नकट्या नाकातली हिरकणी

Submitted by सई केसकर on 29 March, 2017 - 07:39

लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी संपली की हमखास एखादी वर्गातली मुलगी नाकात नाजूक सोन्याची तार घालून यायची. त्या तारेच्या गाठीला चिकटलेला एखादा लाल नाहीतर काळा लुकलुकणारा मणी असायचा. आमच्या मैत्रिणींच्या गटात मात्र अशा नाक टोचून आलेल्या मुलींची यथेच्छ थट्टा व्हायची. नाक टोचणे, छोटी लाल टिकली लावून येणे, कॅनव्हासच्या बुटांच्या आणि आतल्या मोज्यांच्या वरून पायात पैंजण घालून येणे (हे असे का करतात ते एकदा पैंजण आत ठेऊन भयंकर टोचल्यावर कळले) या सगळ्याची "आमच्या" गटात फार निंदा व्हायची.

पण नुकतीच शाळा बदलून नवीन शाळेत आल्यामुळे मला या अशा सौम्य दादागिरीमध्ये सहभागी होताना थोडे अवघडल्यासारखे व्हायचे. एखाद्या मुलीनी काही वेगळे केले, की तिच्याबद्दलचा एखादा कटाक्ष वर्गाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाताना मी कितीतरी वेळा पकडलेला आहे. त्या कटाक्षाचा अर्थ, आणि त्यामुळे जिच्याबद्दल तो सोडला जातो आहे तिला होणार त्रास, या सगळ्याची मूक साक्षीदार झाल्याचे मला अगदी स्पष्ट आठवते आहे. आणि अगदी आत्ता, आत्ता, शाळेत अतिशय सर्वसामान्य दिसणारी (असणारी) मुलगी आता किती असामान्य झाली आहे याबद्दल असूयावजा, उसासे टाकत घडलेली चर्चादेखील ऐकली आहे. माझी सुट्टी कोल्हापुरात असल्यामुळे, मला टिकली, बांगडी, पैंजण, चमकी या सगळ्याबद्दल फार अप्रूप होते. पण आपल्याला अशा गोष्टींचीदेखील हौस आहे हे उघड करून मला शाळेतल्या त्या आगाऊ मुलींच्या गटात मिळालेलं स्थान गमवायची इच्छा नव्हती. पण ते स्थान मला संपूर्णपणे आवडत देखील नव्हते.

नाक टोचणे हे गावठीपणाचे लक्षण आहे. हे माझे (आजूबाजूच्या मुलींकडून उधार घेतलेले) पहिले मत होते. हे मत ग्राह्य धरले असते तर गावठीपणामध्ये पहिला नंबर माझ्या आईचाच आला असता हे वेगळे सांगायला नको. अर्थात, आई होताक्षणी आपण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात गावठी होतच असतो हेही गृहीतच होते. पण शाळेतल्या माझ्या लाडक्या इंग्रजीच्या बाईंच्या नाकात असाच एक लुकलुकता हिरा असायचा. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या आधी आमचे उच्चार ऑक्सफर्ड - केम्ब्रिजच्या दर्जाचे करून देणाऱ्या बाईपण गावठी? पण दहावीपर्यंत मी माझ्या गटातून येणाऱ्या दबावामुळे याबद्दलचे माझे असे विचार गुप्त ठेवले.

बारावीला असताना जर्मन भाषा शिकवणाऱ्या अतिशय टापटीप, पुरोगामी मॅडमच्या नाकात देखील लुकलुकणाऱ्या पाच हिऱ्यांची कुडी दिसली. नाक टोचून बायका जर्मनसुद्धा शिकवू शकतात हा एक फारच महत्वाचा साक्षात्कार होता. माझ्याही मनात तेव्हा असा लुकलुकता हिरा घ्यायचे विचार येऊ लागले. पण माझ्यावर शाळेत आधुनिक स्त्रीबद्दल झालेले संस्कार अजून तसेच होते. मग इंजिनियरिंगला गेल्यावर वर्गातला एक (देखणा) मित्र मला म्हणाला, "तुला नाकात एक छोटीशी चमकी फार छान दिसेल. मला अशा चमकी घातलेल्या मुली फार आवडतात." या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी नको तसा संबंध जोडून मी पहिल्यांदा नाक टोचले.

तोपर्यंत मला मिळालेले सगळे सल्ले हे कमी वाईट कसे दिसता येईल या अंगाचे असायचे. जसे की, काळ्या मुलींनी फिक्कट गुलाबी किंवा तत्सम रंग घालू नयेत. बारीक दिसण्यासाठी कायम काळे किंवा उभ्या डिझाईनचे कपडे घालावेत. केस कापणारीच्या मते, माझा चेहरा फारच आडवा होता. तो उभा करण्यासाठी तिनी माझ्याकडून भरपूर पैसे घेतले. नाकाबद्दल तर बोलावे तितके कमी. आमच्या गटात सगळ्यात वाईट नाकाचा बहुमान मला मिळाला होता. मागे वळून बघता, आम्ही आपापल्या नाकांमध्ये अशी स्पर्धा का लावत होतो हे तितकेच विचार करण्यासारखे आहे. दहावीतून बाहेर पडेपर्यंत आपण दिसायला चांगले नाही हे खात्रीशीर पटले होते. त्यामुळे कुणीतरी तुला अमुक एक गोष्ट खूप छान दिसेल असे कुठल्याही तडजोडीच्या दिशेने न नेता म्हणणे, हा आश्चर्याचा धक्काच होता.

नाक टोचल्यावर परत कॉलेजला जायच्या आधी नेहमीप्रमाणे "त्याला काय वाटेल" यावर अतिविचार केला. पण त्याने जितक्या दिलखुलासपणे तुला चमकी चांगली दिसेल असे सुचवले होते, तितक्याच दिलखुलासपणे ती दिसते आहे, हेदेखील कबूल केले. पण दोन चार दिवसातच नाक लाल लाल होऊन दुखू लागले. मग तुळशीचा रस, उगाळलेली मिरी, खोबरेल तेल या अशा उपायांमध्ये त्या चमकीनी (माझ्या एकटीच्याच) मनात टाकलेली ठिणगी विझून गेली. काही दिवसांनी नाकापेक्षा मोती जड झाल्यामुळे चमकीला निवृत्त करण्यात आले. एव्हाना मी कुठल्यातरी मुलाच्या पाठीमागे हे असले धाडस केले होते, आणि त्यातल्या दोन्ही गोष्टी विफल झाल्या ही वार्ता शाळा मैत्रिणींना कळली होती. आणि मी बिनचमकीचीच कशी चांगली दिसते यावर मला नको असलेले असे बरेच सल्ले देण्यात आले.

ऑस्ट्रेलियात शिकायला गेले तेव्हा विमानातून उतरल्या उतरल्या आपली पाटी आता संपूर्णपणे कोरी आहे हे लक्षात आले. ब्रिस्बनमधले वेस्टएंड हा माझा सर्वात आवडता भाग बनला. तिथल्या घसरगुंड्यांसारख्या वरती खाली जाणाऱ्या रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी "योगा स्टुडियो" पेरले होते. भारताची आठवण काढत मी तिथल्या योगा क्लासला जाऊ लागले. आधी मित्र मैत्रिणी व्हावेत म्हणून जायचे. नंतर मित्र मैत्रिणींना घेऊन जाऊ लागले. तिथे येणाऱ्या सगळ्या गौरांगना मात्र नाकात रंगीत चमक्या घालून यायच्या. बांधणीच्या कापडाचे ओम नाहीतर गणपतीचे टीशर्ट, त्याखाली धोतरासारखी पॅन्ट, कुरळ्या कुरळ्या केसांना घट्ट मिठी मारणारा कापडी हेयरबँड, गळ्यात जपाची नाहीतर तुळशीची माळ आणि पाठीवर तिरपे, भात्यासारखे लटकलेले योगा मॅट! त्यांचा तो थाट बघून आपण किती कमी भारतीय आहोत असे वाटायला लागायचे. अशाच सायकलवरून योगासनं करायला येणाऱ्या काही मैत्रिणी झाल्या. आणि त्यांच्या नाकातले ते साधे चमचमते खडे पाहून पुन्हा नाक टोचायची इच्छा झाली!

सुट्टी संपवून ब्रिस्बनला येताना माझ्या नाकात पुन्हा ती निवृत्त केलेली हिऱ्याची चमकी आली. माझ्या (सुंदर) सावळ्या रंगावर तो हिरा किती शोभून दिसतोय असं कितीतरी लोकांनी आवर्जून सांगितलं. आणि माझी, माझ्या पुढील काही वर्षं राहिलेल्या हिप्पी ओळखीकडे वाटचाल सुरु झाली. नाकातल्या हिऱ्याला साजेशी अशी पाश्चात्य ओळख तयार करण्यात फारच आनंद मिळाला. आणि उन्हात न बसता लाभलेला माझा रंग कित्येक गौरांगनांच्या कौतुकाचा विषय ठरू लागला. नाक टोचलेल्या मुली आपल्याला चांगल्या समजू शकतात हे लक्षात आल्यावर, मी पुढाकार घेऊन ताशा कित्येक मुलींशी मैत्री केली. आणि त्यातून त्यांच्यादेखील आयुष्यात नाक टोचणे, टॅटू करणे हे अतिशय बंडखोरीचे आहे, असे मानणाऱ्या मैत्रिणी आहेत हे लक्षात आले. नाक न टोचणे बंडखोरीचे समजणाऱ्या, आणि आपला "गहू" वर्ण आपल्याला चांगले स्थळ मिळवून देऊ शकत नाही अशी खात्री असलेल्या मला हा खूपच मोठा (सुखद) धक्का होता.

एकदा नाकात हौशेने चांदीची रिंग घातली आणि पुन्हा तुळशीचा रस वगैरे करायची पाळी आली. मग थिसिसच्या कामात, चमकी पुन्हा एकदा निवृत्त झाली. परत तिची आठवण आली ती अमेरिकेत. मी आणि माझी पट्ट मैत्रीण एलोडी, मिशिगनमधून लास व्हेगसपर्यंत (टप्प्या टप्प्यात) जाणार होतो. आमचे पहिले उड्डाण शिकागोमधून होते. तिथपर्यंतच्या प्रवासात अनेक आठवणी निघाल्या. त्यात ही एक चमकीची कथा होती. ती आठवून काय झाले माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी विमान पकडायच्या आधी शिकागोमधल्या एका पिअर्सिंग स्टुडियोत जाऊन पुन्हा नाकात चमकी घातली. यावेळी मात्र टोचणार्यानी चिघळू नये म्हणून एक अभिनव उपाय सांगितला. एखाद्या कान साफ करायच्या बडनी सतत त्यावर भरपूर मीठ असलेले पाणी लावत राहणे. जखमेवर मीठ चोळल्याने जखम बरीदेखील होते हे अतर्क्य वाटले, पण असे कित्येक विरोधाभास पाहिले असल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे पुन्हा कधीही टोचून घ्यायचे नाही असे ठरवले असल्यामुळे, मी तो मार्ग पत्करला. आमच्या प्रत्येक थांब्यावर हॉटेलमधून भरपूर मीठ घेऊन मी एका बाटलीत माझे औषध तयार ठेवले होते. आणि हा उपाय अजूनपर्यंत कामी येतो आहे. ती साधी टायटेनियमची चमकी मी अजून जपून ठेवली आहे. कारण ती बाहेर काढली की त्या प्रवासातल्या सगळ्या आठवणी जिवंत होऊन डोळ्यासमोर उभ्या राहतात.

सुदैवाने, नाक टोचून घ्यायची ती शेवटची वेळ ठरली. काल नाकातली चमकी काढून नथ घालताना माझी आरशासमोर अर्धा तास झटापट चाललेली पाहून नवरा म्हणाला, "कशाला घालतेस तू हे असले जीवघेणे प्रकार? तू चमकी न घालता सुद्धा मला तितकीच सुंदर वाटतेस!". तेव्हा माझ्या तोंडातून आपसूक निघालेलं, "पण मी चमकी माझ्यासाठी घालते", हे वाक्य माझ्या नकट्या नाकावरचा तो वफादार हिराच बोलला असं वाटून गेलं!

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंयस.

आमच्या लहानपणी गावात शाळेतल्या मुलींना कानात बोळवलेल्या रिंगा आणि नाकात गोल नथनी असा ट्रेंडच होता.
कान टोचणे बारशाला आणि नाक टोचणे पहिली दुसरीत होऊनच जायचे.
त्यामुळे बारावीपर्यंत नोज रिंग वापरलीय.
एम बी बी एस करताना पहिल्यांदा एका खोट्या हिर्‍याची सोन्याची चमकी घेतली. ती आवडणारा नवराही मिळाला म्हणून नाकात राहिली.
मध्येच केव्हातरी 'दागिने मिथ्या' असा विचार डोक्यात घुसून सगळेच दागिने काढून टाकले तेव्हा ती चमकीपण काढली.

हल्लीच भाचीचे कान टोचायला छोटे रिंग केले आणि मी ही एक अमेरिकन डायमंडची चमकी घेतली.
मात्र लेकाला तो प्रकार अज्जिबात आवडला नाही.
दररोज येता जाता नाक बोचकारून, काढून टाक म्हणून शेवटी काढायलाच लावली.
त्याच्यामते टिकली/कानातले/चमकी /पंजाबी ड्रेस ये सब डालके मैं 'बाहरवाली आई' दिखती हुं. साडी पहेनका 'बोरिंग'
घरी आल्यावर मी यातलं बरंचसं काढून ठेवते पण चमकी कुठे काढत बसणार म्हणून काढत नसे. म्हणून शेवटी कायमचीच काढावी लागली.

मस्त लिहिलंय.

स्वामी' कादंबरी वाचून मी पाचवी-सहावीत नथीसाठी नाक टोचून घेतले.माझ्या आजीने घरी नाक टोचले. अर्धी आत गेलेली सुई परत बाहेर काढून परत तिने नाक टोचले.पण मी हूं की चू न करता ते दिव्य केले.(रमाबाईंच्या सती जाण्याच्या वर्णनाचा इफेक्ट असावा.) नंतर ते सुंकल्याची मात्र लाज वाटलेली.
नंतर कधी चमकी काढून ठेवली ते माहीत नाही.
खूप उशीरा नंतर हिर्‍याची चमकी घातली,पण सर्व दागिने काढायची सवय असल्याने चमकी काढून ठेवली जायची ती कधीतरी घातली जायची.मग अशी घातली की सर्दी हम्खास व्हायची.चमकी काढताना नाक सुजलेले वाटायचे.घातली चमकी की२-३ दिवसात झाली सर्दी! यामुळे काढून टाकली ती बरीच वर्षे घातली नाही. आता २ महिन्यांपासून परत चमकी घालायला सुरुवात केली आहे, पण यावेळी काढघाल न करता तशीच ठेवली आहे.नवर्‍याने सुरुवातीला म्हटलेही आता परत सर्दी हवी आहे का?

माझ्या आजीची नथ १५ दिवसांपूर्वी घालून पाहिली,अरे देवा नथीसाठी नाक टोचून घेतले तो प्रकार इतका हॉरिबल दिसतो हे या वयात जाणवले.

छान लिहिलंय.
माझंही नाक टोचल्यावर आधी सोन्याची तार मग चमकी होती. नंतर बर्‍आच चमक्या घेतल्या-घातल्या. मग अचानक मॉर्डन मुली चमकी वैहेरे घालत नाहीत असा साक्षात्कार झाला. आणि चम्की नाकातुन निघाली. आता ही घालत नाही. कधीतरी हौसेने घालते. कधी सणावारी-लग्नाकार्यात घातली तर घाल्ते. नाहीतर बरेचदा नाहीच. कारण चमकी घालुन मी मला स्वतःलाच कमी सुंदर वाटते. Happy
बहुतेक माझ्या कॉलेजच्या वेळी नाकात न घालण्याचा ट्रेंडच होता. कारण बर्‍याच मुलींची नाकं टोचलेली असायची पण चमकी घालायच्या नाहीत.
माझ्या मुलीचं नाक टोचलंच नाही.

मस्त लिहिलंय! एकदम खुसखुशीत Happy
लहानपणी कान नकळत टोचले गेले आहेत.. बाकी टोचाटोची, गोंदागोंदी मला झेपणार नाही हे पक्कं माहिती आहे!

छान लिहल आहे सई..कित्येक आठवणी जागा झाल्या.
आणि उन्हात न बसता लाभलेला माझा रंग कित्येक गौरांगनांच्या कौतुकाचा विषय ठरू लागला. >>>> हे गोर्या रंगाचे वेड भारतीयांनाच जास्त. Proud

>>>त्याच्यामते टिकली/कानातले/चमकी /पंजाबी ड्रेस ये सब डालके मैं 'बाहरवाली आई' दिखती हुं.
Happy मुलांचे आयांच्या पेहेरावावर फारच लक्ष असते!! माझा २ वर्षाचा मुलगा सुद्धा लगेच विचारतो काही वेगळं घातलं की!

>>स्वामी' कादंबरी वाचून मी पाचवी-सहावीत नथीसाठी नाक टोचून घेतले.माझ्या आजीने घरी नाक टोचले. अर्धी आत गेलेली सुई परत बाहेर काढून परत तिने नाक टोचले.पण मी हूं की चू न करता ते दिव्य केले.(रमाबाईंच्या सती जाण्याच्या वर्णनाचा इफेक्ट असावा.)

हा हा! घरी टोचण्याचे मी पण बरेच किस्से ऐकले आहेत. माझ्या आईनी स्वतःच नाक टोचून घेतले होते! त्यामानाने मी फार भित्री निघाले. पण तीन वेळा टोचून भरपाई केली

>>बहुतेक माझ्या कॉलेजच्या वेळी नाकात न घालण्याचा ट्रेंडच होता. कारण बर्‍याच मुलींची नाकं टोचलेली असायची पण चमकी घालायच्या नाहीत.
सेम! मला वाटतं आता नोज रिंग खूप जास्त इन आहे. त्यात असे बरेच दागिन्यांचे ब्रँड पण निघालेत. पण गमतीशीर असतात हे ट्रेंड्स. आपण जे नाकारत मोठे झालो ते सगळे करायला लागले की जरा बुचकळ्यात पडायला होतं!

अभिप्रायाबद्दल सगळ्यांचे आभार!! Happy

आपण जे नाकारत मोठे झालो ते सगळे करायला लागले की जरा बुचकळ्यात पडायला होतं!> हो. आणि कधी कधी हॅ! हे मी ही घातलंय. आता नव्याने आली पुन्हा ही स्टाइल असंही म्हण्ता येतं. Happy

छान लिहिले आहे सई. मला खूप हौस होती नथ घालायची म्हणून मी नाक टोचून घेतले. मग सानिया मिर्झा सारखी रींग घालायची फॅशन आली तेव्हापासून नाकात रींग आहेच

आणि त्यातून त्यांच्यादेखील आयुष्यात नाक टोचणे, टॅटू करणे हे अतिशय बंडखोरीचे आहे, असे मानणाऱ्या मैत्रिणी आहेत हे लक्षात आले. >>>>> हे मात्र खरेच. मी लग्नानंतर ऑस्ट्रेलियाला गेले तेव्हा माझ्या नाकात रिंग होती. नवर्‍याच्या एका ऑस्ट्रेलियन मित्राने त्याला विचारले होते की "तुझी बायको non-conformist आहे का?" त्याला एक मिनिट काही कळलेच नाही की हा असे का विचारतो. मग मित्रानेच सांगितले "नाकात रींग आहे म्हणून विचारले"!! ऑस्ट्रेलियात आणि युके मध्ये शिकताना, जॉब करताना माझ्या कलिग्ज, बॉसेस, आणि बरोबरीच्या इतर स्टुडंट्सला सुद्धा माझ्या नाकातील रींगबद्दल फार कुतुहल वाटायचे

>>>वर्‍याच्या एका ऑस्ट्रेलियन मित्राने त्याला विचारले होते की "तुझी बायको non-conformist आहे का?"

एकदा मेलबर्नमध्ये एका बाईच्या हातावर असा रंगीत मोराचा टॅटू बघितला होता. संपूर्ण फ़ोरआर्म त्याचा पिसारा आणि कोपरापाशी मागे वळून बघणारा मोर. आपल्या खेड्यांमध्ये सुद्धा तसाच मोर गोंदून घेतात. पण इथे कन्फर्मिस्ट म्हणून घेतात. किंवा निरागस असतात म्हणून. काय माहित.
अर्थात आपल्याला टॅटू, योगा म्हणून खपवले की सगळे जास्त आकर्षक वाटते. Happy
टॅटूची ख्वाईश मात्र अपुरी राहिली.

छान लिहीले आहे. पण इतके काँप्लेक्सेस का बरे? आपण मस्तच असतो. माझे पण नाक टोचलेले आहे. नवी नथ घेते आता.

अर्थात आपल्याला टॅटू, योगा म्हणून खपवले की सगळे जास्त आकर्षक वाटते >> हे मात्र खरे अगदी.

टॅटूची ख्वाईश मात्र अपुरी राहिली.>> का बरे?? आवडत असेल तर घ्या की एक टॅटू करून

गाडी tatoo कडे वळलीच आहे म्हणून माझे ४ आणे.
१२-ते डिग्री च्या प्रवासात tatoo म्हणजे काहीतरी हिप्पी असे डोक्यात फिट्ट बसले होते.
नंतर ंtatoo म्हणजे बोल्डनेस असे समीकरण डोक्यात तयार झाले
मग खूप वर्षे तो विषय डोक्यातूनच गेला.
बत्तीशी पार केल्यावर परत डोक्यात tatoo चा किडा वळवळायला लागला.
बायको ने त्याची सरते तारुण्य पकडून ठेवायची धडपड अशी संभावना केली Happy
शेवटी आयुष्यातील पहिली हाफ माराथोन धावलो तर tatoo करायचा असे स्वत: ला प्रोमीस केले
२०१५ मध्ये पहिली हाफ marathon धावलो, तरी tatoo करायचा धीर होत नव्हता, शेवटी धीर एकवटून २०१६ मध्ये पोटरीवर tatoo करून घेतला Happy
आजी, मावश्यांनी यथेच्छ नाके मुरडली ,
जन्मात एकदातरी करून बघायच्या गोष्टींमध्ये tatoo चा नंबर होता Happy

टॅटू आणि eyebrow piercing हे दोन्ही करायचं आहे... बघू योग कधी येतो.
लेख मात्र उत्तम आहे Happy

लेख खुप मस्त जमला आहे! लेख वाचून मलाही नाकात हिरा किंवा नथनी घालवीशी वाटतेय!

Conformist म्हणजे काय?

वत्सला disctionary meaning of conformist is "conforming to accepted behaviour or established practices; conventional." and the meaning of non-conformist is "characterized by behaviour or views that do not conform to prevailing ideas or practices."

खूपच छान लेख. Happy माझ्या नाकात सोन्याची तार होती. नववीला एक खडा घेतला पण तो सारखा झोपेत पडून जाय्चा किन्वा पांघरुणात अडकायचा. तो काढला ते परत आला नाही. एक दोनदा प्रयत्न केला परत घालायचा पण नाक खूप दुखले मग राहून गेला.
लेख वाचून मला असलेले असेच न्यूनगंड आठवले. त्या त्या काळात स्वतःबद्दल किती समज करुन घेतो आपण आणि तेच मनात ठेवून अनेक वर्षे जातात. आताशी थोडी थोडी बाहेर पडत आहे. या लेखाने पुन्हा त्याची जाणीव करुन दिली.

मस्त लिहलयं Happy
मला लहान असल्यापासुनच नाकात चमकी घालायला प्रचंड आवडायचे. सुरवातीला नाक सोन्याच्या तारेने टोचलेले पण मला सर्दी झाली आणि नाक सुजले. तरीही त्यावर तेल मिश्रीत कुंकू लावून फिरायला लय भारी वाटायचं Proud नाक जास्तच सुजल्यामुळे ती तार काढुन टाकली. परत काही वर्षांनी माझी चमकी घालायची इच्छा वर आली पुन्हा टोचाटोची, पुन्हा सर्दी + सुजणे Lol असे दोन तीन वेळा झाले मग शेवटी मी त्या चमकत्या खड्यांच्या टिकल्या मिळतात ना हिर्‍यांसारख्या त्या नाकाला चिटकवू लागली आणि झाली माझी हिर्‍याची चमकी तयार Wink

मग लग्न ठरल्यावर आईने ताकीद दिली की आता नाक टोच आणि नाक सुजले तरी लगेच चमकी काढु नको कारण लग्नात नथ घालायची होती. तेव्हाही मी चिमटेवाली नथीचा ऑप्शन दिलेला पण सगळ्यांनी तो उधळून लावला :हाहा
अखेर नाक टोचले, तेव्हाही आधीसारखा त्रास झालाच पण ८-१० दिवसांनी नाकाला सवय झाली बहुतेक चमकीची मग त्रास कमी होऊन बंद झाला. तेव्हापासुन आज १० वर्षे झाली माझ्या नाकातली चमकी काही निघाली नाही, हां पॅटर्न/डिझाईन चेंज झाले तेव्हा ५-१० मिनिटांसाठी चमकी काढत असेल तेव्हढचं Happy
लेक तिचे नाक टोचायचं म्हणुन मागे लागलेय, ती आता ६ वर्षाची आहे पण माझीच सावली आहे ना, नाक नाही टोचत म्हणुन तीपण टिकली लावुन फिरते नाकाला Lol दोन तीन वेळा तिला चिमटेवाल्या नोजरिंग घेऊन दिल्या पण त्या लगेच पडुन हरवल्या त्यामुळे टिकल्याच परवडतात Wink यंदाच्या सुट्टीत टोचतेच तिचे नाक, प्रॉमिस घेतलयं बाईसाहेबांनी माझ्याकडुन Happy

माझ्यावेळेस पन नाक न टोचाय्ची फॅशन होती शायद..कारण हरेक मुलगी नाक टोचलेली असायची..
मी कित्त्येक सोन्याच्या ताराच्या चमक्या हरवल्या त्याला गिणती नाही...मला ते मेंटेन करणे जाम जीवावर यायचे..
पुढे ग्रूज्युएशन ला असताना परत ती चमकी हरवली त्यानंतर मात्र सॉफ्ट स्किलच्या सरांनी कॉर्पोरेट मधे नथनी घालणे अलाउ नाही असे म्हटले आहे अशी थाप मारुन मी ते बंद केल .. आता बुंडर्‍या नाकानीच फिरतेय तेव्हापासुन...तरी अधे मधे आई नाक टाचुन घे चा धोशा लावते पण त्याला पद्धतशीरपणे बगल द्यायला शिकलीए मी..

आदिवासी लोकांमधे गोंदण हा प्रकार असतोच.. माझ्याकडे सर्वांच्याच अंगावर आहे तो पारंपारीक पद्धतीने केलेला.
मी तेवढी राहिली...त्यामुळे टॅटू ची हौस लवकरच पूर्ण करेल मी येत्या काही दिवसात वगैरे...
गोंदण म्हणजे माणसाचे दागिणे समजले जातात गोंड जमातीत..
ते एकच लेणं जे तुम्ही मरणानंतरही सोबत घेउन जाता म्हणुन गोंदण हवच अंगावर अशी समजुत आहे.. आजकाल नवी पिढी नाही करत म्हणा पण मी हटकून करणारे Wink Happy

मी पण ३/४ वेळा टोचुन ही चमकी रींग कमीच घातली.
टॅटू मात्र कधी केला नाही.
ते एकच लेणं जे तुम्ही मरणानंतरही सोबत घेउन जाता म्हणुन गोंदण हवच अंगावर अशी समजुत आहे << हे नवीनच ऐकल. एखादा करुन घ्यायला पाहीजे.!

कॉलेजात असताना नाक टोचले होते तेव्हाची एक आठवण. नाक टोचणे म्हंटले की हाच प्रसंग आठवतो. बॉ.फ्रे. बरोबर बीचवर गेलेहोते तेव्हा मनसोक्त भिजल्यावर बॉ.फ्रे. ने खिशातला रुमाल दिला केस पुसायला. केस इकडे तिकडे झटकुन पुसण्याच्या नादात रुमालाचा धागा चमकीच्या तारेत अडकला. कसा ते देवच जाणे. मी दुसरीकडे तोंड वळवुन तो सोडवण्याच्या प्रयत्नात. आणि बॉ.फ्रे. संशयग्रस्त की ही अशी काय झटका आल्यासारखी तोंड फिरवुन बसलेय. दोनेक मिनिटांनी मी त्याच्याकडे तोंड वळवले, नाकात अडकलेल्या रुमालासकट. त्यानेच सोडवली चमकी रुमालातुन अलगद मग. (एकदम रोमँटीक) . धाग्याच्या निमित्ताने आठवले Wink

मस्त लिहिलय सई. नुकतीच लेकीने नाक टोचून घ्यायची हौस पुरी केली, तिचही चालू आहे ते सी सॉल्ट ने नाकाला स्नान घालणे रोज Happy

मी एकदाही नाक टोचलं नाहीये...कोणत्या नाकाने प्रतिक्रिया देऊ इथे..
पण मागच्या काही महिन्यांपासून फार इच्छा होतेय, आता पुढ्च्या भारतवारीत टोचावं म्हणते
टीने टॅटू करून घेतांना खूप दुखतं ना? इथे अजून कोणी टॅटू करून घेतलाय का? कसा अनुभव होता सांगा ना प्लीज
आणि हो, सगळ्यांचे किस्से मस्तच Happy

Mala kalpasun saglyanna sangayche ahe kee saglech kisse bhari ahet. Pan phone war devnagrit lihita yet naslyane lihile jat navte. Boyfriend cha romantic kissa pan bhari ahe! Tattoo karaycha ahe pan nantar ugich kela asa watayla nako itki maturity alyavar. Tevdhi ali ahe ka te kalat naiye.

@ Ama
Complex hotach adhipasun. Tya complex chya ajubajunech ha lekh rachla ahe. Khara tar teenage madhe mula mulinna gharun tyanchya disnyabaddal kinva ekun kuvati baddal kitihi protshahan ani kautuk milale tari highschool he kharya jagache ek khup concentrated rroop aplyala adhich baghayla milte. Highschool madhe gelela confidence kinva aslela overconfidence ayushyat khup divas tikun rahto. Pan mage valun baghtana ase watate kee confidence kami hota tech bare hote. Karan nantar to parat milavnyasathi khup vichar kela gela.

Pages