चांगले 'साहित्य' / 'चांगला' वाचक म्हणजे काय ?

Submitted by Adm on 22 November, 2010 - 21:34

'मी वाचलेलं पुस्तक' बाफवर सुरु झालेली चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा.
चांगलं 'साहित्य' आणि 'चांगला' वाचक म्हणजे नक्की काय ? अशी व्याख्या करणं शक्य आणि गरजेचं आहे का?

मेघना भुस्कुटेने टाकलेल्या पोस्टवरून ही चर्चा सुरु झाली.

अवचटांबद्दलची ही एक प्रतिक्रिया वाचनात आली. मला ती बेहद्द आवडली आणि पटली. काहीशी कडवट असूनही.
http://dnyanadadeshpande.blogspot.com/2010/10/blog-post_29.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवचट आवडणा-या वाचकांच सारं पॅकेजच नंतर उमगून येतं. >>> या जनरलायझेशन मधे गोची नाही का वाटत?

अवचटांची चार पाच पुस्तके वाचल्यावर पुढची वाचायला कंटाळा येत असेल तर ते समजू शकतो. पण त्या न आवडण्याची केलेली सोशल कॉमेंटरी पटत नाही.

खालची एक कॉमेंट वाचून तर मजा आली: पुलं एवढे लोकप्रिय कारण मराठी माणसाला विनोदातील फारसे वैविध्य वाचायला मिळाले नाही. हे म्हणजे रिचर्ड्स आणि गिलख्रिस्ट भारतीय संघात नाहीत म्हणून सचिन लोकप्रिय आहे म्हणण्यासारखे झाले.

हम्म्म, अवचट आवडण्याचा एक काळ असतो (का होता? कारण आताचे टीनेजर्स अवचट वाचतात का ते माहिती नाही). आणि तो बर्‍याचवेळा जगाचा अनुभव न आलेला, रोमँटीसिझमचा असतो.
अवचट कुठलाही फर्म स्टँड घेत नाहीत, विश्लेषण तर नाहीच नाही, नुसती डीसपॅशनेट वर्णने किती दिवस आवडणार?
तरी 'माणसे', व्यसनमुक्तीचे अनुभव लिहिणारे, अवचट बरे होते, आता म्हणजे आला अनुभव की लिही असे चाल्लेय.
पण लोकांना अवचट लागतात, अवचट वाचून 'सामाजिक जाणिवा' विस्तृत झाल्याचे, 'संवेदनशीलता' वाढल्याचे समाधान मिळवण्यासाठी.

>>तरी 'माणसे', व्यसनमुक्तीचे अनुभव लिहिणारे, अवचट बरे होते, आता म्हणजे आला अनुभव की लिही असे चाल्लेय.
पण लोकांना अवचट लागतात, अवचट वाचून 'सामाजिक जाणिवा' विस्तृत झाल्याचे, 'संवेदनशीलता' वाढल्याचे समाधान मिळवण्यासाठी.<< पटतयं !

अवचटांबद्दल आगाऊ, मेघना, फारेंड सर्वांना अनुमोदन.
पण लोकांना अवचट लागतात, अवचट वाचून 'सामाजिक जाणिवा' विस्तृत झाल्याचे, 'संवेदनशीलता' वाढल्याचे समाधान मिळवण्यासाठी

फार पूर्वी वाचलेली ( अरुण साधु?) 'त्यांच्या ज्वलंत सामाजिक जाणिवांचे निखारे' कथा आठवली.

एवढ्यापुरतेच अवचट लागतात हे अर्धवट सत्य अन्यायकारक आहे. हे अर्धसत्य स्वतःपुरते ठीक असेल पण त्याचे जनरलायझेशन करणे योग्य नाही. अवचतांच्या लिखाणामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनशैलींचा परिचय होऊन, ज्याचा प्रत्येकाचा अनुभव घेने शक्य नसते, त्या त्या सेक्टरबद्दल दृष्टीकोन बदलण्यास, विस्तारण्यास मदत होत नाही काय.?
पण लोकांना अवचट लागतात, अवचट वाचून 'सामाजिक जाणिवा' विस्तृत झाल्याचे, 'संवेदनशीलता' वाढल्याचे समाधान मिळवण्यासाठी
मला स्वतः ला अवचट लागतात हे या कृतक समाधानासाठी नाहीत. आणि अनेकानाही नाहीत. अवचट पुणेकरांसाठीच लिहितात हा सतीश तांब्यांचा शेरा कुजकटच आहे. तांब्यानी सर्व्हे केलाय काय? पुण्याबाहेर अवचट माहीत नाहीत, खपत नाहीत , लोकप्रिय नाहीत की स्वीकारले जात नाहीत?

हे फक्त ते लिहिणार्‍यापुरते आणि त्याला पाठिम्बा देणार्‍यांपुरतेच खरे आहे. अन्यथा अवचट कधीच कालौघात लुप्त झाले असते. अनेक समकालीन बाबींचे अवचतांच्या लिखाणामुळे दस्ताऐवजीकरण झाले नाही काय?
स्वतः दोन ओळी खरडता येत नसताना पिन्का टाकणारे आत्मप्रौढीपर शेरे आहेत हे.

अवचातांवर टीका एका विशिष्ट वर्गातूनच होते त्याची कारणे साहित्यबाह्य आहेत. साधारण 'सोबत' या दिवंगत सापताहिकाच्या विचारसरणीशी जवळीक साधणारी ही विचारसरणी आहे.

स्वतः दोन ओळी खरडता येत नसताना पिन्का टाकणारे आत्मप्रौढीपर शेरे आहेत हे.>>>>
असे कसे? वाचक म्हणून आवडी-निवडीबाबत बोलणे यात कसली आत्मप्रौढी?
रंगीला या आमिरच्या चित्रपटात त्याच्याच तोंडी एक संवाद आहे,
अपून पब्लीक है, जो चाहे बोलेगा... असाच काहीसा.
प्रत्येक पुस्तक पैसे देऊन विकत घेते मी. वाचन हा छंद आहे जोपासते आपल्या परिने.
नेमाड्यांची सगळी पुस्तके आहेत माझ्याकडे, पण हिंदूने साफ निराशा केली.
अवचटांच्या बाबतितही असंच काहीसं.

हंसाजी, तुमच्या न आवडण्यात प्रांजळपणा आहे. नाही आवडत म्हणजे नाही आवडत.पण त्या ज्ञानदा देशपांडे आनि इतरांचे न आवडणे हे 'इतक्या लोकाना हे आवडते म्हणजे काय? त्यांच्या पेक्षा आमचा चॉइस 'हटके' आहेत' हे ठसविण्यासाठी अहंमन्यता दर्शविणारा आहे. आणि पुन्हा ज्याना हे लेखक आवडतात ते लोक किती बाळबोध आहेत दर्शविणारा आहे. सत्यदेव ग्रेट पण बाळ कोल्हटकर ? शी शी. बरं बाळ कोल्हटकर तर शी : शी: आहेतच पण बाळ कोल्हटकर आवडणारे तर त्याहून अधिक शी: शी: आहेत. जीए ग्रेट पण अरविन्द गोखले शी: शी:, (गोखले आवडणारे तर अधिकच शी: शी:).बाबूराव अर्नाळकराना तर जन्माला येण्याचा देखील हक्क नसावा बहुधा.
शेरेबाजी करण्याच्या पद्धतीवर आक्षेप आहे.

अवचातांवर टीका एका विशिष्ट वर्गातूनच होते त्याची कारणे साहित्यबाह्य आहेत.>>> माझी अवचटांच्या लेखनाबद्द्लची मते कुठल्याही साहित्यबाह्य कारणातून आलेली नाहीत. आणि 'त्या' वर्गाचा मी प्रतिनिधी नक्कीच नाही.

अवचट सुरुवातीला प्रभावी वाटले, त्यांनी एक ठसा जरुर उमटवला, ते मी नाकारत नाहीए. पण त्यांचे गेल्या काही वर्षातले लिखाण निसःत्व होत चालले आहे. त्यांचे नाव वाचून तो लेख उत्साहाने वाचायला घ्यावा आणि एक पोकळ अनुभवकथन हाताला लागावे हा निराशाजनक अनुभव अनेकदा आल्याने ही प्रतिक्रिया.

बाकी ते 'चॉईस हटके' वगैरे पवित्रा मलाही मान्य नाही आणि अवचटांवरची टीका त्या भूमिकेतून मी तरी नक्किच केलेली नाही. 'लोकांना अवचट लागतात' असे मी जेंव्हा म्हणतो आहे तेंव्हा त्या लोकांत कधीकाळी मी ही होतो हे मला मान्य आहेच.

मला स्वतः ला अवचट लागतात हे या कृतक समाधानासाठी नाहीत. आणि अनेकानाही नाहीत.>>> मग कशासाठी लागतात ते स्पष्ट करा.

बाळू जोशींना अनुमोदन.

आणि आगाऊला सुद्धा. आगाऊने (आणि टण्याने सुद्धा) स्वतः पुरतं लिहीलय असं मला वाटलं. अवचट वाचायला मला पण आवडायचे. अजूनही अवचटांनी सुरुवातीला लिहीलेलं वाचायला आवडतं. पण एवढ्यातले त्यांचे लेख वाचल्यावर आगावासारखाच अनुभव आला.

बाळू जोशींना थोडेसे अनुमोदन. त्या लेखाची सुरुवातच मुळी ' बर्तोलुचीच्या ‘शेल्टरिंग स्काय’ या चित्रपटाची ..' अशी आहे. आम्ही बर्तोलुची चे सिनेमे बघतो हा स्नॉबिशनेस डोकावतोच. पण अवचटांचे लेखन न आवडणारे सारे 'सोबती' च हे ही फारच जनरलायझेशन होईल. अवचटांचे सुरुवातीचे लेखन मलाही आवडते आणी ते पुरेसे सशक्तही आहे. आजकाल वयोमानाप्रमाणे confrontational लिहायचे थांबवले असावे.

अवचट, वपुच काय पण पुलंही कोणाला आवडत नसतील यात काहीच वाद नाही. वाचकाने आपल्याला आवडले नाही हे खुशाल सांगावे.

मला पटत नाही ते "मग अवचट आवडणार्‍यांचे पॅकेज कळते" अशासारखी मते. आणि एकूण जनरलायझेशन.

एखाद्याला एखादा लेखक्/कलाकार आवडत असेल तर केवळ त्यावरून ती व्यक्ती, तिची साहित्यिक समज वगैरे बद्दल अंदाज येतो हे हास्यास्पद आहे.

उदा: त्या लिन्कवरचे वाक्यः
"इयत्ता आठवीपर्यंत मुलं किंवा नवीन मराठी शिकणारे परभाषिक यांनी अवचट अगत्यानं वाचावेत; मात्र नंतरही त्यांनाच कवटाळणार्‍या वाचकांचा पॅटर्न आता, मला प्रेडिक्ट करता येतो."

बाकी उच्च (किंवा साधे) मध्यमवर्गीय, पुणेकर, स.पे वाले, पांढरपेशे वगैरे नेहमीची गिर्‍हाईके आहेत. कसलेही जनरलायझेशन द्या ठोकून त्यांच्याबद्दल. चार पाच तरी सपोर्टर सहज मिळून जातात.

आगाऊला, ज्ञानदाला, मेघनाला अनुमोदन.
अवचटांचे अलिकडच्या काळातील लिखाण आणि नैमित्तिक रतिब अजिबात वाचवत नाहीत. फार कशाला अगदी दहा वर्षापूर्वीपर्यंतही उत्तम लिहायचे. मला वाटतं मागच्या वर्षीच्या शब्द (की अक्षर?) दिवाळीअंकातील त्यांच्यावरील परिच्छेद भारी होता. त्यांच्या योगदानाचा उचित आढावा होता. कोणाकडे असेल तर तो परिच्छेद डकवा इथे कृपया.
(लेखकाने किंवा कोणीही) कुठे थांबावं हे फार महत्वाचे असते, हे अवचटांकडे पाहून कळते. दुर्दैवं आहे.

बाजो- पुन्हा एकदा. अर्नाळकर म्हणजे प्रमाण साहित्य (canons of literature) नाही आणि ते का नाही. एवढे जरी साहित्याच्या अभ्यासकास कळले तरी खूप झाले. पण म्हणून काही त्यांचे महत्व कमी होते असे नाही. उत्तम वाचकाला आपली नक्की कुठली बौद्धिक गरज कुठल्या प्रकारच्या साहित्याने भागवली जाते हे कळणे महत्त्वाचे. बाकी 'कळत नाही म्हणूनच केवळ थोर' असले लोकं असतातच हेही मान्य.

रैना,

अर्नाळकरांचं साहित्य 'साहित्य' का नाही, आणि 'उत्तम वाचक' म्हणजे नक्की कोण, हे कृपया सांगशील का? स्मित

मला साहित्य आणि साहित्यिक या शब्दाची व्याख्या सांगेल का कुणी?
अगदी अडाणी माणसाला कळेल अशी सांगा म्हणजे मला कळेल.

चिनूक्स,
ज्याला लेखना(का)च्या (आणि स्वतःच्याही) मर्यांदांसकट लेखन जाणवते/भीडते, तो माझ्यालेखी उत्तम वाचक. त्यासाठी स्वतःची चौकट तपासून/विस्तारुन्/आक्रसुन पहाणे ही पूर्वअट. आणि जो कुठल्यातरी एकाच खुंटाला बळकट करुन त्याभोवती एका 'इझम' चा कोष विणत नाही तोही, आणि जो लेखकाला देवत्व वगैरे द्यायच्या भानगडीत पडत नाही तोही.
केवळ मला आवडते/आवडत नाही हा एकच स्तर झाला. आणि मला आवडते, कंफर्टेबल वाटते, मला झेपण्याइतपतच ते टोकदार,रुचकर आहे, 'मी रिलेट करु शकले' (साभार : अरभाट) म्हणूनच केवळ त्याला काहीच मर्यादा नाहीत असे होऊ नये उत्तम वाचकाच्या बाबतीत असे वाटते.
मला पुलं आवडतात, त्यांच्या लेखनाच्या मर्यांदांसकट. कुठल्याही लेखकाच्या (आणि स्वतःच्याही मर्यादा दिसणे/जाणवणे/मान्यकरणे/तपासून पहाणे) महत्त्वाचे वाटते. आवडणार्‍या/नावडणार्‍या (प्रत्येक नाही तरी बहुतांश) लेखनाच्या मर्यादा मला स्पष्टपणे आणि तीव्रतेने जाणवतात. तेवढे माझ्यासाठी खूप आहे.

"आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें,शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ,शब्दची अमुच्या जीवांचे जीवन शब्दें वांटूं धन जनलोकां,तुका म्हणे पाहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करु "...
हे जर वाचकासाठी खरे असले तर कशाचेही सर्मथन करावयाची गरज भासू नये. अवघड आहे खरेच. ज्ञानदाबाईंइतके मी अवचटांबद्दल कधीच लिहू शकत नाही, कारण माझ्याडोळ्यासमोर त्यांचा चेहरा येतो, मुक्तांगण येतं. असं वाटतं जाऊ दे. म्हातारे आहेत झालं. पण तीही त्यांचीच हार नाही का?

असं समजू की एक अवकाश आहे, त्यात आपण एकेक साहित्यकृती / पुस्तकं/काहीही वाचत, जोखत चाललो आहोत (डिनोटेड बाय 'बुडबुडे'), तरी उरलेली बुडबुड्याबाहेरची पोकळी राहतेच. ती नाहीच असे मी का म्हणू? डोळ्यासमोर लख्ख दिसते.

रैना उत्तम लिहलंत आवडले.
कधीकधी वाटते खूप वाचले, उत्तम असे राहीलेच नाही;
पण नेहमीच वाटते..
अजून बाकी आहे..
अजून बाकी आहे..
अजून बाकी आहे!

रैना, तरी तुझ्या व्याख्येत ज्ञानदानी लिहिलेले बसत नाही किंवा शोभतही नाही. त्याचे समर्थन सुद्धा करता येत नाही. त्यांनी अवचटांच्या साहित्याचा समाचार न घेता ते वाचणार्‍यांचा(च) समाचार घ्यायचा प्रयत्न केलाय असे वाटले.

उत्तम वाचकाला आपली नक्की कुठली बौद्धिक गरज कुठल्या प्रकारच्या साहित्याने भागवली जाते हे कळणे महत्त्वाचे. ज्याला लेखना(का)च्या (आणि स्वतःच्याही) मर्यांदांसकट लेखन जाणवते/भीडते, तो माझ्यालेखी उत्तम वाचक. >> हे दोन्ही individualistic perspectives आहेत ह्यातच खरी गोम आहे.

अवचटांचे अलिकडच्या काळातील लिखाण आणि नैमित्तिक रतिब अजिबात वाचवत नाहीत>>ह्यालाही अनुमोदन पण ते नाव दिसल्यावर वाचल्याशिवय पुढे जावत नाहि हेहि हि तेव्हढेच खरे.

अर्नाळकर म्हणजे प्रमाण साहित्य (canons of literature) नाही आणि ते का नाही>> हि गोष्ट नीट कळली नाही. canons of literature हा शब्द वापरलास म्हणून, मला वाटायचे कि अर्नाळकरांनी हाताळलेला साहित्यप्रकार general वाचकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम आधी कोणी केले नव्ह्ते. किंवा त्याला समाजमान्यता मिळण्याचे मुख्य कारण अर्नाळकरांचे लिखाण हे होते. त्याचा मराठी साहित्यावर ठसा उमटला नाहि हे पटवून घेता येत नाही. rather, आज एक मोठा वाचकवर्ग (तो उत्तम आहे कि नाही हा भाग बाजूला ठेवू, mass नक्की आहे) त्याच प्रकारचे वाचन करतो हे विसरता येईल ? Canonization is major culprit for interpretation biases स्मित

सिंडी,
पण त्या माझ्या मर्यादा आहेत ना? साहित्याबाबत बोलायचे झाले तर मला आता अवचट अगदी वाचवत नाहीत. तेच त्या बाईंनी लागट आणि जहाल शब्दात सांगीतले एवढेच. तोच मजकूर मी इथे टोन डाऊन करुन लिहीला तर अनेकांना पटेल. I can't deny that she has a point.
तोच ठराविक लेखकवर्ग आवडणारा आणि त्या पलिकडे न पाहू शकणारा एक वाचकवर्ग असतोच की. पाहू न शकणारा तरी एकवेळ ठिक, पण पाहून मान्य न करु शकणारा आणि त्याही पलिकडे जाऊन आम्हालां या पलिकडे काहीच पहायची गरज नाही, हेच ते अंतिम सत्य, असे ठरवणारा लेखक&वाचकवर्ग दांभिक ठरतो. मग त्या वृत्तीवर टीका होणार आणि ती आपल्याला आवडेल/रुचेल त्या पद्धतीनेच होईल असे नाही.
बाकी याच बाईंना लेख लिहायला सांगीतला तर तो आपोआपच टोनडाऊन होईल. हे सर्व शरसंधान वगैरे ब्लॉगपोस्टींसाठी ठिक असतात किंवा प्राध्यापक लोकांना चार टाळक्यांसमोर बोलायला ठिक.
ब्लॉगवाचकही म्हणू शकतो ना त्यांच्याच जहाल शैलीत, की अवचटांच्या मागे/ पुलंच्या मागे कित्ती म्हणले तरी काही एक भरीव कार्य आहे, तुमच्या त्या तथाकथित ग्रेट लोकांचे काय? साबुदाणा खिचडी खाऊन/करुन/त्याबद्दल लिहून/किंवा वाचून शेकडो लोकांचे आयुष्य बदलत असेल तर मग ती परवडली की हो (एकवेळ.) स्मित
माझं म्हणणं एवढंच आहे (या ब्लॉगलेखिकेसाठी) की सत्याला जर तुम्ही डरत नाय, तर मग कोणाच्याच सत्याला डरु नका ना. मग स्वतःबद्दलचीही (आणि स्वतःच्या श्रद्धास्थानांबद्दलचीही) काही भयंकर अप्रिय सत्य असतात. तेही अशाच थेट पद्धतीने व्यक्त करा.

तोच ठराविक लेखकवर्ग आवडणारा आणि त्या पलिकडे न पाहू शकणारा एक वाचकवर्ग असतोच की. पाहू न शकणारा तरी एकवेळ ठिक, पण पाहून मान्य न करु शकणारा आणि त्याही पलिकडे जाऊन आम्हालां या पलिकडे काहीच पहायची गरज नाही, हेच ते अंतिम सत्य, असे ठरवणारा लेखक&वाचकवर्ग दांभिक ठरतो. मग त्या वृत्तीवर टीका होणार आणि ती आपल्याला आवडेल/रुचेल त्या पद्धतीनेच होईल असे नाही.>>>

हे मान्य आहे, पण केवळ तो एक लेखक आवडत असलेले सगळे वाचक वरच्या कॅटेगरीत टाकलेले आहेत त्या ब्लॉग मधे.

अवचट वाचवत नसतील या पॉईंटबद्दल कधीच वाद नव्हता.

पण त्या माझ्या मर्यादा आहेत ना? >>> एक्झॅटली. मला तुझे मुद्दे पटतात पण त्या बाईंचे सगळ्यांना काय त्या कॅटेगरीत टाकणे (अजूनही) नाही. फारेंड म्हणतोय तसच.

फोर्टीनायनर नी योग्य लिहिलं आहे
मलाही कोणत्याच लेखकाच्या, वाचकवर्गाच्या बाबतीत जनरलाईझेशन योग्य वाटत नाही.
निदान माझ्यापुरतं सांगायचं झालं तर मी तसं न केल्याने माझं विविध विषयावरचं बरंच वाचन होत असतं... जे मला आवडतं... मला जिवंत ठेवतं !
जनरलझेशनची झापडं डोळ्यावर असती तर आयुष्यात खूप अनुभवांना मुकले असते... त्या बाबतीत मी स्वतःला नशीबवान समजते स्मित

.

वाचन हेच मुळी वैयक्तीक असल्यामुळे त्याला वैयक्तीक निकष लावला जाणारच. त्यामुळेच कोणाला वपु तर कोणाला नेमाडे. आणि कोणाला दोघेही!

मला वाटतं वाचक कोण आहेत हा प्रश्न इथे येऊ नये. महत्वाचा नसावा. तर त्या ब्लॉग मध्ये वाचकांना पण एक लेबल लावले हा मुद्दा आहे. तो खरेतर इथे चर्चा करुन सोडविता येण्यासारखा नाही. रैनाने एक मुद्दा माडंला की तो ब्लॉग आहे त्यामुळे असे स्वातंत्र्य घेऊन लिहले, हे मला पटते. पण तसेच कुठेही लिहिले तरी ते लेबल लावणे आले. ही प्रक्रिया मनात होते, कुठे उतरते हा मुदा माझ्यामते पोलिटिकल आहे. आणि ते लेबल लावने मात्र पटत नाही. हे म्हणजे बघा आम्हीच कसे ग्रेट, किंवा इतर वाचकांना कशी भुमिकाच नाही वगैरे बडबड जिथे चालू होते, तिथे माझ्यादृष्टीने अहंगंड जरा प्रश्न निर्माण होतो. तसे नसावेही. ( कधीकधी एखादा लेखक डोक्यात जाऊ शकतो, हे मान्य करुन. )

पण ह्यामुळे प्रत्येक कलाकृती श्रेष्ट असे म्हणण्याचे धारिष्ट्य मी करणार नाही, कारण एकच कलाकृती एखाद्याला श्रेष्ट तर एखाद्याला दुय्यम दर्जाची वाटू शकते. ( उदा चतुष्ट्य मला फार 'पटले' नाही. आणि माझ्या ह्या मताला माझे वाचन नाही तर माझ्या स्वतःच्या व्यक्तीत्वाची जडणघडण कारणीभूत आहे असे मला वाटते. का ते खाली मांडतो)

'ग्रो विथ अ रायटर' हे जितके बरोबर आहे तितकेच 'ग्रो आउट ऑफ अ रायटर' हेही तितकेच गरजेचे आहे >> हो. पण परत मुळ गृहितक असेकी वाचन माणसात ग्रोथ घडवते. ते कदाचित चुकीचे आहे. (हो. हे विधान धाडसी वाटेल. पण माझे तसे मत बनू पाहत आहे. (अजुन नक्की नाही Happy ) हजारो पुस्तक वाचनानंतर असे वाटत चालले आहे. ग्रोथ हा फॅक्टर मुळात वेगळा असतो. टिपकागदासारखे मन असले तर न वाचन करताही ग्रोथ होते. आणि कुठल्याही व्यक्तीच्या जडणघडणीत पुस्तकापेक्षा असलेल्या वातावरणाचा प्रत्यक्ष प्रभाव असतो. नाहीतर थिन्क पॉझिटिव्ह नावाचे पुस्तक घेतले की झाले. Happy
अर्थात वाचक म्हणून नाही, व्यक्ती म्हणून आणि त्याला मी ग्रोथ म्हणत आहे. वाचक म्हणजे कोण हा जसा प्रश्न आहे तसाच वाचून ग्रोथ म्हणजे काय हा प्रश्नही मला मागे पडला होता. त्याचे माझ्यापरीने उत्तर (जे माझ्या सो कॉल्ड मर्यादा, जाणिवा, कक्षा) ह्यातून आले आहे. ते बरोबर नसेलही.

वाचक म्हणजे कोण ह्याला ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट मध्ये उत्तर देता येत नाही. त्याला कडा आहेत. मागे कोणीतरी वर्तमानपत्र वाचणारा वाचक होऊ शकेल काय? असा प्रश्न मांडला होता.

माझ्यामते मायोबोलीवरील बेफिकीर ह्यांच्या कथा वाचणारे पण "वाचकच" आहेत.

प्रत्येकाची अभिरुची वेगळी आहे. नावे ठेवून काही साध्य होईल असे वाटत नाही. महत्वाचे म्हणजे अभिरुची ही डेव्हलप होत जाते. आपोआप. ठरवून आज भिमपलास किंवा बागेश्री ऐकतो म्हणले तर ऐकता येत नाही. साडे चवथ्या मिनिटाला कंटाळा येऊन मुन्नी बदनाम हूई लावले जाते. Happy पण त्यामुळे मुन्नी ऐकणारे फालतू आणि भिमपलासवाले संस्कारीत हे माझ्याच्याने होऊ शकत नाही, पण कोणी असा फरक करुच नये हे ही मात्र म्हणवत नाही.

Pages