मोहनथाळ..

Submitted by सुलेखा on 12 November, 2012 - 12:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

मोहनथाळ हे गुजराती नांव आहे.इतर हिंदी-भाषी प्रदेशात बेसनचक्की किंवा बेसनबर्फी असेही म्हणतात.सामान्यतः बेसन,तूप,मावा/खवा/दुध-पावडर/कडेन्स्ड मिल्क/क्रीम,साखर ,वेलची पुड. काजु-चारोळी वापरुन मोहनथाळ करतात.मी मावा न वापरता वेगळ्या पद्धतीने करते..वडी मावा घातल्यासारखीच मऊ आणि चविष्ट होते.
१/२ किलो रवेदार बेसन.
पाव टीस्पुन मीठ .
१ १/२ वाटी तूप.
४०० ग्रॅम साखर.
[मी बेसन एका पातेलीने मोजुन घेतले.बेसनाच्या पाऊण भाग पेक्षा थोडीशी कमी इतकी साखर घेतली.बरोबरीचीही घेता येते.पण मला तयार वडी"मिट्ट गोड"नको होती.]
१/२ वाटी गरम दूध.
साधारण अर्धा लिटर दुधावरची साय.
१ टीस्पून वेलची पुड.
चारोळी व काजु तुकडे .

क्रमवार पाककृती: 

रवेदार बेसनात मीठ व पाऊण वाटी तूप कडकडीत गरम करुन टाकावे.. चमच्याने छान एकत्र करावे.हाताने मुटका वळेल असे हे मिश्रण तयार होईल.
Mohanthal.. 001.JPG
लागेल तसे दूध घालुन बेसन पिठाचा फार गिच्च नाही पण कोरडा असा गोळा तयार करावा.
[अर्धी वाटीपेक्षा कमी दूध लागते.]
या गोळ्याचे लहान-लहान चपटे मुटके तयार करावे.ते साधारण असे दिसतात.
Mohanthal.. 003.JPG
आता कढईत उरलेले तूप गरम करायला ठेवावे.
तूप तापले कि हे मुटके मंद गॅसवर सोनेरी रंगावर तळुन घ्यावे.
Mohanthal.. 005.JPG
[२ ते ३ चमचे तूप तळणीत उरते ते मुटक्यांवर टाकावे.]
मुटके थंड झाले कि मिक्सरमधुन फिरवुन बारीक करुन घ्यावे.
कढईत साखर व एक वाटी पाणी एकत्र ढवळुन पाक करायला ठेवावा.
झार्‍याने साखर सतत ढवळावी.साखरेचा २ तारी पेक्षा जास्त [२ तारी पाक झाला कि एक कढ/उकळी द्यावी.] पाक तयार करावा.गॅस बंद करुन पाकात वेलची पुड,व अर्ध्या चारोळ्या-काजु टाकावे.आता त्यात मिक्सरमधुन बारीक केलेले मिश्रण घालावे.
चमच्याने छान ढवळुन घ्यावे.मिश्रण घट्ट्सर तयार होते..आता एका तूप लावलेल्या ट्रे/ताटात हे मिश्रण पसरावे.उरलेल्या चारोळ्या व काजु वरुन पेरावे.
पसरलेले मिश्रण थोडे थंड झाले कि सुरीने वड्याचे काप लावुन घ्यावे..अगदी थंड झाल्यावर वड्या सोडवुन घ्याव्या..मावा न घालताही मावासदृश चवीच्या ,छान मऊ वड्या [मोहनथाळ,बेसनचक्की ]तयार होतात.
mohanathal 8.JPG
मोहनथाळ तयार आहे.

अधिक टिपा: 

१] रवेदार बेसन नसेल तर १ भाग बारीक रवा आणि ३ भाग बेसन घेता येईल.
२] पाक नसेल करायचा तर पिठी साखर किंवा उसगावात मिळणारी साखर मिक्सरमधुन काढलेल्या मिश्रण पुन्हा कढईत परतायचे .मिश्रण गरम झाले कि त्यात साखर घालुन ढवळायचे.[मिश्रण खूप कोरडे वाटले तर ,एक लहान चमचा दूध घाला] वेलची.पूड ,काजू,चारोळी टाका साखर विरघळुन तयार झालेला गोळा तूप लावलेल्या ट्रे मधे पसरायचा .
३]जर ताटातले मिश्रण कोंबट झाल्यावर वडी जमणार नाही असे वाटले तर--
पाऊण वाटी बेसन तूपात परतुन घ्यावे.अर्धी वाटी साखरेचा गोळीबंद/घट्ट पाक तयार करावा त्यात हे आत्ता भाजलेले बेसन व आधीचे बेसन घालुन मिश्रण छान ढवळावे.सर्व मिश्रण एकसारखे ,घट्टसर गोळा
होईपर्यंत परतावे.गॅस मध्यम असु द्यावा.तूप लावलेल्या ताटात पसरुन वड्या कापाव्या.

माहितीचा स्रोत: 
"मारु रंग रंगीलु गुजरात."
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही असेच लाडु बनवतो घरी..मुट्के करण्यापेक्षा आई छोट्या शेंगा आकार देवुन तळते म्हणुन शेंगोळ्याचे लाडु Happy
वेळ्खाऊ आहे पण एकदम स्वादिष्ट ..!!

लाजो,तळणं नको असेल तर भाजणं आलंच.तूपात बेसन परतणं हवेच...तू हे मुटके ओव्हन मधे बेक करु शकतेस .त्यानंतर गरम तूप घालुन वळायचे