भेंडी रायते

Submitted by बिल्वा on 19 June, 2011 - 08:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भेंडी साधारण पाव किलो. पातळ गोल गोल चकत्या करून घ्यायच्या.
तेल
फोडणीसाठी हिंग
मीठ, साखर (चवीनुसार)
लाल तिखट
आमसूल्/लिंबूरस/आमचूर पावडर यापैकी जे काही तार न येण्यासाठी भेंडीच्या भाजीत नेहमी वापरत असाल ते.
दही गोडसर, घट्ट. (आंबट नको)
हिरवी मिरची+ लसूण+ कोथिंबीर पेस्ट २ चमचे.
भाजलेल्या जीर्‍याची पूड १ चमचा
चाट मसाला वरून भुरभुरायला
बारीक चिरलेली कोथिंबीर वरून सजावटीसाठी.

क्रमवार पाककृती: 

भेंडीची नेहमीची तेलावर परतून कुरकुरीत भाजी करतो तशी आधी करून घ्यायची आहे. भरपूर तेल पॅनमध्ये घेऊन त्यात चिमूट्भर हिंग घालून त्यात भेंडीच्या चकत्या घालायच्या. आणि जरा मोठ्या आंचेवर परतायच्या. मग त्यात आमसूल/लिंबाचा रस्/आमचूर पावडर ह्यापैकी एक घालून बराच वेळ भाजी परतत रहावी लागते. चकत्या अगदी कुरकुरीत झाल्या म्हणजे परततानाच खुळखुळ आवाज यायला लागतो. शेवटी मीठ आणि लाल तिखट (चवीप्रमाणॅ) घालून भाजी गॅसवरून काढून घ्यायची. भाजी जरा थंड होतेय तोवर रायत्यासाठी लागणारं दही तयार करायचं. जेवढं रायतं हवं असेल त्याप्रमाणात दही घेऊन ते चांगल फेटून घ्यायचं. त्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं. रायत्याला गोडी किती हवी त्याप्रमाणात साखर घालायची. मग त्यात हि. मि+लसूण+ कोथिंबीरीची पेस्ट साधारण २ चमचे (परत एकदा, तिखट किती हवं त्यानुसार कमी जास्त करता येईल) आणि जीरेपूड १ चमचा घालायची. आता ह्या दह्यात भेंडीची भाजी घालून मिक्स करायची. वरून थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.
यात वरून पुन्हा फोडणी ऑप्शनल आहे. नाही दिली तरी छान लागतं रायतं. पण हवी असेल तर चमचाभर तुपात हिंग ,जीर्‍याची फोडणी करून ती तयार केलेल्या दह्यात घालायची. जास्त खमंगपणा येतो रायत्याला.

वाढणी/प्रमाण: 
-
अधिक टिपा: 

कुठल्याही जेवणाबरोबर मस्त वाटतं हे रायतं. मी खरतर नेहमी साधारण अश्या पद्धतिने दह्यातली भेंडीची भाजी करते. पण मध्ये एकदा घरी पार्टी असताना चुकून शेवटपर्यंत रायतं करायचं लक्षात राहिलं नाही. आणि इतर वेगवेगळ्या रायत्यांना लागतील असं एकही जिन्नस घरात नव्हतं. म्हणून मग दही भेंडी करून रायतं म्हणून खपवू असा विचार केला. Happy पण आधीच बर्‍याच मंडळींना भेंडी आवडत नाही त्यातून भेंडी+दही काँबो किती रूचेल म्हणून मग हा प्रयोग करून पाह्यला. आणि जबरदस्त हीट झाला Happy त्यानंतर बर्‍याच वेळा केला. पार्टीत हीट होतो हा पदार्थ. नक्की करून पहा Happy
१-२ टीपा एवढ्याच की, भाजी थंड झाल्याशिवाय रायत्यात घालू नका. नाहीतर मऊ पडेल. पार्टीच्यावेळी भाजी आधी करून ठेवता येईल , अगदी जेवणाच्या वेळेस दह्यात मिक्स करायची. रायत्याची खरी मजा त्यात असलेल्या कुरकुरीत भेंडीमुळे आहे. त्यामुळे खूप आधीपासून भाजी दह्यात मिक्स करून ठेवायला नको.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक दही भेंडी ह्या पदार्था वरून मी करून पाहिलेला प्रयोग :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आली रेसिपी! छान आहे.
सभासदांसाठी आहे. सार्वजनिक कर. Happy

भेंडी कुरकुरीत करणे हे टोस्टर अवनमध्ये भेन्डी एका थरात लावून वरुन ऑईल स्प्रे करुन करता येईल असे वाटते. म्हणजे हाताने परतत बसायला नको.

आमच्या घरी वहीनीने पहिल्यांदा केला होता हा प्रकार. सगळ्यांनी भितभितच चाखून बघितला. मग मात्र सगळ्यांना आवडला.
आमच्याकडे दाण्याचे कुट घातलेले असते.

आज सकाळी लगेच केला हा प्रकार. ऑफिस मध्ये कोरडी भाजी डब्यात आणली. म्हटलं कॅंटीनममध्ये दही घेऊ. पण कस्चं काय नि फाटक्यात पाय Sad आज नेमकं दही नव्हतं. पण नुसती कुरकुरीत तळलेली भेंडीची भाजी पोळीबरोबर छान लागली खायला. Happy

हिट पदार्थ खरच !

मुळात हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. याला मल्याळम मध्ये वेंडक्या खिचडी
अस म्हणतात. वेंडक्या म्हणजे भेंडी.

या विषु ( मल्याळम नव वर्षाला ) दुपारच्या जेवणात मी खाल्ला होता.

विशू व ओणम सारख्या केरळच्या सणात २५-२६ पदार्थ एका वेळच्या जेवणात बनवले जातात. या अशा
जेवणाला सध्या अस म्ह्णतात. सध्या केळीच्या पानात वाढतात.

मी भेंडी आणि दही फॅन आहे ( दॅट एक्स्प्लेन्स Happy ) करको देखेंगा. पण माझी भेंडीची भाजी अशीच संपायची दाट शक्यता आहे. ते कुरकुरीत मावे मध्ये पण मस्त होइल.