आपापला खारीचा वाटा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी आपण सारेच भारतीय अवाक् झालो होतो, म्हटलं तर वावगं ठरु नये. या प्रसंगाच्या अनुषंगाने मायबोलीवर, इतर काही मराठी संस्थळावर आणि वैयक्तिक अनुदिन्यांवरही अनेक मतं मांडण्यात आलेली पाहिली. एकूणच सर्वसाधारण सामान्य माणसाच्या सहनशक्तीचाही कडेलोट झाला, आणि निर्ढावलेल्या राजकारण्यांचीही खुर्चीवरुन गच्छंती झाली. एका फटक्यात कितीतरी गोष्टी जनताजनार्दनाच्याही लक्षात आल्या! आपल्या सुरक्षा व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, लाल फितीच्या खाबूगिरीमधे माहिर असलेल्या राजकारणापायी तुमच्या आमच्या सारख्याच आतापर्यंत सामान्य असलेल्या पोलिस आणि इतर सुरक्षा कर्मचार्‍यांच्या आयुष्याची शासनाला आणि राजकारण्यांना नसलेली किंम्मत, न चालणार्‍या, अपुर्‍या आणि जुनाट शस्त्रांनिशी निधड्या छातीने ह्या सामान्य माणसांनी दिलेला असामान्य लढा, झालेली जिवीत हानी..

तसं पाहिलं तर आपण सामान्य माणसं मवाळच. फार तर आपला राग बोलण्यातून व्यक्त करावा, अतिच झालं तर जरा चारेक शिव्या वगैरे द्याव्या आणि मनातल्या मनात धुमसावं! पुन्हा रोजच्याच आयुष्यातले नेहमीचे प्रश्नच इतके भेडसावत असतात की असल्या मोठ्या प्रश्नांकडे इच्छा असूनही बर्‍याचदा वळताच येत नाही, नेहमीच्या जबबदार्‍या पार पाडताना ते शक्यही नसतं...

पण म्हणून काहीच नाही का करता येणार आपल्याला? आपणही ह्या जनशक्तीचाच भाग आहोत ना?? की फक्त, परिस्थिती बदलायला हवी अशी कळकळीची इच्छा व्यक्त करणारी, पण त्यासाठी स्वतःकडून काहीच हातभार न लावणारी मंडळी आहोत? आता तर कोणत्याही परकीय राजवटीच्या अंमलाखाली आपण राहात नाही तर आपणच निवडून दिलेलं सरकार, आपल्या ह्या देशाचा कारभार पहातं. जर ते सरकार चुकत आहे अथवा लोकमनाची आणि मताची हवी तितकी दखल घेत नाही असं वाटत असेल तर, सरकारला आपलं मत ऐकवायचा अधिकार आपल्याला आहे, नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे. दरवेळी राज्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून आपण हातावर हात ठेऊन शांत बसणार ही परिस्थिती बदलायला नको का? जनशक्ती आहे, आणि ती सक्रीय आहे याची जाणीव सरकारच्या मनात असली तर सरकार अधिक सतर्कतेने, जनशक्तीच्या जागरुकतेची जाणीव मनात ठेवून काम करेल असं नाही का वाटत?

ह्यासाठी आपल्या हातात आहे तितके करावे या हेतूने, हे एक पत्र, सरकारला पाठवण्यासाठी माझे एक आंतरजालीय स्नेही आहेत, त्यांनी तयार केले आहे. त्यांच्याच परवानगीने त्या पत्राचा दुवा इथेही देत आहे. हे पत्र आमच्यापैकी बर्‍याच जणांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे. तुम्हां सर्वांनाही विनंती आहे, की त्या मसुद्यात आपल्याला योग्य वाटतील ते बदल करून पत्र पंतप्रधान कार्यालयाकडे, गृहमंत्रालयाकडे आणि महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनाही कृपया पाठवा, आपल्या सर्व मित्रमंडळींना पत्र पाठवायची विनंतीही करा... मोठ्या प्रमाणावर पत्रांचा वर्षाव झाला तर काहीतरी चांगला बदल घडूनही येईल, निदान थोडाफार तरी परिणाम होईल ना?

खाली काही पत्ते देत आहे, पत्रं, इमेल्स पाठवण्यासाठी यांचा उपयोग होईलसे वाटते. मला वाटतं, मायबोलीवरही हे पत्ते आधी उदय ह्या आयडीने दिलेले असावेत.

पंतप्रधान कार्यालय: http://pmindia.nic.in/

पंतप्रधानांची वेबसाइट, संपर्कासाठी पत्ता: http://pmindia.nic.in/pmo.htm
The Prime Minister's Office
South Block, Raisina Hill,
New Delhi,
India-110 011.
Telephone: 91-11-23012312.
Fax: 91-11-23019545 / 91-11-23016857.

येथे तुम्हाला पंतप्रधानांच्या कार्यालयाला इमेल पण करता येतो, विषयानुसार वर्गवारी आहे: http://pmindia.nic.in/write.htm

राष्ट्रपतींशी संपर्क : http://presidentofindia.nic.in/
इमेल : presidentofindia@rb.nic.in

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा ई-मेल: ashokchavanmind@rediffmail.com
मटा मधे दिलेला होता.

मग उचलाल ना तुम्हीही आपापला खारीचा वाटा?

विषय: 
प्रकार: 

शक्य तितक्या लोकांनी हे पत्र इ मेल द्वारे न पाठवता पोस्टाद्वारे पाठवायला पाहिजे.

हो केदार, शक्य तितक्यांनी तर पाठवायला हवच. नुसतच हळहळ व्यक्त करुन आपली जबाबदारी संपणारी नाही आता.

मित्रांनो..

तुमच्या प्रतिसादाची खरच गरज आहे इथे.
आपण अशा परिस्थितीत काही करु शकत नाही असं असहाय्यपणे म्हणण्यापेक्षा जे काही करु शकतो त्यापैकीच एक उत्तम असा हा वरचा पर्याय आहे.
खरच अशी पत्रे फार फार मोठ्या संख्येने जाणे आवश्यक आहे.
आपल्या सर्वांकरता एवढं तरी करा अशी माझी कळकळीची विनंती आहे.

खरच नुसत बोलन पुर नसत.सर्वानी पत्र पाठवावीत त्याने परिणाम खरच खूप
चांगला होईल.
आयटी धन्यवाद मुख्यमंत्र्यांचा ई-मेल आयडी दिल्याबद्दल.