सोंग सजवण्याची कला - ३. डिझायनिंग पूर्वी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बाकीचे लेख
१. बजेटच नाही http://www.maayboli.com/node/21581
२. अमेरिकेतील शिक्षण http://www.maayboli.com/node/21592
४. तिकडची नाटकं http://www.maayboli.com/node/21602
५. माझा श्वास http://www.maayboli.com/node/21618
६. मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे. http://www.maayboli.com/node/21629
७. इकडचं नाट्य http://www.maayboli.com/node/21640
८. चलता है http://www.maayboli.com/node/21641
----------------------------------------------------
"काय करता काय तीन वर्ष कॉश्च्यूमच्या शिक्षणामधे?" या प्रश्नाचं उत्तर देताना खूप सार्‍या विषयांचा पाढा वाचून तर झाला "पण त्या सगळ्याचा उपयोग करायला शिकवलं की नाही तुम्हाला?" असा प्रश्न सगळ्यांच्याच डोक्यात वळवळला असणारच. तेव्हा त्याबद्दलच गप्पा मारू याच पण त्या आधी डिझायनिंगची पूर्वतयारी समजून घेऊया थोडी.
मी शिकायला गेले होते ती असिस्टंटशिपवर. म्हणजे मास्टर्स डिग्रीला शिकतानाच बरोबरीने विद्यापीठात तुमच्या विषयाशी निगडीत असं काम आठवड्यातले ठराविक तास करायचं आणि त्याबदल्यात तुमची शिक्षणाची फी भरली जाते आणि वर थोडेसे पैसे मिळतात जे घरभाडं, जेवणखाण, पुस्तकं, आर्ट मटेरियल आणि इतर गरजेच्या वस्तूंमधे उडून जातात.
abduction-of-sita.jpg
नाटकाच्या विभागामधले डिझाइनचे विद्यार्थी शिकवण्याच्या ऐवजी शॉप्स मधे काम करतात. प्रत्यक्ष डिझायनिंग करायच्या आधी अजून काही तयारी अपेक्षित असते जी या शॉप्समधे काम करताना होते. मी कॉश्च्यूमची त्यामुळे कॉश्च्यूम शॉपमधे काम करत होते. हे शॉप म्हणजे दुकान नव्हे. हे नाट्यविभागाचे कॉश्च्यूम शॉप जिथे दरवर्षी होणार्‍या नाटकांचे कपडे जतन करून ठेवले जातात, नवीन नाटकांसाठी कपडे बनवले जातात, दागिने, पर्सेस, टोप्या, चपला-बूट, मुखवटे सगळं काही ठेवलेलं असतं आणि ते बनवायची दुरूस्त करायची व्यवस्थाही तिथेच असते. कापडचोपड, बटणं, चेन अश्या वस्तू आणण्यापासून ते रंगीत तालमीपर्यंत सगळ्या कॉश्च्यूम संदर्भातल्या गोष्टी इथे घडतात.
masks.jpg
कुठल्याही प्रकारचा कपडा बनवणं, बूट रंगवणं, कापड रंगवणं, कॉश्च्यूमसाठी दागिने बनवणं असं सगळं सगळं इथेच केलं जातं. तर अश्या या कॉश्च्यूम शॉपमधे मी काम करत होते. या शॉपचा सगळा कारभार पाहणारी शॉप हेड सोडली तर बाकी सगळे माझ्यासारखेच मास्टर्स चे विद्यार्थी किंवा काही बॅचलर्स डिग्रीचेही विद्यार्थी.
या व्यवस्थेमुळे विभागाच्या प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाचे सर्व कॉश्च्यूम्स आमच्या हातातूनच बनून पुढे जात. प्रत्येक सेमिस्टरला किमान तीन तरी नाटकांच्या कपड्यावर काम केलं जाई. त्यामुळे सहा सेमिस्टर्स मधे कॉश्च्यूम्स बनवणे ज्याला आम्ही कॉश्च्यूम कन्स्ट्रक्शन म्हणतो त्याचा भरपूर अनुभव मिळाला. ग्रीक पद्धतीचे कपडे, कॉमेडिया डेलार्टे ची वेशभूषा, मुखवटे बनवणे, वेगवेगळ्या ऐतिहासिक काळातले वेगवेगळे कपडे आणि त्यांचे डिझायनिंग व कपडा बनणे या दोन्हीमधले तपशील अगदी बारकाईने कळले तसेच अनेक प्रकारच्या कापडांवर काम केलं गेलं त्यामुळे कुठलं कापड कसं वागत आणि त्याने आपल्याला हवे ते करायचे असेल तर काय करायला हवें, कुठल्या कापडाचा उपयोग कशासाठी होतो ह्याचाही अंदाज आला.
आमच्या डिपार्टमेंटला होणार्‍या नाटकाचं कॉश्च्यूम डिझायन आमच्यापैकीच म्हणजे माझ्यासारख्याच ग्रॅड स्टुडंटपैकी कुणीतरी केलेलं असे किंवा मग आमची प्रोफेसर सिल्विया पनाल असे. शॉपमधल्या एका भिंतीवर त्या त्या नाटकाची सगळी डिझाइन्स म्हणजे डिझायनरने काढलेली व्यक्तिरेखेची चित्रे लावलेली असत. डिझायनर एकदा सगळ्या शॉपमधल्या सगळ्यांना प्रत्येक कॉश्च्यूम तपशीलात समजावून देई. तो कसा बनायला हवा याविषयी चर्चा केली जाई. त्यामुळे डिझायनरशी संवाद कसा होतो, आपल्या डिझाइन्सवर काम करणार्‍याला काय काय प्रश्न असू शकतात आणि त्यांची उत्तरे कशी द्यायची याचा चांगलाच अनुभव मिळत होता. कॉश्च्यूम डिझायनरला स्वत:ला पुढे जाऊन कधी कपडे बनवण्यात उतरण्याची गरज पडत नाही सर्वसाधारणत: पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत असायला हव्यातच. तर आणि तरच डिझायनर आपल्याला कश्या प्रकारचा कॉश्च्यूम हवा आहे हे सांगू शकेल.
म्हणजे आपल्याकडच्या संदर्भात बघायचं तर कसं की एखादी कॉश्च्यूम डिझायनर आहे जिला नव्वार साडी नेसता येत नाही. त्यामुळे तिला माहितीच नाहीत नव्वार नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती मग थोड्या जुन्या काळातली वेशभूषा डिझाइन करताना ब्राह्मणी साडी होते पायघोळ आणि पदर हा एवढा मोठ्ठा जे अगदीच काळाशी विसंगत असतं आणि मग दिसताना काही केल्या ते पात्र त्या त्या काळातलं वाटत नाही. तर यासाठी कॉश्च्यूम कसा बनणार याचं ज्ञान आणि अनुभव दोन्ही असायला हवे डिझायनरला. शॉपमधे काम करण्याने हा अनुभव भरपूर मिळाला.

उन्हाळ्याच्या तीन महिन्यात असिस्टंटशिप नसायची त्यामुळे मी व्हिसाचे नियम पाळत माझ्याच विषयाशी निगडीत इंटर्नशिप केली सॅन्टा फे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्यूम शॉपमधे. तीनही वर्षं. सॅन्टा फे ऑपेराचं कॉश्च्यूम शॉप बघून माझे डोळेच विस्फारले गेले. इथे शिवणकामाचे सात गट होते ज्यात प्रत्येकी आठ-नउ लोक काम करत होते. प्रत्येक गटाकडे प्रत्येक ऑपेरामधले ठराविक कपडे वाटून दिलेले असत. त्याच कपड्यांवर त्या गटाने काम करायचे. प्रत्येक गटातली मुख्य व्यक्ती असते तिला ड्रेपर म्हणतात. हे ड्रेपर लोक खूपच अनुभवी असतात. आपल्या गटाकडे आलेल्या कामामधले नवीन बनवायचे जे सगळे कपडे असत त्यासाठी गायकाच्या मापाप्रमाणे डमी बनवून त्याबरहुकूम प्रत्येक पॅटर्न बनवणे तसेच आपल्या गटाच्या कामाची योग्य ती आखणी करणे हे ड्रेपरचे काम. केलेल्या पॅटर्नप्रमाणे कापड बेतणे हे करण्यासाठी ड्रेपर आणि फर्स्ट हॅण्ड या पदाची व्यक्ती. मग स्टिचर्स आणि स्टिचर अ‍ॅप्रेन्टिस अशी उतरती भाजणी. कामाच्या पसार्‍यानुसार एका ड्रेपरच्या हाताखाली किती फर्स्ट हॅण्ड, स्टिचर्स, अ‍ॅप्रेन्टिस असत हे ठरत असते. शिवणकामाबरोबरचकॉश्च्युम शॉपमधे एक डाय शॉप असते जिथे कपडे डाय करणे, रंगविणे इत्यादी सगळ्या गोष्टी होत होत्या. एक क्राफ्ट विभाग जिथे पायापासून गळ्यापर्यंत सगळ्या ऍक्सेसरीज वर काम केलं जाई आणि एक मिलिनरी विभाग जिथे डोक्यावर घालायच्या सर्व प्रकारच्या टोप्यांवर केवळ काम चाले.
chilkhat.jpg
पहिल्या वर्षी मी स्टिचर आणि ड्रेसर ऍप्रेंटिस होते. ड्रेसर म्हणून काम ऑपेरांच्या रंगीत तालमीला सुरू होई. त्या त्या व्यक्तीचा जो कॉश्च्यूम असेल तो त्या व्यक्तीला कसा चढवायचा हे शिकवलं जाई. ऐतिहासिक युरोपियन कपड्यांमधले बहुतांशी कपडे हे व्यक्ती आपले आपण घालू शकत नाही. एक किंवा क्वचित दोन तीन लोकांनी मिळून तो त्या व्यक्तीच्या अंगावर चढवावा लागतो आणि तो कसा चढवायचा याच्या काही ठराविक पद्धती असतात. कॉर्सेट नावाचं प्रकरण बांधायला सवय नसलेल्या माणसाला चाळीस मिनिटेही लागू शकतात. तसेच अनेकदा ऑपेरा गायकाला एक सीन करून आल्यावर दुसर्‍या सीनला जायच्या आधी कॉश्च्यूम बदलणं अपेक्षित असतं पण संपूर्ण बदलायला वेळ नसतो मग त्यावेळेला तो बदल करण्यासाठी त्याला मदतीला अनेक जण असतातच पण कपडे बनवणार्‍यालाही ते कपडे पटकन बदलता यावे यासाठी क्लुप्त्या कराव्या लागतात.
एका ऑपेरामधे एका दृश्यात एक्झिट घेतल्यावर पुढच्या दृश्यासाठी प्रवेश करण्याआधी एक बरोक शैलीतला गाउन काढून एका ननचे जाडेभरडे आणि आकार उकार नसलेले कपडे घालणे अपेक्षित होतं. आणि त्या गायिकेला यासाठी वेळ होता केवळ चाळीस-पन्नास सेकंद. एवढ्याश्या वेळात कॉर्सेटचं लेसिंग निघणं शक्यच नव्हतं त्यामुळे तो ड्रेस ज्या शिवणगटाकडे होता त्या गटाच्या ड्रेपरने एक मस्त आयडीया लढवली. कपड्याला रिविट मारून त्यातून लेसिंग करण्याऐवजी कापडी लूप्स तयार केले आणि त्यातून एक पातळ पट्टी सरकवली. मधे जी जागा तयार झाली त्यातून लेसिंग केले. गाउन काढताना केवळ ती पट्टी ओढून काढावी लागे जेणेकरून संपूर्ण लेसिंग क्षणार्धात निघून येत असे. अश्या अनेक क्लुप्त्या इथे मी शिकले.
moti-kam.jpg
दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षी मी क्राफ्ट विभागात क्राफ्ट अप्रेंटिस आणि मग क्राफ्ट असिस्टंट म्हणून काम केलं. चामड्याचं काम म्हणजे बूटांचे आकार बदलणे, रंग बदलणे, चिलखत बनवणे, सिलिकॉन मोल्डिंग, वेगवेगळ्या प्रकारची आभूषणे, हॅण्ड प्रॉप्स (पर्सेस, बटवे, पॅरॅसोल, काठ्या इत्यादी) बनवणे असं सगळं या क्राफ्टच्या काळात केलं. ज्याचा आज काम करताना प्रचंड उपयोग होतोय.
sporans.jpg
सॅन्टा फे ऑपेरा चे लोक आपल्या सगळ्या शॉप्स च्या लोकांसाठी प्रत्येक ऑपेरा ओपन होण्याआधी एक डिझाइन प्रेझेंटेशन ठेवत असत. ज्यामधे त्या त्या ऑपेराचे दिग्दर्शक आणि नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा असे तीनही डिझायनर्स येत आणि जे काही डिझाइन त्यांनी केलेलं आहे ते तसं का? कश्यापद्धतीने ते सध्याच्या डिझाइनवर येऊन ठेपले? डिझाइनचे जे निर्णय आहेत ते तसेच का घेतले? संपूर्ण ऑपेराकडे ते कश्या दृष्टीने पाहतात? एकेक व्यक्तिरेखा ते कश्यापद्धतीने उभी करतात इत्यादी सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जायच्या. प्रश्न विचारता यायचे आणि जगातल्या मोठ्या मोठ्या डिझायनर्स आणि ऑपेरा दिग्दर्शकांच्याशी संवाद साधता यायचा.
यामधे एकदा फॉलस्टाफ नावाच्या ऑपेराचे ब्रिटीश दिग्दर्शक सर जॉन मिलर ह्यांनी एकुणात डिझायनिंग बद्दल बोलताना एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली होती ती म्हणजे
"लॅव्हिश इज व्हल्गर, न्युडिटी इजन्ट." म्हणजे 'नग्नता नाही तर अति भपका, चकमकाट हा हिडीस असतो.'
आपल्या हल्लीच्या सिरीयल्सचं हिडीसपण दाखवायला हे वाक्य पुरेसं आहे नाही का? हे वाक्य, हा विचार आजही काम करत असताना ब्रह्मवाक्य असल्यासारखं जपून ठेवलेला आहे. अशी सगळी पूर्वतयारी करून घेऊन मग पुढे खर्‍या नाटकाच्या डिझायनिंग कडे प्रवास सुरू झाला. पण त्याबद्दल पुढच्या लेखात सांगते. तूर्तास हे पाठ करा
'लॅव्हिश इज व्हल्गर.'

---नीरजा पटवर्धन

तटी: या लेखातील सर्वात पहिली चित्रे म्हणजे अ‍ॅब्डक्शन ऑफ सीता मधील चित्रे वगळता बाकी सर्व चित्रांच्यातील वस्तू मी केवळ बनवल्या आहेत डिझायनरच्या सांगण्यानुसार. अ‍ॅब्डक्शन ऑफ सीता या प्रयोगाचे कॉश्च्युम्स मात्र मी डिझाइन ही केलेत आणि त्यांवरचे पेंटींगही केलेय.

विषय: 
प्रकार: 

नीरजा, सुंदर लेख. आधी तुझ्या ब्लॉगवरही तू लिंक दिल्या होत्यास तेव्हा वाचलेले. पण परत वाचतानाही मजा येतेय. सगळे आठ लेख लवकर टाक. Happy

छान लिहिलयसं,
नी इथे असताना मुख्यत्वे ग्रीक , युरोपीयन (इटालीयन , रेड इंडियन ??? ) वगैरे डिझायनिंगच जास्त शिकवलं गेलं की भारतीय डिझायनिंग ही शिकता आलं ?

श्री, भारतीय आणि पाश्चात्य डिझायनिंग असं वेगळं नसतं काही.
वेशभूषेचा इतिहास प्रत्येक ठिकाणचा नक्कीच वेगळा आहे. परंतु डिझायनिंग किंवा नाट्य आणि दृश्य विचार हे वेगळं नसतं. डिझाइनिंगची तत्वे तीच असतात.
तिकडे जे मी शिकले ते बहुतांशी पाश्चात्य वेशभूषेबद्दलच अर्थात. आणि भारतातून तिकडे जाऊन भारतीय वेशभूषा शिकण्यात प्वायंटच काय? म्हणून तर मी थिसीस किंवा इतर गोष्टींसाठी भारतीय किंवा भारत बेस्ड अशी नाटकं डिझाइन करणंही टाळलंच.

हा घ्या चौथा लेख http://www.maayboli.com/node/21602

भारतीय कपड्यांचा म्हणजे वेशभूषेच्या इतिहासाचा अभ्यास कुठल्याही एका कोर्समधे किंवा तत्सम केलेला नाही.
संदर्भ ग्रंथ, स्थानिक संदर्भ, आजूबाजूचं जग यातून जी माहिती मिळत जाते तीच केवळ.
तसंही प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेला वेशभूषेच्या इतिहासाचा अभ्यास नव्याने करावाच लागतो मग ती जगाच्या पाठीवर कुठचीही असो.

सही सांगते आहेस सारं- अगदी बारीकनिरीक. माझ्यासारख्या या विषयाचा अजिबात गंध नसणार्‍याला देखील उत्सुकता वाटेल अशा शैलीत आणि समजावून सांगते आहेस. Happy मस्त!
वाचतो आहे अजून पुढले भाग.

expressively written,really I would like to know more about your actual work personally,

Best of luck for further designs