पालकाची मुद्दा भाजी

Submitted by गिरिश देशमुख on 5 December, 2010 - 18:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बारीक चिरून पालक २ कप,
शिजवलेली तूर डाळ, घोटुन (घट्ट /गोळा वरण) १ कप,
चिंचेचा दाट कोळ अर्धा कप,
बेसन (हरभरा, चणा पीठ) अर्धा कप,
गूळ १ टी स्पून, मीठ,
तेल २ टेबल स्पून (जरा जास्तच लागते),
लसूण १०-१२ पाकळ्या,
४ लाल मिरच्यांचे तुकडे,
लाल तिखट (पावडर), मोहरी, हींग, धने, सफेद उडिद डाळ, हळद पावडर प्रत्येकी अर्धा टी स्पून,
मेथी दाणे ४-५

क्रमवार पाककृती: 

पॅनमधे १ टे. स्पू. तेल गरम करायला ठेवा, तापल्यावर त्यात हींग घाला आणि लगेचच त्यावर पालक घाला, हलवून, झाकण ठेवुन पालक शिजवून घ्या. चांगला शिजल्यावर त्यात तूरीचे घट्ट वरण घालून , घोटुन, सारखे करून घ्या.
चिंचेचा कोळ, बेसन, मीठ, गूळ, हळद, तिखट एकत्र करुन, थोडे पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट वरच्या भाजीत घालून मिक्स करून मंद आचेवर शिजवून घ्या. आवश्यकता वाटल्यास थोडे थोडे पाणी घाला, पण भाजी घट्टच राहिली पाहिजे.
वेगळ्या कढईत १ टे. स्पू. तेल, मोहरी, लसूण, धने, मेथी दाणे, उडीद डाळ आणि लाल मिरच्यांचे तुकडे याची फोडणी (तडका) करून घ्या आणि तयार भाजीवर घाला. मिक्स करून सर्व करा.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

मुद्दा भाजी म्हणजे घट्ट (गोळा) भाजी. हा पारंपारीक दाक्षिणात्य पदार्थ आहे. माझ्या एक मावशी हैदराबादला असतात, त्यांच्याकडे करतात ही भाजी.
पालका बरोबर शेपू (ऐच्छिक) छान लागतो. पालका ऐवजी कुठलीही पाले भाजी (आळू, चाकवत, करडई, मुळ्याचा पाला) वापरता येईल.
पालेभाजी उकडून घेतली तर पांचट लागते, त्याऐवजी अशी तेलावरच शिजवून घेतली, तर तिची चव, रंग कायम रहातो.
घरी करताना कधी कधी नुस्त्या तूरी ऐवजी ४-५ वेगवेगळ्या डाळी एकत्र शिजवून वापरतो.
व्हेरिएशन म्हणून या भाजीत १ टे. स्पू. भाजलेल्या शेंगदाण्याचा किंवा खुरासणीचा जाडसर कूट घालतो.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक, हैदराबादच्या मावशी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुरासणी हा एक तेल-बीयांचा प्रकार आहे, म्हणजे यापासून तेल निघतं ! जीरे असतात ना, त्याच साईज च्या काळ्या चकचकीत बीया असतात या. नाशिक, नगर जिल्यात, मराठ्वाड्यात पिकवतात.
खुरासणी कुणी लोणच्यातही घालतात. खुरासणी भाजून तीळ, दाणे यांच्याबरोबर चटणी करतात, ती भाकरी बरोबर फारच यम्मी लागते.

आमच्याकडे आई करते ही भाजी. खमंग लागते. तुरीची डाळ आणि वरून चरचरीत फोडणी यांमुळे भाकरी/ भात/ पोळीबरोबर मस्त लागते. पण फोडणीत धणे, उडीद डाळ व मेथी दाणे नसतात. आता असेही करून बघायला हवे.

मी पालक डाळ व थोडे शेंगादाणे असे शिजवून घेते. मग हाटून मीठ चिंच इ. घालून लगेच फोड्णी. मस्त लागते भाजी.

छान आहे हा प्रकार, मला पण पालक पाण्यात शिजवलेला आवडत नाही.
सिंधी लोकात पण करतात असा प्रकार त्यात चण्याची डाळ आणि आले असते.

छान!