शिवणाची कात्री

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्या आईकडे एक 'शिवणाची कात्री' होती. होती म्हणजे अजून आहे. केशरी मूठ, मॅट फिनिशची पाती. ती कात्री म्हणजे आईच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. त्या कात्रीला हात लावायची आम्हाला कुणालाच परवानगी नव्हती. अगदीच उन्हाळ्याच्या सुट्टीत काही भरतकाम करायला घेतलं तर कटपीसमधून रुमालांचे चौकोनी तुकडे कापायला तेवढी ती कात्री हातात येई. पण चुकून जरी त्या कात्रीने कागद-बिगद (बिगद मध्ये पुठ्ठे, थर्माकोल, स्ट्रॉ, सुतळ्या, झाडांच्या फांद्या जे काही कापण्यासारखं असेल ते सगळं येतं) कापले की आईच्या नजरेला आणि आवाजाला त्या कात्रीची धार येई. आणि कात्रीची धार कमी होई. तसं पण अधनंमधनं तिची (कात्रीची) धार कमी होत असे. मग तेवढ्यापुरती कात्री संजू/नंदू/बन्सी अशा कुणाच्या तरी ताब्यात जाई. तो कुठून तरी तेज धार लावून आणे आणि कात्री पुनः: पहिल्यासारखी. कापडाच्या एका टोकाला लावली की सर्रर्रर्रर्र दुसर्‍या टोकापर्यंत अजिबात बोटं न चालवता कपडा कापला गेलाच पाहिजे.

आमच्या गावात एक मारवाडी मुलगा मुंबईहून "imported" सामान आणून घरोघरी विकायचा. ही कात्री आईने त्याच्याकडून घेतली होती. आता सगळीकडे तशाच कात्र्या मिळतात पण तेव्हा ती खूपच भारी वाटलेली. त्या आधी कित्येक वर्ष- किंबहुना मला आठवतंय तसं- आईकडे एक लोखंडाची जड कात्री होती. तिचं पण असच एक लाईफ सायकल होतं. अधनंमधनं तिची (कात्रीची) धार कमी व्हायची. मग संजू/नंदू/बन्सी कुणीतरी धार लावून आणायचा. कात्री परत पहिल्यासारखी!! त्या कात्रीने सुद्धा कागद-बिगद कापायला परवानगी नसे. नंतर नवी केशरी मूठवाली आल्यावर ह्या लोखंडाच्या कात्रीचं 'कागदाची कात्री' असं डिमोशन झालं. केशरी मूठवालीने मात्र अढळपद पटकावलं.

ह्या दोन्ही कात्र्यांनी आईने आमच्यासाठी असंख्य सुंदर सुंदर कपडे बेतले असतील. कोणा कोणाच्या लेकीबाळींसाठी बाळंतविडे केले असतील. कित्येक नवशिक्यांना पहिल्याने कपडा बेतायला शिकवला असेल. काही गणतीच नाही. तेव्हा एक तर आजच्यासारखे डिजीटल कॅमेरे नव्हते. शिवाय उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू नये इतक्या सहजतेने आईने सगळं केलं. ह्या सगळ्याचं काहीच रेकॉर्ड नाही याचं आता फार वाईट वाटतं. तेव्हा आमचे वेळप्रसंगी काढलेले काही फोटो आणि आम्हाला आठवणीत राहिलेले काही एवढ्या शिलकीवर मी आणि धाकट्या बहिणीने पेंट ब्रशमध्ये आईने शिवलेल्या कपड्यांचे काही डिझाइन्स करायला घेतले आहेत. पूर्ण झाले की इथे टाकेनच. तोपर्यंत फक्त ही छोटीशी आठवण Happy

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

हो गं साक्षात तू लिहिलंयस म्हटल्यावर रहावलंच नाही Light 1 मागच्या जन्मीचे पुण्य असावे म्हणूनच नंबर लागला... Proud

खूप छान लेख.
मी सुध्दा थोडफार शिवण करते. ती शिवणाची कात्री इतर कामांसाठी कुणी घेऊ नये म्हणून त्याच्यावर ' sewing only ' असं लिहून ठेवते. सध्या घरी 'sewing only 'वाल्या चार कात्र्या आहेत.

आवडलं Happy
माझ्या आईच्या शिवणाच्या कात्रीची आठवण झाली. ती पण अजुन तिच्या "त्या"कात्रीला आम्हाला कोणाला हात नाही लावु देत Proud

मस्त गं सिंडे Happy गोड आठवण Happy

माझ्यापण आईची अशीच शिवणाची कात्री होती. तिने पण भरपुर ड्रेसेस शिवल्येत आम्हा बहिणींसाठी आणि आमच्या लेकरांसाठी Happy

माझ्या पण वेगवेगळ्या कात्र्या आणि सुर्‍या आहेत... याची कात्री/सुरी त्याला वापरायची नाही Happy

मस्त!
शिवणाच्या कात्रीला हात लावायला मिळायचा नाही म्हणून ती कात्री एकदमच अप्रूपाची वाटायची. म्हणून तीच हवी असायची. हो आमच्याकडे पण माझ्या लहानपणी नवलाईची केशरी हॅण्डलवाली कात्री आली होती. आणि त्याने हस्तकलेचे कागद कापल्यावर मस्त प्रसाद मिळाला होता. मग पुढे त्या कात्रीची वाट लागली हळूहळू आणि शेवटी प्लास्टर बॅण्डेजचे मास्क बनवायच्या वेळेला दुसरी कात्री नाही म्हणून तीच आईने मला देऊन टाकली. ते आठवलं.
अनुभवाअंती वजनाला हलक्या आणि प्लॅस्टिक हॅण्डलच्या कात्र्या कापड कापण्यासाठी योग्य नाहीत हे लक्षात आलं. आता माझ्या Ginghers च्या लोखंडी कात्र्या अश्याच किंवा याहून जास्त जिवापाड मी जपत असते. Happy

असतात असतात प्रत्येक घरातच अश्या कात्र्या असतात...

आमच्याकडे मिशी कापायची वेगळी कात्री आहे... ती दुसर्‍या कोणत्याच कापाकापीसाठी वापरली जात नाही...

सेम पिंच. आमच्याही घरी होती ती सुप्रसिद्ध केशरी हँडल असलेली कात्री आणि एक गंजकी जड लोखंडी कात्रीही.

पण सिरीयसली ज्या खूप रेग्युलर शिवतात त्यांना उत्तम धार असलेल्या लोखंडी कात्र्याच बर्‍या वाटतात. मात्र त्या १०-१२ इंची त्रासदायक होतात हाताला.
माझ्याकडे http://www.gingher.com/product/8in-knife-edge-dressmakers-shears/124/ ही आहे. बेस्ट आहे.
असो.

माझ्या आईची पण आहे अशीच कात्री. त्या कात्रीला कायमच बाकीच्या कात्र्यांपेक्षा जास्त धार असायची. म्हणुन लहानपणी कागद/ इतर काही कापायला आम्हाला तीच कात्री हवी असायची. मग आईने कुठुन तरी त्या कात्रीसारखीच पण थोडी छोटी कात्री आणुन दिली होती आम्हाला. Happy

आठवण आवडली. माझ्या आईकडे पण अशी केशरी मुठीची कात्री होती आणि तिला हात लावायला बंदी होती. अशीच कुठल्या तरी इइम्पोर्टेड माल विकणार्‍या दुकानातून तिने आणली होती. अजुनही आहे ती तिच्याकडे Happy

>>सेम पिंच. आमच्याही घरी होती ती सुप्रसिद्ध केशरी हँडल असलेली कात्री आणि एक गंजकी जड लोखंडी कात्रीही.
अगदी, अगदी... आणि त्यांचा कागद कापायला उपयोग करून ओरडा खाणे हा दर रविवारचा कार्यक्रम असायचा.

अशा लहानपणीच्या सगळ्यांच्याच साधारण सारख्याच असलेल्या कितीतरी आठवणी आहेत. मागे हह ने एक असाच छान लेख लिहिला होता, बर्फाचा गोळा, पेप्सिकोला वगैरे वर..

आमच्याकडेही होती .. फिस्कर्स ची बहुतेक आणि त्या आधी मेटल ची पण होती .. केशरी मुठीची आल्यावर मेटल ला सावत्र वागणूक मिळाली ..

मराठमोळ्या, मध्यमवर्गीय, महाराष्ट्रियन बायकांचा तेव्हाचा कसलातरी 'स्टॅटस सिंबल' होता काय ही केशरी मुठीची कात्री म्हणजे?

'स्टॅटस सिंबल' >>> I don't think so...त्या लोखंडी जड कात्र्या जावून ही छान हलकी कात्री हातात आली म्हणून आनंद असावा (नी चे मत वेगळे असले तरी)...आणि दुसरे (मुख्य) कारण म्हणजे सारखं सारखं कोण अशी कात्री खरेदी करणार होतं म्हणून जपत असतील आहे त्या कात्रीला...

अरे तेव्हा यायच्या त्या मूळ फिस्कर्स च्याच असायच्या. (आता केशरी हॅण्डलमधे डुप्लिकेट भरपूर येतात). महाग आणि देशी लोखंडी कात्रीपेक्षा वापरायला बेस्ट. देशी लोखंडी कात्र्या अजस्त्र असायच्या. त्या केवळ जाड कापडांसाठी ठीक असतात.
सिंडी बाय, त्या अजस्त्र लोखंडी कात्र्या मला पण आवडत नाहीत. माझी केवळ ८ इंचाची आहे. Happy

जबरदस्त निरीक्षण आहे बघ तुझं...आमच्याकडे पण अगदीच हाच प्रकार होता. स्वतः शिवायला लागल्यावर मात्र कळलं त्या कात्रीला येवढं का जपायचं ते...!

खुपच अप्रतिम लिहितेस तू! किती बारीकसारीक पण रोजच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ह्या आणि मोठ्या माणसांचा पझेसिव्हनेस दाखवून जातात. कात्रीच्या निमित्ताने घरोघरीची प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची गोष्ट लिहून गेलीस तू. जीयो!

मस्त आठवण. आमच्याकडे एक अवजड लोखंडी कात्री होती. तिला हातात पेलायलाच बरेच श्रम पडायचे. मात्र कापड सपासप कापले जायचे. त्या कात्रीकडे मी चुकूनही बघायचे नाही! पेलताच यायची नाही ना.... आणि एकदा ती कात्री उचलायच्या नादात पायाच्या अंगठ्यावर पाडून घेतली होती!!! तेव्हापासून ती कात्री कटाप!!
माझ्या काकूकडे मात्र एक से एक प्रकारच्या शिवण्यासाठीच्या खास व्यावसायिक दर्जाच्या कात्र्या होत्या. वेगवेगळे आकार, मुठी, धार असणार्‍या. आणि त्या कात्र्यांशी खेळायला आम्हां मुलांना मज्जाव होता. मग आमचे पडेल चेहरे पाहून सर्वात बोथट धार असलेली एखादी कात्री आमच्या सुपूर्द केली जायची. की मग आम्ही पुढचे काही तास शिवणातून उरलेल्या चिंध्यांची अजूनच वाट लावत, त्यांचा कचरा करत बसायचो. अशा वेळी आजीच्या ताब्यात बरोबर सापडायचो. मग ती आमच्याकडून चिंध्यांचे ठराविक आकाराचे तुकडे करून घ्यायची. त्या तुकड्यांचे नंतर पिशव्या, रुमाल, अष्टकोनी आकार करून त्या तुकड्यांच्या घट्ट ओवलेल्या माळा अशा आकारात रुपांतर व्हायचे.

गोड लिहिलं आहेस Happy आमच्याकडेही सेम पिंच. आधी लोखंडी, मग केशरी. अजूनही दोन्ही आहेत.

आपल्या आयाच कशाला? माझीही शिवणाची स्पेशल कात्री आहे, त्याने मी फक्त तुटलेली बटणं शिवते, किंवा उसवलेलं काहीतरी हा भाग वेगळा Proud आणि आपण लपूनछपून ती घेत असू, अगदी तस्संच माझ्याही मुलाने ती पळवून चक्क त्याच्या शाळेच्या गणवेशावर चालवलेलीदेखील आहे (हे करायची आपली प्राज्ञा होती का??????? :))

सेम सेम..मा़झ्या आईकडे पण केशरी मुठीची अश्शाच वर्णानाची कात्री होती..तिने कागद कापायला घेतला की आई पुर्ण ताशेरी करायची आमची Proud

मस्त आठवण Happy

Pages