गणपतीबाप्पा आणि मी!

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 14:18

नमस्कार!

गणपती बाप्पा मोरया!


Moortee.jpg

गणपती बाप्पाचा उत्सव म्हटलं की आपल्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. आपल्या आवडत्या गणरायाचं स्वागत, पूजा-अर्चा, आरत्या, प्रसाद आणि शेवटी निरोप असं सगळं आपण दरवर्षी करीत असतो. त्या गणोबाचं आणि आपलं अगदी अतूट नातं असतं. त्याच्या संदर्भात आपल्या कितीतरी आठवणी निगडीत असतात. आठवतं का, किती लहानपणापासून गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण कसे रंगून-दंगून जात होतो? त्या आठवणींना उजाळा देण्याकरीता हा उपक्रम. तुमची गणेशोत्सवातली एखादी जुनी खास आठवण किंवा कुठल्या गणेशमंडळांवर काम करताना घडलेल्या काही गंमतीशीर गोष्टी आमच्यासोबत शेअर करणार? चला तर करा सुरुवात.

खास आठवणी किंवा गंमती इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही कसब्यात रहात होतो त्या वाड्यात एक कोकणातले मोठे कुटुंब रहायला होते.
श्रावणाच्या सुरुवातीला त्यांच्याकडे न रंगवलेल्या मूर्ती यायच्या. तोपर्यंत त्यांच्या घरी टिव्ही बघण्यासाठी मुक्काम असे, पण एकदा गणपती आले आणि त्यांचे रंगकाम सुरु झाले की कारणाशिवाय पण आम्ही तिकडेच पडीक.
त्यात पण प्रत्येकाची खासियत वेगळी, त्या प्रमाणे एका कडून दुसर्‍याकडे पुढ्च्या रंगकामासाठी मूर्ती पास होताना बघणे हा एक वेगळाच अनुभव.
त्यांनी शनिवारवाड्यावर स्टॉल लावणे बंद केले तरी बरीच वर्षे त्यांच्याकडूनच मूर्ती आणत होतो. नंतर आम्हीच दुसरीकडे रहायला गेल्याने ते सगळे बंद झाले.

पण असे एकाग्र होऊन मुर्ती रंगवताना बघणे म्हणजे डोळ्यांना मेजवानीच होती. आणि त्यात सुद्धा डोळ्यांचे बारीक काम आणि ते पूर्ण झाल्यावर रंगवणार्‍याच्या चेहर्‍यावरचे पूर्ततेचे भाव - त्याचे तर वर्णन करायला शब्दच नाहीत.

मुम्बईला पत्रकार म्हणून काम सुरू केलं त्यानंतर महिनाभर सिटी रीपोर्टर म्हणून डील्युजच्या बातम्या कव्हर केल्या. अक्षरशः वैताग आला. गौरीगणपतीची निवांत सुट्टी काढून पाच दिवस घरी गेले होते. परत आल्यावर बॉसने नेमणूक "एंटरटेनमेंट" मध्ये केल्याची वाईट बातमी मिळाली. फिल्मी गॉसिप कितीही आवडत असलं तरीही रीपोर्टींग त्यामध्ये नको हवं होतं. बॉसबरोबर दोन तीनदा वाद घातले पण फारसा फायदा झाला नाही.
बॉसने अनंत चतुर्दशीच्या कव्हरेजसाठी आमची मीटींग बोलावली. मला सेलीब्रीटी कोट्स वगैरे फालतू कामं होती (जी फोनवरून झालीअसती) मग बॉस म्हणाला तू उद्या अजून एक काम कर, उद्या लालबागच्या राजाची मोठी मिरवणून निघते. त्याच्या तयारीवरून आपन एक फीचर करू. मिरवणूक कशी जते वगैरे सर्व माहिती तिथेच जाऊन काढून आण.
आणि आम्ही सकाळी अकरा वाजता लालबागच्या राजाला जायचं ठरवलं (मी आणि फोटोग्राफर) आजवर राजाबद्दल केवळ ऐकलं होतं. फोटो पाहिले होते, प्रत्यक्ष दर्शन कधी घेतलं नव्ह्तं. तिथं रात्रभर वगैरेरांग असते हे ऐकलं होतं. मी कामासाठी जात असल्यानं "दर्शनापेक्षा"ही माहिती महत्त्वाची होई. हॉस्टेलमधली एक मैत्रीण म्हणाली की तिला लालबागचा राजा पहायचा आहे. म्हटलं माझ्यासोबत चल. पण रांगेत मी थांबणार नाहीये. मिरवणुकीच्या व्यवस्था करणारे लोक कोण आहेत ते शोधणार त्यांच्याकडून माहिती घेणार आणि निघणार. (तेव्हा पत्रकार असलयचे फायदे अजून समजले नव्हते)
राजाच्या मांडवामधेय गेल्यावर नेहमीचे "मी अमुक तमुक् पेपरमधून आले, ढमकी माह्तिई हवी" वगैरे टेप तीन चार जणांकडे वाजवली. मैत्रीण माझ्यासोबतच होती, कारण रांग कुठून सुरू होतेय हेच आम्हाला माहित नव्हतं. तीसचाळीस फुटावर राजा बसलेला होता, आम्ही तिथूनच हात जोडला.

लालबागच्या राजाचं एक वैशिष्ट्य म्हनजे त्या मंडळाकडे प्रचंड व्यावसायिकता आहे. पत्रकार आलेत म्हटल्यावर योग्य ते माणसं पुढं आली. जी माहिती हवी ती देऊ म्हणाली. मी भराभरा लिहून घेतलं. तेवढं झाल्यावर म्हणाले प्रसाद घ्या. दर्शन नीट झालं ना? मैत्रीण म्हणाली दर्शन झालं नाही. इथूनच हात जोडलेत.

ते काका म्हणाले. अहो, इतकंच ना, या इकडे. स्टेजजवळ गेलो. कुणीतरी हात दिला तो धरून वर चढलो. रांगबिंग सगळी बाजूला आणि आम्ही सरळ राजाच्या चरणी!! हे किती पटकन घडलं असावं तर मी माहिती घेताना मैत्रीणीनं कानाम्ध्ये मोबाईलवर एफ एम चा हेडफोन खुपसलेला होता, तो राजाजवळचा माणूस ओरडला. "अहो देवासमोर तरी हेडफोन काढा" (तिच्या लक्षात्सुद्धा आलं नव्हतं की कानात एफ एम चालू आहे.)

मी फारशी देवभोळी अथवा आस्तिक नाही तरीही त्याक्षणी अनपेक्षितरीत्या देवाचं इतक्या जवळून जे दर्शन घडलं ते अद्भुत होतं. ती मूर्ती विलक्षण जिवंत आहे. आणि आतापर्यंत पाहिलेला कुठलाही फोटो अथवा व्हीडीओ तो जिवंतपणा कॅप्चर करू शकलेलं नाही. भल्यामोठ्या मूर्तीच्या पायाजवळ उभं राहून वर पाहिलं की तो बाप्पा आपल्याकडे बघून गालातल्या गालात हसल्यासारखा वाटतो. या देवाकडे आपण काय मागणार? सगळं काही मिळवूनसुद्धा हे असं समाधानाचं तोषाचं गाली आलेलं हसू आपल्याकडे असणारच नाही. ते केवळ त्याच्याकडेच. या मातीच्या मूर्तीमध्येच. डोळ्यांतून पाणी आलं आणि जाणवलं की याला कलेचा देवता का म्हणत असणार? हा असला जिवंतपणा मातीमध्ये ओतणारे हात मानवाचेच!! कुठल्यातरी एका मानवाच्या हातामध्ये ही कला येते कशी? ज्या नियंत्यानं आपल्याला घडवलं त्याचंच हे असं इतकं देखणं पार्थीव रूप आपल्याच हातून कसं घडतं?

मी जोडायचे असतात म्हणून हात जोडले. प्रत्यक्षामध्ये (स्टेजवर थॉडी अजून जागा असती तर) लोटांगणच घातलं असतं त्या मूर्तीसमोर. मनातल्या मनात घातलंसुद्धा. त्या मूर्तीलासुद्धा आणि अशा मूर्ती घडवणार्या प्रत्येक हातानासुद्धा!!!

मोठ्या मूर्तींची परंपरा मुंबईत खुप पुर्वीपासून आहे. रंगारी बदक चाळ वगैरे गणपति, पुर्वीपासूनच मोठे असत.
त्यावेळी फोटो विकत घेतला तर रांग टाळून दर्शन होत असे. १९८२ सालच्या संपापूर्वी लालबाग परळमधल्या उत्सवांची वेगळीच शान होती.

..

आमच्या शिवसृष्टीत त्याकाळी सिनेमा निदान २/४ तरी दाखवायचे. त्याचे पुस्तक असायचे त्यात त्यांचे दर असत. रंगीत असला तर जास्त दर असे. झुमरू, मधुमति मधल्या गाण्यांना वन्स मोअर मिळाले होते. शर्मीली तल्या राखीच्या अंगप्रदर्शनाला मात्र स्त्रियांनी नापसंती दाखवली होती.. नंतर अर्थातच सिनेमे बंद झाले.

अनेक वर्षे एक हिंदी आणि एक मराठी वाद्यवृंद आवर्जून आणला जात असे. आमच्या कॉलनीतली रहिवासी, उषा
तिमोथी, त्यात आवर्जून हजेरी लावत असे. ( जिवलगा राहिले रे.. खरेच छान म्हणायची ती ) पण मराठी वाद्यवृंद दर्जेदार असूनही, अजिबात प्रेक्षक जमत नसत त्याला.

पाककृती, गायन, रांगोळी स्पर्धा असतात. आईला खुपदा पाककृतीत बक्षीस मिळायचे. मी पण गायनात वगैरे भाग घ्यायचोच. पण माझी त्याकाळी शाळेत जास्त नाटके चालू असायची. रात्री ते आटपले कि मी तसाच मेकपमधे ( तोंड रंगवलेले, मिशी लावलेली ) कॉलनीतल्या गणपतिला येत असे.

आमच्याकडे स्थानिक लोकांची नाटके पण असत. घरात फुलला पारीजात, प्रेमा तूझा रंग कसा ?, पद्मश्री धुंडिराज वगैरे नाटके सादर झाली होती. त्यात माझी मोठी बहीण असायची.
रंगनाथ कुलकर्णी पण आमच्याच कॉलनीतले, त्यांचेही एकपात्री प्रयोग व्हायचे.

शिवसॄष्टी आली तर चुनाभट्टी आलीच पाहिजे.

तर लहानपणापासून आमच्या कॉलनीतला १० दिवस बसणारा सार्वजनिक गणपती हाच आम्हांला घरचा गणपती वाटत आलाय. घरी गणपती येत नसे त्यामुळे आम्ही गणपतीच्या मंडपातच पडीक असायचो.

कॉलनीपासून जवळच एक लहानसा गणपती बनवण्याचा कारखाना होता. तिथेच आमच्या कॉलनीची मूर्ती बनत असे. आम्ही लहान मुले शाळेत येता-जाता, वाट वाकडी करुन 'आपल्या' गणपतीचे काम कुठवर आलेय याची चाचपणी करत असू. वर अनेक जणांनी लिहीलेय मूर्तीच्या डोळ्यांबद्दल, त्याला अनुमोदन, तो सोहळा कैक वेळेस अनुभवलाय या कारखान्यातच. तर अशा रितीने गणेश चतुर्थीच्या आधीपासूनच 'बाप्पाशी' गट्टी केली जायची.

गणपतीची जागा म्हणजे नेहमी जिथे सोसायटीचे ऑफिस असे ती, मग त्याची रंगरंगोटी केली जायची. गणपतीचे मखर आजतागायत कधी विकत आणले गेले नाही. ते काम उत्साही मुलांचे. एका कुणाच्या तरी घरी बसून थर्माकॉल, फेव्हिकॉल, ते नक्षी बनवणारी कटर्स असा संसार मांडलेला असायचा. त्यावेळी पंखा अजिबात लावायचा नाही. तासन्तास बसून ही मुले दरवर्षी निराळे मखर करत असत. ही मुले पुढे नोकरीधंद्याला लागेपर्यंत पुढची बॅच त्यांची जागा घेत असे. हे सारे आजही तसेच चालू आहे.

१० दिवस रोज एका घरातून बाप्पाला नैवेद्याचे ताट येत असे. या दिवसाचे बुकींग, वर्गणी जमा करायच्याही आधीच होत असे. ज्याचा नैवेद्य त्याच घरातून संध्याकाळच्या आरतीसाठी प्रसाद येत असे, संध्याकाळच्या आरतीला शंभरेक माणसे तर असतच, त्या हिशेबात प्रसाद. मग आम्ही मुले नैवेद्य देणार्‍या कुटुंबाचे नाव आधी वाचून उद्या काय प्रसाद असणार यावर अंदाज व्यक्त करीत असू. कधी, पेढे, मोदक, शिरा, फळे,आर्थिक सुबत्ता असलेल्या घरुन ड्रायफ्रुट्स, साजुक तुपातले मोतीचुर लाडू असे वैविध्य असे त्या प्रसादात.

ते टाळ- मॄदंगाच्या तालावर एक सुरात आरती म्हणणे हा भारुन टाकणारा अनुभव होता.

आरतीनंतर रात्री जेवायला घरी जायचे आणि नऊच्या सुमारास सारे कार्यक्रम सुरु होत असत. मुलांसाठी वेशभुषा स्पर्धा, संगीत खुर्ची, चित्रकला, लहान मुलांची, मोठ्यांची नाटके, नुसती रेलचेल असायची. या नाटकांच्या तालमी रात्री गच्चीत होत असत. वेशभुषा स्पर्धेसाठी वयाची अट ओलांडली की आम्ही लहान मुलांपैकी एकाला/एकीला निवडून त्याला काय बनवायचे, कसा ड्रेस, मेक अप हे सारे ठरवून करुन देत असू व आपल्या या छोट्या भिडूला बक्षीस मिळाले की धन्यता मानत असू.एक दिवस खास महिला मंडळाचा. त्या दिवशीची पुजा, आरती, सांस्क्रुतिक कार्यक्रम हे सारे महिला वर्गाने बघायचे. १० दिवस कसे जात कळत नसे.

शेवटच्या दिवशी विसर्जनाची मिरवणूक म्हणजे तर सार्‍यांना हुरहुर लावणारी असे. सजवलेल्या ट्रकमध्ये बाप्पा विराजमान होताच बँजोचा दणदणाट सुरु. सारी मंडळी सायनच्या तळ्यावर जायला निघत. येताना कॉलनीतर्फे 'वडा-पाव' ठरलेला. वाजत-गाजत, नाचत थिरकत अर्ध्या तासाचा रस्ता कापायला ६-७ तास लागत असत. विसर्जनानंतर परत आणलेली बापाच्या मुर्तीची माती पाहून डोळे पाणावत, सद्गदित मनाने , त्या रिकाम्या भकास मंडपाकडे पहात शेवटची आरती करुन हा सोहळा संपन्न होत असे.

एकमेकांशी कसलेही नाते नसलेली ११३ बिर्‍हाडे गणपतीच्या निमित्ताने एका कुटुंबासारखी एकत्र येऊन काम करताना दिसायची आणि या उत्सवातून मिळालेली उर्जा पुढे वर्षभर पुरवायची.

वाह! एकसे एक आठवणी.
कुणी परदेश / परराज्य वास्तव्यातील गणेशोत्सवाच्या आणखी काही आठवणी असतील तर लिहा की.

रंगासेठ,
परदेशात सार्वजनिक गणपतींची मजा नाही. निदान लहान शहरात तरी. आमच्या गावात गेल्या ७-८ वर्षांपासून देवळात १० दिवसांचा गणपती बसवतात. त्यासाठी सुरवातीला पुढाकार घेतला होता. पण आता घरीच गणपती असतो म्हणून आणि अजून काही कारणांस्तव त्यातला सहभाग कमी झाला आहे. तिथेही कार्यक्रमांची रेलचेल असते. यावर्षी ढोल ताशा आणि लेझिमच्या पथका बरोबर मिरवणूकही काढली होती.

घरी २००८ पासून दिड दिवसांचा गणपती बसवतो. जवळपास १५० लोक दर्शन घेउन जातात. हे दोन दिवस आणि आधीचे काही दिवस थोडंफार डेकोरेशन, जोरदार आरत्या, नैवेद्य, लोकांच्या भेटीगाठी यांची धूम असते. भरपूर काम, धावपळ, गडबड असते. इथे नॉन मराठी लोकांमधे गणेशोत्सवाचं खूप अप्रूप बघितलं आहे. लोक अगदी आवर्जून आरत्यांसाठी येतात. पेणच्या गणपतीची मूर्ती, आरास याबद्दल कुतूहल दाखवतात.

मी गणपती बसवायला सुरूवात केली ती नॉस्टेलजियामुळे. त्यात 'धार्मिक' कारण फारच कमी होतं. धार्मिकता, धर्म, श्रध्दा वगैरे गोष्टींबद्दल माझाच गोंधळ आहे. 'या सगळ्या गोष्टी म्हणजे काय?' हे अजून नक्की समजलेलं नाही. पण एकदा गणपती बसला, पूजा झाली की गणपतीच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहून सगळे प्रश्न, शंका, श्रम, ताण विसरायला होतं. कुठेतरी त्या वातावरणात मागचे दिवस शोधायचा प्रयत्न चाललेला असतो. सगळ्या भावंडांनी मिळून केलेली आरास, त्यासाठी रात्र रात्र केलेली जागरणं, गणपतीची मूर्ती आणणं, पूजेच्या वेळेस म्हटलेल्या आरत्या, आणि पैजा लावून, एकमेकांना आग्रह करत खाल्लेले मोदक आठवतात. मला वाटतं माझी ही मानसिक गरज आहे. काळ हातात पडून ठेवता येत नाही, पण पुरण पोळी करताना, काकूची आठवण येते, मोदक करताना वहिनीच्या हातचे सुबक मोदक आठवतात. गणपतीचे डेकोरेशन करताना सगळ्या भावंडांची आठवण येते. I relive those moments again. ५० लोकांच्या एकत्र कुटूंबाची सवय होती. सगळे सणवार धूमधडाक्यात व्हायचे. गावी असलेल्या कुळाचारांच्या महालक्ष्म्या-गणपतीला शाळेमुळे कधी जाता आलं नाही पण पुण्यातही घरी गणपती असायचा आणि आत्याकडे गौरी. मग तिच्याकडेच मदतीला जायचो. आत्याचं सोवळं ओवळं फार. त्यावरून तिला चिडवणं आणि थट्टा करणं नेहमीचचं. 'शास्त्रापुरतं' 'शास्त्रात असं सांगितलं आहे' हे तिचं नेहमीचं पालुपद. तेव्हा घातलेले वाद आठवले की आता हसूही येतं आणि गंभीरही व्हायला होतं.

इथे मित्र मैत्रिणी मदतीला येतात, त्यांच्याबरोबर भरपूर हास्यविनोद, थट्टा मस्करी होते. कुणी परस्पर बाहेरची कामं करतात, कुणी अजून काही मदत. ते क्षणही जपून ठेवले जातात. कुणाला उकडीचे मोदक आवडतात, त्यांचासाठी आवर्जून ते बाजूला काढून ठेवले जातात.सार्वजनिक पेक्षा परदेशात गणपतीचा अनुभव वैयक्तिक असतो. इथे आता बरीच कुटुंबं गणपती बसवतात. अगदी उभ्या महालक्ष्म्याही असतात. त्यांचं सगळं साग्रसंगीत महालक्ष्म्या आणणं, बसवणं, पूजा वगैरे केली जाते. मला वाटतं ज्या वातवारणातून आम्ही इथे आलो, त्यावेळचा काळ हात पकडून ठेवायची आमची धडपड चालू असते. त्यातून हे सगळं होत असावं. हे चूक किंवा बरोबर हा वेगळा विषय आहे. पण असं होतं खरं.

अंजली, आपल्या रूढी परंपरा स्वेच्छेने जतन करणं यात चूक काहीच नाही
उलट परदेशात करत आहात ते कौतुकास्पद आहे. घरच्या दीड दिवसाच्या गणपतीला १५० माणसं येऊन जातात म्हणजे खूपच भारी की __/\__

सुंदर लिहीले आहेस अंजली!

केदार - अरे त्या गरवारेच्या ढोलांचा उल्लेख वाचून एकदम तो आवाज थेट कानांत आला! गणपतीच्या आधी अनेक दिवस रोज संध्याकाळी तो शाळेत चालू असे. मी दोन वर्षे गरवारेच्या दिंडीत होतो - एकदा जिलब्या मारूती व एकदा दगडूशेठ पुढे.

परदेशात पहिल्या वर्षी फार चुकल्या चुकल्या सारखं झालं. जागा नवीन, माणसं नवीन त्यामुळे इथेही लोक उत्साहाने गणपती उत्सव साजरा करतात याची कल्पना नव्हती. जश्या ओळखी होत गेल्या, माहिती वाढत गेली, तसे इथे सण साजरे करण्यातही मजा येऊ लागली.
गणपतीच्या मूर्ती अजूनही इथे एकाच दुकानात विकत मिळतात. मराठी आणि गुजराती लोक भरपूर असल्याने,मूर्तींची मागणी इतकी असते की गेली दोन वर्षं अ‍ॅड्व्हान्स बुकींग करायला लागायचं. या वर्षी या दुकानदाराने बुकींग घेतलंच नाही, म्ह्णाला भरपूर स्टॉक आणलाय! तरी मूर्ती त्याने ट्रक मधून उतरवून दुकानात मांडेपर्यंत लोकांनी परस्पर ट्रक मधून थेट घेतल्या Happy अनेक मराठी मित्रांकडे घरी गणपती बसवत असल्याने पहिल्या दिवशी ३-४ गणपतींचे दर्शन होतेच.
मस्कत मधे दोन देवळं आहेत आणि दोन्ही ठिकाणी सार्वजनिक गणपती असतो. पैकी सगळ्यात जुन्या देवळात दीड दिवसाचा असतो. हा गणपती इंडीयन सोशल क्लब च्या कर्नाटक विंग तर्फे आयोजित असतो. दुसरा गणपती पाच दिवसाचा असतो आणि मस्कत मराठी मंड्ळाने आयोजित केला असतो. अर्थात त्यामुळे बांधिलकी जरा इकडे जास्त असते Happy सकाळ, दुपार आणि रात्री उशीरा आरत्या होतात. मुलांसाठी विविध कार्यक्रम असतात. एक दिवस महाप्रसाद असतो. गणपती आगमनच्या दुसर्‍या दिवशी अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन असते. साप्ताहिक सुट्टीचा दिवस नसल्यास रोज फक्त रात्रीच्या आरतीला जाणे होते. जवळपास तासभर आरत्या चालतात आणि लोक लांबून लांबून आवर्जून येतात. या वर्षी एक परिचित पहिल्यांदाच इकडे आले. माझ्याबरोबर विसर्जनाच्या दिवशी रात्री आरतीला आले. शे दीडशे लोक एकत्र जमून एका परक्या मुलखात एवढ्या दणक्यात उत्सव साजरा करतात हे पाहून त्यांना फारच कौतुक वाटले. आगमन आणि विसर्जन दोन्ही वेळी ढोल ताशे, मिरवणूक नसल्याने, एकप्रकारे हा उत्सव सार्वजनिक न राहता एक घरगुती कार्यक्रमच मोठ्या प्रमाणात साजरा केल्याचा आनंद नक्कीच मिळतो.

एक से एक आठवणी आहेत सर्वांच्या. ३-४ दिवसांचा वाचन-बॅकलॉग आज भरून काढला.

गाडी जऽरा मुंबईच्या गणपतींवर येतेय वाटे-वाटेपर्यंत पुन्यांदा घाट चढली Proud

मस्त वाचतंय सगळ्यांच्या आठवणी वाचताना. आत्ता लिहिलेल्यांपैकी नंदिनी आणि अंजली यांनी फार छान शब्दबद्ध केलंय.
हे सगळं वाचून वाटायला लागलं की गणेशोत्सव धड कधी अनुभवलाच नाही. कोकणात गणपती दिवाळीपेक्षाही मोठा सण असे म्हणतात. तिथे कधी गेलो नाही. इथे बहुभाषिक भागात बालपण गेल्याने आणि गर्दीची अ‍ॅलर्जी असल्याने जे काही अनुभवलं त्यात रमून जावं अशा आठवणी नाहीत.

तरीही, मुंबईपासून, घरापासून दूर राहायची वेळ आली तेव्हा गणेशोत्सवाच्या काळातच जास्त आठवण येऊन हळवं वाटायचं. दिवाळीला सुट्टी घेऊन अगदी दोन दिवसांसाठी का होईना हक्काने घरी येता यायचं.

माझ्या लहानपणच्या आठवणी लिहायच्या तर जेव्हा दोनतीन किलोमीटरच्या परिघात एकच सार्वजनिक गणेशोत्सव असे तेव्हाच्या आहेत. आईसोबत जायच्या वयात, उभ्याने 'कण कण में भगवान' आणि 'बायांनो नवरे सांभाळा' हे चित्रपट पाहिलेले आठवतात. पुढे कॉलनीतल्या मुलांसोबत घोळक्याने ट लवकर जाऊन जागा-बिगा अडवून व्हरायटी एण्टरटेनमेंट नाइट पाहिलेली. त्यात त्यावर्षी मि.नटवरलाल मधल्या परदेसिया.....तुझको दिल दे दिया या गाण्यावर वेगवेगळ्या वयोगतातल्या तीन जोड्यांनी रेकॉर्ड डान्स केलेला एवढे आठवतेय.

Pages