गणपतीबाप्पा आणि मी!

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 14:18

नमस्कार!

गणपती बाप्पा मोरया!


Moortee.jpg

गणपती बाप्पाचा उत्सव म्हटलं की आपल्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. आपल्या आवडत्या गणरायाचं स्वागत, पूजा-अर्चा, आरत्या, प्रसाद आणि शेवटी निरोप असं सगळं आपण दरवर्षी करीत असतो. त्या गणोबाचं आणि आपलं अगदी अतूट नातं असतं. त्याच्या संदर्भात आपल्या कितीतरी आठवणी निगडीत असतात. आठवतं का, किती लहानपणापासून गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण कसे रंगून-दंगून जात होतो? त्या आठवणींना उजाळा देण्याकरीता हा उपक्रम. तुमची गणेशोत्सवातली एखादी जुनी खास आठवण किंवा कुठल्या गणेशमंडळांवर काम करताना घडलेल्या काही गंमतीशीर गोष्टी आमच्यासोबत शेअर करणार? चला तर करा सुरुवात.

खास आठवणी किंवा गंमती इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टेज भारी!! Lol

त्या पिटपिट्याला आम्ही टिकटिक म्हणत असु. गणपतीतच दिसणारी एंडेमीक खेळणी म्हणजे ते टिकटिक, आणखी एक कचकड्याचे गोळ फिरवायचे खेळणे ज्याला एक काडी लावलेली असायची रबरबँडने, तो हवेत प्या करुन फित उडवणारा पोपट व पाण्याने भरलेला फुगा. या फुग्याला मागे एक जाडसर रबरबँड असे. त्याने एवढ्या मारामार्‍या केल्यात की बासच. Happy

गणपतीतच दिसणारी एंडेमीक खेळणी म्हणजे ते टिकटिक,>>

आणि केशरी किंवा हॉट पिंक कलरचा सिल्वर मुकुट घातलेला प्लास्टिकचा मारुती!!! गोल गोल फिरत
तारेवरून खाली येणारा?!

प्लास्टिकचा ग्रीन फ्रेम व लाल लेन्सेस चा चसमा?

आठ चित्रे कागदावर अ सलेला क्यामेरा?

सोनेरी व पां ढर्‍या प्लास्टिक च्या टोप्या व चकरे? हा सर्व माल चतरशिंगीच्या
जत्रेत पण असे. पण त्याचा बाफ येइल तिथे लिहू.

मी माझ्या आठवणी २०१२ कि १३ च्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात लेख लिहून लिहिल्या होत्या. त्या पुन्हा देऊ का इथे?

पुणे गणपती : किस्सा # २ -
@ बाबू गेनू गणपती

मांडवाच्या आत एक तळं बनवलं आहे आणि त्यात एक घंगाळ ठेवलं आहे. भक्तांनी या विकत घेतलेल्या बंडलातलं नाणं त्यात टाकायचं आणि इच्छा मागायची. गॅरंटीड पुरी होणार म्हणे!>>>>>>>>अजूनही ते तिथेच आहे. फ़क्त लोकं आपल्याकडची नाणी टाकतात. आणि "नवसाचा गणपती" म्हणून १०१/- रु. देणार्‍याला एका बरणितले पिवळ्या कागदात (?) गुंडाळलेले बहुधा नाणे असेल देत होते.

पुजारी: तुम्ही पैसे ठेवले नाहीत. तुम्हाला प्रसाद मिळणार नाही! >>>>>>>>>>>..ह्यावेळी सगळ्यांना मोतीचूराचा लाडू, प्रसाद म्हणून दिला. Happy

अयाई गं. काय हसवताय....
आमच्याकडे अशाच सामुदायिक आरत्या करायची पद्धत. अख्खी गल्ली गोळा व्हायची. (अजूनही होतेच) त्यात आमचा गणपती एक दिवसाचा सकाळी येतो आणी संध्याकाळी जातो. त्यामु़ळे संध्याकाळी विसर्जनाला म्हणून समस्त जनता येते. आणि मग आरत्या चालूच राहतात. पप्पा आरतीचे ताट खाली ठेवून द्यायचे. हाताला चटका बसतो म्हणून. आता भाऊच आरती करतो. तो सरळ शेल्यामध्ये ताट धरतो.
आमचा एकच दिवस गणपती असल्यानं जास्तीत जास्त वेळ रहावा म्हणून भटजी सर्वात आधी आमचा गणपती बसवून जातात. पहाटे सहासाडेसहाला गणपतीची पूजा झाली की आम्ही दिवसभर लोकांच्या घरचे गणपती आणायच्या मिरवणुकीला मोकळे.

पूर्वी विसर्जनाला संध्याकाळी आमचाच एकटा गणपती असायचा. फार आधी आम्ही रत्नागिरीमध्ये लांजेकरांच्या तळ्यावर विसर्जनाला जायचो. पाऊस असेल तर तळ्यावर जायला खूप भिती वाटायची. पप्पा पाय सरकतील म्हणून टॉर्च घेऊन उभे. भाऊ लहान असताना कित्येकदा तर मीच गणपती विसर्जन केला आहे. हल्ली शाडूची मूर्ती अस्लयाने घरच्याच विहीरीत विसर्जन करतो.

कोक्णात सार्वजनिक गणपतीची इतकी मजा नाही जितकी घरगुती गणपतींना असते. घरचे गणपती पण आम्ही नाचत नाचतच आणायचो. सार्वजनिक गणपतींमधेय टिळक आळीचा गणपती आणि त्याची विसर्जनाची मिरवणून बघायला जायचो. अऊन एक आवर्जून पाहण्यासारखा देखावा म्हणजे रत्नागिरी मनोरूग्णालयामधल्या गणपतीचा. इथले रूग्ण आणि स्टाफ यांनी मिळून लाईव्ह देखावा अथवा सीन केलेला असायचा, तो दरवर्षी बघायला जायचोच.

.

ह्यावेळी सगळ्यांना मोतीचूराचा लाडू, प्रसाद म्हणून देला. >>> हे कधी दिले म्हणे ?
आम्ही पहिल्याच दिवशी संध्याकाळी ६-६.३० च्या दरम्यान गेलो होतो, तेव्हा सगळ्यांना साखरफुटाणेच देत होते.

आणि केशरी किंवा हॉट पिंक कलरचा सिल्वर मुकुट घातलेला प्लास्टिकचा मारुती!!! गोल गोल फिरत
तारेवरून खाली येणारा?!
प्लास्टिकचा ग्रीन फ्रेम व लाल लेन्सेस चा चसमा?
आठ चित्रे कागदावर अ सलेला क्यामेरा?

अगदी अगदी....
तो काचेचा आठ चित्रवाला कॅमेरा घेउन मॅजीक मॅजीक खेळायचो, आता कोणतं चित्रं येईल ओळखा वगैरे... ओळखल्यावर सगळ्यांचे चेहरे कसे आश्चर्याने खुलायचे...

बांबुच्या काठीला बांधलेला वाळु घालुन फुगवलेला आवाज करणारा फुगा Happy
नारंगी कलरचा प्लास्टीक्च गदा.

कोक्णात सार्वजनिक गणपतीची इतकी मजा नाही जितकी घरगुती गणपतींना असते. >>>>>>...हो. आणि एकमेकांच्या घरी जाऊन मोठ मोठ्या आवाजात, भरपूर आरत्या म्हणणे, नंतर प्रसाद ग्रहण. तसचं विसर्जनाला पण नदीवर एका रांगेत, सगळे गणपती ठेऊन पूजा करून आरती, आणि मग "गणपती बाप्पा.... मोरया, मंगलमूर्ती... मोरया" च्या गजरात विसर्जन! Happy

मस्त पोस्ट नंदिनी. अमा आणि केपीने लिहीलेली खेळणीही भारी.

गणपती मनामनांना कसा जोडतो त्याची एक आठवण. मी दुसरी तिसरीत असेन तेव्हाची गोष्ट. आम्ही शनवारवाड्याजवळ आमच्या वाड्यात राहायचो. वाडा म्हणजे समोरासमोर उंबरे. एकेक खोलीत एकेक कुटूंब असे पाच भाडेकरू होते. आम्ही सतत आमच्या समोरच्या नन्नाकडेच पडीक असायचो. नन्नाच्या तीन मुली मोठ्या वीस बावीस वर्षांच्या आणि एक तसाच तरूण लेक. आम्ही लहान म्हणून आमच्यावर त्या सर्वांचा फार जीव. एका खोलीत त्यांचा संसार होता. दर चतुर्थीला कणकेचे उकडीचे मोदक करत आणि मला फार आवडतात म्हणून प्रसादाचा पहिला मोदक मला देत. गणपती बसायचा गणेश चतुर्थीचा दिवस. आमच्या घरी पूजाच चालू होती. कंटाळा आला म्हणून मी धावतच समोर निघाले. एका दहा बाय दहा च्या खोलीत ओटा कुठे, कॉट कुठे आणि देवघर कुठे! त्यांनी आणलेला गणपती खालीच ठेवला होता. मी सुसाट नेहमीसारखी पळत आले आणि डायरेक्ट गणपतीवर पडले! अनर्थ झाला. मी प्रचंड घाबरले. रडायलाच लागले. वडील खैर करणार नाहीत म्हणून नन्नाला घट्ट पकडून रडत होते. त्यांच्याही घरातल्या सर्वांच्या उत्साहावर माझ्या मूर्खपणापायी विरजण पडले तरी ते मला समजावत होते. माझा आवाज आईला ऐकू गेलाच. ती पण व्यथित झाली ते दृश्य पाहून. मला ओरडण्यापेक्षा नवी मूर्ती पटकन आणणं भाग होतं. बाबांनी नन्नाला पैसे देऊ केले पण ते तिने घेतले नाहीत. मला जवळ घेऊन, तिला ओरडू नका, लहान आहे म्हणाली. मग नवी मूर्ती आणली,पूजा झाली. मला दोन दिवस त्यांच्याकडे जायचीही भीती, लाज वाटत होती. मग नन्नाच घरी आली माझ्यासाठी माझ्यासाठी मोदक घेऊन घरी. आईने तिची पुन्हा पुन्हा माफी मागितली. तर तिने आईलाही जवळ घेतले. आईला फार चुटपूट लागून राहिली त्या प्रमादाची म्हणून शेवट तिने मला आणि बाबांना घेऊन अष्टविनायक दर्शन केले, मिठाच्या चतुर्थ्या केल्या. आपल्यामुळे आईला एवढा त्रास होतोय ही बोच मला दरवेळी वाटायची. पण नन्ना किंवा तिच्या कुटूंबाने त्या प्रकाराची पुन्हा ओळखही दाखवली नाही. दर चतुर्थीला पहिला मोदक माझ्यासाठीच असे! अगदी परवा तिला भेटायला गेले तेव्हाही तिने हाताने मला गुलाबजाम भरवला तर माझे डोळेच भरून आले! Happy

आणि केशरी किंवा हॉट पिंक कलरचा सिल्वर मुकुट घातलेला प्लास्टिकचा मारुती!!! गोल गोल फिरत
तारेवरून खाली येणारा?!

प्लास्टिकचा ग्रीन फ्रेम व लाल लेन्सेस चा चसमा?

आठ चित्रे कागदावर अ सलेला क्यामेरा?

सोनेरी व पां ढर्‍या प्लास्टिक च्या टोप्या व चकरे? हा सर्व माल चतरशिंगीच्या
जत्रेत पण असे. पण त्याचा बाफ येइल तिथे लिहू.

<<<<<< अमा, अमअ, अमा. हे सगळे आमच्या जत्रेत मिळायचे. किती रमवले असेल या गोष्टींनी! मी एक बाफ उघडतो. तिथे लिहू.

केपी, आशुडी अगदी पेठेतले गणपती आणि तिथले वातावरण आठवले.

आमच्या दामले वाड्यात सगळ्यांच्या घरी आरती व प्रसाद. मंत्र पुष्पांजली खूप मोठ मोठ्यानी व आलाप काढत म्हणण्याची स्पर्धा असे.

पण लहान असताना वाईच्या सार्वजनीक गणपतीत लाईव्ह दॄष्यात भाग घ्यायची मजा और असायची. किती वेळ न हलता एकाच पोझ मधे उभे रहाता यायचे ते आठवत नाही, पण त्याच्या चर्चा व आलेल्या प्रेक्षकाम्ची हसून हसून झालेली पुरेवाट येवढेच आठवतेय. लहान मुलांना काही तरी रोल असायचाच. आमची सीता ठरलेली असायची, पण राम कोण आणि रावण कोण यावर झालेली भांडण मात्र आठवतात. Happy

केप्या, तुझ्या पोस्टी वाचताना जामच मजा आली.
माझ्याही लहानपणचे बरेचसे रेफरन्स हेच आहेत.

माझ्या काही आठवणी.
अगदी लहानपणी म्हणजे शिशुविहारमधे असताना हिराबागेचा हलता देखावा, बाबांच्या खांद्यावर बसून बघितल्याचे आठवतेय. स्कूटरवर मी, आई आणि बाबा फिरायचो. गणपती मंडळाच्या जवळपास स्कूटर लावायची आणि गर्दी कमी असेल तर मला चालवायचे. जास्त असेल तर मी खांद्यावर असला प्रकार. मग आम्ही तिघे स्कूटरवर मावणार नाही अश्या स्टेजला पोचलो तेव्हा आईचा गर्दीत जायचा उत्साह कमी झाला होता. बाबा आणि मी एखादा दुसरा दिवस गणपती बघायला स्कूटरीवरून जाऊन यायचो. बरेचदा लांबूनच बघितले जायचे.

विसर्जन मिरवणूक बघायला जाणे हे कर्तव्य असल्यासारखे वाटे. आई आणि बाबा दोघेही ऐन स पे मधेच वाढले. लक्ष्मी रोडपासून अगदी जवळ. त्यामुळे त्या दोघांच्याही दरवर्षी मिरवणुकीला जायच्या आठवणी होत्या.
आई (आजी, आजोबा, मावशी, मामा सर्वांबरोबर) प्रबोधिनी समोरच्या सोनावणे चाळीत रहायची. दुपारी मानाचे पहिले पाच बघायचे. घरी यायचे. संध्याकाळी लवकर जेवून मग रोषणाईचे गणपती बघायला जायचे. थोडावेळ बघून परत यायचे. मग झोप काढायची. तेव्हा काही फोन बिन नव्हतेच पण कुणीतरी चाळीत हाकारा घाले. मंडईचा गणपती कुंटे चौकात आला रे. की सगळी वानरसेना टक्कन जागी होऊन विजय टॉकिजच्या चौकात येऊन थांबत असे. मंडई, दगडूशेठ दोन्ही बघून घरी. आणि मग गुडुप्प.

माझ्या लहानपणीही आम्ही मधल्या काकाकडे राहून हेच करत असू. मग कॉलेजमधे गेले तोवर जाणता राजा वगैरे सुरू झाले होते माझे त्यामुळे लक्ष्मी रोडच्या आसपास राहणार्‍या मित्रमंडळींची, नातेवाइकांची, मित्रांच्या नातेवाइकांची ओळख काढून ठिकाणा तिथे ठेवायचा आणि तिथून गणपती बघायला ये जा करायची असा प्लॅन असे.

एक वर्ष कॉलेजच्या रेडक्रॉसच्या स्टॉलवर पण बसले होते रात्रभर.

लग्नानंतर एक दोन वेळा मी आणि नवर्‍याने मिळून दुपारचे मानाचे पाच, संध्याकाळचे लायटींगचे काही आणि पहाटे मंडई, दगडूशेठ असे पाह्यले होते. मात्र तेव्हा हाकारे नाही. टिव्ही होता. चॅनेलवर सांगितले की मंडईचा गणपती गणपती चौकात की आमचा गणप्ती घरातून हाले. Proud

या सगळ्यामुळे ढोलताश्या गजराच्या आवाजाशी सगळे बाळपण जोडले गेलेले आहे. मग ते आवाज आले की घसा कोंडणे आलेच ओघाने. हे नाशिक ढोलाच्या बाबतीत अजिबात होत नाही.

गणपतीच्या आठवणी काढायच्या तर स्पर्धा, विविधगुणदर्शन व तत्सम कार्यक्रमांशिवाय कसे चालेल?

माझ्या लहानपणी आम्ही शुक्रवारात रहायचो. अकरामारूतीचे देऊळ, मग एक वाडा, मग एक गल्ली, मग एक वाडा आणि मग आमचे प्रमोदबन अपार्टमेंटस. असे होते. त्या मधल्या गल्लीत त्रिमूर्ती मित्रमंडळाचा गणपती बसायचा. गल्ली डेड एण्ड असल्याने तो आख्खा रस्ता भरपूर स्पर्धा, नाटकांचे प्रयोग, गाण्यांचे कार्यक्रम, फॅन्सी ड्रेस स्पर्धा वगैरेसाठी वापरला जायचा. सर्व कार्यक्रमातले लोक विंगेत म्हणजे बाजूच्या डोंगरेंच्या घरात जात. त्या डोंगरेंच्या घराची पार मंडई करून टाकत असू आम्ही.
कुठली ना कुठली तरी ताई आम्ही चार पाच जणींना घेऊन एखादा फोक डान्स बसवत असे. मी उंच असल्याने मला नेहमीच फोकडान्सात मुलगा व्हावे लागे. एके वर्षी माझ्या काकाने मला तीटपेन्सिलने दाढीमिश्या रंगवून दिल्या होत्या. मग प्रोग्रॅमनंतर कपडे बदलले, तोंड धुतले पण त्या दाढीमिश्या लगेच नीट पुसल्या गेल्या नाहीत. त्यामुळे मी काळं तोंड आणि मस्त फ्रॉक अशी फिरत होते डॅन्सचा प्रोग्रॅम संपल्यावर. Proud

या त्रिमूर्ती मित्रमंडळाला एकदा बहुतेक फारच क्रिएटिव्ह संयोजक मिळाले होते. विविध गुणदर्शनात भाग घेतलेल्या शिशुगटापासून कॉलेजपर्यंतच्याच काय तर मोठ्या वयाच्या बायाबाप्यांनाही प्लॅस्टिकचे पांढरे आणि हिरवे किंवा पांढरे आणि निळे लाटांसारखे पट्टे रंगवलेले चेंडू बक्षीस दिले होते. डॅन्समधल्या आम्ही चौघी पाचवी आणि सहावीत होतो. आता याचे करायचे काय असा आम्हाला प्रश्न पडला होता. Proud

सगळेच Lol

सुशोभा - लाडूवाला पलिकडच्या बाजूला होता म्हणे त्यामुळे त्याला दिसत नव्हतं कोणी पैसे ठेवले अन कोणी नाही. तर त्याने सगळ्यांनाच लाडू वाटले Proud पण छोट्या मूर्तीच्याइथल्या साखरफुटाण्यांसाठी मात्र कोष्टकच!

हलत्या देखाव्यांच्या आठवणींवरून हत्ती गणपतीच्या इथला भला मोठा कुंभकर्ण आठवला. त्या वर्षानंतर त्या देखाव्यांमधे अशी एकतरी भलीमोठ्ठी मूर्ती असायचीच. बहुधा कुंभकर्णाचाच मेकअप बदलून ठेवत असावेत Proud

बाकी माझी गणपती दर्शनाची लहानपणीची प्रमुख आठवण म्हणजे दरवर्षी न चुकता दगडूशेटच्या इथून घेतलेली बासरी Proud एक्दोनदा कॅमेरा आणि त्या पाण्यात वेगाने फिरणार्‍या बोटी पण घेतल्याचं स्मरतंय. पण बासरी कंपल्सरी!!

नॉर्मंडी इन्वेजन मध्ये एअरबोर्न डिविजनच्या लोकांना ती पिटपिटी दिली होती सिग्नल म्हणुन एकमेकांना ओळखायला. त्याचा रेफरन्स असेल वरदाच्या लॉन्गेस्ट डे आणि पिटपिटी कनेक्शन मध्ये

Pages