खुशशक्ल भी है वो...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मी काही कधी तिची मोठी 'फॅन' वगैरे नव्हते. ज्या सिनेमांतून ती आणि संवेदनशील अभिनेत्री म्हणून तिची प्रतिमा घडत गेली, त्यातले बरेचसे मी पाहिलेले नाहीत. शक, स्वामी, स्पर्श, नमकीन यांसारखे काही दूरदर्शनच्या कृपेने पाहिले होते, पण त्यांत लेखक किंवा दिग्दर्शकाचंच कौतुक जास्त वाटलं होतं. तिची म्हणून काही खासियत जाणवल्याचं आठवत तरी नाही. मी लहान होते - इतकाच त्याचा कदाचित अर्थ असेल.

आमच्या घरात मुळात आर्ट फिल्म्सचं फारसं कौतुक नव्हतं. वडील म्हणायचे, 'या सिनेमांत पडद्यावर कलाकार अंधारात वावरतात, आणि नेमकं काय चाललंय याबाबत प्रेक्षक त्याहून अंधारात असतात!' त्यांना आवडलेला एकमेव समांतर सिनेमा म्हणजे 'अर्धसत्य'.
मला 'यातही काहीतरी बघण्यासारखं असतं' असं वाटलेला पहिला सिनेमा म्हणजे 'कमला'. 'आप को साब ने कितने में खरीदा?' असं खेडवळ कमलेने निरागसपणे विचारल्यावर खाडकन डोळे उघडलेली तिची सरिता जाधव मनात घर करून गेली होती - आणि मनातली बरीच घरं उधळूनसुद्धा.

त्यानंतर ती भेटली 'फायर'मधली राधा म्हणून. मनातले आणि शरीरातले सगळे कल्लोळ दाबतच दिवस आणि रात्री ढकलण्याची सवय लावून घेतलेली. माणसाची इन्टिमसीची भूक कशी आणि किती पातळ्यांवरची असते, ती भूक भडकणं म्हणजे काय असतं, भागणं म्हणजे काय असतं आणि जागणं म्हणजे काय असतं - हे सगळं तिने किती नेमकं पोर्ट्रे केलं होतं. तशीच तिची 'मृत्युदंड'मधली चंद्रावतीही. 'तहजीब'मधली लेकीशी संवाद न साधू शकलेली आई, हरलेली पत्नी, आणि व्यावसायिक यशाचा तोरा वागवणारी रुख्साना, 'हनीमून ट्रॅव्हल्स'मधली नुकतीच स्वत:ला सापडलेली खेळकर खोडकर नहीद, 'सॉरी भाई'मधली स्मार्ट आणि डॉमिनेटिंग आई गायत्री.. या सगळ्या रोल्समधून तिच्या संवेदना जाणवण्या-भोगण्याच्या आणि व्यक्त करण्याच्या सामर्थ्याची ओळख पटत गेली, आदर वाढत गेला. दरम्यान सामाजिक कार्याच्या संदर्भांतही तिचं नाव बातम्यांमधून कळत राहिलं. आधी तो 'पब्लिसिटी स्टन्ट' असावा अशी शंका आली, पण तिच्या कामात, तिने वेळोवेळी मांडलेल्या मतांत सातत्य होतं आणि मुख्य म्हणजे नेमकी दिशा होती.

म्हणूनच न्यू जर्सीच्या 'बिटिया' संस्थेकडून तिच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याबद्दल विचारणा झाली, तेव्हा 'हो' म्हणण्यामागे तिच्याशी प्रत्यक्ष बोलायला मिळणार याचंच आकर्षण होतं.

'ब्रोकन इमेजेस' हे गिरीश कर्नाडांनी २००४ साली लिहिलेलं नाटक. मानवी मनोव्यापार इतके गुंतागुंतीचे आणि अनेक पातळ्यांवरचे असतात, की व्यक्तीला कोणतंच 'लेबल' लावता येणं हे अन्यायकारकच नाही तर अशक्यच असतं. मुळात आपल्या वागण्यातलं स्वयंप्रेरणेतून आलेलं किती, कशालातरी किंवा कोणालातरी प्रतिक्रिया म्हणून आलेलं किती, आपली इतरांच्या मनातली प्रतिमा जपण्यासाठी आलेलं किती आणि आपली आपल्याच मनातली प्रतिमा जपण्यासाठी आलेलं किती - याचं गणित कुणाला मांडता आलंय? आणि या प्रतिमा अचानक भंगल्या तर? आपले दुवे कुठे शोधायचे? कसे जुळवायचे? प्रतिमा भंगल्यावर काही उरतं का? काय? हे आणि असे बरेचसे प्रश्न हे नाटक आपल्या मनात उभे करतं.

नाटकाच्या फॉर्ममुळे प्रयोग यशस्वी होणं दोन बाबींवर अवलंबून आहे - एक तिचा अभिनय आणि दुसरं स्क्रीनवर आधी लाइव्ह आणि नंतर रेकॉर्डेड प्रतिमा दिसण्यातली तांत्रिक बाजू. मी पाहिलेल्या प्रयोगात हे दोन्ही उत्तम जमून आलं होतं.

नाटक संपल्यावर छोटा पंधरा मिनिटांचा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असणार होता. मी माझ्याकडून काही प्रश्न काढले होते. अगदी पहिला ड्राफ्ट बिटियाच्या संयोजकांना दाखवला तेव्हा त्यांनी 'इतके elite प्रश्न नका हो विचारू!' म्हणून टाहो फोडला. मग काही प्रश्न गाळावे लागले तर काहींची शब्दरचना बदलली.

नाटक सुरू होण्याआधी माइक, लाइट, लाईव्ह प्रक्षेपणासाठी कॅमेरा इत्यादींचं टेस्टिंग सुरू असतांना मी स्टेजच्या मागेच होते. ती त्यातून मोकळी झाल्यावर मी पुढे झाले. अभिवादन करून मग माझे काढलेले प्रश्न तिला दाखवले, आणि तिला कशाबद्दल बोलायला आवडेल हे विचारलं.
ती म्हणाली 'आज आपण फिल्म्सबद्दल नकोच बोलूया. नाटक, त्याच्या फॉर्मची नवलाई आणि त्यामुळे येणारी बंधनं हेच आपण बोलू. मी फिल्म अ‍ॅक्टर असून थिएटर का करते आहे हे मला सांगायला आवडेल. आणि मग 'बिटिया'च्या कार्याबद्दल बोलू, कारण ते जास्त महत्त्वाचं आहे.' तिला विचारलं, 'असं काही आहे का, की ज्याबद्दल तुम्हाला अजिबात बोलायचं नाहीये, असा काही प्रश्न प्रेक्षकांतून आला तर तो टाळायचा आहे?' ती हसली. म्हणाली, 'कळेल गं आपल्याला. इतकी काळजी नको करूस.'

घरातल्या मोठ्या, कर्त्या बाईशी बोलावं तितकं सहज आणि ताण घालवणारं संभाषण!

मग माझं काम सोपंच झालं होतं. काय बोलायचं हे तिचं ठरलेलंच होतं. मला फक्त वेळोवेळी शब्दखुणा पुरवायच्या होत्या. त्यामुळे एक झालं, की मला तिचं निरीक्षण करायची पुरेपूर संधी मिळाली. तिची विनम्र पण ठाम उत्तरं, हुशारी, हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी, सामाजिक कामाबद्दलची कळकळ - सगळंच 'कमाल' होतं. मुख्य म्हणजे तिने कमावलेलं स्थान, तिची प्रसिद्धी, लोकांचं दिपून जाणं, हे सगळं ती ज्या सहजपणे वागवत (कॅरी करत) होती, ते पाहण्यासारखं आणि शिकण्यासारखं होतं. विनयशील असणं हा आपण गुण समजतो. पण बरेचदा ते इतकं ताणलं जातं, की माणूस आपल्या सद्‌गुणांबद्दल किंवा कर्तृत्वाबद्दल क्षमायाचना करतोय असं (अपोलोजेटिक) वाटायला लागतं. त्याचा असा मानाने स्वीकार (ग्रेसफुल अ‍ॅक्सेप्टन्स) जमला पाहिजे असं तिच्याकडे बघून जाणवलं.

'शबाना'चा शब्दश: अर्थ आहे 'रात्रीसारखी'. बहुधा लेक सावळी म्हणून कैफी-शौकतनी हे नाव ठेवलं असावं. पण नाव सोडलं तर तिच्यात रात्रीसारखं काहीच दिसलं नाही मला. ती दिवसासारखी उत्साही, अलर्ट, कार्यप्रवण आणि स्वयंप्रकाशी वाटली.

बुद्धिमत्तेचं एक निराळंच तेज असतं. तिच्या पिंगट डोळ्यांत ते दिसतं ते. असं माणूस सुंदरच दिसतं कधीही.

जावेद अख्तर एकदा तिच्याबद्दल म्हणाला होता,

'खुशशक्ल भी है वो ये अलग बात है मगर
हम को ज़हीन लोग हमेशा अज़ीज़ थे'

(खुशशक्ल : सुंदर ; ज़हीन : हुशार ; अज़ीज़ : प्रिय)

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

नाटकाचं कथानक थोडक्यात :

नाटक सुरू होतं ते मंजुलाच्या दूरचित्रवाणीसाठी रेकॉर्ड होणार्‍या भाषणापासून. मंजुला ही एक सामान्य (मीडिऑकर) हिंदी कथाकार असते. सामान्य असणं, आणि तसं असण्याची सतत एखाद्या गुन्ह्यासारखी टोचणी असणं हेच तिचं प्राक्तन. तिची बहीण मालिनी जरी शरीराने पांगळी असली तरी तिच्याहून देखणी आणि तिच्याहून प्रतिभाशाली असते. आईवडिलांचीसुद्धा जास्त माया, जास्त अटेन्शन तिला मिळते - किंवा निदान मंजुलेला तसं वाटत असतं. मालिनीचं इंग्रजीवर प्रभुत्व असतं. मग जिथे तिच्याशी तुलना होणार नाही असं स्वतःचं काहीतरी निराळं क्षेत्र शोधावं म्हणून मंजुला हिंदीत लिहायला लागते. कॉलेजमधे प्रमोद नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या प्रेमात पडते, पुढे त्याच्याशी लग्न करते. पण प्रमोद आणि तिचं नातं कधी एका मर्यादेपुढे फुलत नाही. कुठेतरी काहीतरी 'डिस्कनेक्ट' असतो. संवाद जवळपास नसतोच. त्यात आईवडिलांच्या निधनानंतर मालिनी मंजुलेबरोबर रहायला येते. प्रमोद सेल्फ एम्प्लॉइड असतो, त्यामुळे घरून काम करत असतो. मंजुला इंग्रजीची प्राध्यापक असते, त्यामुळे तिचं कार्यक्षेत्र घराबाहेर असतं. मालिनी आणि प्रमोद यांच्यात या मिळालेल्या वेळात जवळीक निर्माण व्हायला लागते. जो संवाद त्याच्यात आणि मंजुलेत कधीच होऊ शकला नव्हता, तो त्याच्यात आणि मालिनीत साधला जातो. त्यांच्यात शारीरिक जवळीक होणं मालिनीच्या पंगुत्वामुळे अशक्यच आहे - अशी मंजुला स्वत:ची समजूत घालत असते, पण इन्टिमसी काय फक्त शरीराची असते? ज्या भावनिक, बौद्धिक, वैचारिक पातळीवर ते जवळ येतात, त्याबद्दल ती काय करू शकणार असते? आणि खरंतर त्याबद्दल काही करायची तिला इच्छा उरलेली असते का? नाही. ती काहीच करत नाही. प्रेमळ पत्नी, आईवडिलांमागे पंगू बहिणीची अपत्यवत् काळजी घेणारी (अपत्यहीन, पण) प्रेमळ बहीण - या प्रतिमा जपणं त्यापेक्षा फायद्याचंच नसतं का?

अशात मालिनीचा मृत्यू होतो. प्रमोद कामानिमित्त अमेरिकेत जातो. चहूदिशांनी एक पोकळी निर्माण होते. त्यात मंजुला आठवड्याभरात झपाटल्यासारखी एक कादंबरी लिहून काढते. इंग्रजीत. कादंबरीची नायिका पांगळी असते, जिला एक वरकरणी तिची काळजी घेणारी, पण मनातून तिच्या मृत्यूची वाट पाहणारी दांभिक कझिन असते!

'इंग्रजीतच सुचलं, म्हणून इंग्रजीत लिहिलेलं' हे पुस्तक त्याची शैली, त्यातली नातेसंबंध उलगडून मांडण्याची हातोटी, त्या अनुषंगाने येणार्‍या अन्य टिप्पण्या - या सर्वांमुळे प्रचंड वेधक झालेलं असतं. अमेरिकन प्रकाशक अत्यंत प्रभावित होऊन ते छापायची तांतडीने ऑफर देतात. पुस्तक देशविदेशांत गाजतं. एक सामान्य हिंदी लेखिका आघाडीची इन्टरनॅशनल साहित्यिक होते.

सुरुवातीचं दूरचित्रवाणीसाठी रेकॉर्ड होणारं भाषण हे याच यशाबद्दल असतं. नव्याने सापडलेल्या आत्मविश्वासाने मंजुला ते भाषण ठोकते. त्यात काय नसतं? बहिणीच्या मृत्यूबद्दल शोक, नवर्‍याच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता, 'इंग्रजीत लिहून तुम्ही पैसा आणि प्रसिद्धीसाठी मातृभाषेशी प्रतारणा केली आहे' या असल्या आक्षेपांचा उपहास..

शेजारच्या टीव्ही स्क्रीनवर या भाषणाचं थेट प्रक्षेपण आपल्याला दिसत असतं. भाषण संपवून ती उठते, आणि पडद्यावरची तिची प्रतिमा तिला थांबवते. ती गोंधळते. उत्तरं द्यायचं टाळते, पण खुलासे / कबुलीजबाब / समर्थनं ही मानसिक गरजच असते, नाही का? हळूहळू त्या संवादात ती मोकळी व्हायला लागते. वर सांगितलेली सगळी किल्मिषं, सगळी वंचना, सगळी बोच आपल्याला तेव्हा कळत जाते.

आणि त्याचबरोबर हे ही कळतं, की ज्या पुस्तकाच्या यशाबद्दल तिचा उदो उदो होतो आहे, ते पुस्तक तिने लिहिलेलंच नसतं. मालिनीने लिहिलेल्या पुस्तकाचं मॅनुस्क्रिप्ट तिला प्रमोदच्या ड्रॉअरमधे सापडलेलं असतं. मालिनीने रंगवलेलं दांभिक बहिणीचं चित्र तिला सहनच होत नाही. पण ते झटकूनही टाकता येत नाही. तिला कायमच मालिनीचा तिरस्कारच वाटत नव्हता का? पण तरीही मालिनीने केवळ आणि केवळ कृतज्ञच असायला नको होतं तिच्याबाबत? तिचे अखेरचे दिवस चांगले जायला, अगदी प्रमोद भेटायलाही मंजुलाच कारणीभूत झाली नव्हती का?! हे पुस्तक प्रमोदने मालिनीच्या नावानिशी छापलं तर? हे कोणावर आधारित आहे हे कोणालाही कळेल. मग आपण कसे आहोत, आपलं वैवाहिक आयुष्य कसं आहे या सगळ्याचं जगात हसं होणार नाही का?!
नाही. तिला आपलं हसं करायची संधी द्यायची नाही! पुस्तक आपण आपल्या नावावर छापलं म्हणजे हे कुठलेच प्रश्न निर्माण तर होणारच नाहीत.. आणि यशस्वी झालं तर मालिनीवर, परिस्थितीवर उगवलेला सूड ठरेल!

पण मालिनीनेच तिच्या हयातीतच हे पुस्तक का प्रकाशित केलं नाही? तिला पश्चात्ताप झाला होता का? ती माझी परीक्षा बघत होती का? मग आपण हे आपल्या नावाने छापणं म्हणजे आपलं यश की पराभव?

मंजुलेच्या प्रतिमेची शकलं होतात आणि त्यांतून हे प्रश्न अधिकच विद्रूप होऊन तिच्याभोवती विखरून पडतात.

अवांतर माहिती :

यातल्या 'प्रतिमे'च्या संवादांचं रेकॉर्डिंग शबानाने ४० मिनिटांच्या एकाच टेकमधे पूर्ण केलं होतं. स्टेजवरची शबाना या रेकॉर्डेड प्रतिमेशी बोलत असते, त्यामुळे तिला चुकायला, संवादांत किंवा हालचालीत काही बदल करायला वावच उरत नाही. ते सांभाळत अभिनय करणं ही खरंच तारेवरची कसरत असणार.

कार्यक्रमाआधी नाटकाबद्दल आंतरजालावर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही मजेशीर गोष्टी वाचनात आल्या.

'ब्रोकन इमेजेस' हे नाव टी. एस. इलियटच्या 'द वेस्टलॅन्ड' या कवितेतील 'द हीप ऑफ ब्रोकन इमेजेस' या ओळीवरून घेतलं आहे.

याच नाटकाची हिंदी (बिखरे बिंब), कानडी (Odakalu Bimba) आणि मराठी (नाव माहीत नाही) भाषांतरेही आहेत. कानडी आणि काही हिंदी प्रयोगांत अरुंधती नागने काम केलं आहे, तर मराठी नाटक रीमा करते असं ऐकलं.

कानडी लेखक यू. आर. अनंतमूर्ती एकदा म्हणाले होते की 'परकीय भाषेत लिखाण हे पैसा आणि प्रसिद्धीसाठीच केलं जातं, आणि ते शरीरविक्रय करण्याइतकंच गर्हणीय आहे.' हा आणि अशा प्रकारचे आक्षेप ऐकल्यानंतर या नाटकाचा प्लॉट सुचला असं गिरीश कर्नाड सांगतात. नाटकात मंजुलेच्या तोंडी याबाबत टिप्पण्याही आहेत. पण नाटक याबाबतीत कोणतीच भूमिका घेत नाही.

कोणी त्यामुळे 'मंजुला हे इंग्रजी येत नसल्यामुळे मातृभाषेत लिहिणार्‍या आणि जमेल तेव्हा इंग्रजी साहित्य चोरणार्‍या लेखकांचं प्रतीक' असल्याचाही अन्वय लावतात.

एक उदाहरण म्हणून हा दुवा बघा.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी प्रथम काढलेले प्रश्न :

1. This play, with it's very innovative form, brings together the two mediums -
theater and film, in a way. What were the challenges and limitations, if any,
of this form, for the actor?
2. The play uses language almost as a symbol of one's roots or identity. Do
you see this conflict translating into commercial Vs. parallel cinema? What
are your thoughts about it?
3. The play talks about artist’s integrity, her loyalty to her roots, and also
means one uses for the success. Do you think commercial success is
somehow perceived as a sin in our culture?
4. What is success to you?
5. You have played so many different roles so far. How important it is to love
the character you are playing? Have you ever played a character you
found difficult to connect with, or worse, hated?
6. Daughter of a poet, wife of a poet, has the poetry rubbed off on you?
7. We know you as an artist as well as a social activist. Would you like to tell
us about the projects are you currently involved in. In which projects are you collaborating with BITIYA?

या यादीतले फक्त पहिला आणि सातवा - हे दोनच प्रश्न विचारता आले.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

स्वाती, पुन्हा एकदा शांतपणे वाचेन. पण त्या आधी अभिनंदन.
तू पाठवलेल्या व्हिडिओत एकच थोडं खटकलं की शेवटी शेवटी तू हातातला पेपर बघत होतीस आणि ती त्याच वेळी तुझ्याकडे बघून बोलत होती.

कमला प्रचंड आवडता पिक्चर. दिप्ती नवल आहे का कमलाच्या भूनिकेत? नक्की आठवत नाहीये आता.

स्वाती,
अतिशय छान लिहीलं आहेस. शबानाला भेटणं खरंच एकदम वेगळा, 'delightful' अनुभव असणार. तिसर्‍या आणि सहव्या प्रश्नाला तिने काय उत्तर दिलं असतं....ऐकायला आवडलं असतं..
सुरेख अनुभव Happy

स्वाती, पूर्ण वाचलं नाहीये अजून पण शबाना बद्दल लिहीलंस तर लगेच प्रतिक्रिया द्यावीशी वाटली ..

तिच्या चित्रपटांच्या यादीत मासूम, अर्थ, गॉडमदर आणि अजून बरेच अ‍ॅड करता येतील .. ती खरंच महान आहे ..

मध्ये पार्ल्यातच तिच्या सौंदर्यावरून मिले सूर च्या निमित्ताने बोलणं झालं होतं .. ती सुंदरच दिसते .. तिच्या व्यक्तिमत्वाच्या, कर्तुत्वाच्या तेजामुळे असेल पण ती सुंदर दिसते .. आणि तिच्या नावाबद्दल .. तू म्हंटलंस सावळी म्हणून 'रात्री सारखी' असं नाव ठेवलं असेल .. पण रात्रीसारखी सुंदर (चंद्र, चांदण्या असं मंद सौंदर्य) जसं रजनी (कांत नव्हे!!!), निशा ही नावं आहेत तसंही असेल .. Happy

आता नाटकाबद्दल वाचते .. पण तुला तिला भेटायची, तिच्याशी बोलायची संधी मिळाली .. Lucky you! Happy

हे काय, कमला नंतर डायरेक्ट फायर अन हनिमून ट्रॅव्हल्स ? अधे मधे अर्थ, मंडी वगैरे नाही का Happy
मला त्या ५ व्या प्रश्नाचं उत्तर आवडलं असतं ऐकायला.
व्हिडिओ कुठे आहे?

वाचलं नाटक आणि त्याच्या प्रयोगाविषयी .. खुपच interesting ..

तुझे प्रश्नंही छान होते, विचारता आले नाहीत हे फारच वाईट ..

ह्या प्रयोगाचा दौरा सगळ्या US मध्ये आहे का?

स्वाती, सुरेख ओळख करुन दिलीस 'ब्रोकन इमेजेस'ची Happy
शबाना ग्रेट आहे. तू विचारलेल्या प्रश्नांची तिने काय उत्तरं दिली हे वाचायला आवडेल आणि व्हिडिओ सुद्धा बघायला आवडेल.

सायो, बरोबर - दीप्ती नवलच आहे.
सशल, दौर्‍यातल्या १५ पैकी हा १३वा प्रयोग होता. तुमच्या किनार्‍यावरचे आधीच झाले होते.
मैत्रेयी, मी बरेच चित्रपट पाहिलेलेच नाहीत तिचे. आता बघेन मुद्दाम. Happy

प्रश्नांची उत्तरं लेखाच्या अनुषंगाने आलीच आहेत. तिचा ४० मिनिटांचा पीस तिने एका टेकमधे रेकॉर्ड केला. रेकॉर्डेड इमेजशी बोलायचं असल्यामुळे तिला चुकायला वा इम्प्रोव्हायझेशनला काहीच वाव रहात नाही. एकदा तर चुकून स्टेजवर वावरताना तिचा पाय वायरवर पडून स्क्रीनवरची इमेज दिसेनाशी झाली - पण तिने प्रसंगावधान राखून संवाद बोलता बोलताच पुन्हा होती तशी जुळणी केली आणि नाटक न अडखळता पार पडलं.

तिची आई शौकत आझमी नाटकांत कामं करत असे. अगदी लहान असल्यापासून शबाना तिच्यासोबत तालमींना वगैरे जात असे. त्यामुळे नाटक तिच्या रक्तात आहे असं ती म्हणते. हे स्क्रिप्ट तिला खूप आवडल्यामुळे तिने याला लगेच होकार दिला.

स्वाती,अभिनंदन!!
तुला फारच मस्त अनुभव मिळाला.छान लिहिले आहेस.नाटकही छान असेल असे वाटते.
शबाना आझमीचे बरेचसे सिनेमे मला आवडतात.त्यातल्या स्वामीमधले बंगाली वातावरण तर खूपच आवडते.
कार्यक्रमाचा विडियो असेल तर नक्की पाठव.

स्वाती या मुलाखतीचे रेकॉर्डींग असेल तर ऐकायला आवडेल. ब्रोकन इमेजेसची ओळख करुन दिल्याबदल धन्यवाद.
मला शबानाचे काम आवडते, पडद्यावर आणि मुख्य म्हणजे पडद्याबाहेर सगळीकडे ती स्वतःला खूप चांगली कॅरी करु शकते म्हणून जास्तच आवडते.
बाकी शबाना बद्दल जे वाटते तसच मला नसरुद्दिन शाह बद्दल पण वाटते.

स्वाती,
हे छान नाटक प्रथम लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
तु दिलेल्या वरुन असे जाणवले, की नाटकातल्या २ स्त्रिया म्हणजे भारतीय लेखकाचा dilema आहे.

१) मंजुला ही समाजमान्य स्त्री आहे. जशी कानडी ही राज्यभाषा आहे. ती पैसा व प्रसिद्धी पासुन दुर आहे आणि यामुळे तिला मानसीचा हेवा वाटतो.
२)मालिनी कडे पैसा आणि प्रेम आहे पण समाजमान्यता नाही त्यामुळे ती पांगळी आहे.

टीका करायची झाली तर एकच म्हणेन की लोकभाषेचे मर्म म्हणजे त्या मातीतले संस्कार शब्द्बबद्ध करायची ताकद, अशी ताकद गिरिष कर्नाडांनी मंजुलामध्ये का दाखविली नाही हे कळले नाही. कदाचित त्यांना ती जाणवली नसेल. पन त्यामुळे बिंब एकांगी जाणवले. possible झाल्यास नाटक बघेन.

स्वाती, अप्रतीम लिहिलेय!

शबानाचा मुव्ही पाहिला आणि तिचा अभिनय आवडला नाही असे कधीच झाले नाही (अगदी अमर अकबर अ‍ॅंथनी देखील). अगदी अलिकडचा म्हणजे 'मॉर्निंग रागा'.

तुम्हारी अमृता पाहिले तेव्हा थेटरमधून तरंगतच बाहेर आलेले आठवतेय.

You are very lucky!!!!

स्वाती, अभिनंदन! शबाना माझी अतिशय आवडती अभिनेत्री. त्या मुळे अधाशासारखे वाचले. खूप छान लिहिलय. नाटक वगैरे आमच्या इंडियानात बघायचा योग दुर्मिळच! मुलाखतीचे रेकॉर्डिंग आहे का?

स्वाती वॉव! खरच खुप छान लिहिले आहेस. आवडलं. शबानाची मुलाखात घेणे म्हण्जे खरच लकी यू. Happy

स्वाती, खूपच सुंदर लिहिलंयस.

कमला खरंच खूप भिडणारा चित्रपट आहे. दोघींचीही कामं अप्रतिम. पण वर म्हटल्याप्रमाणे बरेचसे चित्रपट राहिलेत.

छान लिहिलयस Happy आणि असं प्रत्यक्ष भेटुन बोलायला, प्रश्न विचारायला मिळाल्याबद्दल अभिनंदन Happy

स्वाती, खुपच छान लिहिलं आहेस Happy
ब्रोकन इमेजेसची स्टोरी लाईन पण आवडली. कधी बघायला मिळालं तर नक्की बघेन.

कार्यक्रमाचे फोटो, विडिओ येऊ दे.

स्वाती, सुंदर लेख व माहिती. शबाना माझी पण अति आवड्ती अभिनेत्री. तिचे व जावेदजींचे सहजीवन अगदी हेवा करण्यासारखे सुंदर आहे. दोघे एकत्र इतके परिपूर्ण दिसतात. तिची ताकद अफाट आहे व तिचे बोलणे ऐकणे अगदी सुखावह आहे. खानदानी उर्दू तसेच बोली हैद्राबादी ऐकणे अगदी प्लेझर. कैफी व मी कार्यक्रमात तिचे कविता वाचन ऐकायला मिळाले होते. नाट्काचा विषय ही अगदी भेदक आहे. जरूर बघणार. अनेक पातळ्यांवर भावणारा आहे.

रच्याकने लेखाच्या नावावरून गझल आहे कि कॉय असे वाट्ले होते पण छान लेख निघाला. धन्यवाद.

मस्त गं.
बाकी सगळ्यांनी लिहिलंच आहे. मी अजून काय लिहू. प्रचंड आवडते ती आणि तुझा लेखही आवडला. व्हिडिओ नंतर बघेन.
हे नाटक अरूंधती नाग करायची तेव्हा पृथ्वीला पाह्यले होते. ते पण अप्रतिम होते. अरूंधती नाग महान करायची. त्या आधीच दुबेजींनी वाचायलाही दिले होते त्यामुळे नाटक चांगलंच माहितीये. शबाना काहीतरी अजून ग्रेट करत असणार. Happy

स्वाती, काहीकाही भाग छान लिहिला आहेस.. मला पण जमत असेल तर विडीओ पाठवं. मला ती आणि स्मिता पाटिल दोन्ही फार आवडतात. तिचे अर्थ, अंकूर, मासूम, स्पर्श हे चित्रपट फार सुंदर आहेत.

Pages