कातिल डोळे...!
Submitted by चैतन्य दीक्षित on 12 April, 2011 - 09:46
पुण्यातल्या ओढणी बांधलेल्या अनेक अतिरेक्यांकडून घायाळ झाल्यानंतर सुचलेली कविता!!
कातिल डोळे शिकार होते हृदयांची
मुखचंद्रावर खुले पौर्णिमा विजयाची !
डोळे बाणच,धनुष्य आणिक भुवयांचे
रुते जिव्हारी टोक अनोख्या किमयांचे !
शिकार कसली? सावज म्हणते अतृप्त मी
निघेच ना का भात्यामधुनी शर हुकुमी?
असे म्हणेतो रुते कटाक्षाचा बाणऽ
सावज हरते,तृप्त जिंकते तरीपणऽ! (अवग्रह वाचनाच्या सोयीसाठीचे आहेत)
युद्ध संपते,निरोप होतो वळणांचा
जखमी सावज हिशेब करते बाणांचा
नंतर होते सुरू तयारी मलमांची,
पुन्हा लढाई हीच दवा त्या जखमांची!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा