पोह्याचे आप्पे

Submitted by स्वाती लाड on 10 November, 2021 - 07:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पोहे 2 वाटी, रवा 2 चमचे, गाजर किसून 1, कोथिंबीर मूठभर, कांदा 1 बारीक चिरून, राई ¼ चमचा, जिरे ¼ चमचा, 2 हिरवी मिरची, कढीपत्ता 4-5 पाने, दही 100 ग्रॅम, तेल, मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

प्रथम पोहे भिजवून ठेवा. पोहे भिजेपर्यंत 2 चमचे तेल गरम करून त्यात राई, जिरे, चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कढीपत्ता परतून घ्या नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका व परतून घ्या. ही फोडणी थंड होऊ द्या. भिजवलेले पोहे थोडे स्‍मॅश करून घ्या. त्यात किसलेले गाजर, दही, कोथिंबीर, रवा आणि तयार केलेली फोडणी टाका. चवीप्रमाणे मीठ टाका. आवश्यकतेनुसार पाणी टाका. मिश्रण जास्त पातळ करू नका थोडे जाडसर ठेवा. आप्पेपात्रात पाव चमचा तेल टाका तेल थोड गरम झाले की तयार केलेले आप्प्यांच मिश्रण टाका. 2 मिनिटे झाकण ठेवा. 3 ते 4 मिनिटमध्ये 1 बाजूने आप्पे शेकले की चमच्याच्या सहाय्याने ते परतून दुसर्‍या बाजूने शेकून घ्या. दोन्ही बाजूने आप्पे शेकले की चटणी किंवा सॉस सोबत गरमागरम आप्पे खाण्यासाठी तयार.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे 4 जणासाठी
अधिक टिपा: 

मिश्रण थोडे घट्टच ठेवावे. नाहीतर आप्पेपात्रात आप्पे नीट होणार नाहीत. सोडा घालायचा असल्यास चिमूटभर टाकावा पण आवश्यकता नाही.

माहितीचा स्रोत: 
ट्रेन मधली मैत्रीण आणि थोडे माझे बदल
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मस्तच इन्स्टंट आप्पे.
एक शंका: रवा घालून कालवले की मिश्रण मुरायला काही वेळ द्यावा लागतो की लगेच करता येतात?

मस्त रेसिपी.

पोहे जाड घ्यायचे असतील अस वाटतय पोहे भिजवून ठेवा म्हटलंय म्हणून.

पोहे वाटून त्यात रवा, दही घालून सरसरीत भिजवायच आणि करताना थोडा सोडा /इनो किंवा बेकिंग पावडर घालून जाडसर उत्तपे घालायचे. जाळी छान पडते . अगदी थोडाच घातल्याने सोड्याची चव येत नाही. मऊ मऊ मस्तच लागतात.

ब्रेक फास्ट साठी छान option आहे. मूळ घटक पोहे आणि उपम्याचेच पण चवीत खूप फरक पडतो.

सोडा आणि eno नसल्यामुळे नक्कीच करून बघणार..
>> सोडा आणि उनो खरे तर आरोग्यासाठी हितकारक आहे..

रव्याबाबतीत मलापण मानव यांच्यासारखीच शंका आहे. पण दोनच चमचे रवा, तोही बारीक असेल तर लगेच मुरेल बहुतेक.
करून बघितले पाहिजेत. छान आहे पाकृ!

छान आहे पाकृ, पण फोटो नसल्याने पाकृ पाहिल्याचं फिलिंग येत नाही.
रवा बारीक असल्याने लगेच मुरतो. जास्त असला तरी. कांदा , गाजर कापाकापी / खिसाखिशी होईपर्यंत. मी डोसे करते सरसरीत भिजवून. इनो सोडा नाही घातलं तरी छान मऊ मऊ जाळीदार होतात. खरं माझे पोहे प्रमाण कमी असतं. याबरोबर भाजलेले शेंगदाणे+ कोथिंबीर+ही मी+मीठ+साखर+ फोडणी ही चटणी मला आवडते.

स्वाती_आंबोळे - पोहे जाड घ्यायचे. आपण कांदेपोहे ना घेतो तेच.
मानव पृथ्वीकर - रवा टाकल्यानंतर मिश्रण आप्पेपात्र गरम होईपर्यंत तयार होते. जास्त वेळ मुरवण्याची गरज नाही.
मनीमोहोर - हो या मिश्रणाचे आप्पे, डोसे तर होतातच. तसच थोड घट्ट असेल तर पॅन वर छोटे छोटे कटलेट सुद्धा शलोफ्राय करून छान होतात. हवे असल्यास त्यात मक्याचे दाणे व मटार सुद्धा थोडे स्‍मॅश करून टाकू शकतो.