बाटी लाडू..

Submitted by सुलेखा on 3 October, 2012 - 13:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खरे तर हे लाडू थोडेसे वेगळ्या पद्धतीचे आहेत.वेळ खाऊ ही आहेत.पण चव मात्र अप्रतिम येते.त्यामुळे करण्याचा मोह होतो.एकदा तंत्र छान जमले तर सहज सोपे वाटतात. गणेशोत्सवानंतर आज पहिली संकष्टी चतुर्थी.त्यामुळे नैवेद्यासाठी बाटी लाडू केले आहेत.
bati ladoo..-1.JPG
त्यासाठी लागणारे साहित्य :
२ वाट्या गव्हाचे पिठ...
[हे प्रमाण १ वाटी पिठ + १ वाटी रवा घेतले तरी चालेल.]
१/४ वाटी तेल मोहनासाठी..
१/२ टी स्पून हळद..
१/४ टी स्पून मीठ..
३/४ वाटी साजुक तूप..
१ टी स्पून वेलची पूड..
पाणी लागेल तसे..
३/४ वाटी दूध..

क्रमवार पाककृती: 

गव्हाच्या पिठात मीठ,हळद व गरम तेलाचे मोहन घाला.मिश्रण छान कालवुन घ्या.
लागेल तसे पाणी घालुन पिठाचा गोळा करुन घ्या..साधारण पराठ्यासाठी पिठ मळतो तसा..
पिठाच्या गोळ्याला वरुन तेलाचा हात लावुन छान मळुन घ्या.[फु.प्रो. मधे भिजवले तरी चालेल.]
आता एकसारख्या आकाराचे गोळे करुन त्याच्या पेढ्यासारख्या तळहाताएवढ्या आकाराच्या बाट्या करुन घ्या..
मावे.मधे केक बेक करण्यासाठीचा चा स्टॅन्ड ठेवा .
मावे. ६०० पॉवर वर कन्वेक्शन मोडवर प्री-हीट करा.
आता मावेतल्या स्टॅन्ड वर बाट्या भाजायला ठेवा..त्यासाठी टाइम २५ मिनिटे द्या..
दर ५ मिनिटांनी मावे .ऑफ करुन त्यातील बाट्यांची बाजु उलटवा ..म्हणजे बाटीचा तळ भाग वर येईल अशा रितीने ठेवा.त्याकरिता चिमटा/लहान उलथने/मावे साठी असलेले हॅन्ड ग्लोव्ज चा वापर करा..
जर आवश्यक वाटले तर अजुन ५ मिनिटे बेक करा.[प्रत्येक मावे.चे तंत्र वेगवेगळे असते]
बाटी चा रंग बदलेल व भाजली गेल्याचा सुवास ही दरवळेल.
वेळ संपल्यावर आणखी ५ मिनिटांनी बाट्या मावे.तुन बाहेर काढा.
एका लहानशा स्वच्छ कापडाच्या सहाय्याने ही गरम बाटी हातात गॅस च्या ओट्यावर [हार्ड सर्फेस हवा]आपटावी..म्हणजे भाजलेल्या बाटीला तड फुटुन त्यातील वाफ बाहेर निघेल व बाटी कडक होणार नाही.
थंड झाल्यावर या बाट्यांचे लहान -लहान तुकडे करा.मिक्सर मधे फिरवुन बारीक करुन घ्या.
आता हे मिश्रण ,पिठीसाखर ,वेलची पुड,आणि साजुक तूप [गरम करुन ]एकत्र करुन त्यावर कोंबट दुधाचा शिबका लागेल तसा घालुन गोल लाडू वळा.
bati ladoo-2...JPG
चतुर्थीच्या नैवेद्यासाठी खास बाटी लाडू तयार.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ तर हवेतच..
अधिक टिपा: 

साखरे ऐवजी गूळ वापरता येईल.
मावे नसला तर एका कढईत पाऊण वाटी तूप गरम करुन त्यात मध्यम आचेवर या बाट्या खरपुस तळुन घ्याव्या.

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे पाकक्रुती. करुन बघेन आता. मी कणकेत थोडा रवा घालते. बाटि करण्याएवजी जाड पराठे लाटते आणि तुपावर भाजुन घेते. गुळात लाडु बनवते. पण आता बाटि करुन बघेन.

मस्त रेसिपी Happy
यम्मी! मी तर लाडू पण वळत नाही. चुरमा+गुळ्+तूप -अहाहा! स्वर्गच >> खरंच गं स्वर्ग Happy

मस्त!

आयते मिळाले तर मज्जा येइल Wink

मी खल्लेत असे लाडु... ही रेसिपी वाचुन जीभेला चव आठवली त्या लाडवांची Proud

हे लाडू /चुरा वेगवेगळ्या रितीने करतात.त्याप्रमाणे प्रत्येक चवीत थोडा बदल होतो.
१] बाटी भाजुन,२]बाटी तूपात तळुन, ३] बाफला करुन,४]जाड पराठे मंद आचेवर तूपावर खरपुस भाजुन, ५] पिठाला थोड्या तेलाचे मोहन , दूधावरची साय व अगदी थोड्या कोंबट दुधाचा शिबका देवुन हे किंचित ओलसर झालेले पिठ भरपूर तूपात भाजुन त्यात पिठीसाखर घालतात. ६]चवीपुरते मीठ व तेलाचे मोहन घालुन दूध किंवा पाण्यात पिठ भिजवायचे .त्याच्या पातळ पोळ्या लाटून त्या तूपावर अगदी मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत खाखर्‍या सारख्या भाजायच्या व त्यांचा हातानेच अगदी बारीक चूरा करायचा. या चूर्‍यात भरपूर काजु व बदाम तुकडे व चवीप्रमाणे थोडी पिठी.साखर--हे फार गोड नसते--घालुन करतात. हा कुरकुरीत गोडसर चूरा फ्रिज बाहेर टिकतो .अति थंडी असते तेव्हा खाण्याची पद्धत आहे.भरपूर उष्मा -उर्जा मिळते.

मस्तच. आमच्या बिल्डींग मध्ये राहणाऱ्या गुजराती काकू गणपतीत नेवैद्य म्हणून हे लाडू घेऊन येतात. आम्ही त्या कधी येतात याची वाटच बघत असतो. ( आणि त्या आल्यावर लाडू ठेउन कधी जातात याची Happy ). जयपूर ला खाल्ले होते हे लाडू. गेल्या वर्षी महालक्ष्मी सरस मध्ये पण एक स्टॉल होता लाडून्चा. छान होते लाडू.
आता रेसीपी मिळाल्यावर नक्कि करणार.

दिनेशदा , खर्‍या एका लाडवाच्या मिश्रणात मी ३ लाडू केले आहेत त्यामुळे लहानसे २ लाडू खाल्ले कि मस्त तृप्ती येते कि २ सबंध [आख्खे ]लाडू खाल्ले...तिथले भरपूर सुका मेवा युक्त अडदिया लाडू / पिन्नी लाडू /मेथी लाडू ही आकाराने मोठ्ठे असतात.

डाळ बाटीच्या बाट्या करण्याची पण हीच पद्धत आहे का?
मला घरी बनवायच्या आहेत या बाट्या एकदातरी. माझा प्रचंड आवडता पदार्थ आहे.

नंदिनी हीच पद्धत आहे.पण बाटी पेक्षा बाफले कर्.आतुन मऊ /नरम असतात.बाट्या वळुन एका मोठ्या पातेल्यात चमचाभर तेल व बाट्या बुडतील इतके पाणी घालुन ते उकळवायचे ंअंतर त्यात बाट्या सोडुन त्यावर ताट झाकायचे ५-७ मिनिटानी झार्‍याने ढवळायचे. अजुन ५ मिनीटानी हे बाफले एका कापडावर पाणी टिपण्यासाठी ठेवायचे .नंतर भाजायचे ओव्हन नसेल तर थोड्या तूपात तळायचे.भाजलेली/तळलेली बाटी तळहातात कापड घेवुन त्यावर ठेवुन ती हाताने दाबायची जेणे करुन बाटीला तड पडुन आतील वाफ बाहेर निघुन बाटी/बाफला नरम होईल नंतर तूपात घोळवावा..

ऑलटाईमफेवरिट! अर्थात तयार मिळाले तरच!
पण आता दिवाळीत करणारच!
(एव्हढ्यात प्रचंड प्रमाणावर गोड खाणे झाले आहे!)

नंदिनी,ओव्हन असेल तर २०० वा २५० डिग्री [आधी प्री-हीट] करुन साधारण १५ मिनिटे लागतात.पण सतत ५ -५ नंतर ३-३ मिनिटांनी जागा व बाजु बदलावे.थोडा गुलवट रंग आला कि ती बाटी ओव्हन बाहेर काढावी.ओव्हन किती मोठा[स्पेस्]आहे, बाटीची जाडी व एकुण बाटी- संख्या किती आहे त्यावर वेळ अवलंबुन असतो.एकदा केले कि तुला अंदाज येईल्.तसेच पिठ भिजवताना पराठ्यासारखे मऊसर [पुर्‍यांसारखी घट्ट नको] हवे.घट्ट असली तर पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने भाजताना बाटी कडक/टणक होईल.
पिठ [गहू/मका चालेल ..गहू-पि ठ असेल तर थोडा जाड रवा घालायचा मका-पिठ तसेच घ्यायचे].गरम तेलाचे मोहन, हळद्,भरपूर ओवा, मिठ ,किंचित खा.सोडा /बे.पावडर,कसूरी मेथी,हि.मिरची-आले यांचे चवीपुरते वाटण घालुन पिठ भिजवायचे .अगदी लहान लहान पेढ्याइतक्या बाट्या करायच्या.कढईत अगदी कमी तूपात मंद आचेवर छान तळायच्या.[तळताना तूप फार लागत नाही]चहा-कॉफी बरोबर खायच्या.. सॉस,चटणी,लोणचे खार असले तर फार उत्तम. पोटभरीचा नाश्ता तयार होतो.