आशीर्वचन - वृक्षराजाचे !!

Submitted by पुरंदरे शशांक on 7 November, 2014 - 04:05

आशीर्वचन - वृक्षराजाचे !!

खाली दोन वेगवेगळ्या लेखकांचे लिखाण उद्धृत केले आहे.

१] अ हर्मिट इन द हिमालयाज - लेखक मि. पॉल ब्रंटन - / मराठी अनुवाद - हिमालय नि एक तपस्वी - अनुवादक - श्री. गणेश नी. पुरंदरे - पान क्र. २१६ -२१९
(पॉल ब्रंटन हे एक ब्रिटिश पत्रकार, लेखक. सुमारे १९३१च्या आसपास त्यांनी भारतभर भटकंती केली. यातच ते श्री. रमण महर्षींचे शिष्य झाले. 'अ सर्च इन सिक्रेट इंडिया' या पुस्तकात त्याचे सविस्तर वर्णन त्यांनी केलेले आहे. पुढे काही पारमार्थिक साधना करावी म्हणून ते हिमालयाच्या सान्निध्यात येऊन राहिले - त्याचे वर्णन 'अ हर्मिट इन द हिमालयाज' या पुस्तकात त्यांनी केलेले आहे. याच पुस्तकातील काही उतारे येथे खाली देत आहे. एका देवदार वृक्षाच्या सान्निध्यात ते काही ध्यान साधना करीत असत. काही काळ गेल्यावर जेव्हा ते ठिकाण सोडायची वेळ येते त्यावेळेस पॉल यांच्या मनात काय विचारतरंग उमटले ते या खालील उतार्‍यातून दिसून येते. )

माझ्या नित्याच्या जागेवर, त्या पर्णराजीवर मी ऐसपैस बसलो. त्या वृक्षाकडे नजर लावण्याचे मला धैर्य होईना. माझ्या गालावर रक्त उसळून आल्याचे मला वाटू लागले. मग मलासुद्धा वाईट वाटले. या वियोगाचे दु:ख मलासुद्धा होऊ लागले.
पण शेवटी मी धीर धरला. वरती वृक्षाकडे पाहून म्हणालो - " हे तरुवरा, मला क्षमा कर. तू जाणतोसच की, हे जीवन अशाश्वत आहे. ओळख, मैत्री यांना केव्हातरी विराम द्यावाच लागतो. या जगाच्या पाठीवर, या वाळवंटात उंटांच्या काफिल्याला मधेमधे रस्ता बदलावाच लागतो. रात्रीचा मुक्काम करावा लागतो. पण माझ्यासारख्याने या तुझ्या सहवासाच्या सुखद स्मृती जपून ठेवल्या पाहिजेत.
हे मित्रा, जीवित क्षणभंगुर आहे. आपल्याला आता एकमेकांचा निरोप घ्यायला पाहिजे. आपण जी मैत्री, जो प्रेमभाव संपादन करतो, ती गमावण्यासाठी करतो. पण आपल्या आत्म्यांची ताटातूट होत नाही. अनंत अवकाशात प्रेमरज्जूंनी त्यांचे पुन्हा मीलन होत असते."

हवेत एक चमत्कारिकशी वार्‍याची झुळूक येऊन गेली.

आणि मग एक फुलपाखरु येऊन माझ्या डोक्यावर थोडा वेळ बसले आणि नंतर त्या देवदार वृक्षाच्या फांदीवरुन दाढीसारख्या लोंबकळणार्‍या एका वेलीवर उतरले. ही फुलपाखरे मोठी सुंदर दिसतात व ती या भागात सर्वत्र आढळतात. त्या वेलीवर ते फुलपाखरु बसलेले पाहून मला मोठी गंमत वाटली. तारुण्य व सौंदर्य हे वार्धक्य व सुबकता यांवर विराजमान झाल्याचे दृश्य दिसले. हे हिमालयातील फुलपाखरु आमच्या युरोपातील फुलपाखरापेक्षा पुष्कळच मोठ्या आकाराचे असते. त्याच्या पंखांवरचा रंग किती गडद दिसतो. भडक रंगाचे वस्त्र ल्यालेल्या एखाद्या खानदानी सुंदर स्त्रीप्रमाणे हे पाखरु दिसते. हे फुलपाखरु वेलीला चिकटून बसते. त्या वेलीवरचा रंग अलगद उचलते व मग कोठेतरी एखादी जागा निवांतपणे बसण्याकरता पसंत करते. माझ्या या प्रयाणाच्या वेळी दुसरे कोणी हजर नाही म्हणून ते येथे हजर झाले की काय न कळे !

सभोवार शांततेचे व स्तब्धतेचे वातावरण दाट होऊ लागले; व जवळपासची वनश्री अधिक स्पष्ट दिसू लागली.

देवदार वृक्षाच्या फांद्या खाली लोंबकळत होत्या. त्यांच्या सुईच्या अग्रासारख्या दिसणार्‍या टोकावर दंवबिंदू जमा झाले होते. ते दंवबिंदू अश्रूंसारखे दिसत होते. ते दृश्य पाहून माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी जमा झाले.

"हे देवदार वृक्षा, तुला मला काही सांगायचे आहे काय ?"

ती गडद स्तब्धता, नि:शब्द शांतता फक्त आणखी एक मिनिटच टिकली. तिचा पुढे भंग झाला. पण शब्दांनी नव्हे, तर एका विचारलहरीने. तो तरंग वातावरणातून माझ्या मेंदूत शिरला.

"तू ज्या दुनियेतून माझ्याकडे आलास ते जग मला माहित नाही. त्या जगातले मला काही समजत नाही. तू आज ना उद्या परत जाणार हे मला माहित होते. तेव्हा तुला मी रोखून कसा धरणार ? एकटेच जीवन कसे जगावे हे मी शिकलो नाही काय ! मी हा असा येथे एकटा उभा आहे. या एकाकी जीवनात सर्व गोष्टी कशा सहन कराव्या हे मी शिकलो नाही काय ? हे सोसाट्याचे वारे व झाडांना उन्मळून टाकणारे विजांचे चमचमाट मी सहन करतोच की नाही ! मला ही सहनशक्ति, हे धैर्य कोठून आले ? हे धैर्य, हे सामर्थ्य माझ्या अंतरंगातून आले. तेथे ते प्रथम सुप्तावस्थेत होते. आता मला कोणाचीही आणि कशाचीही भीती नाही. मरणाचीसुद्धा नाही. तेही आता काही फार दूर नाही. मी स्वावलंबनावर जगायला शिकलो आहे. माझ्या तरुण मित्रा, हेच माझे तुला उत्तर. स्वावलंबी हो. तू कोठेही गेलास तरी मनाने विरक्त रहा. म्हणजे बाह्य जग तुला कमजोर करणार नाही. येथे जी तुला मनःशांती मिळाली आहे, तिची आठवण ठेव. ती तशीच तुझ्याबरोबर धावपळीच्या आयुष्यात एक अत्यंत मौल्यवान ठेवा म्हणून जवळ बाळग. हे धावपळीचे आयुष्य माझ्यापर्यंत पोहोचत नाही. हा ठेवा तुझ्याजवळ असला म्हणजे तुझ्यावर कितीही वादळे कोसळोत, तुला भिण्याचे कारण रहाणार नाही. ही गोष्ट सतत ध्यानात ठेव की, तुझ्या अस्तित्वाचे मूळ परमेश्वराकडे आहे. माझी स्वतःची मनःशांती मी तुला प्रदान करतो."

हे त्या देवदार वृक्षाचे अखेरचे शब्द. त्याच्याकडून माझ्याकडे येणार्‍या या संदेशवाहक वायुलहरी यायच्या थांबल्यावर नकळत माझ्यावर काही चमत्कारिक परिणाम होऊ लागला. बाह्य जगातील शांतता माझ्या अंतरंगात प्रवेश करु लागली. मला मोहनिद्रा लागू लागली आणि समाधीसारखी अवस्था येऊ लागली. मी अगदी निश्चल, जमिनीतून उगवणार्‍या झाडासारखा जमिनीस चिकटल्यासारखा झालो. माझे बोट हालेना की हातपाय हालेनात.

ध्यान लावण्याचा मी आपण होऊन प्रयत्न केला नाही, की सैरावैरा धावत असणारे विचार दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. तरी गुंगीचे औषध दिलेल्या एखाद्या रुग्णासारखा मी असहाय बनलो. फक्त इतकाच फरक की, माझ्या सभोवारच्या पदार्थांची मला चांगलीच जाण होती. माझे मन आत आत कसल्यातरी अत्यंत चुंबकशक्तीच्या आकर्षणाने जोरात खेचून ढकलून दिले जात आहे असे मला वाटू लागले.

हे वृक्षा, माझ्यावर तू ही काय आफत आणली आहेस!

निर्वातस्थानी दिवा जसा संथपणे जळतो, त्याप्रमाणे माझे विचार आता एके ठिकाणी येऊ लागले. खाली दरीत जशी शांतता होती तशी शांतता आता माझ्या मनात वावरु लागली.

डोळ्यांच्या पापण्या मला धड मिटता येईनात की उघडता येईनात. या अर्धवटशा समाधीस्थितीतून बाहेर पडायला मला प्रयत्नही करता येईनात. पण ही अर्धसमाधी अवस्था मला इतकी सुखदायक वाटली, की त्या अवस्थेतून बाहेत पडूच नये असे वाटू लागले.

हा अनुभव इतका उदात्त व आनंददायक, ती अवस्था इतकी इंद्रियव्यापार विसरुन टाकणारी की तिचे वर्णनच मला खरोखरी करता येत नाही. आपले वैयक्तिक अस्तित्व दिव्यत्वातच रोवलेले आहे हे मला नव्यावे कळून आले. या अवस्थेचे हुबेहूब वर्णन करावयाचे म्हणजे एखाद्या शास्त्रज्ञासारखे लिहिले पाहिजे आणि अगदी तपशिलात जाऊन विश्लेषण करावयास पाहिजे. पृथक्करण करण्याची शास्त्रीय पद्धत म्हणजे सुंदरतेच्या प्रदीप्त अग्नीची नुसती राख करीत बसणे. तरीपण या राखेचे सुद्धा या पार्थिव जगात, जेथे सूक्ष्म जगताचे सौंदर्य अत्यंत दुर्मिळ व दूरचे असते, तेथे स्वागत होईल.
अंतर्मुख दृष्टीने माझे सुख परिपूर्ण करुन टाकले आहे अशा अवस्थेत मी किती वेळ होतो हे माझे मलाच बरोबर नाहित नाही. कदाचित अर्धा तास सुद्धा झाला नसेल. शेवटी परमपुरुषाने माझ्या मनाचा व अंतरंगाचा घेतलेला ताबा सोडून दिला. फक्त माझ्यामधील अतिमानव चिरकाल वास करु शकेल. नाखुषीने का होईना, शेवटी मी उठलो.

मी त्या कड्याच्या कडेवरुन सरपटून गेलो व जपून देवदार वृक्षाच्या खोडापर्यंत दगडांवर व झाडाच्या मुळावर हात टेकीत खाली उतरलो. खोडाच्या सालीची एक लहानशी पट्टी मी काढली आणि परत फिरलो. ती पट्टी माझ्या हिमालयातील एकांतवासाचे जणू स्मृतिचिन्हच.

------------------------------------------------------------------------------------------------------------

२] चकवाचांदण एक वनोपनिषद - लेखक श्री. मारूती चितमपल्ली

श्री. मारूती चितमपल्लींची मोठी बहिण (रेणुका) अक्काचे लग्न झाल्यावर ती दस्तापूरला रहात असे. सोलापूर - हैदराबाद रस्त्यावर नळदुर्गाजवळ हे दस्तापूर नावाचे छोटेसे गाव आहे - सोलापूरहून छत्तीस मैलांवर. तिचे यजमान ग्यानबा उर्फ भावजी यांची मोठी दुकानदारी होती. सुरुवातीस ते सारे कुटुंबिय अतिशय सधन होते. पुढे त्यांच्या व्यापाराला उतरती कळा लागली व ते पार निर्धन झाले. चितमपल्लींच्या मामांनी भावजींना खूप धीर दिला व सोलापूरात काही व्यापारधंदा करण्याचा सल्ला दिला. पण भावजी त्याला तयार झाले नाहीत. त्यांची काही जमीन होती - त्यांनी ठरवले की आता शेतीत लक्ष घालायचे. उभ्या आयुष्यात भावजींनी कधी कुदळखोरे हाती घेतले नव्हते ते भावजी आता बारा बारा तास शेतात काम करु लागले. गावकरी म्हणायचे - "ग्यानबाचे दिवाळे निघाले, तो पागल होऊन शेत उकरत फिरतोय". पण भावजींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी शेतात आधी सीताफळं, रामफळांची झाडं लावली. मग पुढे नानाविध आंबे, चिंचा, जांभळी, बोरी, शेवगा, हदगा, कडुनिंब, उंबर, चंदन, आपटा, सौंदड, कारी अशी अनेक झाडे लावली.
यातील प्रत्येक झाडाविषयीचे गूढ ज्ञान भावजींना होते. उंबराच्या झाडाविषयी ते सांगत - "उंबर रातीच्या वेळेस हरेक झाडाची तपासणी करतो. कुणाठिकाणी इजा झाली ते पहातो. मग चंदन राजापुढे उभा रहातो. आणखीन इतरही झाडं जमतात. त्यांना जीव हाय. ज्याच्या त्याच्या गुणधर्माप्रमाणं रुपही हाय."
"सीताफळाचं रुप बाईसारखं. रामफळ पुरुषासारखं. चिंच-बाभळी बायांसारख्या. बोर बाईचा अवतार."

तर या अशा लोकविलक्षण भावजींनी मारुतीरावांना या झाडांसंदर्भात स्वतःचा एक अनुभव सांगितला तो खालीलप्रमाणे - पान क्र. ९३

"पहाट झाली होती. चंद्र मावळला होता. जिकडेतिकडे अंधार. आभाळात चांदण्या दिसत होत्या. उंबराचं झाड माझ्याकडे चालत येत होतं. त्यानं माझ्या मस्तकावर हात ठेवला अन् म्हटलं - 'मी असा इथं एकटा उभा आहे. त्या एकाकी जीवनात सर्व गोष्टी कशा सहन करायच्या हे मी शिकलो. आता मी सहनसिद्ध आहे. ऊन, सोसाट्याचा वारा, झाडांना बेचिराख करणारा विजेचा लखलखाट सारं मी सहन केलं. मला ही सहनसिद्धी व हे धैर्य कोठून आलं ? हे सारं माझ्या अंतरंगातून आलं. मला भीती माहित नाही. मरणाचीसुद्धा. तू आता स्वावलंबी झालास. पण मनानं विरक्त रहा, म्हणजे बाहेरचं जग तुला विचलित करणार नाही. इथं तुला जी मनःशांती मिळाली आहे, तिची आठवण ठेव. ती तशीच तुझ्याबरोबर राहील. आता माझी स्वतःची मनःशांती मी तुला वरदान देतो.'
"नकळत माझ्यावर काही चमत्कारिक परिणाम होऊ लागला. बाहेरची शांतता एखाद्या प्रकाशाच्या झोताप्रमाणं माझ्या मनात शिरत होती. मला मोहनिद्रा येऊ लागली. समाधीसारखी अवस्था होऊ लागली. जमिनीतून उगवणार्‍या झाडासारखा मी जागच्याजागी चिकटल्यासारखा झालो."

"त्या अवस्थेत मी किती वेळ होतो, ते मलाच बरोबर आठवत नाही. सूर्य उगवला होता. मला जाग आली. सूर्याची कोवळी किरणं झाडांच्या शेंड्यांशी खेळत होती. असा सुंदर सूर्योदय मी कधी देखला नव्हता. त्या झाडानं माझ्या मनाचा व अंतरंगाचा घेतलेला ताबा शेवटी सोडून दिला. मी उठलो आणि घरी परतलो."

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

या दोन्ही पुस्तकांचे लेखक पूर्णतः वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलेले आणि वेगवेगळ्या कालखंडातले. ग्यानबा म्हणजेच भावजी हे सोलापूर जवळच्या अगदी खेड्यातले तर पॉल एक ब्रिटिश लेखक. असे असताना या दोघांचा जो अनुभव तो इतका समान कसा काय हे एक मोठे कोडेच !!

या लेखकांना किंवा ज्या कोणाला असे अनुभव प्रत्यक्षात लाभले त्यांना मी तरी भाग्यवानच समजेन. कारण निसर्गात अनेक रहस्ये दडून बसलेली असताना या मंडळींनी निसर्गाशी केवळ मैत्रीपूर्ण, विनयशील संबंध जोडल्यामुळेच यातील काही काही रहस्ये निसर्गाने आपणहून त्यांच्याकडे तेवढ्याच प्रेमभावाने सुपूर्द केली असावीत असे माझे एक मत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शांकलीने (माझी पत्नी अंजली) हे विलक्षण साधर्म्य असलेले दोन्ही लिखाण मला दाखवले. यावर आमची दोघांची बरीच चर्चाही झाली. मा बो वरील अनेक निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी मंडळींबरोबर हे शेअर करावे हाच एकमेव हेतू.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख. दोन्ही अनुभवातील साधर्म्य खरोखरच आश्चर्यकारक.
पहिले पुस्तक वाचायला हवे. अनुवाद छान जमलाय.
चकवाचांदण आवडते आहेच.

सुरेख, एक चांगली ओळख झाली आज.
चकवाचांदण वाचलंय, पॉल ब्रंटनचं आता मिळवायला हवं.
धन्यवाद शशांक.

वा! मस्तच.

फक्त एक शंका की ग्यानबांनी कदाचित 'हिमालय नि एक तपस्वी' हा अनुवाद वाचला असण्याची शक्यता आहे आणि झाडांवर प्रेम असल्याने त्यांनाही ती अनुभुती मिळाली.

मायकेल क्रायटनच्या ट्रॅव्हल्स ची आठवण झाली. त्यातही त्याने एका कॅक्टस बरोबर काही दिवस घालवले होते आणि त्यावेळी आलेले अनुभव लिहिले होते.

ट्रॅव्हल्स हे एक खूप वेगळेच पुस्तक आहे. माझ्याकडे होते ते हरवले आता कुठेही मिळत नाहीये. अ‍ॅमेझॉनवर आहे पण ते चारशेचं पुस्तक अडीच हजाराला विकताहेत. Sad

अतिशय सुरेख झालाय लेख!! ज्यांना ही अनुभुती आलीये ते किती भाग्यवान आहेत..भारावून व्हायला झालं वाचताना..

मन अगदी प्रसन्न आणि शीतल होऊन गेले, शशांक जी.....ही किमया आहे लेखनाची जितकी तितकीच शब्दांचीसुद्धा. समानता कशी वा का आली ? हे प्रश्न दुय्यमच समजावेत. मुद्दा हा की झाडांच्या प्रेमात असलेले ते जीव, त्याना मिळालेली अनुभूती आणि त्याद्वारे त्यानी साधलेला त्या विश्वकर्म्याशी संवाद...."...माझी स्वतःची मनःशांती मी तुला प्रदान करतो..." देवदार असे म्हणतो त्यात किती आणि कोणती कमाई आहे हे त्यालाच बहुधा उमजू शकेल ज्याने या ना त्या कारणाने मन:शांती हरविलेली आहे.

दोघांची भाषा म्हणजे संपत्तीच आहे एक प्रकारे....जिवंतपणे रुजलेली.... असे काही तरी वाचायला मिळाले की मराठी भाषा आपल्याला येते याचा अभिमान वाटतो. निसर्गाचे उपकार मानताना त्यानी अगदी आतड्यच्या ओढीने सारे काही मांडले आहे हे जाणवते.....रानवाटाकडे पाऊले वळत असतात कदाचित अशाच अनुभवामुळे.

धन्यवाद शशांक जी.....एकप्रकारे ही खरी दिवाळीची भेट.

शशांक पुरंदरे, वा! हे काहीतरी चमत्कारीच वाटले वाचून झाल्यावर. अनायासे माझ्याकडे चांदण चकवा आहे ते परत बाहेर काढले. कदाचित असे असू शकेल की ज्या लेखकानी हा अनुवाद केला त्यांनी चांदण चकवा आधी वाचले असेल. त्यांची अनुवाद करण्याची भाषा इतकी छान आहे की नक्की हा लेखक खूप व्यासंगी असावा. भाषेत साधेपणा सच्चेपणा आहे. त्यामुळे अनुवाद उत्तम झाला आहे. मी हे पुस्तक नक्की विकत घेण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद!!!

चकवाचांदण वाचलंय, पॉल ब्रंटनचं आता इथे वाचले.दोघांचे अनुभव साधर्म्य विस्मयकारक आहे.
ज्यांना ही अनुभुती आलीये ते किती भाग्यवान आहेत... +१

या नवलाईच्या माहितीबद्दल धन्यवाद शशांक! Happy

यावर विचार करत असतांना जाणवलं की या अनुभूतींचे ग्राहक पॉल ब्रंटन आणि भावजी दोघांच्याही मनात ईश्वराबद्दल अपार भाव आहे. ईश्वरी चैतन्य सर्वत्र पसरलेले असते या सत्यावर त्यांची प्रगाढ श्रद्धा आहे. त्यामुळेच त्यांना हे अनुभव आले आहेत.

एक गोष्ट चटकन लक्षात येते ती म्हणजे देवदार आणि औदुंबर दोन्ही वृक्ष चैतन्यधारणेस अनुकूल मानले गेले आहेत (वटवृक्षही आहे, पण प्रस्तुत प्रसंगांत त्याचा उल्लेख नाही.). त्यामुळे या दोन्ही चैतन्याच्या अनुभूती आहेत.

आता प्रश्न असा आहे की दोघांचेही शब्दांकन एकसारखे कसे काय? मला जाणवलेलं स्पष्टीकरण सांगतो.

दोघांनाही दोन वृक्षांनी आपापले विचार सांगितलं असं दिसतं. प्रत्यक्षात वृक्षयोनीतील सामूहिक ज्ञान संक्रमित झालेलं असावं. वृक्ष वेगळे धरले तरी योनी एकच आहे. मनुष्याच्या बाबतीत एकाच योनीतील दोन जीव एकमेकांशी भाषेमार्गे संवाद करून विचारांचे आदानप्रदान करतात. वृक्षयोनीत हाच प्रकार थेट होत असावा.

तसेच वृक्ष व पाषाण हे एकमेकांसारखे मानल्याने वृक्षयोनी ही एक सजीव वस्तू धरली पाषाणयोनी हीदेखील सजीव धरता येईल. सर्व वृक्षांचे सामूहिक ज्ञान जसे अस्तित्वात आहे तसेच सर्व पाषाणांचे सामूहिक ज्ञानही अस्तित्वात असेल. पृथ्वी हा एक मोठा पाषाण मानल्यास तिलाही योनी आणि ज्ञान प्राप्त झाले आहे असा निष्कर्ष निघतो.

याच न्यायाने मनुष्ययोनी हीही सजीव बनते. ज्याला आपण मानवता किंवा माणुसकी म्हणतो ती एक अमूर्त संकल्पना नसून अगदी आपल्यास्रखी सजीव वस्तू आहे हे थरारक सत्य आहे, नाहीका?

आ.न.,
-गा.पै.

तुम्ही हा विचार का करत नाही की पहिला भाग हा अनुवादीत आहे. तो नक्की कसा लिहिला असे हे माहिती नाही. दुसरे असे की अनुवादक मराठी आहेत. त्यांनी चांदण चकवा वाचले असेल तर? चा. च. हे प्रसिद्ध पुस्तक आहे आणि परत निसर्गाशी निगडीत आहे. कदाचित अनुवादकानी तो भाग चा. च. मधून घेतला असेल. इथे मुळ पुस्तक मिळते का ते मी पहातो.

या मंडळींनी निसर्गाशी केवळ
मैत्रीपूर्ण, विनयशील संबंध जोडल्यामुळेच यातील
काही काही रहस्ये निसर्गाने आपणहून त्यांच्याकडे
तेवढ्याच प्रेमभावाने सुपूर्द केली असावीत असे माझे
एक मत. <<< अगदी . बहुधा असंच असावं .

वाचनानुभवाबद्दल धन्यवाद .

सर्वांचे मनापासून आभार .... Happy

अ हर्मिट इन द हिमालयाज - १९३३-३६ च्या आसपासचे - तर - अनुवाद - हिमालय नि एक तपस्वी - साधारण १९७०च्या आसपासचा असावा.

चकवाचांदण एक वनोपनिषद - हे जरी २००५ या साली प्रकाशित केले गेले असले तरी भावजी आणि मारुतीराव यांचे बोलणे नेमके कधी झाले हे कळायला काही मार्ग नाही.

या दोन अनुभवातील साम्य विलक्षण वाटल्याने इथे दिले इतकेच. Happy

हो ते कळले पण इतके साम्य असणे जरा नवल वाटते म्हणून मी थोडे रीचर्स करु पाहिले. जर अनुवाद ७० चा असेल तर मग नक्कीच ह्या विलक्षण सत्य आहे.

शशांकजी खर सांगायच तर खुपच आश्चर्य वाटत आहे. इतक साधर्म्य कस असू शकत?

शांकली कस ग अचूक शोधून काढलीस ही दोन्ही विधाने. खरच कौतुक आहे तुम्हा दोघा निसर्गप्रेमींच.

Pages