आयुष्य आणि करिअर

Submitted by नानाकळा on 17 April, 2017 - 05:49

एखाद्या विद्याशाखेचं पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर 'आता काय करू?' हा प्रश्न जर उभा राहत असेल तर आडातच समस्या आहे असं माझं मत आहे.

दहावीचा निकाल लागेपर्यंत लोक्स निर्धास्त असतात. "पुढे काय करणार?" असं विचारल्यावर "किती मार्क्स मिळतात त्यावर ठरवू" असं उत्तर देतात. जणू आयुष्यात पहिल्यांदाच कुठलाही अभ्यास न करता थेट दहावीचीच परिक्षा दिली असते. शाळेतल्या पूर्वपरिक्षेच्या निकालावरून साधारण अंदाज तर येतो ना? फारतर ५% अगदीच १०% फरक असू शकतो. पण 'शाळेत ९८-९५ मिळवत होता हो पण बोर्डात बघा फक्त ४५ मिळाले' असं तर नसतं ना?

निकाल लागताक्षणी आधी कागदपत्रे मिळवण्याची हातघाई. कागदपत्रांच्या आधी ते 'कोणते, कसे आणि कुठे मिळतील' याच्या चौकशीपासून सुरुवात होते. अरे दहावीची आख्खी सुटी पोरं टवाळक्या करत घालवत होती ना? त्यांना धाडायचं ना माहिती काढायला. जरा दुनियादारी पण कळेल तेही एकही पैसा न घालवता. कारण नंतर 'तुमचं काम १० मिनिटांत करून देतो' असं म्हणून कागदांसकट दोन-तीन हजार रुपये घेऊन गायब होणारे जी दुनियादारी शिकवतात ती भारी पडते. हा वेंधळेपणा ८०च्या दशकात होता आणि अजूनही आहेच बरंका.

यानंतर येते विद्याशाखा निवडायची पाळी. तेथे खरी मदर ऑफ ऑल गोंधळ असते. बाब्याने आणि बाब्याच्या बाबाने जे काही ठरवलं असतं ते सत्यात उतरत नाही असं दिसायला लागतं. काही सुपुत्र जिथे मित्र तिकडे आम्ही शेपूट हलवणारे कुत्रं याच भुमिकेवर ठाम असतात. जरा बरे मार्क्स असतील तर शहरातल्या सर्वोत्तम आणि विज्ञानशाखेच्या कॉलेजमधेच जायचे असते. मग इकडे विचार, तिकडे विचार करत अक्षरशः दोन-पाच दिवसांत 'पुढची पन्नास वर्षे कोणत्या विद्याशाखेत आयुष्य घालवणार' याचा निर्णय घेतला जातो. त्यात काय गल्त हाय बाप्पा? लगीन करतांनी बापाने नाय का आयला ५ मिनिटांत पसन केल्ती? पुढच्या ५० वर्षाचा थो इचार करत बसला आसता तर आज हे दिवस दिसलं असतं का?

असो. सामाजिक दबावाखातर, मित्रांच्या आग्रहाखातर, कुठल्यातरी स्नेहींच्या यशस्वी कारकिर्दीकडे पाहून (खरेतर त्याच्या बंगला-गाडीकडे पाहून) मला याच शाखेत अकरावीसाठी प्रवेश घ्यायचाय हे निश्चित होतं. ज्यांना यथातथा मार्क्स असतात ते काहीतरी भयंकर गुन्हा केल्यासारखे आपले मार्क्स, आपली विद्याशाखा आणि आपलं कॉलेजचं नाव लपवत फिरत असतात. काही नातेवाईक आपण स्वतः काय तीर मारलेत ते पार विसरून ते पार टोचून टोचून पोराला हैराण करतात. लग्नकार्यात, समारंभात, "जाऊबाइंच्या मुलाचं काही खरं नाही बघा, अहो काय शिकतोय, शिकतोय का नाही काहीच सांगत नाही. आमच्या मुलांनी मात्र नाव काढलं हो. एक इंजिनीअरींग करतोय, दुसरा डॉक्टर झालाय बरं का." वैगेरे वैगेरे. ही टोचून जखमी झालेली पोरं चिवट आणि जिद्दी असतील तर याच लोकांना डोळे बाहेर काढायला लागतील अशी प्रगती उत्तरआयुष्यात करतात. तो भाग वेगळा. पण दहावीनंतर बारावी होईस्तोवर फारच ताण सहन करावा लागतो.

चला पुढे: दहावी पास. आता घुसा विज्ञान शाखेत, मग वाणिज्य आणि फारच काय नाय जमलं कुठे तर मजबूरी का नाम महात्मा गांधी म्हणून कलाशाखेत. काय करणार, गावात अशी तीनच कॉलेज असतात ना? याच्यापार बापाला माहितही नसतं आणि शक्तीही नसते माहित करून घ्यायची. कसंबसं, भरमसाठ शिकवण्या लावून, फिया भरून पोरं मार्कांच्या स्पर्धेत पळत असतात. अरे याला १० मार्क आहेत, हा घ्या, याला दोन मार्क्स आहेत हा ऑप्शनला टाका. परिक्षेचं तंत्र आत्मसात करताकरता आयुष्याचं तंत्र आत्मसात करायचं राहून जातं. त्यात कुठे प्रेमप्रकरणाची झुळूक आली की समोरची पुस्तकं उडून जातात. परिक्षा तोंडावर आली की झोंबीसारखे अभ्यासाला लागून बारावीची खिंड पार करायच्या कामाला लागतात.

झाली बारावी? ओके. आता परत जिथे दहावीच्या निकालाच्या वेळेस होतो तिथेच आलोय बरंका. फक्त एक अजून अ‍ॅड झालंय. विविध शाखांच्या प्रवेश परिक्षा (यानेकी सरकारचे हमखास व राजरोस पैसे खाण्याचे कुरण). ज्याचा अभ्यास बारावीसोबतच केल्या जातो. काहीतरी उचकपाचक करून या परिक्षा पास होऊन पोरं इंजिनिअरिंग, मेडीकल ला प्रवेश घेती होतात.

सुपरटेक्निकलमधे (पक्षी: इंजि. मेडी.) पहिल्यांदा कळतं की आपण नक्की काय शिकायला आलोय इथं तेव्हा धाबं दणाणतं. अभ्यासक्रम अंगावर यायला लागतो आणि मग उपरतीची भावना तयार व्हायला लागते. अरे ये मै कहां आ गया? खरंच मला हेच करायचं आहे का? हा धक्का बसेपर्यंत बाब्याने शांतपणे कधी विचारच केलेला नसतो. एवढं होऊ दे, पुढंचं पुढे बघू असं करतच, दहावी-बारावी-पदवी, वन-स्टेप-अ‍ॅट-अ-टाईम म्हणत धावत असतो. केट्या बसत बसत कसंबसं पदवीचं शिक्षण पूर्ण होतं. मूल मोठं झालेलं असतं. दुनियादारी चांगलीच समजायला लागते. मग स्वत:चे निर्णय स्वतः घ्यायचे असतात. पण वेळ निघून चालली असते. पटकन नोकरी शोधायची असते. कारण बाप हे सुपरटेक्निकलचे खर्च पुरवता पुरवता पुरता टाचा घासायला लागला असतो. आतातरी गप्पकन पोरगा नोकरीला लागेल आणि भप्पकन घरात भगिरथाची गंगा लक्ष्मीच्या रुपात उसळ्या घेत अवतरेल याची स्वप्नं रंगायला लागलेली असतात. मागचा पुढचा विचार न करता पोरगं जे समोर येईल ती नोकरी पकडून घेतं. ठेचकाळत, थांबत, धावत, रक्त ओकत 'सेटल्ड' आयुष्याचं स्वप्नं पुरं करत असतो. इथं व्यक्तिगत आवडीनिवडीला कुणीच विचारत नसतं आता. नोकरी पाहिजे हाताला तरच लग्नाच्या बाजारात उभं राहता येतं ना भावाला? कसलं हिडन टॅलेंट अन् कसलं काय. लग्न होतं, वर्षा-दोन वर्षात लेकरू येतं. बाब्याचं आयुष्य एम-सील लावून एका पाइपातून सरळच वाहणारं पाणी होऊन जातं.

थोडंफार सोडलं तर आपल्याकडे हे असंच चित्र आहे. एका लेखात सगळ्याच कारणमीमांसा शक्य नाहीत. त्यामुळे जेवढं जमलं तेवढं लिहिलं.

या लोंढ्यांमधून काही तरूण आपला बाज ओळखून लगेच त्या मार्गाला लागतात आणि यशस्वी होतात. असे करणार्‍यांची टक्केवारी १-५ टक्क्याच्या आसपास असेल. बाकीचे जे धन देतंय त्याचंच ऋण मानून आयूष्य काढतात. पण काही मुलं पुर्वीच्या पीढीपेक्षा प्रचंड हुशारी व मेहनतीने काम करतायत. त्यांची निर्णय घेण्याची, समस्यांवर उपाय शोधण्याची प्रवृत्ती अद्भूत आहे. काहीतरी खास आहे जे आधीच्या पीढ्यांकडे नव्हतं. पण अशा मुलांची संख्याही तशी कमीच आहे हे तेवढंच खरं आहे. आणि प्रत्येक आई-बापाला आपलं मूल हे त्या 'खास' मध्येच आहे अशी पक्की खात्री असते हेही तितकेच खरे बरं का.

मला कायम प्रश्न पडत आलाय तो हा की करीअर मार्गदर्शन नेमकं कोणत्या वयात व्हावं? त्याची शास्त्रीय पद्धत (मेथाडॉलॉजी) काय असावी किंवा आहे का? त्याचा उपयोग होतोय का?

कळव्यात राहत असतांना आमचे घरमालक एका इंजीनीअरींग कॉलेजमधे नोकरीस होते. त्यांनी मुलीला जबरदस्ती झेपत नसतांना त्याच कॉलेजात सीवीलला टाकले. कारण काय तर मुलगी डोळ्यासमोर राहील. त्या मुलीला नृत्याची आवड आणि खरोखर उत्तम नृत्य करता येत होते. पण वडीलांच्या दबावामुळे आणि झेपत नसलेल्या अभ्यासाने ती मुलगी कायम खंगलेली असायची. आजारी आणि कृश असायची. कधी नृत्य वैगेरे करायची तेव्हाच काय तो हसरा चेहरा आणि उत्साही वाटायची. आम्ही त्यांचे वर्षभर मागे लागून त्या मुलीची अवस्था कशामुळे झाली हे पटवून दिले. तीला परफॉर्मींग आर्टचं शिक्षण घेऊ द्या म्हणून त्यांना बरेच मार्गदर्शन केलं. तेव्हा कुठे ते आपला हेकेखोरपणा सोडायला तयार झाले. पुढे काय झालं ते कळलं नाही कारण नंतर आम्ही तिथून दुसरीकडे राहायला गेलो.

मी अशा दोन डॉक्टरांना भेटलोय ज्यांना मेडीकलला जायचेच नव्हते. एक गायनॅकोलॉजिस्ट जीचा आर्कीटेक्टसाठी जेजे मधे नंबर नाही लागला, पण मेडीकलमधे लागला म्हणून तेवढ्यासाठी आर्कीटेक्ट व्हायचं स्वप्न सोडून डॉक्टर झाली. दुसरी आयुर्वेद डॉक्टर तिला चित्रकलेची आवड होती, जेजेत शिकायचं होतं पण कोणा जवळच्या हितचिंतक महाभागाने तीला सल्ला दिला की हे फार वाईट क्षेत्र आहे, पुढे काही स्कोप नाही. म्हणून ती बापडी नाइलाजाने डॉक्टर झाली. अशांना भेटलो की बरेच प्रश्न उभे राहतात मनात. केवळ भरमसाठ पैसा कमावण्यासाठी काहीही करावं? जे मनाविरूद्ध आहे तेही? त्याची अनैसर्गिक सवय करून घ्यावी? खरंच आयुष्य जे मिळालंय ते एक शिक्षा म्हणून भोगतो का आपण? 'बस एवढं झालं की नंतर सुखच आहे' असं प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजवत राहायचं? ते 'नंतर' कायम 'आता' मधे नाही का बदलता येणार?

पहिल्यापासून आपल्या आवडीनिवडींना शास्त्रशुद्ध पद्धतीने ओळखून त्याच्याशी संबंधीत क्षेत्रात व्यवसाय नोकरी मिळवणे शक्य आहे. गरज आहे एका दूरदृष्टीची, मेहनत घेण्याची, समाजाच्या विचित्र नजरा आणि प्रश्न झुगारून द्यायची. कुठल्याही क्षेत्रात पारंगत व्हायला, व्यावसायिक कौशल्य प्राप्त करायला आणि त्यातून अर्थाजनाचा कायम स्त्रोत मिळवण्याच्या पात्रतेचे व्हायला फक्त सात वर्ष कसून मेहनत, अभ्यास लागतो. चार वर्षे शिक्षण आणि तीन वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव. हे सात वर्षे जो कुणी आयुष्याच्या कुठल्याही वळणावर आपल्या आवडीनिवडीला अनुसरून देईल त्याला मनशांती, पैसा आणि शाश्वत आनंद मिळेल असं वाटतं. जगात प्रत्येकासाठी काम आहेच. कारण निसर्गात ज्याची गरज असते तेच उत्पन्न होत असतं. फक्त जे उत्पन्न झालंय त्याला जिथे गरज आहे तिथवर पोचायला प्रचंड कष्ट लागतात. पण शिखरावर गर्दी कमी असते.

या सर्वांचा विचार आजच्या पालकांना करायलाच लागेल. कारण लोकसंख्या भरमसाठ आहे. शासन बेरोजगारांचा शिक्का नको म्हणून कॉलेजांच्या जिलेब्या पाडत आहे. त्यातून इतके पदवीधर बाहेर पडतायत की त्यांच्यात प्रचंड स्पर्धा नोकरी मिळवण्यासाठी वाढते आहे. एकीकडे कुशल मनुष्यबळ तीव्र टंचाई आणि दुसरीकडे उच्चशिक्षित, अकुशल व भ्रमित मनुष्यबळाचे लोंढे. आपलं मूल या लोंढ्यात असणार नाही याची काळजी घ्यायलाच लागेल.

शेवटी एक उदाहरण देतो. माझा एक शाळा-वर्गमित्र जो सिविल इंजिनीअर आहे (आणि ते त्याचं खरंच वेड आहे) तेव्हा रीलायन्सच्या तेलसंशोधन विभागात होता. त्याने त्याच्या ऑफीसमधल्या एकाला आमच्या सोबत तीसरा रूमपार्टनर म्हणून आणले होते. हे साहेब आसाममधले नॉर्थ-इस्ट एथनिसिटीवाले. हा त्याचा पहिलाच जॉब. पगार ८० हजार (२००७) मी म्हटलं 'बाबारे, असं तू काय शिकलायस की तुला एवढा पगार आहे?' तो म्हणाला, 'भूगर्भ-शास्त्रात एमएस्सी केलंय. आणि मला अजून मोठ्या तेल कंपन्यांकडून दीड-दोन लाखाच्या ऑफर्स येत आहेत. मला फक्त निर्णय घ्यायचाय कुठली कंपनी निवडू.' मी माझ्या वर्गमित्राला म्हणालो, "बघ निल्या, आपण इथं महाराष्ट्रासारख्या अतिप्रगत भारतीय राज्यामधे राहून असं काही शिक्षण घेता येतं आणि त्याला एवढी मागणी आहे हे आपल्यापर्यंत पोचत नाही, तर खरंच आपण पुढारलेले आहोत का?" निल्याकडे तेव्हा सिवीलची डीग्री आणि चार वर्षाचा अनुभव आणि ३० हजार रुपये पगार होता. माझ्याकडे दोन डीग्र्या आणि सहा हजार पगार होता. तो आसामी आमच्या पेक्षा २ वर्षांनी लहान होता. आणि मी नुकतीच आवडत्या क्षेत्रात करीअरला सुरुवात केली होती.

त्या क्षणी 'योग्यवेळी केलेल्या करीअरप्लानींग आणि गायडन्सचा आयुष्यात मोलाचा वाटा आहे' हे जे कोरल्या गेलं ते कायमचंच. पैसा कमावण्यासाठीचे उत्तम क्षेत्र शोधून त्यात नोकरीधंदा करणे म्हणजे करीअर करणे असा बावळट अर्थ आपल्याकडे प्रचलित आहे. उपजिविकेसाठी नोकरी/धंदा करायला लागणे ह्या सरधोपट प्रकाराला ग्लॅमर चढवायची उसनी खुमखुमी आहे ही. करीअर म्हणजे एखाद्या क्षेत्रात स्वतःला वाहून घेणे, त्यात पैसा हा दुय्यम असतो तर त्या क्षेत्रात काम करायला मिळण्याची पात्रता कमावणे, महत्त्वाचे प्रकल्प हाताळता येणे, त्यात सहभागी होण्याची पात्रता कमावणे, काहीतरी महत्त्वाचं, अभिमान वाटेल असं समाजोपयोगी करता येणे म्हणजे करीअर करणे. पैशासाठी करतो तो नोकरीधंदा म्हणजे करीअर नव्हे. किमान एवढ्या भ्रमातून जरी बाहेर आले तरी उत्तम होइल.

- सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

याबाबतीत मी खूपच नशीबवान निघाले. मोठ्या बहीणीला कशी कोण जाणे, उपजतच अक्कल होती. १० वी नंतर जातीचा दाखला, nationality and domicile काढणे, १२ वी नंतर जात पडताळणी, हे सगळं आपलं आपण कलेक्टर ऑफीसला जाऊन केले व आम्हा लहान भावंडांनाही स्वत:लाच करायला लावले.
तिला स्वतःला काय करायचे आहे हे अगदी लहानपणापासून माहीत होते. अगदी शाळेत असतानाही ती वहीवर डॉ. लिहून पुढे आपले नाव लिहायची. तिच्या मेडिकलच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी काहीतरी घोळ सुरू होता पण अगदीच काही नाही तर इंजिनीअरींग कर म्हणून बाबांनी सांगितले. चांगल्या कॉलेजला अ‍ॅडमिशनही मिळाली होती, पण तिने बाबांना सांगितले की इंजिनिअर होण्यासाठी नाही जन्माला आले मी, मला डॉक्टरच व्हायचे आहे. एकदाचा अ‍ॅडमिशनचा घोळ संपला नी तिला हव्या त्या मेडिकल कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळाली. आता ती एक सुखी डॉक्टर आहे.
मला गणित व जीवशास्त्रात गती होती. हव्या त्या इंजिनिअरींग कॉलेजला अ‍ॅड्मिशन मिळाली. खरं तर जॉब करायचाच नव्हता मला पण टेंपररी काहीतरी करावे म्हणून शोधताना चांगल्या ठिकाणी जॉब मिळाला. पण नंतर तेच ते काम करून कंटाळा आला तेव्हा त्याच ऑफिसात दुसरे काम बघीतले व ते करू लागले. तेव्हापासून जर कंटाळा आलाच तर मी दुसरा एखादा विभाग शोधते नी सगळे सोपस्कार पूर्ण करून तेव्हा आवडलेले काम करायला सुरूवात करते. गेले १४-१५ वर्षे एकाच ऑफिसमधे काम करतेय आणि माझे काम एंजॉय करतेय. जवळपास सगळ्या विभागांत काम करून झालेय. पुरेसे पैसे, बदलत्या आवडीनुसार काम, स्वतःसाठी पुरेसा वेळ नी मनाचा आनंद मिळत आहे. मी माझ्या करिअर बद्दल खूपच समाधानी आहे.
बहीणीने समजून उमजून करीअर निवडले नी मी प्रवाहात वहात गेले पण कुठे वळायचं नी किती वेग ठेवायचा हे स्वतः ठरवत गेले. दोघीही सारख्याच सुखी आहोत.

Pages