नकट्या नाकातली हिरकणी

Submitted by सई केसकर on 29 March, 2017 - 07:39

लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी संपली की हमखास एखादी वर्गातली मुलगी नाकात नाजूक सोन्याची तार घालून यायची. त्या तारेच्या गाठीला चिकटलेला एखादा लाल नाहीतर काळा लुकलुकणारा मणी असायचा. आमच्या मैत्रिणींच्या गटात मात्र अशा नाक टोचून आलेल्या मुलींची यथेच्छ थट्टा व्हायची. नाक टोचणे, छोटी लाल टिकली लावून येणे, कॅनव्हासच्या बुटांच्या आणि आतल्या मोज्यांच्या वरून पायात पैंजण घालून येणे (हे असे का करतात ते एकदा पैंजण आत ठेऊन भयंकर टोचल्यावर कळले) या सगळ्याची "आमच्या" गटात फार निंदा व्हायची.

पण नुकतीच शाळा बदलून नवीन शाळेत आल्यामुळे मला या अशा सौम्य दादागिरीमध्ये सहभागी होताना थोडे अवघडल्यासारखे व्हायचे. एखाद्या मुलीनी काही वेगळे केले, की तिच्याबद्दलचा एखादा कटाक्ष वर्गाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाताना मी कितीतरी वेळा पकडलेला आहे. त्या कटाक्षाचा अर्थ, आणि त्यामुळे जिच्याबद्दल तो सोडला जातो आहे तिला होणार त्रास, या सगळ्याची मूक साक्षीदार झाल्याचे मला अगदी स्पष्ट आठवते आहे. आणि अगदी आत्ता, आत्ता, शाळेत अतिशय सर्वसामान्य दिसणारी (असणारी) मुलगी आता किती असामान्य झाली आहे याबद्दल असूयावजा, उसासे टाकत घडलेली चर्चादेखील ऐकली आहे. माझी सुट्टी कोल्हापुरात असल्यामुळे, मला टिकली, बांगडी, पैंजण, चमकी या सगळ्याबद्दल फार अप्रूप होते. पण आपल्याला अशा गोष्टींचीदेखील हौस आहे हे उघड करून मला शाळेतल्या त्या आगाऊ मुलींच्या गटात मिळालेलं स्थान गमवायची इच्छा नव्हती. पण ते स्थान मला संपूर्णपणे आवडत देखील नव्हते.

नाक टोचणे हे गावठीपणाचे लक्षण आहे. हे माझे (आजूबाजूच्या मुलींकडून उधार घेतलेले) पहिले मत होते. हे मत ग्राह्य धरले असते तर गावठीपणामध्ये पहिला नंबर माझ्या आईचाच आला असता हे वेगळे सांगायला नको. अर्थात, आई होताक्षणी आपण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात गावठी होतच असतो हेही गृहीतच होते. पण शाळेतल्या माझ्या लाडक्या इंग्रजीच्या बाईंच्या नाकात असाच एक लुकलुकता हिरा असायचा. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या आधी आमचे उच्चार ऑक्सफर्ड - केम्ब्रिजच्या दर्जाचे करून देणाऱ्या बाईपण गावठी? पण दहावीपर्यंत मी माझ्या गटातून येणाऱ्या दबावामुळे याबद्दलचे माझे असे विचार गुप्त ठेवले.

बारावीला असताना जर्मन भाषा शिकवणाऱ्या अतिशय टापटीप, पुरोगामी मॅडमच्या नाकात देखील लुकलुकणाऱ्या पाच हिऱ्यांची कुडी दिसली. नाक टोचून बायका जर्मनसुद्धा शिकवू शकतात हा एक फारच महत्वाचा साक्षात्कार होता. माझ्याही मनात तेव्हा असा लुकलुकता हिरा घ्यायचे विचार येऊ लागले. पण माझ्यावर शाळेत आधुनिक स्त्रीबद्दल झालेले संस्कार अजून तसेच होते. मग इंजिनियरिंगला गेल्यावर वर्गातला एक (देखणा) मित्र मला म्हणाला, "तुला नाकात एक छोटीशी चमकी फार छान दिसेल. मला अशा चमकी घातलेल्या मुली फार आवडतात." या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी नको तसा संबंध जोडून मी पहिल्यांदा नाक टोचले.

तोपर्यंत मला मिळालेले सगळे सल्ले हे कमी वाईट कसे दिसता येईल या अंगाचे असायचे. जसे की, काळ्या मुलींनी फिक्कट गुलाबी किंवा तत्सम रंग घालू नयेत. बारीक दिसण्यासाठी कायम काळे किंवा उभ्या डिझाईनचे कपडे घालावेत. केस कापणारीच्या मते, माझा चेहरा फारच आडवा होता. तो उभा करण्यासाठी तिनी माझ्याकडून भरपूर पैसे घेतले. नाकाबद्दल तर बोलावे तितके कमी. आमच्या गटात सगळ्यात वाईट नाकाचा बहुमान मला मिळाला होता. मागे वळून बघता, आम्ही आपापल्या नाकांमध्ये अशी स्पर्धा का लावत होतो हे तितकेच विचार करण्यासारखे आहे. दहावीतून बाहेर पडेपर्यंत आपण दिसायला चांगले नाही हे खात्रीशीर पटले होते. त्यामुळे कुणीतरी तुला अमुक एक गोष्ट खूप छान दिसेल असे कुठल्याही तडजोडीच्या दिशेने न नेता म्हणणे, हा आश्चर्याचा धक्काच होता.

नाक टोचल्यावर परत कॉलेजला जायच्या आधी नेहमीप्रमाणे "त्याला काय वाटेल" यावर अतिविचार केला. पण त्याने जितक्या दिलखुलासपणे तुला चमकी चांगली दिसेल असे सुचवले होते, तितक्याच दिलखुलासपणे ती दिसते आहे, हेदेखील कबूल केले. पण दोन चार दिवसातच नाक लाल लाल होऊन दुखू लागले. मग तुळशीचा रस, उगाळलेली मिरी, खोबरेल तेल या अशा उपायांमध्ये त्या चमकीनी (माझ्या एकटीच्याच) मनात टाकलेली ठिणगी विझून गेली. काही दिवसांनी नाकापेक्षा मोती जड झाल्यामुळे चमकीला निवृत्त करण्यात आले. एव्हाना मी कुठल्यातरी मुलाच्या पाठीमागे हे असले धाडस केले होते, आणि त्यातल्या दोन्ही गोष्टी विफल झाल्या ही वार्ता शाळा मैत्रिणींना कळली होती. आणि मी बिनचमकीचीच कशी चांगली दिसते यावर मला नको असलेले असे बरेच सल्ले देण्यात आले.

ऑस्ट्रेलियात शिकायला गेले तेव्हा विमानातून उतरल्या उतरल्या आपली पाटी आता संपूर्णपणे कोरी आहे हे लक्षात आले. ब्रिस्बनमधले वेस्टएंड हा माझा सर्वात आवडता भाग बनला. तिथल्या घसरगुंड्यांसारख्या वरती खाली जाणाऱ्या रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी "योगा स्टुडियो" पेरले होते. भारताची आठवण काढत मी तिथल्या योगा क्लासला जाऊ लागले. आधी मित्र मैत्रिणी व्हावेत म्हणून जायचे. नंतर मित्र मैत्रिणींना घेऊन जाऊ लागले. तिथे येणाऱ्या सगळ्या गौरांगना मात्र नाकात रंगीत चमक्या घालून यायच्या. बांधणीच्या कापडाचे ओम नाहीतर गणपतीचे टीशर्ट, त्याखाली धोतरासारखी पॅन्ट, कुरळ्या कुरळ्या केसांना घट्ट मिठी मारणारा कापडी हेयरबँड, गळ्यात जपाची नाहीतर तुळशीची माळ आणि पाठीवर तिरपे, भात्यासारखे लटकलेले योगा मॅट! त्यांचा तो थाट बघून आपण किती कमी भारतीय आहोत असे वाटायला लागायचे. अशाच सायकलवरून योगासनं करायला येणाऱ्या काही मैत्रिणी झाल्या. आणि त्यांच्या नाकातले ते साधे चमचमते खडे पाहून पुन्हा नाक टोचायची इच्छा झाली!

सुट्टी संपवून ब्रिस्बनला येताना माझ्या नाकात पुन्हा ती निवृत्त केलेली हिऱ्याची चमकी आली. माझ्या (सुंदर) सावळ्या रंगावर तो हिरा किती शोभून दिसतोय असं कितीतरी लोकांनी आवर्जून सांगितलं. आणि माझी, माझ्या पुढील काही वर्षं राहिलेल्या हिप्पी ओळखीकडे वाटचाल सुरु झाली. नाकातल्या हिऱ्याला साजेशी अशी पाश्चात्य ओळख तयार करण्यात फारच आनंद मिळाला. आणि उन्हात न बसता लाभलेला माझा रंग कित्येक गौरांगनांच्या कौतुकाचा विषय ठरू लागला. नाक टोचलेल्या मुली आपल्याला चांगल्या समजू शकतात हे लक्षात आल्यावर, मी पुढाकार घेऊन ताशा कित्येक मुलींशी मैत्री केली. आणि त्यातून त्यांच्यादेखील आयुष्यात नाक टोचणे, टॅटू करणे हे अतिशय बंडखोरीचे आहे, असे मानणाऱ्या मैत्रिणी आहेत हे लक्षात आले. नाक न टोचणे बंडखोरीचे समजणाऱ्या, आणि आपला "गहू" वर्ण आपल्याला चांगले स्थळ मिळवून देऊ शकत नाही अशी खात्री असलेल्या मला हा खूपच मोठा (सुखद) धक्का होता.

एकदा नाकात हौशेने चांदीची रिंग घातली आणि पुन्हा तुळशीचा रस वगैरे करायची पाळी आली. मग थिसिसच्या कामात, चमकी पुन्हा एकदा निवृत्त झाली. परत तिची आठवण आली ती अमेरिकेत. मी आणि माझी पट्ट मैत्रीण एलोडी, मिशिगनमधून लास व्हेगसपर्यंत (टप्प्या टप्प्यात) जाणार होतो. आमचे पहिले उड्डाण शिकागोमधून होते. तिथपर्यंतच्या प्रवासात अनेक आठवणी निघाल्या. त्यात ही एक चमकीची कथा होती. ती आठवून काय झाले माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी विमान पकडायच्या आधी शिकागोमधल्या एका पिअर्सिंग स्टुडियोत जाऊन पुन्हा नाकात चमकी घातली. यावेळी मात्र टोचणार्यानी चिघळू नये म्हणून एक अभिनव उपाय सांगितला. एखाद्या कान साफ करायच्या बडनी सतत त्यावर भरपूर मीठ असलेले पाणी लावत राहणे. जखमेवर मीठ चोळल्याने जखम बरीदेखील होते हे अतर्क्य वाटले, पण असे कित्येक विरोधाभास पाहिले असल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे पुन्हा कधीही टोचून घ्यायचे नाही असे ठरवले असल्यामुळे, मी तो मार्ग पत्करला. आमच्या प्रत्येक थांब्यावर हॉटेलमधून भरपूर मीठ घेऊन मी एका बाटलीत माझे औषध तयार ठेवले होते. आणि हा उपाय अजूनपर्यंत कामी येतो आहे. ती साधी टायटेनियमची चमकी मी अजून जपून ठेवली आहे. कारण ती बाहेर काढली की त्या प्रवासातल्या सगळ्या आठवणी जिवंत होऊन डोळ्यासमोर उभ्या राहतात.

सुदैवाने, नाक टोचून घ्यायची ती शेवटची वेळ ठरली. काल नाकातली चमकी काढून नथ घालताना माझी आरशासमोर अर्धा तास झटापट चाललेली पाहून नवरा म्हणाला, "कशाला घालतेस तू हे असले जीवघेणे प्रकार? तू चमकी न घालता सुद्धा मला तितकीच सुंदर वाटतेस!". तेव्हा माझ्या तोंडातून आपसूक निघालेलं, "पण मी चमकी माझ्यासाठी घालते", हे वाक्य माझ्या नकट्या नाकावरचा तो वफादार हिराच बोलला असं वाटून गेलं!

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिले आहे.
मला नाही आवडत नाक टोचलेले, लहानपणी माझ्या बहिणीने नाक टोचले तेव्हा मलाच तिचा राग आला होता.
पण खरेच काहींना खूप छान दिसते.
नाक, कान टोचल्यावर तिथे infection होऊ नये म्हणून सुरुवातीला काही दिवस कडुनिंबाची बारिक काडी घातली जायची.

छान लेख आहे .

का कोण जाणे मला या नाक टोचणे /गोंदवणे प्रकारचं कधीही आकर्षण वाटलं नाही . नातेवाईक मंडळी /फ्रेंड मध्ये बऱ्याच जणींनी नाक टोचून घेतलं होतं .पण मला काहीच फरक पडला नाही .उलट नंतरचे सव्यापसव्य पाहून हे सगळं कधीच करणार नाही असं मनाशी ठरवलं होतं ते अजूनही पाळतेय आणि पाळेन . Happy

रच्याकने, गोंदवून वा टॅटू काढून घेतल्यावर ६ महिन्यापर्यत रक्तदान करता येत नाही असे ऐकले आहे .खरंय का ?

छान लिहिलंय. मी अकरावीत नाक टोचून घेतलं. पहिले काही महिने रिंग आणि मग चमकी . तस तीन चार वर्ष घालत होतेच. नाक टोचल्यामुळे एक बर झालं . फक्शन ला वगैरे खोटी ( चापाची ) नथ न घालता खरी नथ घालायला मिळाली . मग काही वर्षांनी ऑफिसमधे घालायला सुरवात केली गंमत म्हणजे चार पाच वर्ष घालत नव्हते तरी टोचलेले नाक बुजलं नव्हतं . त्यानंतर मात्र बऱ्याच वर्षात नाहीच. पण अंग चिडक नसल्याने नाक लाल होतंय/ झालंय सुजलंय असा त्रास झाला नाही . तस कानात पण चिक्कार खोटे घातले पण कांन कधीच चिडले नाहीत Happy

टॅट्टू केल्यावर काही दिवस त्या भागावर पाणी लागुद्यायचे नाही असेऐकले आहे.
लिगली ब्लॉन्ड(च की अजुन कोणत्यातरी) मधे ह्यावरुन एक केस सॉव्ह केली आहे Happy

एक सांगायचच राहिलं..
आम्हीपन दुखल्या जागी म्हणजे नाक कान टोचलेल्या जागी खोबरेल तेल आणि कुंकू लावत असु Happy

माझ्या मैत्रिणीने आरशात बघुन करकटकने नाक टोचले होते. मग सेप्टीक झाले आणी आईवडिलांचा जबरदस्त ओरडा खाल्लेला तिने, मारही. नाक चांगले १५ दिवस तरी दुखले तिचे.

मला नाक टोचलेले अजिबात आवडत नसे. कदाचित अजुनही नाही आवडत स्वतःसाठी. पण हल्लीच्या नोझरिंगा मस्त असतात.
मी नाक नाही, पण कानाला टोचून घेतले होते ५-७ वर्षांपूर्वी. म्हणजे कानाला वरच्या बाजूला. वर्षभर घातले ते सोन्याचे गोडूस छोटे कानातले. पण दर वेळेस केस अडकणे, ते खूप दुखणे, मग पुढे नील आल्यावर तर संभावित हल्ले दिसल्यावर मीच काढून ठेवले ते. परत घातले नाही..

Thank God I was not in Pune while growing up ase vatale sai cha ha lekh vachun.
Prasthapit group vagaire sagale asale tari bakichyanna dignity nahi, tuccha kataksha vagaire prakar navhate amachya gavat.
He group, group che norms, shahanya/hushar vagaire mullincha group he prakar punyachya cousins kade pahilele.
Somehow I have realized if u want to be part of the so called prasthapit group, u need to be nasty towards others. I was once almost about to be part of one such groups on an online e forum, but within few days I realized I am not being nice/who I am - and I absolutely hated it.
I left that association.
Not sure if it feels like too much generalization, but I have observed this fact in many so called popular groups..

मस्त लेख सई ! बर्‍याच दिवसांनी तुझ्या वर्जिनल शैलीतला लेख वाचायला छान वाटलं. Happy
बाकीच्यांचे किस्सेही मनोरंजक आहेत. Happy

नानबा, लेखात पुण्यातला प्रतिष्ठित ग्रुप सोडून बाकीचं बरच काही पण आहे की.. Wink

छान लिहिलं आहेस.
शाळा ग्रूप्सबद्दल काही ठिकाणी 'अगदी अगदी' झालं. आमच्या पेठी शाळेत नाक टोचणं वगैरे इश्यू नसायचा खरंतर पण प्रस्थापित गट, दिसणं राहाणं यावरून मुलींची नकळत्/कळत होत राहाणारी प्रतवारी (मुली आणि शाळा दोन्हीकडून), गोर्‍या रंगाचं अलिखित महत्व वगैरे होतंच होतं. नशीबाने माझ्या वर्गात असलेल्या प्रस्थापित मुली कुचकट नव्हत्या एवढंच.
मुळात दुसर्‍याच्या दिसण्याची (विशेषतः मुलींच्या) अगदी लहानपणापासून होणारी अतिचिकित्सा, तीही त्या व्यक्तीच्या तोंडावर, करणे हे पेठी मराठी मध्यमवर्गाचे व्यवच्छेदक लक्षण आहे का काय असे मला काही वर्षे वाटत असे. शाळेतून आणि त्या वयात बाहेरून ऐकलेल्या प्रतिक्रियांनंतर आलेले गंड घालवायला बराच काळ जावा लागला....

मला दुखवादुखवी करून घेण्यात रस नसल्याने मी अजिबात कधी फंदात पडले नाही.

Sai,
Atishay sunder lekh. Prasnna ani halka- fulka!

Sai,
Apratim sunder lekh. Prasnna ani halka-fulka!

Sai,
Apratim sunder lekh. Prasnna ani halka-fulka!

Sai,
Apratim sunder lekh. Prasnna ani halka-fulka!

मस्त लिहिले आहे.
दुर्दैवाने माझ्याकडे यावर लिहिण्यासारखे काही नाही. माझी गर्लफ्रेण्डदेखील हा शौक बाळगत नाही. सर्वांना शोभतही नाही.
बाकी फोटोतही दिसत आहे सुंदर सावळ्या नाकातील चमकी Happy

Parag, read varada's post :p
I have seen people carrying these complexes long into adulthood and it takes away so much of happiness from people..

मला माझं नाक टोचून घेण्यात कधीच इंटरेस्ट नव्हता पण तरुण मुली लग्नात नाहीतर पूजेला वगैरे नथ घालतात त्या आवडतात .

लेख मस्तच जमलाय .

नानबा, तू पुण्यात न वाढताही पुण्यातील सो कॉल्ड प्रस्थापित गृप्सच्या नावे बोटंच मोडत आहेस. व्हॉट्स द डिफरन्स!? Happy मी पुण्यात वाढले. पण आमच्या शाळेत असे अनुभव आले नाहीत. काहींना शाळेत तसे अनुभव आले असतील तर त्याने तो रूल नाही होत ना?
मला सईच्या लेखातील ते उल्लेख उलट मॅचुअर्ड होण्याचे लक्षण वाटले. की लहानपणी करतो आपण असा वेडेपणा. पण पुढे जाऊन आपणही बदलू शकतो.

@ बस्के, ए असं नाही हं बोलायचं! पोस्ट चा उद्देश माझा कसा वाल्याचा वाल्मिकी झाला / सुबह का भूला शाम को घर ...... अशी आहे. शुद्धीकरण झाल्याचे कौतुक राहिले बाजुला आणि तुम्ही खुसपटं काढत बसले Sad Not acceptable hmm! प्रस्थापितांविरुद्ध उठाव हवा.

Baske, mat mandane aani group karun sprushya asprushya tharavane hyat farak ahe na?
Tuzi ani parag chi na paTalay he sanganari post ani tya nantarachi rajasinchi kalalavi + jihad karata pukara karanari post, hyatala Jo farak ahe na toch farak.

Mat mandu shakato, tee paTali nahit sangu shakato, pan group chya viruddha kahi vatalyas matahi mandata yeu naye he je asat tyabaddal bolatey.
Punyatalya shalanbaddalacha tuza anubhav mazya anubhavapeksha adhik direct ahe - he manya karate, sarasakat ase nasel he mhanashi note karate.
Pan dusari baju ashihi ahe ki gele kahi varsh Mee punyat rahatey, iit classes , mulanche vargatale behavior hya nimittane anek aayanshi /ayanchya grp shi discussion hote.
Ani anekada punyat vadhalelya aayanna jya goshti normal vatatay tya baherun aalelya aayanna khatakatat - he hee pahile ahe. (Udaharanarth - IIT chya class chi entrance clear keleli ani na keleli mule hya nusar group zalyache Eka Aai la yogya ani Eka Aai la maitri chya drushtine ayogya vatate)
Manasa Manasa madhalya kahi darya shahara madhye jast mothya vatatat - asa maz observation.
Ani Mee hee ata punyatach rahitiye - this city is providing me food and shelter and much more. So mazahi hya shakaravar prem ahech. Ho farak disala to namud kela. Ulat farak disala asata ani vishay asata tar to hi nondavala asata.

He kadachit tumhala paTal nahi - tar apalya apalya anubhav vishwavar adharit apali apali mat, asa mhanun agree to disagree mhanun sodun dein Mee.

Sorry for English typing.. my minglish keyboard is misbehaving on cell phone.

@नानबा, वरदा

>>Parag, read varada's post :p
I have seen people carrying these complexes long into adulthood and it takes away so much of happiness from people..

तुमच्याशी मी काही अंशी सहमत आहे. पण फक्त पुण्यातच असे गट नसून अगदी अमेरिकेतही असतात. आणि हे गट अपरिहार्य आहेत. वयात येताना आणि नंतर स्वतःची नीट ओळख पटेपर्यंत या अशा झुंड संस्कृतीमधून जावेच लागते. आणि तुम्ही कुंपणाच्या कुठल्या बाजूला आहात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

पण मला त्यावेळी या अशा गोष्टींची चीड आली असली तरी त्या सौंदर्याच्या किंवा बुद्धिमत्तेच्या प्रस्थापित परिभाषेत मला न बसवल्याबद्दल मी माझ्या नशिबाची फार ऋणी आहे. आत्मविश्वास असणे किंवा नसणे, यापेक्षा सतत काहीतरी करत राहणे जास्त महत्वाचे आहे. कारण आत्मविश्वास असा सतत आत "तू भारी आहेस" असं म्हणणारा आवाज नसतो. आपण हळू हळू या अशा प्रस्थापित गोष्टींच्या विरोधात जाऊनसुद्धा यशस्वी होतोय, यातून आत्मविश्वास येतो. आणि तो यायला वेळ लागणे चांगले आहे असे माझे मत आहे.

१२ वी च्या "तथाकथित" अपयशानंतर मला माझ्या कित्येक शाळा मैत्रिणींच्या आयांनी, "तू आता कॉमर्सला किंवा आर्टस् ला जा" असा काहीही गरज नसलेला सल्ला आपल्या मुलींबरोबर पाठवला होता (मला येऊन सांत्वनपर भेटण्याचीदेखील तसदी या काकवांनी घेतली नाही). यात एक तर "आर्ट्स ला जाणे" म्हणजे आयुष्य संपुष्टात येणे असा एक अतिशय बिनडोक सूर असतो. कदाचित तेव्हा मला अशा निंदकांकडून आर्टस् ला जाण्याचे सल्ले मिळाले नसते तर मी खरंच भाषेचा अभ्यास केला असता. पण मी जो काही पुढे अभ्यास केला, तो मला अतिशय उपयोगी पडला आणि त्यामुळे माझे भाषेवरचे प्रेम कमीदेखील झाले नाही.

पण पुन्हा मागे वळून बघताना असे नक्कीच वाटते, की एखाद्या कमी मार्क मिळालेल्या मुलाला, तो/ती आधीच त्रस्त असताना, मी जाऊन असा, "तुला हे जमणार नाही", असा सल्ला त्याच्या करीअरच्या सुरुवातीला देईन का? तर उत्तर नाही असेच येते. मला कुणाची कुवत ठरवायचा काहीच अधिकार नाही. आणि जी व्यक्ती आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स या तिहेरी जंक्शनवर आधीच उभी आहे तिला असे खच्ची करणारे सल्ले देण्याचा मला काहीही अधिकार नाही. अशावेळी फक्त एकच वाक्य म्हणता येण्याची उदारता असावी (ते आतून पटत असो किंवा नसो), "या मार्कांचा तुझ्या पुढच्या आयुष्याशी घनिष्ट संबंध बिलकुल नाही. आणि तू यावर जास्त विचार न करता तुला हवी ती शाखा निवड".

अशा आठवणी असल्या तरी, ज्यांचे सेल्फ एस्टीम प्रचंड हाय होते त्यांना पुढे काहीच त्रास नाही झाला असेददेखील म्हणता येत नाही. अशा गटांमध्ये वाढलेली बरीच मुलं सतत आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात दमून जाताना सुद्धा दिसलेली आहेत. आणि प्रस्थापित परिभाषेप्रमाणे सतत आजूबाजूच्यांशी तुलना करायची सवय लागलेली देखील मी पाहिलेली आहे. जसे शाळेत मार्क किंवा कुणाला किती रोझेस मिळाली याची तुलना करता येते, तशी आयुष्यात पुढे प्रत्येक गोष्टीची करता येत नाही. आणि नोकरी, पैसे, लग्न, मुलं या सगळ्याची स्पर्धा जिंकलेल्या लोकांनादेखील, "आपण आनंदी का नाही आहोत?" असा प्रश्न पडताना बघितलेले आहे.

Saee, this latest post is so true! I have been on both the sides. Will write more when i get devnagari keyboard.

सई, खूप आवडला हा लेख.
लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत घरीच दिसण्यावरून, स्वभावावरून (स्मार्ट नाही) सारखे ऐकून ते खरेच वाटत असे.
नंतर नवर्याने इतरांची टीका कशी कानाआड करायची आणि पुढे जायचे हे सोदाहरण पटवले.

Pages