'तुंग किल्ला' (कठीणगड)

Submitted by Yo.Rocks on 28 November, 2010 - 04:46

कधी कधी नकळत अचानक ट्रेक केला जातो.. नि तो यशस्वी झाला तर मिळणारे समाधान, आनंद मोलाचा असतो.. गेल्या रविवारी असेच काही घडले..
शनिवारी रात्री शिर्डी पॅसेंजरने लोण्यावळ्याला जात होतो तोच पक्क्याचा समस आला.. स्टार माझा ब्लॉग मध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याबद्दल.. त्याला अभिनंदन केले नि कळवले 'तुंग' ला जातोय.. नंतर बोलू'... यावर त्याचा प्रतिसमस.."आयला, तुंग ?? कोणकोण जात आहेत?"...
म्हटले आता ह्याच्यासकट अनेक माबोकरांच्या शिव्या खाव्या लागणार.. आपण कधीतर एकत्र इथे जायचे असे ठरले होते.. पण माझे अचानक ठरले..
शनिवारपर्यंत तिकोना वा कोरीगड रात्रीचा करुन येण्याचे मनात होते.. त्यात मायबोलीकरीण मैत्रीण 'रुपाली'नेदेखील तिच्या मैत्रिणीसमवेत लोणावळ्याजवळपास गडावर जाउन येण्याची इच्छा व्यक्त केली होती.. त्यामुळे रात्री न जाता दिवसा करायचे ठरवले.. पण माझे नक्की असे काहीच नव्हते.. कारण मुंबईहून मला कंपनी नव्हती.. दोघातिघांनाच कळवले तर प्रत्येकाने कंफर्मच असे काही सांगितले नाही..शेवटी कुणाला अजून न विचारता इकडून एकटेच जावे लागेल म्हणत शनिवारी सकाळीच प्लॅन रद्द केला.. मुडही गेला होता.. सो रुपालीला तसे दुपारी कळवणारही होतो...पण शनिवारी दुपारनंतर माझा ट्रेक मेट 'शिव' चा फोन आला.. "'तुंगला जाउन येवुया का"'.. बस्स... Proud त्याच्याशी डन झाले नि तोच मायबोलीकर 'नविन'चा फोन.. ''जायचे कुठे पक्के आहे का.. मी पण येतो.. सोबत माझा एक चुलतभाऊ नि एक मित्र येइल" झाले.. कधी, कुठे, कसे निघायचे' अशा गोष्टींना वेग आला नि संध्याकाळपर्यंत सगळे ठरले.. ग्रुप शक्य तितका छोटा ठेवत ट्रेक करण्याचे ठरले.. ठिकाण बदलले तिकोना ऐवजी तुंग !! रात्री दोनपर्यंत लोणावळा स्टेशन गाठायचे नि मग तिथेच पुण्याहून मैत्रीण येइपर्यंत पहाटे सहा वाजेपर्यंत झोप काढायची..नि सकाळी तुंगसाठी निघायचे..

पण लोणावळा एक तासाच्या अंतरावर राहिले तोच 'रुपाली'चा फोन.. काही प्रॉब्लेम झाल्यामुळे तीचे येण्याचे कॅन्सल.. ! "सॉरी, माझ्यामुळे तुला नाईट ट्रेक पण नाही करता आला.." असे तिचे म्हणणे होते.. पण जिथे प्रॉब्लेम महत्त्वाचे आहेत तिथे दुर्लक्ष करुन ट्रेकला येणे म्हणजे चुकीचे.. "सो नो वरी.. पुन्हा केव्हातरी" म्हणत फोन ठेवला.. शिवला तसे सांगितले नि आता लोणावळा स्टेशनवर उगीच थांबण्यापेक्षा नाईट ट्रेक मारायचा का असे विचारले... Proud शिवने 'टॉर्च घेतलीय बरोबर' म्हणत दुजारा दिला.. नविन तर नेहमीच फॉर्ममध्ये असतो.. मग काय लगेच प्लॅनमध्ये बदल.. Proud

टॉर्च एकच होती.. पण रात्र देखील त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशीची होती.. तेव्हा आकाशात असणार्‍या पुर्ण चंद्ररुपी टॉर्चची मदत घेवून पुढे जाण्याचे ठरवले.. लोणावळ्याला रात्री दोनच्या आसपास पोहोचताच एसटी स्टँड गाठले.. भांबुर्डे वा आंबवणे गावी जाणार्‍या पहिल्या एसटीची चौकशी केली.. पण सकाळी ९ च्या अगोदर एसटी उपलब्ध नव्हती.. मग लगेच तिथे जवळील दुकानात जीपची काही सोय आहे का विचारुन घेतले.. तेव्हा कळले की लोणावळा स्टेशनच्या पलिकडे जाउन तिथेच जवळ एक गार्डन लागते त्या रस्त्यावर पहाटे चारनंतर जीप वा लिफ्ट मिळू शकते.. आम्ही लागलीच मोर्चा तिथे वळवला.. !

त्या ठिकाणी पोहोचलो नि रस्त्याच्या एका बाजूस विश्रांतीसाठी बसलो.. रस्ता सहारा एम्बेवॅलीकडे जाणारा असल्याने पाचदहा मिनीटांनी गाडी वा बाइक जात होतीच अधुनमधून.. नि आम्ही लिफ्ट मागत होतो.. शिवला अंदाज होता की पहाटे एखाद- दुसरे माल वाहून नेणारे वाहन जरुर मिळेल.. नि तेच घडले.. साडेतीनच्या सुमारास एक छोटा टेंम्पो थांबला.. नशिबाने तो 'घुसळखांब' फाट्यानेच जाणारा होता.. प्रत्येकी चाळीस रु. ची बोली करुन आम्ही आधीच भरुन ठेवलेल्या मालामध्ये (फुलांचे बॉक्स) आमची भरती झाली.. Proud पण ती सफर मस्तच.. आकाशातील चंद्राच्या साक्षीने आमचे तुंगच्या दिशेने पहिले पाउल पडले होते.. चांदण्यात रस्ता न्हाउन गेला होता.. दुरदूरचा परिसर बर्‍यापैंकी उठून दिसत होता.. तेव्हा आपणास चढाई करणे कठीण नाही याची खातरजमा झाली.. याच तुंगला कठीणगड असेही म्हणतात.. उंची अंदाजे ३५०० फूट.. गडाला फारसा इतिहास नाही.. नाव जरी कठीणगड तरी चढण्यास सोप्पा.. हा गड मुळात एका छोट्या डोंगरावरील पठारावर विसावला असल्याने लांबून बघताना तो मात्र अतिशय उंच नि चढण्यास कठीण असा भासतो...

लवकरच आमची गाडी मुख्य रस्त्याला सोडून घुसळखांब फाट्याने डावीकडे वळाली.. आम्हाला ड्रायवरने त्याच्या कंपनीपर्यंतच (फुलझाडांची लागवड करणारी कंपनी ) सोडतो असे सांगितले होते.. जिथून तुंगवाडी (पायथ्याचे गाव) १-२ किमी अंतरावर आहे असे त्याचे म्हणणे होते.. आम्ही त्याला पुढपर्यंत सोडण्यासाठी मस्का लावण्याचा असफल प्रयत्न केला.. तसे म्हणा इथवर सोडतोय ते देखिल खूप होते.. अन्यथा घुसळखांब फाट्यावरुन पायपीट करावी लागली असती.. (अंतर पायी कापण्यास पाउणतास लागतो असे ऐकून होतो) पंधरा मिनीटांतच आम्ही त्याच्या कंपनीपाशी उतरलो.. इथूनच या रस्त्याला धरुन सरळ गेलात की तुंगवाडी लागेल असे ड्रायवरने सांगितले.. नि आमचा खर्‍या अर्थाने नाईट ट्रेक सुरु झाला.. चंद्रप्रकाशात सिमेंटचा रस्ता उठून दिसत होता त्यामुळे अडचण नव्हती.. तर दोन्ही बाजूस झाडींमध्ये मिट्ट काळोख पसरला होता..

आम्ही १-२ किमी अंतर चालून गेलो तोच एक तुंग सदृश डोंगर पुढे उभा दिसला.. आम्हीदेखील तुंग जवळ आला म्हणून उत्सुकतेने चालण्याचा वेग वाढवला.. पण जवळ जाताच गडबड वाटली.. रस्त्याची ही वाट या डोंगराच्या डावीकडून सरळ जात होती नि गावाचा देखिल पत्ता नव्हता.. शिवने नकाशा काढला.. पाहिले तर तुंगवर जाणारा रस्ता डोंगराच्या उजवीकडून जातो.. तोच त्याचे लक्ष दुरवर चांदण्यात उठून दिसणार्‍या सुऴक्याप्रमाणे भासणारा उंच डोंगरावर गेले.. तोच खरा 'तुंग' यावर आमचे एकमत झाले नि या 'डुप्लिकेट तुंग'ला उजवीकडे ठेवून आम्ही त्याच रस्त्याने पुढे गेलो.. चालून बरेच अंतर कापले होते नि त्या ड्रायवरने पण १-२ किमीचे अंतर असल्याचे सांगून आम्हाला चांगलेच गंडवले होते.. आम्ही निर्जन रस्त्याने शांतता अनुभवत मार्गाक्रमण करत होतो.. तर एकीकडे आकाशात कल्लोळ माजला होता.. एका बाजूस दुरवर वीजा चमकत होत्या. मागे वळून पाहिले तर चंद्र मावळण्याची वेळ झाली होती.. त्या डुप्लिकेट तुंगच्या मागे चंद्र मावळतानाचे दृश्य मस्तच वाटत होते..


------------------------

आम्हाला वाटेत एक बाईकने जाणारा गावकरी भेटला.. त्याला विचारले असता कळले की 'अजून वीस पंचविस मिनीटांची वाट आहे.. पायथ्याशी भैरोबाचे मंदीर आहे.. तिथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भजनकिर्तनाचा सप्ताहिक कार्यक्रम सुरु आहे.. जो आज संपणार होता.. ' इति. त्याने माहिती पुरवली नि तो चालू पडला.. आम्ही जसजशे जवळ जाउ लागलो तसा भजनाचा आवाज कानावर पडू लागला.. आकाशात वीजांचा खेळ रंगात आला होता.. तर एकीकडे अंधारात चमकणारे काजवे आम्हाला साद घालत होते... लवकरच मंदीराजवळ पोहोचलो.. नि अंगणाताच आराम करण्यास बसलो.. आत मंदिरामध्ये भजन-किर्तन गाणारे नि ते मंत्रमुग्ध होउन ऐकणारे भक्तजन बसले होते.. तर बाहेरच एका बाजूस काही गावकरी झोपले होते.. त्यांनाच विचारुन आम्ही मग मंदीराच्या मागून हनुमान मंदीराकडे जाणारी पाउलवाट धरली... आता ही वाट गवताची असल्याने नि पायाखालचे नीट दिसत नसल्याने टॉर्चधारी शिवला मी पुढे राहण्यास सांगितले.. नशिब माझे कारण दोन- तीन पावले चाललो तोच शिवने पटकन टरकून मागे उडी घेतली.. वाटेतूनच Krait (मण्यार) नावाचा विषारी साप जात होता.. दिसण्यास तसा छोटा पण रुबाब मात्र आक्रमक होता.. तो क्षणातच झाडीत निघून गेला पण जाता जाता आमच्या आत्मविश्वासाची साफ वाट लावून गेला होता.. 'आता पुढे उजाडेपर्यंत नकोच' असा हट्टाग्रह नविनचा भाउ 'श्याम' नि मित्र 'संदिप' या फ्रेशर्सलोकांनी तर उचलूनच धरला.. मग तिथेच पुढे हनुमान मंदीराजवळ किंचीतसे उजाडेपर्यंत थांबलो नि मार्गी लागलो..

हनुमान मंदीराच्या अलिकडेच एक वाट उजवीकडे डोंगराकडे वळते.. तीच पुढे पायर्‍यापर्यंत जाते.. ही वाट मस्तच वाटली.. सुरवातीला जेमतेम ८-१० पायर्‍या लागतात.. पुढे मात्र अधुनमधून दोन्ही हात वापरुन चढावी लागणारी पण सोप्पीशी वाट.. वरती लवकर पोहोचून सुर्योदय सोहळा बघण्याचा मनसुबा होता.. पण आकाशात ढगांनी केलेले आक्रमण पाहून तो उधाळला गेला.. पाचेक मिनीटातच एक वाट डावीकडे वळते.. तर दुसरी उजवीकडे.. ही उजवीकडची वाट पुढे एका मोठ्या गुहेकडे घेउन जाते जिथे पाण्याच्या टाक्या आढळल्या..

----------------------
ह्या वाटेत मात्र गवतधारी वाट असल्याने थोडी खबरदारी घ्यावी लागली.. इथवर फक्त मी नि नविनच आलो होतो.. तर बाकीचे डावीकडे जाणार्‍या वाटेने पुढे गेले होते..

---------------------

त्या डावीकडे जाणार्‍या वाटेने जाताना एक छोटी गोलाकार गुहा लागते.. इथूनच पाच मिनीटांत आम्ही मुख्य दरवाज्यापाशी आलो तोच थेंब थेंब पाउस सुरू झाला..

----------------------
आकाशात लगेच इंद्रधनुष्य उमटले..

----------------------

दरवाज्यापाशी असणारा बुरुज
-----------------------

(आतल्या बाजूने..)
-----------------------
इथून वरती आलो की मग दोन बुरुजांमधून असणार्‍या छोट्या वाटेने आत दुसरा दरवाजा लागतो..

-------------------

(तिथेच आतल्या बाजूस असलेले मारुति शिल्प (प्राचिन वाटत नाही ! )
---------------------


(प्रवेशद्वार)
-----------------------


(प्रवेशद्वार नि आतल्या बाजुने दोन्ही बाजुस एक अशा देवड्या आहेत..)
------------------------
इथूनच वरती आलो तोपर्यंत तुंगवरदेखील ढगांचे आक्रमण सुरु झाले होते.. अगदी पावसाळ्याच्या सुरवातीस ट्रेक करतोय असा भास होउ लागला.. समोर दुरवर डोंगररांगाचा छान देखावा दिसत होता.. सगळीकडे धुसर तांबडा रंग पसरला होता.. इथेच उजव्या बाजूस छोटे गणेश मंदीर लागते.. नि त्याच्याच मागे पाण्याचे खंदक खणलेले दिसले...

--------------------

इथले पाणी मात्र पिण्यायोग्य नाही..
तिथेच आजुबाजूचा परिसर बघताना तुंगचा बालेकिल्ला मात्र सारखा खुणावत होता... नेमके त्याचवेळी सुर्यदेवांनी पहिले दर्शन दिले..

आम्ही लगेच बालेकिल्ल्यावर जाण्यास निघालो.. अनपेक्षित अश्या मंदधुंद वातावरणामुळे आम्ही अगदी बेधुंद झालो होतो.. अपवाद फक्त संदीपचा.. हा दमल्याचे कारण देउन बालेकिल्ल्यावर चलण्यास नकार देत होता.. पण इतके अनकुल वातावरण असतानाही तो दमला कसा हे कळत नव्हते.. कदाचित निसर्गसौंदर्यचा आस्वाद घेण्याची सवय नसावी.. Proud अशा जणांनी ट्रेक न केले तर बेहत्तर !!


(पट्टा ढगांचा..)
-----------------------------

-----------------------------
बालेकिल्ल्यावर जाणार्‍या वाटेत डावीकडे खाली दिसणारे टुमदार बंगले ( बहुदा महिंद्रा रिसॉर्टची घरे) छानच वाटत होती..

आम्ही एकदाचा 'तुंग'चा माथा गाठला नि नेहमीप्रमाणे शिवरायांचा जयजयकार करत बालेकिल्ल्यावरती प्रवेश केला.. इथे दरवाजा वगैरे काही नाहिये.. फक्त तुंगादेवीचे अगदी छोटे मंदीर आहे..

----------------
एकीकडे निशाण वार्‍यामध्ये रुबाबाने फडकत होते..

-----
इथेच एका बाजूस जमिनीत खोदलेली गुहा आहे.. पण रचना मस्तच.. जेमतेम ५-६ फूट खोल खड्डा नि आतल्या बाजूस छोटेखानी गुहा.. या गुहेत तीनजण सहज राहू शकतात.. गुहेत जाण्यासाठी खड्ड्यात उतरावे लागते तिथेच एक मोठे छिद्र पडलेय (की पाडले होते ?)..


(गुहेत डोकावणारे तीन शहाणे)
----------------------

-----------------

(नि गुहेच्या पोटात जाउन त्या छिद्रातून डोकवताना दिडशहाणा.. Proud *Photo by Shiv.)

आम्हाला ढगांनी चोहूबाजूंनी विळखा घातला होता.. त्यांच्या आक्रमणामुळे तेजोगोलही अगदी मंद भासत होता.. पौर्णिमेचा चंद्र जणु..

आम्ही तर जिथेजिथे या ढगांच्या भिंतीला भगदाड पडत होते तिथूनच बाहेरचे सौंदर्य न्याहाळत होतो.
असेच एक दृश्य..

(भल्यामोठ्या पवना जलाशयाचा एक छोटा तुकडा)
-----------------------

--------------------------

अनपेक्षित अशा वातावरणामुळे आम्ही भलतेच खुष झालो होतो.. पाउसही केवळ थेंबांचा वर्षाव करत असल्याने कॅमेर्‍याला तितका धोकाही नव्हता.. आमचे लगेच फोटोशुट सुरु झाले.. एव्हाना दमलेला संदीपही लगेच फोटोसाठी उभा राहिला... एकामागोएक सगळे फोटो काढून घेत होते..

----------------------


[ ^ Photo by Shiv ]
-----------------------
आपले तर दोन स्टायलिश फोटो ठरलेले असतातच..
एक राजेशाही पोझ !

[ ^ Photo by Shiv ]
नि दुसरी उडी !! Proud

[ ^ Photo by Shiv ]
------------------------


(पार्श्वभूमी ढगांची..)
-------------------------
आमची धमालमस्ती सुरुच होती..

[ढिशक्याव !! Proud [ ^ Photo by Shiv ] ]
----------------------------


( जीतम जीतम जीतम ! )

थोड्याचवेळात ढगांचा विळखा सुटला तरी सुर्यदेवांना त्यांनी आपल्याच तावडीत ठेवले होते.. ह्यांच्या मारामारीचे खाली भूतलावर असणार्‍या पवना जलाशयात अतिशय सुंदर असे प्रतिबिंब पडत होते.. त्यातच वार्‍यामुळे पावना जलाशयाचे पाणीही स्मितहास्यही देत होते.. नि मग हा नैसर्गिक आविष्कार फक्त बघतच रहावे असा...

---------------------------

--------------------------

--------------------------

------------------------


----------------------
तर एकीकडे जलाशयाच्या पोटात घुसलेली जमिन..

कितीही पाहिले तरी माझे पोट भरत नव्हते.. तर एकीकडे नविन पोटपूजेची सोय करण्यासाठी आग पेटवण्याचे केविलवाणे प्रयत्न करत होता... मॅगीचा नाश्ता करायचा होता ह्याला.. एकदिवसाच्या ट्रेक मध्ये पण ह्या पठ्ट्याने पातेले, चमचे अशी सामुग्री आणली होती.. आम्ही साडेसहा सातच्या सुमारास वरती आलो होतो सो त्याने वेळ सत्कारणी लावण्यास घेतला.. असल्या वातावरणात चूल पेटवणे जिकरीचे काम होते.. पण नविन यशस्वी झालाच.. नि मग सगळेच कामाला लागले..

------------

-------
मॅगी तयार झाली नि मग तो टोपच पुढ्यात घेउन सगळे बसले.. तुंगादेवी मंदीराच्या मागे अगदी कडेला निवांतपणे मॅगी खात बसलो..

(भुक्कड लोक्स.. Proud ) [ ^ Photo by Shiv ]

चित्रपटगृहात पॉर्पकॉर्न खात जसा सिनेमा बघावा तसे आम्ही एका उंच ठिकाणावर बसून मॅगी खात आकाशरुपी विशाल पडद्यावर प्रकाशखेळ बघत होतो.. !!!

------------------------

-------------------------


(वरील फोटोत तुंगच्या समोर उभा ठाकलेले तिकोना... सहज नजरेस पडणार्‍या या किल्ल्याचे दर्शन अवघ्या तासभराने झाले होते...!! )

एव्हाना नऊ वाजत आले होते.. समोर तिकोनाचे दर्शन घडताच आता तिथे जाउन तुंग कसा दिसत असेल असा प्रश्ण साहाजिकच पडला.. मग लगेच ठरले आता तिकोना करुया !! दमलाभागलेल्या संदीपचा चेहरा लगेच पडला.. पण आमचा अजून खर्‍या अर्थाने ट्रेक सुरुच झाला नव्हता हे त्याला कोण सांगेल... Proud म्हटले ट्राय करुया.. जमले तर जायचे नाहितर सोडुन द्यायचे.. Happy

आम्ही शक्य तितक्या वेगाने पण जड अंत:करणाने तुंग उतरायला घेतला... खरच इतक्या मदमस्त वातावरणातून पाय निघणे कठीण होते..

-----------

वाट अगदीच सोप्पी असल्याने फोटोसेशन उरकत आम्ही फक्त पंधरा मिनीटात खाली उतरलो.. नि तिकोनास जाण्यासाठी चौकशी केली.. तिकोनासाठी पवना जलाशयामार्गे जाणारी लॉच सेवा बंद होती.. जर चालू असती तर आम्हाला एक आयुष्यातला सुंदर अनुभव घेता आला असता..दुसरा पर्याय होता.. 'चावसर' गाव गाठून कामशेतला जाणारी एसटी पकडायची नि तिकोनापेठेत उतरायचे.. पण अडचण अशी होती एसटी १० ची होती नि नंतर दुपारी १२ ची.. तुंगवाडीहून चावसर गाव अर्ध्या तासात गाठणे कठीण आहे असे तेथिल स्थानिक लोकांकडून कळले.. पण लेट्स ट्राय म्हणत आम्ही धूम ठोकली... पाउलवाट गावातून शेतातातून छोटे मोठे चढउतार पार करत जाणारी होती.. अधुनमधून भेटणार्‍यांना वा घरामध्ये विचारत आम्ही कूच करत होतो.. खरा ट्रेक आता सुरू झाला होता.. Proud अर्थातच संदीपची विकेट पडली.. 'कुठे ह्या वेड्यांबरोबर ट्रेकला आलो' असे भाव त्याच्या चेहर्‍यावर उमटत होते.. (तरी नशिब आज कडक उन पडले नव्हते.. Wink )

आम्ही मात्र त्याच्या 'थांबा रे' ला दुर्लक्ष करत 'बस्स.. आलेच आता' म्हणत त्याला पुढे खेचत होतो.. त्यातच मध्ये आकाशात हेलिकाप्टर आले नि जल्ला ह्याला वाटले आपल्यासाठीच आलेय... "दोरी सोडा.." ओरडू लागला.. !! नविन नि संदीप ह्या दोघांनी नक्कीच एकमेकांना मनातून शिव्या घातल्या असणार... एक म्हणत असेल 'उगाचा ह्याला आणले' नि दुसरा म्हणत असेल 'उगाच ह्याच्याबरोबर आलो' Lol
थोड्याच वेळात नविनचा चुलतभाउ 'श्याम' ने आता नकारात्मक पवित्रा घेण्यास सुरवात केली... पण शिवने त्याला 'अरे चल.. तिकोनाजवळील पवना तलावात पोहायला मिळेल' असे आमिष दाखवले नि श्याम फसला... Lol

तासभर पायपीट केली पण गावात अजून पोहोचलो नव्हतो..याच वाटेमध्ये सुर्यफूलांची छोटी शेतं दिसली... इतक्या जवळून सुर्यफूल बघण्याची माझी पहिलीच वेळ...


( हे पहा सुर्यफूल नि तो पहा तुंग !!!!! )
------------------

-------------------------

इथूनच पुढे गाव नजरेत आले.. पण एव्हाना दहाचा ठोका पडून गेला होता... त्यामुळे आता १२ ची एसटी पकडावी लागेल याची खात्री झाली.. कदाचित एसटी उशीरा येइल नि आम्हाला मिळेल अशी धुसर आशा होती.. पण जाईपर्यंत कळले की एसटी मघाशीच येवुन गेली.... या चावसर गावात विठठला-रखुमाईचे मंदीर आहे.. तिथूनच एसटी जाते.. याच मंदीराच्या बाजूने छोटी नदी जाते...तेव्हा उरलेला वेळ इथेच व्यतित करायचे ठरवले... पाण्यात पावले ठेवून छोट्या माश्यांकडून 'Pedicure' करुन घेतानाचा अनुभव मस्तच... शिवाय काही खाद्य टाकले की खाण्यासाठी त्यांच्यात होणारे तुंबळयुद्ध एकदम बघेबल होते.. Happy (जल्ला पहिल्यांदाच मासे फक्त 'बघण्यातच' समाधान मानत होतो.. Proud )


(आमची आतापर्यंतची तासभरात झालेली वाटचाल.. फोटोत मागे दिसतोय तो तुंग !! )
-------------------

--------------------------

[ ^ Photo by Shiv ]

---------------------------
या मंदीरातदेखील भजन-किर्तनाचा कार्यक्रम सुरु होता.. त्यामुळे नदिकाठी बसून किर्तन ऐकण्याचा अनुभवदेखील औरच.. बाराच्या सुमारास आम्ही मंदीरापाशी जाउन वाट पाहू लागलो.. मंदीरात गावकर्‍यांची गर्दी होती.. चौकशी केली असता कळले एसटीचा भरवसा नाही.. बरं इकडून कुठले वाहन मिळेल याची शक्यता नव्हती.. तेव्हा आम्ही झाडाखाली डुलक्या घेत एसटीची वाट बघत बसलो.. एक वाजून गेला पण एसटीचा काहिच पत्ता नाही तेव्हा पायी चालत जाण्याचा मी कटु निर्णय घेतला.. तिकोनाचा प्लॅन आपोआप गुंडाळला गेला.. Sad उगीच इकडे अडकून राहण्यापेक्षा चालत जाउ नि पुढे काही वाहन मिळाले तर लिफ्ट घेऊ म्हणत सगळ्यांना चलण्यास सांगितले.. एसटीचा काय भरवासा.. दुपारी आलीच नाहीतर... शिव सोडला तर बाकीचे सगळेच वैतागले.. Proud

पुढचे अंतर ध्यानीमनी नसताना आम्ही खडड्यांनी नटलेल्या डांबरी रस्त्यावरुन चालायला घेतले.. चढ उतार पार करत आम्ही जेमतेम २-३ किमी पार केले.. तेव्हा दुरवर दिसणारा 'तिकोना' चिडवून दाखवत होता...

तिथे दुर्लक्ष करत वाटेत काहि लिफ्ट मिळतेय का बघत पुढे चालत राहीलो..तोच एक मोठे दगड वाहून नेणारा ट्रॅक्टर आला.. नि मग आम्ही ट्रॅक्टर राईडची हौस पुरवून घेतली... Happy

जास्ती नाही पण ३-४ किमी अंतरापर्यंत लिफ्ट मिळाली .. हेही नसे थोडके करत आम्ही पुन्हा मार्गाक्रमण सुरु केले.. दुपारी दोनच्या सुमारास एसटी भेटली.. पण ही आता त्या चावसार गावाच्या पुढे २-३ किमी अंतरावर असणार्‍या मोरवे गावात जाउन परतणार होती.. म्हणजे हमखास एक तास ! तेव्हा आम्ही पुढे काहि चहापाण्याची सोय होते का बघण्यासाठी चालतच राहिलो.. लवकरच एक शिळींब गाव लागले जिथे एका दुकानात चहापाण्याची सोय होती.. आता इथेच ठाण मांडून एसटीची वाट बघण्याचे ठरवले... निदान तेवढा आराम तरी करायला मिळणार होता.. थोड्या वेळेसाठी स्वच्छ झालेल्या आकाशात पुन्हा ढ्गांची गर्दी झाली.. दुपारच्यावेळेस अगदी संध्याकाळचे सहा वाजल्यागत वाटत होते... त्या दुकानात मस्त चहा नि कोबीची भजी असा फक्कड नाश्ता झाला... भजीची चव मस्तच.. एसटी येइपर्यंत भजीवर भजी खातच बसलो Proud

थोड्याच वेळेत एसटी आली... नि मार्गस्थ झालो.. तिकोनाच्या जवळ गेलो तेव्हा धुवाधार पाउस सुरु झाला.. खिडकीतून तुंगकडे पाहिले तर त्याचा शेंड्याकडचा भाग ढगांआड गेला होता.. लगेच विचार सुरू झाले तुंगवरून आता कसे दिसत असेल.. Happy

आम्ही कामशेतला पोहोचलो.. पावसाची रिपरीप सुरु होतीच.. त्यात अपेक्षेप्रमाणे लोणावळा वा मुंबई कडे जाणारी लिफ्ट मिळत नव्हती.. शेवटी ट्रेनने जाउ म्हणत कामशेत रेल्वे स्टेशन गाठले.. पण लोणावळ्याला जाणारी लोकल मिनीटभर आधी मिस झाली.. नि पुढची लोकल थेट तासभराने.. संध्याकाळी साडेपाच वाजता..! एकूण काय तर सकाळी सव्वानऊनंतर आमचे ग्रह फिरले होते.. प्रॅक्टीकली विचार केला तर सकाळी साडेनऊला तुंग उतरून झाल्यानंतर केलेली भटकंती व्यर्थ होती !!! तिथूनच परतीची वाट धरली असती तर एव्हाना मुंबई गाठली असती..इति.. पण सकारात्मक दृष्टीकोनातून बघणारे आम्ही लोक्स.. तिकोना नाही गाठू शकलो पण त्या व्यर्थ भटकंतीचा अनुभव मस्तच होता.. नविन आठवणी मनात घर करून राहिल्या.. नविन गावाची ओळख झाली नि ती वाटचाल कोणत्याही ट्रेकरला आवडणारीच.. शिवाय ध्यानीमनी नसताना आम्ही नाईट ट्रेक केला होता.. त्यामुळेच तुंगचा प्लॅन योजला गेला.. असो !

'तुंग' ला पुन्हा भेट देण्यास नक्की आवडेल.. खासकरुन तिकोनाच्या बाजूने होणारा सूर्योद्य नि त्याचवेळी पवना जलाशयाच्या पाण्यात पसरणारे तांबडे हे दृश्य बघण्यासाठी.. Happy

समाप्त नि धन्यवाद Happy

( वरील लेखात काही ५-६ फोटो माझ्या मित्राच्या कॅमेर्‍यातील आहेत.. तिथे तसे नमुद केले आहे )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मजा केली आहे.............फोटो छान आले आहेत..........
लगे रहो....

वॉव्..कुठे कुठे फिरता रे तुम्ही.. मज्जाये.. मस्त वर्णन,बिचारा( कोण कुठला!!) संदीप.. त्याने पण त्याला कसं रखडवलं यावर लेख लिहिला असेल Proud
आकाशाचे फोटो तर पुन्हा पुन्हा बघत राहावेसे वाटले !!!

मस्त ट्रेक, फोटो पण खुप सुंदर. खरे तर नेमके ध्येय न ठेवता केलेली भटकंती पण वेगळाच आनंद देते.

सह्ह्ही!!! नेहमीप्रमाणेच मस्त वर्णन आणि फोटोही Happy
पवना जलाशयाचा फोटो भन्नाट बंधू :).
पवना धरणाचा परिसर माझा अतिशय आवडीचा (कोणत्याही सिझनमध्ये). तासनतास बसुन राहायला आवडते या परीसरात Happy

योग्या __/\__ तू आणि तुझे मित्र महान आहेत. असो.. Happy
आकाशातल्या प्रकाशखेळाचे फोटो लय म्हणजे लय आवडले.

धन्यवाद चातक, शैलु.. Happy
वर्षू.. Proud
दिनेशदा.. अनुमोदन Happy

तासनतास बसुन राहायला आवडते या परीसरात.. >> येस्स ! पुन्हा जाउयाच कधीतरी.. Happy

टायग्या... महान नाही लहानच Proud

यो लेका थोडक्यात पण कसला भारी ट्रेक झाला तुमचा...
फोटो तर काय उच्च कोटीतले आले आहेत...
राव आम्हाला पण कळवत जा की...काय पाप केले आहे....

वा.. धमाल केलीत की रे!!! तुंग वरून तिकोना कसा दिसतो ते बघायचे होते. मी बहुदा तुंग लवकरच करीन.

आणि हो.. शिव्या तर तू खाणारच... Happy

मी अलंग - मंडण करून आलो... भारी धमाल आली.

अरे यो... सही धमाल केली तुम्ही राव...
हाफिसात लेट झाला म्हनुन नायतर मि पण आलो असतो... मिसलो मी...
मी बहुदा तुंग लवकरच करीन.>> पक्क्या भटक्या... जल्ला कधी जाशील तेव्हा सांग रे...

यो लेख मस्तच, ट्रेक ही छान ..... बालेकिल्ल्यावर पोहचल्यावर जी अदभुत नि अप्रतिम द्रुश्य, हवा तो फिलच सर्व थकान दूर करुन गेला वाटलं दिवसभर येथेच राहवं.......... पण तुम्हांला ते माझ सु़ख पाहवल नाही (फोटोत पाहा किती आनंदी होतो मी) आणि तुम्ही अर्ध्याच तासात मला नवीन टास्क दिलंत ...... नंतर जी पायपीट झाली (एस टी चुकल्यामुळे) ती खरचं दमछाक करणारी होती तरीही जेव्हा सगळं ठरलेलं न ठरलेलं उरकून जेव्हा कामशेत रेल्वेस्टेशन वर पोहचलो (एकदाचा) तेव्हा मी सुखावलो नक्कीच!!!!!! ................गेली १० वर्ष ..... संपूर्ण दिवस बाईक चालविण्यात ( बसून ) गेले आहेत........ खरच शरीराला सवय नाही ऐवढी तंगडतोड करायची ........ म्हणून दमलो...... बाकी मा़झ्या स्लो स्पिडने तुम्हांला काही त्रास झाला असेन तर माफी असावी?
धमकी : पुन्हा ट्रेक करायला नक्की येईन.

मस्त योग्या...
मॅगी , टॉर्च चे आणि सगळेच फोटो छान...
आता जानेवारीत ट्रेक करुया पुन्हा एक्त्र.. या वर्षीचा माझा कोटा झाला पूर्ण...

तिकोना वरून तुंगचे दर्शन महादेवाच्या पिंडी प्रमाणे भासते... सभोवती पवना जलाशय आणि मधोमध तुंगचा सुळका...

तुम्ही अनुभवलेला प्रकाशखेळ तर केवळ अप्रतिम...

तिकोना करुन परतीच्या प्रवासातही खूप हाल होतात... कारण खाजगी वाहने फारशी नसतात त्यामुळे महामंडळावरच अवलंबून रहावे लागते... येणारा लालडब्बा आधीच खचाखच भरलेला असतो... त्यात स्वतःला कोंबणे म्हणजे एक दिव्यच!

तिकोना वरून तुंगचे दर्शन महादेवाच्या पिंडी प्रमाणे भासते... >> सह्ही बोला बॉस !

सूकी.. गैरसमज नसावा.. सोप्पा आहे ! हवतर खात्री करायला जाउ कधीतरी.. पक्क्याला विचार कधी ते..

योरा, ठरव मग मला २५ ते १ डिसेंबर पर्यंत सुट्टि आहे. इतरांना विचारा अन पुढचा ट्रेक ठरवा आता.

मित्रांना न सांगता तुंगवर एकट्याच गेलेल्या दगडाचा त्रिवार निषेध.....:राग:

यापुढेही असेच वागणे राहिले तर जवळच्याच एका किल्ल्यावरुन कडेलोट करण्यात येईल....