वहिदा रेहमान

सिनेमा सिनेमा- खामोशी

’खामोशी’ बघण्याआधी माहीत झाला होता त्यातल्या मोहक गाण्यांमुळे.
’तुम पुकार लो.. तुम्हारा इंतजार है’, ’वो शाम कुछ अजीब थी.. ये शाम भी अजीब है’, आणि अर्थातच ’हमने देखी है इन आंखोंकी महकती खुशबू..’
गुलझारचे शब्द काळजाच्या आतल्या पडद्यापर्यंत जाऊन रुतून बसण्याचं वय येईपर्यंतच्या काळात ही गाणी लक्षात राहिली होती त्यांच्या हॉन्टींग सुरावटीमुळे.

पनीर पराठा आणि मलाई साग (फोटोसह)

लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

खरं तर हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणे म्हणजे हापूसची फोड मधात बुडवून खाण्यासारखे आहे. मी एकाच दिवशी केले एवढेच. हे स्वतंत्र पदार्थ आहेत. स्वतंत्र करु शकता.
अनेक वर्षांपुर्वी वहिदा रेहमानने लोकप्रभात, मंद मलाई का साग या नावाने हि पाककृति लिहिली होती. माझी अत्यंत आवडती. मी आधी लिहिलीही होती इथे, आता फोटोसकट आहे.
दिल्लीला मुद्दाम हौसेने पनीर पराठा मागवला होता. नेहमीप्रमाणे सारण भरुन केलेला तो पराठा मला तितकासा आवडला नव्हता. चवीलाही आणि बघायलाही. तर हा थोडासा प्रयोग.

आता जिन्नस बघू.
पराठ्यांसाठी
१) २ मोठे कांदे
२) पाव किलो पनीर
३) एखादा क्रीम चीजचा क्यूब (ऐच्छीक, मी किरी वापरलेय)
४) चवीप्रमाणे मीठ
५) लागेल तशी कणीक (साधारण दोन/तीन वाट्या लागेल)
६) बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा मिरचीचे वाटण किंवा मिरपूड
७) बटर किंवा तूप / मोहनासाठी लागलेच तर तेल
८) लाटण्यासाठी थोडी तांदळाची पिठी.

साग साठी

१) अर्धा किलो कांदे
२) अर्धा किलो लालबुंद टोमॅटो
३) २५० मिली क्रीम
४) पाव टिस्पून हळद
५) मीठ
६) बटर
७) बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
८) काश्मिरी लाल तिखट, आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

पराठे

१) एका खोल बोलमधे कांदे किसून घ्या.
२) त्यातच पनीर बारीक किसून टाका. कधी कधी पनीर किसले जात नाही, त्यावेळी ते ब्लेंडरमधून काढून घ्या. पनीरचे गोळे राहता कामा नयेत.
३) त्यातच मीठ, हिरवी मिरची आणि वापरत असाल तर चीज टाका.
४) हलक्या हाताने ते सर्व मिसळून घ्या आणि त्यात थोडी थोडी करत कणीक टाका.
५) पनीरच्या तेलकटपणावर तेल टाकायचे की नाही ते ठरवा.
६) आता त्यात पीठाचा गोळा जमेल इतके पाणी थोडे थोडे करत घाला. जर तुम्हाला कुरकुरीत पराठे हवे असतील तर पिठ घट्ट भिजवा, मऊसर हवे असेल तर थोडे सैल भिजवा. अर्धा तास थांबा.
७) याचे साधारण मोठ्या लाडवाच्या आकाराचे गोळे करा (८/१० गोळे होतील)
८) तांदळाची पिठी लावत घडीच्या चपातीएवढे जाड लाटा (हा पराठा लाटायला सोपा जातो, सारण बाहेर यायची भिती नसते.)
९) अगदी मंद आचेवर भाजत ठेवा. एका बाजूने सोनेरी डाग पडले कि परता.
१०) परत एकदा परतून, वरच्या बाजूवर थोडे बटर वा तूप लावा (कडेने सोडू नका) वर लावलेले बटर वा तूप जिरले की परतून, दुसर्‍या बाजूने लावा.
११) एका ग्लासात, अर्धे ग्लास भरुन पाणी घ्या, व त्यावर हा पराठा अलगद ठेवा. थोडा निवला कि ताटात काढा, पण एकावर एक रचू नका.

मलाई का साग

१) कांदे अगदी बारीक चिरुन घ्या.
२) मंद आचेवर तूपात किंवा बटरमधे परता. गॅस अजिबात मोठा करायचा नाही.
३) टोमॅटोही अगदी बारीक चिरा.
४) कांदा सोनेरी रंगावर आला कि त्यात हळद टाका.
५) मग टोमॅटो टाका. (आता गॅस किंचीत मोठा केला तरी चालेल.)
६) कांदा, टोमॅटो शिजून एकजीव झाले कि त्यात तिखट, मीठ घाला.
७) परतून गॅस अगदी मंद करा व त्यात क्रिम टाका, हलक्या हाताने मिसळा.
८) क्रीम टाकल्यावर जास्त गरम करायचे नाही, नाहीतर तूप वेगळे होते.
९) नुसते गरम होऊ द्या. मग गॅस बंद करा.
१०) जरा निवले कि हिरव्या मिरच्यांचे बारीक तूकडे टाका.

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

हे दोन्ही पदार्थ, अगदी सवडीने करायचे आहेत. पण सतत लक्ष ठेवायची गरज नसते. दोन्ही एकाचवेळी देखील करता येतात.
साग मात्र नावाप्रमाणेच मुलायम असतो. मिरच्यांचे तूकडेच मजा आणतात.
क्रिम नसेल तर मिल्क पावडर पण वापरता येते, पण ती चांगल्या प्रतीची असावी.
हे साग उरले तर, परत गरम करताना जास्त गरम करायचे नाही.

माहितीचा स्रोत: 
वरच्याप्रमाणे