सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ५- सिंधू दर्शन स्थळ आणि गोंपा

Submitted by मार्गी on 23 July, 2015 - 11:21

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ४- लेह दर्शन

सर्व माबोकर मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन आणि धन्यवाद...

५ जूनच्या सकाळी छान थंडी होती. ह्या वेळी लदाख़चं वेगळंच रूप बघायला मिळत आहे. आज ह्या सायकलिंग प्रवासाचा एक मुख्य दिवस आहे. आधी लेहमध्ये दोन- तीन दिवस थांबण्याचाच विचार होता. पहिल्या योजनेप्रमाणे करगिल- लेह केल्यानंतर मनालीकडे जायचं होतं. पण अजूनही मनाली रोड बंद असल्यामुळे हा प्रवास पोस्टपोन करावा लागत आहे. दुसरा विचार आला की, त्सोमोरिरीकडे जाईन. तिथे रस्ता सुरू आहे. त्सोमोरिरीहून एक रस्ता त्सो कारमार्गे मनाली- लेह रोडलाही मिळतो. त्यामुळे त्सोमोरिरी गेलो तर मनालीचा पर्यायही खुला राहील. लदाख़ी भाषेमध्ये त्से म्हणजे गाव आणि त्सो म्हणजे सरोवर! पण इथे आल्यापासून खराब हवामानामुळे ह्या योजनेवरही प्रश्नचिह्न आहे.

स्थानिक लोक सांगत आहेत की, इथे म्हणजे लेहजवळ ३३०० मीटर उंचीवरच जर इतकी थंडी असेल तर त्सोमोरिरी रस्त्यावर अजून जास्त असणार. तो रस्ता सुमारे ४५०० मीटर उंचीवरून जातो. आणि लदाख़मध्ये ह्या वेळी इतके ढग असणे आणि थोडा पाऊस होणंसुद्धा विपरित हवामानाचं लक्षण आहे. आणि मेच्या शेवटी सुरू होणारा मनाली रस्ताही सुरू‌ व्हायला अजून वेळ असणं हेच दर्शवतं. त्यामुळे पुढे जाण्याच्या ऐवजी इथेच थांबेन. माझा कार्यक्रम वीस दिवसांचा आहे; त्यामुळे माझ्याजवळ अजूनही खूप दिवस आहेत. आणि तोपर्यंत लेहच्या आसपास सायकल चालवत राहीन. त्याचाही फायदा मिळेल. शरीराला ह्या वातावरणाची जास्त सवय होत जाईल.

मागच्या वेळी लदाख़मध्ये सोबत आलेला मित्र गिरीश आणि नीरज जाट ह्यांच्याशी बोलणं सुरू आहे. गिरीशने त्सोमोरिरी रस्त्याच्या उंचीचे तपशील सांगितले. नीरज जाट तर म्हणत आहेत की, अगदी सहज जाता येईल. पण जेव्हा त्सोमोरिरी रस्त्यावरील गावं- हिमिया आणि चुमाथांगचे हवामानाचे अंदाज बघितले तेव्हा कळालं की, तिथेसुद्धा पूर्ण ढग आहेत. शिवाय तिथलं दिवसाचं तपमानसुद्धा मायनसमध्ये आहे. दिवसा -४ आणि रात्री -१२! अर्थातच मी इतक्या विपरित हवामानासाठी तयारी केलेली नाही. मी जी कल्पना केली होती तो उन्हाळा होता. अर्थात् लदाख़मधल्या उन्हाळ्याचा अर्थ असा की, कमी उंचीवर दिवसा १५ से. आणि रात्री ५-७ से. आणि हेच हवामान अधिक उंच जागी‌ किंवा 'ला' ठिकाणी शून्याच्या जवळ जातं; पण शक्यतो शून्याच्या वरच राहातं. ह्या वेळी सगळं वेगळं दिसतं आहे. त्यामुळेच आज मला त्सोमोरिरीकडे जाता आलं नाही.

लदाख़मध्ये एकट्याने सायकलिंग करायचं ठरल्यानंतर एक गोष्ट अगदी पक्की होती. एकट्याने जाण्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. पण त्यातली सर्वांत कठिण बाब म्हणजे स्वत:च्या भावना, ताण आणि बदलत्या विचारांना सामोरे जाणं. बहुतांश लोक एकटे जाऊ इच्छित नाहीत, ह्यामागे एक कारण हेसुद्धा असतं की, स्वत:च्या तणावांना सामोरं जाणं कठिण असतं. सोबती किंवा ग्रूप असेल तर गोष्टी सोप्या होतात. प्रेशर रिलीज होत राहतं. पण एकटं असताना सर्व एकट्यानेच करावं लागतं आणि विचार व भावनांची स्थिती स्फोटासारखी होते. पहिल्या दिवशी सायकलिंग सुरू करण्याच्या आदल्या रात्री हीच स्थिती होती. करगिलमध्ये मनात तीव्र शंकाकुशंका होत्या. पण तरीही दुस-या दिवशी सुरुवात करू शकलो. तशीच स्फोटासारखी स्थिती इथेही अनुभवाला येते आहे. मनामध्ये अनेकानेक विचार व आशंका आहेत. पुढे जाऊ का थांबू, हवामान ठीक आहे का नाही आहे; पुढे आणखी उंचीवर जाता येईल ना. अशा वेळेस मन शांत ठेवणं; मनातील वादळ बघता येणं‌ आणि स्वत:ला त्यापासून वेगळं ठेवणं हे आव्हान आहे. त्यातही निर्णय घ्यायचे आहेत. येताना पत्थर साहिब गुरूद्वारामध्ये न थांबण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फटका बसला. ह्यावेळी अधिक काळजी घ्यायला हवी.

आजसुद्धा हवामान असंच आहे की, कुठे जायची इच्छा होत नाहीय. प्रोद्युतजींसोबत थांबलो. पण मन तरीही‌ अस्वस्थ आहे. मन स्वत:ला दोष देत आहे की, इतक्या दूर सायकलिंग करण्यासाठी आलो; इतका आराम ठीक नाही. खरं तर हा सायकलिंग प्रोग्राम सुट्ट्यांसारखा आहे. तरीही मन सवयीप्रमाणे तिथेही टारगेट शोधतं आहे; इथेही तीच अपेक्षा करतं आहे की, पुढे जायला पाहिजे; थांबायला नको. योजनेनुसार पुढे गेलं पाहिजे. मग सामान्य वर्क लाईफ आणि सुट्टीमध्ये फरक कुठे? असो.

दुपारी हवामान थोडं ठीक वाटलं तसं बाहेर पडलो. आज सिंधू दर्शन घाट बघायचा आहे. चोगलमसरपासून जवळच आहे. रस्त्यात अनेक गोंपाही आहेत. इथेच एका हॉटेलमध्ये स्थानिक थुप्का टेस्ट केला. इथलं जेवण शक्यतो मांसाहारी जास्त आहे. काही दिवसांनंतर सिंधू दर्शन महोत्सव सुरू होईल. त्याची तयारी सुरू आहे. मागच्या वर्षी इथे जवळच कालचक्र २०१४ उत्सवसुद्धा झाला होता. परत येताना एक गोंपा बघितला. आतमध्ये काही पूजापाठ सुरू होता. बाहेरचे लोकही आत जाऊन बघू शकतात. इथल्या लामाजींनी सांगितलं की, ह्या गोंपामध्ये पाली भाषा वापरली आहे. ते म्हणाले की, लदाख़ अशा थोड्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे भारतामध्ये बौद्ध संस्कृती‌ सुरक्षित राहिली. नाही तर बाकी देशाने बौद्धांना परकंच केलं होतं. खरोखर हा गोंपा वैशिष्ट्यपूर्ण आहे. उल्लेखनीय आहे की, इस्लामी आक्रमणामध्ये नष्ट झालेल्या कित्येक संस्कृत ग्रंथांच्या प्रती तिबेटी भाषेमध्ये तिबेटमध्ये सुरक्षित राहिले. चोगलमसरमध्ये आणखी एक मोठा गोंपासुद्धा आहे. पण तो बंद होता. तिथले लामाजी 'डाउन'मध्ये राहतात, असं कळालं. महाबोधी इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिटेशनसुद्धा बघितलं.

इथे हेल्थ सेंटरमध्ये अनेक जण येतात. चांगल्या गप्पा झाल्या. सगळे हिंदी चांगलं बोलतात. इथे हिवाळ्यात तपमान शून्यच्या वीस अंश खाली जातं. म्हणून अनेक जण 'डाऊन' मध्ये म्हणजे देशाच्या अन्य भागांमध्ये जातात. इथली उपजीविका मुख्यत: उन्हाळ्याच्या चार महिन्यांवर अवलंबून असते. जून ते ऑक्टोबर ह्या चार महिन्यांमध्ये लोक जास्त कमाई करतात आणि पुढे हिवाळ्याची व्यवस्था करून ठेवतात. हिवाळ्यातही काही कामं चालू असतात- जसं याकच्या केसांपासून पश्मिना शाल बनवणे; त्याचे कपडे बनवणे इत्यादी. लोकांनी सांगितलं की, हिवाळ्यात इथे राहायचं असेल तर नॉन व्हेज खाणं आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारची दारू घेणं अनिवार्य आहे. इथे लदाख़ी लोक अरक नावाची एक शुद्ध दारू बनवतात ज्यामुळे खूप उष्णता मिळते. ती दारू बनवण्याची पद्धत इथे सहसा कोणालाही सांगितली जात नाही. याकच्या मांसामुळेही उष्णता मिळते. 'डाऊन' मधून येऊनही मला लदाख़मध्ये दारू किंवा नॉन व्हेज न घेताना पाहून लोक चकित झाले. त्यामागचं कारण असं आहे की, 'डाऊन' हून येणारे बरेच लोक सर्व प्रकारची मौजमजा करायलाच लदाख़ला येतात. कोणत्या प्रकारची मौजमजा सांगायची गरज नाही. लदाख़मध्ये राजकीय दृष्टीने देशाच्या अन्य नागरिकांसोबत कोणताही वाद नाही; पण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेल्या पर्यटनामुळे थोडा तणाव नक्की तयार झाला आहे.

..आज फक्त दहा किलोमीटरच सायकल चालवली. पुढच्या प्रवासाबद्दल अनिश्चितता आहे. आत्ता काही ठरवणं अवघड आहे. लोक सांगत आहेत की, इथलं हवामान मुंबईच्या फॅशनसारखं आहे. कधीही बदलू शकतं. ठीकसुद्धा होऊ शकतं. पण एक गोष्ट पक्की की, मी इथे आरामात फिरायला आलो आहे. एका सीमेपलीकडे जाण्याची तयारी मी केलेली नाही. कोणत्याही परिस्थितीत किंवा टोकाचं आव्हान स्वीकारून जाण्याची माझी इच्छा नाहीय. मला काहीही सिद्ध करायचं नाहीय, तर फक्त एंजॉय करायचं आहे. जर माझ्या तयारीमध्ये पुढे जाणं शक्य असेल; तर जाईन. तसं नसेल तर कदाचित जाता येणार नाही. येतानाच हे माहिती होतं की, लदाख़मध्ये हवामान आणि रस्त्यांचं कधीही काहीही होऊ शकतं. कधीही एव्हलांच किंवा लँड स्लाईडमुळे रस्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे थोडक्यात जो मिल जाएगा, उसी को मुकद्दर समझना है और जो खो जाएगा उसे भुलाते जाना है! हे स्पष्टच होतं. बघूया पुढे काय होतं.


सिंधू घाट


लामाजी


मोठा पण बंद गोंपा


एका छोट्या नगराएवढी मोठी महाबोधी इंटरनॅशनल इन्स्टिट्युट


हिमालयासमान उंचीचे बुद्ध!


एका पुस्तकात तिबेटी आणि संस्कृत

लदाख़ी संस्कृतीची झलक-
लदाख़ी गाणे १
लदाख़ी गाणे २

पुढील भाग: सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ६- हेमिस गोंपा
मूळ हिंदीमधील ब्लॉग:
साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
साईकिल पर जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला

साईकिल पर जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...
साईकिल पर जुले लदाख़ भाग ४- लेह दर्शन

साईकिल पर जुले लदाख़ भाग ५- सिंधू दर्शन स्थल और गोंपा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Tumachya manatale vichaarahee, aapalya manatalech asaavet ase vaaTat raahate

लदाख़मध्ये एकट्याने सायकलिंग करायचं ठरल्यानंतर एक गोष्ट अगदी पक्की होती. एकट्याने जाण्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. पण त्यातली सर्वांत कठिण बाब म्हणजे स्वत:च्या भावना, ताण आणि बदलत्या विचारांना सामोरे जाणं. बहुतांश लोक एकटे जाऊ इच्छित नाहीत, ह्यामागे एक कारण हेसुद्धा असतं की, स्वत:च्या तणावांना सामोरं जाणं कठिण असतं. >>>>>>> डोळे मिटून शांत बसणं म्हणूनच अवघड वाटत असावं अनेकांना .... Happy

आपल्याच मनाकडे तिर्‍हाईतासारखे पहाण्याची विलक्षण कला तुम्हाला जमून गेलीये असे वाटते.

खूप सुर्रेख लेखमाला, पु भा प्र ....

आपल्याच मनाकडे तिर्‍हाईतासारखे पहाण्याची विलक्षण कला तुम्हाला जमून गेलीये असे वाटते. +१

शशांक पुरंदरे, अगदी सहमत. इतक्या कठिण सभोवतालात आत्मभान राखणे आणि 'स्व' ला ओळखणे सहज साधले आहे लेखकाला.
सुंदर चाललीय लेखमाला.

आपल्याच मनाकडे तिर्‍हाईतासारखे पहाण्याची विलक्षण कला तुम्हाला जमून गेलीये असे वाटते. +१

अप्रतिम लेखमालीका.
शशांक पुरंदरे ह्यांनी वर प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे "आपल्याच मनाकडे तिर्‍हाईतासारखे पहाण्याची विलक्षण कला तुम्हाला जमून गेलीय असे वाटते."....खरंय.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! इतक्या प्रतिक्रिया बघून लिहिण्याचा उत्साह वाढतोय.

@शशांक पुरंदरे जी; धन्यवाद! पण ही अतिशयोक्ती आहे हो! Happy

आपल्याच मनाकडे तिर्‍हाईतासारखे पहाण्याची विलक्षण कला तुम्हाला जमून गेलीये असे वाटते. +१

मार्गी, ही विलक्षण कला तुम्ही कुठे शिकला आहात?

मस्त...
"लदाख़मध्ये एकट्याने सायकलिंग करायचं ठरल्यानंतर एक गोष्ट अगदी पक्की होती. एकट्याने जाण्यामध्ये अनेक गोष्टी आहेत..." >>> हा संपूर्ण परिच्छेदच भारी लिहिलाय.