तूरीच्या ओल्या दाण्यांची कचोरी चाट..

Submitted by सुलेखा on 2 January, 2013 - 03:27
turichi kachori chat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तूरीच्या शेंगेचे ओले दाणे.
आले व हिरवी मिरची -लसूण जाडसर वाटलेले २ टेबलस्पून [हे प्रमाण आपल्या चवीप्रमाणे घ्यावे]
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली.
बडीशोप-२ टीस्पून.
ओवा-१ टी स्पून.
गरम मसाला-१ टेबलस्पुन.
१ टेबलस्पून तीळ,
तिखट,मीठ-धनेपुड-प्रत्येकी १ टी स्पून.
अर्ध्या लिंबाचा रस.
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर.
अर्धी/पाव वाटी ओले खवलेले /सुके किसलेले खोबरे.
२ टेबलस्पून काजु चे तुकडे.
फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल,मोहोरी-जिरे-हिंग-हळद.
कचोरी तळण्यासाठी तेल..
कचोरी साठी -
२ वाट्या कणिक.
चवीपुरते मीठ,
१ चमचा मोहनसाठी तेल.
सजावट-
हिरवी चटणी--कोथिंबीर्,हिरवी मिरची,लसुण.मीट ,शेंगदाणे
चिंचेची चटणी-चिंच,गुळ व साखर,किसलेले आले,काळे मीठ,साधे मीठ ,जिरेपुड
शेव.

क्रमवार पाककृती: 

काही वर्षांपुर्वी माझ्या लहानपणी बर्‍याच भाज्या,फळभाज्या ,फळे हंगामी स्वरुपात च मिळायची.त्यामुळॅ त्यांचे महत्व भरपूर असायचे..त्या वस्तू आवर्जुन विविध रुपात वापरल्या जायच्या..त्यातल्या त्यात थंडी-पावसाळा रेलचेल असायची.तेव्हा हिरवे मटर्,हरभरे,ओल्या भुईमुगाच्या शेंगा,तूरीचे ओले दाणे,वाल्-घेवडा-सुरती पापडीचे दाणे-हिरवा लसूण ,हिरवी कांदे पात्,हिरवे कच्चे टोमॅटो ,करवंदे अशा कितीतरी वस्तु..आई त्यापासुन गरम सामोसे,मोठ्या करंज्या करायची..संध्याकाळच्या जेवणाचा हा च मेनू असायचा.दगडी कोळशाच्या शेगडीवर ,लोखंडी कढईत मस्त खरपूस तळलेले पदार्थ आम्ही सगळे फस्त करत होतो..त्याबरोबर हिरवी चटणी,लिंबाचे वा कैरीचे लोणचे असायचे.ती तृप्तीची चव अजुनही रेंगाळते आहे.मी ते सर्व पदार्थ करते पण "अगदी तश्शी "आई ची चव काही येत नाही.
हिरव्या तूरीच्या दाण्याच्या कचोर्‍या थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या आहेत.
dam -alu..tur-kachori 30 th Dc 2012. 008.JPG

मावे बाऊल मधे तूरीचे दाणे व त्यात अर्धी वाटी पाणी घालुन झाकुन मावेत २ मिनिटे फुल पॉवर वर शिजवुन घ्यावे.
हे दाणे त्यातील उरलेल्या पाण्यासकट मिक्सर मधुन एकदा भरडुन घ्यावे.
आले,लसुण्,हिरवी मिरची वाटुन घ्यावी.
पॅन मधे तेलाची फोडणी करुन त्यात हिंग-मोहोरी-जिरे घालावे.
बडीशोप,ओवा,तीळ,वाटलेला मसाला,हळद घालावे. त्यावर तूरीच्या डाळीचे भरडलेले मिश्रण घालुन तिखट-मीठ-गरम मसाला-लिंबू रस -कोथिंबीर व खोबरे घालुन मिश्रण छान ढवळुन घ्यावे.पॅन वर झाकण ठेवुन एक वाफ आली कि मिश्रण थंड करण्यासाठी ठेवावे.त्याआधी त्यात काजुतुकडे घालावे.
आता कणिक मीठ व तेल घालुन घट्ट भिजवुन ,मळुन घ्यावी.
या गोळ्याच्या लहान ल्हान पुर्‍या लाटाव्या..पुरीत एक एक चमचा सारण भरुन ,कचोरीचा आकार द्यावा.
कढईत तेल गरम करावे .गॅस कमी करुन या तेलात कचोर्‍या मंद आचेवर दोन्हीकडुन तळाव्यात..कणकेची पारी असल्याने लगेच तळली जाते.
अशा रीतीने सगळ्या कचोर्‍या तळुन घ्याव्या.
प्लेट मधे कचोरी त्यावर हिरवी चटणी,चिंचेची आंबट-गोड चटणी [सौंठ की चटनी],थोडी शेव घालुन खायला द्यावी,
dam -alu..tur-kachori 30 th Dc 2012. 007_0.JPG

अधिक टिपा: 

इथे कचोरीच्या पारीसाठी मैद्या ऐवजी कणिक वापरली आहे.मकापिठ ही घेता येते.आधणाच्यागरम पाण्यात मक्याचे पिठ भिजवायचे हातावर लहान पातळ पारी करुन त्यात सारण भरायचे.जास्त छान चवीच्या लागतात.

माहितीचा स्रोत: 
आई..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!! ह्याला लीलवा कचोरी म्हणतात ना?
फक्त कणकेची पारी केल्यावर चांगली खुसखुशीत होते का? आत्ता मोसमात नक्कीच करून बघेन. Happy

निंबुडा,यावर काय बोलु मी !! सगळे जुने ,पारंपारिक च पदार्थ आहेत हे..जुन्याला थोडे नटवुन आपल्या पद्धतीने [लो कॅलरी/करायला सोप्पे असे ] नवे करायचे कि झाले..
मंजुडी,होय..ही च ती लीलवा कचोरी..कणकेची पारी खुसखुशीत होते पण मैद्यासारखी खुटखुटीत नाही.

ओके! म्हणजे केल्या की लगेच संपवायच्या नं? टिकणार नाहीत.
मटार पॅटिससारखं तुरी पॅटिसही करता येईल हेच सारण वापरून Wink

मंजुडी,फ्रीज बाहेर टिकणार नाहीत.ताज्या केलेल्या लगेच संपवायच्या.तूरी- पॅटीस करता येतील. हे सारण व थोडासा उकडलेला बटाटा ,ब्रेड-रोल,ब्रेड सँडविच्,स्टफ पराठा मधे ही भरता येते.

आई ग्गं.. वाचतानाच इत्कं तोंपासु होतंय नं कि काय सांगू.. आय मीन काय टायपू.. स्लर्प...
माझ्या आवडत्या दहात..
वेळ मिळाला कि आधी करून पाहीन ...

तळलेले पदार्थ छानच लागतात. त्यात ह्या कचोर्‍या... खूपच आवडतात. करण्यापेक्षा आयतीच बरी..
(इतके तेल घेवून तळत बसण्यापेक्षा काका हलवाईची आठवण झाली).

अशीच तुरीच्या हिरव्या दाण्यांची कचोरी गुजरात मध्ये करतात त्याला लीलवानी(हिरवी) कचोरी म्हणतात. यापेक्षा आकार वेगळा असतो पण कृतीवरून चव अशीच असेल असे वाटतेय . मस्तच आहे हा प्रकार आता मी पण तुमच्या पध्दतीने करणार Happy