झट्पट स्वादिष्ट ग्रीन बीन्सची भाजी ( हिरव्या शेंगा: फरसबी वगैरे)

Submitted by आर्च on 4 December, 2010 - 16:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ वाट्या बारीक चिरलेल्या ग्रीन बीन्स
२ चमचे तेल
१ चमचा भरून धणे
१/२ चमचा जीरे
२ चिमूट हिंग
२ मिरच्या उभ्या चिरून
२ चिमूट हळद
मीठ चवीनुसार
१/२ चमचा लिंबाचा रस

क्रमवार पाककृती: 

१. बीन्स शीरा काढून बारीक आडव्या चिरून घ्यायच्या.
२. धणे खलबत्यात किंवा लाट्ण्याने जरा चुरडून घ्यायचे.
३. तेल तापवून त्यात जिरे, चुरडलेले धणे आणि हि.गाची फोडणी करायची
४. त्यात मिरच्या आणि हळद टाकून लगेच चिरलेल्या बीन्स टाकायच्या.
५. मीठ टाकून भाजी वाफेवर शिजवायची. (अजिबात पाणी टाकायचं नाही)
६. शिजल्यावर लिंबाचा रस टाकायचा.

गरम गरम चपातीबरोबर खायची.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरते.
अधिक टिपा: 

हवं तर खवलेलं खोबरं टाकावं. पण तशीसुध्दा छान लागते. धण्याचा स्वाद फार छान लागतो.
चवीपुरती साखर.

माहितीचा स्रोत: 
बहिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण धने घालुन करुन बघेन. वेगळी चव येइल.
मी फरसबी वाफेवरच शिजवते पण फोडणी वर चिरलेली फरसबी टाकली की त्यात (खोबर, कोथिंबीर,मिरची आणि लिंबु) वाटुन घालते. मग साखर आणी मिठ. कधी कधी कांदा पण छान लागतो.

सायो, मी टोस्ट सँडविच/ पफ पेस्ट्रीचे पॅटीस करताना बटाट्याच्या भाजीत नेहेमी असे भरडलेले धणे घालते. खूप छान चव येते आणि तोंडात येत नाहीत.

यात एक वेगळी फोड्णी म्हणजे दक्षिणी. उडीद डाळ, मोहरी, लाल मिरच्या कढिपता व हिंग.
गाजर बारीक तुकडे व बीन्स वरून ओले खोबरे एक व्हेरिएशन. कोथिंबीर मस्ट.

खरेच लाइट व गरम गरम जबरदस्त लागते. पोळी रॅप.
बरोबर गरम भात, रसम व कसलीतरी दक्षिणी चट्णी पण भारी.

वा छान. तसेही अख्खे धणे फारसे वापरले जात नाहित आपल्याकडे. आणि या नाजूक भाज्यांना फार मसाले पण चांगले नाही लागत.

अजून एक छान व्हेरिएशनः

१. अशाच बारीक कापून बीन्स वाफवून घ्यायच्या.
२. त्यात बारीक चिरून कांदा घालायचा (कच्चाच).
३. चविपुरती साखर, मीठ, आणि लिंबाचा रस घालायचा.
४. वरून हिंग मोहरी, जीरे, आणि बारीक चिरलेल्या मिरच्यांची फोड्णी द्यायची. ( फोडणीत बारीक चिरलेली कोथींबीर मस्त लागते)
५. हवं तर खवलेलं खोबरं घालायच.

नुसतीपण छान लागते नाहितर चपातीबरोबर.

आर्च, दुसर्‍या व्हेरिएशन प्रमाणे मी करते.
फरसबी आडवी चिरुन कुकरला वाफवून घ्यायची. ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरच्या, मीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं नी वाफवलेल्या फरसबीत घालायचं. हिंग, हळ्द, मोहरी, जिर्‍याची फोडणी करुन भाजीत घालायची. वरुन थोडं लिंबू पिळायचं.

मी आज ह्या पदध्तीने गवारीची भाजी केली होती. छान झाली होती. गवार गूळ किंवा साखरेच्या चवीशिवाय मला नको वाटते म्हणून साखर घातली चवीपुरती.
आर्च, खूप दिवसांनी रेसिपी लिहिलीस.

आर्च, मी केली. पण भाजी होत आल्यावर कळले, लिंबुच नव्हते घरात. मग आमचुर पावडर टाकली. पण तरी छान झाली. धण्याची चव छान येते. लिंबाने तर अजुन छान होत असेल.

ओले खोबरे + हिर्वी मिरची वाटुन लावलेली फरसबीची ही भाजी मी साबांच्या मैत्रिणीकडे खाल्ली. त्यांच्या हातालाच चव असली पाहीजे, कारण मी तशी दोनदा करण्याचा प्रयत्न केला, पण ती चव आलीच नाही.

पण खोबरे चव घालुन मला फार आवडते ही भाजी. छान रेसेपी आहे, अश्या पद्धतीने करणार आता.

त्यांच्या हातालाच चव असली पाहीजे, कारण मी तशी दोनदा करण्याचा प्रयत्न केला, पण ती चव आलीच नाही.>> अगदी खरंय वैनी. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे म्हणतात ते काही उगीच नाही.

मी हल्ली ही भाजी किंचीत वेगळ्या पद्धतीने करते. म्हणजे मसाले वगैरे फार वेगळे नाहीत पण फरसबी चिरण्यातच फार वेळ लागतो. एक लांब फरसबी किंवा ग्रीन बीन्सचे आडवे दोन तीन तुकडे करुन त्यातला एक तुकडा घेऊन अर्ध्यात उभा चिरायचा. असे सगळं चिरुन कुकरला एक शिट्टी करुन घ्यायची. शि ट्टी पडली की मग चाळणीत बीन्स घेऊन पाणी काढून टाकायचं. हे सगळं करण्यापूर्वी थोडी चणाडाळ भिजत घालायची.
मोहरी, हिंग, हळद फोडणी करुन त्यात चणाडाळ, हिरव्या मिर च्या, भरपूर कढिपत्ता घालून मग शिजवलेले बीन्स. जरा वाफ काढून त्यात मीठ, साखर, भरपूर कोथिंबीर, ओलं खोबरं घालून वाढायची