सांग ना?
Submitted by तुष्कीनागपुरी on 28 June, 2026 - 17:22
तू येता जगणे पुरे बदलले व्हावे कसे सांग ना?
आधीच्या जगण्यात मी परतुनी जावे कसे सांग ना?
.
येताना तुजला बघून हलके होते पिसा सारखे
ओझे मी लपवूनही पण तुला ठावे कसे सांग ना?
.
तू माझ्या जगण्यातली तरलता आनंद तू
तू तेथे नसता सभांमधुन त्या गावे कसे सांग ना?
.
वेगाने हृदयामधे धडधडे आश्वस्त माया तुझी
ठोके जे चुकते पुन्हा हृदय ते धावे कसे सांग ना?
.
नित्याने भुलणे अशी गहनता आहेस सौभाग्य तू
दुःखाने फिरुनी कधी जवळही यावे कसे सांग ना?
.
तुष्की नागपुरी
नागपूर, गुरूवार, १९ मार्च २०२६
विषय:
शब्दखुणा: