नक्षत्रांचा घडा
Submitted by अजित अन्नछत्रे on 2 November, 2026 - 10:21
कुठे साचवू? भरुन वाहती नयनांच्या या कडा,
कुणी उधळला गगनामध्ये नक्षत्रांचा सडा !
सहज संचिली धनसंपत्ती ही पाचु, हिरे, माणकी
जपुन ठेवितो ताळ्यामध्ये राव रत्नपारखी !
माणिक-मोती, रत्नांनी जणु भरुनी गेला घडा..
कुणी उधळला गगनामध्ये नक्षत्रांचा सडा !
अगणित मोती, जड-जवाहिरे, जणू एकसारखी
अंबराचिया तबकामध्ये होत रत्न पारखी !
करांगुलीने ढकलून दिधला भरलेला तो घडा..
कुणी उधळला गगनामध्ये नक्षत्रांचा सडा !
विषय: