चांगले 'साहित्य' / 'चांगला' वाचक म्हणजे काय ?

Submitted by Adm on 22 November, 2010 - 21:34

'मी वाचलेलं पुस्तक' बाफवर सुरु झालेली चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा.
चांगलं 'साहित्य' आणि 'चांगला' वाचक म्हणजे नक्की काय ? अशी व्याख्या करणं शक्य आणि गरजेचं आहे का?

मेघना भुस्कुटेने टाकलेल्या पोस्टवरून ही चर्चा सुरु झाली.

अवचटांबद्दलची ही एक प्रतिक्रिया वाचनात आली. मला ती बेहद्द आवडली आणि पटली. काहीशी कडवट असूनही.
http://dnyanadadeshpande.blogspot.com/2010/10/blog-post_29.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदा. अर्नाळकर आवडायचे एक वय असते पण त्यापुढे जाण्याची आपली इच्छा आहे की नाही? की तेच ग्रेट, आम्ही तेच वाचणार म्हणून कवटाळून बसायचे?<<<<<< त्यापुढे जायची इच्छा नसली काहींची वा 'आम्ही तेच आणि तेवढेच वाचणार' असं कुणी म्हणत असेल तर याला इतरांची हरकत का असावी?

'ग्रो आउट ऑफ अ रायटर' हेही तितकेच गरजेचे आहे.<<<<< हे गरजेचं असणंही सापेक्ष नाही का? आणि
'सर्व आयुष्य व्यापून राहिल, सतत नव्याने भेटत राहिल असा लेखक विरळा असतो.'<<<< आणि हेही? पुलं वा वपु अथवा अनिल अवचट यांचे साहित्य एखाद्याचे आयुष्य व्यापून राहत असेलही. त्यामुळे 'अवचट आवडणा-या वाचकांच सारं पॅकेजच नंतर उमगून येतं.' वगैरे वाक्ये ही आपल्यापेक्षा वेगळ्या वाचनसवयी असलेल्या लोकांविषयी तुच्छता व्यक्त करणारी वाटतात.

मुळात 'वाचन करणे' असा काही (सर्टिफिकेशन! :-)) कोर्स आणि त्याच्या ठराविक पात्रताश्रेणी आहेत का? अमुक वयाचे असताना बालसाहित्यापासून सुरुवात करा, मग अमक्या लेखकांची पुस्तके वाचनात असू देत, नंतर ते लेखक पुस्तकशेल्फातून हद्दपार करून अमुकतमुक लेखक वाचायला घ्या, त्या त्या वेळी त्या त्या पायर्‍या तुम्ही ओलांडल्या नाहीत, तर तुम्ही नापास, निकृष्ट वाचक, वगैरे?

अजून एक मुद्दा हा की आपण 'फॅन' झालो की तटस्थ विश्लेषण अवघड होते. 'अमुक एक लेखक मला फार आवडतो' या वाक्याचे रुपांतर 'तो सर्वश्रेष्ठ लेखक आहे' यात झाले की प्रॉब्लेम सुरु होतो. >>> हे आवडलं. (अरभाटनं त्याच्या लेखातल्या एका परिच्छेदात असंच काहीसं म्हटलेलं आहे.)

ज्ञानदाच्या ब्लॉगमधला सूर नाही आवडला. इथले काही मुद्दे पटले, काही नाही पटले. पण सकस चर्चा व्हायलाच हवी.
(कधीकधी निव्वळ श्रोता राहून चर्चा ऐकणं छान वाटतं. :))

अरे ते टोन डाऊन ठेवण्यासाठी. त्या ज्ञानदा किंवा इतरही कोणाला असे मत ठेवण्याच्या त्यांचा अधिकार आहे असे म्हणायचे आहे. आणि त्यांचे ते मत इथे बहुतेकांनी कसे चुकीचे आहे हे दाखवून दिले आहेच. स्मित

टिपकागदासारखे मन असले तर न वाचन करताही ग्रोथ होते. आणि कुठल्याही व्यक्तीच्या जडणघडणीत पुस्तकापेक्षा असलेल्या वातावरणाचा प्रत्यक्ष प्रभाव असतो. नाहीतर थिन्क पॉझिटिव्ह नावाचे पुस्तक घेतले की झाले.>>>> केवळ पुस्तकेच हाच एकमेव 'ग्रोथ फॅक्टर' आहे असे मी कुठे म्हणतोय, तू म्हणतोस तसे वातावरणाचा प्रभाव असतोच. माझ्यापुरते सांगायचे तर पुस्तकेच माझ्या वातावरणाचा एवढा प्रचंड भाग व्यापून होती आणि आहेत की त्यांचा जडणघडणीवरचा प्रभाव जोरदार आहे.
बाकी 'थिंक पॉझिटीव्ह' वाचल्याने जीवन सुधारल्याचीही उदाहरणेही असतीलच की!!!

श्रद्धा, असा काही कोर्स आहे का ते माहिती नाही पण माझे वाचन तरी कधी अजाणतेपणी तर कधी अगदी ठरवून अशाच वाटेने गेले आहे. यात कसल्याही पात्रताश्रेणी अजिबात नाहीत. आपल्या वाचनाच्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडून वेगळी वाट चालून पहायला हरकत काय आहे? अर्थात इथे आपल्या वाचनापासून आणि एकंदरीतच साहित्य व्यवहारापासून अपेक्षा काय आहेत हा प्रश्न येतो. त्याच जर भिन्न असतील तर ते तसे मान्य करावे आणि एका गटाने दुसर्‍याला तुच्छ अथवा ग्रेट न मानता आपला रस्ता धरावा.

नाही तू तसे म्हणालेला नाहीस. मी फक्त ग्रोथ अन पुस्तके ह्यांची एकत्रीत सांगड घातली व माझ्या अनुभवाशी ताडून पाहिले.

प्रत्येकाच्याच ग्रोथमध्ये वाचनाचा वाटा कसा असेल?
प्रत्येकजण आपल्याला रुचणार्‍या गोष्टीच करतो. उद्या जर सचिन म्हणाला, फार झालं गल्लीत क्रिकेट खेळणं, आता वनडे खेळा, तर कसं व्हायचं? एखाद्याला फक्त गझला आवडत असतील, तर 'ग्रोथ व्हायला हवी', म्हणून त्यानं मुद्दाम शास्त्रीय का ऐकावं? गझला ऐकून त्याची ग्रोथ होऊ शकतेच.

वाचन स्वानंदासाठी असतं. बौद्धिक, मानसिक भूक भागवण्यासाठी असतं. हे हेतू साध्य झाल्याशी मतलब. कोण काय वाचतं, याची काळजी उगाच कोणी का करावी? आणि त्यावरून वाचकाची लायकी तर अजिबात ठरवू नये. अमुक एक लेखक वाचल्यानंच ग्रोथ होते, हे अजिबातच पटत नाही.

केदारला, आगाऊला, असाम्याला अनुमोदन.
असाम्या- या तुझ्या वाक्यावर विचार करते आहे. Canonization is major culprit for interpretation biases.

तू चक्क दबंग पाहिलास?>> हो पाहिला हे त्याचे उत्तर असू शकते ना? की फक्त मी पाहिला म्हणून दबंग श्रेष्ठ कलाकृती ठरते.
तू चक्कं स्वैपाक करतेस असं तुझ्याकडे पाहून वाटत नाही असं लोकं मला म्हणतात. म्हणुन ते लगेच मूर्ख ठरत नाहीत. Happy

ग्रोइंग आउट ऑफ अ रायटर हे मला तरी उत्तम वाचकाचे लक्षण वाटते. आगाऊला अनुमोदन. आपल्याला काही आवडले ते नेमके का किंवा का नाही या विश्लेषणाची स्वतःला गरज भासावी. पण प्रेमाबाहेर पडल्यावर मात्र लगेच ते फाल्तू असे मात्र व्हायला नको.

मुळात 'वाचन करणे' असा काही (सर्टिफिकेशन! ) कोर्स आणि त्याच्या ठराविक पात्रताश्रेणी आहेत का? >>> हो स्वतःपुरती आणि स्वतःसाठी आहेच. वाचनाचेच कशाला कुठल्याही कलेबाबत ते लागू होतेच ना.

कारण काही निवडक वाचनाला काही पूर्वतयारी, वैचारिक बैठक लागते. कारण पर्सेप्शन हळुहळु आकार घेते. सोप्या लहान मुलांसाठीच्या ज्ञानेश्वरीपासून ते ज्ञानेश्वरीपर्यंत आणि मग गीतेपर्यंत हळुहळु करायचा तो प्रवास आहे. एका पानांत FAQ सारखे त्याचेही सार काढता येऊ शकतेच.
वाचन हा एकच टप्पा झाला. मनन, चिंतनाशिवाय कसले वाचन? दुर्दैव असे आहे की 'मी' ला वगळुन ना वाचन होते ना लेखन. चौकट चांगली ठाकठोकुन बसते. Sad

मी फक्त पर्वती चढेन- ठिक, आम्हाला नाही हिमालयाचे कौतुक- तेही ठिक,पर्वती माझ्यासाठी हिमालय आहे- ?? (सॉरी?), पर्वती हिमालयापेक्षा उत्तुंग आहे (अहो, डोळे उघडा जरा).. असे होते कधीकधी. आणि असे झाल्यास दुर्दैव आहे, पण fossilization होते.

मनोरंजन हे साहित्याचे व वाचकाचे प्रमुख ध्येय असावे असे माझे मत आहे. यात वर्तमानपत्रे (व तत्सम साहित्य) हा अपवाद मानला जावा असे दुसरे मत!

वाचक जर लेखनाकडे खेचलाच गेला नाही तर कितीही उच्च प्रतीचे लेखन असले तरी ते बिनकामाचे! कारण ज्ञानवर्धनासाठी कित्येक इतर उपाय व मुख्य म्हणजे स्वतःचे आयुष्य (जो एक कायमस्वरुपी शिक्षक आहे) उपलब्ध आहे. ताणग्रस्त आयुष्यात रंजक वाचायला मिळणे हे पु ल., सुहास शिरवळकर, काही प्रमाणात व पू यांचे लेखन डोक्यावर घेतले जाण्यामागचे रहस्य आहे असे मी मानतो. (शिरवळकरांचे नाव वाचून कदाचित टीका होईल माझ्यावर, पण मी ते प्रामाणिकपणे लिहीलेले आहे. अमर विश्वास, फिरोज, मंदार आणि दारा बुलंद, तसेच दुनियादारी वगैरे पुस्तके माणसाला चार घटका वेगळ्या विश्वात नेतात म्हणजे नेतातच!)

नेमाडे व अवचट मी वाचलेले नाहीत. त्यांच्या लेखनाने मनोरंजन होत असल्यास कृपया कळवावेत. (ते सापेक्ष आहे हे मान्य करूनही 'मनोरंजन' म्हणजे लेखन वाचून संपवायची उत्सुकता तीव्र होण्याइतपत खिळवून ठेवणारे लेखन असले तर ते मनोरंजक असे मी मानतो.)

वाचन या बाबतीत इतके गंभीर का होतात लोक हे काही समजत नाही मला! पाहिजे ते वाचा नाहीतर नका वाचू!

तसेच, पाहिजे ते लिहा नाहीतर नका लिहू आणि प्रतिसाद / प्रतिक्रिया वगैरेंना तयार राहा!

(लेखन मानवी असावे इतके मात्र वाटते. म्हणजे, मागे कुणीतरी 'बॉईल्ड बेबीज' वगैरे बाबत लिखाण केले होते. म्हणजे परदेशातील काहींना लहान अर्भके खावीशी वाटायची व त्याबाबत ते लेखन होते. हे धिक्कारास्पद आहे व लेखन तसे नसावे इतकेच वाटते.)

-'बेफिकीर'!

तू चक्क दबंग पाहिलास?>> हो पाहिला हे त्याचे उत्तर असू शकते ना? की फक्त मी पाहिला म्हणून दबंग श्रेष्ठ कलाकृती ठरते.
तू चक्कं स्वैपाक करतेस असं तुझ्याकडे पाहून वाटत नाही असं लोकं मला म्हणतात. म्हणुन ते लगेच मूर्ख ठरत नाहीत.<<<
अनॉलॉजी अजिबात पटण्यासारखी नाही. असो.

पर्वती हिमालयापेक्षा उत्तुंग आहे याच्यातले फॉसिलायझेशन काही प्रमाणात मान्य आहे पण तिथे सरळ सरळ मोजता येण्याच्या उंचीचा मुद्दा आहे.
जेव्हा एखादा माणूस मला पर्वती हिमालयापेक्षा महत्वाची वाटते कारणे अमुक तमुक आणि खमुक (वैयक्तिक अनुभव आणि आवडीशी निगडीत कारणे) म्हणून माझ्यालेखी/ माझ्या मनात पर्वती हिमालयापेक्षा उत्तुंग आहे असे म्हणत असेल तर फॉसिलायझेशनचे लेबल कश्यांक?

ग्रो आउट ऑफ ऑथर हे लेखकाची व्यक्तीपूजा या संदर्भात गरजेचे आहेच. पण इतर संदर्भात गरजेचे असेलच असं मला वाटत नाही. नवीन गोष्टींना सामावण्यासाठी जुन्या गोष्टींना कचरापेटी दाखवण्याचा फंडा इथे वर्क होत नाही. अनेक नवीन गोष्टी समोर आल्यावर क्षितिज विस्तारले जाते पण मध्यापर्यंत पूर्ण त्रिज्या असेल तर ठिके. क्षितिज विस्तारण्याचा आणि नकार वाढण्याचा वेग एकच असेल तर वैयक्तिक पातळीवर ठिके पण जनरलायझेशन पातळीवर अजिबात योग्य नाही.

अरे वा, छान चर्चा चालली आहे! आगाऊ, चिनूक्सची मतं पटली.. (काही काही ठिकाणी ती कॉन्ट्राडिक्ट होतात तरीही)
पूर्वी अवचट (लेखक म्हणून) आवडायचे.. आता 'दिसले ते' वगैरे वाचताना 'दिसेल ते' लिहलय असं वाटतं कधीकधी..
सरसकट सगळे पुस्तकं नाहीच आवडत हल्ली.. (म्हणूनच आगाऊला अनुमोदन दिलं हाहा)
पण त्यांच्यातली वेगवेगळ्या गोष्टी करण्याची उर्मी जबरदस्त भावली मला.. साधेपणाही..असो, पण लेखक-अवचट हा चर्चेचा विषय असल्यानं त्याबद्दलच बोलू!

लेखिकेला जे अवचटांच्या लिखाणाबद्दल म्हणायचय त्यावरच्या रैनाच्या भाष्याला अनुमोदन..
पण एकूणच लेखनाचा सूर आताताई वाटला (बायो, ज्यांना ट्विट करायचय त्यांना करूदेत की.. तू कशाला त्यांच्या आयुष्याचा ताळेबंद मांडायला बसलीयेस. जसं तू हा ब्लॉग लिहिलीतीयेस, तसंच तिनंही ट्विट्स टाकलेले.. तू १००% तुझ्या मतांशी प्रामाणिक आहेस तर तू कशाला ब्लॉगद्वारे कंठशोष करतीयेस? हे 'मध्यमवर्गीय' नाहीये का मग? असं काहीस वाटलं)
असो..

नवीन गोष्टींना सामावण्यासाठी जुन्या गोष्टींना कचरापेटी दाखवण्याचा फंडा इथे वर्क होत नाही>>>> तसे होऊही नये, मात्र जुन्याला कचर्‍यात न टाकता, त्याचे महत्व, त्यावेळेतले काँट्रिब्यूशन मान्य करुन पुढे निघावे.
मला 'मृत्युंजय' आता परत वाचताना काही ग्रेट वाटत नाही उपमांचा सोस टोचतो असे जरी असले तरी पहिल्यांदा वाचली तेंव्हाचे प्रचंड भारावलेपण, तो 'ट्रांन्स' या अनुभवासाठी लेखकाचे आभार मानले पाहिजेत, पण पुन्हा फक्त त्यातच अडकायचे का, हा प्रश्न ज्याने त्याने सोडवावा.
त्याच कलाकृतीतून दरवेळा नवा अर्थ नवी अनुभूती देणारा लेखक भेटला तर तो बाकीच्यापेक्षा ग्रेट मानावा की नाही? अर्थात असा लेखक व्यक्तिपरत्वे बदलणार हेही खरेच.
नानबाला अनुमोदन.

>>चांगलं 'साहित्य' आणि 'चांगला' वाचक म्हणजे नक्की काय ? अशी व्याख्या करणं शक्य आणि गरजेचं आहे का?

कशी करणार व्याख्या? फारच व्यक्तीसापेक्ष आहे. ऊ.दा:
चांगलं लोणचं म्हणजे काय?:
आईने केलेलं, बायकोने केलेलं, बेडेकरांचं, प्रवीण च, किंव्वा ईतर...
चांगला लोणचं खाणारा म्हणजे काय?:
कधीही कुठलेही लोणचे कशाही बरोबर आनंदाने खाणारा (सर्व तेलुगू जनता यात बसेल! त्याला कल्ट म्हणुयात?), किंव्वा आयुष्यभर त्याची आठवण काढणारा, वगैरे?...

व्याख्या करणं गरजेचं मुळीच वाटत नाही.. आस्वाद घ्या अन पुढे चला. सर्व लोणच्यांची रेसिपी सारखीच असली तरी काही थोडीच लोणची अशी "मुरतात" की आयुष्यभर (त्याची चव) लक्षात रहातात. शेवटी साहित्यीक अभिरूचीचही तसच आहे असं मला वाटतं.

बाकी व.पु. पु.ल., अर्नाळकर, अवचट, ई. नावे म्हणजे एक काळी एक एक "ब्रँड्स" होते.. आजकाल लेबल्स भरपूर आहेत, ब्रँड्स मात्र कमी दिसतात. ते का हा चर्चेचा विषय होवू शकेल.

<तू चक्क दबंग पाहिलास?>> हो पाहिला हे त्याचे उत्तर असू शकते ना? की फक्त मी पाहिला म्हणून दबंग श्रेष्ठ कलाकृती ठरते.
तू चक्कं स्वैपाक करतेस असं तुझ्याकडे पाहून वाटत नाही असं लोकं मला म्हणतात. म्हणुन ते लगेच मूर्ख ठरत नाहीत>

स्वयंपाकाचा आणि अभिरुचीचा संबंध नसतो. तसा दबंगचाही अभिरुचीशी संबंध नसतो. पण तो लावला जातो.

<हो स्वतःपुरती आणि स्वतःसाठी आहेच. वाचनाचेच कशाला कुठल्याही कलेबाबत ते लागू होतेच ना.>

नाही होत. आधी रवी परांजपे, मग पिकासो (त्याची चित्र कळत नसली तरी) आणि मग देगा, गोया, रेम्ब्राँ असं काही नसतं. आधी लता-आशा, मग गिरीजादेवी आणि मग बडे गुलाम अली खाँसाहेब असं तर अजिबातच नसतं. पुस्तकांचीही प्रतवार कोणी तयार केली? म्हणजे सुरुवात पुलंनी करून डिग्री नेमाड्यांनी मिळवायची? म्हणजे एका विशिष्ट वयानंतर अगाथा क्रिस्ती, एडगर अ‍ॅलन पो वाचायचेच नाहीत?

आणि एखाद्याला नसेल चढायचा एव्हरेस्ट. त्याला करण्याजोग्या इतर अनेक गोष्टी असतील आणि त्यात तो बरंच काही करत असेल. एखादा 'उत्तम वाचक' झाला म्हणजे तो सर्वज्ञ होतो, असं थोडंच आहे?

आता ह्या चर्चेचा मूड फडके खा.न्डेकरांच्या काळातील 'जीवनासाठी कला' की 'कलेसाठी कला' या सनातन विषयाकडे निघाली आहे का? (निघाली असली तर स्वागतच . त्यानिमित्ताने नवी पिढी याबाबत काय म्हनते हे पहाणे मनोरंजक ठरेल :))

स्तकांची प्रतवार कोणी तयार केली? >>> सहमत चिनूक्स. मलाही असली प्रतवार मान्य नाही. कोण लेखक कोणापेक्षा थोर आहे हे पुन्हा सापेक्षच झाले. काही लेखक नेहमीच्या लेखकांपेक्षा वेगळी वाट स्वीकारतात, कदाचित त्यांचे अनुभव वेगळे असतात म्हणून काहींना थोर वाटतील, तर काही लेखकांची ५० वर्षांपूर्वी लिहीलेली पुस्तके बहुसंख्य वाचक अजूनही पुन्हा पुन्हा वाचतात म्हणून थोर वाटतील.

एक लेखक (अगदी त्याच विषयावर लिहीणार्‍या) दुसर्‍या पेक्षा जास्त चांगला हे पर्वती-एव्हरेस्ट लॉजिक -सर्वांना मान्य होईल असे- ठरवायचे कसे?

नानबा करेक्ट. ब्लॉगरने ट्विटरवालीकडे बोटं दाखवावी हे मव नव्हतं का > अगदी अगदी.

जेव्हा एखादा माणूस मला पर्वती हिमालयापेक्षा महत्वाची वाटते कारणे अमुक तमुक आणि खमुक (वैयक्तिक अनुभव आणि आवडीशी निगडीत कारणे) म्हणून माझ्यालेखी/ माझ्या मनात पर्वती हिमालयापेक्षा उत्तुंग आहे असे म्हणत असेल तर फॉसिलायझेशनचे लेबल कश्यांक?>> कारण पुन्हा तिथे माझ्यालेखी (मी, माझे, माझा आलेख, माझी मतं, माझे भावविश्व आणि या सगळ्यांचे परस्परसंबंध तपासून आपल्या मनात नक्की पर्वतीला ती जागा का ) हे सर्व येते ना. मग हे सर्व धागेदोरे तपासायला ती व्यक्ति तयार आहे का? असेल तर फारच उत्तम. नसेल आणि ते सर्व तपासत बसायची मला अजिबात गरज वाटत नाही हे वर असेल तर मग ते फॉसिलायझेशन होत नाही का?

कंफर्ट झोन मधून बाहेर पडा असे जेव्हा कोणी म्हणते ती व्यक्ति म्हणजे मुद्दाम काहीतरी conspiracy करते आहे, उच्चाभिरूचीची अवास्तव दहशत माजवते आहे असेच का धरायचे? (आणि हो असे लोकं असतात ते मी नाकारत नाहीये) नाण्याची दुसरी बाजू आहे एवढेच.
ज्ञानदाबै जनरायझेशन करतात, मला जनरलायझेशन आवडत नाही म्हणुन ज्ञानदाबैंसारखे लिहीणारे सर्व तथाकथित बुद्धिवंत आवडत नाहीत कारण ते उथळ असतात>>> हेही जनरलायझेशनच आहे ना?

personal is universal म्हणताना जनरलायझेशनला (फारसा) पर्याय नाही दुर्दैवाने. कारण त्या मानवी जाणीवा आहेत. एका मानवसमुहाला व्यापणार्‍या. म्हणूनच अक्षर साहित्य स्थलकालसापेक्ष असते ना. ?

आगाऊला अनुमोदन.

स्वयंपाकाचा आणि अभिरुचीचा संबंध नसतो. तसा दबंगचाही अभिरुचीशी संबंध नसतो. पण तो लावला जातो>> आधी लता-आशा, मग गिरीजादेवी आणि मग बडे गुलाम अली खाँसाहेब असं तर अजिबातच नसतं >>-- टोटली पटले. पण एका genre मध्ये उदा-अनुराधाबाई आणि लता/ आशा, सुधा मल्होत्रा आणि लता- आशा अशा तुलना होणे अटळ आहे. फार कशाला लताबाईंनी काळी एकात/काळी दोनात गायची (काहींच्या मते) दहशत आणली आणि पातळ सोनेरी तारेसारखा आवाज म्हणजेच अफाट सुंदर अशी समाजमान्य प्रतिमा झाली. कालांतराने अतिगोड गोड ते रुढ झाले, हे मी लताबाईंच्या प्रेमात असूनही नाकारु शकत नाही. स्टेशनावरच्या भिक्षार्थीच्या कंठात, शेकोटीभोवतीच्या गायलेल्या गीतांमध्ये सौंदर्य दिसले म्हणुन लताबै कमी ठरतात का?

एखादा 'उत्तम वाचक' झाला म्हणजे तो सर्वज्ञ होतो, असं थोडंच आहे?>> अनुमोदन. उत्तम वाचक/लेखक उत्तम माणुस असेलच असे नाही. आणि तसा तो असावा ही अपेक्षा करणे हेही जनरलायझेशन झाले.

म्हणजे एका विशिष्ट वयानंतर अगाथा क्रिस्ती, एडगर अ‍ॅलन पो वाचायचेच नाहीत??>> जरुर वाचायचे की. त्यांचा आणि आपल्या वयाचाही डोळस आस्वाद घ्यायचा. त्यांच्यात आपल्याला जे आवडले ते पुन्हा तपासून पहायचे. आणि तरीही ते तेवढेच आवडले तर तेही कबुल करायचेच की. प्रामाणिकपणा महत्त्वाचा.
भोवती सर्वच आणि अंतरातही बरेच काही बदलत असताना मनातील ती श्रद्धास्थाने (पुस्तके) तेवढी अढळ ध्रुवतार्‍यासारखी -असे होईल? होत असेल तर सांगा. माझा तरी तो अनुभव नाही.

अनुमोदन रैना!

कोण काय वाचतं, याची काळजी उगाच कोणी का करावी? >>> उत्तम, एका फटक्यातच चर्चा निकालात निघाली, आता बाफ बंद करा!

कोण काय वाचतं, याची काळजी उगाच कोणी का करावी?

असं कसं? आम्हाला 'त्यांना ' न आवडणार्‍या गोष्टी आवडतात म्हणून आमची अक्कल काढली गेली म्हणून तर या बाफ चा जन्म झाला. Proud

नसेल आणि ते सर्व तपासत बसायची मला अजिबात गरज वाटत नाही हे वर असेल तर मग ते फॉसिलायझेशन होत नाही का?<<<
तपासून बघायचं नसेल तर त्यालाच फॉसिलायझेशन म्हणावं लागेल कारण पर्वती हिमालयापेक्षा उत्तुंग हे(अश्यासारखे) विधान निश्चित इतर संदर्भांबरोबरच बघावे लागेल. नाहीतर विधान निर्विवाद असत्य आहे हे कुणालाही माहीतच आहे. कारण ती एक शास्त्रीय वस्तुस्थिती आहे.
पण हे तपासून बघणं विधान करणार्‍यासाठी जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ऐकून लेबल लावणार्‍यासाठीही.

पण पुस्तकं, लेखक, कलाकार आणि त्यांचे कलाविष्कार अश्यांच्याबाबतीत पर्वती आणि हिमालय ह्या जागा व्यक्तिसापेक्ष/ अनुभवसापेक्षच आहेत. शास्त्रीय सत्य नाहीत. मग फॉसिलायझेशन कसे काय?

<स्टेशनावरच्या भिक्षार्थीच्या कंठात, शेकोटीभोवतीच्या गायलेल्या गीतांमध्ये सौंदर्य दिसले म्हणुन लताबै कमी ठरतात का?>

इथे लताबाईंना कमी ठरवलंय कोणी? तू म्हणालीस ग्रेडेशन हवं, म्हणून मी हे उदाहरण दिलं. वयानुसार ग्रेडेशन वेगळं, ही तुलना वेगळी. तुलना प्रत्येकजण आपल्यापुरती करतच असतो. समोरच्याची आवड/तुलना आपल्यासारखीच असावी, यावर माझा आक्षेप आहे. तुम्हाला लता आवडते, तुम्ही लताची गाणी ऐका. पण मी हिमेशची गाणी ऐकतो, म्हणून मला नावं ठेवू नका. लतापेक्षा हिमेश वाईट असेलही, पण म्हणून मी त्याची गाणी ऐकूच नये, असं थोडीच आहे?
तू वर दिलेल्या उदाहरणांचं प्रयोजन खरं म्हणजे कळलंच नाही, कारण त्याचा ग्रेडेशनशी संबंध नाही.

<जरुर वाचायचे की. त्यांचा आणि आपल्या वयाचाही डोळस आस्वाद घ्यायचा. त्यांच्यात आपल्याला जे आवडले ते पुन्हा तपासून पहायचे. आणि तरीही ते तेवढेच आवडले तर तेही कबुल करायचेच की. प्रामाणिकपणा महत्त्वाचा.>

ते आवडत नाहीत, असं कोणीच म्हटलेलं नाहीये. असंख्य लोकांना वपु, पुलं, अवचट प्रामाणिकपणे आवडतात. तसं ते मान्यही करतात. मुद्दा आहे की तसे ते आवडावेत की नाहीत, आयुष्यभर आवडावेत की नाहीत, हा.

>>भोवती सर्वच आणि अंतरातही बरेच काही बदलत असताना मनातील ती श्रद्धास्थाने (पुस्तके) तेवढी अढळ ध्रुवतार्‍यासारखी -असे होईल? होत असेल तर सांगा. माझा तरी तो अनुभव नाही

असे होते नक्की. पण "मागे वळून पाहताना" असा दृष्टीकोन प्रत्येक वेळी ठेवला तर मात्र ते "स्थान" आजच्या घडीला तितकेच कायम आहे काय याचं उत्तर आज देणे तितके सोपे असणार नाही. तेव्हा त्या त्या वेळी ती ती स्थाने असणार...

आमची बोम्बी नेहेमी म्हणते, की सत्यनारायणाच्या पोथीतही साधे सोपे तत्वज्ञान सान्गितलेले असते आणि तेवढेही न समजून घेऊन कधीतरी दसरा-दिवाळीला घरात होणार्‍या पूजेकडे-पोथीकडे नीट लक्ष न देता प्रसादासाठी किती तूप गेले नि बोम्ब्याला झोळीत आता काय दक्षिणा टाकावी या विवन्चनेत राहणारे यजमान हातात श्रीफलाची करवन्टी देणाच्याही लायकीचे नाहीत. आता बोम्बीशी लग्न केले तेव्हा तिच्यात असे मुस्काटफोड तत्वज्ञानाचे अन्ग आहे, हे ठाऊकच नव्हते हा भाग अलाहिदा. पूजापोथीतले तत्वज्ञान जितक्या बारकाईने समजून घेतले, तितकाच त्यातला बालिश फोलपणाही समजून घेऊन ज्ञानाच्या वाढीसाठी पोथ्यापुराणान्व्यतिरिक्त इतरत्र वळणार्‍या यजमानान्ची जातकुळी वेगळी; पोथ्यापुराणान्च्या बाहेर जगच नाही असे समजून सटिसामासि ती घातली, की समाजात वावरायला उजळवर्ण एकदाचा मिळतो म्हणून ती पूजा एकदाची मूर्खमनोभावे घालून मोकळे होऊन धन्यता मानणार्‍यान्ची जातकुळी वेगळी; आणि पोथ्यापुराणान्तच आयुष्याचे सार आहे, बाकी सारे फोल आहे असा दांभिकहट्टाग्रह धरून, बोम्ब्यास बोलावून पूजेचा घाट घालून त्यासाठी घरातल्या सार्‍यान्नाच काय, पण बोम्ब्यासही अतिकर्मठपणे तुच्छ लेखून कामास लावून पूजा घातल्यावर पीठाधीश शन्कराचार्यान्चा आव आणून एव्हरेस्ट जिन्कल्याच्या थाटात क्षुद्र बोम्ब्याच्या झोळीत कवड्या घालणार्‍यान्ची जातकुळी वेगळी. आता यान्त श्रेष्ठ जातकुळी कोणती हे बोम्बीच्या बाबान्ना विचारले असते तर शिन्च्यापासून सुरूवात होऊन कानाखाली पोथीचा धीरगंभीर आवाज काढण्यात त्याचा शेवट झाला असता. वर इतकीही दीडदमडीची समज आली नसेल तर त्या पोथ्यापूजान्पासून कायमची फारकत घे- अशी मुक्ताफळे झोळीत पडली असती. असो. एकेकाळच्या सत्यनारायणाच्या प्रसादातल्या साजूक तूपासारख्या नाजूक बोम्बीचे बोचके झाले म्हणून मी आजकाल तीस पर्वती म्हणतो. पण त्याकाळच्या नाजूक बोम्बीने मला जे काय दिले असेल, त्यापेक्षा कैक पटीने आजकाल पर्वती झालेल्या बोम्बीच्या तत्वज्ञानातून मला मिळते. मला आजही तीच नाजूक बोम्बी हवी असा हट्ट धरतो, तर बोम्बीचे बाबा मला कैलासात हाकलते झाले असते, हा भाग वेगळा, पण तसे मनातच येत नाही, यासाठी तरी सत्यनारायणाचे आभारच मानले पाहिजेत. अर्थातच कितीही झाले आणि बोम्बी माझ्यासाठी तत्वज्ञानाचा पर्वतही झाली तरी जगात अफाट तत्वज्ञाने आता शिल्लकच राहिली नाहीत अशा अविर्भावात मी तिला तत्वज्ञानाचा एव्हरेस्ट म्हणालो तर ती स्वतःच तिच्या बाबान्चा अवतार धारण करील यात शन्काच नाही.

Proud

चर्चा आवडली. मला अवचटांचे लिखाण आवडते, अगदी परवा वाचलेला सकाळातला डार्विनवरील लेख देखिल आवडला. तरी 'हल्ली अवचट वाचवत नाहीत' हे मत सोडून रैनाची सगळी मते पटली. Happy

अभिरुची म्हणजे नक्की काय हा मुद्दा आहे. आणि अमकी अभिरुची जास्त चांगली/ उच्च प्रकारची असते का हा ही. इतर कलाप्रकारांपेक्षा साहित्यात प्रतवारी ठरवणे जास्त सोपे वाटते. त्यातही गद्य साहित्यात. कवितेत किंवा चित्रात किंवा एखाद्या लकेरीत कोणाला काय दिसेल, जाणवेल सांगता येत नाही. त्या मानाने गद्य साहित्याच्या मर्यादा जास्त ठळक. तरी साहित्य हाही कलाविष्कारच. त्यामुळे आस्वादकाला कलाकृतीत काय आढळेल, काय भिडेल हे ठोक नियमाने सिद्ध करता येणार नाही. त्यातल्या त्यात बहुसंख्यांना काही एक प्रकार आवडण्याची शक्यता जास्त असे फारतर म्हणता येईल. (उदा. हॅरी पॉटर, पुलंचे विनोदी लेखन.) काही लेखक/ कलाकार इतरांहून अधिक प्रज्ञावान तसेच काही आस्वादकही. आणि काही सुमार, मध्यम, सामान्य. पुन्हा यातील सीमारेषाही ठळक नाहीच. त्यामुळे प्रतवारी करणे सोपे 'वाटले' तरी तसे नसतेच. Happy

अवचटांचे लेखन, मला वाटते, 'साहित्यकृती' म्हणून बघण्यापेक्षा तत्कालीन समाजाचे वर्णन म्हणून बघितले पाहिजे. मी अमक्या लोकांना भेटलो, अमके बोललो व मला असे वाटले अश्या प्रकारचे ते लेख. जिवंत माणसाने लिहिलेले आहे, म्हणजे ते संपूर्णपणे नि:पक्षपाती नसणार. पण तरी त्यात कुठलाही आव आणलेला नाही हे त्या लेखनाचे विशेष. तो विशेष आता गळून पडला आहे काय? ते कोणत्या तरी विचारधारेचे समर्थन करू लागले आहेत काय? (हे मला खरेच पडलेले प्रश्न.) की वाचकांना जाणवलेले अवचटांच्या लेखनाचे विशेष काही वेगळेच आहे? (आणि ते आता त्यांच्या लेखनात दिसत नाही?)

लतापेक्षा हिमेश वाईट असेलही, पण म्हणून मी त्याची गाणी ऐकूच नये, असं थोडीच आहे?>> ऐका की. पण लताला हिमेश किंवा vice versa म्हणू नये. कारण हे केवळ semantics नाही. प्रत्येक genre मध्ये काहीतरी वेगळे, एकापेक्षा दुसरे, अनेकपदरी वेगळे, पुर्वसुरींपेक्षा भिन्नं सापडणार. काळानुसार कलाकृतीच्या श्रेष्ठत्वाच्या संकल्पना बदलणार आणि जे कालातीत ते 'प्रमाण' या संज्ञेपर्यंत पोचणार हा प्रवास आहे ना ? (का?). उत्क्रांती सर्व दिशा सँपल करत जाते ना ? (साभार: आश्चिग)
प्रत्येक पिढी, हेच 'प्रमाण' का? आम्हाला मंजूर नाही असे म्हणणार, प्रश्न विचारणार. आणि त्यांनी ते तसे म्हणावे/विचारावे अशी माझी अपेक्षा आहे.
ग्रेडेशन (मानांकन?) एका genre अंतर्गत तरी असूच शकते. बालसाहित्यापेक्षा कादंबरी श्रेष्ठ असे मुळीच नाही. पण बालसाहित्यातल्या ५० लेखकांची तुलना करता त्यातही ग्रेडेशन करता येईलच. की नाही येणार?

मुद्दा आहे की तसे ते आवडावेत की नाहीत, आयुष्यभर आवडावेत की नाहीत, हा>>
पण पुस्तकं, लेखक, कलाकार आणि त्यांचे कलाविष्कार अश्यांच्याबाबतीत पर्वती आणि हिमालय ह्या जागा व्यक्तिसापेक्ष/ अनुभवसापेक्षच आहेत. शास्त्रीय सत्य नाहीत. मग फॉसिलायझेशन कसे काय?>>
आयुष्यभर त्याच तीव्रतेने (intensity ने) आवडणे, त्या लेखकांच्या मर्यादाच न जाणवणे, जाणवल्यास त्या मान्य करता न येणे, आणि तिथेच त्याच जगात थबकून रहाणे, बाहेरच्या कशाशीही 'रिलेट' न होऊ शकणे यालाच मतांचे पक्के सिमेंट होणे अर्थात 'फॉसिलायझेशन' असे म्हणायचे होते.

तेव्हा त्या त्या वेळी ती ती स्थाने असणार...>> Happy

कोण काय वाचतं, याची काळजी उगाच कोणी का करावी?>> स्वतःची मात्र करावी का? काटेकोरपणे. इथे आपण का रेंगाळतोय, यातले नेमके काय आवडले, का? ह्याच्या पलिकडे काय आहे? याचा शोध घ्यायला हवा का?

ज्ञानदाचा ब्लॉग काही दिवसांपुर्वी वाचनात आला. जनरलायझेशनमुळेच थोडाफार सोडुन देण्यात आला.
'अवचट वाचणारे' म्हणजे अवचटांचे काहिही वाचलेले का? मी त्यांचे इतक्यातले काहीच वाचले नाही (लहान मुलांकरता लिहिलेले एक गोष्टींचे पुस्तक सोडुन). त्यामुळेच बहुदा मी कसा आहे ते मला कळले नाही.

अवचट हे तसे fiction लिहिणारे देखील नाहीत. त्यामुळे इथे होत असलेली थोडी चर्चा त्यांना तितकी लागु होत नाही (ज्याप्रमाणे वर्तमानपत्र वाचणारे वाचक नाहीत त्याच न्यायाने). दिसेल त्यावर त्यांनी निबंध लिहिले तर काय वाईट?

कोणी त्यांची किती व कोणती पुस्तके वाचली व त्या व्यतिरीक्त कायकाय (आणि कोणाकोणाचे) वाचले यावरुनही लोकांच्या मनात काय आहे ते सांगता येणे कठीण आहे. मुळात जे काहिही वाचत असतील ते न वाचणार्‍यांपेक्षा सरस (जर तुम्हाला एक व्यक्ती दुसर्‍यापेक्षा absolute sense मध्ये 'चांगली' असु शकते असे वाटत असेल तर ['पटत' नाही म्हंटलेले]).

बाकी, चळत वाचण्यापेक्षा पसरट साहित्य वाचलेले नक्कीच जास्त फलदायी ठरावे.

Pages