे वा, ही पोरगी चक्क दोन इंचांनी उंच झालेली आहे.”

हा सॅटिनचा जांभळा परकर नक्कीच आखूड होणार नव्हता. तो अगदी जमिनीपर्यंत पोहोचत होता.
कल्याणी एकदम मला उठवून उभी करते. आणि माझे केस खसाखसा पुसते. मी अंगात पोलकं घालते आणि धावत धावत पूजेच्या खोलीत जाते. माझे अप्पा तिथल्या फळीवर ठेवलेले नवे कपडे माझ्या हातात देतात.
“हे घे तुझे कपडे, काळुबाई,” ते मला नेहमीच तशी हाक मारतात. त्यांनी तशी हाक मारली की कधी कधी मी दिवाणखान्यातल्या आरशाकडे जाते आणि त्यात स्वत:ला बघते. तेव्हा माझी आई माझ्या कानातल्या कुजबुजल्याचा मला भास होतो,“तू सुंदर आहेस.”

सरलाच्या घरी फिश टँक आहे. त्यातले मासे जसे सुळसुळतात, तसा तो सॅटीनचा परकर माझ्या अंगावर सुळसुळतो. त्याच्यावरचं जाकीट मखमली आहे. मी माझ्या कपाळावर कुंकू रेखते आणि धावत धावत अप्पांच्या पुढ्यात जाऊन उभी राहते.
“अगदीच वाईट नाही.” ते म्हणतात.
मी माझ्या वाटच्या फटाक्यांचं पुडकं घेते, पुढल्या खोलीत ठेवते आणि चाफ्याच्या झाडावर चढण्यासाठी पळते.
दररोज सकाळी फुलं काढण्यासाठी चाफ्याच्या झाडावर चढणं, हे माझं खास काम असतं. फुलांनी भरलेली परडी मी आईच्या हातात दिली की ती म्हणते, “अरे वा, एवढी फुलं!” मग तिचे डोळे विस्फारतात आणि फुलांच्या पाकळ्यांसारखी तिची नाजूक, गोरी बोटं त्या फुलांमध्ये फिरता फिरता हरवूनच जातात.

सॅटिनचा परकर निसरडा आहे. मला सगळ्यांत वरच्या फांदीपर्यंत पोचता येत नाही. शिवाय आज अजूनही काळोख आहेच. मी खाली उतरत असताना अचानक फटाके फुटतात. मी दचकते आणि थरथर कापत झाडावरून खाली उडी मारते. धापा टाकत मी घराकडे धावत सुटते. माझी थरथर अजूनही थांबलेली नाही.

कशीतरी मी स्वत:ला सावरते आणि पुढल्या खोलीत फटाके घ्यायला जाते. मला ते उडवायचे असतात. मी तिथं जाते आणि मला माझ्या फुलांच्या परडीची आठवण होते.
आता पहाट झाली आहे.

माझा परकर हातात धरून मी परडी उचलायला खाली वाकते. त्यातली काही फुलं जमिनीवर पडली आहेत. ती उचलण्यासाठी मला खूपच खाली वाकावं लागतं. तशी मी वाकले असताना माझा परकर माझ्याभोवती जमिनीवर पसरतो. त्यावर मला इकडेतिकडे थोडेसे डाग पडलेले दिसतात. झाडावर चढताना पडलेत का हे?
मी माझ्या बहिणीला हाक मारत घरात जाते, “कल्लूस!” परडी हातात धरून मी तिच्या पुढ्यात उडी राहते आणि म्हणते, “अग, माझ्या नव्या परकराचा डाग पडले बघ, सगळीकडे! आता अम्मा मला रागावेल का ग?”
कल्याणी एक अख्खं मिनिटभर माझ्याकडे घाबरलेल्या नजरेनं बघत राहते आणि मग मोठयानं ओरडत तिथून धावत जाते, “अहो, अप्पा...”

तिची ती नजर आणि धावत जाण्याची तिची ती पद्धत पाहून माझ्या अंगावर शंभर पायांच्या वळवळणार्‍या अळ्या चढल्याचा भास होतो मला! तिनं माझ्या हातून फुलांची परडीसुद्धा घेतलेली नसते. मी सॅटीनच्या परकराकडे पाहते, मखमली जाकीटावरून हात फिरवते.
देवा मला काही झालेलं तर नाहीये ना?

मला काहीही झालेलं नाहीये, हो की नाही? पण मी स्वत:लाच हा प्रश्न विचारत असताना मला जाणवतं की खरोखरच काहीतरी झालेलं आहे. माझ्याभोवती फटाक्यांचा दणाणून टाकणारा आवाज होतो. मी तिथंच उभी राहते, फुलांची परडी हातात घट्ट कवळून! माझ्या श्वास अडकतो आहे, ओठ थरथरत आहेत, नव्हे सर्व अंगच थरथर कापतं आहे.
एक मोठा हुंदका आणि मग अश्रू कोसळू लागतात.

मला माझी आई पाहिजे. तिच्या चिन्नलमपट्टी सिल्कनं वेढलेल्या खांद्यावर मला माझं डोकं ठेवायचं आहे. मला न लाजता तिला सांगायचं आहे, ‘आई, मला खूप भीती वाटतेय ग!’ तिनं मला डोक्यावर थोपटायला हवंय, धीर द्यायला हवाय. कारण नक्कीच, काहीतरी भयंकर घडलेलं आहे.

शेजारी राहणार्‍या सोवळ्यातल्या विधवा आजीबाईंना कल्याणी घेऊन येते. त्या आजीबाई नेहमी चकल्या वगैरे करायला आम्हांला मदत करतात. त्या माझ्याजवळ येऊन म्हणतात, “अगं, तू रडतेस कशाला? वेडाबाई! एवढं काय मोठं घडलं आहे ? काहीही जगावेगळं घडलेलं नाहीये.”

त्या बोलतात त्यातला एक शब्दही मला कळत नाही. माझ्या समजशक्तीच्या पलीकडचं ते असतं, पण माझं अंतर्मन अर्धवट काहीतरी समजल्यासारखं भीतीनं काकडून जातं. न भागणारी तहान लागावी तशी माझ्या मनातून खोल खोल अशी एक गरज निर्माण होते. अम्मा...

मी पाच वर्षांची असताना एकदा हरवले होते, तेव्हाची मला आठवण होते. एका मोठ्या बागेत मी चालत असते. आसपास काळोख भरतोय हे माझ्या गावीही नसतं. आणि... आणि अचानक झाडं अंधारात अंगावर चाल करून येतात. कुठले कुठले आवाज आणि शांततादेखील माझ्या मनाला घाबरवू लागतात. माझे बाबा मला शोधून काढतात. पण जेव्हा आई मला दिसते, तेव्हा इतका वेळ कोंडलेले अश्रू बांध फुटल्यासारखे वाहू लागतात.
माझी आई मला जवळ घेते, मला कुरवाळते आणि हळुवार स्वरात म्हणते, ‘काही झालेलं नाहीये, राणी, सगळं काही ठीकठाक आहे.’ तिचा चेहरा ती माझ्या चेहर्‍याजवळ आणते, तेव्हा तिचे ओठ मला लवलवत्या ज्वाळेसारखे उबदार भासतात.

मी हरवल्यावरती मला जशी भीती वाटली होती, तशीच आताही वाटते आहे. मी मटकन खाली बसते आणि डोकं गुडघ्यावर ठेवून रडू लागते. काहीतरी कायमचं हरपलं आहे, असं मला वाटतं. सिनेमात कसं ‘द एंड’ अशी पाटी दिसली की लोक तिथून चटकन उठतात, तशी मी उठले आहे आणि माझं काहीतरी मागेच राहिलं आहे, अशी भावना माझ्या मनात दाटून आली आहे. सगळ्या जगाचं दु:ख मी माझ्या मखमलीनं शृंगारलेल्या खांद्यावर वाहते आहे, अशा तर्‍हेनं मी रडते.

आम्ही दोघी संध्याकाळच्या वेळी एकत्र असायचो, तेव्हा आईनं मला त्या गोषटींबद्दल कधीच का सांगितलं नाही, ह्याचं मला नवल वाटतं.

माझ्या मनात खूप भीती भरून आली आहे, अनोळखी परिसर किंवा अनोळखी माणसांमुळे जसा भीतीचा पगडा बसतो तशी ही भीती नव्हे. अचानकपणे साप बघितल्यावर जशी मूर्तिमंत भीती आणि गोंधळ माणसाला ग्रासतो आणि किंचाळतानादेखील अर्ध्यातच त्याचे शब्द गोठतात, तशी ही भीती आहे. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे ती भीती माझ्या मनाच्या सर्व कोपर्‍यांत लटकत राहिली आहे.

मी एक प्रेत बघितलं होतं, ते मला आठवतं. त्या प्रेताचे फिकट ओठ चिरले गेले होते, डोकं दगडावर आपटलं होतं. एका क्षणापूर्वीच तर ते केस नसलेलं गुलाबी डोकं माझ्या डोळ्यांपुढे असतं आणि क्षणार्धात गुहेचं तोंड उघडावं तसं ते डोकं फुटतं आणि त्याच्या आतून रक्ताचा गडद लाल प्रवाह वाहू लागतो. काही मिनिटांतच ते रक्त जमिनीवर झिरपू लागतं. मी तिकडे बघत राहते. तो लाल रंग सगळीकडे पसरू लागतो. माझ्या डोळ्यांतही तो उतरतो. आता त्या हृदय गोठवणार्‍या प्रतिमा परत माझ्या मनात नाचू लागतात. केवढं रक्त! केवढं रक्त! पण माझ्या तोंडून शब्दही बाहेर पडत नाही. रक्ताची शय्याच जणू! तो म्हातारा माणूस तोंड उघडतो, त्याचे डोळे उघडेच राहतात. ते डोळे माझ्या हृदयात जणू घरं पाडतात. रक्त हे किती भयानक असतं. त्यामुळे ओठ पांढरे पडतात आणि अवयव गोठतात.

मला आई हवी आहे. अंधाराला मी घाबरायची तेव्हा माझी आईच मला जवळ घेऊन धीर द्यायची. तशीच ह्या भीतीतून बाहेर काढण्यासाठी आता ती मला हवी आहे. तिचा उबदार, आश्वासक हात माझ्या खांद्यावर ठेवून तिनं म्हणायला हवंय, “हे तुला जे काही झालंय, ते ही सुंदर आहे मुली!” माझं मन तिच्यासाठी तळमळतंय.
“अगं, उठ ना ग! बसून का राहिलीस? आता किती वेळ अशी रडत राहणार तू?” कल्याणी माझी समजूत घालते. ती माझ्या बाजूला बसलीये आणि तीही रडतेय.
“अम्मा...”
“अगं, पण ती पुढच्या आठवडयात येणार आहे ते तुला ठाऊक आहे ना! मी आत्ताच तिला त्याबद्दल पत्रसुद्धा लिहून टाकलं आहे. राधूचा बघण्याचा कार्यक्रम झाला की ती लगेच येईल. चला, उठ आता! ही म्हणजे नसती डोकेदुखीच झाली की!” कल्याणी रागानं म्हणते.
“मला काय झालं आहे?”
“डोंबलं तुझं! काही झालेलं नाहीये. आता किती वेळा सांगू मी तुला?”
“मला ह्यानंतर झाडावर चढता येणार नाही का?”
ती माझ्या डोक्यावर चापट मारते.
“मूर्ख! मी तुला अर्ध्या तासापासून सांगते आहे की बाई, चल आणि तुझे कपडे बदल. आणि तू आपली नुसते प्रश्न विचारत ठोंब्यासारखी बसली आहेस. अहो अप्पा!” ती हाक मारते, “बघा हो, किती छळतेय ही मला!”
अप्पा येतात आणि म्हणतात, “तू आता वेडयासारखं वागता कामा नये. कल्याणी सांगेल तसं वाग.”
ते गेल्यावर आजीबाई म्हणतात, “पण ही एवढा हट्टीपणा का करतेय? शेवटी काय... स्त्रीजन्माचे भोग आहेत हे सगळे!”
सात दिवस! राधूला बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर आई घरी येणार. त्याला अजून सात दिवस आहेत. सात दिवस... अंधारात चाचपडण्याचे!

ooo

एके दिवशी शेजारपाजारच्या बायका घरी येतात.
“तिनं आता ‘दावणी’ नेसायला हवी नाही का? कल्याणी!”
“मामी! आमची अम्मा आली की नंतरच नेसेल ती! ही बया फारच हट्टी आहे आमची! ती फक्त अम्माचं ऐकते.”
“पण आता ती व्यवस्थित मार्गावर येईल. मर्यादेनं वागेल. कसं वागलं पाहिजे ते तिला कळू लागेल.”
का?
काय होणार आहे आता?
मी का म्हणून दावणी नेसायची? अम्माच म्हणाली नव्हती का, ‘तू आहेस तशीच राहा परकर फलकारत!’ मग का बदलायचं मी?

कोणीही समजावून सांगत नाही. मला भावलीसारखं मधोमध बसवून ठेवतात आणि एकमेकींच्यात गावभरच्या गप्पा मारत बसतात. आमचे अप्पा घरात येतात, तेव्हा त्या साडीचा पदर अंगाभोवती घट्ट आवळून घेतात आणि बोलताना जरा हळू आवाजात बोलतात.

पाचव्या दिवशी कल्याणी मला एका वाटीत कोमट तेल देते.
“आता ह्यानंतर डोक्याला तेल आपलं आपण लावायचं.” ती म्हणते.

डोळ्यांत पाणी आणून मी माझ्या कमरेएवढ्या लांब, दाट केसांशी लढते. आणि मग अंघोळ करून हॉलमधल्या आरशासमोर पोलकं अंगात घालून उभी राहते.

“ह्यापुढे न्हाणीघरातच कपडे घालायचे. कळलं का?” अप्पा म्हणतात.
ते बाहेर गेल्यावर मी दार बंद करते आणि पोलकं काढते. आरशात मला माझं स्वत:चं सावळं शरीर दिसतं. माझे खांदे, दंड, छाती, कंबर आणि मऊ मऊ मांडया... सगळीकडे मी हात फिरवते. चेहर्‍यापेक्षा हे बाकीचे अवयव थोडेसे उजळ आहेत. मी पूर्वी होते तीच मुलगी नाहीये का आता? अम्मा काय म्हणेल? मी माझा शाळेचा गणवेश अंगात घालते.

मी दार उघडताक्षणी कल्याणी आत येते
“तू शाळेत का आली नाहीस, असं विचारलं तर काय सांगणार आहेस तू?”
मी तिच्याकडे बघतच राहते. पिंजर्‍यातून बाहेर काढलेल्या पक्ष्याप्रमाणे उडतच मी शाळेत जाणार असते, पण आता माझ्या उत्साहावरती विरजण पडतं.
“तुला काही सांगायला पाहिजे असं नाही. गप्प बसून राहा. काही बोलायची गरज नाही.” ती सांगते.

ooo

खेळाच्या तासाला मी खेळायला जात नाही. एका मोठ्या झाडाच्या मागे लपून राहते मी! पूर्वीही एकदा मी असं केलं होतं. आणि दुसर्‍या दिवशी मिस् लीला मेनन टीचरनं आम्हांला वर्गात विचारलं होतं, “काल खेळायला कोण मूर्ख मुलं गेली नव्हती?”
मी उभी राहिले नव्हते.
“तू? तू का उभी राहिली नाहीयेस?” त्यांनी विचारलं होतं.
“पण मी मूर्ख नाहीये ना, मिस.” मी उत्तर दिलं होतं. त्यावर त्यांनी माझ्या पुस्तकात लिहिलं होतं - “इंपर्टिनंट!”

पण आज मला मिस लीला मेनन टीचरच्या ओरडण्याचीसुद्धा भीती वाटत नाही. मला जे काही झालं आहे त्यापेक्षा दुसरं काहीही मला अधिक महत्त्वाचं वाटणार नाही, असं मला जाणवतं. मी एरवी झाडाखाली बसून एनिड ब्लायटनची पुस्तकं वाचत असे. पण आज मला तसंही करायचं नसतं. झाडाच्या बाजूला एक खळगा असतो. त्यात पडलेल्या वाळक्या पानांना मी प्रश्न विचारते, “काय झालंय तरी काय मला?”

आरोपी जसा अधीरतेने न्यायाधीशाच्या निकालाची वाट पहातो, त्याच अधीरतेनं मी अम्माच्या येण्याची वाट बघते. तिच्यापाशी ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळेल.

अम्मा आपली नजर माझ्यावर रोखून म्हणेल की, ‘तुला जे काही झालंय तेदेखील सुंदर आहे, चिंगे!’
तिच्या हास्यात एक धगधगती चमक आहे. हे मला ठाऊक होतं. केवळ त्या हसण्यानंच ती मला त्रास देणार्‍या सर्वांना दूर पळवून लावेल. त्या मला घाबरवणाऱ्या आजीबाई, कल्याणी... सगळ्या सगळ्यांना! माझी अम्मा त्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. ती असली की कुठल्याही नको त्या गोषटींचं स्तोम माजवू देत नाही. तिला सगळ्यांत सौंदर्य दिसतं.

मला अम्मा हवी आहे आत्ता! मला काहीतरी समजून घ्यायचं आहे. त्या सॅटीनच्या जांभळ्या परकराची आठवण जरी आली तरी मला घाम का फुटतो आणि माझं अंग का थरथरू लागतं, ते मला कुणीतरी समजावून सांगायला हवंय. अचानक माझी जीभ लाकडाची का होते? जग असं अंधारं अंधारं का भासतं? आणि बघताबघता खूप मोठे स्फोट झाल्यासारखे आवाज माझ्या कानी का पडतात? आणि ते वाहणारं रक्त आणि ते प्रेत माझ्या डोळ्यांपुढे का उभं राहतं? विचार करत शाळेच्या मैदानावरच मला अर्धवट डुलकी लागते.

सगळेजण गेलेत आणि मी एकटीच उरले आहे, हे मला जाणवतं. माळी मला झोपेतून उठवतो. मी हळूहळू घरी जाते.
“तुला उशीर का झाला? कुठे गेली होतीस?”
“कुठेच नाही. मी झाडाखाली बसले होते.”
“एकटीच?”
“हूं.”
“काय झालंय काय तुला? अजून तू लहान मुलगीच आहेस, असं वाटतंय काय तुला? काही भलतंसलतं झालं असतं म्हणजे?”

मी माझं दप्तर खाली फेकून देते. माझा चेहरा एकदम गरम होतो. मी हातांनी कान झाकते आणि ओरडते, “होय, मी तिथं बसणार. तशीच बसणार. मला काही झालेलं नाही.”
ते किंचाळणं अगदी वेडयासारखं असतं. अप्पा आणि कल्याणी माझ्याकडे स्तंभित होऊन पाहत राहतात.
संतापाच्या भरात मी त्यांना ओलांडून वरती जाते आणि मोकळ्या गच्चीत जाऊन बसते. मला चाफ्याच्या सुगंधाच्या जवळ एकटीलाच राहायचं असतं. कल्याणी किंवा अप्पा कुण्णीकुण्णीही तिथं यायला नको असतं मला! ह्या घरातल्या माणसांपेक्षा हा चाफ्याचा सुगंधच अधिक आश्वासक आहे. त्या सुगंधाकडे शब्द नाहीत, स्पर्श नाही, तरीदेखील! ही माणसं कधी बोललीच नाहीत तर किती छान होईल. माझी अम्मा कशी डोळे विस्फारून हसते, तसं त्यांना का हसता येत नाही? ती तशी हसली की माझ्याही मनात काहीतरी होतं आणि मलाही खूप खूप हसू येतं. गावंसं वाटतं. माझी अम्मा ह्या सृष्टीच्या निर्मात्यासारखी आहे, केवळ मान नुसती वळवून आणि गोडसं हसून जादू व्हावी तशी ती आनंद, उत्साह, सौंदर्य सारं काही निर्माण करते.
कल्याणी वरती येते.

“हं, चला जेवायला! राणी सरकार! खरोखर अम्मानं तुला अगदी डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे.”
मी बेफिकिरीने उठते आणि तिच्याकडे तिरस्कारानं बघते.

ooo

दुसर्‍या दिवशी माझी अम्मा येते. टॅक्सीचं दार उघडतं आणि ती घरात शिरते. तिची गडद हिरवी रेशमी साडी प्रवासामुळे चुरगळलेली आहे.

“काय झालं?” अप्पा विचारतात.
“त्यानं नकार दिला! नालायक माणूस! मुलगी फारच काळी आहे, असं त्यांचं म्हणणं दिसलं.”
“तुझी ताई काय म्हणते?”
“तिला वाईट वाटलं, साहजिकच आहे. गरीब बिचारी!”
“आपल्यालाही एक काळी मुलगी आहे.”

मी धावत जाऊन अम्माच्या पुढ्यात उभी राहते. कल्याणीनं पत्रात काय लिहिलं असेल त्यापेक्षा सगळं काही मला अधिक चांगलं सांगायचं आहे. माझ्या मनात ज्या भीतीच्या भावना सरपटताहेत, त्याबद्दल सांगायचं आहे तिला! तिच्या गळ्याला मिठी घालून, अगदी हळूवारपणे, थरथरत्या ओठांनी मला सगळं काही मनातलं ओतून टाकायचं आहे.

मी तिच्या डोळ्यांत खोलवर पाहाते. शेवटी मला ती सगळं काही गूढ समजावून सांगेल, ह्याचा मला भरवसा असतो. शरीरात घडणार्‍या या बदलांमुळे होणारा मनस्ताप, रात्रीच्या वेळी गुदमरल्यासारखी वाटणारी भीती ह्या सगळ्याचं गूढ ती मला सांगेल. मग ती मला केळीसारख्या नाजूक हातांनी तिच्या कुशीत घेईल. मला जोरात रडावंसं वाटत होतं. मी तिच्या केसात माझे हात खुपसून मोठमोठयाने हुंदके देणार होते.

ती माझ्याकडे पाहते.

मला कळत नाही, पण बहुधा त्याचक्षणी माझं रुपांतर आणखी एका राधूमध्ये झालेलं असतं.

विषारी डंख मारावा तसे तिचे शब्द माझ्या कानात पडतात,“अन् काय गं, आत्ता ह्याचवेळी तुला हा नसता उद्योग सुचला? हे आता आणखी एक ओझं आमच्या उरावर!”

कुणावर... कुणावर ती दोषारोप करतेय?

ooo

मूक हुंदके माझ्या छातीचं दार ठोठावू लागतात.
अम्माचे ओठ, नाकपुडया, कपाळावरचं कुंकू, नाकातली चमकी आणि तिचे डोळे सार्‍यासार्‍यातून रक्तासारखी लाल चमक धगधगते आणि त्या जळजळत्या क्षणी तिच्यावरचं दैवी प्रतिमेचं आवरण गळून पडतं आणि त्याखालची एक साधी मानवी आई दिसू लागते.

तिचे थंड, भावनाहीन शब्द तलवारींसारखे अंदाधुंदपणे वार करत सुटतात आणि आतापर्यंत तिनंच निर्माण केलेल्या सुंदर सुंदर प्रतिमांची कत्तल करून टाकतात. आता माझ्या मनात कधीही न सरणारं असं भय कायमचं वस्तीला येईल... काळ्या सावल्यांसारखं!

अग्नये स्वाहा!
अग्नीत काही फक्त अशुद्धच जळत नाही काही! कळ्या आणि फुलांचे फुललेले ताटवेदेखील जळून कोळसा होतात.


***

तुटलेले पंख

लेखिका - अम्बई
अनुवाद - सविता दामले
संपादन - कविता महाजन

मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या - १४८
किंमत - रुपये १३०


***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्सा, धन्यवाद.

एक शंका.
तुला माबोनी मार्केटिंगचं काम दिलं का ? Happy
दर १५-२० दिवसानी एक पुस्तक घेऊन येतोस ईथे, विकायला! Proud

पुस्तक मालिकेची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली. पण भाषांतर फारच कृत्रिम वाटतय.

मिलिंद बोकीलांच्या एका पुस्तकात बलात्कार झालेल्या एका बाईची आणि त्याला समांतर जाणारी अशी आणखी एका कार्यकर्तीची कथा आहे. ती वाचताना पुन्हा पुन्हा असं वाटलं होतं की इतक्या संयत स्त्री विषयक कथा आपल्या लेखिकांकडून का येत नाहीत. अर्थात माझं वाचन फार तोकडं आहे त्यामुळे हा गै स असू शकतो.

हम्म्म्म्म्......अम्बई ह्यांच्या इतर कथा चांगल्या असतीलही, पण ही काही मला विशेष आवडली नाही. कुठल्याही लैंगिक विषयाला हात न लावता, उत्तम स्त्रीवादी साहित्य निर्माण करता येऊ शकते. बायकांच्या आयुष्यात इतरही अनेक समस्या असतात, ह्याची जाणीव फारच थोड्या लेखकांना असते.
किंवा "सेक्स सेल्स" हे साहित्याला पण लागू होत असावं.

कुठल्याही लैंगिक विषयाला हात न लावता, उत्तम स्त्रीवादी साहित्य निर्माण करता येऊ शकते. >> कळले नाही सोहाताई.
शारीरभावना/ देहभान पूर्णपणे डावलूनही शक्य होणार नाही. सामाजिक काच/बंधने एकदम शारिरिक बदलांनुसार लागू केले जातात, तेव्हा कुठेतरी अशा प्रकारचे लेखन येत राहणार.

सिंडी- वाचताना त्रास होतो म्हणून मलाही आधी असेच वाटायचे. पण थेटपणाला पर्याय नाही. शैलीने लोकं अस्वस्थ होतात, आणि कित्येकदा स्मरणात फक्त शैली रहाते. म्हणूनच तसे लिहावे असे अजिबात म्हणायचे नाही, पण भावनिक उद्रेक आणि कमालीचा संताप यांच्या समन्वय झाल्यामुळे ती शैली भडक वाटु शकते.
शिवाय ज्यांचे (आपण फक्त कल्पनाच करु शकतो अशा प्रकारे) शोषण झाले, ज्यांनी ते शब्दात मांडले अशांनी ती व्यथाही संयतपणे शब्दबद्ध करावी अशी अपेक्षा मग अवास्तव वाटु लागली.

चिनूक्ष, मस्तच. आवडले मला कविता महाजनांची भूमिका, ती गोष्ट आणि भाषांतर ही. घ्यायला हवे.
सिंडी, स्वाती, भाषांतर हे थोडंसं त्या भाषेचा आणि संस्कृतीचा बाज घेऊन येतं त्यामुळं तसं वाटत असेल. शब्दशः भाषांतराचा विचार करता मला तरी हे बरंच छान वाटतंय.

रैना, तुम्ही गंगाधर गाडगीळांचा तलावातले चांदणे हा कथासंग्रह वाचला आहे का? त्यात घरदार, मुले ह्या चक्रात अडकलेल्या एका बाईला, मुक्त आयुष्य जगणार्या एका नर्सचा हेवा वाटतो अश्या स्वरूपाची कथा आहे. कुठल्याही लैंगिक विषयाला स्पर्शही न करता, स्त्रीची संसारात, समाजात होणारी घुसमट अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.
अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मला मान्य आहे की शारिरिक बदलांनुसार निर्माण होणारे सामजिक काच असह्य ठरू शकतात, पण शारिरिक बदलांशी निगडीत नसलेले अनेक काच, बंधन असतात. जसे की, अजूनही मुलांची काळजी घेणे ही प्रामुख्याने स्त्रीचीच जबाबदारी मानली जाते. तिचे शिक्षण, अर्थार्जन अजूनही दुय्यम समजले जाते.
तेही साहित्यात दिसावे, मांडले जावे.
असो. इतर भारतीय भाषांमधील, स्त्री-साहित्य, मराठीत अनुवादित करण्याचा हा उपक्रम नक्कीच कोउतुकास्पद आहे.

अम्बई यांचा छान परिचय. कविता महाजन यांची भूमिकाही आवडली.

कथाही छान. भाषांतरीत साहित्य वाचताना मूळ साहित्यकृती कुठल्या भाषेतली आहे ते पाहून मग भाषांतर वाचायला सुरूवात करायची, कथानकातलं (मूळचं प्रादेशिक) वातावरण कसं असेल त्याबद्दल विचार करत पुढेपुढे सरकायचं हा माझा एक आवडीचा विरंगुळा आहे.

मिलिंद बोकीलांच्या एका पुस्तकात बलात्कार झालेल्या एका बाईची आणि त्याला समांतर जाणारी अशी आणखी एका कार्यकर्तीची कथा आहे. >>> हो. ती कथा मलाही आवडली होती. बहुतेक 'झेन गार्डन' या कथासंग्रहातली होती. (कथेचं नाव आठवत नाही. :()

सोहा- 'तलावातील चांदणे' नाही वाचलेले.

लैंगिक विषयाला स्पर्शही न करता>> केला म्हणूनच केवळ ती कथा तितकीशी चांगली नाही किंवा टिपीकल ठरत नाही एवढेच म्हणायचे होते.

If you look beyond your body, then others will हा एक महत्त्वाचा मतप्रवाह आहे स्त्रीवादात निश्चितच. आम्ही आधी व्यक्ति आहोत, मगच स्त्री अशी धारणा.

जसे की, अजूनही मुलांची काळजी घेणे ही प्रामुख्याने स्त्रीचीच जबाबदारी मानली जाते. तिचे शिक्षण, अर्थार्जन अजूनही दुय्यम समजले जाते. >> हे तर मराठी/ भारतीय कशाला, सर्व भाषांत जवळपास तसेच दिसत असणार की काय कोण जाणे Happy

कथा आवडली.

कविता महाजनांची भूमिका, " प्रत्येकीच्या धाडसाच्या वाटा वेगळ्या आहेत आणि बिचकण्याच्या जागाही वेगळ्या आहेत" हा मुद्दा आवडला.