सोंग सजवण्याची कला - ४. तिकडची नाटकं

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बाकीचे लेख
१. बजेटच नाही http://www.maayboli.com/node/21581
२. अमेरिकेतील शिक्षण http://www.maayboli.com/node/21592
३. डिझायनिंग पूर्वी http://www.maayboli.com/node/21595
५. माझा श्वास http://www.maayboli.com/node/21618
६. मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे. http://www.maayboli.com/node/21629
७. इकडचं नाट्य http://www.maayboli.com/node/21640
८. चलता है http://www.maayboli.com/node/21641
-----------------------------------------------------------
यावेळेला खर्‍याखुर्‍या नाटकाच्या मी केलेल्या डिझायनिंगबद्दल बोलायचं आपलं ठरलंय गेल्या वेळेलाच तेव्हा नमनाला घडाभर तेल नको ओतायला. जाउया तिकडच्या नाटकांकडे, डिझायनिंगकडे.
यूजीए मधलं पहिलं वर्ष प्रत्यक्ष डिझायनिंग करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारीचं गेलं. पण उन्हाळ्यात सँटा फे ऑपेरा मधे मात्र संधी मिळाली. तिथे विद्यार्थी डिझायनर्सना अप्रेंटीस ट्रेनिंग मधल्या अप्रेंटीस शोकेससाठी वेगवेगळ्या ऑपेरामधले एकेक प्रवेश डिझाइन करायला मिळायचे. या डिझायनिंगसाठी काडीचंही बजेट नसायचं. पण कंपनीकडे ४० वर्षांपेक्षा जास्त काळात त्यांच्याइथे झालेल्या ऑपेरांच्या कपड्यांचा स्टॉक होता. सगळे कपडे अतिशय व्यवस्थित जतन केलेले होते. त्यातल्या वस्तू वापरायची आम्हाला मुभा होती पण तशीच्या तशी नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादा गाउन आहे तर तो मूळ वस्तू म्हणून घ्यायचा आणि मग त्या त्या व्यक्तिरेखेप्रमाणे त्यावर कधी कापडे लपेटून वा कधी दागिन्यांनी मढवून वा कधी रंग बदलून नवीन वेशभूषा तयार करायची असे.
माझ्या वाट्याला 'सॅम्सन एट दलिला' या ऑपेरामधला एक सीन आला होता ज्यात दलिला आणि पुजारी मिळून सॅम्सनला संपवायचा कट करत असतात. त्यासाठी दलिलाने सॅम्सनला आपल्या सौंदर्याने आणि प्रेमाच्या नाटकाने भूलवून मारण्याबद्दल संवाद चाललेला असतो असा तो सीन. दलिला आणि पुजारी दोघंही पॅलेस्टिनी. ही कथा बायबलमधली. बॅबिलोनियन वा असिरीयन संस्कृतींचा पगडा यांच्या राहणीमानावर होता. त्याचा अभ्यास केल्यावर जे मिळालं त्याच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत डिझाइन केलेली ही वेशभूषा. कापड शिवून वापरण्याबरोबरच कापड गुंडाळून वापरण्याची असिरीयन पद्धत, सुंदर मुलींनी पोटरीवर घातलेले दागिने हा त्या काळातला महत्वाचा तपशील अश्या गोष्टी उचलून डिझाइन तयार केले.
Samson-Et-Dalila---Dalila.jpg
या शोकेस साठी डिझायनर पण आम्हीच आणि बनवणारे पण आम्हीच असायचो त्यामुळे आपलं कागदावरचं डिझाइन प्रत्यक्ष्यात आणण्यासाठी काय केलं पाहिजे याचा पहिला धडा इथे मिळाला.
दुसर्‍या वर्षात यूजीए मधे प्रत्यक्ष डिझायनिंगची घडी अवतरली. पिकासो ऍट द लॅपिन एजिल या नावाचे स्टीव्ह मार्टिन या हॉलिवूडमधील नटाने लिहिलेले नाटक मी डिझाइन केले. नाटकाचा काळ १९०४ आणि स्थळ पॅरीसमधील लॅपिन एजिल नावाचा बार. नाटकात पिकासो आणि आइनस्टाइन भेटल्याचे दाखवलेय. आणि कहर म्हणजे भविष्यातून, अंगावर तार्‍याची धूळ बाळगत एल्व्हिस प्रिस्ले पण अवतरतो याच नाटकात. नाटक अर्थातच वास्तवाला धरून नाही, नाटकाची जातकुळी विनोदाची आणि कल्पनाविलास भरपूर त्यामुळे डिझायनिंगमधे वास्तवाशी फारकत घेणे सहज शक्य होते. तरीही त्या त्या काळाची, व्यक्तिरेखांच्या सामाजिक स्थानाची जी जी म्हणून वैशिष्ठये होती ती तर असायलाच हवी होती. पण त्याच्या काटेकोर तपशीलात, रंगांच्या निवडीमधे, कापडाच्या निवडीमधे काही अंशी स्वातंत्र्य होतं.
Picasso-At-the-Lapin-Agile-(3)---The-bar.jpg
व्यक्तिरेखेचा स्वभाव आणि नाटकातलं स्थान या गोष्टी कपड्यांच्या ऐतिहासिक तपशीलापेक्षा काही अंशी वरचढ झाल्या तरी चालण्यासारखं होतं. हे जरी खरं असलं तरी अभ्यास करताना १९०४ च्या कपड्यांचा, त्या काळच्या पॅरिसचा आणि पिकासो व आइनस्टाइन या २० व्या शतकातल्या दोन सगळ्यात प्रसिद्ध व्यक्तिरेखांचा अभ्यास अत्यंत बारकाईने करणे जरूरीचे होते. १९०४ चा काळ बघता पुरूषांच्या कपड्यात तपकीरी, काळा, राखाडी व निळा हे रंग जास्त प्रमाणात असणार होते पण नाटकाच्या नेपथ्यामधे शिसवी आणि महागनी लाकडाच्या रंगाचाच वापर असल्याने तपकीरी व काळा हे रंग बाजूला टाकले. त्यामुळे उरले मग राखाडी आणि निळा हे रंग. तेच वापरले पुरूषांच्या कपड्यात. स्त्री व्यक्तिरेखांच्यातली बार मधली वेट्रेस होती तिच्यासाठी लाल रंग, १९०४ च्या संदर्भाने थोडा उच्छृंखल वाटेल असा स्कर्ट आणि कॉर्सलेट वापरलं आणि दुसरी जी कुणा पुरूषामुळे भारावून गेलेली, निरागस मुलगी होती तिच्यासाठी हलके रंग वापरले.
त्याच वर्षी दुसरं नाटक डिझाइन केलं ते म्हणजे 'अ‍ॅब्डकशन ऑफ सीता'. रामायणाची गोष्ट आणि इंडोनेशियन केचक प्रकाराचं नृत्यनाट्य असं या नाटकाचं स्वरूप. केचक नृत्यनाट्य स्टायलाइज्ड पठडीचं. आपल्याकडच्या यक्षगान, दशावतार यांच्यासारखं. याचीही एक ठराविक वेशभूषा असते. व्यक्तिरेखांचे रंग, पोत, इतर साज सगळं सगळं सुष्टदुष्ट च्या कोष्टकाप्रमाणे ठरलेलं असतं. मूळ केचक ची वेशभूषा वापरणं वा बनवणं जॉर्जिया मधे शक्य नव्हतंच. बहुतांशी वस्तू जॉर्जिया मधे मिळण्यासारख्या नव्हत्या. तसेच करणारी नटमंडळी ही सगळी अमेरीकन, ज्यांचे केचक पद्धतीचे नृत्यकौशल्य नसल्यासारखेच होते. आणि त्यातून असा अवजड कपडा घालून हे अनोळखी पद्धतीचे नृत्य करणे यातल्या कोणालाच जमण्यासारखे नव्हते. मूळ केचकपासून फारकत घेऊन दोन महत्वाचे बदल या सादरीकरणात होते ते म्हणजे कोरसमधे मुलीही होत्या. मूळ केचकमधे केवळ स्त्री व्यक्तिरेखांच्यापुरत्याच मुली असतात आणि कोरसमधील लोक कमरेला एक धोतर व त्यावरून गुंडाळलेले पांढरे काळे चौकडीचे कापड या वेषात असतात. दुसरा बदल म्हणजे कोरस व व्यक्तिरेखा करणारी नटमंडळी वेगवेगळी नसून कोरसमधीलच व्यक्ती वेगवेगळ्या व्यक्तिरेखा करत होती. मूळ केचकमधे कोरस चा गट वेगळा असतो आणि व्यक्तिरेखा करणारे वेगळे. व्यक्तिरेखांची वेशभूषा अत्यंत एलॅबोरेट आणि चढवायला खूप वेळ लागणारी अशी असते. हे सगळं विचारात घेता प्रथम मूळ केचकच्या कपड्यांचा अभ्यास महत्वाचा होता. त्यानंतर बाकी सगळ्या मुद्यांना धरून त्यात बदल करणे गरजेचे होते.
Abduction-of-Sita-(2)---Laxman,-Ram,-Seeta.jpg
कोरसचा वेश संपूर्ण वेळ अंगावर असणार होता. अगदी एखादा नट व्यक्तिरेखा बनून येतो तेव्हासुद्धा हा बेस कॉश्च्यूम म्हणून असणारच होता. मग कोरसच्या मूळ कपड्यातल्या तंग धोतराच्या जागी गुडघ्याच्या खालपर्यंत येईल अशी इंडोनेशियन त्वचेच्या रंगाची पँट वरती त्याच रंगाचा टिशर्ट आणि कमरेला काळे पांढरे चौकडीचे कापड अशी वेशभूषा निर्माण झाली. व्यक्तिरेखा बनून येताना याच कपड्यावर दोन गोष्टी अंगावर चढवल्या की झाले अशी व्यवस्था केली होती. खूप सारे जरीचे कापड केचकच्या मूळ कपड्यात वापरले जाते त्यासाठी कपड्यावर सोनेरी रंगाने स्टेन्सिलिंग करून हवा तो परिणाम साधला गेला.
Abduction-of-Sita.jpg

तिसर्‍या वर्षात द क्रुसिबल हे आर्थर मिलरचं नाटक केलं. नुसतंच डिझाइन केलं असं नाही तर हे माझं थिसीस प्रॉडकशन असल्याने त्या प्रोसेसवर थिसीस लिहून तो डिफेन्डही केला. हे नाटक मिलरने लिहिलं १९५२ मधे पण नाटकाचा काळ आहे १६९२ चा अमेरीकेतील मॅसेच्युसेटस येथील सेलम या गावातला. हा काळ म्हणजे अमेरीकेत युरोपियन लोक येऊन वसण्याचा काळ. सेलम मधे वसलेले हे लोक सगळे प्युरिटन या प्रोटेस्टंट पंथातले खिश्चन लोक. अत्यंत कडवी धर्मनिष्ठा आणि ज्या ज्या गोष्टीचा आनंद उपभोगता येतो ते ते पापकर्म आहे अशी धार्मिक धारणा असलेले हे लोक. अत्यंत प्रतिकूल हवामानाला तोंड देत नव्या भूमीत टिकू पाहणारे लोक. साहजिकच चेटूक, मंत्रतंत्र यांच्यावर प्रचंड विश्वास आणि त्याची भितीही. या सगळ्यातून १६९२ साली ज्या चेटक्यांच्या सुनावण्या झाल्या सेलम मधे, ज्यात एका वेळेला १९० पेक्षा जास्ती लोकांना एकदम फाशी देण्यात आली या घटनेभोवती हे नाटक फिरते. नाटकाच्या दिग्दर्शकाला कपड्यांमधे त्या काळाची एक सर्वसाधारणत: लाईन आलेली हवी होती. बारीक बारीक तपशीलांच्यात फेरफार केलेले त्याला चालणार होते.
The-Crucible-04-John-Procter-home.jpg
नाटकाच्या दृश्यतेसंदर्भात दिग्दर्शकाने 'अंधाराने वेढलेलं एक छोटसं जग, ज्या जगातले सगळे अंधारातल्या अस्तित्वांना घाबरलेले आहेत अशी एक ओळ सांगितली होती.' त्यावरून आम्ही तिघांनी म्हणजे मी, सेट डिझायनर व लाईट डिझायनर, आम्ही तिघांनी आपली डिझाइन कॉन्सेप्ट बनवली. मी पहिली फारकत रंगांशी घेतली. खडतर आयुष्य आणि धर्माची काटेकोर बंधने यांनी जखडलेल्या या लोकांचं आयुष्य मला रंगहीन वाटलं. त्यामुळे त्यांच्या कपड्यात काळा, पांढरा व राखाडी एवढेच रंग वापरले. पण अंधश्रद्धा, भिती, तसेच लोभ आणि सूडकरी प्रवृत्ती या सगळ्या एका रोगासारख्या आहेत आणि ज्यांना लागण झालीये त्यांच्या कपड्यात लाल रंग आहे जो दृश्यागणिक वाढत जातो असं दाखवलं. चेटक्यांच्या सुनावण्यांच्या संदर्भात अभ्यास करत असताना या विषयावरचं एक पेंटींग मिळालं होतं त्यामधे लाल रंगाचा वापर होता जो काळाला अनुसरून नव्हता. त्यावरून ही लाल रंगाची कल्पना डोक्यात आली होती. ह्या नाटकाच्या डिझाइन प्रोसेसबद्दल थिसीस लिहून तो डिफेन्ड करणे हा माझ्या अभ्यासक्रमाचाच शेवटचा भाग होता.
या सगळ्या प्रक्रीयेतून तावून सुलाखून निघून तीन वर्षांनी एम एफ ए (ड्रामा-डिझाइन-कॉश्च्यूम) अशी डिग्री हातात पडली. आणि मी मायदेशी परतले.

--- नीरजा पटवर्धन

विषय: 
प्रकार: 

छान. ही सर्व नाटके बघायला आवडले असते. Happy
मागच्या लेखात बरोकचा उल्लेख होता, मला फक्त बरोक संगीताची ओळख आहे. त्या काळच्या वेशभूषेबद्दल माहिती नव्हते. वर्णन रोचक वाटले.

बरोक काळातच ऑपेराचा नाट्यप्रकार म्हणून प्रसार सुरू झाला जास्त करून आणि मग रोकोको काळात फोफावला. त्यामुळे बर्‍याचदा काळ कुठलाही असला तरी ऑपेरांमधे बरोक किंवा रोकोको धर्तीचे गाउन्स स्त्री वेशभूषांच्यात आढळतात.
जसे की आपल्याकडच्या सर्व संगीत नाटकांमधे भरजरी नउवारी शालू पैठण्या हेच बर्‍याचश्या स्त्री व्यक्तिरेखा वापरतात मग ती सुभद्रा असो की शारदा.

छान लेख. पूर्वी टाकले होते तेव्हा फक्त पहिले दोनच भाग वाचले होते. आता सगळे वाचायला मिळतिल.
पुढचे भाग पण टाक लगेच.

खडतर आयुष्य आणि धर्माची काटेकोर बंधने यांनी जखडलेल्या या लोकांचं आयुष्य मला रंगहीन वाटलं. त्यामुळे त्यांच्या कपड्यात काळा, पांढरा व राखाडी एवढेच रंग वापरले. पण अंधश्रद्धा, भिती, तसेच लोभ आणि सूडकरी प्रवृत्ती या सगळ्या एका रोगासारख्या आहेत आणि ज्यांना लागण झालीये त्यांच्या कपड्यात लाल रंग आहे जो दृश्यागणिक वाढत जातो असं दाखवलं. >>> ही विचारप्रक्रिया/कल्पना फार आवडली!

हा लेख पण छान जमलाय. आपल्याकडच्या नाटकांत इतक्या बारकाईने विचार होतो का ? प्रश्नच आहे !