ऊत्क्रांती होताना (फोटोसहीत)

Submitted by दिनेश. on 1 December, 2010 - 04:04

P1000068.JPG

हे आहे स्ट्रेलित्झिया किंवा बर्ड ऑफ पॅराडाईझ फ्लॉवर. मराठीत याचे नाव दीपकळी असल्याचे एका
प्रदर्शनात बघितले होते.

वंशसातत्य टिकवणे हे तर प्रत्येक सजीवाचे धेय असते, अगदी सूक्ष्म वनस्पती पण त्यांना
अपवाद नसतात.पण वनस्पतिंवर असणारे एक सर्वात मोठे बंधन म्हणजे ते इतर सजीव,
म्हणजेच किटक, पक्षी व प्राणी यांच्याप्रमाणे हालचाल करू शकत नाहीत. पण यावर
त्यांनी अफ़लातून उपाय शोधून काढलेले असतात.

रुढ अर्थाने, म्हणजे आपल्या डोळ्यांना जाणवेल अशी हालचाल म्हणजेच स्थलांतर
त्या करत नाहीत. त्यांचा प्रवास होतो तो मुख्यता परागकणांच्या रुपात किंवा
बीजांच्या रुपात. आणि यासाठी त्यांना इतर सजीवांची मदत घ्यावी लागते.
हि मदत अर्थात विनामोबदला क्वचितच असते. आजकाल कोण कुणासाठी
काय करतो हो ? यात काहीवेळा फ़सवणुकीचे प्रकार होतातच. पण एकमेकांवर
कुरघोडी करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी होत असतात. या प्रयत्नांतून जे बदल
फायदेशीर ठरतात, ते पुढच्या पिढीत उतरतात.

हि जी प्रक्रिया असते ती आपल्या आयूष्यमानाच्या तूलनेत इतकी संथ असते,
की आपल्याला एका आयूष्यात ती अनुभवणे अशक्य असते. ठराविक वनस्पति
आणि ठराविक किटक वा पक्षी यांचे परस्पर संबंध इतके दृढ असतात की काही
कारणाने, एका प्रजातीला धोका झाल्यास वा त्यांची संख्या घटल्यास, त्याच्याशी
संबंधित असणारी दुसरी प्रजाती नष्ट होण्याचा धोका असतो. मानवाच्या बाबतीत
मात्र याची शक्यता कमी आहे. संपूर्ण मानवजात पृथ्वीवरून नष्ट झाली, तरी फारसे
काहि बिघडणार नाही. (कदाचित कोंबडी, कुत्रे, गहू, बटाटा वगैरे नष्ट होतील.)

तर हे जे बदल होत असतात, ते आपल्याला जाणवतील इतक्या वेगाने होत
नाहीत, पण असे एक उदाहरण मलाच काय तूम्हालाही अनुभवता येईल.
वरच्या फ़ोटोत जे "फूल" दिसतेय, ते असा प्रयत्न सध्या करत आहे.

या "फूला"चे काही प्रकार तूम्ही आजूबाजूला बघितले असतील. (इथे जमल्यास
अवश्य फ़ोटो टाका.) फूलाचा उल्लेख केला तर एक बेसिक रचना आपल्या
डोळ्यासमोर येते. पाकळ्यांची गोलाकार रचना आणि मधे स्त्रीकेसर आणि
पूंकेसर यांची दाटी (शिवाय मादी फूल असेल तर बाल्यावस्थेतला बीजकोषही.)
इथे तशी काही रचना दिसत नाही. म्हणजे पाकळ्यासदृष्य काहीतरी आहे पण
ते गोलाकार नाही.

परागीभवन करणारे दोन मुख्य सजीव घटक म्हणजे किटक आणि पक्षी.
(इतर निर्जीव घटकात वारा येईल.) पण या दोघांच्या सवयीत फ़रक आहे.
दोघांना ही मोबदला म्हणून झाडे साखरपाणी देतात. (हो ते केवळ साखरपाणीच
असते. मध ही पूर्णत: मधमाश्यांची निर्मिती असते.)

या दोघांतला मुख्य फरक आहे तो त्यांच्या रंग आणि गंध ओळखण्याच्या
क्षमतेत. किटकांची नजर वर्णपटलाच्या अतिनील टोकाकडे जास्त संवेदनशील
असते. आपल्याला पिवळा दिसणारा रंग त्यांना जांभळा दिसू शकतो. तसेच
त्यांची गंधांची जाणीव खूपच तीव्र असते. फुलांनी निर्माण केलेले गंध त्यांना
दूर अंतरावरून ओळखता येतात. आणि त्याचा मागोवा घेत ते फुलांकडे येतात.
रंग काय किंवा गंध काय, ते निर्माण करण्यासाठी झाडांना बराच कच्चा माल
जमवावा लागतो. त्यामूळे जर गंध तीव्र असेल आणि त्याने काम भागणार
असेल तर रंग निर्माण केले जात नाहीत. रात्री उमलणारी अनेक फूले यासाठीच
सुगंधी आणि शुभ्र असतात. रात्री तसाही रंगांचा उपयोग नसतो.

पक्ष्यांची नजर मात्र वर्णपटलाच्या लाल टोकाकडे तीव्र असते. त्यांनाही आपल्या
प्रमाणेच, लाल, नारिंगी, पिवळा या रंगांचे आकर्षण असते. (आपण खातो ती
बहुतेक फळे याच रंगात असतात.) ते रंग त्यांना दूरवरून ओळखता येतात.
आपल्याकडची सावर, पांगारा, पळस फूलायला लागले कि त्याच्यावर पक्षी
सम्मेलनच भरलेले दिसते. पण या तिन्ही फूलांना गंध नसतो, कारण पक्षांचे गंधज्ञान
तितकेसे चांगले नसते.

आता पक्षी यायला हवे असतील तर आणखी सोयी कराव्या लागतात. एकतर
फूलाचा आकार एवढा मोठा हवा कि पक्षी त्यात चोच घालू शकेल. तसे असे
करताना, त्याचे डोके, छाती, गळा वगैरे अशा स्थितीत असले पाहिजेत कि
त्यावर परागकणांचा शिडकावा करता येईल. शिवाय पक्षाला बसायला मजबूत
आधार दिला पाहिजे. यासाठी फूलांचा देठही आखूड हवा, पण जवळची फ़ांदी
मजबूत हवी. हे सगळे वरच्या तीन झाडांत दिसतेच.

वटवाघूळ जरी उडत असले तरी ते पक्षी नसल्याने, त्याचे गंध ज्ञान चांगले
असते. त्यामूळे परागीभवनासाठी त्याच्यावर अवलंबून असणारी, वाघूळफूले
(ब्रम्हदंड) खास वेगळ्या डीझाईनची असतात. आणि त्यांना सडणार्‍या मांसाचा
गंध असतो.

तर आता परत वरच्या फूलाकडे वळू. यातली फक्त एकच "पाकळी" जांभळी
व बाकीच्या केशरी आहेत. म्हणजे या फूलाला, पक्षी आकर्षित करायचे आहेत.
मग त्यात यश मिळालेय का ?

तूमच्या बघण्यात ही फूले असतील, तर यावर सकाळच्या वेळी सूर्यपक्षी आलेले
दिसतात.

या झाडाने "विचार" केलाय कि जर तो सूर्यपक्षी त्या जांभळ्या "धावपट्टी" वर
उतरला, तर त्याच्या डोक्यावर परागकण चिकटवता येतील. कधीकाळी सूर्यपक्ष्याने
ते करून बघितलेही असेल. पण त्यात सूर्यपक्ष्याचे नूकसान झाले असणार.
या झाडाचे परागकण जरा ओलसर आणि चिकट असतात. ते डोक्यावर चिकटलेले
त्याला आवडत नाहीत. शिवाय ती जांभळी पाकळीही त्याला बसण्याइतकी मजबूत
नसते.

पण एकदा चटक लावल्यामूळे सूर्यपक्षी या फूलावर येतच राहतो. पण आता त्याची
बसण्याची जागा ती आडवी रंगहीन पाकळी असते. तिथेही तो जरा लांबच संभाळून
बसतो. त्याची चोच लांब व बांकदार असल्याने, त्याचा खाऊ मिळवण्यात त्याला
काही अडचण येत नाही, पण अंगाला परागकण लावून घ्यायचे मात्र तो टाळतो.
यात नूकसान आहे त्या झाडाचे, कारण त्याचे साखरपाणी तर द्यावे लागतेय, पण
परागीभवन काही होत नाही.

पण मूळात असे अडनिडे डिझाईनच का निर्माण झाले ? तर दक्षिण आफ्रिका, जे
या झाडाचे मूळ स्थान आहे, तिथे आधी पालसदृष्य गेको प्राण्यांचे वर्चस्व होते.
पालीसारखा प्राणी जर त्या जांभळ्या पाकळीवर बसला (आणि त्याच्या पुढच्या
पायांना आधार देणारे कंगोरेदेखील आहेत.) तर बाकिच्या पाकळ्या योग्य रितीने
वळून, त्या पालीच्या डोक्यावर परागकण ओतले जाऊ शकतात.

आता पाल हा प्राणी परागीभवन करु शकतो का असा प्रश्न पडेल. न्य़ू झीलंड मधे
सर्वत्र आढळणारा पोहोतुकावा हा लाल फूलांचा वृक्ष अजूनही त्यांच्याचकडून
परागीभवन करुन घेतो. तिथे बाकिचे किटक, पक्षी तूलनेने कमी संख्येत आहेत,
म्हणून ही व्यवस्था अजूनही टिकून आहे.

दक्षिण आफ़्रिकेत मात्र बदल झाले. एकतर पाली तितक्या उरल्या नाहीत,
ज्या उरल्यात त्यांनी मांसाहार करायचा असे ठरवले त्यामूळे त्या फूलांवर जात
नाहीत. तिथे गेल्या तर त्यांना पक्ष्यांपासून धोका आहे. (काही सरपटणार्‍या
प्राण्यांपासूनच पक्षी उत्क्रांत झालेत.) म्हणजे पालींचा आणि या झाडाचा
ऋणानुबंध संपलाय. आता पुढे काय ?

हा या झाडाच्या उत्क्रांतीचा एक टप्पा आहे. सध्यातरी नैसर्गिक रित्या याचे
परागीभवन होत नाही. मानवी प्रयत्नातूनच ते शक्य होते.

कदाचित हे झाड जगभरच्या बागांमधे इतके लोकप्रिय होईल, कि त्याला स्वत:
काही प्रयत्न करावे लागणार नाहीत. मानवाला आकर्षित करण्यासाठी जास्त
पाकळ्या, अनेक रंग, मोठा आकार असे बदल, कदाचित मानवाकडून होतील.

सुर्यपक्षी आपल्या सवयी बदलेल, अशी शक्यता कमी आहे. पण इतर दुसरा
कुठलातरी पक्षी आकर्षित करण्याचा प्रयत्न हे झाड नक्कीच करेल.

सूर्यपक्ष्याला पर्याय सापडला नाही तर पुंकेसरांचे स्थान बदलण्यात येईल,
परागकण अधिक कोरडे व हलके करण्यात येतील, ज्यामूळे त्याला
परागकणांचा त्रास होणार नाही.

समजा पक्ष्याचा नाद सोडून किटकांचा उपयोग करायचा असे ठरले तर
या "फूला"ला सुगंध प्राप्त होईल. पाकळ्यांची रचना गोलाकार करण्यात येईल.
रंगातही काही बदल केले जातील.

नेमके काय होईल ते सांगता येत नाही, आणि ते बघायला मी असणार नाही.

dipkali.jpg

गुलमोहर: 

दिनेशदा, ___/\___

अप्रतिम लेख. अचुक निरिक्षण. सुंदर मांडणी. ज्ञानात बरीच भर पडली आणि निसर्गाकडे बघायची एक वेगळीच द्रुष्टी मिळाली.

आभार मामी आणि साधना, या विषयावरचे लेखन कितपत आवडेल याची शंकाच होती.
विकिपिडियावर या फूलासंबंधीची माहीती थोडी चूकलीय. (सूर्यपक्षाच्या पायावर परागकण टाकले जातात असे लिहिले आहे.)

दिनेशदा, प्रचंड धन्यवाद. हे अजिबात माहितीच नव्हते.
पण सुर्यपक्षी यांचे पॉलिनेशन करीत नाहीत या माहितीबद्द्ल मला शंका वाटते.

दिनेशदा ___/\____

अप्रतिम लेख. अचुक निरिक्षण. सुंदर मांडणी. ज्ञानात बरीच भर पडली आणि निसर्गाकडे बघायची एक वेगळीच द्रुष्टी मिळाली.>>>>मामींना अनुमोदन

निसर्गात सजिव खुप आहेत पण मानवासारखी त्यांना बुद्धि-विचार करण्याची क्षमता नाही असे मानले जाते. पण मला तरी ते तितकेसे खरे वाटत नाही. कदाचित मानवासारखा अन्न आणि वंशसातत्य सोडुन इतर विषयांचा विचार ते करु शकत नसतील. पण या दोन विषयांबाबत मात्र ते मानवाइतकाच विचार करतात आणि तेवढेच हुशार आहेत असे मला वाटते.

दिनेश तुम्ही लिहिलेय की परागीभवन करणा-या प्राण्यांशी याचा संबंध आता तुटलाय त्यामुळे सध्या नविन गि-हाइक मिळवणे आवश्यक झालेय..... Happy

म्हणजेच ते आपल्या रुपात, रंगात किंवा गंधात बदल करत आहे. असे बदल सुरू झाल्याचे तुमच्या लक्षात आलेय का? असे असेल तर मग याचे ५० वर्षांपुर्वीचे आणि आताचे असे फोटो दिसतील काय? म्हणजे एवढ्यात काय बदल केलाय ते लक्षात येईल.

नेमके काय होईल ते सांगता येत नाही, आणि ते बघायला मी असणार नाही.

म्हणजे कुठल्याही बदलाला अजुन सुरवात झालेली नाही? बदलाला इतका वेळ लागत असेल तर त्यादरम्यान फुल नामशेष होण्याची शक्यता नाहीये काय? आता नशिबाने हे फुल मानवाला आवडलेय आणि तो बागेत फुलवायचा प्रयत्न करतोय. पण हे फुलाला कसे कळणार? त्याने स्वतःच्या वंशसातत्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे ना??

कोपरापासून दंडवत...दिनेशदा, सिम्पली अमेझिंग !
किती खोल विचाऱ केला आहे तुम्ही.
एक वेगळा अ‍ॅप्रोच मिळाला निसर्गाकडे बघण्याचा.

dineshda, apratim, sundar, mahiti , itkya sundar mahito baddal dhanywad
runuzunula animodan

दिनेशदा, या तुमच्या लेखाचं शिर्षक 'नविन लेखन' मध्ये असं दिसतयं :
'उत्क्रांती होताना दिनेशदा (फोटोसहित)' Proud

मी वर जे दोन फोटो टाकलेत, त्या दोन्ही फूलांत किंचीत फरक आहे. भारतात मी जे बघितले होते, त्याला जांभळी "पाकळी" च नव्हती. तशीही ती आता निरुपयोगी आहे. पक्ष्यांना तिचे आकर्षण असणार नाही, शिवाय उतरायचा प्लॅटफॉर्म म्हणूनही तिचा उपयोग नाही. यापेक्षा आणखी व्हेरिएअशन्स झाले असतील, असे मला वाटते (म्हणून तर फोटो मागवलेत.)
सूर्यपक्षी या फुलावर बसलेला मला नेहमीच दिसतो, पण फोटो काढेपर्यंत तिथे रहात नाही तो. तो बसताना बरेच अंतर राखून बसतो, आणि आपल्या लांब चोचीने साखरपाणी पितो. त्याच्या पायावर परागकण पडायची शक्यता नाहीच. शिवाय पायावर पडलेले परागकण त्याला सहज दिसतील, आणि ते तो साफ करुन टाकेल. डोक्यावर, गळ्यावर पडले असते तर त्याने एकवेळ चालवून घेतले असते. तरीही ते चिकट असल्यामूळे त्याला आवडणार नाहीच. (मी लिहिले त्याला सर अटेन्बरो साहेबांचा दुजोरा आहे. )
पोपट किंवा पॅराकिट सारखेच काही पक्षी, खाली डोके वरती शेपटी असे करुन आपले खाद्य खातात. निव्वळ चोचीच्या आधाराने ते लटकूही शकतात, बाकिच्या पक्ष्यांना ते जमत नाही. उडता उडता, एका जागी स्थिर राहून साखरपाणी पिणे, तर हमिंग पक्षालाच जमते.

मामी, माकडापासून माझा माणूस होतानाचा फोटो बघायचा होता वाट्ट. (नाही, अजून प्रोसेस पूर्ण नाही झाली !!)

आणखीही काही झाडांबद्दल लिहायचे आहे, पण मला तुमच्या सगळ्यांकडून या झाडांबद्दलचे तूमचे निरिक्षण हवे आहे.

साधना, झाडांना बरेच कळते असा माझा ठाम विश्वास आहे.
कापूस, भेंडी, आंबाडी आणि जास्वंद हे सगळे एकाच कुळातले. मग फक्त जास्वंदीलाच फळे का येत नाहीत ? माझ्या बघण्यातील एका जास्वंदीला फळे लागायची प्रक्रिया सुरु होते आणि मग ती अचानक थांबते.
आपल्या आयूष्यातच जास्वंदीचे किती अनोखे रंग आणि प्रकार भारतात दिसायला लागले. विकायलाही ते असतात. या सर्व लागवडी फांदी कलम करुनच होतात. मग जास्वंद कशाला फळं निर्माण करायचे कष्ट घेईल ? (माझी एक कथाही या विषयावर होती.) आपसूक प्रसार होतोय ना !

मामी, माकडापासून माझा माणूस होतानाचा फोटो बघायचा होता वाट्ट. (नाही, अजून प्रोसेस पूर्ण नाही झाली !!)

>>>>> Biggrin

एक शंका : उत्क्रांतीची ही प्रोसेस जर अत्यंत सावकाश होत असेल तर मग लक्षात कशी येते? कोणत्या टप्प्यावर असं ठरवता येतं की ही उत्क्रांतीची प्राथमिक अवस्था आहे आणि आता काही बदलाची अपेक्षा आहे?

मामी या सदस्याशी सहमत आहे. शीर्षक भन्नाटच आहे.

मामी, माकडापासून माझा माणूस होतानाचा फोटो बघायचा होता वाट्ट. (नाही, अजून प्रोसेस पूर्ण नाही झाली !!>>>>

ही 'मिश्कील' धमकी आवडली.

पहिला फोटो फार आवडला.

' माहिती' फार सुंदर! अभिनंदन!

-'बेफिकीर'!

मामी, हि प्रोसेस आपल्या नजरेत भरण्यासाठी खूपच हळू असते. पण काहि उदाहरणे देतोच. आपल्या लहानपणी पेरुचा असा एक आकार असायचा, चित्रकलेत आपण नेहमी तोच आकार काढायचो. आता बहुतेक सगळे पेरु गोल गरगरीत असतात. मग ते पेरू, हळू हळू मागे पडत नष्ट होतील.

पाळीव कुत्रे आता नैसर्गिक रित्या (शिकार करुन) आपले खाद्य शोधू शकत नाहीत. ते मानवाच्या संगतीतच राहू शकतात. भले ते बेवारशी भटके का असेनात.

कोंबड्या आता इतक्या जड झाल्यात कि त्या उडू शकत नाहीत.

गहू हे तृणधान्य. इतर तृणांच्या बियांप्रमाणे त्याच्या बिया आता वार्‍याने उडू शकत नाहीत. मानवाच्या मदतीशिवाय त्यांचा प्रसार आता होऊ शकत नाही.

आणखी काहि पिढ्यांनंतर या क्षमताच नष्ट होऊन जातील.

त्यांचे खाद्य सहज जमिनीवर उपलब्ध असल्याने आणि नैसर्गिक शत्रूच नसल्याने, न्यू झीलंडमधले बरेच पक्षी आता उडू शकत नाहीत, काहि पिढ्यानंतर त्यांना पंखही असणार नाहीत.

जमिनीवर सरपटणार्‍या पण चार पाय असणार्‍या प्राण्यांपैकी काहि जणांनी जमिनीखाली भक्ष शोधायला सुरवात केली, जमिनीखाली हालचाल करताना त्या पायांची अडचण व्हायला लागली. मग काही पिढ्यानंतर ते नष्ट झाले, त्या प्राण्यांचे साप झाले.

आता देखील काही साप, खारी एका झाडावरून दुसर्‍या झाडावर झेपावतात. त्यांना पुढे पंखही येतील.

मानवाच्या बाबतीत देखील, आपल्या नैसर्गिक क्षमतांचा वापरच आपण केला नाही, (उदा तोंडी हिशेब ) तर काही पिढ्यांनंतर ती क्षमताच उरणार नाही.

आपल्या लहानपणी पेरुचा असा एक आकार असायचा, चित्रकलेत आपण नेहमी तोच आकार काढायचो. आता बहुतेक सगळे पेरु गोल गरगरीत असतात. मग ते पेरू, हळू हळू मागे पडत नष्ट होतील.

पाळीव कुत्रे आता नैसर्गिक रित्या (शिकार करुन) आपले खाद्य शोधू शकत नाहीत. ते मानवाच्या संगतीतच राहू शकतात. भले ते बेवारशी भटके का असेनात.

कोंबड्या आता इतक्या जड झाल्यात कि त्या उडू शकत नाहीत.

गहू हे तृणधान्य. इतर तृणांच्या बियांप्रमाणे त्याच्या बिया आता वार्‍याने उडू शकत नाहीत. मानवाच्या मदतीशिवाय त्यांचा प्रसार आता होऊ शकत नाही.

>>>>>> अरे, खरचं की ...... ही सगळी म्हणजे उत्कांतीची उदाहरणं ..... फारच इंटरेस्टिंग!

Pages