गणपतीबाप्पा आणि मी!

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 14:18

नमस्कार!

गणपती बाप्पा मोरया!


Moortee.jpg

गणपती बाप्पाचा उत्सव म्हटलं की आपल्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. आपल्या आवडत्या गणरायाचं स्वागत, पूजा-अर्चा, आरत्या, प्रसाद आणि शेवटी निरोप असं सगळं आपण दरवर्षी करीत असतो. त्या गणोबाचं आणि आपलं अगदी अतूट नातं असतं. त्याच्या संदर्भात आपल्या कितीतरी आठवणी निगडीत असतात. आठवतं का, किती लहानपणापासून गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण कसे रंगून-दंगून जात होतो? त्या आठवणींना उजाळा देण्याकरीता हा उपक्रम. तुमची गणेशोत्सवातली एखादी जुनी खास आठवण किंवा कुठल्या गणेशमंडळांवर काम करताना घडलेल्या काही गंमतीशीर गोष्टी आमच्यासोबत शेअर करणार? चला तर करा सुरुवात.

खास आठवणी किंवा गंमती इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सपेतल्या पीजीत रहात असताना पीजीच्या चहू बाजूनी गणपती मंडळं होती. ज्ञानप्रबोधिनी, अष्टांग हॉस्पिटल, हत्ती गणपती, मधला एक चौक आणि एक चौक पलिकडे भावे स्कूल चौक अशी तुफान आवाजी हाणामारी चालायची. प्रत्येकाचे कार्यकर्ते एकापेक्षा एक होते. तेव्हा रात्री १० चं लिमिट नसल्यामुळे सगळे देखावे आवाजासकट रात्री १-१.३० पर्यंत सुरूच असयचे.

एका वर्षी भावे स्कूल चौकात शुर्पणखेचा देखावा होता तोही फक्त ८-१० ओळींचाच!! शेवटी लक्ष्मणा धाव, काप तीचे नाक कान अशी काहितरी लाइन झाल्यावर लक्ष्मण धावून नाक कान कापायचा आणि ती शुर्पणखा जवळजवळ ३ मिनिटं सलग (!!) जोरजोरात किंचाळत असायची. हा प्रकार दिवसरात्र १००-२०० वेळा तरी व्हायचा! (इमॅजिन!! :राग:) पीजीतल्या काही मुलींच्या तर ती स्वप्नात सुद्धा यायची. Lol

केपीच्या आग्रहावरून बेकरीत पोस्टलेले किस्से इथे टाकते आहे Happy

माझी बहीण गणपती पाहायला गेलेली असताना काही अनुभव/किस्से घडले. काही गंमतीदार गोष्टी समजल्या. त्या अश्या -

पुणे गणपती : किस्सा # १ -
@ गुरूजी तालीम गणपती
माझी बहीण जीन्स-टीशर्ट घालून गणपती दर्शनाला गेली होती.

तिथे बसलेला एक पोलिस: गणपती दर्शनाला तरी पंजाबी ड्रेस घालावा
बहीण: तुम्हाला इथे बायकांचे कपडे बघायला बसवलंय का?

पुणे गणपती : किस्सा # २ -
@ बाबू गेनू गणपती
एक माणूस मांडवाबाहेर टेबल टाकून बसला आहे. त्याच्याकडे १ रूपयाची पाच नाणी बंडल अप केलेली अशी बरीच बंडलं आहेत. प्रत्येक बंडल तो २० रूपयांना विकतो.
कशाला?
मांडवाच्या आत एक तळं बनवलं आहे आणि त्यात एक घंगाळ ठेवलं आहे. भक्तांनी या विकत घेतलेल्या बंडलातलं नाणं त्यात टाकायचं आणि इच्छा मागायची. गॅरंटीड पुरी होणार म्हणे!

याच मांडवात आतमधे एक खांब बसवला आहे आणि तिथे दुसरा एक माणूस लाल धागे घेऊन बसला आहे. ते मन्नत धागे आहेत म्हणे! तुम्ही ते विकत घेऊन त्या खांबाला बांधायचे. तुमची मन्नत पूर्ण होणारच!! Happy

पुणे गणपती : किस्सा # ३ -
@ मंडई गणपती
दर्शन घेऊन बाहेर पडताना दानपेटी आहे. तिथेच उभं राहून पुजारी लोकांना साखरफुटाणे, नारळ असं काहीबाही देतात. किती पैसे टाकले यावर तुम्हाला काय मिळणार याचं कोष्टक ठरलेलं असावं. एका बाईने दानपेटीत पैसे टाकले नाहीत पण साखरफुटाण्यांसाठी हात पुढे केला.
पुजारी: तुम्ही पैसे ठेवले नाहीत. तुम्हाला प्रसाद मिळणार नाही! Uhoh

हे एक बॅक इन द सेवंटीज पोस्ट आहे.

आमच्या पुण्यातील घराचे लोकेशन एकदम स्ट्रॅटेजिक आहे. लकडी पुला कडून कर्वे रोड कडे वळतो तिथे टर्निंगलाच बिल्डिंग. आम्ही तिसृया मजल्यावर राहायचो. त्यामुळे गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहायला अतिशय बेस्ट लोकेशन. हे गावातल्या सर्व नाते वाइकांना व ओळ्खीच्या लोकांना पण माहीत होतेच. त्यामुळे त्या दिवशी सर्व नाते वाईक येत व रात्रभर कल्ला चालू असे. पण दिवसाची सुरुवात. मी उठायच्या आधीच अनंताची पूजा झालेली असे. समुद्र गुरुजी, व आई बाबा पूजा करून बसलेले असत गप्पा मारत. सकाळीच आई बाबा इतके छान दिसत. आई जरीची नौवार साडी व बाबा
पीतांबर. नैवेद्याची गडबड चालू असे.

दुपारी एकेक जण येउ लागत. दोन काका व त्यांची कुटुंबे, मामा, मावश्या, फ्रेंड्स, ओळखीचे लोक्स वगैरे. ह्यातले काही परत जात व घरचे जेवायला थांबत. पिठले भात व ताक, ठेचा असा मेनू असे.
मामा बाद्लीतून पिठले वाढत असे सर्वांना.

पहिले मानाचे गणपती चार साडेचार च्या सुमारास येत. गुरुजी तालमीचा तिसरा गणपती काकांच्या फॅमिलीच्या विशेष लाडाचा कारण तो त्यांचया घरा जवळचा हे लकडी पूलसाइड चे स्टेटस . तर दुसृया जिमखान्याच्या बाजूला श्रिक्रष्ण मंडळाचा गणपती मिरव णुकीत गेलेला असे व तिथे पोलिसांचे एक ठाणे बसलेले असे. हरवलेल्या मुलांच्या घोषणा होत. बटाटे वडे पावाचा स्टॉल लागलेला असे.
मस्त वास यायचा. पण बाहेरचे खायला बंदी होती. एक जत्रा भरलेली असे त्या साइडला.

पिटपिटे, चक्रे व जत्रेतील खेळणी आम्ही घेउन यायचो. एक कपाळावर रंगीत पट्टी उमटवायचा पण
स्टॉल असे. रंगात साचा बुडवून कपाळावर फिरवत व डोळे बंद करायला सांगून थोडीशी चमकी टाकत. अशी रंगवलेली खूप मुले मुली दिसत.लकी च्या चौका पासून पूर्ण पूलक्रॉस करे परेंत गणपतीची आरास दिसे. काही रंगीत प्रकार पुढे लोकमान्य नगरा कडे जात तेव्हा ते मिस झाले अशी
चुट पुट लागून राही.

वरदा,केपी, आत्मधून, रमड भारी किस्से Lol मी पण होटों पे ऐसी ला जाम मिस करते चिमण्या आणि नातूबागेच्या.
श्यामली,.कसलं मस्त वाटत असेल कल्पना करू शकते!
ते कॉमेंटरी वरून आठवलं, मला लहानपणापासून तशी कॉमेंटरी करायची फार इच्छा होती. खासकरून ते सुरूवातीचे "शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत निंबाळकर तालीम मित्र मंडळ / हिराबाग मित्र मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे. यंदा मंडळ त्र्याऐंशीव्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. भव्य पौराणिक देखाव्यांची देदीप्यमान परंपरा जपत यंदा हिराबाग मित्र मंडळ सादर करत आहे देखावा - विश्वामित्रांचा तेजोभंग! विश्वामित्रांचा तेजोभंग!! विश्वामित्रांचा तेजोभंग!!!" मग एकदम अंधार.. लहान मुलांची रडारड, आयांनी त्यांना हात घट्ट पकड म्हणून बजावणं, मागच्यांनी पुढच्यांना शुक शुक करणं, ढोसणं, अतिहुशार पुरूषांनी दुरून पानटपरीवरून गर्दीला येड्यात काढत तोच देखावा ऐटीत बघणं. मग कडकडकडकड विजांचा आवाज. देखावा सुरू. चिडीचूप शांतता. देखावा संपला की भक्कन उजेड. मग मंगल कार्य संपन्न झाल्यागत वाजंत्रीच्या आवाजात मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार, कार्यकर्त्यांची नावं. मग. लोकांची उलथापालथ. मग शेवटच्या लायनीत उभी असलेली बायकापोरं पुन्हा पहिल्या रांगेत येणार सुरवातीचं नीट कळालं नव्हतं म्हणून. मग पुन्हा शिवरायांच्या पदस्पर्शाने.. मग देखावा मध्यात आला की पुढचं मगाशी पाहिलंय म्हणून परत उलटं फिरणार. अंधारात चेंगराचेंगरीत विरूध्द दिशेने पोहत बाहेर पडेपर्यंत भक्कन उजेड होणार आणि गर्दी पांगणार. Proud

होटों पे ऐसी ला जाम मिस करते चिमण्या आणि नातूबागेच्या >>> अगदी अगदी

आशूडी, हिराबागेचं पर्फेक्ट वर्णन आहे. ऑलमोस्ट पोहोचले तिथे हे वाचताना Proud

अमा, पेठेतल्या घरांची गोष्टच न्यारी. आमचं घर शनिवारवाड्यासमोर. दहा दिवस हैदोस. इकडे कसबा,.तिकडे दगडूशेठ.
रमड, मी पण. Lol
विकु, Biggrin मग काय केलंत?

दुस्रा भाग. :

ज्ञानप्रबोधिनी पथक व त्यांचे झेंडा नाचवणे तेव्हा नवीन आले ती एक नॉव्हेल्टी होती. पहिला भर ओसरला की जरा कंटाळ्वाणे होई. मग मी घरात ल्या वेगवेगळ्या नातेवाईक कोंडाळ्यात भटकून येइ. इतकी गर्दी घरात बघून जरा वैताग येइ. मग जेउन अंधारा कोपरा शोधोन झोपून टाकी. कोणी तरी बाहेर नजर ठेवून असेच. पहिला लायटिंगचा गणपती लक्ष्मी रोडच्या सुरुवातीस आला की आलारे
आला लायटींग चा. असे हाकारे जात. सर्व पब्लिक एकदम बाहेर जमे. हळू हळू फ्रिक्वेन्सी वाढत जाई. रात्री दोन अडीच च्या सुमारास व पुढे संपूर्ण पूल भर मागे पर्यंत लायटिंग च्या गणपतीची रांग्
लागलेली असे. काय बघू अन काय नको असे होई.

शेवटी पहाटेस मंडईचा व दगडू शेट असे दोन मानाचे गणपती येत. तेआमच्या घरा समोरच थांबत व
आरती होई, आम्ही तसेच रस्त्यावरील सर्व माणसे बाया मुले आरती करत जबर दस्त दर्शन होई. रिअली सेलेस्टिअल विजन. तेव्हा व्हिज्युअल्स चा सध्या इतका मारा नसे त्यामुळे हे द्रुश्य फार मनोहर वाटे. मग सर्व गेस्ट ताज्या दुधाचा चहा घेउन निघत

मिरव्णूक चालूच राही. आवाज पुढे दोन तीन दिवस कानात बसलेला असे. शांतता अगदी हवीशी वाटे.

मस्त मजा आली एक-एक किस्से वाचून Lol

लहानपणी ठाणे-ईस्टला राहायचो तेव्हा घरी पाच दिवसांचा गणपती असायचा. ठाण्यात आल्यावर इथली एक पद्धत कळली, की सोसायटीतल्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी आरतीला जायचं. बाकी पूजा, प्रसाद, सजावट यापेक्षाही मला ही सामुदायिक आरती प्रचंड आवडायची. त्यात एक काका त्यांचं हार्मोनियम घेऊन सगळीकडे फिरायचे. आरतीचा सर्वात खडा आवाज त्यांचाच असायचा. बाकी काही नाही तरी त्या आरत्या मी मिस करते खूप. तोवर घरच्या घरी आरती म्हणजे गणपती-देवी-शंकराची म्हणायची, मंत्रपुष्पांजली म्हटली की झालं. या सामुदायिक आरत्या अर्धा-अर्धा, पाऊण-पाऊण तास चालायच्या. बाबांना ते जरा बोअर व्हायचं. आरतीचं तबक हातात धरून हात भरून येतात म्हणायचे. पण ते संध्याकाळी "चला, आरती करून घेऊ" म्हणाले की आम्ही दोघी पळायचो सर्वांना बोलवायला. Lol
"हरितात्या"मधे उल्लेख असलेलं "भक्तसंकटी नानाऽऽऽ" (आणि "निढळावरी करऽऽऽ") तिथेच प्रथम अनुभवलं.

आमच्या मजल्यावर एक काकू होत्या. अर्धशिक्षित होत्या. त्या हमखास "धन्य तुम्हारो दर्शण मेरा मण रमता" असं म्हणायच्या. मला आणि बहिणीला जाम हसू यायचं. आजही त्या आरतीतली ती ओळ तशीच म्हटली जाते Biggrin

लहानपणी मी गणपतीला माझ्या भावन्डाबरोबर मामाकडे जायचे. तेथे मा़झी इतर मामे भावन्डे मिळून १० जण जमायचो. एके दिवशी आरती झाल्यावर इतर स्तोत्र म्हणताना माझी आजी एक स्तोत्र म्हणत होती. जे केवळ तीच म्हणायची. "दास मानूनी पायाचा परमेश्वर क्रुपा करी." त्याच वेळेस तिच्या पायावर एक डास बसला आणी तो बहुतेक चावला म्हणून तिने चापट मारली. त्या बरोबर आम्ही दहाही जण हसायला लागलो. त्या नन्तर जेव्हा जेव्हा ते वाक्य आले तेव्हा तेव्हा आम्ही सर्व जण एकसूरात बोलायचो " डास मारूनी पायाचा परमेश्वर क्रुपा करी.".

मी शाळेत असताना खुद्द पुण्यातली अशी (म्हणजे मावळातून वगैरे सुपारी देऊन न आणलेली) ढोल पथके फक्त ज्ञान प्रबोधिनी किंवा गरवारे प्रशालेची असायची. मी गरवारे प्रशालेचा विद्यर्थी असल्याने ७ वी ते ९ वी सलग ३ वर्षे पथकात होतो (१०वी चं बोर्डाच्या परिक्षेचं प्रस्थ असल्याने त्यावर्षी शाळेकडूनही मनाई असायची पथकात भाग घ्यायला) माझी शरीरयष्टी किरकोळ मधे मोडणारी असल्याने प्रत्यक्ष ढोल किंवा ताशा देखिल कधीच वाजवायला मिळाला नाही मिळाले ते लेझिम किंवा टिपर्‍या... पण सरावापासूनच खूप मजा यायची. ७वी त मंडई व नंतर ८ वी ९ वी मधे दगडूशेट हलवाई गणपती समोर आमचे पथक होते. ऑफीशियली रात्रभर जागायला मिळाल्याचे अप्रूप असायचे कारण दोन्ही गणपती रात्री निघून पहाटे खंडुजी बाबा चौकात पोहोचायचे. प्रत्यक्ष विसर्जन नटराज टॉकिज मागे कॉजवे होता तिकडे व्ह्यायचे पण मिरवणूकीतला लवाजमा डेक्कन कॉर्नरलाच थांबायचा. त्यावेळी पेशवे पार्कातील सुमित्रा हत्तीण देखिल विसर्जन मिरवणूकीत सामील असायची.

सगळ्यांच्याच आठवणी आणि किस्से मस्त Happy

हिराबागेचं वर्णन एकदम पर्फेक्ट. मला असे सीनचेच गणपती आवडायचे. लायटींगवाले नाही आवडले कधी Sad

डास मारूनी पायाचा परमेश्वर क्रुपा करी>>> Lol

आशुडी हिराबागेचे वर्णन तूफान. Lol काही देखावे मुद्दाम थोड्या उंचीवर करत असत ते. उदा: कृष्णलीला, सदेह वैकुंठ वगैरे. काही देखाव्यात अचानक एखादी मूर्ती खालुन येत असे. मध्यंतरी तर प्रेक्षकातुन हनुमान उड्डाणपण करत होता. सही एकदम. Happy

शामली खरोखरच मस्त पोस्ट.

आता पुण्यात आहे तर गणपती बघायला बाहेर पडावेसे ही वाटत नाही पण पुण्या / देशा बाहेर असताना मात्र फार म्हणजे फारच आठवण येऊन असेच काहीतरी करायचो हे मात्र खरे!

नासिकला शालीमारवर देखणे गणपती असायचे. मायको कंपनीचा वगैरे..चुकवू नयेत असे.
एका वर्षी कृष्णाचा देखावा केलेला. त्यात तो कृष्ण प्लास्टीकची मटकी फेकायचा, ती प्रेक्षकात कोणाचा तरी कपाळमोक्ष करायची. बरेच जण बघायला आणि कपाळमोक्ष करुन घ्यायला यायचे...:खोखो:

डास मारूनी पायाचा परमेश्वर क्रुपा करी.">>:D

सुमित्रा हत्त्तीण. क्या याद दिलादी. जियो!! त्यावरुन पेशवेपार्क ते प्राणी व ती फुलराणी पण आठवली. Happy

रमड Proud
आशूडे, अगदी अगदी. आत्ता या क्षणी परत हिराबागेत पोचले Happy

अमा - पिटपिटं - क्या याद दिलाया!!! लहानपणी भयंकर क्रेझ होती त्याची. त्याचा पत्रा हाताला लागेल म्हणून आई सतत कानीकपाळी ओरडत असे पण आमचं खेळणं काही सुटलं नाही. ते फिकट शेवाळी हिरव्या पत्र्याचं पिटपिटं अजून डोळ्यासमोर ताजंच आहे..
मग कॉलेजमधे असताना लॉन्गेस्ट डे पहिल्यांदा पाहिला आणि तिथे त्या पिटपिट्याचा उगम कळला. आमचा आश्चर्यचकित चेहेरा बघून बाबा मिस्किलपणे हसत होते. त्यांनी मुद्दामच सांगितलं नव्हतं, त्यांना ती आमच्या आश्चर्याची गंमत बघायची होती म्हणून
असो. फारच अवांतर झालं पण स्मरणरंजनात तेवढं चालावं Happy

मग कॉलेजमधे असताना लॉन्गेस्ट डे पहिल्यांदा पाहिला आणि तिथे त्या पिटपिट्याचा उगम कळला. >>> हॅ!! लाँगेस्ट डे आणि पिटपिटं ह्यांचा संबंध आहे? Uhoh

एकदा गिरगावात सार्वजनिक गणपतीमधल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आमचा भांगडा होता. टेबलांना जोडून/बांधून स्टेज बनवलेलं होतं. भांगड्यात एक स्टेप होती ती म्हणजे पुढच्या मुलाने मागे हात जोडलेले असणार त्यावर पाय ठेवून मागच्या मुलीने चढायचं आणि बल्ले बल्ले अ‍ॅक्शन करायची. रेकॉर्ड लावली होती. आयत्या वेळी त्या लुंग्या नेसून आम्हाला हातावर चढताच येईना. एक दोघींनी तर लुंग्या नाचताना थांबून वर खोचूनही चढायचा प्रयत्न केला Rofl . पण ते काही जमत नाही बघून प्रेक्षकांनी पुढे नाचा म्हणून हातवारे केल्यावर आम्ही ती स्टेप गाळली व पुढच्या स्टेप्स नाचू लागलो. कोणाचा कश्याला मेळच उरला नाही Biggrin नंतर आम्हाला भांगडा शिकवणार्‍या वाडीतल्या एका ताईने शेवटी दणादणा नाचायचे असे सांगितले होते त्याप्रमाणे गाण्याचं शेवटचं कडवं आल्यावर आम्ही सगळीच मुलं अंगात आल्यासारखं नाचू लागलो आणि झालं...... ते सुंभाने टेबलं बांधून तयार केलेलं स्टॅज गदागदा हलू लागलं. आम्ही काही थांबायचं नाव घ्यायला तयार नाही. मग प्रेक्षक उठून धावले आणि चारही बाजूंनी स्टेज धरुन ठेवलं आणि आम्हाला म्हणू लागले "नाचा तुम्ही. पुर्ण करा". :हाहा:. समोर प्रेक्षकच उरले नव्हते. फक्त लहान पोरंच बसली होती. सगळे प्रेक्षक (वाडीतल्या मुलांचे आईबाबा) स्टेज सांभाळत होते Happy

अश्विनी, स्टेज >>>>> वाचून एकटीच हसतेय आणि आजुबाजूचे तोंडाकडे बघायला लागलेत.

सगळ्यांचेच किस्से भारी

हिराबाग, स्टेज .... Lol

पिटपिट्याचा उगम जरा उत्खनन करून सांगा वरदाताई.

Pages