पर्यटकांनो सावध! .... अर्थात टूरीस्ट ट्रॅप्स

Submitted by मामी on 10 May, 2011 - 13:06

देशापरदेशात भटकताना, काही ठिकाणी प्रवाशांना गंडवण्याचे जाणून-बुजून प्रयत्न केलेले दिसतात. किंवा काही ठिकाणी पहिल्यांदा भेट देणार्‍या प्रवाशांना तिथल्या काही खास टिप्स माहिती नसतात. या गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात. पण त्यामुळेच कोणी कोणाला सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. किंबहुना या सांगायला हव्यात असंही आपल्या डोक्यात येत नाही. 'प्रवासात झालेला तात्पुरता मनस्ताप' या सदराखाली टाकून आपण त्या विसरून जातो. पण या गोष्टींमुळेच इतर काही प्रवाश्यांना फायदा होईल की.

काही गोष्टिंची इथे जंत्री केली तर वेगवेगळ्या ठिकाणांच्या अशा महत्त्वाच्या टिप्स इथे एकत्रित होतील आणि सगळ्यांनाच फायदा होईल. 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'

त. टि. : जसजशा टिप्स जमत जातील तसतशा त्या ठिकाणांप्रमाणे एकत्र करून ठेवीन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निल्या खरंच वाईट फसवणूक आहे ही. टूर कंपन्या फार गृहित धरतात प्रवाशांना.

मनालीतले ते तुम्ही उल्लेख केलेले मराठी हॉटेलियर आणि दुकानदार आहेत त्यांचा आम्हालाही वाईट अनुभव होता. मराठी आहेत म्हणून आम्ही त्यांच्या हॉटेलात उतरलो आणि भिकार सर्व्हिस, कोंदट रुम्स, अस्वच्छता (उश्यांचे तेलकट अभ्रे, टॉवेलही खराब, पाण्याच्या जगात कचरा), उर्मटपणा, चूका कबूल करायची तयारी नाही याचा अनुभव घेऊन दुसर्‍याच दिवशी चेकऔट केलं. जवळपास निम्म्या दरात त्यांच्याच हॉटेलच्या जवळ आम्हाला उत्कृष्ट, हवेशीर, प्रशस्त रुम्स असलेलं हॉटेल लगेच मिळालं.

माझा अनुभव केसरी ट्रॅव्हल्सचा.केसरीबरोबर सिक्कीम-दार्जिलिंग टुर केली, गंगटोक आणि दार्जिलिंग या दोन्ही ठिकाणी हॉटेल्सच्या बाबत आलेला हा वाईट अनुभव.

टुर बुकींगच्या वेळेस गंगटोकला ऑरेंज कंट्री क्लब रिसॉर्टमध्ये रहाण्याची व्यवस्था आहे म्हणुन सांगितलं होतं. गंगटोकला पोचल्यावर सांगितलं की आपल्यापैकी काही फॅमिलीज ऑरेंज कंट्रीमध्ये तर काही वेगळ्या हॉटेलमध्ये रहातील कारण ऑरेंज कंट्री फुल्ल आहे. हीच गोष्ट मुम्बईहून निघण्याच्या आधी सांगितली गेली नव्हती. ज्या हॉटेलमध्ये आम्ही काही फॅमिलीज राहिलो त्या हॉटेलचा दर्जा आणि ऑरेंज कंट्री रिसॉर्टचा दर्जा यात खुपच फरक होता.

तीच गोष्ट दार्जिलींगला झाली, काही फॅमिलीज हॉटेल व्हाईसरॉय तर उरलेल्यांची 'सोय' समोरच्याच तिबेट होम मध्ये करण्यात आली. दोन्ही होटेल्स समोरासमोर होती ही एकच गोष्ट सोडली तर दोघांच्या दर्जात प्रचंड फरक होता. टुर लीडरशी वादावादी झालीच तेव्हा त्याने सुचवलेला उपाय हा की फक्त रहा तिबेट होममध्ये पण जेवण्-नाश्ता व्हाईसरॉयमध्ये करायला या.

एकतर ८ तासाच्या बस प्रवासानंतर संध्याकाळी ६ वाजता दार्जिलिंगला पोचलेलो, त्यात हा मनःस्ताप. चिकाटीने टुर लीडरच्या खनपटी बसुन केसरीच्या मुंबई ऑफिसमध्ये रीतसर तक्रार नोंदवली. रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल व्हाईसरॉयच्या लाउंजमध्येच बसलो होतो, त्याच दर्जाच्या दुसर्‍या हॉटेलमध्ये जेव्हा त्यांनी सोय केली तोवर रात्रीचे ११ वाजले होते.

सर्वात वाईट या गोष्टीचे वाटले की या टुरमध्ये एकंदर १४ मराठी कुटुंबे होती पण एकाही कुटुंबाने येउन साधी विचारपुस/मदत करण्याचं सौजन्यही दाखवलं नाही. Angry

त्यानंतर केसरीच काय कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीबरोबर टुर करण्याची ईच्छा नाहीय.

त्यानंतर केसरीच काय कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीबरोबर टुर करण्याची ईच्छा नाहीय. >>
माझंही हेच मत. ही माझी पहिलीच टूर होती प्रोफेशनल ट्रॅव्हल्सबरोबर आणि बहुतेक शेवटचीच. गेल्या वर्षी स्वतःहून आखणी करून गेलो होतो, तेव्हाही असे अनुभव आलेच, पण त्या माझ्या चुका होत्या म्हणून इतके वाईट नव्हते वाटले. ह्या वर्षी सगळ्या कुटुंबाला वेळ देता यावा [आणि माझी चिडचिडही त्यांना सहन करावी लागू नये] म्हणून हा प्लॅन केला होता. Sad

आडो, वाचले नाहीत त्यांचे अनुभव.

हल्ली सगळ्या टुर्स मी स्वतःच जालावरुन माहिती गोळा करुन आखणी करुन जात आहे. अजुनपर्यंत सुदैवाने काहीही त्रास झाला नाहीय.

सगळ्या ट्रॅव्हल कंपन्या प्रचलित स्थळे दाखवून लवकरात लवकर हॉटेलात आणुन आदळतात. हटके,काहीशी अप्रचलित स्थळे उपेक्षित राहतात.
उदा. बंगलोर-म्हैसुर-उटी या टुरमध्ये सोमनाथपुर्,रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य.श्रीरंगपट्टणम वगैरे ठिकाणी बस कधीच वळवली जात नाही. परिणामी ही टुर करुन आलेले फक्त मोजकीच ठिकाणं बघुन आलेले असतात.

अशा अप्रचलित ठिकाणी त्यामुळे भारतीयांपेक्षा परदेशी नागरिकच जास्त दिसतात हा माझा अनुभव आहे.

पानभर मोठ्या आणि उगीचच फळाफुलांच्या नावाने चालवल्या जाणार्‍या ट्रॅव्हल कंपनीच्या जाळ्यात न फसणंच शहाणपणाचं ठरेल.

हैद्राबाद : भाग्यश्री ट्रॅव्हल्स पुणे - पॅकेज टूर
ट्रेनमधे आमच्या नावाचे बुकिन्ग न करता वेगळ्याच नावाने बुक केलेली तिकिटे आणून दिली.
रहायला बेगमपेटमधे जे हॉटेल होते ते बरे होते. एक बस बुक केली होती ३ दिवसांसाठी
एक पुर्ण दिवस रामोजी फिल्मसिटीमधे गेला त्यामधे खाण्याची पॅकेटस देणार होते ती विसरली म्हणे घ्यायची म्हणून पार दुपारी दोन नंतर लंच टाईमपर्यंत काहीच दिले नाही. आणि संध्याकाळी चिवड्याची थोडीफार पॅकेटस आणून दिली.
त्या बसमधे आमचे कुटुंब आणि ३ ज्येष्ठ नागरिक महिला आणि २०/२५ दुकानदार होते बारामती, दौन्ड भागातले की जे शेवटपर्यंत आमच्याशी फारसे काही बोलले नाहीत. एनटीआर गार्डन पहायचे होते पण या सर्व गटाने विरोध केला म्हणून पहाता आले नाही.
बाकी तिकिटे काढण्यासाठी कुठे फारसे रांगेत थांबावे लागले नाही ही एक चांगली बाब होती.
पॅकेज ट्रीप मधे फारसे स्वातंत्र्य रहात नाही म्हणून मग पुढची ट्रिप (सिमला, मनाली) स्वतःच ठरवून केली. त्याबद्दल पुढच्या लेखात.

काश्मिर ला कोणी मार्तंड मंदिर दाखवत नाही...आम्ही ईकडून माहीती काढून गेलो होतो.. तिथे आमच्या लोकल माणसाला ही माहीत नव्हते...चौकशी केल्यावर रस्ता कळला.. हे त्याचे फोटो ईथे आहेत.... काही फोटोत माणसे आहेत.. त्यावरून त्या मंदिरा च्या उंचीचा अंदाज येईल.... हे कोणी टुर दाखवत असल्याचे ऐकीवात नाही.. ह्याची माहीती सकाळ मध्ये लिहायची होती...पण आळस.. Sad (आता झटकायलाच हवा)..

------
------
------

तसेच हडप्पा सारखे श्रीनगर मध्ये सापडले होते... पण काही केल्या त्याचा पत्ता लागला नाही.. दाल लेकच्याच बाजूला आहे असे वाचले होते...

Thank you very much for sharing ur experiences.. after all All tour operators are for making money. specially those who give full page advt in the newspapers.

its better if u do all ur home work and org. ur trip.

vinayak

ह्या सगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांची फेसबुकवर पानं आहेत आजकाल. तिथे जाऊन लिहु शकता चांगले-वाईट अनुभव.

या कंपन्यांना लिहून, त्यांची जी काय उत्तरे येतील तीपण लिहावी इथेच.
माझ्यापण सगळ्या सहली माझ्या मीच प्लान करत असतो, थोडी धावपळ होते खरी पण मनाजोगता वेळ देता येतो.
अनेक ग्रुपमधे उशीरा उठणारे, नको तितके शॉपिंग करणारे लोक असतातच, त्याबाबतीत मात्र टुअर ऑपरेटर्सचा नाईलाज असतो.

माफ करा मंडळी, पण माझा जो अनुभव इथे कथन करू इच्छितो तो कदाचित धाग्याच्या शीर्षकाशी ['पर्यटकांनो....'] फटकून असेल पण तरीही टूरिस्ट कंपनीची एक लबाडी या निमित्ताने इथे चर्चेला घेतली तर ती अनुचित होणार नाही असे वाटते, म्हणून लिहिण्याचे धाडस करीत आहे.

कोल्हापुरातील एका त्यातल्या त्यात प्रसिद्ध अशा टूरिस्ट कंपनीची एक ३० सीटर लक्झरी 'लग्नकार्या' साठी आम्ही भाड्याने ठरवली. देण्याघेण्याच्या प्रश्न मिटला होता. गाडी तब्बल दहा दिवस अगोदर बुक केली होती. बुकिंगच्या दुसर्‍या दिवशी कंपनीतील एका एजंटचा फोन आला व बोलला, "तुम्हा ३० लोकांची त्यांची पूर्ण नावे, सेक्स आणि आजचे वय यासह एक यादी आज संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये द्यावी." कशासाठी विचारले असता उत्तर मिळाले. "आर.टी.ओ.लायसन्स काढावे लागते. लग्नाला एस.टी. वापरली नाही म्हणून माणशी ३० रुपये चार्ज द्यावा लागतो." म्हणजे ३० x ३० असे एकूण ९०० रुपये जादाचे आणि लिस्ट दुसर्‍या दिवशी तिथे दिली. लग्न समारंभात असे खर्च अपेक्षित असल्याने आम्हा जेष्ठांना त्यात काही वावगे वाटले नाही. आम्ही मग ते चार्ज प्रकरण विसरूनही गेलो.

लग्नाच्या आदल्या दिवशी रात्रीचा प्रवास होता...कोल्हापूर ते पुणे. रात्री ७.०० ला लक्झरीने कोल्हापूर सोडले. बसमध्ये अन्यत्र जसा लग्नाचा दंगा मुले घालत असतात तसा आमच्याही इथे चाललाच होता. मजेत होते सर्वच. साधारणतः दोन टोल नाके गेल्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास बाहेर पावसाची रिपरिप चालू असताना ड्रायव्हरने शेजारील सायरन ऐकून लक्झरी साईडला लावली. तो आणि त्याचा जोडीदार काही कागदपत्रे घेऊन खाली उतरलेले आम्ही पाहिले. म्हटले असणार काहीतरी पोलिसांची वा आरटीओची कागदपत्रांची तपासणी. आम्ही आत गप्पा मारीत बसलो असताना दहाएक मिनिटांनी तो ड्रायव्हर आम्हा तिघा सीनिअर्सना खाली येण्याविषयी विनंती करू लागला. आम्ही उतरलो. तो कुजबुजला, 'साहेब, १००० रुपये मागत आहे." बरे मग याचा आमच्याशी काय संबंध ? तर सांगावे की न सांगावे अशा विचारात ड्रायव्हर वदला, "गाडीतील प्रवाशांची यादी नाही म्हणून." हा काय प्रकार आम्हाला कळेना. यादी तर टूरिस्ट ऑफिसमध्ये आम्ही पैशासह दिली होती. शेवटी आम्ही सरळ आरटीओ व्हॅनकडे गेलो तर तिथे ते नेहमीचे ताठर थ्री स्टारवाले बसले होते. त्याना आम्ही शक्यतो नम्रपणे 'लग्नाचे वर्‍हाड आहे, यादी व सरकारी चार्जेस आम्ही नोंदणी करतानाच अदा केला आहे" असे सांगितल्यावर त्यातील एकाने आमची अब्रूच काढली, "तुम्ही लोक सुशिक्षित आणि सरकारी नोकरीवाले आहात असे तो ड्रायव्हर म्हणत्योय. पण तुमची ड्युटी होती की त्या यादीवर आरटीओने सहीशिक्का दिला आहे की नाही ते पाहण्याचा. तुम्हाला माहीत आहे ड्रायव्हरकडे कुठली यादी आहे ते?" आम्हाला यादी कोणती आहे ते माहीत असणे शक्यच नव्हते, किंबहुना आमच्या कुणाच्याच मनी ती बाब इतकी महत्वाची असते याची कल्पना आली नव्हती.

तर त्या टूर कंपनीने चक्क गेल्या आठवड्यात त्याच लक्झरीने गावातील प्राथमिक शाळेतील मुलांसाठी आयोजित केलेल्या महाबळेश्वरच्या सहलीची यादी या ड्रायव्हरकडे दिली होती. बारा वर्षाखालील मुलांना आरटीओ चार्जेस बसत नाही, या नियमाचा फायदा घेऊन त्या नालायक संचालकाने आम्ही दिलेले ९०० रुपये खिशात घातले होते. आणि जर चुकून पोलिसाने अडविले तर १०० रुपये देऊन प्रकरण मिटविण्याचे संकेत त्या ड्रायव्हरला दिले होते. पण त्याच्या दुर्दैवाने [आणि आमच्याही] त्या रात्री थेट आरटीओ इन्स्पेक्टरनीच लक्झरी अडवली. पुढे जे व्हायचे ते झाले. लग्नासाठी तर जाणे भागच होते. कोल्हापूरातील एजंटला सेलवरून सत्राशेसाठ शिव्या आमच्या गाडीतील पोरांनी घातल्या आणि तो 'सौदा' १००० रुपयावर मिटविला. गाडी हलली.

पुढे लग्नात हा विषय काढला नाही. मात्र तिसर्‍या दिवशी कोल्हापुरला परतल्यावर ज्यावेळी आमची मुले संतापून त्या टूरिस्ट कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसली त्यावेळी त्या मालकाची घाबरगुंडी उडाली. त्याला आमचा राग अपेक्षित होताच पण शिवाजी पेठेतील ते आठदहा तरूण त्याला दिवसा चांदणे दाखवायचे या निश्चयाने तिथे आलेली पाहिल्यावर त्याने आम्हाला बोलावून घेऊन ते हजार रुपये तर दिलेच पण झालेल्या त्रासाबद्दल आरटीओ पासचे ९०० ही परत दिले आणि विनंती केली की हे प्रकरण पेपरमध्ये देऊ नका. मुलांना आवरले....तो पर्यंत शिव्यांचा भडिमार दुसरीकडुन चालूच होता.

यातून शिकायचे तर टूरला निघण्यापूर्वी टूर लीडर वा कुटुंब प्रमुखाने गाडीसंदर्भातील सर्व कागदपत्रे रितसर ड्रायव्हरकडे [अगदी त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्ससह] पाहणे अत्यंत निकडीचे आहे.

पण तुम्ही हे पेपरमधे द्यायला हवे होते. तुमचे पैसे परत मिळाले म्हणून सोडून देणे याला काही अर्थ नाही तो माणूस परत तेच करणार...

होय नीधप...पटते मला तुमचे म्हणणे. इकडे मारे आम्ही कायद्याच्या गप्पा हाणायच्या आणि कायद्याविरूध्द घटना आमच्याच बाबतीत घडली तर संबंधिताच्या हिताचे रक्षण करावे म्हणून आम्हीच तसल्या गैरप्रकाराची वाच्यता कुठे करायची नाही. टिपिकल मध्यमवर्गीय वृत्ती दाखविली आम्ही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लाज वाटते अगदी केव्हाकेव्हा अशा आमच्या डरपोकपणाची.

निदान अशा खुल्या संस्थळावर तो अनुभव लिहून मन काहीसे हलके झाले...वाचणारेही पुढे योग्य ती दक्षता घेतील असे वाटले, हेही नसे थोडके !

अशोक पाटील

ओरिसात गेलं असता चिलका लेकच्या ट्रिपमध्ये तुमच्या बोटिवर येऊन लोक तुमच्या देखत शिंपले फोडून काळे, पिवळसर मोती काढून दाखवतात आणि ते विकतात. ते चुकूनही घेऊ नयेत. तसच कोरल्स फोडून पोवळीही दाखवतात त्याबाबतीतही तेच मत. अशा गोष्टी नेहेमी गव्हर्न्मेंट अप्रूव्हड दुकानातून घ्याव्यात. खूप मोह होतो. बरेच लोक घेतात तर आपण का नाही असही वाटू शकत.

'माणसं शिकलेली असली तरी प्रत्येक बदलणारा नियम प्रत्येक माणसाला माहीत असावा' ही अपेक्षाही चूकीची आहे. आपल्याकडे नियम सारखे बदलत असतात. उद्या बसला अपघात झाला, तर वाटेवरची
पोलिस स्टेशन, हॉस्पिटल, रक्तपेढ्या, प्रथमोपचार याची तुम्हाला माहीती हवी... पूर आला तर होडी आणि ती वल्हवायची माहीती हवी.. वादळ झालं तर पडणार्‍या झाडांपासून संरक्षण करण्याची तयारी हवी... सुशिक्षीत म्हणजे सर्व ज्ञानी नव्हे.
उद्या यादीचा नियम माहीत नसला, आणि तुम्ही सगळ्या कागदपत्रांची तपासणी केलीत तर तुम्हाला कळणार काय? आणि 'आमचं काम आम्हाला करू दे, तुम्ही शिकवायची गरज नाय' हे पण असतंच.

यात्रा कंपनीला नियम माहीत असणं आणि त्यानी ते पाळणं हे अपेक्षीत आहे... उद्या विमानप्रवासात काही झाले, तर 'शिकलेली माणसं तुम्ही, उडता येत नाही?' असं विचारायचा एकादा पोलीस..

पैसे देतो सांगून न देणे हे भारतात अनेकदा अनुभवले आहे. भेटतो सांगून न भेटणे, इ. प्रकार भारतात नेहेमीच अनुभवाला येतात. त्यात भारताला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. इतर देशात सुद्धा बरीच फसवणूक होते. भारत वाईट असे फक्त भारतीयांनाच, विशेषतः भारत सोडून आएल्या नि इतरत्र रहाणार्‍या भारतीयांना वाटते.
वास्तविक मी पुण्यात सहा महिने रहात असताना (२००५ साली) , प्रामाणिकपणाचे अनेक अनुभव मला आले नि मी त्याबद्दल लिहीलेहि होते. पण पुण्यातल्याच लोकांनी माझी टिंगल केली, अहो तुम्हाला बनवलेच, किंवा तुम्ही उपहासाने लिहीता का? असे विचारले. कारण भारतात काही चांगले असेल यावर भारतात रहाणार्‍यांचाच विश्वास नाही, तर बाहेर रहाणार्‍यांचा कुठून?

असो. आपण आपले चांगले काय ते बघावे, नि त्यात आनंद मानावा.

@ परदेसाई ~
"नियम प्रत्येक माणसाला माहीत असावा' ही अपेक्षाही चूकीची आहे."

~ नक्कीच चुकीची आहे. पण होते असे की, मध्यरात्रीच्या सुमारास खांद्यावर दोन तीन चांदण्या लटकविलेले आणि लालपिवळ्या दिव्याच्या गाडीत गुर्मीत बसलेले ते अधिकारी असे काही बोलू लागले की समोरील 'प्रवाशा'च्या अवतारातील व्यक्ती हतबलच होऊन जाते. शिवाय लग्न, दवाखाना आदी कारणासाठी निघालेला जथ्था असला की कुठेतरी मनी येतेच की, 'जाऊ दे, तो म्हणतोय त्याला हो म्हणू आणि निघू इथून'.

वितंडवाद टाळणे हा देखील कित्येकाच्या स्वभावातील, गुण म्हणा दोष म्हणा, एक कप्पा असतो. [अर्थात त्यामुळे समोरचा सोकावतो हेही तितकेच खरे ! पण काय करणार ?]

अशा गोष्टी नेहेमी गव्हर्न्मेंट अप्रूव्हड दुकानातून घ्याव्यात. >>
सरकारी दुकानांमधे किमतीच्या बाबतीत फसवले जाणार नाही याची खात्री असते म्हणून अनेकदा पर्यटक अशा ठिकाणी खरेदी करणे पसंत करतात. पण जयपूर /राजस्थान मधे सरकारी वाटतील अशी काही खाजगी दुकाने आहेत. म्हणजे दुकानांची नावे सरकारी वाटतील अशी असतात जसे स्टेट हॅन्डलूम स्टोअर, नॅशनल हॅन्डिक्राफ्ट असो. शोरूम" असली काहीतरी. टॅक्सीवाले तुम्हाला सरकारी/ खादी ग्रामोद्योग सारखे आहे ई. म्हणत तिथे घेऊन जातात. अर्थात दुकानात कमी प्रतीच्या वस्तु आणि किमती अवाच्या सव्वा! तसेच प्रॉडक्ट बद्दल तद्दन खोटी माहिती, जसे नेहमीच्या रासायनिक रंग वापरलेल्या ब्लॉक प्रिन्टेड चादरी असतात पण नैसर्गिक रंग वापरून रंगवल्या आहेत म्हणून सांगतात किंवा देवी देवतांच्या मुर्तींवर बसवलेले कृत्रिम चकाकणारे खोटे खडे सफायर्स आहेत म्हणून सांगतात ई. तेव्हा राजस्थान मधे फिरतांना अशा ठिकाणी गेल्यास कॅश काउन्टर वर जाऊन खाजगी दुकान आहे का याची माहिती विचारावी, सर्टीफिकेट्स लावली असल्यास ती वाचावी.

मामी, आम्हालाही शिर्डीला असाच अनुभव आला. माझ्या जावेचा तुळजापूरचा अनुभव.देवीची साडी,चोळीने ओटी भरावी म्हणून तिने एका दुकानातुन साडी,चोळी व ओटीचे ताट घेतले.आत गेल्यावर ओटी भरायला म्हणून साडी थोडी उलगडली,तर साडी ऐवजी छोटे कापड निघाले. मनालीला त्या मराठी गृहस्थांना आपला माणूस म्हणून पायी शोधत गेलो,तर त्यांनी निर्विकार चेहेर्‍याने आम्हाला त्यांच्या हॉटेलमध्ये बसवले.व थोड्या वेळाने सध्या तुम्हाला काहिही मिळणार नाही म्हणून सांगितले.

नीधप असे शिंपले आणि कोरल्स कोणीही काढून बोटीवर फोडून दाखवणे, आतली मोती आणि पोवळी परस्पर विकणे हे बेकायदेशीर असते. पर्यावरणाचा नाश होतो यात. लोक घेतात म्हणून हा धंदा चालतो. मला वाटतं आर्च म्हणूनच म्हणते आहे की कितीही मोह झाला तरी गव्हर्न्मेन्ट अप्रुव्ह्ड दुकानांमधूनच मोती, पोवळी घ्यावीत.

आतली मोती आणि पोवळी परस्पर विकणे हे बेकायदेशीर असते. पर्यावरणाचा नाश होतो यात.

सरकारी दुकानातून घेतले तरी तेही समुद्रातूनच माल आणणार ना? तेंव्हाही पर्यावरणाचा सत्यानाश होणारच की.

मोती, पोवळी खरी खोटी ह्याची गॅरंटी नाही. हातचलाखी असते का ते कळत नाही अगदी डोळ्यादेखत फोडत असताना. मनमानी किंमत सांगतात. एका मोत्याला २००रुपये वगैरे सांगतात मग आपण १०० रुपयांना विकत घेतो, काय बारगेनींग केलं म्हणून आपण खूष. काठावर आलो की काही १० रुपयाला एक मोती म्हणून विकत असतात. आपल्याला वाटतं, आपण फसलो का हे १० रुपयाला १ वाले प्लॅस्टीकचे मणी आहेत. परत पुण्याला आल्यावर गाडगीळांकडे गाठवायला नेल्यावर ते म्हणतात, मोती ठीक आहेत तुमचे. पोवळी दगडं आहेत. पोवळ्याला किती किंमत दिली ते सांगायचीपण लाज वाटते कारण आपण किती घाट्यात गेलो ते आपल्या तोंडाने काय सांगणार कारण पोवळ्याला मोत्यापेक्षा कितीतरी पटीने पैसे मोजलेले असतात. मग सुंदर दिसणारे दगड म्हणून सेटींगमध्ये आणखी पैसे टाकून आपण गाडगीळांकडून सेट्स करून घेतो. महागातली कोस्ट्युम ज्युलरी म्हणून पार्टीत दिसते चांगली. पण व्हॅल्यू काय असा विचार करायचा नाही. तर एवढ्या सगळ्यापेक्षा आपल्या नेहेमीच्या सराफाकडून घेणं किंवा गव्ह्र्न्मेंट अप्रूव्ह्ड दुकानातून घेण शहाणपणाच.

शर्मिला, तुझ्या मुद्याचा विचारच केला नव्हता. पण तोही एक मुद्दा बरोबर वाटतो.

सोनाली कुलकर्णींचा हा लेख आठवला.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=140264:...

इथे कोणी फसवण्याचा प्रश्न नसेल. पण पर्यटनास गेल्यावर होणारा त्रास, मनस्ताप या गोष्टी आहेत.

ह्म्म्म म्हणजे एकुणात अशी प्रेशस स्टोन्स इत्यादी खरेदी करायची तर मुळात थोडा अभ्यास आणि थोडा अनुभव (नकली कसे दिसते, असली कसे दिसते त्याची परिक्षा काय इत्यादी) करून जायला हवे.

बादवे राजस्थानात हह ने सांगितलंय ती खबरदारी घ्यायचीच आणि जर शक्य असेल तर आपण करू ती खरेदी आपल्याच बरोबर उचलून आणता आली तर बघायचे. काही ठिकाणी ते आपल्या पत्त्यावर पाठवू असे सांगतात. आणि यात सिलेक्ट केल्यापेक्षा वेगळाच पीस किंवा डिफेक्टेड माल असं काहीही मिळण्याची शक्यता असते.

आम्ही ऑगस्ट २०१२ मध्ये जवळच कुठेतरी तीन रात्रीकरता ट्रिपला जायचे म्हणून इडलीवाल्यांच्या जाधवगढ हॉटेलचे बुकिंग नेटवरून केले. आता आता त्यांची साईट बदलली आहे. पण आधीच्या साईटवर त्यांनी मेजर झोल केला होता. रुम्समध्ये चार प्रकार होते - टेन्ट, डिलक्स रूम, प्रिमियम रूम आणि स्वीट रुम्स. तर या प्रत्येकाचा फोटोही दिला होता. त्यातील आम्हाला स्वीट रुम चा आवडला. ४ स्वीट रुम होत्या. आम्ही एक बुक केली. पार्ट पेमेंट केले.

तिथे पोहोचलो तर त्यांनी जी रुम आम्हाला दिली ती अजिबातच त्या फोटोसारखी नव्हती. फोटोत चांगली प्रशस्त (स्वीट नावाला साजेशी) रुम होती आणि इथे तर नेहमीच्या रेग्युलर रुमसारखी रुम! आम्ही त्यांना विचारलं तर म्हणे हिच सगळ्यात बेस्ट रुम आहे. कॉर्नरला आहे, फक्त याच रुमला बाल्कनी आहे वगैरे वगैरे. प्रवासानं थकून गेल्याने आम्ही जास्त वाद घातला नाही. शिवाय तिथे फोनवरून इंटरनेट अ‍ॅक्सेस होत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की त्यांची साईट डाउन आहे त्यामुळे त्यांचा कॉम्प्युटर वापरायला झाला नाही. शेवटी त्यांनी जी रुम दिली होती त्यातच झोपलो. पण आम्हाला खात्री होती की काहीतरी गडबड नक्की आहे.

सकाळी उठून पुन्हा रिसेप्शन गाठलं. पुन्हा साईट डाउन होती (म्हणे). पुन्हा तुमची रुम बेस्ट आहे. फक्त याच रुमला बाल्कनी आहे वगैरे रेकॉर्ड सुरू झाली. पण सकाळी लॉनवर फिरताना आम्ही एका दुसर्‍या रुममधल्या स्त्रीला तिच्या बाल्कनीत उभं राहून छानपैकी चहा पिताना पाहिलं होतं... स्मित त्यामुळे आम्ही ते सांगताच त्यांनी लगेच वाक्य फिरवत 'तुमच्या रुमला सगळ्यात मोठी बाल्कनी आहे आणि तुमच्या रुममधून बेस्ट व्हू दिसतो' असा नविन मुद्दा आमच्या गळी उतरवायला सुरवात केली. पण आम्ही जी रुम म्हणून बुक केली ती ही नाहीच. फोटो कंप्लीटली वेगळाच होता, त्याचं काय?

आम्ही बुक केली तो स्वीट होता आणि जी रुम आम्हाला दिली ती प्रिमियम रुम होती हे त्यांनी सांगितलंच नाही.

आता मात्र हे प्रकरण धसास लावायचंच असं आम्ही ठरवलं. डिनरच्या आधी आम्ही पुन्हा एकदा रिसेप्शनमध्ये गेलो. यावेळी तिथे एक वेगळा माणूस होता. त्यानं आम्हाला मॅनेजरच्या रुममध्ये नेऊन त्याचा कॉम्प्युटर वापरू दिला. जाधवगढच्या साईटवर जाऊन आम्ही त्याला त्याची साईट दाखवली. घे बाबा, डोळे भरून बघ आणि सांग काय घोळ केलायत तो! त्याने कबुल केले की फोटो महाराजा स्वीट चा आहे आणि आम्ही राहतोय ती प्रिमियम रुम आहे. (महाराजा स्वीट हा जाधवगढ मधिल सगळ्यात मोठा आणि सर्वात उंचीवरचा स्वीट आहे. द बेस्ट रुम.)

मॅनेजर जागेवर नव्हता, त्याच्या घरी होता. त्याला फोन लावला तर म्हणे त्या फोटोत आहे तीच रुम आम्हाला दिलेय. तेच तुणंतुणं ऐकून मी फोन नवर्‍याच्या हातून घेतला आणि त्या मॅनेजरला झाप झाप झापलं. हा फ्रॉड आहे आणि स्वीटचे फोटो टाकून तुम्ही लोकांची दिशाभूल करताय हे त्याला सांगितलं. मग तो क्षमा मागायला लागला. त्यानं आम्हाला म्युझियम स्वीटमध्ये शिफ्ट होण्याची विनंती केली. कारण महाराजा स्वीटमध्ये कोणी रहात होते म्हणे. शिवाय रात्रीचं जेवण आणि अनलिमिटेड वाईन ऑन द हाऊस देण्याची घोषणा केली. ते ऐकून तर आणखीनच वैताग आला. ( आम्ही डिनर केले पण वाईन घेतली नाही. स्मित )

एव्हाना आम्ही तीन रात्री तिथे राहण्याचा विचार रद्द केला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट नंतर लगेच निघायचा विचार होता म्हणून रुमदेखिल बदलली नाही. ब्रेकफास्ट नंतर हॉटेल सोडले. त्यांनी आमच्याकडून आम्ही आधी भरले होते तेवढेच म्हणजे रु. १०,००० घेतले. अजून काही घेतले नाहीत. त्यामुळे आर्थिक तोटा तसा काही झाला नाही. पण वैतागवाणी ट्रिप आणि एक विचित्र अनुभव गाठीशी आला.

ट्रिपअ‍ॅडवाईजर.कॉम या साईटवर मी माझा अनुभव लिहिला होता. ते खात्री झाल्यावरच तो अनुभव प्रसिद्ध करतात. पण माझा अनुभव प्रसिद्ध झाल्यावर देखिल जाधवगडची साईट अनेक महिने तशीच होती. नंतर त्यांनी स्वीटचा फोटो बदलून योग्य तो फोटो टाकला पण त्यातही झोल केला होता. इतर रुम्स च्या बाबतीत माहितीशेजारच्या छोट्या फोटोवर क्लिक केले असता तोच फोटो मोठा होत होता. पण याच फोटोच्या बाबतीत त्या योग्य छोट्या फोटोवर क्लिक केले असता पुन्हा महाराजा स्वीटचा फोटो दिसत होता.

(याच ट्रिपअ‍ॅडवायझर वर इतरांनी लिहिलेले जाधवगढचे अनुभव तर भयानक आहेत. तिथल्या ओपन शॉवर रुमच्या बाबतीतला अनुभव तर डेंजर आहे. कोणीतरी गेस्ट आंघोळ करत असताना वरून एक माणूस बघत होता म्हणे. अरेरे )

आता हे इथे लिहिण्याआधी त्यांची साईट तपासली तर आता रुम्सचे योग्य आणि सर्व प्रकार दिसत आहेत. साईटच पूर्णपणे नविन दिसत आहे.

Pages