मासे १८) खुबड्या - खुबड्यांचे सुके व एलवण्याची कढी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 December, 2010 - 03:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

सुके करण्यासाठी
खुबड्यांचे ४ ते ५ वाटे
२ कांदे
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
२ चमचे मसाला
सिमला मिरची १ कापुन
मिठ
चिरलेली कोथिंबीर अर्धी मुठ
१ हिरवी मिरची
तेल
अर्धा चमचा गरम मसाला
टोमॅटो किंवा आमसुल

एलवण्याच्या कढीचे साहित्य
खुबड्या उकडल्याचे पाणी
१ कांदा बारीक चिरुन
५-६ लसुण पाकळ्या चिरुन
१ ते २ मिरच्या बारीक चिरुन
थोडी कोथिंबिर बारीक चिरुन
हिंग, हळद
मिठ
थोडा चिंचेचा कोळ

क्रमवार पाककृती: 

खुबड्यांचे सुके ची पाककृती:
खुबड्या चांगल्या ४-५ पाण्यात धुवुन घ्यावात व त्या बुडतील इतके पाणी आणि थोडे मिठ टाकुन उकडून घ्याव्यात. उकडलेल्या खुबड्या थंड झाल्या की उकडलेले पाणी एका भांड्यात काढून घ्यावे कढीसाठी. खुबड्यांच्या पाण्याच्या कढीला एलवण्याची कढी म्हणतात.

सुई घेउन खुबडीच्या वरील कच सुईचे टोक खुपसुन काढावी. ह्या कचेला चिकटूनच खुबडीचा गर (गोळा) बाहेर येतो. कच टाकून देउन गोळा घ्यावा. सगळ्या खुबड्या काढताना चुकुन एखादी कच जाण्याची शक्यता असते. पण ही कच आढळल्यास लगेच काढून टाका. कारण ह्या कचेला धार असते. ह्या खुबड्या एक एक काढायला भरपुर वेळ लागतो. साधारण एक तास तरी लागतो ४ ते ५ वाट्यांना. ज्यांना पेशन्स आहेत अशेच खवय्ये हे काम करतात.

आता तेलावर लसूणाची फोडणी देउन त्यावर कांदा बदामी रंगावर परतवा. हिंग, हळद, मसाला घालुन परतवुन त्यात खुबड्या घाला. सिमला मिरचिच्या फोडी घाला. झाकण ठेउन त्यावर पाणी ठेउन एक वाफ आणा. खुबड्या शिजवण्याची गरज नसते कारण त्या उकडल्यामुळे आधीच शिजलेल्या असततात. आता त्यावर चिरलेला टोमॅटो किंवा आमसुल घाला. टोमॅटो घातल्यास वाढणीसाठी भर पडते. मिठ, गरम मसाला, हिरवी मिरची मोडून, चिरलेली कोथिंबीर घालुन परतवा व २ ते ३ मिनीटे शिजवुन गॅस बंद करा.

एलवण्याची कढीची पाककृती
तेलावर लसुण, हिंग, हळद, टाकुन जास्त न परतवता (लसुण शिजवायचा नाही पटापट सगळ टाकायच) खुबड्यांचे पाणी व चिंचेचा कोळ टाकुन चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर टाकावी. मिठ टाकावे ही कढी उकळवायची नाही. चव जाते. गरम झाली की बंद करायची. अगदी बेस्ट लागते. साधारण चिंचेच्या कढी सारखीच.

वाढणी/प्रमाण: 
कितीही असो कमीच पडतात.
अधिक टिपा: 

खुबड्या समुद्रातील खडपांवर ओहोटीच्या दिवसांत मिळतात. ह्या पकडण्यासाठी रात्री कंदील घेउन जावे लागते. अंधारात ह्या खुबड्या कडकांवर येतात त्या ओंजळीने गोळा करतात. सकाळी किंवा दिवसा ह्या खुबड्या तुरळक दिसतात दगडा खाली लपलेल्याही असतात.

खुबड्या हे शेलफुड असल्याने त्यात भरपुर कॅल्शियम असते. ह्या खुबड्या लहान मुलांच्या चिंबोर्‍याप्रमाणे आवडीच्या असतात. सुईने गोळे काढतानाच लहान मुले अर्ध्या फस्त करतात. हा गोळा पुढे क्रिम कलर, राखाडी कलर आणी शेवटी काळा कुळकुळीत गोळा असतो. काही काही खुबड्यांचा काळा गोळा खुबडीतच अडकुन बसतो. आम्ही लहान असताना आईच्या सगळ्या खुबड्या काढून झाल्या की हा गोळा काढण्यासाठी दगड घेउन खुबडी फोडून हा गोळा काढून खायचो. काय आनंद असायचा त्यात ? मग टाकलेल्या रिकाम्या खुबड्या आम्ही कवडी कवडी म्हणून खेळायला घ्यायचो.

एलवण्याच्या कढी करण्यामागचे रहस्य खुबड्यांचे व्हिटॅमिन्स पुर्ण मिळणे हेच असेल.

माहितीचा स्रोत: 
खुबड्यांचे सुके आई, एलवण्याची कढी - वहीनी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या आहेत खुबड्या. जितक्या मोठ्या खुबड्या असतील तितक्या चविष्ट आणि काढायला सोप्या.
Khubadi.JPG

ह्या स्वच्छ धुवुन उकडून घेतलेल्या.
Khubadi2.JPG

एक एक खुबडी घेउन त्याची कच बाजुला सारायची
Khubadi3.JPG

आता त्यातील गोळा सुईने काढून घ्यायचा.
Khubadi4.JPG

साधारण १ तास परीश्रम करुन हे एवढे गोळे निघतात. तरी मुलगी झोपली होती म्हणुन नाहीतर ह्याच्या अर्धे दिसले असते. कारण तिला हे नुसते उकडलेलेच खुप आवडतात.
Khubadi5.JPG

हे तयार झालेले खुबड्यांचे सुके आहे.
Khubadi8.JPG

एलवण्याच्या कढीची तयारी
Khubadi7.JPG

ही तयार एलवण्याची कढी
Khubadi6.JPG

खुबेच आसतले ते गो शैलु. लहानपणी गावाक खाल्ललय. जीभ चाळवता ह्या चेडू, खावक मातर नाय बोलावणा. Proud

म्हणेस्तोवर फोटो ईलेच, खुबेच हे! Happy

फिनिश्ड प्रॉडक्ट मस्त दिसतंय. पण केवढा हा खटाटोप? एकाएका शिंपल्याला सुईने भोसकत बसायचं आणि नंतर सगळ्याचा काला करायचा.

त्यापेक्षा दोन दोन मुठी खुबडे द्रोणात भरुन प्रत्येकापुढे ठेवायचे आणि चमच्याऐवजी सुई द्यायची. मन लावून काढत बसा म्हणावं तासभर. तोपर्यंत तू माबोवर उंडारुन घ्यायचं.

शैलजा, भ्रमर, निलु हे खुबे नाहीत खुबड्या आहेत. खुबे म्हणजे शिंपल्यांचा प्रकार.
अश्विनी भारी आयडीया आहे. Lol

वर्षा, योडे धन्स. मार्गशिर्ष संपला की या नक्की पण सुई घेउन या काढायला मी तयार करुन देईन.

हा प्रकार नायजेरियात पण खातात. तिथे त्यांची मासटे काढलेलीच विकायला असतात.
मालवणला घूला (म्हणजेच छोट्या गोगलगायी, गोल असतात त्या ) पण खातात. त्याला तर यापेक्षा जास्त खटाटोप असतो.
नव्याने खाणार्‍याने मात्र कुठलेही शेलफिश जपूनच खावे. अनेकजणांना त्याची अ‍ॅलर्जी असू शकते.

वित्तुंबंगा (आयडी बघत बघत नाव टायपायला लागल) शिंपल्या शिवल्या तसे खुबे असतात. चिखलात मिळतात ते पुर्ण चॉकलेटी, काळ्या कलरचे.

अजून एक आयडिया. ते रिकामे शिंपले टाकायचे नाहीत. नंतर त्या सुईतून ते ओवायचे आणि डिझायनर माळा करायच्या. पुढच्या टातुटिसाठी एन्ट्री !

हायला, हे खुबड्या नाव लईच टोच्त कानाला. कुबड्या खवीसचा भाउ असल्यागत.

जागूतै, वास असतो का ग ह्याला ?

अगं मी दोन काय चार तास साफ करेन खुबे, पण टातूटि करण्यासाठी राहिलेले शिंपे तुला देईन गं Happy
तुझीच आयड्या आहे ना? मग करुन नाही का दाखवणार? Proud

ओक्के शैलू, चांगल्या घासघासून साफ करुन धूवून दे मला शिंपल्या. मग मी त्या वेगवेगळ्या रंगात रंगवीन आणि ओवीन. मग फोटो काढीन, मग दिवाळीत इथे पोस्टीन. मग तुम्ही वा वा छान असं म्हणा Biggrin

माल्नकोत ज्जा ! कस उच्चारायच ? म्हणजे काय ? (अज्ञान बालिका)

शैलजा अग ह्या शिंपल्या नाहीत. मला आता खुबे आणुन रेसिपी टाकायला लागेल.

असुदे ह्याला वास नसतो. चिंबोर्‍यांप्रमाणेच हे जिवंत आणतात. पण फक्त जागेवर वळवळ करतात. एकदा खाउन बघ परत परत मागशील. पण मी देणार नाही परत एकदाच शक्य आहे. खुप मेहनत करावी लागते.

असेल असेल दिनेशदा म्हण्तायत तसे घुलेच असतील. मी घुले खूप आधी खाल्लेत पण ते नुस्ते उकडूनच खाल्लेत.
>>मला आता खुबे आणुन रेसिपी टाकायला लागेल.>> टाक टाक लवकर.
>>मग तुम्ही वा वा छान असं म्हणा>> हो हो नक्की Biggrin

त्या सुईतून ते ओवायचे आणि डिझायनर माळा करायच्या. पुढच्या टातुटिसाठी एन्ट्री !>>>> हे लय भारी ... Happy

जागू.. पाणी सुटलं ..ग्रेट्टच Happy
'वित्तुंबंगा (आयडी बघत बघत नाव टायपायला लागल'.' जागुतै मंग वि च्या ऐवजी बि लिही ना Happy

जागू, हे कालवं ह्याचे कझिन ना गं? मला आता नीट आठवत नाही पण आजी कालवं आणायची ना तेव्हा आम्ही अशीच तोंडात टाकायचो.

शिपी पण उकडल्याव्र अशीच तोंडात टाकायचो.

हेका आमी घुल म्हणताली. Happy मुम्बैला मिळतात त्या तिसर्‍या. गोव्याला मिळतात ते खुबे. तिसर्‍या सारखेच पण जरा जाड असतात.

हे खातात हेच माहित न्हवत. आम्ही ह्या रिकाम्या झालेल्या स्वच्छ धुवून कवड्यांसारख्या खेळायला वापरायचो. किंवा शिपल्यांची माणसं केली तर हे जिरेटोपासाठी वापरायचो.

Pages