ढोकळा उपाहार गुजराथी डाळ

डाळ/तांदूळ ढोकळा

लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदूळ, १/२ वाटी हरबरा डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, २ हिरव्या मिरच्या, ३-४ लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, मीठ, पाव चमचा हळद. फोडणीसाठी तेल, मोहोरी, जिरं, हिंग. सजावटीसाठी खोबरं, कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

तांदुळ आणि दोन्ही डाळी ५-६ तास एकत्र भिजवावे. पाणी उपसून टाकुन इडली/डोशासाठी वाटतो तसे वाटुन घ्यावे. थोडे मीठ घालुन ७-८तास आंबवुन घ्यावे. पीठ छान फसफसले पाहिजे.

ह्या पीठात १ टे स्पून तेल, हळद, बारीक वाटलेले- हिरव्या मिरच्या + आल्याचा तुकडा + लसूण आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व नीट मिसळुन घ्यावे. एका थाळ्याला (किंवा ढोकळे करायचे काही उपकरण असल्यास त्यात) तेलाचा हात लावुन पीठाचा हव्या त्या जाडीचा थर द्यावा. ढोकळा छान फुलतो. थाळा नीट बसेल अशा पातेल्यात अथवा कढईत घट्ट घाकण लावुन २० मिन वाफवुन घ्यावे. चांगली आंच लागली पाहिजे. ढोकळा झाला की पांढरी वाफ यायला लागते. पहिल्यांदाच करत असाल तर "नाइफ टेस्ट" करुन बघायला हरकत नाही.

गुजराथी पद्धतीने थोडा गोडसर ढोकळा करायचा असेल तर चमचाभर साखर घालावी. ताटात अगदी पातळ थर द्यावा. साधारण एक सेमिचा थर पुरेल. मिरची,लसणाची पाकळी एखादी कमी घालावी तसेच हळद घालु नये.

दोन्ही प्रकारात हिंग, मोहोरी, जिर्‍याची फोडणी आणि खोबरं/कोथिंबीर घालुन सजवावे.

dhokaLa.JPG

प्रकाशचित्रात पहिले चित्र आहे आईने केलेल्या ढोकळ्याचे. दुसरे आहे ते मी गुजराथी पद्धतीने केलेल्या गोडसर ढोकळ्याचे. आईने केलेला अर्थातच जास्त छान लागतो स्मित

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांना पोटभर नाष्टा होतो.
अधिक टिपा: 

१. पीठ उन्हाळ्यात ५-६ तासांत छान फसफसते. एरवी मी रात्री ओवनमधे ठेवुन देते ढोकळे सकाळी करायचे असतील तर. अवन प्री-हीट करायची गरज नाही.
२. पीठ छान फसफसले नसेल तर मिश्रण ताटात घालण्याआधी अगदी एक मिनिट चिमुटभर सोडा घालावा.

माहितीचा स्रोत: 
आई :)