गणपतीबाप्पा आणि मी!

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 14:18

नमस्कार!

गणपती बाप्पा मोरया!


Moortee.jpg

गणपती बाप्पाचा उत्सव म्हटलं की आपल्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. आपल्या आवडत्या गणरायाचं स्वागत, पूजा-अर्चा, आरत्या, प्रसाद आणि शेवटी निरोप असं सगळं आपण दरवर्षी करीत असतो. त्या गणोबाचं आणि आपलं अगदी अतूट नातं असतं. त्याच्या संदर्भात आपल्या कितीतरी आठवणी निगडीत असतात. आठवतं का, किती लहानपणापासून गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण कसे रंगून-दंगून जात होतो? त्या आठवणींना उजाळा देण्याकरीता हा उपक्रम. तुमची गणेशोत्सवातली एखादी जुनी खास आठवण किंवा कुठल्या गणेशमंडळांवर काम करताना घडलेल्या काही गंमतीशीर गोष्टी आमच्यासोबत शेअर करणार? चला तर करा सुरुवात.

खास आठवणी किंवा गंमती इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आठवणी लिहताय सगळे.. Happy .. इथलं वाचुन आज - उद्या गणपती बघायला जायचचं हे ठरवलयं..

पुण्यात आल्यापासुन न चुकता विसर्जन मिरवणुक बघायला जातो आम्ही.. ढोल ताशाचा आवाज ऐकुन येणारा जोश.. बाप्पा जातायत म्हणुन नकळत डोळ्यात पाणी.. असं मिक्स फिलींग दरवर्षी असतचं Happy

ढोल ताशांचा आवाज नंतर २-३ दिवस कान घुमत राहतो .. एकदा तरी पथकात भाग घ्यायचा आहे!

तर आता रुमाल उचलतेय , Happy
माझ्या शाळेत , अभ्यास कमी बाकीचे उद्योगच जास्त केले आम्ही. अन खरतर तेच जास्त समृद्ध करणारे होते.
खेड शिवापूर ,गुंजवणी खोर्‍यातली खेडी हा आमच्या आवांतर उपक्रमांच अंगण. पाउस, भुजल पातळी,बंधारे, स्त्रीया अन बाल विकास,दारूबंदी , प्राथमिक उपचार ,प्राथमिक शिक्षण , युवक शक्ती अन रोजगार , एकुणच समृद्ध ग्रामिण जगण्याबद्दल प्रबोधन . पाचवी ते दहावी चे विद्यार्थी /विद्यार्ह्तिनी ह्या सगळ्या उपक्रमात आपापल्या परीनी सहभागी असायचे. गणेशोत्सवात गावा गावात जाउन कथाकथन, पथनाट्य, समुहगीते अन जोडीला काही स्वच्छता अभियाने/ आरोग्य शिबीरे करायचो आम्ही.
'गाडगे बाबांची लाठी' नावाच नाटक आठवतय अजून. मी गाडगे बाबा झाले होते Happy समोर दिसणारी लोकं , घटना , गुंफत स्वच्छतेचे धडे देणारी भाषणं . स्क्रीप्ट वगैरे काहीच नाही. साधारण नाटकाचा रोख त्या त्या गावा प्रमाणे बदलायचा. मजा होती. एका गावातल्या कार्यक्रमानंतर परत बेस कॅम्प शिवापुरला येताना एका अडलेल्या बाईला नसरापुरला सोडल ं होतं . तिच्या वेदनानी कळवळणं अन तिची सुखरूप सुटका झाली ह्याबद्दल हात जोडून आभार मानणारे तिच्या घरातले अजूनही लख्ख आठवतायत. आता ती तेव्हा जन्मलेली मुलगी तीशीमधे असेल Happy
टिळकांच्या मनातला गणेशोत्सव म्हणजे अगदी हाच अशी ठाम धारणा होती आम्हा सगळ्यांची तेव्हा. Happy

हो ग नीधप. Happy
त्यावेळी ताया अन दादा ( हेही १८-१९ पेक्षा जास्त वयाचे नसत) यांच्या बरोबर अस आडगावामधे आम्ही कार्यक्रम करत फिरायचो अन आम्चे आईबाबा आम्हाला बिनघोर पाठवायचे ह्या च मला कौतुक अन आता हेवा वाटतोय. :I

टिळकांच्या मनातला गणेशोत्सव म्हणजे अगदी हाच अशी ठाम धारणा होती आम्हा सगळ्यांची तेव्हा.>>> +१११
इन्ना, आपल्या शाळेचा पण एक वेगळा धागा काढायचा का ? सगळ्या आठवणी एका जागी राहतील.

मी हे सगळं ऐकून होते. त्यामुळे मला प्रबोधिनीमधे घातलं नाही याचा कधी कधी जाम राग यायचा.

इन्ना भारी ग. माझ्या लेकीचे प्रबोधिनीत सिलेक्षन झाले होते पण तिला तिची सध्याची शाळा सोडायची नव्हती. मी पण जबरदस्ती केली नाही. पण असे काही वाचले की ती तिथे गेली ह्याचे फार वाईट वाटते Sad

जिज्ञासा, मस्त वर्णन. माझ्या दोन्ही भाच्या, ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थिनी, त्यामुळे हे सतत ऐकायला मिळायच. त्यात थोरली तर सतत तिथेच असायची. घरी असतानाही सतत तिथलाच विचार. खूप मेहनत घेतात त्या मुली. छान वाटत त्यांच पथक बघताना. Happy

दीमा - तुम्ही कोणत्या गावचे? तिकडे गणपती येत नाहीत का?

लिहा काहीतरी...

आणि अगदीच त्या गावचे नसल्यागत करू नका. (त्या गावचे म्हणजे गणपतीच्या गावचे) ढेकूण चावलेत तुम्हालाही तिथले...

थोडी मेहेनत घ्यावी लागेल म्हणा पण जमेल तुम्हाला (नावं ठेवायला आपलं सुचवायला नाही जमले तसे) Light 1

माझा एक मित्र भिक्षुकी करतो. चतुर्थीला त्याची पहाटे तीन वाजल्यापासून धावपळ सुरू असायची. प्रत्येक घरची पूजा आटोपता आटोपता रात्रीचे ११/१२ सहज वाजायचे. त्याच्याकडे अनेक विनोदी किस्से आहेत एकेक. ते तो सांगायचा आणि आम्ही पोट धरधरून हसायचो.
एक किस्सा आठवला हे सगळं वाचताना.

एकांकडे पुजेला गेला होता. यजमान पूजेला बसले होते. अनेक वेळा अनेक चुका ऑलरेडी करून झाल्या होत्या यजमानांच्या. पूजा सांगता सांगता मध्येच याने सांगितले 'छातीला हात लावा'.
यजमानांनी पटकन याचीच छाती पकडली. पुढची पूजा बर्‍याच मोठ्या 'हास्य' interval ने सुरू झाली.

आमच्या सोसायटीत आम्ही ५-६ वर्षे गणपती बसवला होता. मस्तपैकी सकाळ-संध्याकाळ आरती करायचो. आरतीच्या आधी सगळीकडे "आरतीssssssssssला चला ssssssss" अश्या हाका मारायचो Proud

गणपतीत अनेक स्पर्धा असत. सगळ्यात आवडीची म्हणजे Quiz Competition & Treasure Hunt. एका Treasure Hunt मधे एक क्लू होता की "माझ्या घरी माझ्या मुलाची पूजा" ज्यांच्या घरी बापा बसवला आहे ते घर हे समजले पण ह्याचा अर्थ काही लागला नाही Uhoh मग एका काकांनी ज्ञानात भर घातली Happy

ज्याच्या घरी बापा होता त्यांच्या मुलाचे नाव - पिनाकिन. आणि पिनकिन म्हणजे शंकर. आणि शंकराच्या घरी गणपतीची पूजा असा अर्थ होता.

आम्हाला पिनकिन हे एकदम भारी मॉडर्न नाव वाटायचे तोपर्यंत Proud

"आरतीssssssssssला चला ssssssss" >>>>>>>>>....हे गेली कित्येक वर्षे ऐकतेय मी. पिढ्या बदलल्या पण शब्द आणि सूर तेच. Lol

सगळ्यांच्याच आठवणी मस्त.
आमच्या घरी (मिरज, जिल्हा: सांगली) ५ दिवसांचा गणपती असतो, अपवाद जर गौरी विसर्जन पाचव्या दिवसानंतर असल्यास.

गणरायाचे आगमनाची तयारी जोरात असायची. घरच्या गणपतीला लागणार साहित्य बाबांबरोबर जाऊन आणने, गणपती मूर्तीच बूकींग करणं यात मजा यायची. गणपतीची मूर्ती आणताना येणारे जाणारे एकमेकांना, ओळख असो वा नसो, "मोरया$$" करायचो. समोरचा पण त्याच उत्साहाने उत्तर द्यायचा. मी पुण्यात आल्यावर पहिल्या वर्षी असं केलं होतं तेव्हा कोण येडं आलय असं बघत होते लोक. Happy

सकाळची आरती शाळेत, सामूहिकपणे, करताना रोमांच उभारायचे. पूर्ण पटांगण भरून विद्यार्थी आणि समोर स्टेजवर बाप्पा आणि काही गायक मंडळी. त्या सामूहिक गानाच्या आठवणी अजून पण आहेत.

संध्याकाळची आरती घरात करत होतो. प्रसादाची तर रेलचेलच असायची. पंचप्रसाद/ उकडीचे मोदक/ फळं / चिरमुरे-फुटाणे असं काही काही असतं. घरी पहिल्यांदा कणकेचे उकडीचे मोदक करत असू पण नंतर तांदळाच्या पीठीचे मोदक करायला लागलो. कित्ती मोदक खाऊ आणि नको अस व्हायचं.

घरचा गणपती विसर्जन करताना डोळ्यात पाणी यायचं/अजूनही येतं. शाळेचा गणपतीच्या विसर्जनाला जोर-जोरात घोषणा देत, फटाके फोडत पूर्ण रस्ता दणकवायचो आणि येताना खिरापत वाटत यायचो. नववीत असताना MCC मध्ये होतो तेव्हा आमच्या ट्रूपने संचलन पण केलं होतं.

मिरजमध्ये गणपती उत्सवात उभारल्या जाणार्‍या कमानी हे वैशिष्ट होते, देव-देवता/ शिवाजी महाराज/ ऐतिहासिक वास्तू असायच्या या कमानिंवर. त्या कमानी बघायला आजूबाजूच्या खेड्यातून लोक यायचे.

miraj_kaman.jpg1252434737_kaman1.jpg

देखावे बघत सायकलवरून हिंडणं तर सर्वमान्यच होतं. जिवंत देखावे जास्त असायचे, सगळी हौशी मंडळी. कथा/ध्वनी योजना/ स्पेशल इफेक्ट एकदम फंडू वाटायचं. नदीवेस मंडळाचे जिवंत देखावे मधल्या काळात फार गाजले. त्यांचा नुकत्याच स्थापन झालेल्या 'सां.मि.कु.' महापालिकेवरचा देखावा आणि 'बालगंधर्व थिएटरच्या' दुरवस्थेबद्दलचा देखावा फार हिट झाला.
पैलवान गणपती मंडळ / महागणपती मंडळ म्हणजे भव्य मूर्ती फिक्स. त्याच्याच शेजारचं (नाव विसरलो ) मंडळ दरवर्षी एका मंदिराची गाभार्‍याची प्रतिकृती उभी करायचे, तो नवसाला पावतो असं म्हणतात.

झुलता पूलाचा देखावा, भूत महल ज्यात जाऊन येताना भरपूर आरडा ओरडा करून येता येतो, संगीत कारंजे, प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती हे एकदम हिट्ट! जिवंत देखाव्याला गर्दीच्या गर्दी सिनेमाच्या शो सारखी आत बाहेर करताना मोक्याची जागा पकडायला धमाल असायची. मिरजेतील देखावे झाले की मग सांगलीला जाऊन तिथले देखावे पाहायचे. तिथे पण भव्य देखावे असायचे. एका जिवंत देखाव्यात माझे काका आणि एकात माझ वर्गमित्र काम करायचे. या गोष्टीवरून कॉलर ताठ करून हिंडत असू.

मिरजेतील गणपती विसर्जन हा एकेकाळी आमच्या दृष्टीने अभिमानाचा विषय होता. संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वेळ चालणारी मिरवणूक आमच्याकडे व्हायची, असं आम्हाला वाटायचं. (अजून इंटरनेट नव्ह्तं आलं आणि वर्तमानपत्र पण त्यालाच खतपाणी घालायचे!). नंतर याचा इतका अतिरेक झाला की रात्रभर मिरवनूक झाली की रेकॉर्ड व्हावं म्हणून काही मंडळं मूर्ती लपवून ठेवत. आणि उशिरा म्हणजे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी विसर्जन करत. मग पोलीसच अशा मंडळांना शोधत फिरत.

पूर्ण शहरभरा बाप्पांना फिरवून आणलं की मग 'गणेश तलावात' विसर्जन व्हायचं. मध्ये तलावातील गाळ काढला, तेव्हापासून मंडळांचे गणपती नदीवर जातात विसर्जनाला आणि घरगुती तळ्यावर येतात.

झांजपथक , लेझीम पथक असायची. ढोलपथक हल्ली हल्ली सुरु झालीत. एरवी बेंजो असायचा, ज्यात दोन स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही आवाजात गाऊ शकणारा गायक असायचाच. मग नंतर डॉल्बी आली आणि विसर्जन मिरवणूक अक्षरशः दणकू लागली. त्याकाळात ऐकलेली आणि मनसोक्त 'गणपती डान्स' केलेली गाणी म्हणजे, '' ब्राझील', 'डोकं फिरलया' Lol , मुंगळा, लिंबू मला मारला Lol " आमच्यासाठी कधीही न विसरता येण्यार्‍या गोष्टी आहेत.

विसर्जन मार्गावर नागोबा कट्ट्यावर थांबून प्रत्येक मंडळाने फुल्ल वॉल्यूम वर १०-१५ मिनिटे तरी हॉल्ट घ्यायचाच हा अलिखित नियम होता. शेजारी असलेल्या मशिदीसमोर. एकदम खुन्नस असायची. गुलाल उधळला जायचा. बिचारे पोलीस हात-पाय जोडून एकेक मंडळाला पुढे सरकवायचे.

आमच्याकडे विसर्जनाचा स्पेशल गणपती 'सव्वाशे ब्रदर्स' यांचा असायचा. त्यांची स्वत:चा ध्वनी-प्रकाश उपकरण विकायचा/ भाड्याने द्यायचा व्यवसाय होता. तो गणपती मार्केटात लक्ष्मी चौकात आला की सगळे तिकडे पळायचे. जबरदस्त डॉल्बी आणि फाडू लाइटींग हे आकर्षण असायचं. २००-२०० मीटर भर लोक डान्स करत थांबायची.

दुखःद आठवण पण आहेच. २००९ साली एका समाजकंटकाने वादाचे निमित्त होऊन मंडपातील गणपतीची मूर्ती फोडली होती आणि प्रचंड दंगल पेटली होती. मी आदल्याच दिवशी पुण्यात परतलो होतो पण मित्र अडकले होते. ४-५ दिवस कर्फ्यू लागला होता. दूध/ किराणा मिळत नव्हतं. दंगलींच लोण आजूबाजूला पण पसरल होतं, सांगली-कोल्हापूर सारखी शहरं काय आणी खंडेराजूरी सारखं खेड काय, नुसता धगधगत होती. त्यावर्षी पहिल्यांदाच विधानसभेमध्ये भाजपा / शिवसेनेला आमच्या भागात विक्रमी जागा मिळाल्या होत्या.

यंदाच्या वर्षी नाही जाता आलं घरी. यंदाचा गणपती माबोवरच. Happy

क्लासिक लिहीलंत रंगासेठ! आम्हाला मिरजेचा दणका दिसला तुमच्या शब्दात. Happy
आरतीssssssssssला चला ssssssss" >>>> याच चालीवर आम्ही नsssळ बंदss कराsss ओरडायचो. खालच्या मजल्यावरचे नळ बंद केल्याशिवाय मालकांकडे वर पाणी यायचे नाही. Proud
प्रबोधिनी रॉक्स. ढोल पथकात आता ते प्रबोधिनीबाहेरच्या लोकांनाही घेतात गेली काही वर्षं. माझी बहीण, आत्येबहीण, नवरा सगळे त्याच पथकात असायचे.

काल हिराबागेचा पाहिला. अप्रतिम सादरीकरण. अतिशय शांत, तृप्त मुद्रा असलेली दुर्गा आणि तिनेच नंतर विध्वंसक, संहारक रूप धारण केलेली कालीमाता. रक्ताच्या थेंबातून वेगवेगळ्या ठिकाणी जिवंत होणारा अंधकासुर. त्याच्यावर त्वेषाने तुटून पडणारी कालिका. जबरदस्त आवेश आणि रूप. अंधकाचा वध केल्यावरही (इनर्शिया असल्यागत) ती रणभूमीवर थयथयाट करत राहते विजयाचा. पृथ्वी, तिन्ही लोक डळमळू लागतात. मग नेहमीप्रमाणे शंकर चार्ज घेतात सिच्युएशनचा. मुद्दाम रणभूमीवर आडवे होतात. नाचणार्या कालिकेला ते दिसतच नाहीत..ती त्यांच्या अंगावर नाचते आणि तिचा थयथयाट ते पदन्यासासारखा झेलत विश्वाचे रक्षण करतात. यावर एक छोटेसे गाणेही तयार करून गायले आहे, त्याचे शब्दही सुरेख आहेत. डोळ्यांचे पारणे फिटणारा देखावा.

*दुर्गा म्हणजेच पार्वती. तर शंकर पार्वती हे असे भडक डोक्याचे कपल कसे काय लिहीले आहे आपल्याकडे काय माहीत. दोघांपैकी एकाचे डोके फिरले की प्रलय निश्चित. गुरुजी म्हणतील पत्रिका न बघता लग्न केले की असे होते. Proud

१०/१२ वर्षाचा असेल त्यावेळेचे गावचे पोलीस निरीक्षक गावचे इंगोले / की मारीया सर होते त्यांचा दबदबा खुप काही सांगुन जायचा, त्यांनी चांगला गणपती बसविणार्‍या मंडळाला चांगले बक्षीस देण्याचे जाहीर केले आंम्ही कामाला लागलो. दगड-धोंडे, माती जमा करुन गड तयार केला, मेथीचे दाणे टाकुन दिली. २ दिवसात गड हिरवा झाला. गणपती बसला , सर पहायला आलेत. तेव्हा गाण्याच्या क्यासेट नसल्याने सरळ आकाशवाणी रेडीओ जोडला एम्प्लीफायरला, मस्त गाणी वाजत होती सरांनी पाहुन प्रत्येकाची पाठ थोपटुन कौतुक केले. सर आलेत याचाच जास्त आनंद झाला !

रंगासेठ, भारी लिहीलंय.

घरचा गणपती विसर्जन करताना डोळ्यात पाणी यायचं/अजूनही येतं.<< +१

वाटलं होतं असं होणार नाही आता पण झालं पर्वा तेही. माहेरचा गणपती म्हणून असेल. Happy

फार छान लिहिले आहे सगळ्यांनी.

लाईटवाले गणपति आधी पुण्यात सुरु झाले. त्यावेळी दूरदर्शनवर ते दाखवत असत ( काळे पांढरे ) मग नंतर मुंबईत
सुरु झाले. माटूंग्याचेच गणपति जास्त बघून व्हायचे कारण रोजच्या कॉलेजच्या मार्गावरच ते.
वरदाच्या गणपतिचा दरारा असायचा. खुप मोठा मंडप असायचा, तो गेल्यावर मात्र मंडप अर्धा साईझचा झाला. शिवाय तिथेच पोलिस चौकी पण झाली मग.

Pages