दलिया चा ढोकळा.

Submitted by सुलेखा on 4 January, 2013 - 04:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आपण दलिया किंवा सांजा तिखट किंवा गोड करतो आणि तो गरम च खायला आवडतो..दलियाची दुधातली घट्टसर खीर ही छान लागते..माळव्यात दलियाचा ढोकळा करतात. हा ढोकळा थंड ही छान लागतो.त्यामुळे डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.हा ढोकळा खुटखुटीत अन रवाळ होतो.
त्यासाठीचे साहित्य ---
दलिया-
daliyaa.JPG
१ वाटी गव्हाचा दलिया.
[मी बारीक दलिया वापरला आहे.दलिया आणल्यावर मावे /कढईत भाजुन ठेवला तर टिकतो--त्यात पोरकिडे -अळ्या होत नाही. तर असा भाजलेला दलिया घेतला आहे.]
१ वाटी आंबट ताक किंवा अर्धी वाटी दही.त्यानुसार लागेल तसे थोडेसे पाणी.
अर्धे गाजर किसणीवर किसलेले किंवा अगदी बारीक बारीक तुकडे करुन घ्या.
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली व १ टी स्पून आले किसलेले.[तिखट /चवीप्रमाणे आवडेल तसे घ्यावे]
४-५ कढीपत्त्याची पाने.
१ टेबलस्पून भाजलेले तीळ.
१ टी स्पून ओवा.
१ टेबलस्पून मटर/तत्सम काहीही
१ लहान कांदा चिरलेला. साधारण २ टेबलस्पून .
१ टेबलस्पून कसूरी मेथी/ताजी मेथीची पाने घेतली तरी चालेल.
१ टी स्पून उडद डाळ.
१/२ टी स्पून हिंग
हळद.
मीठ .
लाल तिखट.
१ टी स्पून शीग भरुन किंवा एक सपाट चमचा इनो .
फोडणी साठी २ टेबलस्पून तेल.
१ टी स्पून -मोहोरी-जिरे .

क्रमवार पाककृती: 

दलिया दही किंवा आंबट ताकात किमान ३० मिनिटे भिजवुन ठेवावा.भिजल्यावर दलिया घट्ट झालेला दिसेल.त्यात आले-हिरवी मिरची,ओवा,गाजर,मटर,चिरलेला कांदा ,चवीप्रमाणे तिखट व मीठ घाला.
लागेल तसे थोडेसे पाणी घाला.मिश्रण सरभरीत असायला हवे.
आता त्यावर कसूरी मेथी तळहातांवर कुसकरुन पसरा.
तेलाची फोडणी करुन त्यात मोहोरी-जिरे-हिंग-उडदाची डाळ-अर्धे तीळ-कढीपत्याची पाने हाताने बारीक तोडुन घाला.त्यावर हळद घाला..आता ही फोडणी मेथी पसरवलेल्या मिश्रणावर घाला.कालवुन घ्या.
आता गॅसवर प्रेशर पॅन मधे थोडे पाणी व रिंग घालुन गरम करायला ठेवा .एक काठ असलेल्या थाळीला तेलाचा हात फिरवुन घ्या.
तयार मिश्रणात इनो घालुन पुन्हा एकदा मिश्रण छान ढवळुन घ्या.
हे मिश्रण थाळीत ओता.त्यावर उरलेले अर्धे तीळ पसरवा..
प्रेशर पॅन मधे १० मिनिटे वाफवुन घ्या.
थाळे बाहेर काढुन थंड झाल्यावर ढोकळा कापा..
Daliya Dhokala 4 Jan 2013.JPG

अधिक टिपा: 

या ढोकळ्यात कच्च्या कांद्याची चव खूप छान येते.
मिश्रणात फरस बी ,पालक,ओले खोबरे,इतर कोणतेही दाणे ,कोथिंबीर घालता येईल.
वाफवलेल्या ढोकळ्यावर आवडत असेल तर पुन्हा एकदा तेलाची फोडणी तयार करुन घालावी.
हिरवा पातीचा लसुण व पातीचा कांदा वापरता येईल.

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे अरे..... एकेक पदार्थ करून बघायला आम्हाला जरा वेळ द्या Happy

मस्त दिसतोय ढोकळा! दलियाचाही फोटो टाका सहज शक्य असेल तर...

मंजुडी माझ्याकडे असलेल्या दलियाचा फोटो टाकते.
दिनेशदा.प्रेशर पॅन ला प्रेशर [शीटी]लावायची नाही.
तसेच इथे माझ्याच्याने अनवधानाने हळद थोडी जास्त [दोन दा -एकदा मिश्रणात व फोडणीत असे दोन वेळा] त्यामुळे रंग जास्त आला आहे.

कविन, खमण इतकी जाळी ही नसते व इतका हलका नसतो कारण दलिया वजनाला जड असतो ना.
पण इनो व आंबट दही/ताक मुळे हलका होतो..गिच्च नाही होत. खाताना रवाळ पण मऊ लागतो.त्यामुळे लहान -वयस्कर दोघांसाठी उत्तमं .नेहमीचा दलिया-सांजा पेक्षा सरस ..
जर फाडे किंवा जाड सांजा असेल तर दही/ताकात कमीत कमी ३ ते ४ तास तरी भिजवुन ठेवावे.

ऐ सुलेखा... Uhoh काय ग्गं ..भेटली नाहीस ना भारतवारीत.. नाहीतर काय काय करून घालण्याकरता तुझ्याकडे हट्ट धरायचा हा प्रश्नच पडला असता ... सुगरण हैस तू भारी..