चांगले 'साहित्य' / 'चांगला' वाचक म्हणजे काय ?

Submitted by Adm on 22 November, 2010 - 21:34

'मी वाचलेलं पुस्तक' बाफवर सुरु झालेली चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा.
चांगलं 'साहित्य' आणि 'चांगला' वाचक म्हणजे नक्की काय ? अशी व्याख्या करणं शक्य आणि गरजेचं आहे का?

मेघना भुस्कुटेने टाकलेल्या पोस्टवरून ही चर्चा सुरु झाली.

अवचटांबद्दलची ही एक प्रतिक्रिया वाचनात आली. मला ती बेहद्द आवडली आणि पटली. काहीशी कडवट असूनही.
http://dnyanadadeshpande.blogspot.com/2010/10/blog-post_29.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका लेखकापासून त्याच लेखकाचा निस्सीम वाचकभक्त किती वेगळा काढता येतो? म्हणजेच लोकशाहीतून मताधिकार असलेली प्रत्येक प्रौढव्यक्ती बाजूला काढता येते तितपत?
आता गंमत म्हणजे तिथे ब्लॉगवर वाचक डोक्यावर घेतात तर लेखकांची काय चूक, वाचकांवर टीका करा, लेखकांवर कशाला अशीही प्रतिक्रिया आली आहे. Happy

आजसाठी हे- Bertolt brecht ची Burning of the books
http://poetrydispatch.wordpress.com/2010/02/22/bertolt-brecht-the-burnin...

मूळ जर्मन इथे आहे
http://www.yolanthe.de/lyrik/brecht05.htm

"अनेकदा असं होतं की केवळ आपल्याच लोकांसाठी लिहिण्याचा निर्णय घेणारा लेखक अधिक मोठ्या समुदायासाठी अनोळखी राहतो, अगदी तो अप्रतिम साहित्य लिहीत असला तरी. पण विश्लेषणच करायचं तर आपण सर्वच एका ठराविक प्रेक्षकवर्गासाठी/वाचकवर्गासाठीच लिहीत नसतो का? आपले वाचक कोण आहेत हे आपल्याला कळलं आणि आपण ते ठरवलं तर हा वादच बहुतांशी निकाली निघेल. एकदा का हा निर्णय झाला की मग जे माझे वाचक मुळातच नाहीत अशांकडून मान्यता आणि कौतुक मिळवण्याची अपेक्षा लेखक कशाला करेल? सगळ्या लेखकांना रोजच्या व्यवहारात ज्यांच्याशी संवाद होत असतो आणि ज्यांच्याशी आपली नाळ जुळलेली असते अशा वाचकांचीच गरज असते. आणि अशा प्रकारचं गहिरं नातं वाचकाशी निर्माण करण्यात यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या स्थानाशी इमान असणं."
महेश एलकुंचवार - वैश्विक लेखक स्थानिक इमान (इंग्रजीत लिहिणारे भारतीय लेखक या विषयाच्या अनुशंगाने)- अक्षर दिवाळी २०१०.

महेश एलकुंचवारांचे म्हणणे पटते. स्थान मात्र सापेक्ष असु शकते. Do what you are best at. पण अर्थातच हे लेखकाच्या अनुशंगाने झाले.

प्रत्येक वाचकाने लेखक बनुन पहावे ...

>>>>> पण विश्लेषणच करायचं तर आपण सर्वच एका ठराविक प्रेक्षकवर्गासाठी/वाचकवर्गासाठीच लिहीत नसतो का? <<<< बहुधा तसच असत (पण माझ्यासारखे अपवाद वगळता, माझे लेखन कोणीही वाचावे अशी माझी अपेक्षा अस्ते, व तसे मी लिहीत जातो, पण कधी कधी अनुल्लेखवाले "ज्जा, आम्मी नै वाचत तुज कैच्च" अशा गमजा नाक फेन्दारुन मारायला लागले की मग "ते देखिल" वाचतीलच वाचतील, न वाचून सान्गतात कोणाला, असे लिहीतो! Proud
असो

>>>>> आपले वाचक कोण आहेत हे आपल्याला कळलं आणि आपण ते ठरवलं तर हा वादच बहुतांशी निकाली निघेल. एकदा का हा निर्णय झाला की मग जे माझे वाचक मुळातच नाहीत अशांकडून मान्यता आणि कौतुक मिळवण्याची अपेक्षा लेखक कशाला करेल? <<<<< नाहीच करणार, पण इथे माबोवरच बघा, एखाद्या विषयाचे वाचक्/अभ्यासक नसले तरी विरोधक अस्तातच ना? त्यान्च्याकरता नाही लिहीले तरी तिथे नाक खुपसायच्या हल्लाबोल उपद्रवी सवईनुसार "हे अस्ले वाचक" तिथे कडमडतातच, अन वाद होतातच! मागे माझ्या पोपटाच्या बीबीवर देखिल असाच हल्लाबोल झाला होता Biggrin

वाचन ही काहितरी उच्च कला-अभिरुची आहे वगैरे समजातून मुळात इतर काय वाचतात ह्यावरुन त्यांची पात्रता ओळखायची भावना वाढीला लागते. एखाद्याला संगीत आवडते/कळते, एखाद्याला चित्रकला-शिल्पकला, तसेच कुणाला लेखन. त्यातसुद्धा केवळ गद्य भावणारे काही, केवळ पद्य भावणारे काही असे आहेतच. काही लोकांना एकच नव्हे तर अनेक कलांची उत्तम जाण असते.

मुळात वाचता येणे हे एका विशिष्ट वर्गाशी निगडीत झाल्याने (इंग्रज राजवटीत शालेय शिक्षण असलेले लोक इतरांपेक्षा सुस्थितीत गेल्याने असेल) वाचनाची आवड असणे हे एक उच्च अभिरुचीचे लक्षण मानले जाउ लागले. त्यातच आमच्या पिढीत टी.व्ही. बघणे वाईट व वाचणे हे चांगले असे मध्यमवर्गीय संस्कार ह्या समजास अजून बळकटी देउन गेले. माझे अजूनही टीव्ही बघणे हे खरेच वाईट आहे का ह्यावर नक्की मत बनले नाही.

आता चांगले वाचक व चांगले साहित्य याकडे वळू. मुळात 'चांगला' हे विशेषण फारसे बरोबर नाही. खूप जास्ती वाचणारा, कमी वाचणारा, निवडक (ज्याच्या-त्याच्या आवडीनुसार) वाचणारा हे योग्य वाटते. चांगले साहित्य हे absolute मोजपट्टीवर मोजणे अवघड. वाचकाच्या नजरेतून चांगले-वाईट ठरणार. अमुक एका पद्धतीचे लेखन चांगले, अमुक एका पद्धतीचे लेखन वाइट असे कप्पे करणे शक्य नाही. पण मग तरी एखादा वाचक एखाद्या लेखकाला/लेखनाला चांगले-वाईट असे लेबल का लावतो? कारण वाचक आपला वेळ-उर्जा पुस्तक/लेख वाचण्यात गुंतवत-खर्च करीत असतो. त्या खर्चामागे/गुंतवणुकीमागे त्याची एक अपेक्षा असते. ती पुरी झाली व त्यापेक्षा अधिक हाती लागले तर तो खुष होतो. ती पुरी नाही झाली तर तो शिव्या घालतो. ज्या लेखक-कवींच्या कलाकृतींमधून ती पुरी होत नाही त्यांच्या वाटेला मग तो जात नाही वा जायला घाबरतो. मग साधारण आपल्या सारखी आवड असणार्‍या वाचकांना आवडणारी पुस्तकं तो वाचतो. त्यांनी सुचवलेल्यावर जास्त विश्वास टाकतो. अधिकाधिक वाचनातून एक वाचक म्हणुनदेखील तो प्रगल्भ होत असतो. ही प्रगल्भता पुन्हा तौलनिकच आहे. तसे व्हावे किंवा तसे होणे हेच अपेक्षित आहे असे नाही. अनेक लोक केवळ थरारक/रहस्यमय कादंबर्‍यात आयुष्यभर तल्लीन होतात. ती त्यांची आवड असते. काही नेहेमी नवीनच्या शोधात असतात. काही विशिष्ट लेखकांच्या कार्याशी निगडीत राहू इच्छितात.
वाचनाची वाढ आडवी असते. उभी/hierarchical नाही. अमूक एक वाचल्याने तुम्ही श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही. काही वाचल्यानेच मुळात श्रेष्ठ-कनिष्ठ ठरत नाही. कलेची आसक्ती, जाण व अनुभुती ह्या अतिशय वैयक्तिक गोष्टी आहेत. आणि त्यामुळेच प्रत्येक व्यक्तिला आवडणार्‍या-नावडणार्‍या कलाकृतींची स्तुती वा टिका करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. अश्या टिकेतून-स्तुतीतून काही वाचकांना आपल्या वाचनाची कक्षा अधिक रुंदावता येते, लिखाणातील सौंदर्य टिपण्याची काही नवीन-अनवट मोजमापे/जागा कळतात हे त्या टिकेचे-स्तुतीचे एक उपयुक्त byproduct आहे इतकेच.

@टण्या : उत्तम प्रतिसाद. सहमत आहे.

इथे शांता शेळके यांचे विचार आठवले, (जसे आठवले तसे, चूभूद्याघ्या) "माझे वाचन बकरीसारखे आहे. बकरी ज्याप्रमाणे सर्व प्रकारचा पाला, पाने खाते तसेच मलाही सगळ्या प्रकारचे वाचायला आवडते. एकदा मी एका मोठ्या विचारवंतांना भेटायला गेले. त्यांना विचारले, तुम्ही काय वाचताय? तर त्यांनी एका तत्वज्ञानातील किचकट ग्रंथाचे नाव सांगितले. मला विचारल्यावर मी म्हटले मी सध्या शनिमहात्म्य वाचते आहे." Happy

चर्चा खरच छान वाटली.

अवचटांचे लेखन फार फार आधी चांगले वाटले होते. पण पुढे पुढे ते इतके ढिसाळ आणि स्वस्तुतीपर होत गेले, की घरातल्या कामवाल्या बाईला त्यांनी गरजेला हजार रुपये दिले वा सिग्नलवरच्या मुलांना गाडीतले जवळचे खाद्यपदार्थ देउन टाकले एवढ्या भांडवलावर ते तीन लेख, चार मुला़खती व पाच भाषणे करू लागले तेंव्हा मात्र उबग आला.

या वर्षीच्या दिवाळी अंकातले त्यांचे लेखन खरच छापण्याच्या तरी लायकीचे होते का ? ( मी पण बकरीच आहे त्यामुळे खाल्ला हाही पाला.. )

विषयामधला 'उपहास' मला (एकटीलाच) न समजल्यामुळे "मला जिथे चर्चेचा विषयच समजला नाही आहे, तिथे अधिक लिहायला जाऊ नये' असा विचार करून मी ह्या चर्चेमधला लिखित सहभाग थांबवला होता.
पण आत्ता टण्याचे - चांगला वाचक आणि चांगले साहित्य यावर भाष्य करणारे पोस्ट वाचले... आणि अजून कोणालातरी उपहास समजला नसावा असा भास झाला Happy
(हे विधान चुकले असेल तर माफी.. मी परत एकदा चर्चेच्या 'read only mode' मधे जाते) Happy

मुळात जिथे 'उपहासात्मक' शीर्षक वापरले आहे, म्हणजेच 'चांगला वाचक किंवा चांगले साहित्य असं काही नसतंच' असा उपहास करूनच चर्चेला विषय दिला आहे तिथे व्याख्या केली काय आणि नाही केली काय ... काय फरक पडतो ?

पराग, माफ कर. पण काहीतरी मला समजलं नाहीये, ते समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे .. इतकंच !

रार, शीर्षकतले भाव कळून/ न कळून ९८ पोस्टी पडल्या... काहींनी एकमेकांना अनुमोदनं दिली.. काहींनी एकमेकांची मतं खोडून काढली... काहीजण चर्चा चांगली चालली आहे म्हणाले तर काही जणांची सगळी मत मांडून लेखनसीमा झाली म्हणाले... त्यामुळे "जाऊ द्या झालं".. Happy

जी एस साहेब , अहो लेखनात डावे उजवे येतेच. वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यबाह्य दबावातूनही वेळोवेळी साहित्य निर्माण होते. 'माझ्या फ्रीजमध्ये स्कॉचच्या बाटल्या याव्यात म्हणून मी लिहीतो' असेही एकदा भाऊ पाध्यानी लिहिले होते. त्यामुळे अवचटाना देखील खनपटीला बसलेल्या सम्पादकांचा तगादा भागवण्यासाठी, ससेमिरा चुकवण्यासाठी 'ठोकुनी देतो ऐसा जे' असे करावे लागते. जे लेखन उर्मीतून, अथवा 'स्वान्त सुखाय ' केलेले असते त्याला दर्जा असतोच.

प्रत्येक वेळी सारखा दर्जा असायला ते काय सॉफ्ट वेअर आहे.?

ग्रामीण साहीत्य म्हटलं की द मा मिरासदार आणि शंकर पाटील चटकन का आठवतात ? पण मुळात या साहीत्याची वर्गवारी ग्रामीण अशी का करावी ? ते मराठी साहीत्य नाही का ? मुस्लीम साहीत्य, दलित साहीत्य अशी वर्गवारी केल्यानंतर शिल्लक राहतं त्यालाही नाव द्यायला नको का ? साहीत्याची अशी वाटणी करणे हे सुजाण वाचकाचे लक्षण म्हणता येईल का ?

साद, हा धागा वरती काढल्याबद्दल आभार. फार जबरी चर्चा झालेली आहे.

या चर्चेतले आपलेच जुने प्रतिसाद व त्याच्या तारखा वाचल्या की ताबडतोब संतूर ची वडी आणावीशी वाटते !

हा धागा वरती काढल्याबद्दल आभार.
अकरा वर्षांपूर्वीची चर्चा..! कशी काय वाचायची राहून गेली काय माहित..! विशेषत: टवणे सर आणि फारएण्ड यांचे प्रतिसाद फारच महत्त्वाचे आहेत.. ! बाकी ही चर्चा आधी वाचनात आली असती तर मी उगाचच इकडेतिकडे काही उथळ मतं व्यक्त केली होती, ते आठवून आत्ता खजील वगैरे होतोय.. काय काय वाचणारे लोक आहेत इथे..!
Happy

Pages