अजय जोशी

जरी वाटेल माझे बोलणे

Submitted by अ. अ. जोशी on 16 February, 2011 - 11:08

जरी वाटेल माझे बोलणे खोटे तुला
हृदय माझे कधी नव्हते दिले उसने तुला

मनाशी रोजची हितगूज होती चालली
तुझ्याशी बोललो मी वाटले होते तुला

जगाशी भांडल्याने आपले होते हसे
जगालाही मजा येते जशी येते तुला

जसा हा चंद्र आकाशी बदलतो वागणे
तसे आकाश त्या बदल्यात बोलवते तुला ?

महागाई किती प्रेमातही बघ वाढली
तरी स्वस्तात माझा भरवसा आहे तुला

मला तू सोडले आहेस नाही खंत ही
दिले आहे जगाशी बांधुनी नाते तुला

मला सर्वांपुढे तू टाळते आहेस; पण...
मला माहीत आहे कोण आवडते तुला

गुलमोहर: 

घोषणा झाली...

Submitted by अ. अ. जोशी on 6 November, 2010 - 08:33

घोषणा झाली मला फेटाळलेली...
'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली

माणसे झाली पहा आता शहाणी
फार पूर्वी भोवती घोटाळलेली

पालवी कोठे नसू द्या फार मोठी
आणि ती नक्की नको नाठाळलेली

एकही अश्रू दिसेना आज कोठे
गोष्ट होती आजही रक्ताळलेली

नेहमी असते खर्‍याची गोष्ट मागे
जातसे जत्रा पुढे वाचाळलेली

मद्य कसले घेत बसता धुंद होण्या....?
जीवने बनवा नशा फेसाळलेली..!

खोल आहे मी समुद्रासारखा; पण...
आजही देतो उन्हें गंधाळलेली

फायदा नसतो उधारी फेडण्याचा
माणसे गेल्यावरी सांभाळलेली

आजही गावाकडे लज्जा दिसावी...
जीवनाची लक्तरे गुंडाळलेली..!

टेकला माथा जिथे, तेथेच फुटला...

गुलमोहर: 

... स्मरण असावे

Submitted by अ. अ. जोशी on 17 October, 2010 - 11:49

विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे
'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..'

भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे...
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'

एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे

पानोपानी जीवन भरले रसरसलेले..
ती कुठली प्रतिभा होती की दळण असावे..?

आज कशाने भावुक झालो..? प्रेम दाटले..?
आज पहा, चंद्राला नक्की ग्रहण असावे

क्षणाक्षणाला बदलत असते 'हो' की 'नाही'
नशीबासही कोणतेतरी बटण असावे

लुकलुकणारे डोळे धापा टाकत होते
आयुष्याच्या अंतीसुद्धा चढण असावे...?

देव नाकारला पण विवेक सुटला नाही
त्यांच्या अंगी निश्चीतच देवपण असावे

गुलमोहर: 

का अजून वर्तमान...

Submitted by अ. अ. जोशी on 7 October, 2010 - 13:32

का अजून वर्तमान जातसे जळून..?
एकदा तुझाच भूतकाळ बघ वळून

नेहमीच जिंकणार तूच शर्यतीत
आपल्याच सावली पुढे-पुढे पळून

वेदने! नको करूस आणखी उशीर...
ये अशी मिठीत; वेळ जायची टळून...

द्या, हजार घाव काळजावरी खुशाल...!
एकदाच, पण बघा स्वतःसही छळून

काय राहिले तुझे अजून काळजात ?
जातसे अजून जीव आतला गळून...

द्या महत्त्व ज्या क्षणांस द्यायचे तिथेच...
वेळ टाळली कि फायदा नसे कळून

एवढे कधी महत्त्व मी दिले कुणास..?
आसवे तिची उगाच जायची ढळून....

जेवढी नसेल वाट काढली मळून
तेवढा विचार 'अजय' काढतो दळून

गुलमोहर: 

जरी सदा शांत...

Submitted by अ. अ. जोशी on 3 October, 2010 - 09:07

जरी सदा शांत मी भासतो
कधीतरी मीसुधा पेटतो

किती धरा मार्ग आपापला
कुणी उगाचच पुन्हा भेटतो

गुणाप्रमाणे समाजात मी
वयाप्रमाणे कुणी पाहतो

कधीच मी सोडली काळजी
तरी तुझा चेहरा भावतो

जगू नको तू दुराव्याविना
तुझ्यावरी जो सदा भाळतो

कळेल का झगमगाटा या...?
जगात साध्या 'अजय' राहतो...

गुलमोहर: 

विसरण्याला मद्यप्याला....

Submitted by अ. अ. जोशी on 2 October, 2010 - 06:32

विसरण्याला, मद्यप्याला ओठ हे धरतात का रे?
अन नशा आल्यावरीही अश्रु ओघळतात का रे?

ज्या फुलांना पाहिले की त्या मिठीचा गंध येतो
नेहमी गंधाळण्या कोमेजली असतात का रे?

पाखरे येतात काही आजही घरट्यात माझ्या
आठवांचे वेचुनी दाणे... पुन्हा उडतात का रे?

देह, घरटे एक झाले; वाटते होईल मनही...
या जशा जमतात आशा, त्या तशा उरतात का रे?

आजही साधेपणाने गात आहे 'अजय' गीते
ऐकणारेही तसे साधे कुणी मिळतात का रे?

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - अजय जोशी