आधुनिक सीता - २२

Submitted by वेल on 20 November, 2013 - 12:22

भाग १७ - http://www.maayboli.com/node/45869
भाग १८ - http://www.maayboli.com/node/45994
भाग १९ - http://www.maayboli.com/node/46013
भाग २० - http://www.maayboli.com/node/46199
भाग २१ - http://www.maayboli.com/node/46297

*****************************************************

मला वाटले होते मी टॅब पाठवल्या पाठवल्या रफिक माझ्याशी बोलायला येईल. पण तो आलाच नाही. त्याला ओळखण्यात माझी काहीतरी चूक होत होती.

दुसर्‍या दिवशी मी योगासने करून नुकती उठत होते, माझे सकाळची आवरूनही झाले नव्हते तेव्हा. रफिकने बाहेरून दाराची कडी काढल्याचे मी ऐकले. मी मनाशी काहीतरी ठरवले. मनाला सांगितले सरीताच्या शरीराचा प्रियकर आता रफिक हाच आहे आहे. विचित्र वाटतय ना? मी अगदी स्वतःला हेच सांगितलं कारण माझ्या मनाचा कण आणि कण सागरने व्यापलेला होता. आता वेळ होती मन आणि शरीराला वेगळं करण्याची. रफिक आत आला आणि त्याने दार बंद करण्यापूर्वीच मी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याक्षणी न ठरवताच मला हुंदका फुटला.

"का रडते आहेस् आता, भीती वाटतेय का माझी? माझ्या बोलण्याची?"
"वाईट वाटतय की मी पूर्ण प्रयत्न करते आहे भूतकाळ विसरायचा आणि तू मात्र माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस."
"विश्वास असाच ठेवता येत नसतो, त्याकरता काहीतरी करावं लागतं."
त्याच्यापासून थोडं लांब जात त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला विचारलं "काय करू बोल ना?"
"माझ्यावर प्रेम कर.."
"तू आवडतोस रे मला, मला माहित नाही मी तुझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली आहे का नाही, पण प्रेम हे सहवासाने निर्माण होतं ना? सहवास वाढू दे, प्रेम निर्माण होईल रे."
"माझ्यात संयम नाही आहे.. अजिबात नाही, कधीच नव्हता. आणी मला जे हव असतं ते मला मिळालं नाही की मी माझा उरत नाही."
"तुला जे हवय ते मी देणारे रे तुला."
"मला जे हवं असतं ते आणी मला जेव्हा हवं असतं तेव्हा"
असं म्हटल्यावर मला काही सुचेना. मी त्याला हाताला धरून माझ्या बाजूला बसवलं. त्याच्या डोळ्यात एकटक बघत राहिले. काय होतं त्या डोळ्यात. त्या डोळ्यात होतं लहान मुलाचं सच्चेपण, लहान मुलाचा हट्ट, प्रेमाची भूक .. असं काय होतं त्याच्या आयुष्यात की त्याच्या डोळ्यात सच्चेपण आणि प्रेमाची भूक एकाच वेळी असावी.
माझ्या मनात गलबललं, काहीतरी कमतरता होती त्याच्या आयुष्यात ... माझ्या आयुष्यात आता ह्याचं असणं हेच सत्य होतं. मी डोळे बंद केले, मनाचे दरवाजे बंद केले आणि त्याचं चुंबन घ्यायला पुढे सरसावले. मी किती वेळ त्याचं चुंबन घेत होते मलाच माहित नाही. सागरने माझं पहिलं चुंबन घेतलं तेव्हा मी जितकी अ‍ॅग्रेसिव्ह नव्हते तेवढी अ‍ॅग्रेसिव्ह होऊन मी रफिकचं चुंबन घेतलं. त्या चुंबनात प्रेम होतं की नाही माहित नाही, वासना तर नक्कीच नव्हती पण त्याक्षणी रफिक समाधानी झाला पाहिजे एवढंच माझ्या डोक्यात होतं.

मी त्याच्यापासून लांब झाले तेव्हाही त्याचे डोळे मिटलेलेच होते. एक तर रफिक खूप चांगला अभिनेता होता किंवा खरंच कुठेतरी मी त्याच्या मनाला स्पर्श केला होता. काही क्षणांनी त्याने डोळे उघडले आणि तो काहीही न बोलता त्या खोलीतून निघून गेला, जाताना त्याने तो दरवाजाही बंद नव्हता केला. मी त्या खोलीतून बाहेर पडायला हवं का? कमीतकमी घर कसं आहे हे पाहायला तरी? पण मी तिथेच बसून राहिले, थोड्या वेळाने फातिमा त्या खोलीत आली, तिने माझ्याकडे पाहिलं आणि दरवाजा बंद करून घेतला. रफिकने बाहेर जाऊन सांगितलं की काय? काय चाललय माझ्या आयुष्यात? मी म्हणजे वापरून आणि वापरल्या नंतर वापरली म्हणून शो करण्याचे साधन आहे का?

थोड्या वेळाने रफिक परत आला. मी फक्त त्याच्याकडे एकटक पाहात होते. त्याच्या हातात काहीतरी होतं - त्याच्यापाठीमागे लपवलेलं . त्याने हात पुढे घेतला. त्याच्या हातात एक सुंदर नक्षीकाम केलेली डबी होती. त्याने ती माझ्या हातात दिली. मला खूणेनेच उघड म्हणून सांगितलं. मी ती डबी उघडली, त्यात खूप सुंदर असं संगमरवरी गुलाबाचं फूल होतं. ते इतकं सुबक सुंदर होतं की नकळत माझा चेहरा आनंदला. "खूप छान" मी म्हटलं.
"आहे ना खूप छान, मी सुनितासाठी घेतलं होतं, इथे परत येताना, पण त्यानंतर मी तिला भेटलोच नाही. सुनिताने माझ्यावर जिवापाड प्रेम केलं. मी खूप हट्टी खूप अ‍ॅग्रेसिव्ह होतो, अनेकदा तिचा अपमान केलाय, तिला शारिरिक दुखापत सुद्धा केलिये एकदा. पण तरीही तिच्या स्पर्शात मला जे प्रेम जाणवायचं ते मला आज तुझ्या स्पर्शात जाणवलं. ते खरं आहे की नाही ह्याचा मी विचार करत नाही. पण तू माझ्या जवळ असताना माझ्या मनात पहिला विचार आला तो ह्या गुलाबाचा म्हणून हे तुला माझ्याकडून"

मी ती डबी हातात घेतली आणि रफिकच्या जवळ गेले, त्याने त्याचा हात माझ्या खांद्यावरून टाकून मला जवळ घेतलं आणि एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला बागेत जवळ ओढून कसा बसेल तसा तो मला जवळ घेऊन बसला. मला त्याही परिस्थितीत हसू फुटलं,
"का हसते आहेस?" त्याने थोड्या रागातच विचारलं.
"मला ना कॉलेजात असल्यासारखं वाटतय. हे सगळं मी केलं नव्हतं ना कॉलेजात म्हणून छान वाटलं."
"छान वाटलं ना, मग त्याबदल्यात अजून एक .." त्याने माझ्याकडे पाहून ओठाचा चंबू केला. मला परत हसू फुटलं.
"अगदी माझ्यासारखा दिसतो आहेस, मी रुसते, लाडात येते ना तेव्हा अशीच दिसते."
"विषय बदलू नकोस."असं म्हणत त्याने पुन्हा एकदा मला स्वतःजवळ ओढून एक दीर्घ चुंबन घेतलं. पण त्यात कालच्या सारखा वखवखलेपणा नव्हता. तो स्वतःहून बाजूला झाल्यावर मी त्याला विचारलं, "आता मी माझं आवरून घेऊ का, माझा नाश्तासुद्धा व्हायचा आहे."
"तू आवरताना मी इथे थांबलो तर चालणार नाही का?"
"चहाटळपणा करू नकोस इतक्यात, मला आवरून घेऊदे, मग आपण एकत्र नाश्ता करू, अर्थात तुला वेळ असेल आणि चालणार असेल तर"
रफिक हसत हसत बाहेर गेला. मी आवरून घेतलं, जे चाललं आहे त्याबद्दल काही विचार करायचा नाही, जे होतय ते होऊ द्यायचं हे मी स्वतःला सांगत होते. स्वत:शी हेही मान्य केलं शरीरातून मनाला बाहेर काढणं तसं कठीण नाही.

माझं आवरून होईपर्यंत फातिमा नाश्ता घेऊन आली, चमचे, दोन डिशेस आणि बोल, एक जग आणि एक गोल बंद डबा होता तिच्यासोबत. मागोमाग रफिक आला. तो उत्साहाने उतू जात होता. रफिक आत आल्यावर त्याने विचारलं
"नाश्त्याला काय आहे माहित आहे का?"
"काय"
"ओळख"
तो एवढा उत्साहात विचारत होता, म्हणजे नक्की पुरणपोळी."पुरणपोळी?" मी विचारलं
"कररेक्ट" आणि तो तोंडभरून हसला.
"तू मला ज्या दिवशी प्रेमाचा प्रतिसाद देशील त्यादिवशी पुरणपोळीच खायची असे मी ठरवले होते. फ्रीजमध्ये ठेवली होती. खास पुण्याहून मागवली आहे. तुला आवडते ना? मला ना एक दिवस तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे, माहित नाही तो दिवस कधी येईल." रफिक उत्साहाने बडबड करत होता. आणि मी पुरणपोळी डिशमध्ये घेऊन, जगमधलं दूध बोलमध्ये ओतून घेऊन त्याच्यासमोर डीश धरली. त्याचा चेहरा पुन्हा आनंदाने उजळला.

क्रमशः

http://www.maayboli.com/node/46658

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटली कथा तुम्ही खरचं खूप छान लिहिता. वाचून फार छान वाटते. मला माहीत आहे लिहिणे फार कठीण आहे पण तरीही जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पुढील भाग पोस्ट करा.कारण आता माझी उत्सुकता वाढली आहे.खूप दिवसांनी काहीतरी खूप छान वाचायला मिळालं. मनपूर्वक धन्यवाद .

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म !!!

खासच !!
मुळात कन्या रास असल्याने, माझ्या मनात भलत्याच शंका.... Wink
हि सीता असल्याने आपल्या रामाला कधीच अंतर देणार नाही, आणि तिची चलाखी ह्या रावणा च्या लक्षात आल्यावर कसे बरे होणार..... Happy Happy हा हा हा

वल्लरी ताई, फार वेळ न घालवता पुढचा भाग येवु द्या !!!

आवडला असे म्हणता नाही येणार. पण खुप विचित्र हुरहुर वाटली.
माहीत नाही मी तिच्या जागी असते तर कदाचित हेच केले असते.

T.V. वरील सिरीयल सारखे भाग वाढवु नका. छान होते आहे. लवकर पुर्ण करा. >>

नक्की. .. काळजी नसावी. कथेचा साचा तयार आहे

खरच खुप छान चाललि आहे कथा.
T.V. वरील सिरीयल सारखे भाग वाढवु नका. छान होते आहे. लवकर पुर्ण करा.>>>>>>>>>>> + १११११११११११११११११११११११११

tv सिरियल सारखी वाढवु नका ................ लवकर संपवा
मला अगोदर आवडायची पण आता आवडत नाहीये..... सरिताने असे केलेले............. प्लिज हि कथा लवकर संपवा...........!!!
याने लव्ह जिहाद वाढु शकते तेव्हा प्लिज..........प्लिज!!!

सीतेला रावणाने दासी असुनसुध्दा व शक्य असतानासुध्दा स्पर्शपण केला नव्हता................. या नालायक रावणाची कथा प्लिज जास्त रंगवु नका....................
लवकर कथेला वळण देऊन कथेचा शेवट गोड करा वल्लरीताई...................
यापेक्षा चुक कोणाची या कथेचे भाग लवकर लवकर टाका.

विकास दादा पवार - लव्ह जिहाद म्हणजे काय हो? ,अला खरच कळलं नाही.

रामायणातला काळ वेगळा होता, हा वेगळा आहे. प्रसंगसुद्धा वेगळे आहेत. सीतेने असं केलेलं आवडावं की नाहे हा प्रत्येक रामाचा प्रश्न आहे. आपण कथा राम होऊन वाचायची का प्रेक्षक होऊन प्रत्येकाने ठरवायचे. खरतर मी लिहिताना मी प्रत्येक पात्राच्या डोक्यात शिरून लिहायचा प्रयत्न करते आहे, म्हणून माझ्यासाठी सगळे सारखे.. कोणीच नालायक किंवा कोणीच बिच्चारं नाही.

मुळात आपण रामायणाकडे पाहातो तो दृष्टिकोन सुद्धा थोडा वेगळा हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. रावणाने सीतेला पळवलं ते त्याच्या बहिणीचा अपमान झाल्यावर, त्यापूर्वी नाही. आपण म्हणतो रावणाने सीतेला लग्नासाठी पळवलं. खर खोट रावणाला माहित. रावण हा शंकराचा निस्सिम भक्त होता आणि शंकराला लंकेत नेण्याच्या वेळी देवांनी त्याला फसवलं तरी त्याने शिवभक्ती सोडली नव्हती. सोन्याच्या विटा लंकेत होत्या, अयोध्येत नाही. लंकेतले रहिवासी सुखी आणि एकमेकाला जीव देणारे होते, अयोध्येतल्या धोब्यासारखे नव्हते. मी सीता-राम- रावण हे फक्त शब्द वापरते आहे ते रूढ आहेत म्हणून, ह्या कथेसाठी, माझी स्वतःची मतं वेगळी असून सुद्धा.
ह्याशिवाय ह्या कथेत सरिताच्या आजीने व्यक्त केलेली मतं खूप महत्वाची आहेत. - जे होतं त्यामागे काही खास कारण असतं, कोणताही माणूस मुळात वाईट नसतो, तुका म्हने उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. .... अर्थात हा सगळा वेगळा विषय आहे, तो वेगळ्या फोरमवर चर्चिला जायला हवा.

आणि गोड शेवट तर कोणाच्या दृष्टीने? प्रत्येक दृष्टी ही वेळ आणि ठिकाणसापेक्ष असते .. - लॉ ऑफ रिलेटिव्हिटि.

प्रितीभुषण - अध्यात्माच्या दृष्टीने मन आणि शरीर वेगळे आहेत. मन आणि बुद्धी हे आत्म्याचा भाग आहेत आणि शरीर हा आत्म्याचा कपडा. आता विचार करून पाहा. मनाला माहित आहे चहा प्यायचा नाहीये शरिराला अ‍ॅसिडिटि होईल, मनाला माहित आहे गरम चहाने जीभेला घशाला भाजेल पण तरीही तल्लफ भागवायला शरीर चहा पितं. मनावर वरताण करून. तसच ड्रग्जचं तसंच शरीरविक्रय करणार्‍या स्त्रियांचं...

याने लव्ह जिहाद वाढु शकते तेव्हा>> अगदी [पब्लीक धाग्या वर आहे ही कथा

आता माझी शंका.... मन अन शरीर कधे वेगळे होते [
म्हण जे मन विचार कर तंय की मला चहा पिता कामा नये अन हातात चहाचा कप अन तोंडात घोट
काहितरी कन्फुशन होतयं...........

विकास दादा , क्रुपया रामायणातल्या सीते ची तुलना या सीते शी करु नका, एका कथेच्या अनुशंगाने विचार करा तुम्हाला नक्किच आवडेल मग हि कथा.
वल्लरि पुढचे भाग लवकर येउ देत.

वल्लरी ताई.....

रामायणातला काळ वेगळा होता, हा वेगळा आहे........................आणि गोड शेवट तर कोणाच्या दृष्टीने? प्रत्येक दृष्टी ही वेळ आणि ठिकाणसापेक्ष असते .. - लॉ ऑफ रिलेटिव्हिटि. !!!!
एक नंबर.....:)

तुमच्या ह्या कथेवर शिणेमा निघु शकतो एखादा......:) सिरीअल तर नक्कीच..... Happy विचार करायचा का ? मी येतो हवे तर मदतीला.....

प्रसन्न - लिहून पूर्ण होऊ दे मग काढू चल. सिनेमा नको सिरियलच बरी, थोडक्या एपिसोड्सची. पूर्वी कसे १३ -२५ - ५२ इतकेच असायचे एपिसोड तशी.

देतय का कोण मला सिरियल स्क्रिप्ट रायटरचा जॉब

चालेल.....
मी सर्वतोपरी मदत करायला तयार आहे.....
टेक्निकल बाजु सांभाळु शकतो मी....आणि एखादा रोल पण करु शकतो नक्किच. हा हा हा

वल्लरी, मोठे भाग लिहि ना थोडे. इन्टरेस्ट वाढता वाढता लगेच एपिसोड संपतोय. क्लिफ हँगर व्यवस्थित विचार करून टाक. डोक्यात भुंगा फिरत राहिला पाहिजे वाचकांच्या. Happy

आतापर्यंतच्या एपिसोडमधे इथे सरिताचं वागणं पटलं. तरी रफीकचं वागणं पटत नाहीये

वल्लरी ताई,

cliffhanger
ˈklɪfhaŋə/

noun: cliffhanger; plural noun: cliffhangers; noun: cliff-hanger; plural noun: cliff-hangers
1.
a dramatic and exciting ending to an episode of a serial, leaving the audience in suspense and anxious not to miss the next episode.
"it will take more than outrageous cliffhangers to win the ratings wars"
a story or event with a strong element of suspense.
"the match was a cliffhanger right up to the final whistle"

क्लिफ हँगर ची गूगलून मिळालेली व्याख्या -

वल्लरीताई, तुम्ही माबो वर लिहिता म्हणजे नक्कीच वर्तमानपत्र तरी वाचत असालच ............... आजुबाजुला जे घडते ते तर नक्कीच माहित असेल लव्ह जिहाद च्या नावाखाली होत असलेले....................
काही मुस्लीम मुले हिंदु मुलीना फसवुन लग्न करतात व बाटवुन सोडुन देतात.............. यामुळे या मुलीचे घरचे तर अगोदरच तुटलेले असतात मग या जाणार कोठे................ हे आपल्या आयाबहिणीच्या बाबतीत चांगले आहे का?

मानशीताई, ही कथा फारच छान आहे...... मला तुलना पण करायची नाहीये........ पण मी स्वत: माझ्या शेजारी असे पाहिले आहे.... लव्ह जिहाद च्या नावाखाली मुलीचें आयुष्य नासवलेले.............

मला हे असे होते माहित आहे, त्याला लव जिहाद म्हणतात हे माहित नव्हते. कोणासोबतच असे होऊ नये. ह्या कथेचा मुद्दा जिहाद हा नाहीये, तसा तो वाटू शकतो, पण मी काळजी घेईन तसे वाटू न देण्याची, माझ्या परीने तरी.

माझी कथा पूर्ण होत आली किंवा पूर्ण झाली की मी माझ्या डोक्यातले मुद्दे जास्त व्यवस्थित मांडू शकेन. .

वल्लरीताई आभारी आहे................. तसा वाटतो म्हणुनच... अन मुली याचं अनुसरन करु शकतात......... बाकी कथा खुप छान आहे........ फक्त असे कोणाच्याही बाबतीत झालेलं खुप भयंकर आहेत म्हणुन..........!!!

Pages