वांगं-मुगवडी फ्राय

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६-८ छोटी वांगी-हिरवी किंवा जांभळी
२ मध्यम आकाराचे कांदे
१ टोमॅटो (नसला तरी चालेल)
भरपूर कोथंबीर
मीठ
गरम मसाला
हळद
तीखट
अर्धा चमचा चिंचेचा घट्ट कोळ
एक छोटा खडा गुळाचा
१ वाटी मुगवड्या
२ पळ्या तेल (भाजीला शक्यतो तेलाच्या वाफेत शिजवावं म्हणून)

क्रमवार पाककृती: 

* वांगी, टोमॅटो आणि कांदा हे सगळं धूउन पातळ आणि उभं चिरून घ्यावं. (वांग्याला पाण्यात टाकून ठेवलं तर त्यातली चांगली सत्व निघून जातात, तेव्हा पाण्यात टाकु नये). या सगळ्या भाज्या कापून एकत्र ठेवल्या तरी चालतील.
* फोडणीत, तेल गरम करून मोहरी-हिंग घालून मुगवड्या घालाव्या. २-३ मिनिटं परतावं.
* त्यावर थोड्या चिरलेल्या भाज्या घालून हळद, तीखट, मीठ, मसाला आणि चिंच घालून नीट परतावं. ऊरलेल्या भाज्या घालून परत सगळा मसाला नीट सगळ्या फोडींना लागेल इतकं ढवळून मंद आचेवर १० मिनिटं ठेवावं. त्यात वांग्याचा उग्र वास जाईल.
* परत एकदा भाजी घाटून, पाण्याचा हलका शिपका देऊन झाकळ घट्ट लावून भाजी शिजवावी.
मुगवड्या शिजल्या की ३-४ मिनिटं जास्त आचेवर भाजी फ्राय करावी. याच वेळी थोडा गुळ घालावा आणि बारिक चीरलेली कोथिंबीर पेरावी.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी सहज पुरेल.
अधिक टिपा: 

*** यात कांदा व्यवस्थीत गळतो. चांगला ब्राऊन पण होतो. तेव्हा फोडणीत त्याला वेगळं परतुन घ्यावा लागत नाही.
*** काही मुगवड्या शिजायला खूप वेळ लागतो. त्यांना फोडणीत घालण्याआधी १० मिनिटं पाण्यात भिजवून निथळून घ्याव.