आयुष्य आणि करिअर

Submitted by नानाकळा on 17 April, 2017 - 05:49

एखाद्या विद्याशाखेचं पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर 'आता काय करू?' हा प्रश्न जर उभा राहत असेल तर आडातच समस्या आहे असं माझं मत आहे.

दहावीचा निकाल लागेपर्यंत लोक्स निर्धास्त असतात. "पुढे काय करणार?" असं विचारल्यावर "किती मार्क्स मिळतात त्यावर ठरवू" असं उत्तर देतात. जणू आयुष्यात पहिल्यांदाच कुठलाही अभ्यास न करता थेट दहावीचीच परिक्षा दिली असते. शाळेतल्या पूर्वपरिक्षेच्या निकालावरून साधारण अंदाज तर येतो ना? फारतर ५% अगदीच १०% फरक असू शकतो. पण 'शाळेत ९८-९५ मिळवत होता हो पण बोर्डात बघा फक्त ४५ मिळाले' असं तर नसतं ना?

निकाल लागताक्षणी आधी कागदपत्रे मिळवण्याची हातघाई. कागदपत्रांच्या आधी ते 'कोणते, कसे आणि कुठे मिळतील' याच्या चौकशीपासून सुरुवात होते. अरे दहावीची आख्खी सुटी पोरं टवाळक्या करत घालवत होती ना? त्यांना धाडायचं ना माहिती काढायला. जरा दुनियादारी पण कळेल तेही एकही पैसा न घालवता. कारण नंतर 'तुमचं काम १० मिनिटांत करून देतो' असं म्हणून कागदांसकट दोन-तीन हजार रुपये घेऊन गायब होणारे जी दुनियादारी शिकवतात ती भारी पडते. हा वेंधळेपणा ८०च्या दशकात होता आणि अजूनही आहेच बरंका.

यानंतर येते विद्याशाखा निवडायची पाळी. तेथे खरी मदर ऑफ ऑल गोंधळ असते. बाब्याने आणि बाब्याच्या बाबाने जे काही ठरवलं असतं ते सत्यात उतरत नाही असं दिसायला लागतं. काही सुपुत्र जिथे मित्र तिकडे आम्ही शेपूट हलवणारे कुत्रं याच भुमिकेवर ठाम असतात. जरा बरे मार्क्स असतील तर शहरातल्या सर्वोत्तम आणि विज्ञानशाखेच्या कॉलेजमधेच जायचे असते. मग इकडे विचार, तिकडे विचार करत अक्षरशः दोन-पाच दिवसांत 'पुढची पन्नास वर्षे कोणत्या विद्याशाखेत आयुष्य घालवणार' याचा निर्णय घेतला जातो. त्यात काय गल्त हाय बाप्पा? लगीन करतांनी बापाने नाय का आयला ५ मिनिटांत पसन केल्ती? पुढच्या ५० वर्षाचा थो इचार करत बसला आसता तर आज हे दिवस दिसलं असतं का?

असो. सामाजिक दबावाखातर, मित्रांच्या आग्रहाखातर, कुठल्यातरी स्नेहींच्या यशस्वी कारकिर्दीकडे पाहून (खरेतर त्याच्या बंगला-गाडीकडे पाहून) मला याच शाखेत अकरावीसाठी प्रवेश घ्यायचाय हे निश्चित होतं. ज्यांना यथातथा मार्क्स असतात ते काहीतरी भयंकर गुन्हा केल्यासारखे आपले मार्क्स, आपली विद्याशाखा आणि आपलं कॉलेजचं नाव लपवत फिरत असतात. काही नातेवाईक आपण स्वतः काय तीर मारलेत ते पार विसरून ते पार टोचून टोचून पोराला हैराण करतात. लग्नकार्यात, समारंभात, "जाऊबाइंच्या मुलाचं काही खरं नाही बघा, अहो काय शिकतोय, शिकतोय का नाही काहीच सांगत नाही. आमच्या मुलांनी मात्र नाव काढलं हो. एक इंजिनीअरींग करतोय, दुसरा डॉक्टर झालाय बरं का." वैगेरे वैगेरे. ही टोचून जखमी झालेली पोरं चिवट आणि जिद्दी असतील तर याच लोकांना डोळे बाहेर काढायला लागतील अशी प्रगती उत्तरआयुष्यात करतात. तो भाग वेगळा. पण दहावीनंतर बारावी होईस्तोवर फारच ताण सहन करावा लागतो.

चला पुढे: दहावी पास. आता घुसा विज्ञान शाखेत, मग वाणिज्य आणि फारच काय नाय जमलं कुठे तर मजबूरी का नाम महात्मा गांधी म्हणून कलाशाखेत. काय करणार, गावात अशी तीनच कॉलेज असतात ना? याच्यापार बापाला माहितही नसतं आणि शक्तीही नसते माहित करून घ्यायची. कसंबसं, भरमसाठ शिकवण्या लावून, फिया भरून पोरं मार्कांच्या स्पर्धेत पळत असतात. अरे याला १० मार्क आहेत, हा घ्या, याला दोन मार्क्स आहेत हा ऑप्शनला टाका. परिक्षेचं तंत्र आत्मसात करताकरता आयुष्याचं तंत्र आत्मसात करायचं राहून जातं. त्यात कुठे प्रेमप्रकरणाची झुळूक आली की समोरची पुस्तकं उडून जातात. परिक्षा तोंडावर आली की झोंबीसारखे अभ्यासाला लागून बारावीची खिंड पार करायच्या कामाला लागतात.

झाली बारावी? ओके. आता परत जिथे दहावीच्या निकालाच्या वेळेस होतो तिथेच आलोय बरंका. फक्त एक अजून अ‍ॅड झालंय. विविध शाखांच्या प्रवेश परिक्षा (यानेकी सरकारचे हमखास व राजरोस पैसे खाण्याचे कुरण). ज्याचा अभ्यास बारावीसोबतच केल्या जातो. काहीतरी उचकपाचक करून या परिक्षा पास होऊन पोरं इंजिनिअरिंग, मेडीकल ला प्रवेश घेती होतात.

सुपरटेक्निकलमधे (पक्षी: इंजि. मेडी.) पहिल्यांदा कळतं की आपण नक्की काय शिकायला आलोय इथं तेव्हा धाबं दणाणतं. अभ्यासक्रम अंगावर यायला लागतो आणि मग उपरतीची भावना तयार व्हायला लागते. अरे ये मै कहां आ गया? खरंच मला हेच करायचं आहे का? हा धक्का बसेपर्यंत बाब्याने शांतपणे कधी विचारच केलेला नसतो. एवढं होऊ दे, पुढंचं पुढे बघू असं करतच, दहावी-बारावी-पदवी, वन-स्टेप-अ‍ॅट-अ-टाईम म्हणत धावत असतो. केट्या बसत बसत कसंबसं पदवीचं शिक्षण पूर्ण होतं. मूल मोठं झालेलं असतं. दुनियादारी चांगलीच समजायला लागते. मग स्वत:चे निर्णय स्वतः घ्यायचे असतात. पण वेळ निघून चालली असते. पटकन नोकरी शोधायची असते. कारण बाप हे सुपरटेक्निकलचे खर्च पुरवता पुरवता पुरता टाचा घासायला लागला असतो. आतातरी गप्पकन पोरगा नोकरीला लागेल आणि भप्पकन घरात भगिरथाची गंगा लक्ष्मीच्या रुपात उसळ्या घेत अवतरेल याची स्वप्नं रंगायला लागलेली असतात. मागचा पुढचा विचार न करता पोरगं जे समोर येईल ती नोकरी पकडून घेतं. ठेचकाळत, थांबत, धावत, रक्त ओकत 'सेटल्ड' आयुष्याचं स्वप्नं पुरं करत असतो. इथं व्यक्तिगत आवडीनिवडीला कुणीच विचारत नसतं आता. नोकरी पाहिजे हाताला तरच लग्नाच्या बाजारात उभं राहता येतं ना भावाला? कसलं हिडन टॅलेंट अन् कसलं काय. लग्न होतं, वर्षा-दोन वर्षात लेकरू येतं. बाब्याचं आयुष्य एम-सील लावून एका पाइपातून सरळच वाहणारं पाणी होऊन जातं.

थोडंफार सोडलं तर आपल्याकडे हे असंच चित्र आहे. एका लेखात सगळ्याच कारणमीमांसा शक्य नाहीत. त्यामुळे जेवढं जमलं तेवढं लिहिलं.

या लोंढ्यांमधून काही तरूण आपला बाज ओळखून लगेच त्या मार्गाला लागतात आणि यशस्वी होतात. असे करणार्‍यांची टक्केवारी १-५ टक्क्याच्या आसपास असेल. बाकीचे जे धन देतंय त्याचंच ऋण मानून आयूष्य काढतात. पण काही मुलं पुर्वीच्या पीढीपेक्षा प्रचंड हुशारी व मेहनतीने काम करतायत. त्यांची निर्णय घेण्याची, समस्यांवर उपाय शोधण्याची प्रवृत्ती अद्भूत आहे. काहीतरी खास आहे जे आधीच्या पीढ्यांकडे नव्हतं. पण अशा मुलांची संख्याही तशी कमीच आहे हे तेवढंच खरं आहे. आणि प्रत्येक आई-बापाला आपलं मूल हे त्या 'खास' मध्येच आहे अशी पक्की खात्री असते हेही तितकेच खरे बरं का.

मला कायम प्रश्न पडत आलाय तो हा की करीअर मार्गदर्शन नेमकं कोणत्या वयात व्हावं? त्याची शास्त्रीय पद्धत (मेथाडॉलॉजी) काय असावी किंवा आहे का? त्याचा उपयोग होतोय का?

कळव्यात राहत असतांना आमचे घरमालक एका इंजीनीअरींग कॉलेजमधे नोकरीस होते. त्यांनी मुलीला जबरदस्ती झेपत नसतांना त्याच कॉलेजात सीवीलला टाकले. कारण काय तर मुलगी डोळ्यासमोर राहील. त्या मुलीला नृत्याची आवड आणि खरोखर उत्तम नृत्य करता येत होते. पण वडीलांच्या दबावामुळे आणि झेपत नसलेल्या अभ्यासाने ती मुलगी कायम खंगलेली असायची. आजारी आणि कृश असायची. कधी नृत्य वैगेरे करायची तेव्हाच काय तो हसरा चेहरा आणि उत्साही वाटायची. आम्ही त्यांचे वर्षभर मागे लागून त्या मुलीची अवस्था कशामुळे झाली हे पटवून दिले. तीला परफॉर्मींग आर्टचं शिक्षण घेऊ द्या म्हणून त्यांना बरेच मार्गदर्शन केलं. तेव्हा कुठे ते आपला हेकेखोरपणा सोडायला तयार झाले. पुढे काय झालं ते कळलं नाही कारण नंतर आम्ही तिथून दुसरीकडे राहायला गेलो.

मी अशा दोन डॉक्टरांना भेटलोय ज्यांना मेडीकलला जायचेच नव्हते. एक गायनॅकोलॉजिस्ट जीचा आर्कीटेक्टसाठी जेजे मधे नंबर नाही लागला, पण मेडीकलमधे लागला म्हणून तेवढ्यासाठी आर्कीटेक्ट व्हायचं स्वप्न सोडून डॉक्टर झाली. दुसरी आयुर्वेद डॉक्टर तिला चित्रकलेची आवड होती, जेजेत शिकायचं होतं पण कोणा जवळच्या हितचिंतक महाभागाने तीला सल्ला दिला की हे फार वाईट क्षेत्र आहे, पुढे काही स्कोप नाही. म्हणून ती बापडी नाइलाजाने डॉक्टर झाली. अशांना भेटलो की बरेच प्रश्न उभे राहतात मनात. केवळ भरमसाठ पैसा कमावण्यासाठी काहीही करावं? जे मनाविरूद्ध आहे तेही? त्याची अनैसर्गिक सवय करून घ्यावी? खरंच आयुष्य जे मिळालंय ते एक शिक्षा म्हणून भोगतो का आपण? 'बस एवढं झालं की नंतर सुखच आहे' असं प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजवत राहायचं? ते 'नंतर' कायम 'आता' मधे नाही का बदलता येणार?

पहिल्यापासून आपल्या आवडीनिवडींना शास्त्रशुद्ध पद्धतीने ओळखून त्याच्याशी संबंधीत क्षेत्रात व्यवसाय नोकरी मिळवणे शक्य आहे. गरज आहे एका दूरदृष्टीची, मेहनत घेण्याची, समाजाच्या विचित्र नजरा आणि प्रश्न झुगारून द्यायची. कुठल्याही क्षेत्रात पारंगत व्हायला, व्यावसायिक कौशल्य प्राप्त करायला आणि त्यातून अर्थाजनाचा कायम स्त्रोत मिळवण्याच्या पात्रतेचे व्हायला फक्त सात वर्ष कसून मेहनत, अभ्यास लागतो. चार वर्षे शिक्षण आणि तीन वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव. हे सात वर्षे जो कुणी आयुष्याच्या कुठल्याही वळणावर आपल्या आवडीनिवडीला अनुसरून देईल त्याला मनशांती, पैसा आणि शाश्वत आनंद मिळेल असं वाटतं. जगात प्रत्येकासाठी काम आहेच. कारण निसर्गात ज्याची गरज असते तेच उत्पन्न होत असतं. फक्त जे उत्पन्न झालंय त्याला जिथे गरज आहे तिथवर पोचायला प्रचंड कष्ट लागतात. पण शिखरावर गर्दी कमी असते.

या सर्वांचा विचार आजच्या पालकांना करायलाच लागेल. कारण लोकसंख्या भरमसाठ आहे. शासन बेरोजगारांचा शिक्का नको म्हणून कॉलेजांच्या जिलेब्या पाडत आहे. त्यातून इतके पदवीधर बाहेर पडतायत की त्यांच्यात प्रचंड स्पर्धा नोकरी मिळवण्यासाठी वाढते आहे. एकीकडे कुशल मनुष्यबळ तीव्र टंचाई आणि दुसरीकडे उच्चशिक्षित, अकुशल व भ्रमित मनुष्यबळाचे लोंढे. आपलं मूल या लोंढ्यात असणार नाही याची काळजी घ्यायलाच लागेल.

शेवटी एक उदाहरण देतो. माझा एक शाळा-वर्गमित्र जो सिविल इंजिनीअर आहे (आणि ते त्याचं खरंच वेड आहे) तेव्हा रीलायन्सच्या तेलसंशोधन विभागात होता. त्याने त्याच्या ऑफीसमधल्या एकाला आमच्या सोबत तीसरा रूमपार्टनर म्हणून आणले होते. हे साहेब आसाममधले नॉर्थ-इस्ट एथनिसिटीवाले. हा त्याचा पहिलाच जॉब. पगार ८० हजार (२००७) मी म्हटलं 'बाबारे, असं तू काय शिकलायस की तुला एवढा पगार आहे?' तो म्हणाला, 'भूगर्भ-शास्त्रात एमएस्सी केलंय. आणि मला अजून मोठ्या तेल कंपन्यांकडून दीड-दोन लाखाच्या ऑफर्स येत आहेत. मला फक्त निर्णय घ्यायचाय कुठली कंपनी निवडू.' मी माझ्या वर्गमित्राला म्हणालो, "बघ निल्या, आपण इथं महाराष्ट्रासारख्या अतिप्रगत भारतीय राज्यामधे राहून असं काही शिक्षण घेता येतं आणि त्याला एवढी मागणी आहे हे आपल्यापर्यंत पोचत नाही, तर खरंच आपण पुढारलेले आहोत का?" निल्याकडे तेव्हा सिवीलची डीग्री आणि चार वर्षाचा अनुभव आणि ३० हजार रुपये पगार होता. माझ्याकडे दोन डीग्र्या आणि सहा हजार पगार होता. तो आसामी आमच्या पेक्षा २ वर्षांनी लहान होता. आणि मी नुकतीच आवडत्या क्षेत्रात करीअरला सुरुवात केली होती.

त्या क्षणी 'योग्यवेळी केलेल्या करीअरप्लानींग आणि गायडन्सचा आयुष्यात मोलाचा वाटा आहे' हे जे कोरल्या गेलं ते कायमचंच. पैसा कमावण्यासाठीचे उत्तम क्षेत्र शोधून त्यात नोकरीधंदा करणे म्हणजे करीअर करणे असा बावळट अर्थ आपल्याकडे प्रचलित आहे. उपजिविकेसाठी नोकरी/धंदा करायला लागणे ह्या सरधोपट प्रकाराला ग्लॅमर चढवायची उसनी खुमखुमी आहे ही. करीअर म्हणजे एखाद्या क्षेत्रात स्वतःला वाहून घेणे, त्यात पैसा हा दुय्यम असतो तर त्या क्षेत्रात काम करायला मिळण्याची पात्रता कमावणे, महत्त्वाचे प्रकल्प हाताळता येणे, त्यात सहभागी होण्याची पात्रता कमावणे, काहीतरी महत्त्वाचं, अभिमान वाटेल असं समाजोपयोगी करता येणे म्हणजे करीअर करणे. पैशासाठी करतो तो नोकरीधंदा म्हणजे करीअर नव्हे. किमान एवढ्या भ्रमातून जरी बाहेर आले तरी उत्तम होइल.

- सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

{{{ - सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.}}}

शेवटचं वाक्य तितकंसं वास्तवात उतरत नाही.

मायबोलीवर लेख टाकला म्हणजे लेखाचे बरेच हक्क मायबोली मालकांना मिळतात.

लेख पटला आणि बराच रिलेट झाला.

शिक्षण आणि करियर याची सांगड घालणे आमच्या सारख्या कोणत्या कलेत आणि क्षेत्रात गती नसलेल्या सामान्य विद्यार्थ्यांना अपरिहार्य होते.

आम्ही शिकलो त्या काळच्या बऱ्याच पालकांची चांगले शिक्षण= चांगली नोकरी + चांगले स्थळ= चांगले आयुष्य हीच धारणा होती आणि त्या विरोधात बोलायची हिम्मत आमच्याकडे तरी नव्हती. आणि त्यांच्या प्रमाणे आयुष्यभर भाड्याच्या घरात राहून, गरिबीत खस्ता काढून एक एक रुपया जमवून फी भरत असतो तर कदाचित माझी पण विचारसरणी तीच असती.

आताची विद्यार्थी पिढी बरीच फोकस्ड आणि वेल अवेअर आहे. पालक पण ठोकळेबाज विचारसरणीतून बाहेर पडत आहेत. तेव्हाचे पालक आणि आजकाल आजी आजोबा असलेले सर्व सुद्धा विचाराने मॉडर्न आणि supportive झाले आहेत.
आर्थिक परिस्थिती पण सुधारलेली आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील आणि CA सोडून पण बऱ्याच क्षेत्रात करियर करता येते याची अवेअरनेस येते आहे.

मी जरा एक २० ते २५ वर्षे उशिरा जन्माला आलो असतो तर किती बरे झाले असते ..... Happy

मान्यच!
रोजचे काम बोरींगवाटून त्या तथाकथित धकाधकी उर्फ ड्र्जरीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी छंद जोपासणे आणि वेळीअवेळी त्यावर लेख, फोटो, इत्यादी टाकत बसणे याचे मूळ हेच आहे.
फार कमी लोकांना जीविका आणि उपजीविका यातला फरक मिटवता येतो. आणि तसे एकदा झाले की प्रत्येक दिवस मजेचा!

लेख पटला, आवडला.
असे मार्गदर्शन उपलब्ध असते याची कल्पना ना पालकांना असते ना मुलांना. खुपदा चुकीची शाखा निवडली जाते आणि मेहनतीच्या
बळावर यशही मिळते.. पण मग आयूष्यभर ते न आवडणारे क्षेत्र सतत मानगुटीवर बसलेले असते.

माझी मुलगी या वर्षी दहावीत गेली. कुठल्या क्षेत्रात वाहून घ्यायला आवडेल याबद्दल तिला अजिबात कल्पना नाही. मार्गदर्शनासाठी कोणती चांगली संस्था आहे का?

लेख पटला आणि आवडला.
पूर्वीपेक्षा किंचित परिस्थिती बदलतेय का आता? म्हणजे मुलं इंजिनियरींगलाच (मेडिकल सगळ्यांच्या खिशाला परवडत नाही म्हणून) फक्त प्राधान्य न देता जरा वेगळा मार्ग निवडतायत का? स्वानुभव नाही ह्यांचं त्यांचं ऐकून असं वाटलं.

पूर्वीपेक्षा किंचित परिस्थिती बदलतेय का आता?

>> ह्या प्रश्नाचा विचार करणारा वेगळा लेख लिहिलेला आहे, थोड्या दिवसांनी तो टाकतो. प्रस्तुत लेख केवळ मेट्रो नव्हे तर भारतातल्या सर्व स्तरांमधल्या पालक-बालकांच्या एकूण वागण्या-विचार करण्याच्या सर्वसाधारण परिस्थितीबद्दल आहे. वरचे दोन तीन प्रतिसाद परिस्थिती बदलली आहे - बदलत आहे ह्याबद्दल सुतोवाच करतांना वाटलेत, परिस्थिती बदलत आहे पण त्यांच्यासाठीच जे भविष्याचे आकलन करण्याची क्षमता राखून आहेत. ९० टक्के लोक अजूनही चाचपडत आहेत.

करिअर मार्गदर्शन ह्याबद्दल अजून म्हणावी तशी जनजागृती नाही, योग्य करिअर मार्गदर्शन म्हणजे काय याबद्दलही अजून बेन्चमार्क ठरलेले नाहीत. काही अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट्स वगैरे घेऊन, मग त्यानुसार ढोबळमानाने "कोणत्या क्षेत्रात कोणत्या नोकर्‍या आहेत" ह्याबद्दल बालक-पालकांना माहिती-आधारित समुपदेशन केले जाते. एकूण माझ्या अभ्यासानुसार भारतात करिअर गायडन्स हे दर्जेदार, किंवा खरोखर करिअर गायडन्स म्हणावे असे नाही. जे आहे ते फक्त "उपजीविकेसाठीच्या संधी" अशा स्वरुपाचे आहे. अनेक करिअर मार्गदर्शक-समुपदेशक हे फक्त माहितीसंकलक असल्यासारखे असतात. काही लेक्चरबाज असतात, काही मार्केटींगमास्टर असतात. चांगले मार्गदर्शक समुपदेशक मिळणे नशिबाचा भाग आहे.

आजकाल ऑनलाइन-ऑफलाइन वगैरे प्रकारांत अनेक करिअर-अ‍सेसमेंट टेस्ट्स उपलब्ध आहेत. अशा चाचण्यांमधून जे मार्गदर्शन मिळतं त्याची विश्वासार्हता माहित पडायला सुमारे १० ते १५ वर्षे लागू शकतात.

याविषयी या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणार्‍या लोकांकडून अभ्यासपूर्ण प्रतिसाद आल्यास आवडेल.

त्या क्षणी 'योग्यवेळी केलेल्या करीअरप्लानींग आणि गायडन्सचा आयुष्यात मोलाचा वाटा आहे' हे जे कोरल्या गेलं ते कायमचंच. >>

प्रत्येकाला आयुष्याच्या उमेदीत आपली आवड कळेल याची काहीच खात्री नाही. कित्येकदा एका विशिष्ट क्षेत्रात पुढे गेल्यावर मागाहून आपल्या मनाचा कल कळतो. आपल्याकडे प्रचलित व्यवस्थेत एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाण्याच्या किती संधी मिळतात?
विज्ञान शाखेतल्या एखाद्याला इतिहास शिकण्याची आवड असली तरी तशी संधी त्याला प्रचलित व्यवस्था देते का ?

दुसरीकडे, आपल्याला एखादी गोष्ट आवडते की नाही, हे प्रत्यक्षात पडताळून पाहण्याची संधी तरी किती जणांना मिळते?
एखाद्याच्या घरी दोन वेळच्या जेवणाची मारामार असताना स्वतःची आवड जोपासण्याची संधी मिळेल? संगीत, चित्र, नृत्य, अभिनय इत्यादी गोष्टींची तोंडओळख तरी होईल का?

चांगला लेख.
सामाजिक दबावाखातर, मित्रांच्या आग्रहाखातर, कुठल्यातरी स्नेहींच्या यशस्वी कारकिर्दीकडे पाहून >>>> आमच्या वेळी खरोखर अशीच परिस्थिती होती Happy आता बदलली आहे की काय ते माहित नाही.
हल्ली ते करियर काउन्सिलिंग चे प्रस्थ ही ऐकू येते. पण त्यात पण फिंगर प्रिंट्स वरून कल सांगणार अशा प्रकारची हस्तमुद्रिक सद्रुश जाहिराती पण दिसतात, लुटायचे नवनवीन उपाय !

चांगला लेख. बहुतांशी पटला पण एक गोष्ट पटली नाही.
> थोडंफार सोडलं तर आपल्याकडे हे असंच चित्र आहे.
माझेही मत बरीच वर्षे तुमच्यासारखे होते पण आता या एका मुद्द्यावर बदलले आहे. हे मी सर्रास अमेरिकेतही पाहतो आहे. काही युके आणि मेक्सिकोतल्या मित्रांच्या संभाषणातून तिथेही वेगळी परिस्थिती नाही. मी त्या त्या देशातल्या मुख्य प्रवाहातल्या कुटुंबाबद्दल लिहितो आहे. (बाहेरून तिथे स्थायिक झालेले नाही) एक फरक नक्कीच आहे की शिक्षणाचा खर्च आईवडील करतीलच असे नाही. पण नक्की काय करायचे हे माहिती नसल्यामुळे कर्ज काढून आपल्याला जमत नसलेले शिक्षण घेणे, फुकट शिक्षण ( सरकारी आर्थिक मदतीतून) मिळाले म्हणून त्यात लक्ष न घालणे आणि वर्षे वाया घालवणे, मित्रांच्या प्रभावाखाली येऊन स्वतःला न पेलवणार्‍या वर्गात प्रवेश घेणे जगात सगळीकडे आहे. उलट वैयक्तीक स्वातंत्र्याला पाश्चात्य देशात खूप महत्व असल्याने , कर्ज मिळणे बरेच सहज असल्याने, भारतात जो पालकांचा थोडासा तरी अंकुश असतो तो ही इथे नाही. उलट मागचा पुढचा विचार न करता केवळ प्रेमाकरता एखाद्या कॉलेजमधे जाणे , लहान वयातच मूल होऊ देणे हे प्रश्न अजून तरी आपल्याकडे तितके नाहीत ( मी असताना तरी नव्हते).

आणि मुद्दे थोडेफार बदलले असतील, पण माझ्या पालकांबरोबरचे माझे संवाद आठवले आणि माझी आणि माझ्या मित्रांची मुले यांच्याबरोबरचे संवाद पाहता , दर पिढीत हे होतच असते. हे वयात येताना , व्यक्तिमत्वात होणार्‍या बदलांचा परिणाम आहेत. समाजा-समाजात थोडे फार फरक असतीलच पण हा फक्त "आपल्याकडचा" प्रश्न नाही. हे एकदा लक्षात आले की कदाचित तुम्ही याकडे वेगळ्या चष्म्यातून पाहू शकाल.

पाश्चात्य देशात आपल्या शिक्षण पद्धतीपेक्षा खूप स्वातंत्र्य आहे. हवे ते विषय शिकता येतात हे सगळेच सांगतात. पण या स्वातंत्र्याचा उपयोग करूनही जी काही नोकरी मिळेल ती करून परत दु:खी राहणे जगात सगळीकडेच आहे. केवळ system ने स्वातंत्र्य दिले, समाजाने सकारात्मक दृष्टीने सगळ्या व्यवसायांकडे पाहिले तरी मूलभूत प्रश्न ( मी काय केले की मला यशस्वी वाटेल) सुटलेले नाहीत.

अजय,
मी अजून भारताबाहेर गेलो नाही, वरची निरिक्षणे केवळ भारतात राहून भारताबद्दल केलेली आहेत, तसेच इतर कोणा देशासोबत ही तुलना नाहीये अन्यथा इतर देशाची उदाहरणे देऊन 'तिकडे बघा, कित्ती छाने!' प्रकारचं काहीतरी लेखात आले असते.

'आपल्याकडे' ह्या शब्दामागे देशसापेक्ष वगैरे नसून एक सामाजिक परिस्थिती आहे. ह्याबद्दल उहापोह पुढच्या लेखात करणार आहे.

नानाकळा,
"आपल्याकडे" हा शब्द थोडा व्यापक अर्थाने घेतला. तुम्ही म्हणताय तशीच "सामाजिक परिस्थिती" मलाही अपेक्षीत आहे. मी महाराष्ट्राबाहेर , भारतातच इतर राज्यात काही वर्षे राहिलो आहे. तिथेही स्थानिक रहिवाशी तरूणांच्या निर्णयक्षमतेबद्दल बोलतांना "त्यांच्याकडच्या" सामाजिक परिस्थितीबद्द्ल बोलायचे. मला काही वर्षांपूर्वी बंगळुरात एका कानडी सहकार्‍याबरोबरचं संभाषण आठवलं. तुमच्या लेखातली काही वाक्ये मी पुन्हा एकदा नव्याने ऐकतो आहे (Deja Vue) असे वाटले. फरक इतकाच की तेंव्हा तरी महाराष्ट्र म्हणजे सगळ्यात प्रगत राज्य अशी इतर राज्यातल्या रहिवाशांची समजूत होती.

आगाऊ +१
अतरंगी म्हणतात त्यातही तथ्य आहे. आज जी पिढी चाळिशीत आहे त्यातल्या अनेकांचे (सर्व नाही) आईवडील कठीण परिस्थितीतून वरती आलेले होते त्यामुळे आर्थिक स्थैर्य हे सगळ्यात महत्वाचे अशी त्यांची त्यांच्या दृष्टीने बरोबर धारणा होती. त्यामुळे ज्या नोकरीत पैसे चांगले (बॅन्क, डॉक्टरी, इंजिनीअर, इ.) ते शिक्षण मुलांना दिले पाहिजे अशी साहजिकच एक मानसिकता होती. त्यातही वेगळं काही करू बघणार्‍याला पाठिंबा देणारेही पालक होते. पण कमी प्रमाणात. 'बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको' हे मध्यमवर्गीय मराठी मानसिकतेचं त्यावेळचं व्यवच्छेदक लक्षण होतं. तेच निम्नमध्यमवर्ग, निम्नवर्ग, ग्रामीण समाज यातही झिरपलं, विविध आर्थिक सामाजिक कारणांमुळे त्यांचीही तशीच मानसिकता झाली.
आता मध्यमवर्गातला काही टक्का बदलतो आहे पण प्रमाण कमीच.

खरं सांगायचं तर आपल्या शिक्षण व्यवस्थेत मुलांना स्वतंत्रपणे विचार करायला शिकवणे, आसपासच्या वास्तवाची जाणीव होऊन आपला भवताल 'एक्स्प्लोर' करणे (छंदवर्ग, कला, ट्रेकिंग याच्या आखीव चौकटीबाहेर) असं काही फारसं होतच नाही. आपण सगळे सततच 'मार्क्स'वादी असतो. प्रचंड लोकसंख्येमुळे सगळीकडेच स्पर्धा आहे आणि त्यासाठी परीक्षेतील उत्तम गुण गरजेचे आहे हे काही अंशी खरं असलं तरी आयुष्यातलं एकमेव उद्दीष्ट नाही हे घिसंपिटं वाक्य परत एकदा खरोखरीचं समजावलं गेलं पाहिजे. रोजच्या अभ्यासाच्या रेट्यात मुलांना ना विचार करायला वाव दिला जातो ना स्वतंत्रपणे प्रश्न विचारायला, त्यांच्यातील कुतुहल जागे ठेवायला! त्यामुळे दहावीपर्यंत आलेल्या बाळाला झापड लावलेल्या घोड्याप्रमाणे फक्त आणि फक्त परीक्षा, मार्क्स आणि यशस्वी करिअर्स एवढंच दिसत असतं. जोपर्यंत हे बदलत नाही तोपर्यंत करिअर काउन्सेलिंगने किती फरक पडणार? सगळेच जण टॉपर होऊ शकत नाहीत आणि समाजमान्य चारपाच पर्यायांपलिकडेही वेगवेगळे पर्याय असतात, स्वत:चे छंद करिअरमधे बदलता येऊ शकतात, फक्त आर्थिक स्थैर्याच्या मागे पळणे खरं नाही तर आयुष्यात रिस्क घेऊन काही गोष्टी करता आल्या पाहिजेत, यशाबरोबर अपयश पचवता आलं पाहिजे, हे सगळं शाळकरी मुलं आणि त्यांच्या आईवडिलांना समजावायची नितांत गरज आहे. हल्ली तर म्हणे प्रीस्कूलच्या मुलांचा पण पालक घरी अभ्यास घेतात... अशा व्यवस्थेत आणखी दुसरं काय निर्माण होण्याची अपेक्षा बाळगणार?

छान लेख नानाकला .
आयुष्य आणि करिअरचा मार्ग निवडताना बरेचदा वस्तुस्थितीचा विचार न करता आपण केवळ मृगजलामागे धावत सुटतो आणि शेवटी जे मिळालं ते स्वीकारुन गप्प बसतो .

एकेकाळी म्हणजे साधारण १९९० पर्यंत सरकारी नोकरी मिळेल असे शिक्षण घेण्याकडे कल होता. फारतर डॉक्टर किंवा वकील, सीए, प्रोफेसर वगैरे. त्यावेली वाट्टेल ती पदवी घेऊन लोक बँक, एलायसी, शाळा अशा नोकर्‍या करायचे. इंजिनिअर व्हायला कुणी फारसे बघायचे नाही कारण इंजिनिअर लोकांना सरकारी नोकर्‍या कमी होत्या आणि खाजगी तर त्याहून कमी. तरी काही लोक इंजिनिअर झाले आणि त्यांना करियरच्या मध्या पर्यंत खुप चांगले पगार वगैरे मिळू लागले. ते बघून आणि इंजिनिअरींग क्षेत्रात वेगाने उपलब्ध होणारे जॉब्स बघता जवळजवळ १९९० ते २०१० असे २ दशके तरी विद्यार्थ्यांमध्ये इंजिनिअर बनायची क्रेझ राहिली. पण ह्या दशकात तरी नोकरी मिळवण्यासाठी इंजि किंवा एमबीए असलेच पाहिजे अशी आता गरज राहिली नाही. कंटेन्ट डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, अ‍ॅनालिटिक्स, फार्माकोविजिलन्स, मिडिया, गेमिंग, मोबाइल अ‍ॅप बनवणे अशा अनेक नवीनच शाखांचा उदय झालाय.
हळूहळू अतिहुशार मनुष्य करतोय त्या नोकर्‍या आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार आणि ज्याला लो एन्ड म्हणतात ते कीम्वा ज्यात ए-आय आणणे महाग पडेल असे किंवा "ह्युमन टच" ची गरज असणारे तेवढे जॉब्स माणसं करणार. त्यामुळे आर्किऑलॉजिस्ट, शेफ, कला शाखेशी संबंधित जॉब्स, नर्सिंग अशा नोकर्‍या माणसांकडे रहाणार असे हा मॅकेन्झी रिपोर्ट म्हणतो.

माझे आवडते लेखक युआल नोआ हरारी ह्यांचा हा लेख वाचायलाच हवा: http://ideas.ted.com/the-rise-of-the-useless-class/

निरर्थक आयुष्याला अर्थ द्यायचा प्रयत्न करायला म्हणून अमुक पदवी, तमुक कंपनीत नोकरी, आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम असा भुलभुलैया बनवून आपण "पैसा मिळवण्यासाठी करायच्या कामात" आयुष्याचा अर्थ शोधतोय. कदाचित येणार्‍या काळात ह्या सगळ्याचा पुनर्विचार करायची वेळ माणसावर येणार आहे.

खुप छान लेख नानाकळा...
मला माझ्या १२वी च्या उन्हाळ्यच्या सुट्टीतील एक प्रसंग आठवला..

आमच टोळक, जवळपास बहुतेकांनी सायन्स मधले व दोन्ही ग्रुप ठेवलेले, एकदा विहरीवर पोहायला गेल्यावर खुप जोरात चर्चा रंगली पुढ काय करायच..? ( तस ते प्रत्येकाने थोडफार ठरवलेल होतच बारावीच्या२ वर्षा मधे )

आमच्या मागच्या पिढी ने आम्हाला काय करायच त्याचा पर्याय निवडण्याची सुट दिलेली होती..
गंम्मत अशी कि आमच्या टोळक्यातल्या प्रत्येकाने वेगवेगळे मार्ग निवडले .. जे त्याना आवडतात ते आणि पुढ त्यात यशस्वी झाले देखील...

एक आर्कीटेक्ट झाला.. मी संगणक क्षेत्रात आलो... एकाने Meteorology मध्ये करियर केल..
पण आमच्या मध्ये एक जण होता .. सगळ्यात हुशार .. मार्क्स मध्ये टॉपर.
त्याच्या घरच्याना वाटायच त्याने मेडीकल मध्ये जाव.. पण हा पठ्या कुठे जातोय.. त्याला वनस्पतीशास्त्रा मध्ये जायच होत.. व पुढे जाउन स्व ताच अस काही करायच होत.. घरच्यानी खुप समजावल.. पण तो बाधला नाही..

शेवटी त्याने वनस्पतीशास्त्रा मध्ये मास्टर्स केली व स्व ताची टीशु कल्चरची लॅब सुरू केली ...
तो त्याच्या आवडत्या क्षेत्रा काम तर करतोच पण आमच्या ग्रुप मध्ये सगळ्यात जास्त त्याचा इन्कम आहे...

विज्ञान शाखेतल्या एखाद्याला इतिहास शिकण्याची आवड असली तरी तशी संधी त्याला प्रचलित व्यवस्था देते का ?..........

माझा घोळ असाच होता. मला कला शाखेची आवड होती पण त्यात नक्की कशात आणि कसे पोट भरता येईल हे काही माहीत नव्हते. विज्ञान शाखा घेतली. पोटापाण्याची सोय केली मग काही वर्षे जॉब करून सध्याच्या क्षेत्रात फारसा काही उपयोग होणार नसताना सुद्धा फक्त आवड म्हणून पुणे विद्यापीठातून आर्टस् आणि मॅनेजमेंट केले.

माझ्या एका मित्राने आय टी आय आणि आर्टस् ची पदवी एकाच वेळी केली होती. आणि आता कोणत्यातरी वाहन विक्रेत्या कंपनीत लोन डिपार्टमेंटला मॅनेजर आहे.

कधी कधी दोन वेगवेगळ्या विषयातले स्पेशलायझेशन/ पदव्या उपयोगी ठरू शकतात.

चांगला विषय.
करियर मार्गदर्शन बद्दल मला सिरीयस डाउटस आहेत.
मी दहावी नंतर असं करियर मार्गदर्शन घेतलेलं. त्यात (मला बरोबर आठवत असेल तर) काही बहुपर्यायी प्रश्न, काही साखळीतील पुढची लिंक सांगा टाईप प्रश्न, काही डेटा अ‍ॅनॅलीसिस टाईप प्रश्न असं ढोबळ स्वरूप होतं. यातून लॉजिक, प्रॉब्लेम सॉल्विग, आकडेमोड इ. अ‍ॅबिलिटीजवर स्कोर करत असावेत आणि मग ह्या अ‍ॅबिलिटीज आणि विविध करियर यांच्या आधीच तयार असलेल्या मॅपिंग वरून 'याने आकडेमोड टाईपचे प्रश्न बरोबर सोडवलेत ना? मग याला कॉमर्सला जायला सांगू आणि मग सीए करायला सांगू. याने क्रिटीकल थिंकिंग केलंय धाडा इंजिनिअरिन्ग ला, पॅटर्न मॅचिंग वाला फाईन आर्टला असं वरवर ढोबळ काही तरी करत असावेत. इतके शार्प स्क्यू असलेले (म्हणजे फक्त लॉजिक बरोबर बाकी सगळं चूक) विद्यार्थी अर्थात जास्त नसतीलच. मग वेन डायग्रॅमच्या वर्तुळांच्या सामाईक भागाला जमलं तर वेगळे करियर पर्याय. नाहीच जमलं तर पहिला ऑप्शन 'हा हा' तो नाही जमला तर दुसरा ऑप्शन हा असे निकाल दिले जात. मला मिळालेला निकाल आणि मला जमलेले प्रश्न, मित्रांना मिळालेले निकाल यावरून हे वरचं अनुमान मी त्या काळी काढलं होतं असं आठवतं.
आज विचार केला तर मला रिवर्स इंजिनिअरीगमध्ये तेव्हा उत्तम गती होती आणि आज करत असलेलं करियर अगदी योग्य बसलंय असं जाणवतं. पण हे हाईड साईट २०/२० च आहे.
हे करिअर न करता दुसरं काही केलं असतं ...डॉक्टर झालो असतो, सायटीस्ट झालो असतो तरी उत्तम प्रगती केलीच असती याची आज खात्री वाटते. आज विचार केला तर हे ही जाणवते की मला मी करत असलेलं काम आवडते म्हणून मी सुखी आहे का? तर नाही. उत्तम पैसा मिळणे हे माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे.
व्यवसाय आणि छंद एकंच असल्याने जीवन सुखी झाले टाईप बऱ्याच लोकांकडून वाचनात येते, जे मला खूपच एककल्ली वाटते (चूक न्हवे, पण वाटतं तितकं ग्लोरीफाईडही नाही). मला संगीताची आवड आहे, आणि त्यातच मी करिअर केलं असतं, तर पैसे कमावून घरी आल्यावर मी परत पेटी घेऊन वाजवत बसलो असतो का? तर मला नाही वाटत. मोस्टली कम्प्युटरवर काही तरी करत बसलो असतो किंवा फिरलो असतो.

एखाद्याला कुठल्या क्षेत्रात जाण/ ओढ आहे किंवा कल हे करिअर मार्गदर्शक अगदी काही सायंटीफिकली प्रोव्हन पद्धतीने जरी सांगत असतील, तरी पण पुढे जाऊन त्या व्यक्तीला त्या क्षेत्राविषयी जास्त माहिती मिळते, जवळून ओळख होते, आवड किंवा नावड निर्माण होऊ शकते. कुठल्याही क्षेत्रात गेला तरी नाविन्य जाऊन ८०-२० रूल (८० टक्के घोडागिरी काम आणि २०% चांगलं काम) समजतो. त्यावेळी वर वरदा म्हणत्येय तसं विचार करायला शिकवलं असेल, वास्तवाची जाण असेल, भोवताल एक्स्प्लोर करायला येत असेल तर माणूस वेगळ काही करू शकतो. त्यामुळे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं. करिअर मार्गदर्शन चुकू शकतंच (त्याचेच चान्सेस अधिक असही मला स्वतःला वाटतं) त्यामुळे विचार करणे निर्णय घेणे आणि जवाबदारी स्वीकारणे हे सगळ्यात महत्त्वाचे.

अमितव,
करिअर मार्गदर्शन च्या असेसमेंट टेस्ट बद्दल माझेही हेच मत आहे तुमच्यासारखेच.

आज मुलांना कोणत्या साच्यात बसायचं आहे त्यानुसार आकार देण्याचं बंद करून पाण्यासारखं कशातही केव्हाही फिट होऊ शकेल असे बनवण्याची गरज आहे. येणारा काळ आव्हानात्मक आहे तेव्हा प्रवाही असलेलं बरं!

अवांतर: संगीतातून कमाई होते हा खरंतर बाय प्रॉडक्ट आहे. रियाज हा छंद/आवड आणि काम याचे संयुक्त रूप आहे.
मी कलाकार आहे पण एकाच स्वरूपाचे काम कायम करत राहणे माझ्या स्वभावात बसत नाही, त्यामुळे कलेच्याच क्षेत्रात राहून मी कामाचे स्वरूप बदलत राहिलो आहे. छंद आवड हि व्यवसाय नोकरीत विकसित केल्या जाते तेव्हा छंद हा छंद राहत नाही, व्यवसाय नोकरीत आपण कुणाला तरी उत्तरदायी असतो , छंद आवड हि वैयक्तिक आवडी साठी असते, त्याचा पोट भरू शकेलच असा व्यवसाय होणे कठीण असते.

छान लेख आहे. पटला.
पण प्रॅक्टीकल विचार करता हे असेच होणार आणि व्गापक विचार करता असे व्हायलाही हवे. नाहीतर जग चालणे अवघड होईल. जर सारेच आपल्या आवडी आणि छंदानुसार व्यवसाय करू लागले तर समाजाची गरज कशी भागेल? म्हणजे समाजाची गरज भागवण्यासाठी जेवढे बांधकाम गरजेचे आहे तेवढे सिविल ईंजिनीअर नको का? एवढ्या लोकसंख्येचे पोट भरण्यासाठी जेवढे अन्नधान्य गरजेचे आहे तेवढे पिकवणारे शेतकरी हवेतच ना. जर हे आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडणारयांचा टक्का वाढला तर हे संतुलन राखणे तितकेच अवघड होत जाईल. त्यामुळे जिथे जॉबच्या संधी जास्त आहेत तिथे लोंढे वळणे हे गरजेचेच आहे.

त्यामुळे स्वताच स्वताची आवड मारणे आणि जिथे स्कोप पक्षी पैसा मानमरातब आहे तिथे वळणारयांबद्दल जास्तीची सहानुभुती ठेवण्यात अर्थ नाही. पण ज्यांच्या छंदाने पॅशनची लेवल गाठली आहे पण केवळ बाह्य घटकांच्या न टाळता येणारया दबावाखाली तडजोड करत घुसनटत जगत आहेत अश्या मोजक्या लोकांबद्दल सहानुभुती आहेच.

{हे करिअर न करता दुसरं काही केलं असतं ...डॉक्टर झालो असतो, सायटीस्ट झालो असतो तरी उत्तम प्रगती केलीच असती याची आज खात्री वाटते. आज विचार केला तर हे ही जाणवते की मला मी करत असलेलं काम आवडते म्हणून मी सुखी आहे का? तर नाही. उत्तम पैसा मिळणे हे माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे.}

याच्याशी सहमत. म्हणुनच {फक्त आर्थिक स्थैर्याच्या मागे पळणे खरं नाही} हे पटलं नाही.
आपण कुठेही गेलो तरी तिकडे टिकुन राहु शकतो, किंबहुना सरासरीपेक्षा चांगलं परफॉर्म करु शकतो, चमकु शकतो हा आत्मविश्वास मुलांना वाटणं गरजेचं आहे. आणि हा आत्मविश्वास मिळायचं एक साधन आहे परीक्षेत चांगले मार्क मिळणं. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांची तोंडओळख करुन द्यायची जबाबदरी पालकांची.

>>कुठल्याही क्षेत्रात गेला तरी नाविन्य जाऊन ८०-२० रूल (८० टक्के घोडागिरी काम आणि २०% चांगलं काम) समजतो

हे देखील पटतंय. अर्थात काही सन्मानीय अपवाद असतीलच. पण या अपवादांनीच नियम सिद्ध होतो.

नानाकळा छान लेख. अजयचे प्रतिसाद पण आवडले.

अजुनही तशीच परीस्थिती आहे अनेक बाब्यांची. अर्थात नुकतेच काही अपवाद बघीतल्यावर तोंडात बोटे घातली आहेत. एकाचा मुलगा परदेशात १२ करुन आपल्या आपल्या परिक्षा देऊन अमेरीकेत उच्च शिक्षणाकरता चालला आहे.

दुसरा एक मुलगा, त्याने ८ वीतच ठरवले की मला जर्मनीला जायचे आहे. त्याकरता तो जर्मन शिकला, ICSC १२ वी करुन आपले आपले जर्मनीतले कॉलेज शोधले व आजच जर्मनीला रवाना होत आहे. मधे एक वर्ष तो फक्त ब्रेड व बटाटे खात होता, सवय व्हावी म्हणुन. अनेक पेनफ्रेंड केले व त्यांच्यासोबत इथे भारतात हिमालय, केरळ व गोव्यात फिरला. मधे १ महिना लडाखला १ महिना एका शाळेत इंग्रजी शिकवुन पण आला. वय वर्ष १९.

आम्ही फक्त तोंडात बोटे घालुन बघतो आहोत. अशी अनेक उदा. असतीलही. थोडा बदल घडतो आहे.

माझा पण मित्र करतील ते करायचे म्हणत बाब्या झालेला. कसे बसे नोकरी व वाणीज्य शाखेत पदवी मिळवुन परत कारकुनी नोकरी केली मग आवड म्हणुन जपानी शिकलो व सरकारी नोकरी सोडुन खाजगीत आलो. आवड होती ठिक पण नंतर त्याला मागणी कमी झाल्यावर इतर शिक्षण नोकरी करतानाच केले व आता इतर आवडी जपत आहे.

योग्य दिशा मिळणे, त्या करता कुणीतरी आयडॉल असणे, योग्य मित्र परिवार मिळणे, नशीब, उपलब्धता असे अनेक मुद्दे आहेत. तसेच आयुष्यातील आवड जपणे याकरता कुटुंबाची आर्थीक कुवत असणेही तेव्हढेच महत्वाचे ठरते.

'आवडीचे शिक्षण आणि त्यातच काम' हे एक मृगजळ आहे. दहावी आणि बारावीतल्या, म्हणजे वय वर्ष साधारण १५ ते १८ च्या किती मुलांचा स्पष्ट कल कळतो? एकट्या महाराष्ट्रातच लाखो मुलं दहावी-बारावीची परिक्षा दर वर्षी देतात. त्यापैकी काही हजारांचा कल तरी स्पष्ट कळलेला असतो का- त्यांना स्वतःला आणि त्यांच्या पालक/ शिक्षकांना? त्यामुळे असा कल कळलेले ५% धरू आणि एकदम तळाचे ५% सोडले, तर मधला ९०% वर्ग हा गटांगळ्याच खात असतो. आणि मग शेवटी फारसे कष्ट न करता, झेपेल तो अभ्यासक्रम आणि त्या बळावर मिळणारी नोकरी यावर संतुष्ट होतो. आत्यंतिक घुसमट होणारे अगदी थोडे अस्तात. बाकी करतात अ‍ॅडजस्ट. आणि तसे काही दु:खातही नसतातच. बाकी, करिअर काऊन्सेलिंग हाही एक व्यवसायच आहे. ज्याला आपली दिशा कळलेली आहे तो तिकडे जातोच. बाकी काऊन्सेलरकडे जाऊनही त्याचं ऐकतीलच असं नाही. फुलप्रूफ तोही काही सांगू शकत नाही, सांगणारही नाही.

हां, आपल्याला काय झेपू शकणार नाही याचं भान हवं. ते दहावीपर्यंतच्या अभ्यासावर येतं... मुलाला तरी नाही तर त्याच्या पालकांना तरी. ते असलं की निराशेचे क्षण बरेच कमी करता येतात.

कल बिल काही नसते,एखादं फॅड डोक्यात शिरले तर असे होते.माझे अनेक मित्र आवड म्हणून मेक ,इलेक्ट्रीकल ,सिविल इंजिनिअरींगला गेले व आता पैशासाठी आयटीमध्ये घुसलेत.मी स्वतः बीएस्सी आवडीने केले,पण नोकरी जमली नाही म्हणून आता शेतात लक्ष घातले ,जनावरांचे शेण काढतो.
शेवटी पैसा महत्वाचा आहे,आवड छंद रिकाम्यावेळी करायचे असतात.

करेक्ट पूनम. काही वेळा पालकांना असुनही उपयोग होत नाही याचा अनुभव सध्या घेत आहे. Happy

@ सिंथेटिक जिनियस >> विपु चेक करा ... शेतात लक्ष घातलेविषयी थोडेसे
----------------------------------------------------------------------------------------------

नानाकळा खूप तळमळीने लेख लिहिलाय आणि बहुतांश प्रतिसादही नोकरी धंदा करता करता काहीतरी आयुष्यात करायचे राहिलंय ज्याच्यात खरेच मन रमले असते आणि आपण समाधानी असतो असे दिसलेत, अर्थात मीसुद्धा ह्याला अपवाद नाहीच. जाना था जपान पहुच गये चीन अशीच खूप जणांची अवस्था होते कधी घरच्यांचे ऐकून तर कधी सेटल व्हायच्या घायीपैकी झटपट करिअर निवडून, पण सर्व ऐशोआराम मिळवूनही काहीतरी रुखरुख कायमसाठी मनात राहते ... त्याला योग्य वयात योग्य दिशा मिळाली तर खरेच आयुष्यात त्यासारखे दुसरे समाधान नाही.

रोजचे काम बोरींगवाटून त्या तथाकथित धकाधकी उर्फ ड्र्जरीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी छंद जोपासणे आणि वेळीअवेळी त्यावर लेख, फोटो, इत्यादी टाकत बसणे याचे मूळ हेच आहे. >>>> हे असं असेल तर "छंद" ह्या प्रकाराची व्याख्याच बदलायला हवी! वर अमितने लिहिलय ते गाण्याचे उदाहरण पटले.

चांगला लेख, अजय आणि पूनमचे प्रतिसाद आवडले. बाकी काही प्रतिसाद नेहमीप्रमाणे आवेशपूर्ण आहेत. Happy

चांगला लेख!
हा विषयच असा आहे की कोणीही चटकन रिलेट होउ शकतो

माझ्यामते करीअर ही बऱ्याचदा डेस्टीनी असते.... एखादी गोष्ट आयुष्यात करणार नाही असे म्हणणारी माणसे पुढे जाउन नेमकी तीच गोष्ट करताना दिसतात आणि त्यात रमलेलीही दिसतात

अगदी माझ्याच बाबतीत बोलायचे झाले तर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर करीअरबद्दलच्या माझ्या आकांक्षा आणि स्वप्ने वेगवेगळी होती
आयुष्य जसे उलगडत गेले, अनुभव येत गेले, जगरहाटी कळत गेली तसे हे प्लॅन्स बदलत गेले.... सहज, अगदी माझ्याही नकळत!
Life is all about options.... एखाद्याने एखादा पर्याय का निवडला याचे खरेखुरे उत्तर बऱ्याचदा त्याच्यासमोर इतर पर्याय नव्हते/सहजी उपलब्ध नव्हते आणि समोर असणाऱ्या पर्यायात निवडलेला पर्याय तुलनेने उजवा होता हेच असते.... फार कमी वेळा तो निवडलेला पर्याय सर्वोत्तम पर्याय असतो!

आणि करीअरमधल्या यशापशयाचे म्हणाल तर माझ्यामते तुमचा कल, बुध्यांक आणि ॲकेडमिक्स इतकेच ते तुमच्या करीअरच्या पहील्या काही वर्षांवर अवलंबून असते.... तुम्ही किती शिकता, तुम्हाला कलीग्स कसे मिळतात, जबाबदारी किती पडते, एखादा चांगला मॅंटॉर मिळतो का? यावर पुढची बरीचशी वाटचाल ठरत असते!

The whole concept of one career is changing. A lot of ppl have multiple careers now. Get good education; be it in any field and that's good enough to explore possibilities out there! As far as counseling goes, I believe Standard 9 for school is a very good grade to start to talk to kids about various knowledge ( and thereby work) streams. Any grade earlier is too early and Grade 10 onwards is too late.

Pages