फक्त तू नव्हतास!

Submitted by मुग्धमानसी on 18 December, 2012 - 04:17

फक्त तू नव्हतास!

दारापुढे अंगण होतं.. अंगणात जाई होती.
टपोर्‍या शुभ्र फुलांमध्ये गंधाची मजेदार जाळी होती.
जाळित अडकून पडलेले ते दंवाचे टपोरे थेंब...
...आणि थेंबांत तरंगणारं निळंशार आकाश!
त्या आकाशावर हळुवार तरंग उमटवणारा तो तुझाच स्वर होता....
फक्त तू नव्हतास!

दाराला उंबरा होता... आणि उंबर्‍याला ओठंगुन मी... कधीची!
स्तब्ध, निर्जिव पायांमध्ये मैलोगणती प्रवासाचा थकवा घेऊन...
पावलांखाली गुलाबाच्या काही मखमली ओल्या पाकळ्या घेऊन...
माझ्या दारात तु लावलेला तो गुलाब... आणि माझ्या नखातली माती!
मातीत उमटलेले तुझ्या पायांचे ठसे आणि ठशांवर कोरलेले काही अनुत्तरित प्रश्न!
ते प्रश्न सुद्धा तिथंच गुटमळत होते... स्वतःची उत्तरं शोधत होते...
माझ्या अवकाशात तुझं उरलेलं अवकाश वेचत होते.
माझ्यातुन आत-बाहेर करणार्‍या काही अल्लड चपळ पळवाटा...
छातीत भिरभिरणार्‍या काही हळुवार झुळूकी... काही वादळं...
काही पाऊसही तिथंच घुटमळत होते!
फक्त तू नव्हतास!

आकाशाच्या घनगंभीर आर्त हाका...
डोळ्यांत मावेनाश्या झाल्या तेंव्हा ओघळून गालावर आल्या.
ते शब्द चट्कन झेलणारे अन् अर्थ हळुवार टिपणारे...
माझ्या खांद्याला जोडलेले ते हात तुझेच होते!
फक्त तू नव्हतास!

तु कधिच नव्हतास... आणि आता मीही नाही!
दार अजुनही उघडं ठेवते... पण उंबर्‍यावर आताशा मी दिसत नाही!
अंगणात हल्ली माझी मीच काही झाडं लावते...
काही गाणी माझ्यासाठी मीच आताशा गाते...
वाट पहाता पहाता काहितरी करावं... म्हणुन हल्ली जगते!
माझ्या असण्याची नव्हे... तुझ्या नसण्याची साक्ष द्यायला माझे सगळे श्वास होते...
फक्त तू नव्हतास!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकाशाच्या घनगंभीर आर्त हाका...
डोळ्यांत मावेनाश्या झाल्या तेंव्हा ओघळून गालावर आल्या.
>>
छान ! Happy

माझ्या असण्याची नव्हे... तुझ्या नसण्याची साक्ष द्यायला माझे सगळे श्वास होते...
>>>
ओह!
बेफाट लिहिलंय!

वाट पहाता पहाता काहितरी करावं... म्हणुन हल्ली जगते!
माझ्या असण्याची नव्हे... तुझ्या नसण्याची साक्ष द्यायला माझे सगळे श्वास होते... >>> सुंदरच!

लगे रहो! Happy

माझ्या असण्याची नव्हे... तुझ्या नसण्याची साक्ष द्यायला माझे सगळे श्वास होते...
फक्त तू नव्हतास!>>क्या बात Happy आवड्या Happy