सुहृद - भाग ६

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

******मास्तर खिन्न मनाने अप्पांच्या घरून परत यायला निघाले..... *********

शाळेत जाताना पण मास्तरांच्या मनात अनेक विचार थैमान घालत होते. लक्षच नव्हते कशातही. एका विचित्र पेचात जणू ते अडकले होते. तत्वांना उराशी कवटाळाव, तर लेकीच्या स्वप्नांची राखरांगोळी डोळ्यांदेखत होत होती, आणि लेकीची स्वप्न फुलवायला जाव, तर तत्वं पायदळी तुडवली जाणार असच चित्र दिसत होत. मास्तरांना एकदम थकून, गळून गेल्यासारख, लढाई हरल्यासारख वाटायला लागल होत... शाळेत पोचले नाहीत, तोच, चालकांनी ऑफिसात बोलावले आहे असा निरोप आला. मास्तर ऑफिसात गेले.

"या, या मास्तर, मग काय ठरीवलय तरी काय मास्तर? कळू तरी द्या...."

"मला खोट बोलायला जमणार नाही..."

"आर तिच्या मारी!! काय लावलय राव खोट खोट! खोट काय बोला म्हणलोय का मी? फक्त गप्प बसा म्हणतोय न्हव का??! आन खोटच बोलायच नाय तर तुमच्या पावण्यांना सगळ सांगाया वो काय कोणी बंदी तर नाय घातली ना? ते का व्हईना हो तुमच्या हातन...? तिथं का नाय खर खर बोलला आधीच?? आँ? तर मग जाईबाईच्या नशिबातच रडणं दिसतय तर!! हां, आता ती आन तिच नशीब नाय का मास्तर, त्याला तुम्ही तरी काय करणार अन मी तरी काय करणार... या तुम्ही!" मग्रूरपणे चालकांनी मास्तरांना बाहेर जाण्यासाठी सुचवले.

आयुष्यात एक भयानक पोकळी निर्माण झाली आहे अन ती आपल्याला कुठेतरी अंधारात ओढून घेउन चालली आहे असे मास्तरांना वाटायला लागले होते. कसाबसा दिवस संपवून ते घरी आले. संध्याकाळ अन रात्र अशीच उदासवाणी गेली...

दुसर्‍या दिवशी मास्तरांनी राजीनामा लिहिला अन ते शाळेत जाण्यासाठी बाहेर पडणार, इतक्यात दारावर थाप पडली. कोण आले असावे असा मनातल्या मनात विचार करत मास्तरांनी दरवाजा उघडला अन पाहतात तो काय! दरवाजात दादासाहेब अन अनिकेत उभे होते! अचानक दोघांना दरवाज्यात उभे राहिलेले पाहून मास्तरांच मन भितीने एकदम झाकोळून आल... एवढ्या लवकर जाईची स्वप्न पायदळी तुडवली जाणार? बापाच मन कळवळल....

"काय सर, येऊ का आत?? अहो, इतक आश्चर्य वाटायला काय झाल?" दादासाहेब बाहेर उभे राहून प्रसन्नपणे हसत विचारत होते.

"अं.. नाही, नाही तस नाही, या, या... बसा. अग , ऐकलस का? दादासाहेब आलेत आणि अनिकेतही आलेत सोबत... चहा, जेवणाच बघा...."

स्वयंपाक घरात मास्तरांच्या पत्नीच्या पोटात गोळा उठला!! आता काय होईल? यांना काही समजल असेल का?

"सर, कुठे चालला होता का तुम्ही?? बाहेर जायची तयारी दिसतेय..."

"हां, तस काही नाही, आपल हेच... शाळेत चाललो होतो...."

"हं... अच्छा... काय म्हणतेय शाळा तुमची, ठीक ठाक सगळ? आणि लग्नाची तयारी कुठवर आलीये? आमची ही तर अगदी जोरदार बेत करते रोज, ही खरेदी, ती खरेदी... काय काय सुरुच असत तिच, अन सध्ध्या लेकाला पकडलय खरेदीसाठी!! मी पण म्हणतो जा रे बाबा, तेवढीच तुला सवय पुढच्या आयुष्यासाठी, काय म्हणता?? खर की नाही? द्या टाळी!! " मास्तरांनी कसनुस हसत टाळी देण्यासाठी हात पुढे केला. "आणि जाई कुठे आमची? जाsssईSSS, ए जाssई... सर, एकदम गोड मुलगी आहे हो तुमची... कुठे गेली? तिला भेटायला म्हणून तर आलो मी!"

एवढ्यात जाई बाहेर आली. तिने दादांना वाकून नमस्कार केला, अनिकेतकडे कळत नकळत एक दृष्टीक्षेप टाकला. अनिकेत तिच्याकडेच पाहत होता. परत एकदा तीच शांत, हसरी, मनाचा ठाव घेणारी नजर.....

"आलीस बेटा, ये, ये, आईलाही बोलव बेटा. सर, तुम्हां सर्वांशीच बोलायचे आहे आम्हां दोघांना. काही गोष्टी स्पष्ट झालेल्या बर्‍या, नाही का?" मास्तर आणि त्यांच्या पत्नी धडधडत्या मनाने दादासाहेबांपुढे येऊन बसले.

"जाई बेटा, जरा आत जा बर तू...."

"नाही वैनी, तस नको, जाई देखील इथे असलेली मला हवी आहे. शेवटी हा तिच्या पण आयुष्याचा प्रश्न आहेच ना... थांब बेटा.."

हे ऐकूनच, लेकीसाठी, तिच्या कानावर आता जे काही काही पडेल अन तिची काय प्रतिक्रिया होईल या धास्तीनेच आईची छाती दु:खाने दडपली!

"सर, वैनी, आमच्या कानावर सगळ काही आलय. सर, तुम्ही संस्थेत पैशाची सोय करायला गेला होतात अन तिथे चालकांनी तुम्हांला काय काय अटी घातल्या आहेत अन काय काय धमक्या दिल्या आहेत हे सगळ कळलय आम्हांला!"

"दादासाहेब... माझ चुकलच खर तर.. मी खर तर तुम्हांला माझ्या भावाविषयी सांगायला हव होत... तुमच्यापासून लपवायच अस नव्हत हो मला, पण एकदम काय सांगाव अन कस सांगाव या विवंचनेत होतो मी.. पुन्हा इतक्या वर्षांमागच्या गोष्टी... त्याला सगळे लागू नयेत ते छंद लागले, सवयी लागल्या, त्यापायी झालेला तुरुंगवास... पण खूप वर्ष झाली याला.. दुर्दैवाने म्हणा किंवा काही म्हणा, आता तो या जगात कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही, त्याला शोधायचा प्रयत्न केला, पण काही ठावठिकाणा नाही... जाईची काहीदेखील चूक नाही हो यात.... जाई, बेटा... "

"शांत व्हा सर. ऐका तर खर माझ. आम्हांला हे सगळ जाईकडूनच कळलय... मोठी धीराची आणि स्वाभिमानी लेक आहे तुमची सर... अगदी आम्हांला हवी तशी आहे आमची होणारी सून! काय जाई? एकदम सासर्‍यावर गेलीयेस हां तू!!" दादासाहेबांनी वातावरणात आलेला ताण हलका करण्याचा प्रयत्न केला.

"जाई? जाईने सांगितल तुम्हांला? पण.. तुला कोणी सांगितल जाई? कस कळल?" मास्तर गोंधळून विचारत होते, त्यांच्या पत्नीही गोंधळल्या होत्या.

"आई, बाबा, त्यादिवशी ऐकल मी.. मी मैत्रिणीकडे गेले होते ना, तिथे पोचले अन कळल की तिला काही कामासाठी बाहेर जाव लागतय, मग काय तशीच माघारी फिरले.. दरवाज्याशी पोचले तोच बाबांचा चढलेला आवाज ऐकू आला म्हणून दाराशीच थबकले अन सगळ ऐकल... ऐकून इतका त्रास झाला!! माझ लग्न ठरलय याचा गैरफायदा घेऊन तुम्हांला कोणी कोंडीत पकडू पाहणार असेल तर, मला त्यात कसला आलाय आनंद? आणि तुम्ही दोघांनी मला काही सांगितल नाहीत ना? का? विश्वास नव्हता वाटला माझा? मी मुलगी आहे म्हणून? मी एवढी स्वतःतच मशगुल राहिन, तुमची काहीच काळजी मला वाटणार नाही, अस वाटल का तुम्हाला?" बोलता बोलता जाईच्या डोळ्यांत पाणी तरळल..

"..तस नाही ग बेटा.... हं, तरीच दरवाजापाशी काही वाजल्याचा आवाज आला त्यादिवशी, पण बाहेर येऊन पाहते तो कोणीच नव्हत... "

"मी सटकले ग आई, मागच्या मागे..."

"तर सर, जाईने त्यादिवशी तुमच बोलण ऐकल अन तिने अनिकेतला फोन करून सगळ सांगितल. अनिकेतने ते आम्हाला सांगितल. अन तुमच्या भावाबद्दल म्हणाल ना, तर आम्हांला ठाऊक आहे ते आधीपासूनच. अनिकेतच्या जिवलग दोस्ताचा एक मित्र तुमचा विद्यार्थी होता, त्याच्याकडून खूप काही ऐकलय तुमच्याबद्दल, आणि काकाच्या पूर्वायुष्याची सजा पुतणीला देऊ नये हे कळण्याइतके मीही केस पांढरे केलेत की आता!! सर, उगीच टेंशन घेऊ नका विनाकारण... अप्पांनीही मला कल्पना दिली होती सर... मीच म्हणालो, ते एवढ महत्वाच नाही आता... "

"दादासाहेब... काय बोलू आता मी.... खरच.."

"खर सांगू का सर, जाईचा खूप अभिमान वाटतो मला. वयामानाने तिचे विचार परिपक्व आहेत. तिने अनिकेतला जेह्वा भावी जोडीदाराबद्दल तिच्या अपेक्षा बोलून दाखवल्या ना, तेह्वा, घर, गाडी, घोडा, पगार यापैकी काहीच विचारल नाही, तिला हवा आहे तिच्यासारखाच एक सुहृद जोडीदार, जो तिला सतत साथ देईल... अश्या मुलीला नाकारण्याचा करंटेपणा आम्ही कसा करू? आणि अनिकेत दुसर्‍या कोणा मुलीला जोडीदार मानायला तयार होईल अस वाटत नाही मला... काय अनिकेत?? दुसरी कोण सुहृद मिळणार त्याला अशी?? स्पष्ट सांगितल आहे त्याने तस, आणि आमचाही पूर्ण विश्वास आहे त्याच्या निर्णयावर. "

"तुमचीही काळजी आहे तिला खूप, म्हणून आम्ही इथे येऊन तुमच्याशी बोलाव अशी विनंती केली तिने... आणि मानीदेखील आहे सून माझी! आम्हांला, जे काही तुमच्यावर ओढवलय त्यात तुमची साथ द्यावीशी वाटली नाही, तर इथेच सार थांबवायची तयारी होती पोरीची.... काय ग, अनिकेत तुझा सुहृद बनू शकतो, नव्हे आहेच, याची खात्री नव्हती का ग तुला? निदान या म्हातार्‍या सासू सासर्‍यांवर तरी विश्वास??"

"दादा...." जाईचे डोळे पाण्याने भरले होते. अनिकेत जाईकडे बघत फक्त आश्वासक हसला.

मास्तर अन त्यांच्या पत्नींची काही वेगळी अवस्था नव्हती....

"सर, आता जाऊन त्या चालकांना सांगा, काय करतोस ते करुन घे म्हणाव खुशाल!! माझेही सुहृद आहेत म्हणाव ठामपणे माझ्या पाठीमागे उभे!!" दादासाहेबांनी दिक्षीतांना सांगितल.

"वैनी, फक्कडसा चहा करा बुवा आता!!" होकार देत, समाधान भरल्या मनाने, मास्तरांच्या पत्नी चहा करायला अन त्यांच्या गजाननापुढे वात उजळायला आत वळल्या.

दादासाहेब जाईपाशी आले. तिच्यासमोर उभे राहून हसत हसत म्हणाले, "आता तरी सून म्हणू का तुला?? आहे का परवानगी??" अन मग हळूच गुपित सांगितल्यासारख म्हणाले, "अग, लवकर हो म्हण, तुझ्या सुहृदाचा जीव टांगणीला लागलाय ना तिथे!!" वडिलांच्या मायेने दादासाहेबांनी जाईला जवळ घेतले, अन तिच्या डोक्यावर थोपटले.
बापाच्या मायेने जवळ घेणार्‍या सासर्‍याच्या कुशीत हसत भरले डोळे पुसताना जाईने पाहिले, तिचा सुहृद तिच्याकडेच पहात होता, तिच्याच नजरेच्या भाषेत तिच्याशी बोलत.......

समाप्त.

विषय: 
प्रकार: 

मस्त लिहिली आहेस गं.. आवडली मला.. आणि सलग वाचली त्यामुळे जास्त छान वाटली मला..

शैलजा, छान जमलिये कथा! शेवट सुखद असणार हे अपेक्षितच होते Happy
पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा!! Happy
~ पन्ना ~

आत्ता कळाले त्या पाचव्या पार्टची गरज काय होती, मला आधी वाटले filler होता Happy चांगली जमली कथा.

संपली का कथा? आता वाचतो...मुद्दामच वाचली नव्हती अजुन सलग वाचायची होती म्हणुन!
झाल्यावर प्रतिक्रिया देतो!

कथा छान आहे...

खुप आवडली कथा...... रोज कसाही वेळ काढुन मायबोलीवर चक्कर टाकत होते मी, पुढचा भाग वाचायसाठी..... तुझा पहिला प्रयत्न आहेस असे लिहिलस्....पण वाचताना कुठेही नवखेपणा दिसत नाहिये...... खरच छान लिहिलियेस.... आधीचे लेख पण वाचले.... ते पण मस्त....

सुरेख जमली आहे कथा.

तुझी कथा लिहिण्याची स्टाईल थोडीशी योगिनी जोगळेकरांसारखी वाटली...... वाचायला सरळ, सोप्पी आणि त्यामुळेच मनाला चटकन भावणारी ............. Happy

अशाच कथा येऊ देत अजून ............ Happy
--
अरूण

छान लिहिलेस ग कथा.. एकदम विषय खुलवत नेला आहेस.. आणि रोज भाग टाकून लवकर पुर्ण ही केलीस म्हणून अभिनंदन.. Happy

कथा पूर्ण होईपर्यंत प्रतिक्रिया देणार नव्हते. 'समाप्त' चा बोर्ड बघितला आणि म्हटलं आता 'छान आहे, आवडली' लिहायला हरकत नाही. प्रत्येक भाग अगदी सुरेख लिहिलास. फक्त मधेच 'काका' कुठून आला ते कळलं नाही.

खूप आवडली. छानच. सुमॉ च्या गोष्टींसारखी झालीय. लिहीत रहा. Happy

सुरेख लीहिली आहेस कथा..असेच येउदेत पुढचे लेखण..

रुमा, पन्ना, अमोल, गोबू, अल्पना, अरूण, अल्पना, अनघा, संघमित्रा, मनोगत... सार्‍यांचेच आभार. तुम्ही दिलेल प्रोत्साहन खूप मह्त्वाच आहे मला.
टिऊ, वाट पाहतेय मी बरका काय सांगतोस त्याची Happy

शैलू, खूपच छान झालीये गं. मस्तच. अगदी वेळेत पूर्ण केलीस. खूप भावली मनाला. Happy

आयटी, एकदम सलग वाचून काढली. कथा साधीच आहे पण लेखनशैली आवडली. स्वभाववर्णन, डिटेल्स चांगले आलेत. काही अनावश्यक असले तरी अश्या प्रकारच्या कथेत चालून जातात. कुठेही loose ends, major flaws नाही आहेत. विषय मात्र जुना आहे. ('या गोष्टी हल्ली घडत नाहीत' असं म्हणायचं नाही आहे, पण या विषयावरच्या कथा खूप लिहिल्या, वाचल्या गेल्या आहेत.)
सांगायचा मुद्दा असा, की 'तुला चांगले लिहिता येते' Happy हळूहळू स्कोप वाढव. Happy

-लालू

धन्स मोना.
लालू, तुझ्या अभिप्रायाबद्दल आणि सूचनांबद्दल मनापासून आभार. हो, हळूहळू स्कोप वाढवण्याचाच प्रयत्न आहे. परत एकदा धन्यवाद.

आयटी, खुपच छान जमली आहे गोष्ट. शेवटी माझे पण डोळे पाणावले.

आज पुन्हा एकदा सर्व भाग सलग वाचले. छान लिहिलं आहेस.

तुला पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

थँक्स वर्षा आणि अभि.
अभि, तू परत एकदा वाचलीस?? वा वा! Lol तुला १० गाव बक्षीस, हवी ती गाव घेऊन टाक!! Happy Happy

आयटी, किती छान लिहिलियेस कथा!
विषय तसा नेहमीचा पण त्यालाही कसा उजाळा मिळालाय! व्वा!
तुझी लिहिण्याची पद्धत अगदी सहज आहे... कुठेही "आटापिटा" नाही.... आणि तरिही वाहती! हे असं लिहिणं सोप्पं नाही, अनुभवाने सांगत्ये Happy
पात्रांना फुलवणं, घटना आणि संवाद यांचा योग्य वापर... असं कितीतरी! कथेतली कलाटणीही किती सहज.... अगदी चालता चालता वळण यावं इतकी.
सुंदर लिहित्ये आहेस. पहिला प्रयत्न वाटू नये इतकं नेटकं, सुबक! माझ्या मनापासून शुभेच्छा!

शैलजा.. मला तुझी ओघवती शैली आवडली .छान लिहिले आहेस. दाद... तुझीच एक अशीच कथा आठवली... पिशवीत हात घालताना पाहील्यावर जो गैरसमज होतो ती...

दाद, मुकुंद, देवा आभार Happy दाद, तुला खास धन्यवाद. खूपदा तू मला लिहायला उत्तेजन दिले आहेस, आणि तुझ्यासारखी, जिचं शब्दांवर इतक प्रभुत्व आहे, तिच्याकडून अस उत्तेजन सातत्यान मिळण ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे, परत एकदा धन्यवाद. Happy