'मुक्तांगणची गोष्ट' - डॉ. अनिल अवचट

Submitted by चिनूक्स on 28 November, 2010 - 23:38

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं हे रौप्यमहोत्सवी वर्षं. डॉ. सुनंदा अवचट आणि डॉ. अनिल अवचटांनी हे केंद्र सुरू केलं त्याला निमित्त ठरला त्यांच्या एका स्नेह्यांचा व्यसनाधीन मुलगा. दारू, गर्द यांचं विश्व किती भयप्रद आहे, हे या निमित्तानं अवचट दांपत्याच्या ध्यानी आलं. 'गर्द' ही लेखमालिका अनिल अवचटांनी व्यसनाधीनांच्या आयुष्यावर लिहिली, आणि त्यातून जन्म झाला 'मुक्तांगण'चा.

आपल्या लेखनातून मिळणारा सर्व पैसा पुलंनी सुनीताबाईंच्या मदतीनं समाजोपयोगी कार्यासाठी वापरला. 'मुक्तांगण' सुरू करण्यासाठीही सुनीताबाईंनीच पैसे दिले. केंद्र सुरू होऊन केंद्राची घडी नीट बसेपर्यंत 'मुक्तांगण'ला सुनीताबाईंकडून ही आर्थिक मदत मिळत राहिली. डॉ. सुनंदा अवचट, डॉ. अनिल अवचट, पुलं आणि सुनीताबाई या चौघांच्या ध्यासामुळे हजारो कुटुंबं सावरली. आत्मविश्वासानं पुन्हा उभा राहिली. 'मुक्तांगण'ला देणगी देताना पुलं म्हणाले होते - 'एका जरी घरात (व्यसनमुक्तीचा) दिवा लागला, तरी माझ्या देणगीचं सार्थक झालं असं मी समजेन'. पुलं-सुनीताबाईंच्या देणगीमुळे अक्षरशः हजारो घरांमधला अंधार कायमचा नाहिसा झाला.

आज 'मुक्तांगण'चा पसारा वाढला आहे. स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग सुरू झाला आहे. व्यसनाधीनांच्या पत्नींचा 'सहचरी' हा वेगळा गट आहे. अनेक शहरांमध्ये आता या संस्थेचं कार्य उभं राहिलं आहे. ही संस्था उभी कशी राहिली, गेल्या पंचवीस वर्षांत आलेल्या अडचणी, अद्भुत अनुभव यांचा लेखाजोखा म्हणजे डॉ. अनिल अवचट यांचं 'मुक्तांगणची गोष्ट' हे सुरेख पुस्तक. 'मुक्तांगणची गोष्ट' झपाटून काम करणार्‍या अनेकांची कहाणी तर सांगतंच, पण सुनीताबाई देशपांडे आणि डॉ. सुनंदा अवचट या थोर स्त्रियांनी किती अफाट काम केलं, समाजातल्या कित्येकांचं आयुष्य कसं बदलून टाकलं, याची पुन्हा नव्यानं जाणीवही करून देतं.

हे पुस्तक मायबोली खरेदीवर आता उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/Muktanganchi-Goshta.html

MuktanganPhoto.jpg

ती ८५ सालातली एक दुपार. बेल वाजते. सुनंदाची ठाण्याची मैत्रीण अलका आणि तिचा तरुण मुलगा धनू दारात उभे. आं? अलका अशी का दिसतेय? काय झालंय तिला? अलकाला एवढा मोठा मुलगा असून ती छान, उत्साही, देखणी दिसते. कायम हसरी. एरवी धनूही हसून ओळख देणारा. आज असा मान खाली घालून चेहरा पाडून का उभा? माझ्या मागे सुनंदा उभी. अलका तिच्या गळ्यातच पडली. सुनंदा तिला आत घेऊन गेली. मला काहीच कळेना. माझ्या समोर धनू बसलेला. मी त्याला काय झाले विचारू शकलो असतो, पण ही सुनंदाच्या अखत्यारीतली बाब होती. मी त्यात पडू इच्छित नव्हतो. तिच्याकडे अनेकदा मानसिक प्रश्नांसाठी लोक यायचे. मी चुकूनही त्यांच्याबद्दल विचारायचो नाही. अगदी जवळचे, ओळखीचे असले तरी.

काही वेळानं ते दोघे परत गेले. सुनंदा माझ्याकडे वळली आणि म्हणाली, ''ब्राऊन शुगर''.
''बाप रे! धनूला?''
''हो.''
''कसं काय लागलं?''
''कोल्हापूरला. त्याच्या इंजिनीयरिंग कॉलेजात.'' धनूला तिथे शिकायला ठेवले होते. तिथून तो घरी पत्र पाठवायचा की, इन्स्ट्रुमेंटसाठी पैसे पाहिजेत. हे पाठवत राहिले. कॉलेजचे पत्र आले, पुरेसा अटेंडन्स नसल्याने त्याला परीक्षेला बसता येणार नाही. तशी अलका तिकडे तातडीने गेली आणि हे समजले.

अलकाला एक धास्ती होती. तिचा नवरा महेश डोक्याने भडक होता. त्याला हे कसे सांगायचे? तो तर धनूला बेदम मारतच सुटायचा. सुनंदाने त्याला समजावण्याचे काम केले. तो फक्त तिचेच ऐकायचा, म्हणून तिला ते जमले. ''आता धनूला रागावू नकोस. त्याला मदतीची गरज आहे. आपण सगळे मिळून यातनं वाट काढू..'' अशा अर्थाचे काहीतरी सांगितले आणि तो शांत झाला. संध्याकाळी आम्ही त्यांच्या घरी गेलो. बेडरूममध्ये धनूला झोपवले. सुनंदाने त्याला गोळ्या सुरू केल्या. त्याला कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाऊ द्यायचे नाही, कारण तो लगेच ड्रग्जकडेच जाईल, असे बजावले. अलकाने, महेशने आळीपाळीने त्या खोलीत खुर्ची टाकून बसायचे ठरवले, आणि आम्ही परत आलो.

पहाटेपहाटेच अलकाचा फोन. महेशचा डोळा लागल्याचे पाहून धनू उठला. खिडकीतून खाली उडी मारली. पहिल्या मजल्यावर राहत होते म्हणून बरे. तो त्याच्या त्या अड्ड्यावर गेला. तिथं त्यानं बरंच कर्ज करून ठेवलं होतं. त्या लोकांनी याला सपाटून मार दिला. तशाच रक्तानी भरलेल्या कपड्यांनी तो घरी आला. बेल वाजवली. काय वाटलं असेल त्या आईबाबांना? मग परत आम्ही त्यांच्याकडे गेलो. सुनंदाने त्याचे ड्रेसिंग केले. मी तिचा मदतनीस. परत सगळी ट्रीटमेंट सुरू केली.

या मुलाला आम्ही अगदी जन्मापासून पाहिलेलं. सुनंदाने तर त्या प्रेग्नन्सीमध्ये अलकाला इंजेक्शनेही दिली होती. छोटा गोरा देखणा मुलगा. घरभर तीनचाकी सायकल चालवताना मला आठवतोय. किती वेळा मी त्याला खेळवलंय, फोटो काढलेत. आणि या मुलाला हे जीवघेणे व्यसन लागावे? हे व्यसन, मी समजत होतो की, श्रीमंतांच्या मुलांना लागते. सुनील दत्त यांच्या मुलाला लागल्याचे ऐकले होते. कुणा उद्योगपतीच्या मुलालाही. पण आता हे थेट आमच्या घरापर्यंत पोचले होते.

दोन दिवस धनूला बराच त्रास झाला. त्या बेहोशीमध्येच तो ड्रगसाठी सिगारेटमध्ये ड्रग भरल्याची अ‍ॅक्शन करायचा. काडी पेटवल्याची. फूंफूं..फक् फक् असे आवाज करीत तो काल्पनिक धूर पकडायचा प्रयत्न करायचा. पाठीला होणार्‍या वेदनेने ओरडायचा. पण शेवटी ते थांबत गेले, अणि दोन - तीन दिवसांत तो नेहमीसारखा दिसू लागला, डोळ्यांत जिवंतपणा आला. अलका, महेशला खूप हायसे वाटले. पण आता त्याची चौकशी करायला त्याचे मित्र येऊ लागले. अलका- महेशने कधी पाहिलेलेही नव्हते. सुनंदाने बजावलेले होते, कुणालाही धनूला भेटू द्यायचे नाही. गावाला गेलाय म्हणून सांगा. दोन - चार दिवसांत तेही यायचे बंद झाले. आता त्याला घरात फारच कोंडल्यासारखे वाटू लागले. मग सुनंदाने मला सुचवले, ''तू त्याला घेऊन फिरायला जा, म्हणजे त्याला जरा बाहेरची हवा लागेल. तू बरोबर असल्यावर त्याचे तसले मित्रही येऊन भेटणार नाहीत.'' तसा मी त्याला घेऊन विद्यापीठाच्या मोठ्ठ्या मैदानावर फिरायला घेऊन जाऊ लागलो.

मला प्रश्न पडला होता : 'ड्रग्ज'च्या विषयावर बोलायचे की नाही? पण थोड्याच वेळात तो विषय निघालाच. आणि धनूही मोकळेपणाने बोलू लागला. मला या ड्रग्जविषयी काही माहिती नव्हती. वर्तमानपत्रातून आलेले लेख एक - दोनदा वाचले होते, पण त्यात ड्रगचे प्रकार, माहिती तितपतच होती. इथे मी ड्रग्जमध्ये सापडलेल्या मुलाशी बोलत होतो. ते किती भयंकर असते, हे गेल्या काही दिवसांत कळले होते. 'त्या' दुपारी आमच्या घरी माझ्या समोर धनू बसला होता. त्याचा चेहरा किती भकास होता! डोळ्याभोवतीची त्वचा काळी झालेली. ओठ काळे पडलेले. गाल किती आत गेले होते! आता ड्रग्ज सोडून आठच दिवस झालेले. पण सगळा नूरच बदलला होता! आधी तो फर्ग्युसनला होता, तेव्हा मागच्या बाकावर यांचा ग्रूप बसायचा. हा खिडकीतून उडी मारून बाहेर पळायचा. कँपात 'माल' मिळायचा. मग हा त्या पुड्या घेऊन कॉलेजला यायचा. खूण केली की मुलंही उड्या टाकून पळून यायची. मग कुठे कुठे बसून ते ड्रग्ज ओढायचे. कुठे माहीत आहे ? एका हॉस्टेलमध्ये स्वा. सावरकरांची जिथे खोली आहे, त्याच्या बरोबर खाली. काय भयानक योग बघा. त्या त्यागी महापुरुषाचे वारे जरी लागले तरी जीवन बदलून जायचे, तिथे ही मुले ड्रग ओढत बसायची. नंतर त्याच्या ग्रूपमधल्या मुलांची नावे आम्ही मिळवली. सगळे डेक्कन परिसरातले, उच्चभ्रू कुटुंबांतले. अलका - महेशला कळायला उशीर झाला तसा त्यांना होऊ नये म्हणून सुनंदाने त्यांच्या घरी फोन केले. ''आम्हांला हे कळले आहे. हवे तर स्वतंत्रपणे तुम्ही चौकशी करा. आणि मदत हवी असल्यास आम्ही ती करायला उत्सुक आहोत.'' पण प्रतिसाद अनपेक्षित आला. 'आमच्या मुलाला असलं काही व्यसन नाही. तुम्ही उगाच आमच्या घराची बदनामी करू नका,' अशी उत्तरे. पुढे दोन - चार - पाच वर्षांनी हेच पालक त्यांच्या मुलांना घेऊन मुक्तांगणमध्ये दाखल करायला आले, तेव्हाचा सूर पालटून आता तो असहाय सूर झाला होता. पण मधली काही वर्षे गेली नसती तर?

कदाचित त्याच वेळी काही करता आले असते. ही उच्चवर्गीय संस्कॄतीची एक झलक. धनू सांगत होता आणि ड्रग्जचे विश्वच उलगडत होते. तिथे माल घ्यायला कोण कोण यायचे? तर गरीबवर्गच जास्त. झोपडपट्टीत राहणारी पोरं, कचरा वेचून, भंगार विकून पोट भरणारी कंगाल पोरं, हलकी कामं करणारे हेल्पर, रिक्शावाले, कामगार... असेच बहुतेकजण. संजय दत्त कॅटॅगिरी नव्हतीच तिथं. आणि पुडया महाग तरी किती? वीस रुपयाला एक. अशा रोज पाच-सहा पुडया तरी लागणारच. म्हणजे ड्रग सुरु केल्यापासून चार-पाच महिन्यांत तेवढा डोस वाढतोच. म्हणजे रोजचा शंभर-सव्वाशेचा खर्च (तो ऐंशी सालातला हां!), आणि तो टाळून चालत नाही. त्याचा परिणाम संपला की त्रास व्हायला सुरुवात झालीच समजा. तुम्ही सगळ्यांपासून पळून जाऊ शकता. पण या ड्रगपासून? कुठे जाणार? जिथे असाल तिथे तुम्हाला त्रास सुरु होणार, आणि घेतले नाही की तो वाढतच जाणार. किती वाढणार? कितीही. यात माणसं मेलेलीसुद्धा आहेत. सर्वांत महागडे व्यसन सर्वांत गरीब थरात! हे मला लिहिण्यासाठी आव्हान वाटू लागले आणि त्यावर मी लिहायचे ठरवले.

पण त्याआधी धनू प्रकरण सांगून टाकतो. त्याला व्यसन कसे लागले, हेही त्या मैदानावरच्या फिरण्यात मी विचारले. तो म्हणाला, "तुला माहीतच आहे, माझे बाबा संध्याकाळी रोज ड्रिंक्स घेतात, प्रमाणात घेतात. मी लहानपणी आईला विचारलं, डॅडी हे रोज काय पितात?’ आई म्हणाली, ’ते रोज ड्रिंक घेतात.’ काही वर्षांनी समजलं की, ते ड्रिंक म्हणजे दारू आहे. तसं मी आईला विचारलं, ’डॅडी रोज दारू पितात? का पितात?’ आईने सांगितलं, ’त्यांना ऑफिसमध्ये टेन्शन्स असतात, म्हणून त्यांना घ्यावी लागते.’ मग मी दहावीला गेलो. माझ्या अभ्यासाचं मला टेन्शन यायला लागलं. मग वाटलं, आपण डॅडींसारखं ड्रिंक घेऊ या का? पण नको. सिगारेट ट्राय करू. घरी कळणार नाही. तिथून सगळं सुरू झालं. पहिल्यांदा सिगारेट.. त्यात चरसची गोळी घालून ओढू लागलो. आणि शेवटी ब्राऊन शुगर."

मी या विषयावर सभांमध्ये बोलताना नेहमी सांगतो की, आपण घरात रोज थोडी दारू घेत असाल. चांगल्या दर्जाची घेत असाल, कंट्रोलमध्ये घेत असाल; पण तरी त्याकडे तुमची लहान मुलं कशा दॄष्टीने पाहत असतील यावर तुमचा कंट्रोल नसतोच, त्यामुळे घरात अल्कोहोल संस्कॄती आणायची की नाही हे तुम्ही ठरवा. त्यावरून एका मित्राची आठवण झाली. तो एकदा असाच गंभीर चेहर्‍याने, अस्वस्थ होऊन आला. म्हणाला, "आमच्या चिरंजीवांनी काल एक पराक्रम केला. सिगारेट ओढली. आता ते साहेब आठवीत आहेत फक्त!" मला आश्चर्य वाटले. हा मित्र स्वतः जवळपास चेनस्मोकर (अग्निहोत्री म्हणूयात का त्याला?) आहे. मी त्याला म्हटलं, "मित्रा, त्याला हा नाद लागू नये, असं वाटत असेल तर तुला सिगारेट सोडली पाहीजे. तयार आहेस का त्याला?"
तो म्हणाला, "नाही, मला ते शक्य नाही."
"मग त्या मुलाला तू काय, कसं सांगणार आहेस?"
"मी त्याला सांगितलंय की, मी आठवीत असताना ओढत नव्हतो. नोकरी लागल्यावरच मी ओढायला लागलो..." मला त्याही परिस्थितीत हसू आले. म्हणालो, "मित्रा, त्याला हे कसे पटेल? त्याला आठवतं तेव्हापासून जर तुझ्या ओठांत तो सिगारेट पाहत असेल, तर ती एक चुकीची गोष्ट आहे, हे त्याला कसे पटावे?"

तो मुलगा माझाही लाडका होता. त्याला घेऊन मी सिंहगडावर गेलो. खूप बोललो आम्ही. या सवयीविषयी बोललो. त्याने नंतर सिगारेट ओढलीच नाही.

तर परत धनूकडे येऊ.

नंतर मुक्तांगण निघाले, धनू सुनंदाचा मदतनीस झाला. नंतर सगळे कुटुंब बदलीमुळे मुंबईला हलले. तिकडे गेल्यावर तो दोन-चार वेळा स्लिप झाला, म्हणजे परत व्यसनाकडे वळला. त्या त्या वेळी तो मुक्तांगणमध्ये दाखलही झाला होता. नंतर तो त्यातून सुटला तो सुटलाच. वर्ष पूर्ण झाल्यावर आम्ही त्यांना टोकन - शाबासकी देतो. त्या वेळी त्याने आपले अनुभव ’शेअर’ केले, म्हणजे सांगितले. तो म्हणाला,"माझी आणि डॅडींची नेहमी भांडणे व्हायची. त्यानंतर मी प्यायला जायचो. माझी स्लिप व्हायची. एकदा रात्री असेच भांडण झाले. डॅडी ओरडून म्हणाले, ’गेट आऊट’! मी दाराबाहेर जिन्याच्या पायरीवर बसून राहिलो. विचार केला - आता दोनच रस्ते. एक म्हणजे परत ड्रगकडे जाणे. दुसरा, डॅडी बदलणार नाहीत, आपल्यालाच बदललं पाहिजे. मी आत आलो. डॅडींसमोर उभा राहिलो. नजरेला नजर देऊन म्हट्लं, ’सॉरी’. डॅडीं थक्कच झाले. मित्रांनो, मी हा शब्द कधीच डॅडींसमोर उच्चारला नव्हता. आणि आश्चर्य म्हणजे डॅडींनी हात पुढे करून मला मिठीत घेतलं. आम्ही दोघंही खूप रडलो त्यादिवशी. त्यानंतर मी सुधारलो, आणि डॅडीही सुधारले."

आम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या. कुठल्या पुस्तकात शिकला हे शहाणपण? त्या जिन्यात त्याने नेमका चांगला रस्ता का आणि कसा पकडला? सगळेच आश्चर्य. जाता जाता आणखी एक गंमत. धनू बरा झाल्यावर त्याचे डॅडी - आमचा मित्र आम्हांला सांगत होता, "महाराजांची कृपा म्हणून धनू यातून बाहेर आला." तो कुणा महाराजांचा भक्त होता. घरात त्यांचा एक मोठा फोटोही लावलेला होता. मला आश्चर्य वाटले. मग सुनंदाचे प्रयत्न? मुक्तांगणमधल्या सर्व सहकार्‍यांची दिनरात्र मदत? या सगळ्याचा धनूच्या बरे होण्यात काही रोल आहे का? पण महेशला तसे म्हणण्यात अर्थ नव्हता. कारण त्यावर तो म्हणाला असता, त्यांची कृपा म्हणून
तुम्ही भेटलात. आणि हे सगळं करायला त्यांनीच तुम्हांला बुद्धी दिली.

धनूला हे सांगताच तो हसून म्हणाला, ''त्यांना सांग की बेडरूममधल्या महाराजांच्या फोटोखाली बसूनच माल ओढायचो.'' मी महेशला तसे कधीही म्हणालो नाही. जर त्यामुळे त्याला छान वाटत असेल तर वाटू द्यावे की.

पुढं मुक्तांगणमध्येही आम्हांला असेच अनुभव यायचे. एखादा पेशंट बरा झाला की, लोक म्हणायचे, ''आमच्या नवसाला देव पावला. आता त्याची पूजा घालायला पाहिजे.'' सुनंदा हसून म्हणायची, ''जरूर, घाला पूजा. फक्त आम्ही सांगितलेल्या सूचना, पथ्यं पाळा म्हणजे झालं.''

तर या धनू प्रकरणाने मला खूप चालना मिळाली. जसा त्या प्रश्नाचा ध्यास लागला. आनंद नाडकर्णी मुंबईत हेच काम करतो हे ऐकले. मग काम सोपेच झाले. आधी त्याच्या ठाण्याच्या घरी जाऊन त्याला विचारत सुटलो. त्यानेही माझी जशी शिकवणीच घेतली! नंतर परळच्या के. ई. एम. हॉस्पिटलमधल्या त्याच्या खोलीत राहिलो. ते दिवस खूप शिकवणारे, वेदना देणारे आणि बहारीचे होते. बहार म्हणजे आनंद नावाचा उत्साहाने उसळणारा मित्र मिळाला. माझे कॉलेजजीवन संपून बारा- पंधरा वर्षे लोटली होती. इथं ती तरुणाई परत भेटली. त्याचा पार्टनर महेश गोसावी होता. मुख्यमंत्री निलंगेकरांच्या मुलीला बेकायदा प्रवेश दिला म्हणून तो कोर्टात गेला. खूप दरडावण्या, धमक्या आल्या; पण तो खंबीर राहिला. त्या सगळ्यांत मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. ते प्रकरण त्याच वेळी चाललेले. ती खोली म्हणजे त्या हालचालींचे केंद्रस्थान होते. रोज नव्या घटना, नवे थरार.

आनंदच्या बरोबर त्याच्या सायकियाट्री डिपार्टमेंटला जायचो. दगडी इमारती. पुण्याच्या ससूनच्या मानाने खूपच स्वच्छता. कार्यक्षमताही. त्याच्या ग्रूपमीटिंगला तीस- चाळीस जण. प्रत्येकाच्या 'शेअरिंग'मध्ये मन हादरवणार्‍या कहाण्या. आनंद या सगळ्यांमध्ये छान मिसळायचा. बरोबरीच्या नात्याने. त्याचे एम. डी हे बिरूद बाजूला उतरवून ठेवलेले. त्या मुलांचा आवडता हीरोच जसा! सायकियाट्री वॉर्डमधल्या सात - आठ खाटा यांच्या 'डीअ‍ॅडिक्शन'साठी दिलेल्या. प्रश्न नवीन, उत्तरे शोधणेही नवीन. त्यामुळे सगळीच एक्साइटमेंट. हॉस्टेलच्या त्यायाच्या छोट्याश्या खोलीत दोन कॉट्स् जेमतेम बसायच्या. त्यात खाली काहीतरी टाकून त्यावर झोपायचो.

पेशंटच्या घरी जायचो. त्या निमित्ताने एक वेगळीच मुंबई पाहायला मिळाली. या प्रश्नामुळे उद्ध्वस्त झालेली घरे आता सावरली, तरीही साशंक. काय होणार या पोरांचं? यातनं कुटुंबाचे अनेक पैलू पहायला मिळत. एका ड्रगच्या व्यसनी मुलाच्या घरात आई, थोरला भाऊ आणि वहिनी राहायचे. या पोरानं व्यसनासाठी पैसे चोरले, अनेकांकडून बहाणे करून पैसे उसने काढले.. वगैरे. या सगळ्याला कंटाळून त्याच्या थोरल्या भावाने शेवटी या धाकट्याला घराबाहेर काढले. तो बाहेर पडला आणि घरासमोर एक सार्वजनिक बाग होती तिथल्या एका बाकावर बसला. त्याच्या मागोमाग कपडे पिशवीत टाकून त्याची आईपण बाहेर पडली. ती त्याच्या शेजारी जाऊन बसली. जिथं तू, तिथं मी. मग शेवटी थोरला भाऊ उतरून बागेत आला आणि या सगळ्यांना हाताला धरून त्याने घरात आणले. हे ऐकून मला तर गहिवरून आले. या एका घटनेने आपल्याला काय काय दाखवले! मला तर कपडे पिशवीत घालून घरदार सोडून मुलाशेजारी जाऊन बसणारी माऊली धन्य वाटली. आणि ती गेल्यावर दादाने सगळ्यांना जाऊन परत आणणे? सगळेच मोहरून टाकणारे. मी नंतर परदेशात तिथल्या या क्षेत्रात काम करणार्‍यांसमोर बोलताना हे सांगितलं, तर त्यांना ते खरंच वाटेना. एका मुलाने आई व्यसनाला पैसे देत नाही म्हणून तिचे डोके तीन - चार वेळा भिंतीवर आपटले , तर ती आंधळीच झाली. आता तो सुधारला. आता तो आईची काळजी घेतो. काही नुकसान भरून येणारे, तर काही न भरून येणारे. त्या खड्ड्यांसहित जगणे.

त्याच काळात मुंबईच्या अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस ( ए. ए. किंवा अनामिक मद्यपी ) या संघटनेच्या सभांना हजर राहिलो. पुढे पुण्यातही त्यांना जात राहिलो. सुरवातीला ' मी ( आद्याक्षरांनी ते नाव घेत, ओळख लपवण्यासाठी ) एक दारूडा आहे' असे बोलणारा म्हणायचा की ऐकणारे हाय.. अमुक ( त्याचे संक्षिप्त नाव) म्हणून ओरडायचे. हे जरा विचित्र वाटायचे. काहीजण अनुभव फार मोकळेपणाने व्यक्त करीत, तर बर्‍याच जणांच्या आत्मनिवेदनात तोचतोचपणा असे. पण तरीही ते सगळे भावले. त्यांच्या अनामिकतेविषयी मला अगत्य नव्हते. कारण ही संघटना अमेरिकेत जन्मली. तिथे अनामिकता महत्त्वाची. इथे सगळ्यांना सगळे आधीच माहीत असते. त्यांच्या कार्यक्रमातल्या बारा पायर्‍याही अनुभवसिद्ध वाटल्या. दारूपासून दूर राहताना त्या पायर्‍यांनीच पुढे जायचे. आधी मी व्यसनी आहे हे मान्य करणे. ही आधीची पायरी. आणि दुसर्‍या व्यसनी माणसाला व्यसनापासून दूर राहायला मदत करणे, ही शेवटची बारावी पायरी. आपली व्यसनमुक्ती ऊर्फ सोब्रायटी पक्की नसताना दुसर्‍याला
मदत करायला जाणे धोक्याचे. त्यांचे एक अनुभवाने गच्च भरलेले 'बिग बूक' आहे. त्यांच्या प्रार्थना आहेत. मीटिंगच्यावेळी भिंतीवर टांगण्यासाठीची वाक्ये आहेत. या एएमधली आवडणारी गोष्ट म्हणजे या व्यसनींसाठी व्यसनापासून दूर असलेल्या व्यसनींनी चालवलेली ही संघटना. यात कुणी एक्स्पर्ट डॉक्टर नाही की कुणी समाजातली मान्यवर व्यक्ती अध्यक्ष नाही. संध्याकाळी, जेव्हा दारूची वेळ असते तेव्हा, या मीटिंगला जायचे. इतरांचे अनुभव ऐकायचे, हवे तर आपलेही सांगायचे आणि ती दारूची वेळ चुकवायची आणि एक दिवस पदरात पाडून घ्यायचा.

या एएची अनेक भावंडे आहेत. ड्रगवाल्यांचे ’नॉर्कॉटिक अ‍ॅनॉनिमस’ आहे. एवढेच काय, अतिस्थूल माणसांचे अतिखाण्यापासून दूर राहण्यासाठी ’ओबेसिटी अ‍ॅनॉनिमस’ आहे. आणि हो, जुगाराचेही व्यसनी असतात, त्यांचं गँबलर्स अ‍ॅनॉनिमस आहे. तर हे सगळं विश्व मला आनंदने दाखवलं. तो या क्षेत्रातला माझा, सुनंदाचा गुरू.

व्यसनाच्या विषयात पडलो. पेशंटना फायदा झाला असेलच. पण माझा मोठ्ठा फायदा म्हणजे मला आनंदसारखा मुलगा, बाप आणि जिवाभावाचा मित्र मिळाला. आम्ही एकमेकांच्या सुखदु:खात बरोबर राहिलो. आमची कुटुंबे जशी मिसळलीच गेली.

आनंदकडून पुण्याला आलो. पुण्याच्या सायकियाट्रिस्ट मित्रांनी काही अ‍ॅडिक्ट्सचे पत्ते दिले. एकाची आई तर धुणीभांडी करणारी. पोलिसांनाही भेटलो. या सगळ्यावर लिहायला सुरुवात केली आणि त्याची लेखमालाच झाली. महाराष्ट्र टाईम्समध्ये दिनकर गांगल होता. त्याने उत्साहाने स्वीकारून रोज एक लेख याप्रमाणे छापली. ते अकरा लेख झाले. त्यात आणखी भर घालून 'गर्द' नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. या लेखांनी खूप खळबळ झाली. हे गर्द ओढणार्‍या आणि नंतर आमच्याकडे उपचार घेतलेल्या काही पेशंट मित्रांनी सांगितले, "आम्ही व्यसनात होतो, पण म. टा. येण्याची वाट बघायचो. उत्सुकतेने वाचायचो. कारण जसं ते आमच्यावरच लिहिलेलं असायचं." काही लेख वाचून काही वयस्क, मध्यमवर्गीय पालक भेटायला येऊ लागले. "तुम्ही त्या लेखात जी लक्षणे लिहिलीत तशीच माझ्या मुलात आहेत." त्या मुलाला भेटताच तसे असल्याचे लक्षात यायचे. मग याचे काय करायचे? सुनंदाने ससून हॉस्पिटलला सायकियाट्री विभागाकडे त्याला अ‍ॅडमिट व्हायला पाठवले. रोज एकदोन मुले आम्ही पाठवू लागलो. तसा तिथल्या डॉक्टरांचा सुनंदाला फोन आला - "अहो, तुमच्या या पोरांनी इथे गोंधळ घातलाय. आम्हांला हे झेपायचं नाही. आमचं हे कामच नाही. पाठवू नका असले पेशंट." आता काय?

एके दिवशी दुपारी एक तरुण बेळगावाहून आला. म्हणाला, "मी ड्रगपासून गेले चार दिवस दूर आहे. पण उद्या माझा इंटरव्ह्यू आहे. ही नोकरी लागली तर माझे सगळेच प्रश्न मिटतील.."
मी म्हणालो, "बरोबर आहे. पण यात मी काय करू शकतो?"
तो म्हणाला, "मला ड्रगची एक पुडी पाहिजे. ती मी खिशात ठेवीन. ओढणार नाही. पण ती नुसती खिशात असली, तरी मला आधार वाटेल. तेवढी पुडी मला मिळवून द्या."
मी थक्क झालो. आजवर धीर येण्यासाठी अंगार्‍याच्या पुड्या ठेवतात हे ऐकले होते. म्हणालो, "मी आणि तुला पुडी मिळवून देऊ? आम्ही तुला यातनं बाहेर पडायला मदत करू. पण हे काय?"
"मला इथले ड्रग विकणारे माहीत नाहीत. बेळगावचे माहीत आहेत. म्हणून तुमच्याकडे आलो. तुम्ही लेखात लिहिलेत, तुमच्या पोलिसांशी ओळखी आहेत. त्यांनी पकडलेल्या मालातली एखादी पुडी काढून द्यायला सांगा की.."
मी मनातनं संतापलो, पण संयमाने म्हणालो, "तुला ड्रगमधनं बाहेर पडायचं असलं तर ये. नसलं तर चालू लाग!"

तो गयावया करून गेला अखेर. मी आणि सुनंदा सुन्न होऊन बसलो. पाच-दहा मिनिटांत एक गोरे, साठीचे, टक्कल पडलेले गृहस्थ दारात उभे. त्यांना आत बसवले. म्हणाले, "मी अमुक तमुक. (ते तिथल्या प्रसिद्ध श्रीमंतांपैकी एक.) मघाशी आलेला माझा मुलगा. त्याला खरोखरीच एक पुडी मिळवून द्या. एक बाप म्हणून हात जोडून विनंती करतो."

आमचा हा धक्क्यावर धक्के खायचा दिवस होता. सुनंदाने त्यांना ड्रग सोडताना जो त्रास होतो तो कमी करण्याची औषधे लिहून दिली आणि त्यांना निरोप दिला. पुढे मुक्तांगण सुरू झाल्यावर तो मुलगा पेशंट म्हणून आला. 'तेव्हा' त्याचा इंटरव्ह्यू वगैरे काही नव्हता. त्याला पुडी मिळत नव्हती, त्रास सुरू झालेला, म्हणून तो आला होता. नंतर त्या कुटुंबाशी काही वेळा संबंध आला. श्रीमंती अफाट होती. पण त्या घरात संस्कृतीच नव्हती. घरात एकमेकांमध्ये संवादच नव्हता. प्रत्येकाची दिशा भलतीकडेच. या निमित्ताने असं एक घर आतून पाहायला मिळालं. काय नव्हतं तिथं? बंगला, वस्तू, गाड्या.. पण काय होतं तिथं? शिकलोय त्यांच्याकडून की, नुसत्या पैशांत सुखसमाधान नसतं. ते व्यक्त होतं आपसांतल्या हृद्य नात्यांमध्ये, आपलं मागे ठेवून इतरांसाठी करण्यामध्ये. घराघरांतल्या सर्वांसाठी अखंड झिजणार्‍या कित्येक आया आठवल्या. त्यातनं ती समाधानी घरं उभी राहिलेली. हे जागोजाग दिसतंय, तरी लोक पैशांमागे धावताहेत, प्रॉपर्टीसाठी एकमेकांवर खटले भरून आयुष्यभर लढताहेत... काय म्हणावे याला?

नंतर कधीतरी सुनीताबाईंचा फोन आला. नंतर पुलंही बोलले. ते या लेखांनी खूप अस्वस्थ झाले होते. 'भेटायला या दोघं' असं म्हणाले. मग काय, आम्ही लगेच गेलो त्यांच्या घरी. ते जवळच राहत. आमच्या दोघांचे त्यांच्याकडे बरेच जाणेयेणे असायचे. हक्काने काही बाहेरची कामेही सांगायचे. आम्ही त्यांची मुलेच जशी. मला दर वर्षी एकदा खास कामाला बोलावत. त्यांच्या ट्रस्टमधून ते काही छोट्या उपक्रमांना मदत करत. मी कुठून जाऊन आलो की त्या त्या वेळी एखाद्या कामाविषयी, ते करणार्‍या माणसांविषयी सांगायचो. ते लक्षात ठेवून मला अधिक माहिती विचारून त्यांच्या गरजांची चर्चा करायचे. मग मी त्या व्यक्तींना बोलावून घ्यायचो. असे बर्‍याचदा.

या वेळी त्यांनी बोलावले आणि म्हटले, "या मुलांसाठी काही तरी करा तुम्ही. आता एक लाख द्यायचे ठरवलंय, पण आम्ही पैशाला कमी पडू देणार नाही." हे दोघे तोपर्यंत चालू असलेल्या, स्थिरावलेल्या कामांना मदत करत आलेले. इथे कामाचा पत्ताही नव्हता. तरी एक लाख? बाप रे, केवढी मोठी रक्कम! काय करूयात? प्रचारासाठी पुस्तिका काढता येतील. हजारो हँडबिलं छापू. किंवा एखादा फोटोंचा स्लाईड शो करता येईल. अधिक पैसे जमवून अर्ध्या तासाची डॉक्युमेंटरी? तेवढ्यात सुनंदा म्हणाली, "या लोकांसाठी आपण व्यसनमुक्ती केंद्र काढू." मी थक्क झालो. एवढा मोठा घाट घालायचा? बाप रे! पण पुलं, सुनीताबाईंनी ती कल्पना उचलून धरली. परत येताना मी सुनंदाला म्हणालो, "अगं, असं का म्हणालीस तू? आपल्याला झेपणार आहे का हे?"
"झेपेल की."
"पण असं एकही केंद्र आपण पाहिलेलं नाही. त्या शास्त्रामधलं कसलंही ट्रेनिंग घेतलेलं नाही.."

तशी सुनंदा सायकियाट्रिस्ट असल्याने मेंटल हॉस्पिटलमध्ये चरस-गांजामुळे वेडे झालेले किंवा दारूमुळे अल्कोहोलिक सायकोसिसचे पेशंट तिने पाहिलेले होते. पण ते काही झाले तरी मेंटल पेशंट होते. इथं तसं नव्हतं. ते बाकीच्या दृष्टीने नॉर्मल होते. त्यांना कसं हाताळायचं?

त्यावर सुनंदा जे म्हणाली त्यानं मला तिचं वेगळंच दर्शन झालं. ती म्हणाली, "त्यात काय? निदान या पेशंटला ठेवायला जागा तर होईल! नंतर शिकू आपण पेशंटकडनंच." तिच्यात ज्ञानाचा, डिग्रीचा कसलाही अहंकार नव्हता. 'आय नो एव्हरीथिंग' ही बहुतेक उच्चशिक्षितांची वृत्ती तिच्यात औषधालाही नव्हती. कुणाकडनं शिकायचं, तर पेशंटकडनं? त्या दारूड्या, गर्दुल्ल्यांकडनं?

पण सुनंदा खरेच त्यांच्याकडून शिकत गेली. ती विचारायची पेशंटला की, तुझ्यासाठी काय झालं तर तू बरा होशील? नेहमी पेशंटपासूनच ती विचार करायला सुरूवात करायची. त्यामुळे पेशंट तिच्याशी जोडलेच जायचे. आणि हे पेशंटकडून शिकणं आमचं आजतागायत चालू आहे. हजारो पेशंट पाहिलेत तरी. अशी ही सुनंदा!

केंद्र काढायची कल्पना पुलं-सुनीताबाईंनी लगेच उचलून धरली. सुनंदा त्यावेळी मेंटलमध्ये सिनियर सायकियाट्रिस्ट होती. तिचे अधीक्षक डॉ. इकबाल हजच्या यात्रेसाठी सहा महिन्यांच्या रजेवर गेले होते. तेव्हा त्यांचा चार्ज सुनंदाकडे असायचा. (सुनंदाला अधीक्षक होण्याबद्दल अनेकदा विचारले होते; पण तिला क्लिनिकल कामांची आवड असल्याने तिने नकार दिला होता.) अलीकडच्या काळात दोन मोठ्या इमारती 'मेंटल'च्या आवारात बांधल्या गेल्या होत्या. एकीकडे सर्व ऑफिसेस हलली, पण दुसरी तशीच काही वर्षे रिकामी पडून होती. तळमजल्यावर काही पेशंट होते. ते पण सुनंदाने दुसरीकडे हलवले आणि या कामासाठी या इमारतीची सरकारकडे मागणी केली. सरकारने मेंटल हॉस्पिटलच्या आवारात मेंटल हॉस्पिटलतर्फे हे केंद्र चालवावे, अशी त्या प्रयत्नांची दिशा होती. सरकार त्यावेळी आर्थिक अडचणीत असावे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी झिरो बजेट मांडले होते. म्हणजे नेहमीचा खर्च चालू राहणार; पण नव्या योजना, उपक्रम यांवर जशी बंदीच. कुठेही काहीही प्रयत्न करायचा, तर मंत्रालयातल्या अधिकार्‍यांचा परवलीचा शब्द होता, झीरो बजेट. म्हणजे पुढे रस्ता बंद. अशा परिस्थितीत सरकारकडनं नकार अपेक्षित होता. पण पुलंचं नाव, सुनंदाच्या डॉ. संभाजी देशमुख ह्या सहकार्‍याने मुंबईला जाऊन केलेले निकराचे प्रयत्न यांमुळे त्या खडकाला हळूहळू चिरा पडू लागल्या. संभाजी हा अत्यंत सरळमार्गी, सालस, शांत डॉक्टर. बाकी सगळे पांगले तरी हा तिच्या मागे ठाम उभा होता. आता तोही जगात नाही. मग सरकारने असा तडजोडीचा मसुदा पाठवला की, जागा वापरा, पण नोकरवर्ग तुमचा. त्यांचा पगारही तुम्ही करायचा. त्यांनी नंतरही सरकारी नोकरीवर हक्क सांगता कामा नये, वगैरे वगैरे.

परत प्रश्न आला : पुलंची देणगी स्वीकारायला आमची संस्था कुठेय? ते कोणाला पैसे देणार? आणि तिथे पैसे खर्च कोण करणार? पुलंचे 'पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान' होते. पण त्यांचे काम म्हणजे योग्य त्या संस्थेला मदत करायची आणि नामानिराळे व्हायचे. देणगी देताना ते खूप कसोशीने माहिती घेत, पण नंतर त्यांची अजिबात ढवळाढवळ नसे. ही त्यांनी घालून ठेवलेली मर्यादा योग्यच होती. हा एक चांगला, हितचिंतकाचा रोल होता. पण आमच्या बाबतीत ते जरा जास्तच गुंतले होते. सुनीताबाई म्हणाल्या,"तुम्ही संस्था स्थापन करण्याची प्रोसेस सुरू करा. तोपर्यंत तुम्ही नेमाल त्या माणसांचे पगार, इतर व्यवहार आमच्या ट्रस्टतर्फे करू."

हे ऐकून मी चकितच झालो. त्यांच्या संस्थेच्या मार्फत? किती कटकट होईल त्यांच्या डोक्याला! पण त्यांनी पत्करले. पुढे मुक्तांगणचा सेवकवर्ग वाढत गेला. त्यांचे पगाराचे चेक पु.ल. देशपांडे फाउंडेशनमार्फत दिले जायचे. ती नावे, त्या रकमा लिहून सुनीताबाई तयार ठेवायच्या. मग त्या दोघांच्या सह्या व्हायच्या. दर महिन्याला हा सोपस्कार.

सुनंदाने ती बिल्डिंग साफ करून घेतली. मी अ‍ॅल्युमिनियमची जाड, पिवळ्या रंगाची मुक्तांगणची अक्षरे करून लावून घेतली. संडास, ड्रेनेज लाईन्स ... सगळेच साफ करून घ्यावे लागले. सुनंदाला मेंटलमधला कर्मचारीवर्ग फार मानत असे. इलेक्ट्रिशियनने सडलेले वायरींग काढून नवे बसवले. काही कर्मचारी आले आणि त्यांनी जमेल तिथे, जमेल तसा सरकारी रंग लावून टाकला. फरशा इतक्या काळ्या झाल्या होत्या की, त्यांनी अ‍ॅसिड टाकून धुतल्या तेव्हा त्यांचा मूळ रंग हळूहळू दिसू लागला. तिच्या आवडत्या नर्सेस तिने इकडे घेतल्या. त्यांनी औषधांची खोली सजवली, तपासणीची खोली तयार केली. सुनंदाच्या ऑफिसवर हॉस्पिटलच्या पेंटरने पाटी करून लावली. हे सगळे कर्मचारी इतर डॉक्टरांच्या, अधिकार्‍यांच्या मते 'नाठाळ' होते, पण सुनंदाच्या हाताखाली कसे ते धावून धावून काम करीत.

सुनंदाला मेंटलमधला गेल्या पंधरा वर्षांचा अनुभव होता. जसा पेशंटबाबतचा क्लिनिकल अनुभव होता, तसाच तिला 'अ‍ॅडमिनिस्ट्रेशन'चाही अनुभव होता. तिने पेशंट आल्या आल्या नोंदवतात त्या रजिस्टरपासून ते केसपेपरपर्यंत, औषधांचे स्टॉक रजिस्टर, रोज किती गोळ्या कुणाकुणाला दिल्या याची हिशोबवही, मेंटलमधून किती कॉट-गाद्या-चादरी-फर्निचर आणले त्याचे डेड स्टॉक रजिस्टर...अशी बहुविध तयारी केली. सरकारी यंत्रणेला आपण किती गलथान समजत असलो, तरी प्रत्येक गोळीचा, प्रत्येक उशीच्या अभ्र्याचाही हिशोब ठेवणारी ती एक अजब यंत्रणा आहे, हे या निमित्ताने समजले. त्यात गैरव्यवहार करणारे असोत, हलगर्जीपणा करणारे असोत; पण त्या सिस्टीमला मला दाद द्यावीच लागली.

पुलंकडे त्या काळात जवळपास रोज बैठका होत. या केंद्राला नाव काय द्यायचे? सुनीताबाईंची सूचना होती की, 'तुमच्या मनात दुसरे काही नाव नसले, तर आम्ही ज्या उपक्रमांना देणगी दिली तिथे मुक्तांगण हे नाव सुचवतो. भाईंचं ते आवडतं नाव आहे.' आम्ही लगेच ते उचलून धरले. मग पुलं म्हणाले, "'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र' असं नाव दिलं तर?" वा: वा: म्हणून ते नाव नक्की झाले. ]

सर्व तयारी झाल्यावर उद्घाटनाचा दिवस ठरवला, २९ ऑगस्ट १९८६. डॉ. ह.वि. सरदेसाईंच्या हस्ते उद्घाटन करायचे ठरवले. पुलंच्या नावामुळे, फोनमुळे सगळेजण होकारच देत. बाबा आमटे त्या दिवशी पुण्यात होते. ते तर आपण होऊन या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले. असा पाहुणा प्रयत्न करूनही मिळाला नसता, तो आम्हांला आपोआप मिळाला!

या सगळ्या गडबडीत मी मात्र आतून जरा हादरलोच होतो. माझी मूलभूत शंका अशी की, आपल्या या केंद्रात कोण येणार? त्यांनी, म्हणजे अशा व्यसनी माणसांनी आपल्याकडे का यावे? एक तर अशी किती माणसे व्यसने सोडायला तयार होतील? आनंदकडे असा उपक्रम पाहिला होता. पण तो मुंबईच्या के.ई.एम.सारख्या मोठ्या, जुन्या हॉस्पिटलचा भाग होता. त्यातही त्यांना सायकियाट्री वॉर्डमधली जेमतेम साताठ बेड्स दिलेली. मुंबईत माहिती घेताना बर्‍याच जणांकडून कळले की, जे. जे. हॉस्पिटलने असे केंद्र सुरु केले आहे. ठाणे मेंटलमध्येही अशा केंद्राचे उद्घाटन सुनील दत्त यांच्या हस्ते झाले. पण ही दोन्ही केंद्रे बंद पडली. जे. जे.मध्ये दारु सोडण्यासाठी दाखल झालेल्या पेशंटना तिथले वॉर्डबॉईजच दारू पुरवायचे. कुठल्या मार्गाने? तर शहाळ्यात दारू भरून आणून द्यायचे आणि पेशंट डॉक्टरसमोर स्ट्रॉने दारू पीत असत! ठाण्यालासुद्धा असले घोटाळे झाले. जे ऐकत होतो त्यावरुन निष्कर्ष एकच होता, या क्षेत्रातल्या संस्थांचा मृत्युदर फार म्हणजे फारच मोठा आहे. थोडक्यात, जगलेलं पोर समोर कोणी दिसतच नव्हतं. बंद पडण्याचं उघड कारण म्हणजे पेशंट अ‍ॅडमिट असताना त्याला दारू किंवा ड्रग्ज मिळणे हे. जी केंद्रे बंद पडली ती सरकारी हॉस्पिटलमध्ये होती. तिथल्या स्टाफविषयी कोण गॅरंटी घेणार? त्यांच्यातच व्यसन इतके बोकाळलेले की, दारूच्या बदल्यात कुठलेही काम करायला बरेचजण तयार.

मग इथे तरी काय होतं? मेंटलचा स्टाफ काही वेगळा नव्हता. तो याच भ्रष्ट समाजाचा भाग होता. मग कसं चालणार, कसं टिकणार हे केंद्र? आपल्या यंत्रणेतला एक माणूस जरी अप्रामाणिक असेल तर सगळा प्रोग्रॅम कोसळतोच. इथे 'ऑल ऑर नन लॉ' असतो. इथे एक तर संस्था चांगली चालेल, नाही तर पूर्ण बंद पडेल. मधली अवस्था नाही. सुनंदाने घाट घातलाय खरा, पण ती यातून कशी वाट काढणार? मी तिचा निष्ठावंत सहायक. जरी केंद्राची सुरुवात व्हायला माझे लिखाण कारणीभूत झालेले असले, तरी हे केंद्र म्हणजे पूर्णपणे तिचेच अपत्य होते. तोपर्यंत मी अनेक प्रश्नांवर लिहिले होते, पण त्या प्रश्नांसाठी कुठल्या कामात मी कधी स्वतःला गुंतवून घेतले नाही. यावर काहीजण टीकाही करीत. मी त्यांना सांगायचो, तो माझा स्वभाव नाही. पण इथे माझ्या लिखाणानंतर सुनंदामुळे मी या कामातही गुंतत गेलो. यापूर्वी मी युक्रांदमध्ये होतो. बाबा आढावांबरोबर महात्मा फुले प्रतिष्ठानमध्ये होतो. पण तिथे इतर अनेकजण होते, त्यांतला मी एक होतो. तिथेही मी फार गुंतायचो नाही. आंदोलनात इतरांबरोबर भाग घ्यायचो. तुरुंगवासही पत्करायचो. पण लोक म्हणायचे तसे एका जागी जेठा मारुन बसून काम केलेल नव्हते. आणि इथे तर सुनंदामुळे ते सगळे करणे भागच होते. पण तेवढ्यातही माझा असा हिशोब होता की, सुरुवातीला माझी मदत लागेल, पुढे मला त्यातून बाहेर पडता येईल. त्या काळात आमच्या कुठल्याशा वाढदिवसाला मी सिंहगडावर सुनंदाला एक 'प्रेझेंट' दिले. म्हणालो, "चल, तुझ्या या कामाला माझी दोन वर्षे देतो. या काळात मी माझे असे काही काम करणार नाही. तुला सर्व कामांना उपलब्ध राहीन." ती दोन वर्षे कधीच संपली. त्यानंतर तेवीस वर्षे लोटलीत. मला अजून त्यातून बाहेर पडता आले नाही.

कार्यक्रमाच्या दिवशी 'सकाळ'मध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला. 'मुक्तांगण'च्या इमारतीच्या फोटोसह. त्यात असे असे केंद्र सुरु होणार आहे, वगैरे काही लिहिले असावे. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची माहितीही दिली असावी. माझ्या मते शहरापासून इतक्या लांब या सभेला कितीसे लोक जमतील? पण तिथेही धक्काच. आमच्या मेंटलचा 'रिक्रिएशन हॉल' भरूनच गेला. बाबा आमटे स्टेजकडे तोंड करुन एका खाटेवर पहुडले होते. सस्मित नजरेने कार्यक्रम पाहत, ऐकत होते. आनंदचे सुरेख सभा नियोजन आठवते. सभेत कोण काय बोललं ते आठवत नाही, पण सुनंदा अतिथय नेटके आणि छान बोलली. ती कधी सभांमध्ये भाषण करीत नसे. तसा तो भाग माझ्यावर सोपवलेला असे. पुढे मुक्तांगणची वाढ झाल्यावर तिने स्टेजवर जाणे सोडलेच. आमच्या संस्थेच्या वाढदिवस कार्यक्रमात, किंवा २६ जूनच्या आंतरराष्ट्रीय दिवसाच्या कार्यक्रमात ती मलाच स्टेजवर बसायला भाग पाडायची, आणि मला ती वरुन समोर प्रेक्षकांमध्ये - म्हणजे आमचे पेशंट, त्यांच्या बायकांमध्ये बसलेली दिसायची. त्या पहिल्या कार्यक्रमात मात्र ती छान बोलली. बहुधा खादीचा गुरुशर्ट, सलवार आणि वर जाकीट घातलेलं असावं. पण नक्की आठवत नाही. या स्मृतीची गंमत बघा... त्या आधीचे, नंतरचे प्रसंग मला जसेच्या तसे आठवतात, पण टेपचा तेवढाच भाग खराब व्हावा? नंतर दुसर्‍या दिवशी पुलंचे मित्र नंदा नारळकर यांनी पुलंना म्हटलेलं लख्ख आठवतंय की, ’काय ती मुलगी छान बोलली! केवढा आत्मविश्वास होता तिच्या बोलण्यात’

मला मात्र कार्यक्रमाच्या बाहेरचं एक दृश्य चांगलं आठवतंय. हा रिक्रिएशन हॉल मेंटलच्या खूप आत आत आहे. पण गेटच्या जवळ, मुक्तांगणच्या दारात कोणी महिला आल्याचे कळल्यावरून मी तिकडे गेलो. त्या चार-पाच महिला म्हणजे एका शाळेतल्या शिक्षिका होत्या. त्यांनी ’सकाळ’मधला माझा लेख वाचला होता. त्यांच्याबरोबर मळकट कपड्यांतला, दाढी वाढलेला त्यांच्या शाळेतला शिपाई होता. एक शिक्षिका म्हणाल्या, "याला दारूचं व्यसन आहे. याला अ‍ॅडमिट करायला आणलंय." तो शिपाई मान खाली घालून गप्प उभा. त्या सकाळी तो शाळेत आला, तेव्हा या शिक्षिकांनी त्याला सांगितलं, "असं असं केंद्र निघालंय पुण्यात. चल, तुला आत्ताच तिथं अ‍ॅडमिट करू." तो ’नाही’ म्हणू लागला. ’घरी सांगितलं नाही’, म्हणाला. तसं या शिक्षिका म्हणाल्या, "आम्ही सांगू तुझ्या घरी जाऊन." नाइलाज झाल्याने तो आला यांच्याबरोबर.

त्याचं नाव महादेव घारे. कार्यक्रम संपवून सुनंदा मुक्तांगणमध्ये आल्यावर तिनं त्याला अ‍ॅडमिट केलं. तो आमचा पहिला पेशंट. शकुनावर सुनंदाचा विश्वास नव्हता, तरी ती गमतीने म्हणे, "हा महादेव म्हणजे माझा शकुनाचा पेशंट आहे!" कारण तो खरोखरीच फार शहाणा पेशंट आहे. तो सुनंदा असेपर्यंत सोबर (व्यसनमुक्त) होताच, पण आजतागायत गेली चोवीस वर्षे तो सोबर आहे. (या सोबर शब्दाची गंमत सांगतो. ए.ए.कडून मिळालेला, या क्षेत्रात रूढ असलेला हा शब्द. मी त्याला आपल्या संस्कृतीतला जवळचा शब्द शोधत होतो, तर काय, साईबाबांचा ’सबुरी’ हा शब्द सापडला. वा:वा:! सबुरी म्हणजे संयम. पिण्याची इच्छा झाली तरी संयम पाळायचा, सबुरी धरायची, म्हणजे तुम्ही सोबर राहता!) इतर अनेकांना दारू सोडल्यावरही दारूची तीव्र तलफ (याला ’आमच्यात’ ऑब्सेशन म्हणतात) येते. मग ते परत दारूकडे, व्यसनाकडे ओढले जातात. तसे महादेवला एकदाही ऑब्सेशन आले नाही की परत तो दारूकडे वळला नाही.

प्रत्येक क्षेत्राची एक परिभाषा असते, तशीच या क्षेत्रातही आहे. व्यसनमुक्त राहिल्यावर कधी तरी एकदा दारू प्याली तर ती ’स्लिप’ होते, म्हणजे पाऊल घसरते. तेव्हा लगेच कुणाची मदत घेतली, तर तो व्यसन टाळू शकतो. पण परत परत पीत राहिला तर मग तो ’रिलॅप्स’ झाला! म्हणजे ते परत पूर्वीसारखे चोवीस तास पिण्याचे चक्र सुरू झाले. मग त्याला परत अ‍ॅडमिटच व्हावे लागते. म्हणजे एकदा पाऊल घसरले तर आधार घेऊन परत उभे राहता येते, पण दलदलीत फसला आणि तिथं खेळतच बसला तर त्याला बाहेर काढून आंघोळच घालावी लागते. महादेवची कधी स्लिप झाली नाही तर रिलॅप्स कुठून होणार? एरवी संकट आले, टेन्शन आले, नैराश्य आले की पेशंट स्लिप होतात, रिलॅप्स होतात. मग महादेववर संकटे आलीच नाहीत का? आली तर. मोठीच संकटे. दत्तवाडीत एका झोपडीत तो अनेक वर्षे राहत होता. तरीही कॉर्पोरेशनने त्याची झोपडी तोडली आणि त्याचा छोटा संसार त्यांनी अक्षरश: रस्त्यावर फेकला. तरीही महादेव व्यसनाकडे वळला नाही. नंतर त्याचा जावई अकाली निधन पावला, तरीही तो स्थिर राहिला हे विशेष. पायजमा-शर्ट-डोक्यावर पांढरी टोपी, असा त्याचा नेहमीचा वेश. त्याची बायकोही नऊवारीमधली, डोक्याला मोठं कुंकू लावलेली मराठमोळी स्त्री होती. पती-पत्नींच्या सहजीवन मीटिंगला ते दोघंही येतात. असा हा सुनंदाचा शकुनाचा पेशंट! मुक्तांगणला दहा वर्षे पूर्ण झाली, तेव्हा साहजिकच मोठा कार्यक्रम करायचा, असे आमच्यातल्या काहींच्या मनात होते. प्रमुख पाहुणा म्हणून मंत्री किंवा उद्योगपती बोलावू, त्यानिमित्त स्मरणिका काढून ’फंड रेजिंग’ करू... असे बोलणे चालू असतानाच सुनंदा म्हणाली, "तसलं काही नको. या कार्यक्रमात प्रमुख व्यक्ती म्हणून दीपप्रज्ज्वलन आपला महादेव करेल." आणि तसेच आम्ही केले. दशवार्षिक उत्सवाला आमच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे महादेव घारे. त्याच्याइतकी योग्य व्यक्ती कुणी असू शकेल काय? तो दोन वाक्येही बोलला नाही, तरीही?

पुलं - सुनीताबाईंनी तेव्हा आमच्यावर धरलेली छत्री नंतरही बराच काळ तशीच धरून ठेवली होती. या छत्रीचे वैशिष्ट्य असे की, त्यातून मायेच्या, प्रेमाच्या धारा थेट आमच्यावर पडत असत. नंतर सरकारने हे केंद्र ’टेक-ओव्हर’ करावे, म्हणजेच याचा सर्व खर्च सरकारने अंगावर घ्यावा, असा आमचा प्रयत्न चालला होता; पण त्याला यश येत नव्हते. कारण सरकारचे ’झीरो बजेट’. (त्यात मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण असावेत. पुलंना ते ओळखत होते की नाही याची शंका.) दर महिन्याला दहा-पंधराजणांच्या पगाराचे चेक्स सुनीताबाई सुनंदाने दिलेल्या यादीप्रमाणे लिहून तयार ठेवत. मग पुलं त्यावर सह्या करीत बसत. त्यांना हा त्रास द्यावा लागतो याचे वाईट वाटे; पण करणार काय? अखेरीस त्यांनी दिलेली एक लाखाची देणगी संपत आली. आम्ही चिंताग्रस्त झालो. पण पुलंनी सांगितले, "जिवात जीव असेतोवर हे केंद्र मी बंद पडू देणार नाही. तुम्ही निर्धास्तपणे काम करा." काय या शब्दांनी आधार वाटला असेल आमच्या सगळ्या टीमला! तरीही मी प्रयत्न करीत राहिलो. आणि केंद्र सरकारची आम्हाला ग्रँट मिळाली. ती आनंदाची बातमी सांगायला पुलंकडे गेलो. तोवर त्यांनी आणखी सुमारे अडीच लाख रुपये दिलेले होते. तरीही ते म्हणाले, "मला आता जाता जाता मुक्तांगणसाठी काही तरी द्यायचेय, काय देऊ?" सुनंदाने सांगितले, "मुलांना मोकळ्या वेळेत वाचनाची आवड लावायचीय." पुलं म्हणाले, "लायब्ररीची कपाटं मी देतो." शेजारी बसलेल्या नंदा नारळकरांनी पुस्तकखरेदीसाठी पाच हजार रुपये दिले. कपाटाचं बिल पस्तीस हजार रुपये झालं, ते पुलं-सुनीताबाईंनी दिलं.

तरीही ऋणानुबंध राहिलेच.

२९ ऑगस्टच्या वर्धापनदिनाला ते आवर्जून यायचे. पेशंट मित्रांचे, कुटुंबियांचे अनुभव ऐकताना ते गलबलून जायचे. एका पेशंटची मुलगी बोलताना तर त्यांचे डोळे डबडबले होते. परत येताना गाडीत म्हणत होते, "त्या पोरांनी काय पाप केलंय रे, त्यांना असं लहानपण मिळावं?" एका पेशंटचे सासरे सभेत उठून म्हणाले, "पुलं स्वत: पद्मश्री आहेत. त्यांनी आमच्या मॅडमना पद्मश्री मिळवून द्यावी." त्यावर पुलं म्हणाले, "हजारो माणसांनी तिला आई मानलंय. आईपेक्षा जगात कोणती पदवी मोठी आहे?" असे काही क्षण.

***

मुक्तांगणची गोष्ट

लेखक - डॉ. अनिल अवचट
समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या - १७७
किंमत - रुपये २००

***

टंकलेखन साहाय्य - साजिरा, चिंगी, अनीशा, श्रद्धा, मंजूडी, अश्विनी के

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती,
मध्यंतरी भाविका ने आपल्या पतीच्या दारुची समस्या मांडली होती.... हे पुस्तक भाविकाने वाचावे..... मी वाचणारच आहे.

या लेखाबद्दल अभिनंदन आणि आभार.:)

हृद्य आणि प्रेरणादायी. टीमचे खूप खूप आभार.

'आधी मी व्यसनी आहे हे मान्य करणे. ही आधीची पायरी. ''- बहुतेक सगळीकडेच हे लागू पडते. प्रॉब्लेम आहे हे मान्य केले तरच पुढच्या पायर्‍या सापडतात.

भाविका,
मायबोलीच्या खरेदी विभागात एक दोन दिवसांत हे पुस्तक उपलब्ध होईल. खरेदी विभागात इतर प्रकाशनांची व लेखकांची पुस्तकं आपल्याला विकत मिळतील.
कृपया http://kharedi.maayboli.com/shop/home.php हा दुवा बघा.

उत्तम व दर्जेदार नेहमी प्रमाणेच. माझा वाहनचालक दारू पिऊन स्वतःला त्रास करून घेतो तेव्हा मला ह्या मुक्तांगण ची खूप आठवण येते. सुनंदाताई, सुनीताताई व पुलं यांच्या बद्दल आम्ही काय बोलावे. थोर माणसे.
पुलंच्या सहीचा पगाराचा चेक मिळता तर तो मी अगदी फ्रेम करून ठेवला असता.

चिनुक्स,
अतिशय उत्तम आणि दर्जेदार. पुस्तक वाचण आणि ते दुसर्‍याला वाचायला भाग पाडण ही कला तुम्हाला खुप चांगली जमलिये, साधलिये. तुमच परिक्षण वाचुनच पुस्तक वाचायचा मोह झाला. बाकी सुनंदाताई, सुनिताताई आणि पुल या थोर व्यक्तिमत्वांबद्दल जेवढ बोलाव तेवढं कमीच.

'गर्द' वाचले होतेच. तसेच अवचटांच्या इतरही पुस्तकांतून ह्याबाबत वाचले आहे. मध्ये एकदा एक पीडीएफ रुपात 'सुनंदाच्या आठवणी' की असेच काहीसे आले होते. तेसुद्धा वाचनीय होते. त्यात मला वाटते डॉ. आनंद नाडकर्ण्यांचादेखील लेख होता.

मुक्तांगणने किती संसार सावरले असतील, किती आयुष्ये बरबाद होण्यापासून वाचवली असतील ह्याची गणतीच नाही. त्याबद्दल अवचट दांपत्याचे (आणि आता त्यांची एक मुलगीदेखील) ऋण फार मोठे आहे.

पुलंनी महाराष्ट्रात गावोगावी निर्माण केलेली मुक्तांगणेदेखील तितकीच महत्वाची. अगदी मिरजेतसुद्धा वसंत व्याख्यानमाला ते निरनिराळी माहितीपर प्रदर्शने भरवण्यासाठी हक्काची जागा म्हणजे 'मुक्तांगण' सभागृह. देणगी देण्याआधी कसोशीने चौकशी व दिल्यावर मात्र संपूर्ण बाजूला राहणे हे वाचून अधिक विशेष वाटले. स्वतःच्या खिशातून कुणाला १ रुपया दिला तरी त्याचे त्याने काय केले ही उत्सुकता/भोचकपणा माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटत राहतो. भल्या थोरल्या रकमा दान दिल्यानंतर अलिप्त होणे हे महानच.

अरे, माबोवर सध्या अवचटांवर टीका करण्याचा मोसम आहे ना? त्यात हे असे लिखाण? ये बात कुछ हजम नही हुइ Uhoh

चिनूक्स, तु करून दिलेल्या पुस्तकांच्या ओळखीपैकी मला सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक म्हणजे बाईकवरचं बिर्‍हाड- अजित हरिसिंघानी. "मुक्तांगणची गोष्ट्"ची ओळखही सुरेखच केली आहेस. लवकरच ते पुस्तक मिळवून वाचेल. धन्स चिनूक्स. जमल्यास कॉर्पोरेट विषयावरच्या पुस्तकाची पण ओळख करून देत जा.

फारच छान लेख... हा लेख लिहिल्याबद्दल व पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल खुप आभार...

.

हा विषय इथे मान्डला ते खूप चान्गले झाले Happy पुस्तक मिळवुन वाचायला हवे.

तिन वर्षान्पूर्वीच, पुण्यातील मुक्तान्गणच्या ओपीडीचा उपयोग मी करुन घेतला आहे, खूप छान अनुभव होता.
मात्र मुक्तान्गणपर्यन्त पोचणे, हा माझ्याकरता तरी, केवळ अपघाती योगायोग वा ठरवुन केलेली कृती नसून "कुठल्या त्या तस्ल्या बाबामहाराजान्चीच कृपा" होती हे देखिल निश्चित.
त्याच दरम्यान हे देखिल जाणवत गेले की मुक्तान्गणच्या प्रशासनास "बाह्य जगातील व्यवहारी किड" इथे लागू नये म्हणून अतिशय दक्ष रहावे लागेल.

अर्थात, व्यसनी माणसाची मते तितकिशी कुणीच गम्भिरपणे घेत नसल्याने लिम्बी सोडून दुसर्‍या कुणाबरोबर मी ती मान्डली देखिल नाहीत. मुक्तान्गणसारख्या अत्यन्त महत्वाच्या प्रकल्पाचा विषय इथे निघाला म्हणून लिहीले, इतकेच.

चिनुक्स, एकसेएक सुंदर पुस्तकांचा अभिनव पद्धतीने परिचय करुन देण्याच्या कल्पनेबद्दल तुझे आणि ती कल्पना प्रत्यक्षात यावी म्हणून टंकलेखन सहाय्य करणार्‍या सर्वांचे कौतुक आणि आभार... संपूच नये हा लेख असं वाटत होतं...
अनिल अवचटांच्या लिखाणावरील चर्चा दुसर्‍या एका धाग्यावर वाचली होती. ती वाचून वाईट वाटत होतं. अनिल अवचटांना मी प्रत्यक्ष ओळखते. प्रसन्न व्यक्तिमत्वाचा दिलदार माणूस आहे तो... तीच गोष्ट डॉ. आनंद नाडकर्णींची... कसे भारावून जाऊन, सर्वस्व ओतून हे लोक काम करतात... ह्या लोकांकडून खुप काही शिकण्यासारखं आहे...
सुनंदाताईंचं तर कौतुक करावं तेवढं थोडंच... त्या गेल्या, त्या काळात त्यांच्यावरचे सगळे लेख वेड्यासारखे वाचून काढले होते... अनिल आणि सुनंदा ह्यांनी आपल्या लेकींना म्युन्सिपालटीच्या शाळेत घातले होते, हे वाचल्याचे अंधुक आठवतेय. एकदा त्यांच्या मुलीला शाळेत जायचा कंटाळा आला, तेंव्हा अनिलकाका म्हणाले, ठिक आहे, नको जाऊस... माझ्याबरोबर माझ्या कामांना ये. लेक पण खुशीत... तब्बल चार दिवस शा़ळेला दांडी मारली, तरी कोणीच काही म्हणाले नाही. एकदा रस्त्यावर तिला तिच्या मैत्रीणी दिसल्या आणि तिला एकदम शाळेच्या आठवणींनी उचंबळून आले आणि ती शाळेत परत जायला लागली, कुठल्याही दबावाशिवाय...स्वखुशीने!!!
हा प्रसंग अनिल अवचटांचा एक फार मोठा पैलू उलगडतो... व्यसनाधीन, वाया गेलेल्या लोकांना मार्गावर आणण्यासाठी हे जोडपे अगदी योग्य आहे. मुलांशी कसे वागावे, याची त्यांना नैसर्गिकच जाण आहे, नव्हे तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भागच आहे... Happy

मुक्तांगणविषयी सगळं माहिती होतं, पण पु.ल. आणि सुनिता देशपांडेंनी यासाठी दिलेल्या योगदानाविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ होते. दोघेही आधीपासूनच आवडते होते, एक लेखक म्हणून... आता एक माणूस म्हणून त्यांच्याविषयीचा आदर वाटतो आहे. महान माणसं... त्यांना माझा सलाम!

पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत...

गेल्याच आठवड्यात हे पुस्तक वाचून झाले. मनापासून आवडले.
याच धर्तीवर आनन्द नाडकर्णीनी IPH वर लिहिले आहे. पण हे बेटर.

धन्यवाद चिनुक्स Happy

इथे वाचून हे पुस्तक वाचण्याची उर्मी वाढली आणि पुस्तक माझ्या संग्रही जमा झाले.

टिपः माझे वाचून झालेय. घरातील मंडळींचे नंबर लागलेले आहेत. त्यानंतर कोणाला वाचायला हवे असल्यास जरुर मिळेल. अट एकच जसे नेले तसे परत करणे Wink